प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप
नमो आता सद्गुरुनाथा! कर द्वय जोडूनि नमितो त्राता!
मज लाविले नाथपंथा। त्वांचि येवोनिया ॥१॥
तुझे नवल वर्णावया। वेदहि शिणले वाया।
ऐसा तू कृपाळू गुरुराया ! धन्य लीला तुझी ।।२।।
त्वाचि उपजविला भक्ति भाव । तूचि जगाचा उद्घारिता राव।
निर्मिले ब्रह्मा विष्णु महादेव । तुझेचि शक्तियोगे ।।३।।
तव स्वरूप वाटे सत्य सुंदर। मुळी असशी निर्विकार।
निरंजना! तुज नसोनि आकार। दाविशी लीला जगी पै ॥४॥
वाढविले देव- महिमान । जगी प्रगटला भक्तिकारण।
असोनिया स्वयेचि पूर्ण । पूर्णात्मा चितूनि दाविशी।।५॥
पाहोनिया तुझे स्वरूप। उद्धरलो वाटे आपोआप।
सुटे कामक्रोधासी कंप। वास करी क्षमाशांति॥|६॥
उडता धूळ तव चरणांची। कायावाचा साची।
तुटे बाधा द्वैताची। अद्वैत जोडी लाभूनि ।।७।।
आता नमस्कार तुजलागूनि। अन्य दुजा कवणा न मानी।
तूंचि मूळ कर्ता जाणोनि । शरण आलो तवपायी ॥४॥
प्रेमे गाता तव महिमा। तन्मय होई अंतरात्मा।
चालविणे नलगे इसर नेमा । गुण जो नित्य गाई तुझे ॥९॥
तूचि केला देश समोर। इतरांचा न लागे थार।
जेथे शिणला धराधर। तूचि आधार गुरुराया! ॥१०॥
त्वाचि वाढविला भक्ति-पंथ । बहुत उद्धरिले पापी अनाथ ।
न पाहशी शुद्ध शेत। कृपा करिशी दीनावरी ।।११।।
तूंचि प्रेमानंद सदोदित । राहशी सर्वांशीहि अलिप्त ।
तुझिया नामाचा पंथ । वाढू लागला जगामाजी ॥१२॥
काय उतराई होऊ संता। लाविले जेणे भक्तिपंथा।
परमहंस कृपानाथा। वरदान देई दासासी ।।१३।।
तूचि सद्गुरु रूपे येऊनि । उत्पत्ति स्थिति लया दावूनि ।
कर्ता-कारण-करणी। घेतली हाती तुवा ।।१४।।
विधिरूपे उत्पत्र करिशी। विष्णुरूपे प्रतिपाळिशी।
महेशांगे संहारिशी। सूत्रधारी तूचि एक ॥१५॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तूर्या । साक्षि तूचि गुरुवर्या !।
उपजोनि सृष्टि जाई विलया। नित्य तुझ्या दृष्टिपातें ॥१६॥
सकळ सूत्रे तुझ्या हाती। अभक्ता लाविशी भक्तिपंथी।
रिद्धि सिद्धि लोळती। चरणी तुझे ॥१७॥
तूंचि चराचरांचा कर्ता। सर्व जग हे तुझीच वार्ता । ।
इच्छेनुरूप केली समर्था ! फार काय बोलू? ॥१८॥
पूर्ण ईश्वर गमसी मजला। शरण जाऊ मी कवणाला?।
जैसा देही स्वर्ग उतरला। दुमदुमोनिया ॥१९॥
गुरुराया! तुझे आसन । दशव्यावरी करिशी शयन ।
जेथे नलगे मानपान। वासना आदि ॥२०॥
आता तन मन धनदि करून। तुला अर्पिला हा प्राण।
मज देई देई ज्ञान । ग्रंथवचन वदावया ॥२१॥
माझिया सद्गुरो मुरारी! धाव धाव गा जिव्हाग्री।
बैसवोनिया सत्रावी-तिरी। लोटवी पाझर प्रेमाचा ॥२२॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । द्वितीय प्रकरण संपूर्णम् ॥२॥
प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग
श्रोती व्हावे सावधान । लक्षी घ्यावे बोबडे वचन ।
सर्व तुम्ही साधुजन। म्हणोनि तुम्हां विनवीत ॥१॥
प्रथम करा सोपा उपाय । जेणे प्रपंचातचि मुक्त होय ।
फिटे चौयांशीचे भय। ग्रहण करिता अर्थ याचा ॥२॥
नको नकोत काही साधने। नको नको पहाडी राहणे ।
नको संसार तोहि सोडणे । भक्तिरूप उपाय तो ।।३।।
असोनि खुळा पांगळा । जो का उपाधी वेगळा।
असेल प्रपंचहि आगळा। तरी चालतले यालागी ।।४।।
कित्येक बोलती ब्रह्मज्ञान । शास्त्रपुराणे पठन करून ।
म्हणती पाहू पाहू ब्रह्मखूण। दावू लोका सर्वहि ।।५।।
रश्मीची ज्योति लावा। मग तिकडे दृष्टि फिरवा।
बह्ममणि दिसतो रे हिरवा। पाहा पहले एक दृष्टी ।।६।
ज्यासी आहे स्पष्ट दृष्टि । तो पाही दीप्ति गोमटी।
बिचारा आंधळा अंधदृष्टी। काय जाणे? ||७||
तयाने काय साधने करावी? ब्रह्मज्योति कैसी पाहावी?
म्हणोनि सर्वचि खरी मानावी। करावे दृढ ते एकचि ॥८॥
ब्रह्म काय दृष्टीने दिसे? आणि दिसे तितुके नाशे ।
ब्रह्म काय अंधाजवळी नसे? चराचरी व्यापक जे ।।९।।
जंव शुद्ध ज्ञानमार्ग न जाणला। कि भक्तिपंथे न गेला।
तोंवरी तया प्राण्याला। मुक्ति मिळेल कैंची? ।।१०।।
*अहं ब्रह्मास्मि* शब्द एक । तेथे जया न लाभे ऐक्य ।।
तो प्राणी जन्ममरण-शोक । सोडील केवि? ||११ ।।
जंव *तत्पद* पाहोनि *त्वंपद* शोधील। *असि* पदाचा मार्ग साधील ।
तंवचि मोक्षमार्ग लाभेल । हे तू सत्य जाण पा ।।१२ ।।
नेम धर्म अनुष्ठान । यांनी होशील जरी पावन ।
तरी मोक्षास आत्मज्ञान। पाहिजे गड्या! ।।१३ ।।
जंव सोडूनिया प्रवृत्ति। धरिशी दृढ भावे निवृत्ति ।
जरी होशील लीन संती। तरी ज्ञानदृष्टि देई तो ॥१४ ।।
श्रवण मननाचेनि योगे। निजध्यास लागे वेगे।
मग साक्षात्कार भोगे । तंववरी मुक्ति मिळेना ।।१५।।
वैखरी मध्यमा पश्यंति पर। हे वेदांचे जाण घर ।
चार वाचा तीच नार। वरी प्रेमनिर्झर सत्रावी ।।१६।।
पडे शुद्ध प्रेमकिरण जयावरी। अमृत वाचा पाझरी।
प्रगट ती वेदशब्द सत्य अवधारी। न ढळती बापारे! ।।१७।।
तया शब्दे जीव-शिव होती एक। मुळीचे ठावे पडे देख।
गंगाजळी टाकिता मलीनोदक । गंगारूप होतसे ।।१८ ।।
जरी करिशी यज्ञ अन्नदान । तरी मिळती स्वर्गादि भोग पूर्ण।
पुण्य सरलिया तेथून। उतरे भोगाया मृत्युलोकी ॥१९॥
म्हणू नि तूं ऐसे न करी। सांगती संत ते अवधारी।
लक्ष ठेवी पुरा-पुरी। माझिया बोला ॥२०॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते।
तुकड्यादास विरचिते । तृतीय प्रकरण संपूर्णम् ॥३॥