संत तुकाराम गाथा १ अनुक्रमणिका नुसार
अ अं
६७१
अखंड जया तुझी प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज बा नानीं कांटाळा ॥१॥
पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥ध्रु.॥
तुह्मी आह्मी पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दाराशीं ॥२॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । आता माझा आव्हेर ॥३॥
२५००
अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥
याची जाली बोळवण । आतां न देखों तो शीण ॥ध्रु.॥
बहुतांची दासी । तये घरीं सासुरवासी ॥२॥
तुका म्हणे मुळें । खंड झाला एका वेळें॥३॥
३०९३
अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धी ॥१॥
काय म्हणावें तयासी । तो केवळ पापरासि ॥ध्रु.॥
जो स्मरे राम नामा । तयासी म्हणावें रिकामें ॥२॥
जो तीर्थव्रत करी । तयासी म्हणावें भिकारी ॥३॥
तुका म्हणे विंचाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं ॥४॥
३११०
अगत्य ज्या नरका जाणें । वीट मानणे कीर्तने ॥१॥
नावडेसा झाला बाप । आलें पाप वस्तीसि ॥ध्रु.॥
नारायण नाहीं वाचे । ते यमाचे अंदण ॥२॥
तुका म्हणे अभक्तासी । माता दासी जगझोडी ॥३॥
११४०
अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥१॥
ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥ध्रु.॥
मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥२॥
उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥३॥
उरलें तें एक हें चि मज आतां । अवघें विचारितां शून्य जालें ॥४॥
तुका म्हणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥५॥
३३८३
अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईच्या वरा पांडुरंगा ॥१॥
अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥ध्रु.॥
अगा कृपावंता जीवन तूं दाता । अगा सर्वसत्ता धरितिया ॥२॥
अगा सर्वजाणा अगा नारायणा । करुणवचना चित्त द्यावें ॥३॥
तुका म्हणे नाहीं अधिकार तैसी । सरती पायांपाशीं केली मागें ॥४॥
४०२४
अगा ये वैकुंटनायका । अगा ये त्रैलोक्यतारका । अगा जनार्दना जगव्यापका । अगा पाळका भक्तांचिया ॥१॥
अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा । अगा बळिबंध वामना। अगा निधाना गुणनिधी ॥ध्रु.॥
अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा । अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥२॥
अगा महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा । अगा सुंदरा सहस्रभुजा । पार मी तुझा काय वर्णप ॥३॥
अगा अंबॠषिपरंपरा। निलारंभ निर्वीकारा । अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनाचिया ॥४॥
अगा धर्मराया धर्मशीळा । कृपासिंधु कृपाळा । अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ॥५॥
अगा चतुरा सुजाणा । मधुरागिरा सुलक्षणा । अगा उदारा असुरमर्दना । राखें शरणा तुकयाबंधु ॥६॥
४०२०
अगा ए सावळ्या सगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसा विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ॥१॥
बहु या उदराचे कष्ट । आह्मांसि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥ध्रु.॥
जालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥२॥
येथें तों नये आठव कांहीं । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं दिसे चि ना ॥३॥
जीवित्व वेचलों वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांहीं व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥४॥
माझा मीं च जालों शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगदगुरु तुका म्हणे ॥५॥
१५८६
अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें ॥१॥
अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥ध्रु.॥
ब्रम्हहत्याराशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥२॥
तुका म्हणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥३॥
३२६०
अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भक्ता हातीं चोट आहे ॥१॥
देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसीं पापी पापें लिंपताती ॥ध्रु.॥
एकी बेकी न्यायें होतसे प्रचित । तेणें लोक समस्त भुलताती ॥२॥
तयाचे स्वाधीन दैवतें असती । तरी कां मरती त्यांचीं पोरें ॥३॥
तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा । भक्त कान्होबाचा तो ही नव्हे ॥४॥
२८३८
अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनितां ॥१॥
मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेई । भाव खरें लोपे ना ॥ध्रु.॥
आपुलाले तुम्ही पुसा । सोवा पेव्याच सरिसा । थिरावल्या कैसा काय । जाणों विचार ॥२॥
तुका म्हणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥३॥
३०१९
अंगीं ब्रम्हक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥१॥
आंतेजा खिचडी घेताती मागून । गाळिप्रधानि मायबहिणी ॥ध्रु.॥
उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥२॥
तुका म्हणे ऐसी कलयुगाची चाली । स्वार्थे बुडविलीं आचरणें ॥३॥
२७६८
अंगी भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ॥१॥
कैसें न कळे त्या डेंगा । हित आदळलें अंगा ॥ध्रु.॥
जीव जाते वेळे । भल्या कडे ताठी डोळे ॥२॥
मुसळाचें अनु । तुका म्हणे नव्हे धनु ॥३॥
२०१६
अंगें अनुभव जाला मज । संतरजचरणांचा ॥१॥
सुखी जालों या सेवनें । दुःख नेणें यावरी ॥ध्रु.॥
निर्माल्याचें तुळसीदळ । विष्णुजळ चरणींचें ॥२॥
तुका म्हणे भावसार । करूनि फार मिश्रित ॥३॥
३९९३
अगोचरी बोलिलों आज्ञेविण आगळें । परी तें आतां न संडावें कृपाळू राउळें ॥१॥
जाईल रोकडा बोल न पुसती आम्हां । तुझा तुझें म्हणविलें पाहा पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥
न व्हावा न वजावा न कळतां अन्याय । न धरावें तें मनीं भलता करा उपाय ॥२॥
म्हणे तुकयाबंधु हीन मी म्हणोनि लाजसी । वारा लागों पाहाताहे उंच्या झाडासी ॥३॥
८२४
अग्नि तापलिया काया चि होमे । तापत्रयें संतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथें । न चुके संसारस्थिति । राहाटघटिका जैसी फिरतां चि राहिली । भरली जाली होती एके रितीं । साधीं हा प्रपंच पंचाय अग्न । तेणें पावसील निजशांती रे ॥१॥
नारायण नाम नारायण नाम । नित्य करीं काम जिव्हामुखें । जन्म जरा व्याधि पापपुण्य तेथें । नासती सकळ ही दुःखें रे ॥ध्रु.॥
शीत उष्ण वन सेवितां कपाट । आसनसमाधी साधीं । तप तीर्थ व्रत दान आचरण। यज्ञा नाना मन बुद्धी । भोगा भोग तेथें न चुकती प्रकार । जन्मजरादुःखव्याधि । साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमीं अविनाश साधीं रे ॥२॥
घोकितां अक्षर अभिमानविधि । निषेध लागला पाठी । वाद करितां निंदा घडती दोष । होय वज्रलेपो भविष्यति । दूषणाचें मूळ भूषण तुका म्हणे । सांडीं मिथ्या खंती । रिघोनि संतां शरण सर्वभावें । राहें भलतिया स्थिती रे ॥३॥
१९९१
अग्निमाजी गेले । अग्नि होऊनी तेच ठेले ॥१॥
काय उरले तयापण । मागील ते नाम गुण ॥ध्रु.॥
लोह लगे परिसा अंगी । तोही भूषण जाला जगी ॥२॥
सरिता वोहळा ओघा । गंगे मिळोनी जाल्या गंगा ॥३॥
चंदनाच्या वसे । तृण चंदन जाले स्पर्शे ॥४॥
तुका म्हणे जवळा संता पायी । दुजेपणा ठाव नाही ॥५॥
१२११
अग्नि हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तोचि तापे जाणोनियां ॥१॥
उदक म्हणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥
काय वस्त्र म्हणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥२॥
तुकयास्वामी म्हणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागूनियां ॥३॥
९९८
अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अंतु । होय शुद्ध न पवे धातु । पटतंतुप्रमाणे ॥१॥
बाह्यरंगाचें कारण । मिथ्या अवघें चि भाषण । गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥
पुरें मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधीं भंगेना ॥२॥
हस्ती परदळ जो भंगी । तया पायीं न मरे मुंगी । कोण जाय संगी । पाणोवाणी तयाच्या ॥३॥
पिटितां घणें वरी सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥४॥
लीन दीन हें चि सार । भव उतरावया पार। बुडे माथां भार । तुका म्हणें वाहोनि ॥५॥
१३३९
अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निजखुण राहिलों ते ॥१॥
आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ध्रु.॥
एकविध भाव नव्हे अभावना । आणिक या गुणां न मिळवे ॥२॥
तुका म्हणे माझे पडिलें आहारीं । ध्यान विटेवरी ठाकले तें ॥३॥
३०३६
आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरी स्मरला नाहीं तुज ॥१॥
प्राण जातेवेळे म्हणे नारायण । त्यासाठी विमान पाठविलें ॥ध्रु.॥
बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥२॥
तुका म्हणे भक्तकाज तूं कैवारी । तुज साही चारी वर्णिताती ॥३॥
३६७०
अझुनि कां थीर पोरा न म्हणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥१॥
मोकळा होतासि कां रे पडिलासि डाई । वरीलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ध्रु.॥
मेळवूनि मेळा एकाएकीं दिली मिठी । कवळिलें एक बहु बैसविलीं पाठीं ॥२॥
तळील तें वरी वरील तें येतें तळा । न सुटे तोंवरी येथें गुंतलिया खेळा ॥३॥
सांडितां ठाव पुढें सईल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥४॥
तुका म्हणे किती आवरावे हात पाय । न खेळावें तोंच बरें वरी न ये डाय ॥५॥
२०३५
अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥
काय करावें तें मौन । दाही दिशा हिंडे मन ॥ध्रु.॥
बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥२॥
नाहीं इंद्रियां दमन । काय मांडिला दुकान ॥३॥
६२७
अणुरेणुयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुनि सांडिलें कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥२॥
तुका म्हणे आतां । उरलों उपकारापुरता ॥३॥
३७४३
अंतरली खुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥१॥
बाप बळिया शिरोमणी । उतावळि या वचनीं । पडलिया कानीं । धांवा न करी आळस ॥ध्रु.॥
बळ दुनी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता । आइतें चि दाता । पंगतीस बैसवी ॥२॥
वाहे खांदीं पाववी घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवे ॥३॥
सारविलें निकें । वरी माजी अवघें फिकें ॥४॥
तुका ह्मणे अंतीं । कांहीं न लगे चि हातीं ॥५॥
९५३
अंतराय पडे गोविंदीं अंतर । जो जो घ्यावा भार तो तो बाधी ॥१॥
बैसलिये ठायीं आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा ॥ध्रु.॥
अखंड तें खंडे संकल्पीं विकल्प । मनोजन्य पाप रज्जुसर्प ॥२॥
तुका म्हणे विधी विश्वंभर वसे । राहों ऐसे दशे सुखरूप ॥३॥
७९७
अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥
घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥
मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥२॥
नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥३॥
तुका म्हणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥४॥
५
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥
आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥२॥
तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥३॥
११६२
अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥१॥
तेथींचा आनंद ब्रम्हांडीं न समाये । उपमेशीं काये देऊं सुखा ॥ध्रु.॥
भावाचे मथिलें निर्गुण संचलें । तें हें उभें केलें विटेवरी ॥२॥
तुका म्हणे आम्हां ब्रम्हांड पंढरी । प्रेमाची जे थोरी सांठवण ॥३॥
११४४
अंतरींचें गोड । राहें आवडीचें कोड ॥१॥
संघष्टणें येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥ध्रु.॥
उचिताच्या कळा । नाहीं कळत सकळा ॥२॥
तुका म्हणे अभावना । भावीं मूळ तें पतना॥३॥
१६६७
अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना ॥१॥
तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥
नव्हती मोडामोडी । केली मागें ते चि घडी ॥२॥
तुका म्हणे दिला ठाव । पायीं लागों दिला भाव ॥३॥
७३२
अंतरींचें ध्यान । मुख्य या नांवें पूजन ॥१॥
उपाधि तें अवघें पाप । गोड निरसतां संकल्प ॥ध्रु.॥
आज्ञा पाळावी हा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥२॥
तुका म्हणे वृत्ति । अविट हे सहज स्थिति ॥३॥
१७३७
अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥१॥
उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥
शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥२॥
तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईविण नाहीं ॥३॥
२६४
अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥१॥
त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु.॥
प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥२॥
तुका म्हणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥३॥
९३
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥
वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥
तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥
२९०९
अद्वय चिद्वय झालें चि कारण । धरिलें नारायणें भक्तिसुख ॥१॥
अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज । एकतत्व बीज भिन्न नाहीं ॥ध्रु.॥
शून्य निरसुनी राहिलें निर्मळ । तें दिसे केवळ विटेवरी ॥२॥
सुखें घ्यावें नाम वदनाही वाड । सरिता वापी आड एक पाणी ॥३॥
तुका म्हणे मी च आहें तेणें सुखें । भेद नाहीं मुखें नाम गाता ॥४॥
२९१४
अद्वैतीं तों नाही । माझे समाधान हेंची अनुष्ठान नाम तुझे ॥१॥
करुनी उचित देई हेची दान । आवडे कीर्तन नाम तुझे ॥ध्रु.॥
देव भक्त सुखाच सोहळा । ठेउनी निराला दावी मज ॥२॥
तुका म्हणे आहे तुझे हे । सकळ कोण्या एके काळे देई मज ॥३॥
१५३
अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥१॥
विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयां विण ॥ध्रु.॥
सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥२॥
तुका म्हणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥३॥
३२६१
अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥१॥
पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥
अधमाचें चित्त दुश्चित्त ऐकेना । वांयां वीण मना करूंनी काय ॥२॥
गर्धबासी दिली चंदनाची उटी । केशर लल्हाटीं शुकराच्या॥३॥
पतिवंचकेसी सांगतां उदंड । परि तें पाषांड तिचे मनीं ॥४॥
तुका म्हणे तैसें अभावीका सांगतां । वाउगा चि चित्ता सीण होय ॥५॥
११७३
अंधळ्याची काठी । हिरोनियां कडा लोटी ॥१॥
हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥ध्रु.॥
चाळवूनि हातीं । साकर म्हणोनि द्यावी माती ॥२॥
तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥३॥
३७३८
अधिकाचा मज कांटाळा । तुम्हां गोपाळां संगति ॥१॥
काय नाहीं तुम्हापाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ध्रु.॥
उद्वेगाचा नेघें भार । लागल्या सार पुरतें ॥२॥
तुका म्हणे अधीर जिणें । नारायणें न करावें ॥३॥
२५४
अधिकार तैसा दावियेला मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥१॥
जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥३॥
२४३४
अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें ॥१॥
मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी ॥२॥
तुका म्हणे फांसे वाघुरा कुऱ्हाडी । प्रसंगी तों काढी पारधी तो ॥३॥
२२२५
अधीरा माझ्या मना ऐक एक मात । तूं कां रे दुश्चित निरंतर ॥१॥
हे चि चिंता काय खावें म्हणऊनि । भले तुजहूनि पक्षीराज ॥ध्रु.॥
पाहा ते चातक नेघे भूमिजळा । वरुषे उन्हाळा मेघ तया ॥२॥
सकळयातींमध्यें ठक हा सोनार । त्याघरीं व्यापार झारियाचा ॥३॥
तुका म्हणे जळीं वनीं जीव एक । तयापाशीं लेख काय असे ॥४॥
३७२१
अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरी हा बाळक नंदा घरीं ॥१॥
नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥
पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥
विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥
तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥
२३७७
अनंत ब्रम्हांडें । एके रोमीं ऐसें धेंडें ॥१॥
तो या गौळियांचे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी ॥ध्रु.॥
मारीले दैत्य गाडे । ज्यांचे पुराणीं पवाडे ॥२॥
तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥
२६१०
अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हां ॥१॥
माझें कोठें आलें होईल विचारा । तरीं च अव्हेरा योग्य झालों ॥ध्रु.॥
सर्वकाळ तुम्ही असा जी संपन्न । चतुरा नारायण शिरोमणि ॥२॥
तुका म्हणे ऐसे कलियुगींचे जीव । तरी नये कीव बहुपापी ॥३॥
२७०८
अनंताच्या ऐकों कीर्ती । ज्याच्या चित्तीं हरीनाम ॥१॥ उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनियां ॥ध्रु.॥
आतां हळुहळु ते चि वाहीं । चालों कांही अधिकारें॥२॥
खुंटूनियां गेले नावा । नाहीं हेवा खोळंबला ॥३॥ न लगे मोल द्यावा रुका । भावें एका कारणें॥४॥
तुका म्हणे पाहतों वाट । उभा नीट पाउलीं॥५॥ भीमातिरीं थडवा केला । उठा चला लवलाहें ॥६॥
२८०१
अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज काळें येणें कृपा कीजे ॥१॥
अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥ध्रु.॥
अंतरींचें कळों देई गुह्य गुज । अंतरीं तें बीज राखेन मी ॥२॥
समदृष्टी तुझे पाहेन पाउलें । धरीन संचले हृदयांत ॥३॥
तेणें या चित्ताची राहील तळमळ । होतील शीतळ सकळ गात्रें ॥४॥
तुका म्हणे शांति करील प्रवेश । मग नव्हे नाश अखंड तो ॥५॥
३५२९
अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्त ॥१॥
न पुरतां आळी देशधडी व्हावें । हें काय बरवें दिसतसे॥ध्रु.॥
लेंकराचा भार माउलीचे शिरीं । निढळ तें दुरी धरिलिया ॥२॥
तुका म्हणे किती घातली लांबणी । समर्थ होउनि केवढएासाटीं ॥३॥
३०४०
अनाथ परदेशी हीन दीन भोळें । उगलें चि लोळे तुझे रंगीं ॥१॥
आपुलें म्हणावें मज नुपेक्षावें । प्रेमसुख द्यावें मायबापा ॥ध्रु.॥
कासवीचे परि दृष्टी पाहें मज । विज्ञानीं उमज दावुनियां ॥२॥
तुका म्हणे तुझा जालों शरणागत । काया वाचा चित्त दुजें नाहीं ॥३॥
५११
अनाथांची तुम्हां दया । पंढरीराया येतसे ॥१॥
ऐसी ऐकोनियां कीर्ती । बहु विश्रांति पावलों ॥ध्रु.॥
अनाथांच्या धांवा घरा । नामें करा कुडावा ॥२॥
तुका म्हणे सवघड हित । ठेवूं चित्त पायांपें ॥३॥
३२८१
अनाथां जीवन । आम्हां तुमचे चरण । करुनी सांठवण । ते धरिले हृदयी ॥१॥
पुष्ट झाली अंगकांती ।आनंद न समाये चित्तीं । कवतुकें प्रीती । गाऊं नाचों उल्हासें ॥ध्रु.॥
करुणाउत्तरीं ।करूं आळवण हरी ।जाऊं नेंदू दुरी । प्रेमप्रीतीपडीभरें ॥२॥
मोहममता करी गोवा ।एसें आहेजी केशवा । तुका म्हणे सेवा । आणिक नाही जाणत ॥३॥
२६५६
अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरूं वचन मागिलांचा ॥१॥
त्याचे पाय माझे लागोत कपाळीं । भोग उष्टावळी धन्यकाळ ॥ध्रु.॥
षडउर्मी जिंहीं हाणितल्या लाता । शरण या संता आल्या वेगीं ॥२॥
तुका म्हणे जाती वोळे लवकरी । ठायीं चि अंतरीं शुद्ध होती ॥३॥
३६८
अनुतापें दोष । जाय न लगतां निमिष ॥१॥
परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥ध्रु.॥
हें चि प्रायिश्चत । अनुतापीं न्हाय चित्त ॥२॥
तुका म्हणे पापा । शिवों नये अनुतापा ॥३॥
२८९८
अनुभव ऐसा । मज लागला सरिसा ॥१॥
पाठी बैसली सेजारीं । नव्हे शांत कोणे परी ॥ध्रु.॥
कोठें न लगे जावें । कांहीं घालावया ठावें ॥२॥
तुका म्हणे कोटि । दुःखाच्या च तये पोटीं ॥३॥
२८८०
अनुभव तो नाहीं तुमच्या दर्शनी । अइकिलें कानें वदे वाणी ।
जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । म्हणतां मांडे पुरी काय होतें ॥१॥
नाहींनाहीं गेली तळमळ दातारा । कां जी हरीहरा चाळविलें ॥ध्रु.॥
पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येईल मानूं ।
अंतरीं सबाह्यी कां नाहीं सारिखें । धरूनि पारिखें वर्ततसां ॥२॥
आलों आलों ऐसी दाऊनियां आस । वाहों बुडत्यास काय द्यावें ।
तुका म्हणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुम्ही कोठें ॥३॥
२१०४
अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें ॥१॥
असे जवळी अंतरे । फिरे आवडीच्या फेरें ॥ध्रु.॥
खादलें चि वाटे । खावें भेटलें चि भेटे ॥२॥
तुका म्हणे उभें । आम्ही राखियेलें लोभें॥३॥
२५६८
अनुभवाचे रस देऊं आर्त भूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं ॥१॥
देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणीं आपुलिया ॥ध्रु.॥
आधीं भाव सार शुद्ध ते भूमिका । बीज आणि पिका चिंता नाहीं ॥२॥
तुका म्हणे ज्याचें नाम गुणवंत । तें नाहीं लागत पसरावें ॥३॥
२४०१
अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हे हें करणें स्वहिताचें॥१॥
तैसा नको भुलों बाहिरल्या रंगें । स्वहित तें चि वेगें करूनि घेई ॥ध्रु.॥
बहुरूपी रूपें नटला नारायण । सोंग संपादून जैसा तैसा ॥२॥
पाषाणाचें नाव ठेविलें देव । आणिका तारी भाव परि तो तैसा ॥३॥
कनक झाड ह्म वंदिलें माथां । परिं तें अर्था न मिळे माजी ॥४॥
तुका म्हणे त्याचा भाव तारी त्यास । अहंभावीं नाश तोचि पावे ॥५॥
७५८
अनुभवें अनुभव अवघा चि साघिला । तरि स्थिरावला मन ठायीं ॥१॥
पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥ध्रु.॥
एक चि उरलें कायावाचामना । आनंद भुवनामाजी त्रयीं ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥३॥
११६०
अनुभवें आलें अंगा । तें या जगा देतसें ॥१॥
नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥ध्रु.॥
उतरूनि दिसे कशीं । शुद्धरसीं सरे तें ॥२॥
तुका म्हणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ॥३॥
१८६२
अनुभवें कळो येते पांडुरंगा । रुसावे ते कां गा तुम्हांवरी ॥१॥
आवरीता चित्त नावरे दुर्जन । घात करी मन माझे मज ॥२॥
अंतरी संसार भक्ति बाह्यात्कार ।म्हणोनी अंतर तुझ्या पायी ॥३॥
तुका म्हणे काय नेणें वर्म । आले तैसे कर्म सोसुं पुढे ॥४॥
१५७९
अनुभवें वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥१॥
कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरें ॥ध्रु.॥
जातीऐसा दावी रंग। बहु जग या नाव ॥२॥
तुका म्हणे खद्योत ते । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥३॥
११४
अनुसरे तो अमर झाला । अंतरला संसारा ॥१॥
न देखती गर्भवास । कधीं दास विष्णूचे ॥ध्रु.॥
विसंभेना माता बाळा । तैसा लळा पाळावा ॥२॥
त्रिभुवनीं ज्याची सत्ता । तुक्या रिक्षता तो जालिया ॥३॥
३८८४
अनुसरे त्या फिरो नेदी मागे । राहे अंग संगे समागमे ॥१॥
अंगसंग असे क्रम साक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसे फळ ॥ध्रु.॥
फळपाकी भोग देतील प्राणीये । तुका म्हणे नये सवें काही ॥२॥
१८०७
अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा तरे ॥१॥
सकळां जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥ध्रु.॥
ज्ञान सकळांमाजी आहे हें साच । भक्तीविण तें च ब्रम्ह नव्हे ॥२॥
काय मुद्रा कळल्या कराव्या सांगतां । दीप न लगतां उन्मनीचा ॥३॥
तुका म्हणे नका पिंडाचें पाळण । स्थापू नारायण आतुडेना ॥४॥
१६५६
आनुहातीं गुंतला नेणे बाह्य रंग । वृत्ति येतां मग बळ लागे ॥१॥
मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले अवयव आवरीतां ॥ध्रु.॥
आणिकांची वाणी वेद तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥२॥
तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥३॥
तुका म्हणे बाह्य रंग जो विटला । अंतर निवालें ब्रम्हरसें ॥४॥
२७१३
अनेक दोषांचे काट । जे जे गादले निघोंट । होती हरीनामें चोखट । क्षण एक न लगतां ॥१॥
तुम्ही हरी म्हणा हरी म्हणा । महादोषांचे छेदना ॥ध्रु.॥
अतिप्रीतीचा बांधला । नष्ट चांडाळीं रतला । क्षण न लगतां नेला । वैकुंठासी हरी म्हणतां ॥२॥
अमित दोषाचें मूळ । झालें वाल्मीकासी सबळ । झाला हरीनामें निर्मळ । गंगाजळ पैं जैसा ॥३॥
हरी म्हणतां तरले । महादोषी उद्धरिले । पहा गणिकेसी नेलें । वैकुंठासी हरी म्हणतां ॥४॥
हरीविण जन्म नको वांयां । जैसी दर्पणींची छाया । म्हणोनि तुका लागे पायां । शरण तया हरीसी ॥५॥
१९९
अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥१॥
आपुलालें तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥
देखोनि जीवन जरि जाय तहान । तरि कां सांटवण घरोघरीं ॥२॥
देखोनियां छाया सुख न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥३ ॥
हित तरी होय गातां अईकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥
तुका म्हणे होसी भावें चि तूं मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची ॥५॥
३१५९
अन्यायासी राजा न करितां दंड ।बहुत ते लंड पीडी जना ॥१॥
न करितां निगा न काढितां तन । कैंची येती कण हातासी ते ॥ध्रु.॥
तुका म्हणे संता करू नये अनृत । पाप नाही नित विचारितां ॥२॥
२८४४
अपराधी म्हणोनि येतों काकुलती । नाहीं तरी होती काय चाड ॥१॥
येईल तारूं तरी तारा जो जी देवा । नाहीं तरी सेवा घ्यावी भार ॥ध्रु.॥
कासया मी आतां वंचूं हे शरीर । आहें बारगीर जायजणें ॥२॥
तुका म्हणे मन करूनि मोकळें । आहें साळेंढाळें उदार तें ॥३॥
७५५
अभक्त ब्राम्हण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु.॥
ऐसा हा निवाडा जालासे पुराणीं । नव्हे माझी वाणी पदरींची ॥२॥
तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥३॥
२७४२
अभक्ताचे गांवीं साधु म्हणजे काय । व्याघ्रवाडां गाय सांपडली ॥१॥
कसाबाचे आळी मांडिलें प्रमाण । बस्वन्नाची आण तया काई ॥ध्रु.॥
मोतियाची गोणी माळे वोळी नेदी । पुस्ती केली केवढ्या पसरी हे ॥२॥
केळी आणि बोरी वसती सेजारी । संवाद कोणे परी घडे येथें ॥३॥
तुका म्हणे खीर केली काऱ्हेळ्याची । शुद्ध गोडी कैची वसे तेथें ॥२॥
३९८२
अभय उत्तरी संतीं केलें दान । झालें समाधान चित्त तेणें ॥१॥
आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥ध्रु.॥
आलें जें उचित देहविभागासी । तेणें पायांपासीं उभी असों ॥२॥
तुका म्हणे करी पूजन वैखरी । बोबडा उत्तरीं गातों गीत ॥३॥
२८९१
अभयदान मज देईं वो दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥१॥
देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ध्रु.॥
सेवाभक्तिहीन नेणता पतित । आतां माझे हित तुझ्या पायीं ॥२॥
तुका म्हणे तुझे नाम दिनानाथ । ते मज उचित करी आता ॥३॥
५९८
अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥१॥
तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥
पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥२॥
तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥३॥
८७५
अभिनव सुख तरि या विचारें । विचारावें बरें संतजनीं ॥१॥
रूपाच्या आठवें दोन्ही ही आपण । वियोगें तो क्षीण होत नाहीं ॥ध्रु.॥
पूजा तरि चित्तें कल्पावे ब्रम्हांड । आहाच तो खंड एकदेसी ॥२॥
तुका म्हणे माझा अनुभव यापरि । डोई पायांवरी ठेवीतसें ॥३॥
७८६
अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व येती सकळ ॥१॥
कळोनि ही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥ध्रु.॥
सर्व सत्ता धरितां धीर । वीर्यां वीर आगळा ॥२॥
तुका म्हणे तिखट तिखें । मृदसखें आवडी ॥३॥
१४९९
अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार ॥१॥
लाभ न्यावा हातोहातीं । तोंडी माती पाडोनि ॥ध्रु.॥
लागलीसे पाठी लाज । जालें काज नासाया ॥२॥
तुका म्हणे कुश्चळ मनीं । विटंबनीं पडिला तीं ॥३॥
१२७१
अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥१॥
अनुसरा लवलाहीं । नका विचार करूं कांहीं ॥ध्रु.॥
कोठें राहतील पापें । जालिया हो अनुतापें ॥२॥
तुका म्हणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥३॥
२०६
अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥१॥
जो हे दूषी हरीची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥
याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥
तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥३॥
९०३
अमर आहां अमर आहां । खरें कीं पाहा खोटें हें ॥१॥
न म्हणां देह माझा ऐसा । मग भरवसा कळेल ॥ध्रु.॥
कैंचा धाक कैंचा धाक । सकिळक हें आपुलें ॥२॥
देवचि बरे देवचि बरे । तुका म्हणे खरे तुम्ही ॥३॥
२२१९
अमर तूं खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥१॥
चाल जाऊं संतांपुढें । वाद सांगेन निवाडें ॥ध्रु.॥
तुज नांव जर नाहीं । तर माझें दाव काई ॥२॥
तुज रूप नाहीं । तर माझें दाव काई॥३॥
खळसी तूं लीळा । तेथें मी काय वेगळा ॥४॥
साच तूं लटिका । तैसा मी ही म्हणे तुका ॥५॥
२५६७
अमृत अव्हेरें उचंबळलें आतां । विष आर्त भूतां आवश्यक ॥१॥
आदरासी मोल नये लावूं केजें । धीर शुद्धबीजें गोमटा तो ॥ध्रु.॥
खऱ्याचिये अंगीं आपणे चाली । लावणी लाविली काय लागे ॥२॥
तुका म्हणे चाडे करा वेवसाव । आम्हांसी तो वाव धीर आहे ॥३॥
३४०८
अमृताची धार । वाहे देवा ही समोर ॥१॥
उर्ध्ववाहिनी हरीकथा । मुगुटमणि सकळां तीर्थां ॥ध्रु.॥
शिवाचें जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥२॥
तुका म्हणे हरी । इची स्तुति वाणी थोरी ॥३॥
१०९५
अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥
ऐसियांचा संग देई नारायणा । वोलाचा वचना जयांचिया ॥ध्रु.॥
उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्ट कांती तैसी दिसे वरी ॥२॥
तुका म्हणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥३॥
८२३
अरे गिळिले हो संसारें । कांहीं तरि राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥१॥
येथें न घलीं न घलीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवी ॥ध्रु.॥
केलें ते क्रियमाण । झालें तें संचित म्हण । प्रारब्ध जाण । उरवरीत उरले तें ॥२॥
चित्त खोटें चालीवरी । रोग भोगाचे अंतरीं । रसने अनावरी । तुका म्हणे ढुंग वाहे ॥३॥
१६५
अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥
मग कैचें हरीचें नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥
विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥२॥
अणीक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥३॥
तुका म्हणे ऐसें । मना लावी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥४॥
३१६१
अर्भकाचे साठी । पंतें हातीं धरिली पाटी ॥१॥
तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगीं ॥ध्रु.॥
बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥२॥
तुका म्हणे नाव । जनासाठी उदकीं ठाव ॥३॥
४०३९
अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोळिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥१॥
किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मिळलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार। गेला अंतपार ऐसें नाहीं ॥ध्रु.॥
विविध कर्म चौयाशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरणसांटवण ॥२॥
जीवा नाहीं कुडीचें लाहातें । यें भिन्न पंच भूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥३॥
पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळतां काष्ठें लोटतां पूर । आदळे दूर होती खलाळीं ॥४॥
म्हणोनि नासावें अज्ञान । इतुलें करीं कृपादान । कृपाळु तूं जनार्दन । धरूनि चरण तुका विनवी ॥५॥
४४१
अल्प माझी मती । म्हणोनि येतों काकुलती ॥१॥
आतां दाखवा दाखवा । मज पाउलें केशवा ॥ध्रु.॥
धीर माझ्या मना। नाहीं नाहीं नारायणा ॥२॥
तुका म्हणे दया । मज करा अभागिया ॥३॥
३९३६
अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥१॥
ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार । व्हांटें आघे चढे पीठ । आपे हुवा असुवार ॥२॥
जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥३॥
३९३७
अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे । अल्ला बगर नही कोये अल्ला करे सो हि होये ॥१॥
मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ध्रु.॥
सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर जा ॥२॥
जिन्हो पास नीत सोये । वो हि बनकर ते रोवे । सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥३॥
सब ज्वानी निकल जावे । पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥४॥
मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥५॥
बजारका बुझे भाव । वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लेंवो सखा ॥६॥
४६५
अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठिले । मागें होत आले शिष्टाचार ॥१॥
दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तों नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु.॥
मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें त्या ॥२॥
तुका म्हणे माझा उिच्छष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृष्टिन्यायें ॥३॥
११
अवगुणांचे हातीं । आहे अवघी फजीती ॥१॥
नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥
विष तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥२॥
तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥३॥
९२४
अवघा चि आकार ग्रासियेला काळें । एक चि निराळें हरीचें नाम ॥१॥
धरूनि राहिलों अविनाश कंठीं । जीवन हें पोटीं सांठविलें ॥ध्रु.॥
शरीरसंपित्त मृगजळभान । जाईल नासोन खरें नव्हे ॥२॥
तुका म्हणे आतां उपाधीच्या नांवें । आणियेला देवें वीट मज ॥३॥
१०२१
अवघा तो शकून । हृदयी देवाचे चिंतन ॥१॥
येथे नसता वियोग । लाभ उणें काय मग ॥ध्रु.॥
छंद हरी नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥
तुका म्हणे हरीच्या दासा । शुभ सकाळ अवघ्या दिशा ॥३॥
२५०१
अवघा भार वाटे देवा । संतसेवा न करीता ॥१॥
कसोटी हे असे हातीं । सत्य भूतीं भगवंत ॥ध्रु.॥
चुकलोंसा दिसें पंथ । गेले संत तो ऐसा ॥२॥
तुका म्हणे सोंग वांयां । कारण या अनुभवें ॥३॥
४६१
अवघा वेंचलों इंद्रियांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥१॥
असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु.॥
कायावाचामनें तोचि निजध्यास । एथें जालों ओस भक्तीभावें ॥२॥
तुका म्हणे करूं येईल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥३॥
१७७६
अवघिया चाडा कुंठीत करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना ।
करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा तोडीं ।
तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥१॥
माझें साच काय केलें मृगजळे । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें ।
काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥
वेगळाल्या भावें चित्त तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत ।
बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें ।
जाणोनियां त्याग सर्वस्वें केला। सांभाळीं आपुलें जाळें ॥२॥
एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण ।
चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळे चि तुझी ।
म्हणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती । तुका म्हणे भाक माझी ॥३॥
३६२३
अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया ॥१॥
सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥ध्रु.॥
जोंवरी ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥२॥
मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥३॥
अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥४॥
तुका म्हणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥५॥
३७५०
अवघियां दिला गोर । मजकरे पाहीना ॥१॥
फुंदे गोपाळ डोळे चोळी । ढुंगा थापली हाणे तोंडा ॥ध्रु.॥
आवडती थोर मोटे । मी रे पोरटें दैन्यवाणे ॥२॥
तुका म्हणे जाणों भाव । जीविंचा देव बुझावू ॥३॥
१५७७
अवघीं च तीर्थे घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥
अवघीं च पापें गेलीं दिगांतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥ध्रु.॥
अवघिया संतां एकवेळा भेटी । पुंडलीक दृष्टी देखिलिया ॥२॥
तुका म्हणे जन्मा आल्याचें सार्थक । विठ्ठल चि एक देखिलिया ॥३॥
१०११
अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥१॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥
माझी कोणी न धरो शंका । हो कां लोकां निर्द्वंन्द्व ॥२॥
तुका म्हणे जें जें भेटे । तें तें वाटे मी ऐसें ॥३॥
८७१
अवघी मिथ्या आटी । राम नाहीं तंव कंठीं ॥१॥
सावधान सावधान । उगवीं संकल्पीं हें मन ॥ध्रु.॥
सांडिलें तें मांडे। आग्रह उरल्या काळें दंडे ॥२॥
तुका म्हणे आलें भागा । देउनि चिंतीं पांडुरंगा ॥३॥
३७६२
अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥१॥
आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ध्रु.॥
चुकलों आम्ही खेळतां खेळ । गेला गोपाळ हातींचा ॥२॥
तुका म्हणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥३॥
३७४९
अवघें अवघीकडे । दिलें पाहे मजकडे । अशा सवंगडे । सहित थोरी लागली ॥१॥
कां रे धरिला अबोला । माझा वांटा देईं मला । सिदोरीचा केला । झाडा आतां निवडे ना ॥ध्रु.॥
भूक लागली अनंता । कां रे नेणसी जाणतां । भागलों वळितां । गाई सैरा ओढाळा ॥२॥
तुका करुणा भाकी । हरी पाहे गोळा टाकी । घेता झाला सुखी । भीतरी वांटी आणीकां ॥३॥
३६७४
अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला ।
नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरें च बोला । वंची वंचला तोचि रे येथें भोवंडा त्याला ॥१॥
घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळें नाहीं ।
ताक सांडी येक रे येकरे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥ध्रु.॥
एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा । एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा ।
एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करूनि आराले आतां ऐसें चि घाटा ॥२॥
एकीं स्थिराविल्या गाई रे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेती ।
एकें चाराबोरा गुंतलीं नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती ॥३॥
एकीं एकें वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें ।
गांठीचें तें सोडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोढी रे भार वाहातां मेलें ॥४॥
एक ते माया गुंतले घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहीं च ठावें ।
जैसें होतें शिळे संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचुनि मग पडिलें ठावें ॥५॥
एकीं हातीं पायीं पटे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा ।
एक ते आळसी तळीं रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वांचून बुद्धि रे केला अवघ्यां वाखा ॥६॥
तुका म्हणे आतां कान्होबा आम्हां वांटोनि द्यावें । आहे नाहीं आम्हांपाशीं तें तुज अवघें चि ठावें ।
मोकलितां तुम्ही शरण आम्ही कवणासि जावें । कृपावंते कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥७॥
३७५६
अवघें चि गोड झालें । मागीलये भरी आलें ॥१॥
साह्य झाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.॥
थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥२॥
तुका म्हणे गेलें । स्वप्नींचें जागें झालें ॥३॥
२०४१
अवघे चुकविले सायास ।तप रासी जीव नाश ॥१॥
जीव देऊनियां बळी ।अवघी तारिलीं दुबळी ॥ध्रु.॥
केला भूमंडळी । माजी थोर पवाडा ॥२॥
काहीं न मागे याची गती । लुटवितो जमा हाती ॥३॥
तुका म्हणें भक्तराजा । कोंण वर्णी पार तुझा ॥४॥
१२७४
अवघें जेणें पाप नासे । तें हें असे पंढरीसी ॥१॥
गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥ध्रु.॥
अवघी सुखाची च राशी । पुंडलिकाशीं वोळली हे ॥२॥
तुका म्हणे जवळी आलें । उभे ठालें समचरणीं ॥३॥
२८८
अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥१॥
म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ध्रु.॥
ऊंस कांदा एक आळां । स्वाद गोडीचा निराळा ॥२॥
तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥३॥
१६६
अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥
नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाखांडिया ॥ध्रु.॥
जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥२॥
तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥३॥
७२५
अवघ्या उपचारा । एक मन चि दातारा ॥१॥
घ्यावी घ्यावी माझी सेवा । दिन दुर्बळाची देवा ॥ध्रु.॥
अवघियाचा ठाव । पायांवरी जीवभाव ॥२॥
चित्ताचें आसन । तुका करितो कीर्तन ॥३॥
३९१६
अवघ्या जेष्ठादेवी । कोण पूजनाचा ठाव । धरितां चि भाव । कोठें नाहींसें झालें ॥१॥
दिसे सारिखें सारिखें । परि तें कारणीं पारिखें । तळीं गेलें देखें । वरी टोले न साहाती ॥ध्रु.॥
पट एका शिरीं । यथाविधीनें त्या येरी । बसकोळ्या घागरी । डेरे रांझण गाडगीं ॥२॥
तुका म्हणे माना । येथें कोणीं रुसावें ना । आपुलाल्या स्थानां । जेथें त्या चि शोभल्या ॥३॥
४०४६
अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ती। प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुद्धी जाणोनियां ॥१॥
बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळां काळांचें हे वर्म। निवारी श्रम सकळ ही ॥ध्रु.॥
जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥२॥
येती अंगा वसती लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें। आपण चि येती तयाचा गुण । जाणें येणें खुंटे वस्तीचें ॥३॥
न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥४॥
वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रम्ह शून्य । मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हां ॥५॥
३११८
अवघ्यां पातकांची मी एक रासी । अवघा तूं होसी सर्वोत्तम ॥१॥
जैसा तैसा करणें लागे अंगीकार । माझा सर्व भार चालविणें ॥ध्रु.॥
अवघें चि मज गिळियेलें काळें । अवघीं च बळें तुझे अंगीं ॥२॥
तुका म्हणे आतां खुंटला उपाय । अवघे चि पाय तुझे मज ॥३॥
३४६३
अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥१॥
त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ध्रु.॥
काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥२॥
करितां पाप न धरी शंका। म्हणे तुका कोणी ही ॥३॥
७२३
अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघी च दान दिली भूमि ॥१॥
अवघा चि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥ध्रु.॥
अवघीं च तीर्थे व्रतें केले याग । अवघें चि सांग जालें कर्म ॥२॥
अवघें चि फळ आलें आम्हां हातां । अवघें चि अनंता समर्पीलें ॥३॥
तुका म्हणे आतां बोलों अबोलणें । कायावाचामनें उरलों नाहीं ॥४॥
२२१५
अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळीं न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा ॥१॥
भक्तीपंथ बहु सोपा पुण्य नागवेया पापा । येणें जाणें खेपा येणें चि एके खंडती॥ध्रु.॥
उभारोनि बाहे। विठो पालवीत आहे । दासां मी चि साहे मुखें बोले आपुल्या ॥२॥
भाविक विश्वासी पार उतरिलें त्यांसी । तुका म्हणे नासी कुतऱ्याचे कपाळीं ॥३॥
३८५३
अवचिता त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥
आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो हरी गडियांसि ॥२॥
गडियांसि म्हणे वैकुंठनायक । या रे सकळिक मजपाशीं ॥३॥
मजपाशीं तुम्हां भय काय करी । जवळि या दुरी जाऊं नका ॥४॥
कानीं आइकिले गोविंदाचे बोल । म्हणती नवल चला पाहों ॥५॥
पाहों आले हरीजवळी सकळ । गोविंदें गोपाळ आळिंगिले ॥६॥
आल्या गाईं वरी घालितील माना । वोसरलें स्तना क्षीर लोटें ॥७॥
लोटती सकळें एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळलीं ॥८॥
कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥९॥
त्यां च पाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥
याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें काया दिव्य दिली ॥११॥
दिलें गोविंदें त्या पदा नाहीं नाश । तुका म्हणे आस निरसली ॥१२॥
२९३८
अवचित या तुमच्या पायां । देवराया पावलों ॥१॥
बरवें झालें देशाउर । आल्या दुर सारिखें ॥ध्रु.॥
राहोनियां जातों ठाया । आलियाची निशानी ॥२॥
तुका म्हणे चरणसेवा । जोडी हेवा लाधली ॥३॥
१३३६
अवचितचि हातीं ठेवा । दिला सेवा न करितां ॥१॥
भाग्य फळलें जाली भेटी । नेघें तुटी यावरी ॥ध्रु.॥
दैन्य गेलें हरली चिंता । सदैव आतां यावरी ॥२॥
तुका म्हणे वांटा जाला । बोलोंबोला देवासीं ॥३॥
३८८६
अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥१॥
परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो ही भाव आरंभिला ॥२॥
लाविलें लाघव पाहोनियां संधी । सकळांही वधी दुष्टजना ॥३॥
दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणी न साहति ॥४॥
न साहवे दुःख भक्तांचें या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥५॥
रूप हें चांगलें रामकृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारितां ॥६॥
उच्चारितां नाम कंस वैरभावें । हरोनियां जीवें कृष्ण केला ॥७॥
कृष्णरूप त्यासि दिसे अवघें जन । पाहे तों आपण कृष्ण झाला ॥८॥
पाहिलें दर्पणीं आधील मुखासि । चतुर्भुज त्यासि तोचि झाला ॥९॥
झालीं कृष्णरूप कन्या पुत्र भाज । तुका म्हणे राज्य सैन्य जन ॥१०॥
४०८६
अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेजपुंजाळरासी । उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं ॥१॥
जय देवा कृष्णनाथा जय रखुमाईकांता। आरती ओंवाळीन तुम्हां देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥ध्रु.॥
वसुदेवदेवकीची बंद फोडुनी शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटिंचा बाळ । दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राजया उग्रसेना केला मथुरापाळ ॥२॥
राखतां गोधनें हो इंद्र कोपला वरी । मेघ जो कडाडिला शिळा वर्षतां धारीं । राखिलें गोकुळ हें नखीं धरिला गिरी। निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥३॥
कौतुक पाहावया माव ब्रह्म्यानें केली । वत्सें चोरोनियां सत्यलोकासि नेलीं । गोपाळ गाईवत्सें दोहीं ठायीं राखीलीं । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माउली ॥४॥
तारिलें भक्तीजना दैत्य निर्दाळूनि । पांडवां साहकारी आडल्यां निर्वाणी । गुण मी काय वर्णु मति केवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव देई चरणीं ॥५॥
३४०१
अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥
काय त्याचे वेल जाईल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥ध्रु.॥
मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचें धोंडा उभा ठाके ॥२॥
तुका म्हणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं जाणा खोटा तैसा ॥३॥
१५८७
अविट हें क्षीर हरीकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥१॥
अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदे ॥ध्रु.॥
पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥२॥
सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥३॥
निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गाये नाचे ॥४॥
तुका म्हणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनी ठेला ॥५॥
१६१०
अशक्य तों तुम्हां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥
मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ध्रु.॥
थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे । म्हणवितों दास काय थोडें ॥२॥
तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे समर्थाचे ॥३॥
१९६
अशोकाच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी ।
येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥
सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ ।
मन उतावळि जाला दुरी पंथ । राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ध्रु.॥
काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें कवणाचें भंगीलें ।
गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले ॥२॥
नाडियेलें आशा मृगकांतिसोने । धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणें ।
उल्लंघिले आज्ञा माव काय मी जाणें । देखुनी सूनाट घेउनि आलें सुनें ॥३॥
नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या माये ।
उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढ्यामध्यें तेथें चाले काये ॥४॥
जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी ।
संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । येईल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥५॥
३०२५
असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठुर अतिवादी ॥१॥
अंतरीचा रंग उमटे बाहेरी । वोळखियापरी आपेंआप ॥ध्रु.॥
संत ते समय वोळखती वेळ । चतुष्ट निर्मळ चित्त सदा ॥२॥
तुका म्हणे हित उचित अनुचित । मज लागे नित विचारावें ॥३॥
१५२४
असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रम्ह तें विकारविरहित ॥१॥
तरि म्हणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥
सिजलें हिरवें एका नांवें धान्य । सेवनापें भिन्न निवडे तें ॥२॥
तुका म्हणे भूतीं साक्षी नारायण । अवगुणीं दंडण गुणीं पुजा ॥३॥
१६३८
असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥
जाईल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥
वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाटीं गेला ॥२॥
तुका म्हणे आतां सांभळा रे पुढें । अंतरिंचे कुडें देईल दुःख ॥३॥
२५२५
असा जी सोंवळें । आहां तैसे चि निराळे ॥१॥
आह्मीं नयों तुमच्या वाटा । काय लटिका चि ताठा ॥ध्रु.॥
चिंतनाचि पुरे । काय सलगी सवें धुरे ॥२॥
तुका म्हणे देवा । नका नावडे ते सेवा ॥३॥
२९५५
असाल ते तुम्ही असा । आम्ही सहसा निवडों ना ॥१॥
अनुसरलों एका चित्तें । हातोंहातें गींवसित ॥ध्रु.॥
गुणदोष काशासाठी । तुमचे पोटीं वागवूं ॥२॥
तुका म्हणे दुजें आतां । कोठें चित्ता आतळों ॥३॥
३३८०
असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अग्नी हा काष्ठ तेवीं ।
घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥१॥
तृन वाटितां क्षीर हें होत नाहीं । पशू भिक्षतां पालटे तें चि देहीं ।
तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥२॥
फळ कर्दळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये ।
धीर नाहीं त्यें वाउगें धीग झालें । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥३॥
असे नाम हें दर्पणें सिद्ध केलें। असे बिंब तें या मळा आहे ठेलें ।
कसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप। नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥४॥
करा वर्म ठावें नका सोंग वांयां। तुका वीनवीतो पडों काय पायां ।
त्यज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरलें शेवटीं काय पाहें ॥५॥
१०१७
असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां ॥१॥
भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु.॥
आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥२॥
तुका म्हणे केली कोणें । एवढा नेणें लौकिक ॥३॥
३४७०
असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥१॥
रक्षिता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥ध्रु.॥
काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥२॥
तुका म्हणे गाइन गीतीं । रूप ते चित्तीं धरूनियां ॥३॥
४१०
असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥१॥
माझें प्रारब्ध हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ध्रु.॥
सोडवीन आतां । ब्रीदें तुझीं पंढरीनाथा ॥२॥
तुका म्हणे बळी । तो गांढयाचे कान पिळी ॥३॥
२४३७
असो खटपट । आतां वाउगे बोभाट ॥१॥
परिसा हे विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥
अपराध करा । क्षमा घडले दातारा ॥२॥
तुका म्हणे वेथा । तुह्मा कळे पंढरिनाथा ॥३॥
१७४१
असो खळ ऐसे फार । आम्हां त्यांचे उपकार ॥१॥
करिती पातकांची धुनी । मोल न घेतां साबनीं ॥ध्रु.॥
फुकाचे मजुर। ओझें वागविती भार ॥२॥
पार उतरुन म्हणे तुका । आम्हां आपण जाती नरका ॥३॥
३९८३
असो मंत्रहीन क्रिया । नका चर्या विचारूं ॥१॥
सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥ध्रु.॥
विचारूनि ठाया ठाव । येथें भाव राहिला ॥२॥
आतां तुकयापाशीं हेवा । नाहीं देवा तांतडी ॥३॥
१८३७
असो मागे जाले । पुढे गोड ते चांगले ॥१॥
आतां माझे मनी । काहीं अपराध न मनी ॥ध्रु.॥
नेदी अवसान । करी नामचें चिंतन ॥२॥
तुका म्हणे बोले । तुज आधीच गोविलें ॥३॥
२४०४
असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाई ॥१॥
आपंगिलें मज आहे ते कृपाळु । बहुत कनवाळु अंतरींची ॥ध्रु.॥
वेदशास्त्रें जिसी वर्णिती पुराणें । तिचें मी पोसणें लडिवाळ ॥२॥
जिचें नाम कामधेनु कल्पतरू । तिचें मी लेंकरूं तुका म्हणे ॥३॥
२३३३
असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे ॥१॥
आमुचें स्वहित जाणतसों आम्ही । तुझें वर्म नामीं आहे तुझ्या ॥ध्रु.॥
विचारितां आयुष्य जातें वांयांविण । रोज नागवन पडतसे ॥२॥
राहेन मी तुझे पाय आठवूनी । आणीक तें मनीं येऊं नेदीं ॥३॥
तुका म्हणे येथें येसी अनायासें । थोर तुज पिसें कीर्तनाचें ॥४॥
२१०१
असोत हे बोल । अवघें तूं चि भांडवल ॥१॥
माझा मायबाप देवा । सज्जन सोयरा केशवा ॥ध्रु.॥
गाळियेले भेद । सारियेले वादावाद ॥२॥
तुका म्हणे मधीं । आतां न पडे उपाधि॥३॥
१५२६
असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगी च या भारें कुंथाकुंथी ॥१॥
धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शक्तीहीन ॥ध्रु.॥
भ्रमल्यानें दिसें बांधल्याचेपरी । माझें मजवरी वाहोनियां ॥२॥
तुका म्हणे धांव घेतलीसे सोई । आतां पुढें येई लवकरी ॥३॥
८९३
अस्त नाहीं आतां एक चि मोहोरा । पासूनि अंधारा दुरि जालों ॥१॥
साक्षत्वें या जालों गुणाचा देखणा । करीं नारायणा तरी खरें ॥ध्रु.॥
आठवें विसरु पडियेला मागें । आलें तें चि भागें यत्न केलें ॥२॥
तुका म्हणे माझा विनोद देवासी । आम्ही तुम्हां ऐसीं दोन्ही नव्हों ॥३॥
२५२६
अहंकार तो नासा भेद । जगीं निंदे ओंवळा ॥१॥
नातळे तो धन्य यासी । जाला वंषीं दीपक ॥ध्रु.॥
करवितो आत्महत्या। नेदी सत्या आतळों ॥२॥
तुका म्हणे गुरुगुरी । माथां थोरी धरोनि॥३॥
३६५२
अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥१॥
रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ध्रु.॥
कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपे अविनाश भवाणी ॥२॥
तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ॠषि ॥३॥
नाम जप बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥४॥
नामजप जीवन मुनिजना । तुकयास्वामी रघुनंदना ॥५॥
२४३८
आहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली ॥१॥
निवारलें जाणें येणें । कोणा कोणें रुसावे ॥ध्रु.॥
संकल्पासी वेचे बळ । भारे फळ निर्माण ॥२॥
तुका म्हणे उभयतां । भेटी सत्ता लोभाची ॥३॥
१६१४
अहो कृपावंता । होय बुद्धीचा ये दाता ॥१॥
जेणें पाविजे उद्धार । होय तुझा पायी थार ॥ध्रु.॥
वदवी हे वाचा । भाव पांडुरंगी साचा ॥२॥
तुका म्हणे देवा । माझे अंतर वसावा ॥३॥
२८८२
अहो पुरुषोत्तमा । तुम्हां काशाची उपमा ॥१॥
सतत तो नाहीं बुद्धी । नाळवितां नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥
जागविलें तरी । तुम्हां व्यक्ती येणें हरी ॥२॥
तुका म्हणे देवा । तुम्हा नित्य दिस नवा ॥३॥
२३७७
अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिलें ॥१॥
पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ध्रु.॥
होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥२॥
तुका म्हणे बोली । पुढें कुंटित चि जाली ॥३॥
५३९
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥१॥
अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरउनी ॥ध्रु.॥
फळलें तें लवे भारें । पिक खरें आलें तई ॥२॥
तुका म्हणे हा गे देव । पुढें भाव सारावा ॥३॥
३१७६
अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥१॥
अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥
अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी मन । निष्काम साधन तया कैंचें ॥२॥
अज्ञानाचें ज्ञान विषयावरी ध्यान । ब्रम्ह सनातन तया कैंचें ॥३॥
तुका म्हणे जळो ऐसियांचे तोंड । अज्ञानाचें बंड वाढविती ॥४॥
View Comments
गाथा पाहिजेल आहे
कोणती गाथा पाहिजे ?
I need tukaram gatha in pdf..
Need Tukaram Gatha pdf all for one
जय दास दोवा टाका
रामकृष्ण हरि???