ग्रामगीता अध्याय सव्वीसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ईश्वर सर्वांठायीं व्यापला । तो पंथीं नाही विभागला । मग उणें-अधिक कोणाला । कां म्हणावें ? ॥१॥
ऐसें ऐकोनि निरूपण । एक श्रोता करी प्रश्न । देव विशाल व्यापक पूर्ण । मग कां समर्थन मूर्तीचें ? ॥२॥
असो कोणाहि धर्माची खूण । परि मूर्ति मानवांनी केली निर्माण । तिथे कोठलें देवपण ? तिचें पूजन कशाला ? ॥३॥
देव कुणाची पूजा नेघे । त्यास नको हें वाउगें । स्वयें बोलला भक्तासंगें । ’ मज हवें शुध्द प्रेम ’ ॥४॥
याचें ऐकावें उत्तर । प्रेम निर्मावें एका मूर्तीवर । तेंचि क्रमाने करावें विश्वाकार । हाच हेतु पूजनाचा ॥५॥
देवाची स्मरणमूर्ति बघतां । त्याचें जीवनकार्य ध्यानीं आणतां । शक्ति येते मनासि तत्त्वता । मानसिक संयोगें ॥६॥
मनासि लावावया चिंतन । लागावया मार्गाचें आकर्षण । नेमिलें असे प्रतिमापूजन । साधुसंतीं ॥७॥
मनास पाहिजे कांही आधार । म्हणोनि आरंभीं मानिले साकार । देवें व्यापिलें चराचर । तेथे मूर्ति तद्रुपचि ॥८॥
परि जो सिध्दान्ताचा पुरस्कर्ता झाला । त्यासहि जन देव बोलला । त्याचीहि प्रतिमा पूजूं लागला । भोळेपणाने ॥९॥
जरी पूजिली व्यक्तिमूर्ति । तरी चुकलें मी न म्हणे चित्तीं । परि सिध्दांत वाउगे राखिती । हें तों आहे अज्ञानपण ॥१०॥
सुखासाठी आखिली दिशा । रेखिला घराचा नकाशा । परि लाभली शेवटीं निराशा । नकाशाचि राखतां ॥११॥
घर राहाया नाही मिळालें । नकाशे नकाशेच राहिले । तेणें समाधान भंगलें । जाणीव होतां पुढे पुढे ॥१२॥
तैसेंचि झालें मूर्तिपूजेचें । जे जे पंथ दिसती आजचे । तेथील साधक मूर्तिपूजेपुढचें । कांहीच नेणे ॥१३॥
तो मूर्ति धरोनीच बसला । मूर्खचि समजतो पुढचियाला । म्हणतो भ्रष्टाचार झाला । मूर्तिपूजेवांचोनि ॥१४॥
त्यासि कळला नाही धर्म । मूर्तिपूजेचें काय वर्म । उगीच वाढवूनि घेतला भ्रम । बिचार्याने अंतरीं ॥१५॥
घरीं देवाचा कट्टर पुजारी । असत्य करीत असे बाजारीं । व्यवहार करितां झाला वैरी । ज्याचा त्याचा ॥१६॥
देवळामाजीं कान घरी । नाक धरोनि प्राणायाम करी । बाहेर येतां शिवी दे, कावरी । ज्यासि त्यासि ॥१७॥
देवाद्वारीं हवन करी । बाहेर भिकार्यासि मारी । पोटा न दे चूनभाकरी । उपाशीयाच्या कधीहि ॥१८॥
आमचा देव सत्यचि बोले । परि आम्हीं पाहिजे खोटें केलें । ऐसें असोनि भक्त झाले । म्हणती आम्ही ॥१९॥
स्वयें म्हणवी रामभक्त । नाही एकपत्नीव्रत । नित्य पूजितो हनुमंत । व्यसनें झाला प्रेताऐसा ॥२०॥
देव दुर्जनासि संहारी । कष्ट करितो भक्तांघरीं । भक्त बघा हा व्यभिचारी । आळसे घरीं झोपतसे ॥२१॥
देव म्हणे ’ मी सर्वत्र । दीनरंक माझे पुत्र ’ । उपासक त्यांसि दिवसरात्र । पिळोनि चैन भोगितसे ॥२२॥
’ प्रभु आमुचा पतितपावन ’ । म्हणोनि कंठरवें करी गायन । मानवासि अस्पृश्य हीन । मानून डौल मिरवितो ॥२३॥
देवाचिया मूर्तीसाठी । सोने हिरे बैसवी मुकुटीं । न दे श्रमिकासि लंगोटी । मंदिर बांधतां मेला तरी ॥२४॥
कसलें हें देवपूजन ? मूर्तिपूजेचें विडंबन । केवढें शिरलें आहे अज्ञान । आपणांमाजीं ! ॥२५॥
देवळामाजीं करी भजन । बाहेर येतां खोटें भाषण । ऐशा पुजार्या पुसेल कोण ? सांगा तरी ॥२६॥
म्हणोनि हें वाईट विसरावें । पूजेने पूज्यासि ओळखीत जावें । अभ्यासाने पाऊल टाकावें । पुढे पुढे ॥२७॥
जैसी ज्याची भावना । त्याने तैसीच मानावी देवता मनां । परि न चुकावी उपासना । सत्कर्मांची ॥२८॥
मूर्तिपूजेचा अर्थ एक । आपण मूर्तीच व्हावें सम्यक । म्हणजे करावी तैसी वागणूक । अभ्यासाने ॥२९॥
जयाची मूर्ति उपासावी । तयाची चरित्रकथा वाचावी । पुढे कामेंहि करीत जावीं । आपणहि तैसीं ॥३०॥
काय केलें माझिया देवें । मजसी मुळीच नाही ठावें । फक्त मूर्तीच धरोनि बसावें । हें वेडेपणाचें ॥३१॥
ऐसी असावी उपासना । उपासनीं वाढवावें कर्तव्यगुणा । कर्तव्यपूर्तीने मोठेपणा । अंगीं घ्यावा मिळवोनि ॥३२॥
संकटें येतां कार्यामाझारीं । चिंतनीं घ्यावें चारित्र्य अंतरीं । अभ्यासाचें तेज वृत्तीवरि । वाढवावें सर्वकाळ ॥३३॥
चुकलिया संतां विचारावें । पुढे कार्य करावयासि धजावें । आपुल्या परीने सुख देत जावें । जीवांलागीं ॥३४॥
यासाठीच मूर्तिस्थापना । ठायींठायीं केली जाणा । आठवण राहावी साधकांना । म्हणोनिया ॥३५॥
पदोपदीं हो पवित्र वृत्ति । म्हणोनि स्थळोस्थळीं स्थापिली मूर्ति । वृक्षपशुपक्षी ठरविल्या विभूति । सदभावासाठी ॥३६॥
मनोभावें मूर्तीसि पुजावें । श्रवण, कथन, स्मरणादि करावें । मूर्तीप्रमाणे सत्कर्म घडावें । आपुलिया अंगें ॥३७॥
सर्व सोडोनि भिन्न भावना । हृदयीं धरावी उपसना । जेणें प्रसन्नता येई मना । तेंचि उत्तम समजावें ॥३८॥
मन जेथे समाधान पावे । तेथूनि शक्तीचें तेज घ्यावें । मग कार्यासि लागावें । सदगुणी ऐशा ॥३९॥
सदभावें करावें पूजन । विनम्र करोनिया देहमन । निर्मळ असावें वातावरण । ध्यान धराया देवाचें ॥४०॥
येथे मानसिक पूजेचेंच महत्त्व । विचारसामर्थ्य हें मूलतत्त्व । तेणेंचि पावे ईश्वरत्व । जीवालागी प्रयत्नें ॥४१॥
जीवासि मूळतत्त्व कळावें । सर्वांभूतीं आत्मरूप समजावें । ऐसेचि पूजनाचे गोडवे । वर्णिले संतीं ॥४२॥
संतीं बोलिलें हरिनांम घ्यावें । हेंहि वाटे साधन बरवें । परि अर्थ समजोनि जपावें । तरीच सार्थक जीवाचें ॥४३॥
नाम ईश्वराची शब्दमूर्ति । ’ मुखीं नाम हातीं मोक्ष ’ म्हणती । यज्ञाहूनि थोर जपावी महती । ठाऊक हें सर्वां ॥४४॥
परि कासयासि जपावें नाम । साधावयाचें तें कोण काम । या ध्येज्ञानावांचोनि सर्व कर्म । निरर्थक ॥४५॥
कितीतरी जन नाम घेती । माळा-मणी ओढीत राहती । परि क्षणहि त्यांची मति । रामीं न रंगे ॥४६॥
मुखें नाम उच्चारिती । व्यवहार अधोगामी करिती । पापें करोनि शपथ घेती । देवधर्मांची ॥४७॥
कसलें हें नाम जपणें ? स्वार्थें विश्वासघात करणें । आशातृष्णा न सोडणें । इंद्रियविषायांची ॥४८॥
येथे तारतम्यचि पाहिजे । नामजपीं व्रतस्थ होइजे । तरी जीवास सुखाचें साजे । स्थान जीवनीं ॥४९॥
मुखीं नामाचें चिंतन । हातीं सेवाकर्य पूर्ण । करील चारित्र्य संपादन । तोचि भक्त ॥५०॥
नामें शक्ति येते अंगीं । संकटें निवारण्याची प्रसंगीं । परि पुरुषार्थ असावा जंगी । तरीच फळे ॥५१॥
दुराचार सज्जन-विरोध । ऐसे दोष आणिती बाध । काया-वाचा-मनें टाळिले अपराध । तरीच फळे ॥५२॥
मग तें नाम मंदिरीं जपावें । अथवा शेतीमाजीं घ्यावें । चालतां बोलतांहि गावें । तरी तो यज्ञ ॥५३॥
मुख्य नामाचें अधिष्ठान । कर्तव्य करावें संपादन । हेंचि साधावया संतजन । नामजप सांगती ॥५४॥
जे पुरुषार्थ सोडोनि जपती नाम । त्यांसि कैसा पावेल आराम ? हें तों झालें आंधळें काम । देवाद्वारीं ॥५५॥
आमुचा राम कामें करी । आम्ही मागावी भाकरी । होवोनि फिरावें भिकारी । ही भक्ति कैची ? ॥५६॥
रामें असुरांसि मर्दावें । आम्हीं पूजापात्र अवलंबावें । निर्बल होवोनि शरण जावें । ही भक्ति कैची ? ॥५७॥
भक्त म्हणजे विभक्त नव्हे । एकरूपचि होवोनि जावें । देवें लोकांचें दु:ख हरावें । आम्हीं का करावें देवदेव ? ॥५८॥
ऐसा जप जयाने केला । तो शेवटीं मूर्खचि राहिला । बोल देवोनिया देवाला । काय होतें ? ॥५९॥
पापक्षालनासि नाम घ्यावें । पुढती पाप करीतचि जावें । ऐसें कोण वदलें बरवें । सांगा मज ॥६०॥
ऐसी आहे ज्यांची स्थिति । त्यांसि नामजपी म्हणती । मी म्हणेन कलंक लाविती । नामादिकासि ते ॥६१॥
याहूनि न जपे तो पुरवला । उत्तम राहणी ठेवी जो भला । दु:ख न देईच कोणाला । कोण्या प्रसंगीं ॥६२॥
व्यवहार करीतसे कष्टून । जोडोनिया उद्योगें धन । सदा राहतो प्रसन्न । खेळींमेळीं प्रेमभावें ॥६३॥
असेल तें गरजूंना देणें । कोणा उत्तम-वाईट न म्हणे । आपणा ऐसें सर्वांचें जाणे । सुखदु:ख सज्जन ॥६४॥
हेंचि शिकावयासाठी । नामजप सांगितला उठाउठी । सदा राहणी गोमटी । प्रेमळपणाची सर्वांशीं ॥६५॥
प्रथम नाम दुजें चिंतन । तिजें निश्चयीं लावावें मन । मग होवोनि सत्कार्यप्रवण । समाजसेवा साधावी ॥६६॥
ऐसें सत्कर्म जरी नाचरवें । सदगुण विसरोनि नामचि गावें । तरी तें पूर्णतेस न पावे । आत्मोन्नतीच्या ॥६७॥
म्हणोनि संतांचिया वचना । निरीक्षोनि ठेवावी धारणा । तरीच ग्रंथीं कथिल्या त्या खुणा । पावती रामनामाच्या ॥६८॥
देव बोलला ’ कामें करा । निर्भय होवोनि देशीं विचरा ’ । सकळ देवाचाचि पसारा । सेवाभाव साधा ॥६९॥
जनता ज्याला देवरूप कळली । त्याचीच भक्ति देवा पावली । साक्षात्कारें वृत्ति वळली । विश्वात्मभावीं ॥७०॥
तें साधाया बोलिलें नाम । लाभावया जीवास आराम । तुटावया अज्ञानभ्रम । दु:खमूळ जो ॥७१॥
आपण तरूनि जग तारावें । शक्तियुक्तीने विश्व भरावें । नामें लोकांसि जागवावें । ऐसा आदेश संतांचा ॥७२॥
संतमुकुटमणि तुकाराम । त्यांनी अभंग कथिले अति सुगम । मार्ग केला व्यवहारक्षम । भोळयाभाळया जनांसाठी ॥७३॥
अत्यंत साधी गर्जली वाणी । गेली वेदादिकांस भेदोनि । भ्रमचि निवारिला तत्क्षणीं । अज्ञानी जडजीवांचा ॥७४॥
हजारो मुखांतूनि गरजला । ’ वेदान्त आम्हांसीच कळला ’ । ’ ज्याने पंढरीराज वंदिला । सर्व पावला शास्त्रगुह्य ’ ॥७५॥
म्हणे ’ नको ब्रह्मज्ञानादि भाव । आत्मस्थितीचा गौरव । आम्ही भक्त तूं चहूकडे देव । ऐसें करी आम्हांसि ’ ॥७६॥
’ कोठोनि आणावी विद्वत्ता ? सेवेंचें काम आमुच्या हातां । नाम गाऊं कष्ट करितां । पंढरीनाथा पावाया ’ ॥७७॥
प्रभूने ऐकिली त्यांची सेवा । संकटीं आला ऐकोनि धांवा । त्यांच्या शब्देंहि लोक तरावा । ऐसा केला चमत्कार ॥७८॥
ऐसे झाले संत अनेक । मूर्तिभक्त बहु नामधारक । जे सेव्यचि झाले असोनि सेवक । हनुमंतापरी ॥७९॥
सर्वचि पंथांचे भक्तिप्रकार । तत्त्व साधतां असती सार । हा आचरोनि दाविला समन्वय सुंदर । रामकृष्ण परमहंसें ॥८०॥
नाम जपोनि मूर्ति पूजितां । देवचि झाले देवा भजतां । पूजूं लागले विश्वा समस्ता । स्त्रीपुरुष-भेद विसरोनि ॥८१॥
मूर्तिपूजा जपतप कांही । तत्त्व साधतां बाधक नाही । हें सिध्दचि केलें अनुभवें पाही । संतजनांनी ॥८२॥
उत्तम भाकरी करितां यावी । म्हणोनि मुलीने मातीची करावी । तैसी अमूर्त देवाचा मार्ग दावी । मूर्तिपूजा ही ॥८३॥
देव आहे मूळचा अंतरीं । त्याची साधना करावी लागे बाहेरी । ओळख पटतां विचारें पुरी । भिन्नपणा राहीना ॥८४॥
सत्कर्मांचें ज्ञान झालें । सत्कर्म करणें अंगीं आलें । मूर्तिपूजेचें साधन संपलें । साधकाचें ॥८५॥
राहिलें जीवनांत तैसे वागणें । देव भजतां देवचि होणें । देव होण्याचीं कारणें । अनुभवोनिया ॥८६॥
माझा देव दयावंत । पुरवी हीनदीनांचे मनोगत । मजसी पाहिजे निष्ठावंत । तेंचि केलें ॥८७॥
ऐसा जप जाले अंतरीं । हातीं व्यवस्थेची चाकरी । लागला रंग याचिपरीं । अहोरात्रीं देहाला ॥८८॥
आता परोपकारचि उरला । देव अंतरी-बाहेरी भरला । पाहणेंचि नाही दुसर्या कोणाला । कोणे ठायीं ॥८९॥
विसरोनि गेले व्यक्तिपण । झाले कार्यरूपचि आपण । ऐसें होतां देवपण । अंगीं आलें धांवोनि ॥९०॥
नाना विरोधकांस तोंड दिलें । नाना कष्ट सहन केले । शेवटी सर्वांनी ठरविलें । हेंचि खरें म्हणोनि ॥९१॥
पूर्वी मूर्तीस शृंगार करी । तैसेंचि मानवांसि शृंगारी । ’ कष्ट नसो कोण तिळभरी । गांवीं माझ्या ’ म्हणोनि ॥९२॥
हीच खरी देवपूजा । याविण नाही मार्ग दुजा । संतदेव बोलिले माझ्या । हृदयामाजीं येवोनि ॥९३॥
देव जैसा जैसा आकळला । तैसा देह-अंहकार मावळला । लवणकण सागरीं मिळाला । सागर झाला एकत्वें ॥९४॥
यापरी पुढची आहे पायरी । जैसी वृत्ति धरोनि चढाल वरी । तैसा जीव ब्रह्म होवोनि अंतरीं । अनुभव घेई आपणचि ॥९५॥
म्हणे मीचि सर्व आता झालों । विश्वीं विश्वाकार होवोनि ठेलों । सर्वचि कार्ये करूं लागलों । आपणाचि साठी ॥९६॥
माझ्याविरहित कोणी नुरला । अणुरेणूमाजीं मीचि संचला । ऐसा अनुभव येतां झाला । पूर्ण योगी ॥९७॥
प्रथम पाहिली देवुळीं मूर्ति । पुढे पाहिलें जीवजनाप्रति । पूर्णता होतां सर्वत्र व्याप्ति । आपुल्याचि रूपाची ॥९८॥
ऐसी लाभावया आनंद-ठेव । पूजावयासि मांडिला देव । द्रष्टा-दृश्य-दर्शनभाव । एकतत्त्वी दिसावया ॥९९॥
हाचि धरोनि निर्धार । केलिया नवविध पूजाप्रकार । पावेल सर्वोत्तम सार । ईश्वरभक्तीचा ॥१००॥
एरव्ही कितीहि पूजिली मूर्ति । तरी वाढचि घेईल भ्रांति । न मिळेल कदाकाळीं शांति । जनामनासि ॥१०१॥
नसता वाढेल अहंकार । ’ आमची प्रतिमा अधिक थोर ’ । न मिटेल पंथद्वेष साचार । व्यापक ईश्वर जाणल्याविण ॥१०२॥
म्हणोनि प्रतिमा धरोनीच न बसावें । पायरीने वाढत जावें । क्रियाशीलपणें विश्वीं पाहावें । विश्वंभरासि ॥१०३॥
सर्व लोकचि आमुचा ईश्वर । सर्व गांवचि आमुचें मंदिर । सेवा करणें निरंतर । पूजा आमुची ॥१०४॥
प्रामाणिकतेने करणें काम । हेंचि आमुचें ईश्वरनाम । सर्व जीवमात्राशीं ऐक्यप्रेम । धर्म हा आमुचा ॥१०५॥
हाचि दृढ धरितां निर्धार । परमार्थ याहूनि नाही थोर । किंबहुना हाचि परमार्थ-सार । अनुभवियांचा ॥१०६॥
अंगीकारोनि या तत्वांसि । एक करावें सर्व भक्तांसि । लावावें पूजाया ग्राममंदिरासि । तुकडया म्हणे ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । पूजनस्मरण-रहस्य कथित । सहविसावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
ग्रामगीता अध्याय सव्वीसावा ग्रामगीता अध्याय सव्वीसावा ग्रामगीता अध्याय सव्वीसावा ग्रामगीता अध्याय सव्वीसावा ग्रामगीता अध्याय सव्वीसावा
ref:transliteral