संत तुकाराम गाथा ३ अनुक्रमणिका नुसार
ओ
३८२
ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें ॥१॥
तें चि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ध्रु.॥
रज्जु सर्प होता । तोंवरी चि न कळतां ॥२॥
तुका म्हणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥३॥
९०२
ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धी ॥१॥
नव्हे ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरि ॥ध्रु.॥
दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥२॥
तुका म्हणे कैंचा बैसण्याची ठाव । जठरीं बाळा वाव एकाएकीं ॥३॥
२२३३
ओस जाल्या मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥१॥
भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा॥ध्रु.॥
अंधकारापुढे न चलवे वाट । लागतील खुंटे कांटे अंगा ॥२॥
एकला निःसंग फांकती मारग । होतों नव्हे लाग चालावया ॥३॥
तुका म्हणे वाट दावूनि सद्गु । राहि हा दुरू पांडुरंग ॥४॥
३८२१
ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥
न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥२॥
वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग ॥३॥
व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौळियांची ॥४॥
यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥५॥
होतें तें द्यावया आला नारायण । मायबापां ऋण गौळियांचें ॥६॥
गौळियांचें सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रम्हादिकां तुका म्हणे ॥७॥
इ इं
१८९८
इच्छा चाड नाहीं । न धरी संकोच ही कांहीं ॥१॥
उदका नेले तिकडे जावे । केले तैसै सहज व्हावे ॥ध्रु.॥
मोहरी कांदा ऊंस । एक वाफा भिन्न रस ॥२॥
तुका म्हणे सुख । पीडा इच्छा पावे दुःख ॥३॥
२८३
इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण ॥१॥
नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ध्रु.॥
मुकियाचे परी जीवीं । साकर जेवों खादली ॥२॥
तुका म्हणे काय बोलें । आतां भलें मौन्य ची ॥३॥
२५९४
इच्छिती तयांसी व्हावें जी अरूप । आम्हांसी स्वरूपिस्थती चाड ॥१॥
आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनी इच्छा गोवियेली ॥ध्रु.॥
लेंकरासी कोठें जाणत्याची परी । करूं येते दुरी धरावया ॥२॥
लागली न सुटे नामाची आवडी । माझी भावजोडी भंगूं नका ॥३॥
घेसील वेढे मुक्तीच्या अभिळासें । चाळवीं जा पिसे ब्रम्हज्ञानी ॥४॥
तुका म्हणे माझा कोठें भक्तीरस । पाडावया ओस चाळविसी ॥५॥
२५२७
इच्छिलें ते शकुनवंती । होय देती तात्काळ ॥१॥
क्षीरा नीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥ध्रु.॥
भाग्याविण कैचें फळ ।अंतर मळमूत्राचें ॥२॥
तुका म्हणे संचित कुडें । तें बापुडें करीतसे ॥३॥
१७४३
इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥१॥
यांचा विश्वास तो काई । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥
सुगंध अभ्यंगें पाळितां । केश फिरले जाणतां ॥२॥
पिंड पाळितां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥३॥
करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥४॥
अल्प जीवन करीं । तुका म्हणे साधीं हरी ॥५॥
२७५९
इच्छेपाशीं आलों फिरोनि मागुता । स्वामीसेवकता आवडीचे ॥१॥
द्यावें लवकरी मागितलें दान । मुळींचें जतन करूनि असें ॥ध्रु.॥
उपाय हे करीं एका चि वचना । दावूनियां खुणा ठाया येतों ॥२॥
तुका म्हणे गांठी किती तुजपाशीं । जगाच्या तोडिसी चिंतनानें ॥३॥
२२७५
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥
इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥
इतुलें करीं देवा विनवितों तुज । संत चरणरज वंदीं माथां ॥२॥
इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथा दिवसरात्रीं ॥३॥
भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥४॥
४०६७
इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥१॥
न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥२॥
जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥३॥
करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास । तृष्णा वाढविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥
धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हाचि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका म्हणे ॥५॥
१२९४
इंद्रियांचीं दिनें । आम्ही केलों नारायणें ॥१॥
म्हणऊनि ऐसें सोसीं । काय सांगों कोणांपाशी ॥ध्रु.॥
नाहीं अंगीं बळ । त्याग करींजेसा सकळ ॥२॥
तुका म्हणे मोटें । प्रारब्ध होतें खोटें ॥३॥
२९२८
इंद्रियाचें पुरे कोड । तें चि गोड पुढती ही ॥१॥
जावें म्हणती पंढरपुरा । हाचि बरा संसार ॥ध्रु.॥
बैसलें तें मनामुळीं । सुख डोळीं देखिलें ॥२॥
तुका म्हणे देती कान । वाणावाण निवडूनी ॥३॥
३२०६
इंद्रियांसी नेम नाहीं । मुखीं राम म्हणोनि काई ॥१॥
जेविं मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥ध्रु.॥
कीर्तन करावें । तैसें करूनी दावावें ॥२॥
हें तों अंगीं नाहीं चिन्हें । गाइलें वेश्येच्या ढव्यानें ॥३॥
तुका म्हणे रागा । संत शिवूं नेदिती अंगा ॥४॥
१७२
इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥१॥
अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥
अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥२॥
तुका म्हणे जोडी झाली । ते आपुली आपणा ॥३॥
१२६५
इहलोकीं आम्हां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥१॥
निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥
छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाची तें ॥२॥
तुका म्हणे एक सेवटीं राहाणें । वर्ततों या जना विरहित ॥३॥
२३०४
इहलोकीं आम्हां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं॥१॥
कार्यापुरतें कारण मारगीं । उलंघूनि वेगीं जावें स्थळा ॥ध्रु.॥
सोंगसंपादणी चालवितों वेव्हार । अत्यंतिक आदर नाहीं गोवा ॥२॥
तुका म्हणे वेंचे लाविला संचिता । होईल घेतां लोभ कोणां ॥३॥
१३१
इहलोकींचा हा देह । देव इच्छिताती पाहें ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे झालों ॥ध्रु.॥
आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥
तुका म्हणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥३॥
उ
१५१९
उकिरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं ॥१॥
कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ध्रु.॥
काय जाणे विष पालटों उपचारें । मुर्खासी अंतर तों चि बरें ॥२॥
तुका म्हणे काय उपदेश वेड्या । संगें होतो रेड्यासवें कष्ट ॥३॥
१३८७
उखतें आयुष्य जायांचें कलेवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥१॥
कोणासी हा लागे पुसणें विचार । मनें चि सादर करूं आतां ॥ध्रु.॥
उत्पत्ति प्रळय पडिलें दळण । पाकाचें भोजन बीज वाढे ॥२॥
तुका म्हणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगीं ॥३॥
१०४७
उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥१॥
ख्यात केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु.॥
मोकलिला प्रायिश्चतीं । कोणी न धरिती हातीं ॥२॥
तुका म्हणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥३॥
६०१
उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साठ होती ॥१॥
काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥
नानाछंदें आम्हां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥३॥
११३५
उंचनिंच नेणें भगवंत । तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ॥१॥
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ध्रु.॥
चर्म रंगूं लागे रोहिदासा संगीं । कबिराचे मागीं शेले विणी ॥२॥
सजनकसाया विकुं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥३॥
नरहरीसोनारा घडु फुंको लागे । चोख्यामेळ्या संगें ढोरें ओढी ॥४॥
नामयाची जनी सवें वेची सेणी । धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥५॥
नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगीं ओढी ॥६॥
अर्जुनाचीं रथीहोय हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची ॥७॥
गौळियांचे घरीं अंगें गाई वळी । द्वारपाळ बळीद्वारीं जाला ॥८॥
यंकोबाचें ॠण फेडी हृषीकेशी । आंबॠषीचे सोशी गर्भवास ॥९॥
मिराबाई साठी घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥१०॥
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची। हुंडी त्या मेहत्याची अंगें भरी ॥११॥
पुंडलिकासाठी अझूनि तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ॥१२॥
३६३६
उंच निंच कैसी पाईकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥१॥
स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥
प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाईक तो नांव मिरवी वांयां ॥२॥
गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥३॥
तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाईक पाहोन मोल करी ॥४॥
५४०
उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं स्थिर ॥१॥
न घालावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥२॥
अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न उगे उपदेश तुका म्हणे ॥
२४६
उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥१॥
देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ध्रु.॥
आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन कायवेंचे॥२॥
तुका म्हणे तुम्हां साजे हें श्रीहरी । आम्ही निलाजिरीं नाहीं ऐसीं ॥३॥
५२७
उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥१॥
आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥
अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाटीं ॥२॥
तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥३॥
२८३९
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥
नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥
जाळ जाळा काळें । करपों नेदावें आगळें । जेवितां वेगळें । ज्याचें त्याचें तेथें तें शोभे ॥२॥
पाळी नांगर पाभारीं । तन निवडूनि सोंकरी । तुका म्हणे घरी । सेज जमा शेवटीं ॥३॥
२०९८
उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता ॥१॥
कां रे न घालिसी धांव । तुझें उच्चारितां नांव ॥ध्रु.॥
काय बळयुक्ती । नाहीं तुझे अंगीं शक्ती ॥२॥
तुका म्हणे तूं विश्वंभर । ओस माझें कां अंतर ॥३॥
१५७५
उचिताचा भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले ॥१॥
वचनाची कांहीं राहे चि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें ॥ध्रु.॥
विश्वासानें माझें बुडविलें घर । करविला धीर येथवरी ॥२॥
तुका म्हणे एकीं थार नाहीं बुड । कैसें तुह्मीं कोड पुरविलें ॥३॥
४८३
उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥
संपुष्ट हा हृदयपेटी । करूनि पोटीं सांटवूं ॥२॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥३॥
१७६
उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥१॥
बोलविले बोलें बोल । धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥
तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥२॥
तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गाबाळ ॥३॥
३२३९
उजळितां उजळे दीपकाची वाती । स्वयंभु ते ज्योति हिऱ्या अंगीं ॥१॥
अेकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥
परिमळें केलें चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥२॥
तुका म्हणे जया अंगीं नामठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥३॥
१६५१
उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥१॥
तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥
नेत्री अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥२॥
तुका म्हणे काला । कोठें अभेद देखिला ॥३॥
४००२
उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥१॥
वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारुणी ॥ध्रु.॥
केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥२॥
लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥३॥
३९९५
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥
करा जयजयकार वाद्यांचे गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥
जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥२॥
तुका म्हणे काय पढियंतें तें मागा । आपुलालें सांगा सुख दुःखें ॥३॥
४००५
उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥१॥
नेउल जालें सेवका स्वामींचें । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥ध्रु.॥
पहुडलिया हरी अनंतशैनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥२॥
अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सांगितलें लोकां निजले देव ॥३॥
४०२
उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥१॥
तुझें नाम धरिलें कंठीं । केली संसारासी तुटी ॥ध्रु.॥
आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥२॥
तुका म्हणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥३॥
१७२१
उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊ नेदी ॥१॥
न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥
नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥२॥
तुका म्हणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाह्य रूप ॥३॥
१२०३
उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥१॥
नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ध्रु.॥
उमटती ठसे । ब्रम्हप्राप्ति अंगीं दिसे ॥२॥
भाविक विश्वासी । तुका म्हणे नमन त्यांसी॥३॥
१४८०
उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥१॥
उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणां संतांचिया ॥ध्रु.॥
दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याई पापाची च मूर्ती ॥२॥
तुका म्हणे जेव्हां फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥३॥
५०९
उदंड शाहाणे होती तर्कवंत । परि नेणवे अंत विठोबाचा ॥१॥
उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि ते नेणेवेची थोरी विठोबाची ॥२॥
तुका म्हणे नाहीं भोळेपणा विण । जाणीव ते सिण रितें माप ॥३॥
३१३५
उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥
एसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटे वरी देव कोठे ॥ध्रु.॥
ऐसे संतजण ऐसे हरीदास । ऐसा नाम घोष सांगा कोठे ॥२॥
तुका म्हणे आम्हां अनाथां कारणे । पंढरी निर्माण केली देवे ॥३॥
७९८
उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥१॥
सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरलीं वाचा काया मनें ॥ध्रु.॥
पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावें ॥२॥
चालतां ही पंथ सांभाळिसी वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥३॥
तुका म्हणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥४॥
२९१०
उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति । पुंडलिकाचिया प्रीती । विटेवरी राहिला ॥१॥
सर्वसिद्धीचा दातार । सवें आणिला परिवार । भक्त अभयंकर । घ्याघ्या ऐसें म्हणतसे ॥ध्रु.॥
जेणें हें विश्व निर्मीलें । महर्षीदेवा संस्थापिलें । एकवीस स्वर्गांतें धरिलें । सत्तामात्रें आपुलिया ॥२॥
तुका म्हणे कृपावंत । इच्छिले पुरवी मनोरथ । रिद्धिसिद्धिमोक्ष देतसे । शेखीं संग आपुला ॥३॥
१४३५
उदार तूं हरी ऐसी कीर्ती चराचरीं । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे ॥१॥
तुझे लागों पायीं माझा भाव पुसी जन्ममरणां ठाव। देवाचा तूं देव स्वामी सकळा ब्रम्हांडा ॥ध्रु.॥
मागणें तें तुज मागों जीवभाव तुज सांगों । लागों तरी लागों पायां तुमच्या दातारा ॥२॥
दिसों देसी केविलवाणें तरी तुज चि हें उणें । तुका म्हणे जिणें माझें तुज आधीन ॥३॥
२२२७
उदारा कृपाळा पतितपावना । ब्रिदें नारायणा साच तुझीं ॥१॥
वर्णिलासी जैसा जाणतां नेणतां । तैसा तूं अनंता साच होसी ॥ध्रु.॥
दैत्यां काळ भक्तं मेघश्याममूर्ती । चतुर्भुज हातीं शंख चक्र ॥२॥
काम इच्छा तयां तैसा होसी राणीं । यशोदेच्या स्तनीं पान करी ॥३॥
होऊनि सकळ कांहींच न होसी । तुका म्हणे यासी वेद ग्वाही ॥४॥
३९४६
उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा ॥१॥
कैसा जासी सांग आतां मजपासुनी । केलें वाताहात दिले संसारा पाणी ॥ध्रु.॥
अवघीं आवरूनि तुझे लाविलीं पाठीं । आतां त्या विसर सोहंकोहंच्या गोष्टी ॥२॥
तुका म्हणे आतां चरणीं घातली मिठी । पडिली ते पडो तुह्मा आम्हांसी तुटी ॥३॥
२२५३
उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया॥१॥
वेटाळिला भोंवता हरी । मयोरफेरीं नाचती ॥ध्रु.॥
मना आले करिती चार । त्या फार हा एकला ॥२॥
तुका म्हणे नारायणीं । निराजनी मीनलिया ॥३॥
१४४२
उदासीनाचा देह ब्रम्हरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥१॥
अनुताप अंगीं अग्नीचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥
दोष ऐशा नावें देहाचा आदर । विटाळे अंतर अहंभावें ॥२॥
तुका म्हणे जाय नासोनियां खंती । तंव चि हे चित्तीं बद्धता ते ॥३॥
२७०२
उद्धत त्या जाती । द्रवें रंगल्या उद्धती ॥१॥
म्हणऊनि बहु फार । त्यांसी असावें अंतर ॥ध्रु.॥
कैंचें पाठी पोट । गोडविषासी सेवट ॥२॥
तुका म्हणे सापा । न कळे कुरवाळिलें बापा ॥३॥
१७८३
उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥१॥
तरि मी पाहेन पाहेन । तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥
जनकश्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥२॥
पांडवा अकांतीं । तेथें पावसी स्मरती । घातलें द्रौपदी । यागीं बिरडें चोळीचें ॥३॥
करी गोपीचें कवतुक । गाईगोपाळांसी सुख । दावीं तें चि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥४॥
तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका म्हणें आतां । कोड पुरवीं हें माझें ॥५॥
५०४
उद्धाराचा संदेह नाहीं । याचा कांहीं सेवकां ॥१॥
पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु.॥
बुडतां जळीं जळतां अंगीं । ते प्रसंगीं राखावें ॥२॥
तुका म्हणे आम्हांसाठी । कृपा पोटीं वागवी ॥३॥
१३०७
उद्योगाची धांव बैसली आसनीं । पडिलें नारायणीं मोटळें हें ॥१॥
सकळ निश्चिंती जाली हा भरवसा । नाहीं गर्भवासा येणें ऐसा ॥ध्रु.॥
आपुलिया सत्ते नाहीं आम्हां जिणें । अभिमान तेणें नेला देवें ॥२॥
तुका म्हणे चळें एकाचिया सत्ता । आपुलें मी रिते पणें ऐसें ॥३॥
१४८८
उद्वेगासी बहु फांकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥१॥
आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु॥
मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरि हो नाश जीवित्वाचा ॥२॥
तुका म्हणे आहे वचनाची उरी । करितों तोंवरी विज्ञापना ॥३॥
५८२
उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आम्हां चाड ॥१॥
बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥२॥
तुका म्हणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥
८७९
उपकारी असे आरोनी उरला । आपुलें तयाला पर नाहीं ॥१॥
लाभावरी घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ध्रु.॥
जीवा ऐसें देखे आणिकां जीवांसी । निखळ चि रासि गुणांची च ॥२॥
तुका म्हणे देव तयांचा पांगिला । न भंगे संचला धीर सदा ॥३॥
२१४५
उपचारासी वांज जालों । नका बोलों यावरी ॥१॥
असेल तें असो तैसें । भेटीसरिसें नमन ॥ध्रु.॥
दुसऱ्यामध्यें कोण मिळे । छंद चाळे बहु मतें ॥२॥
एकाएकीं आतां तुका । लौकिका या बाहेरी ॥३॥
३०९५
उपजले मनीं । हे तों स्वामीची करणी ॥१॥
होईल प्रसादाचें दान । तरि हें कवुतक पाहेन ॥ध्रु.॥
येईल अभय जरि । तरि हे आज्ञा वंदिन शिरीं ॥२॥
भक्तीप्रयोजना । प्रयोजावें बंदिजना ॥३॥
यश स्वामिचिये शिरीं । दास्य करावें किंकरीं ॥४॥
तुका म्हणे आळी करा । त्यासी योजावें उत्तरा ॥५॥
२७५३
उपजल्या काळें शुभ कां शकुन । आतां आवरोन राहिलेती ॥१॥
नाहीं मागितली वचनाची जोडी । निष्काम रोकडी वरीवरी ॥ध्रु.॥
सत्याविण काय उगी च लांबणी । करियाची वाणी येर भूस ॥२॥
तुका म्हणे ऐसी कोणा चाळवणी । न विचारा मनीं पांडुरंगा ॥३॥
३६८७
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥१॥
वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ध्रु.॥
एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥२॥
तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥३॥
२३८३
उपजोनियां मरें । परि हें चि वाटे बरें ॥१॥
नाहीं आवडीसी पार । न म्हणावें जालें फार ॥ध्रु.॥
अमृताची खाणी । उघडली नव्हे धणी ॥२॥
तुका म्हणे पचे । विठ्ठल हें मुखा साचें॥३॥
१३६८
उपजों मरों हे तों आमुची मिरासी । हें तूं निवारिसी तरी थोर ॥१॥
उभा राहीं करीं खरा खोटा वाद । आम्ही जालों निंद लंडपणें ॥ध्रु.॥
उभयतां आहे करणें समान । तुम्हां ऐसा म्हणें मी ही देवा ॥२॥
तुका म्हणे हातीं सांपडलें वर्म । अवघाची भ्रम फेडिन आतां ॥३॥
२९९७
उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥
शुद्ध कां वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणें ॥ध्रु.॥
नाहीं भाव मनीं नाइके वचन । आपल्या आपण नाडियेले ॥२॥
तुका म्हणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रात्रंदिवस ॥३॥
११९
उपदेश तो भलत्या हातीं । झाला चित्तीं धरावा ॥१॥
नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ध्रु.॥
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥२॥
तुका म्हणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥३॥
२२०८
उपाधिवेगळे तुम्ही निर्विकार । कांहीं च संसार तुम्हां नाहीं ॥१॥
ऐसें मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥ध्रु.॥
निस्संग तुम्हांसी राहणें एकट । नाहीं कटकट साहों येक ॥२॥
तुका म्हणे नाहीं मिळों येत शिळा । रंगासी सकळा स्पटिकाची ॥३॥
२१४१
उपाधीजें बीज । जळोनि राहिलें सहज ॥१॥
आम्हां राहिली ते आतां । चाली देवाचिया सत्ता ॥ध्रु.॥
पराधीन तें जिणें । केलें सत्ता नारायणें ॥२॥
तुका म्हणे जाणें पाय । खुंटले आणीक उपाय ॥३॥
५५
उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥
काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.॥
काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥२॥
तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥३॥
३४१०
उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं ॥१॥
आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारीली आस ॥ध्रु.॥
भक्तीच्या उत्कर्षे । नाहीं मुक्तीचें तें पिसें ॥२॥
तुका म्हणे बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥३॥
१४४५
उपासा सेवटीं अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं ॥१॥
पुरवीं वासना साच सर्वजाणा । आम्हां नारायणा अंकिताची ॥ध्रु.॥
बहुदिसां पुत्रामातेमध्यें भेटीं । तैसा दाटो पोटीं प्रीतिउभड ॥२॥
तुका म्हणे धन कृपणा सोईरें । यापरि दुसरें नहो आतां ॥३॥
१७१५
उपेक्षिला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आईकिली ॥१॥
आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥
माझ्या दोषासाटीं होईल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥२॥
तुका म्हणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥३॥
२३७२
उंबरांतील कीटका । हें चि ब्रम्हांड ऐसें लेखा ॥१॥
ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥
हें चि ब्रम्हांड आम्हांसी । ऐसीं अगणित अंडें कैसीं ॥२॥
विराटाचे अंगी तैसे । मोजूं जातां अगणित केंश ॥३॥
ऐशा विराटाच्या कोटी । सांटवल्या ज्याच्या पोटीं ॥४॥
तो हा नंदाचा बाळमुकुंद । तान्हा म्हणवी परमानंद ॥५॥
ऐशी अगम्य ईश्वरी लीळा । ब्रह्मानंदीं गम्य तुक्याला ॥६॥
२०७१
उभाउभी फळ । अंगीं मंत्राचे या बळ ॥१॥
म्हणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ध्रु.॥
कळी काळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥२॥
तुका म्हणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥३॥
२५५५
उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥१॥
पुढें गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ।ध्रु.॥
दिसतें आहारीं । नये जाऊं ऐशावरी ॥२॥
अळसाची धाडी । तुका म्हणे बहु नाडी ॥३॥
४०५२
उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥१॥
शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पितांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेणें रवितेजें ॥२॥
श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुद्रिका माळ । दंतओळी हिरे झल्लाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥३॥
कडीं कडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥४॥
सुंदरपणाची साम्यता । काय वर्णु ते पावे आतां । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥५॥
३९७८
उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥१॥
देव बैसले सिंहासनीं । आल्या याचकासी होय धनी ॥ध्रु.॥
एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥२॥
दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥३॥
३३७७
उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे । पळे पाप महा सुटे कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥१॥
गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । मुनिलागे बहु गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥२॥
ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना ते द्यावयासी उदार । सिद्धी वोळगती जया सर्वठायीं । तुझें नाम हें चांगलें गे विठाई ॥३॥
असे उघडा हा विटेवरी उभा । कटसूत्र हें धरुनि भक्तीलोभा । पुढें वाट दावी भवसागराची । विठो माउली सिद्ध हे साधकांची ॥४॥
करा वेग हा तो धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुखा तें च साधीं । म्हणे तुका पंढरीस सर्व आलें । असे विश्व हें जीवनें त्याचि ज्यालें ॥५॥
२०१९
उभे चंद्रभागे तीरीं । कट धरोनिया करीं । पाउले गोजिरीं । विटेविरी शोभलीं ॥१॥
त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचे मनें हेवा । संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥
रूप डोळिया आवडे । कीतीं श्रवणीं पवाडे । मस्तक नावडे । उठों पायांवरोनि ॥२॥
तुका म्हणे नाम । ज्याचे नासी क्रोध काम । हरी भवश्रम । उच्चारितां वाचेसी ॥३॥
२४०३
उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरिनाथा॥१॥
अवघें पोटासाटीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥ध्रु.॥
लावी अनुसंधान। कांहीं देईल म्हणऊन ॥२॥
काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ॥३॥
२२४३
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥
बरें सेवन उपकारा । द्यावें घ्यावे या उत्तरा ॥ध्रु.॥
सरळ आणि मृद । कथा पाहावी तें उर्ध ॥२॥
गात जात तुका । हाचि उपदेश आइका॥३॥
१९६३
उमटे ते ठायीं । तुझे निरोपावे पायी ॥१॥
आह्मीं करावे चिंतन । तुझे नामसंकीर्तन ॥ध्रु.॥
भोजन भोजनाच्या काळीं। मागों करूनिया आळी ॥२॥
तुका म्हणे माथां । भार तुझ्या पंढरीनाथा॥३॥
२८२४
उरलें तें भक्तिसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिये ॥१॥
पुरवां तैसी केली आळी । बळी जगदानियां ॥ध्रु.॥
हातीं घेउनि चोरां भातें । दावां रितें बाळका । साजतें हें थोरपण । नाहीं दिण वत्सला ॥२॥
शाहणें तरीं लाड दावी । बाळ जेवीं मातेसी । तुका म्हणे पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥३॥
१११३
उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥१॥
अतीत देखोनि होय पाठीमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥
द्वीजा नमस्कारा मनीं भाव कैचा । तुर्कांचे दासीचा लेंक होय ॥२॥
तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥
२००५
उल्लंघिली लाज । तेणे साधियेले काज ॥१॥
सुखे नाचो पैलतीरीं । गेलों भवाचे सागरीं ॥ध्रु ॥
नामाची सांगडी । सुखे बांधिली आवडी ॥२॥
तुका म्हणे लोकां । उरली वाचा मारीं हाका॥३॥
११८२
उशीर कां केला । कृपाळुवा विठ्ठला ॥१॥
मज दिलें कोणा हातीं । काय मानिली निंश्चिती ॥ध्रु.॥
कोठवरी धरूं धीर । आतां मन करूं स्थिर ॥२॥
तुका म्हणे जीव । ऐसी भाकितसे कींव ॥३॥
७१८
उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥
ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥
तुका म्हणे एक नारायण घ्याई । वरकडा वाहीं शोक असे ॥३॥
२६४३
उसंतिल्या कर्मवाटा । बहु मोटा आघात ॥१॥
शीघ्र यावें शीघ्र यावें । हातीं न्यावें धरूनि ॥ध्रु.॥
भागलों या खटपटे । घटपटें करितां ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । माझी चिंता खंडावी ॥३॥
ऋ
८४२
ऋण वैर हत्या । हें तों न सुटे नेंदितां ॥१॥
हें कां नेणां पांडुरंगा । तुम्ही सांगतसां जगा ॥ध्रु.॥
माझा संबंध तो किती । चुकवा लोकाची फजिती ॥२॥
तुका म्हणे या चि साठीं । मज न घेतां नये तुटी ॥३॥
१३२८
ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥१॥
जालों उतराई शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥
आजिवरी होतों धरूनि जिवासी । व्याजें कासाविसी बहु केलें ॥२॥
तुका म्हणे मना आणिला म्यां भाव । तुमचा तेथें ठाव आहे देवा ॥३॥
ए
१५२१
एक एका साह्य करूं । अवघें धरूं सुपंथ ॥१॥
कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ध्रु.॥
अवघे धन्य होऊं आता । स्मरवितां स्मरण ॥२॥
तुका म्हणे अवघी जोडी । ते आवडी चरणांची ॥३॥
८५०
एक करिती गुरु गुरु । भोंवता भारु शिष्यांचा ॥१॥
पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ध्रु.॥
परस्त्री मद्यपान। पेंडखान माजविलें ॥२॥
तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥३॥
१७९६
एका गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥१॥
मोडूनियां वाटा सूक्षम दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥
लावूनि मृदांग टाळश्रुतिघोष । सेवूं ब्रम्हरस आवडीनें ॥२॥
तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥३॥
१६७
एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी ॥१॥
दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥
एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥२॥
एकां सर्वस्वाचा त्याग। एकां पोटासाठीं जोग ॥३॥
एकां भक्ति पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥४॥
वर्म पोटीं एका । फळें दोन सांगेतुका ॥५॥
१४९७
एक धरिला चित्तीं । आह्मीं रखुमाईचा पती ॥१॥
तेणें जालें अवघें काम । निवारला भवभ्रम ॥ध्रु.॥
परद्रव्य परनारी । जालीं विषाचिये परी ॥२॥
तुका म्हणे फार । नाहीं लागत व्यवहार ॥३॥
१९१
एक नेणतां नाडली । एकां जाणिवेची भुली ॥१॥
बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ काय निकें ॥ध्रु.॥
दोहीं सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥२॥
तुका म्हणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥३॥
२८३५
एक परि बहिर बरें । परि तीं ढोरें ग्यानगंडें ॥१॥
कपाळासी लागली अगी । अभागी कां जीतसे ॥ध्रु.॥
एक परि बरें वेडें । तार्कि कुडें जळो तें ॥२॥
तुका म्हणे खातडवासी । अमृतासी नोळखे ॥३॥
१०६६
एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥१॥
मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥
मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तोचि वरी माप भरी ॥२॥
तुका म्हणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥३॥
३३५१
एक ब्रहाचारी गाढवा झोबतां । हाणोनिया लाता पळाले तें ॥१॥
गाढवही गेले ब्रहाचर्य गेले । तोंड काळें झालें जगामाझी ॥धृ॥.
हें ना तैसे झाले हें ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायांची ते ॥२॥
३९८
एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती ॥१॥
कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ध्रु.॥
आठव चि पुरे । सुख अवघें मोहो रे ॥२॥
तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥३॥
५२८
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येई कैसें ॥१॥
म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥
आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरीच कारण साध्य होय ॥२॥
तुका म्हणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज स्थित येईल कळों ॥३॥
४०७१
एक मागणें हृषीकेशी । चित्त द्यावें सांगतों वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥१॥
नको दुजी बुद्धी आणीक । रिद्धीसिद्धी परलोक । तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ध्रु.॥
मना येईल तो जन्म देई । भलते कुळीं भलते ठायीं । तें मी सांकडें घालीत नाहीं । हृदयींहुनीं तूं न वजें ॥२॥
इतुलें करीं भलत्या परी । भलत्या भावें तुझें द्वारीं । राहेन दास होऊनि कामारी । वदो वैखरी नित्य नाम ॥३॥
नको विचारूं दुसरें आतां । शरण आलों जी पंढरीनाथा । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥४॥
३२२४
एक म्हणती आम्ही देवची पै झालो । ऐसे नका बोलो पडाल पतनी ॥१॥
एक म्हणती आम्ही देवाची पै रूपें । तुमचिया बापे न चुके जन्म ॥धृ॥
देवें उचलिली स्वमुखे मेदिनी । तुमचे गोणी नुचवलें ॥२॥
देवे मारियेलें दैत्य दानव मोठे । तुमचेनि न तुटे तृनमात्र ॥३॥
राया विठोबाचे पद जो अभिळासी । पातकाची राशी तुका म्हणे ॥४॥
३७८८
एकली रानागोविंदा सवें । गेलें ठावें तें झालें ॥१॥
मज न म्हणा न म्हणा शिंदळी । नाहीं विषम जवळीं आतळलें ॥ध्रु.॥
नव्हती देखिली म्यां वाट । म्हणोनि हा धीट संग केला ॥२॥
सलगी धरी पयोधर । साहाती करमुर सवें ॥३॥
भेणें मिठी दिधली गळां । सेजे जवळ दडालें ॥४॥
आहेव मी गर्भीन पणे । हे सांगणे का ॥५॥
लगे तुका म्हणे शेवटा नेले । संपादिले उभयंता ॥६॥
२४७७
एकविध आम्ही न धरूं पालट । न संडूं ते वाट सांपडली ॥१॥
म्हणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझें बुद्धीबळ पाय तुझे ॥ध्रु.॥
बहुत न कळे बोलतां प्रकार । अंतरा अंतर साक्षी असे ॥२॥
तुका म्हणे आगा जीवांच्या जीवना । तूं चि नारायणा साक्षी माझा ॥३॥
२८९५
एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण । पालटों चि भिन्न । नये अणुप्रमाण ॥१॥
अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ । आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ॥ध्रु.॥
कायावाचामन । स्वरूपे चि अनुसंधान । लक्ष भेदी बाण । ये पाडें लवलाहो ॥२॥
तुका म्हणे आळस निद्रा । येथें देउनियां चिरा । देउनियां धीरा । मिठी जाणा जागृतीं ॥३॥
२८३०
एकविध वृत्ति न राहे अंतरीं । स्मरणीं च हरी विस्मृति हे ॥१॥
कैसा हा नवलाव वाटतो अनुभवें । मज माझ्या जीवें साक्षित्वेसी ॥ध्रु.॥
न राहे निश्चळि जागवितां मने । किती क्षीणेंक्षीणें सावरावें ॥२॥
तुका म्हणे बहु केले वेवसाव । तेणें रंगें जीव रंगलासे ॥३॥
२५७४
एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि ॥१॥
आठवीन पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥ध्रु.॥
बहु दूरवरी भोगविले भोगा । आतां पांडुरंगा सोडवावें ॥२॥
तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओंवाळूनि सांडीं मस्तक हें ॥३॥
३१०
एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥१॥
अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥
अनुतापें स्नानविधि । यज्ञ सिद्धी देहहोम ॥२॥
जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥३॥
२६६४
एक वेळ केलें रितें कलेवर । आंता दिली थार पांडुरंगा ॥१॥
पाळण पोषण नलगे ते सोई । देहाचें तें काई सर्वभावें ॥ध्रु.॥
माझिया मरणें झाली हे वसति । लागली ते ज्योती अविनाश ॥२॥
झाला ऐसा एका घायें येथें नाहीं । तुका म्हणे कांहीं बोलों नये ॥३॥
१९५७
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥१॥
कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं ॥ध्रु.॥
ओठ हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा ॥२॥
तुका म्हणे श्रम । एक विसरतां राम ॥३॥
२८१६
एका एक वर्में लावूनियां अंगीं । ठेवितों प्रसंगीं सांभाळीत ॥१॥
नेघावा जीं तुम्ही वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥ध्रु.॥
वेव्हारें आलें तें समानें चि हातें । बळ नाहीं येथें चालों येत ॥२॥
तुका म्हणे आतां निवाडा च साटीं । संवसारें तुटी करुनि ठेलों ॥३॥
२१११
एकाएकीं आतां असावेंसें वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥१॥
वाजवूनि तोंड घातलों बाहेरी । कुल्प करुनी दारीं माजी वसा ॥ध्रु.॥
उजेडाचा केला दाटोनि अंधार । सवें हुद्देदार चेष्टाविला ॥२॥
तुका म्हणे भय होतें तों चि वरी । होती कांहीं उरी स्वामिसेवा ॥३॥
१३११
एका ऐसें एक होतें कोण्याकाळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥१॥
घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ध्रु.॥
केला तो न संडीं आतां कइवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥२॥
तुका म्हणे जाली अळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळों साच ॥३॥
३६३७
एका च स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥१॥
स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥
हीन कमाईचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥२॥
पाईकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढ्या ठाव ॥३॥
तुका म्हणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥४॥
९५४
एकाचिया घाटया टोके । एका फिके उपचार ॥१॥
ऐसी सवे गोविळया । भाव तया पढियंता ॥ध्रु.॥
एकाचेथें उष्टे खाय । एका जाय ठकूणि ॥२॥
तुका म्हणे बहु सोपें । बहु रूपें अनंता ॥३॥
२६३९
एकाचिये वेठी । सांपडलों फुकासाठी ॥१॥
घेतों काम सत्ताबळें । माझें करूनि भेंडोळें ॥ध्रु.॥
धांवे मागें मागें । जाय तिकडे चालत लागे ॥२॥
तुका म्हणे नेलें । माझें सर्वस्वें विठ्ठलें ॥३॥
१०८९
एकाचिये सोई कवित्वाचे बांधे । बांधिलिया साधे काय तेथें ॥१॥
काय हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुनि काय ॥ध्रु.॥
कवित्वाचे रूढी पायां पडे जग । सुखावोनि मग नरका जाय ॥२॥
तुका म्हणे देव केल्याविण साहे । फजिती ते आहे लटिक्या अंगीं ॥३॥
३६३
एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥१॥
ऐशा देवाच्या विभुती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ध्रु.॥
एकांचीं वचनें । कडु अत्यंत तीक्षणें ॥२॥
प्रकाराचें तीन । तुका म्हणे केलें जन ॥३॥
३४३२
एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥
नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥
तुका म्हणे झालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥
१५६०
एकांतांचे सुख देई मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥१॥
ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं ॥ध्रु.॥
मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देई देवा ॥२॥
कीर्ती ऐकोनियां जालों शरणांगत । दासाचें तूं हित करितोसी ॥३॥
तुका म्हणे मी तों दीन पापराशी । घालावें पाठीशी मायबापा ॥४॥
२५७०
एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तो ही मळ नाहीं येथें ॥१॥
घ्यावें द्यावें आह्मीं आपुलिया सत्ता । न देखों पुसता दुजा कोणी ॥ध्रु.॥
भांडाराची किली माझे हातीं आहे । पाहिजे तो पाहें वान येथें ॥२॥
तुका म्हणे आम्हां विश्वासाच्या बळें । ठेविलें मोकळें देवें येथें ॥३॥
४९
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥१॥
काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥
हरीहरां नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥२॥
तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होईल नेणों ॥३॥
१७०
एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥१॥
ऐका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऐकतीं हरीकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥
अशुद्ध विटाळसीचें खळ । विडा भिक्षतां तांबूल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥२॥
सेज बाज विलास भोग । करी कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥३॥
आपण न वजे हरीकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा महा मेरु ॥४॥
तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥५॥
८५१
एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥१॥
पाप न लगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥ध्रु.॥
कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥२॥
असत्य जे वाणी । तेथें पापाची च खाणी ॥३॥
सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥४॥
तुका म्हणे दोन्ही । जवळी च लाभहानी ॥५॥
४०६
एका बीजा केला नास । मग भोगेल कणीस ॥१॥
कळे सकळां हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥ध्रु.॥
लाभ नाहीं फुकासाठीं । केल्यावीण जीवासाठीं ॥२॥
तुका म्हणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥३॥
२३४३
एका बोटाची निशाणी । परीपाक नाहीं मनीं ॥१॥
तरिं तें संपादिलें सोंग । कारणावांचूनियां व्यंग ॥ध्रु.॥
वैष्णवांचा धर्म। जग विष्णु नेणे वर्म ॥२॥
अतिशयें पाप । तुका सत्य करी माप ॥३॥
१२२२
एका म्हणता भलें । आणिका सहज चि निंदिलें ॥१॥
कांहीं न करितां सायास । सहज घडले ते दोष ॥ध्रु.॥
बरें वाइटाचें । नाहीं मज कांहीं साचें ॥२॥
तुका म्हणे वाणी । खंडोनि राहावें चिंतनीं ॥३॥
१४१६
एका हातीं टाळ एका हातीं चिपिळया । घालिती हुंमरी एक वाहाताती टाळिया ॥१॥
मातले वैष्णव नटती नाना छंदें । नाहीं चाड मोक्षपदें भजनीं आवडी ॥ध्रु.॥
हाका अरोळिया गीतवादें सुखसोहळे । जाय तें न कळे केव्हां रजनी दिवस ॥२॥
तीर्थी नाहीं चाड न लगे जावें वनांतरा । तुका म्हणे हरीहरात्मक चि पृथिवी ॥३॥
५६१
एका केली हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥१॥
आम्ही देवा शिक्तहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥
पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥२॥
तुका म्हणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥३॥
३३१९
एकीं असे हेवा । येर अनावडी जीवां ॥१॥
देवें केल्या भिन्नजाती । उत्तम कनिष्ठ मध्यस्ती ॥ध्रु.॥
प्रीतिसाठी भेद । कोणी पूज्य कोणी निंद्य ॥२॥
तुका म्हणे लळा । त्याचा जाणे हा कळवळा ॥३॥
३७०८
एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे ।
त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांसी तरी धरीं सोई रे ॥१॥
खेळ खेळोनियां निराळा चि राही । सांडी या विषयाची घाई रे ।
तेणें चि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भाई रे ॥ध्रु.॥
सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या सवंगडिया सिकवूनि घाई ।
तेणें सतत फड जागविला रे । एक घाई खेळतां तो न चुके चि कोठें । तया संत जन मानवले रे ॥२॥
ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदे खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनी बसवंत केला ।
आपण भोवती नाचती रे । सकळीका मिळोनी एकची घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायी रे ॥३॥
राम बसवंत कबीर खेळीया । जोड बरवा मिळाला रे । पाचा सावन्ग्दिया एकची घाई ।
तेथे नाद बरवा उमटला रे । ब्रम्हादिक सुरवर मिलोनियां त्यांनी । तो हि खेळीया निवडीला रे ॥४॥
ब्राम्हणाच पोर खेळीया ऐका भला । तेणे जन खेळकर केला रे ।
जनार्दन बसवंत करुनिया तेणे वैष्णवांचा मेळ मेळविला रे ।
एकची घाई खेळता खेळता । आपणची बसवंत जाला रे ॥५॥
आणिक खेलीये होऊनिया गेले । वर्णावया वाचा मज नही रे ।
तुका म्हणे गडे हो हुशारुनी खेळा । पुढिलांची धरुनिया सोई रे ।
एकची घाई खेळता जो चुकला । तो पडे संसार डाई रे ॥६॥
२८४७
एके ठायीं अन्नपाणी । ग्रासोग्रासीं चिंतनीं ॥१॥
वेळोवेळां जागवितों । दुजें येईल म्हणु भीतों ॥ध्रु.॥
नाहीं हीं गुंतत उपचारीं । मानदंभाचे वेव्हारीं ॥२॥
तुका झालासे शाहाणा । आड लपे नारायणा ॥३॥
५७४
एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ॥१॥
होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ध्रु.॥
एवढा जगदानी। मागे तुळसीदळ पाणी ॥२॥
आला नांवा रूपा । तुका म्हणे जाला सोपा ॥३॥
३५४८
एवढा संकोच तरि कां व्यालासी । आह्मी कोणांपाशीं तोंड वासूं ॥१॥
कोण मज पुसे सिणलें भागलें । जरी मोकलिलें तुह्मीं देवा ॥ध्रु.॥
कवणाची वाट पाहों कोणीकडे । कोण मज ओढे जीवलग ॥२॥
कोण जाणे माझे जीवींचें सांकडें । उगवील कोडें संकटाचें॥३॥
तुका म्हणे तुह्मी देखिली निश्चिंती । काय माझे चित्तीं पांडुरंगा ॥४॥
२५०७
एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती ॥१॥
जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥ध्रु.॥
काळिमेचें जिणें । जीवोनियां राहे सुनें ॥२॥
तुका म्हणे गुण । दरुषणें अपशकुन ॥३॥
ऐ
१४६६
ऐकतों दाट । आले एकांचें बोभाट ॥१॥
नका विश्वासों यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥ध्रु.॥
हे चि यांची जोडी । सदा बोडकीं उघडीं ॥२॥
तुका म्हणे न्यावें । ज्याचे त्यासी नाहीं ठावें ॥३॥
२८१२
ऐकें पांडुरंगा वचन माझें एक । झालों मी सेवक दास तुझा ॥१॥
कळे तैसा आतां करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढें ॥ध्रु.॥
दंभ मान माझा करूं पाहे घात । झालिया ही थीत कारणाचा ॥२॥
हीन बुद्धी माझी अधम हे याती । अहंकार चित्तीं वसों पाहे ॥३॥
तुका म्हणे मज बिघडतां क्षण । न लगे जतन करीं देवा ॥४॥
३९४३
ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें म्हणउन ॥१॥
मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हे भलें कळों कोणा लोकांसि ॥ध्रु.॥
सांगतें गुण जीवीची खुण ऐक माझी मात । बैस एका भावें माझे हातीं दे वो हात ॥२॥
बरवा घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥३॥
आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भावा करीं साह्य चहूं अठरांच्या बळें ॥४॥
करीं लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखई तो चुडा तुज भोगईल ना हो ॥५॥
कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावी ॥६॥
तुका म्हणे नांद सुखें धरीं आठवण । माझ्या येती कोणी त्यांचा राखे बहु मान ॥७॥
१७९०
ऐकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग म्हणऊनि॥१॥
उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥
दुसऱ्या परी एक ऐसा । वजे रिसा निकुरें ही ॥२॥
तुका म्हणे कळत्यां कळे । येर खेळे खेळ म्हणो ॥३॥
२३५६
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥
तर्कीकाचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥ध्रु.॥
नका शोधूं मतांतरें। नुमगे खरें बुडाल ॥२॥
कलिमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ॥३॥
३४६१
ऐका कलीचें हें फळ । पुढें होईल ब्रम्हघोळ ॥१॥
चारी वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंक्ती ॥ध्रु.॥
पूजितीअसुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा ॥२॥
वामकवळ मार्जन । जन जाईल अध:पतन ॥३॥
तुका हरीभक्ती करी । शक्ती पाणी वाहे घरीं॥४॥
३९३२
ऐका गा ए भाई । सरवदा सांगतो काई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची । ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसद्धि जना । एक न मारितां शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥१॥
आणीक ऐका गाए । सरवदा सांगतो काय । खरें चि बोले तो जाय । नरकामध्यें अधोगती । हें चौघांच्या मुखें । मना आणावें सुखें । अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ध्रु.॥
आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन । जागें माझें म्हणोन । पडिलें खान तया घरीं । म्हणोन न म्हणा माझें कांहीं । निजीं निजा सुखें ठायीं । यत्न होईल तई । चोराठायीं विश्वास ॥२॥
आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामधीं । पांचांनीं दिधली हातीं । म्हणोनि न मनावी निश्चिती । परपुरुषीं होय रती । सुखगती ते पावे ॥३॥
आणिक परी । सरवदा सांगतो तें करीं । दान देतां जो न वारी । नव्हे भला भला तो । तुका म्हणे आई । येथें नांव काई । सांगसी तें ठायीं । मरो रांडेचें ॥४॥
१५९९
ऐका गा ए अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥१॥
अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावें ॥ध्रु.॥
नाहीं कोणी सवें येता । संचिता या वेगळा ॥२॥
बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रियें ॥३॥
कर्मभूमीऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥४॥
तुका म्हणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ॥५॥
२४८९
ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
सन्निध पातलों सांडूनियां शंका । सन्मुख चि एकाएकीं पुढें ॥ध्रु.॥
जाणविलें कोठें पावे पायांपाशीं । केली या जिवासी साटी ह्मुण ॥२॥
तुका म्हणे माझे हातीं द्या उद्धार । करीं करकर म्हणवूनि ॥३॥
२१३८
ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥१॥
सकळांचें सार एक । कंटक ते त्यजावे ॥ध्रु.॥
विशेषता कांद्याहूनि । सेवित्या घाणी आगळी ॥२॥
तुका म्हणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे॥३॥
३६६७
ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुम्हांपुढें हो कोणी झणी कोपाल ॥१॥
उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुम्ही धरावें चित्तीं ॥ध्रु.॥
धर्म तयासी घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाहीं लाज ॥२॥
पुण्य तें जाणां रे भाइनो परउपकाराचें । परपीडा परनिंदा रे खरें पाप तयाचें ॥३॥
लाभ तयासी झाला रे मुखीं देव उच्चारी । प्रपंचापाठी गुंतला हाणी तयासी च थोरी ॥४॥
सुख तें जाणा रे भाइनो संतसमागम । दुःख तें जाणारे भाइनो शम तेथे विशम ॥५॥
साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धि । पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी ॥६॥
मान पावे तो आगळा मुख्य इंद्रियें राखे । अपमानी तो अधररसस्वाद चाखे॥६॥
जाणता तयासी बोलिजे जाणे समाधान । नेणता तयासी बोलिजे वाद करी भूषण ॥८॥
भला तोचि एक जाणा रे गयावर्जन करी । बुरा धन नष्ट मेळवी परद्वार जो करी ॥९॥
आचारी अन्न काढी रे गाई अतितभाग । अनाचारी करी भोजन ग्वाही नसतां संग ॥१०॥
स्वहित तेणें चि केलें रे भूतीं देखिला देव । अनहित तयाचें झालें रे आणी अहंभाव ॥११॥
धन्य जन्मा ते चि आले रे एक हरीचे दास । धिग ते विषयीं गुंतले केला आयुष्या नास ॥१२॥
जोहोरि तोचि एक जाणा रे जाणे सिद्धलक्षणें । वेडसरु तो भुले रे वरदळभूषणें ॥१३॥
बिळयाढा तोचि जाणा रे भक्ती दृढ शरीरीं । गांढ्या तयासी बोलिजे एक भाव न धरी ॥१४॥
खोल तो वचन गुरूचें जो गिळूनि बैसे । उथळ धीर नाहीं अंगीं रे म्हणे होईल कैसें ॥१५॥
उदार तो जीवभाव रे ठेवी देवाचे पायीं । कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिठाई ॥१६॥
चांगलेंपण तें चि रे ज्याचें अंतर शुद्ध । वोंगळ मिळन अंतरीं वाणी वाहे दुगपध ॥१७॥
गोड तें चि एक आहे रे सार विठ्ठलनाम । कडु तो संसार रे लक्षचौऱ्यांशी जन्म ॥१८॥
तुका म्हणे मना घरी रे संतसंगतिसोई । न लगे कांहीं करावें राहें विठ्ठलपायीं ॥१९॥
१६४४
ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥१॥
नका करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥
अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥२॥
तुका म्हणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥३॥
३३२५
ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥१॥
थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ तयाला ॥ध्रु.॥
पोहे सुदामदेवाची । फके मारी कोरडे चि ॥२॥
न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तीपुढें ॥३॥
७६८
ऐका वचन हें संत । मी तों आगळा पतित । काय काजें प्रीत । करीतसां आदरें ॥१॥
माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं । एकांचिये वांहीं । एक देखीं मानिती ॥ध्रु.॥
बहु पीडिलों संसारें । मोडीं पुसें पिटीं ढोरें । न पडतां पुरें । या विचारें राहिलों ॥२॥
सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें बहु तें ही । त्याग केला नाहीं । दिलें द्विजां याचकां ॥३॥
प्रियापुत्रबंधु । यांचा तोडिला संबंधु । सहज जालों मंदु । भाग्यहीन करंटा ॥४॥
तोंड न दाखवावे जना । शिरें सांदी भरें राणां । एकांत तो जाणां । तयासाठी लागला ॥५॥
पोटें पिटिलों काहारें । दया नाहीं या विचारें । बोलावितां बरें । सहज म्हणें यासाठी ॥६॥
सहज वडिलां होती सेवा । म्हणोनि पूजितों या देवा । तुका म्हणे भावा । साठी झणी घ्या कोणी ॥७॥
१४७१
ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुम्हां ॥१॥
तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥
आमुच्या जीवींचा तोचि जाणे भावो । रखुमाईचा नाहो पांडुरंग ॥२॥
चित्त माझें त्याचे गुंतलेंसे पायीं । म्हणऊनि कांहीं नावडे त्या ॥३॥
तुका म्हणे मज न साहे मीनती । खेद होय चित्तीं भंग मना ॥४॥
८०८
ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥१॥
मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥
दास्य करील कळिकाळ बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥
सकळशास्त्रांचें सार हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार हाचि करिती पुराणें ॥३॥
ब्राम्हण क्षेत्री वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥४॥
तुका म्हणे अनुभवें आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें सुख घेती भाविकें ॥५॥
३९८४
ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥१॥
कर जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ध्रु.॥
घेई ऐसी भाक । मागेन जरि कांहीं आणिक ॥२॥
तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाचि राखावा ॥३॥
३५७०
ऐकोनियां कीर्ती । ऐसी वाटती विश्रांती ॥१॥
माते सुख डोळां पडे । तेथें कोण लाभ जोडे ॥ध्रु.॥
बोलतां ये वाचे । वीट नये जिव्हा नाचे ॥२॥
तुका म्हणे धांवे । वासना ते रस घ्यावे ॥३॥
१९९२
ऐशा भाग्यें जालों । तरी धन्य जन्मा आलों ॥१॥
रुळें तळीले पायरी । संत पाय देती वरी ॥ध्रु.॥
प्रेमामृतपान । होईल चरणरजें स्नान ॥२॥
तुका म्हणे सुखें । तया हरतील दुःखें ॥३॥
३४९५
ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ ध्रु॥ इतन गोते काहे खाता । जब तूं आपणा भूल न होता ॥१॥
अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥२॥
तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नहिं लेस ॥३॥
१४७२
ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥१॥
निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दुःखें व्याधि पीडा ॥ध्रु.॥
काय पळे सुखें चोर लागे पाठी । न घलावी काठी आड तया ॥२॥
जयाचें कारण तोचि जाणे करूं । नये कोणां वारूं आणिकासी ॥३॥
तुका म्हणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥४॥
१२६३
ऐसा घेई कां रे संन्यास । करीं संकल्पाचा नास ॥१॥
मग तूं राहें भलते ठायीं । जनीं वनीं खाटे भोई ॥ध्रु.॥
तोडीं जाणिवेची कळा । होई वृत्तीसी वेगळा ॥२॥
तुका म्हणणे नभा । होई आणुचा ही गाभा ॥३॥
२६९०
ऐसा चि तो गोवा । न पाहिजे केला देवा ॥१॥
बहु आली दुरिवरी । ओढत हे भरोवरी ॥ध्रु.॥
आम्हांसी न कळे । तुम्ही झाकुं नये डोळे ॥२॥
तुका म्हणे संगें । असों एक एका अंगें ॥३॥
१०३८
ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥१॥
देव तया जवळी असे । पाप नासे दर्शणें ॥ध्रु.॥
कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥२॥
तुका म्हणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥३॥
२८२०
ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥१॥
मागत्याची टाळाटाळी । झिंज्या ओढोनि कपाळीं ॥ध्रु.॥
नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥२॥
तुका म्हणे झाला । उशीर तो विठ्ठला ॥३॥
३२२१
ऐसा दुस्तर भवसागर । नेणों कैसा उतरूं पार ॥१॥
कामक्रोधादि सावजें थोर । दिसताती भयंकर ॥ध्रु.॥
मायाममतेचे भोवरे । घेती भयानक फेरे ॥२॥
वासनेच्या लहरा येती । उद्योगहेलकावे बसती ॥३॥
तरावया एक युक्ति असे । तुका नामनावेमधे बैसे ॥४॥
२४१३
ऐसा माझा कोण आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥१॥
काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । तें मज राउळ कृपा करी ॥ध्रु.॥
काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥२॥
कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥३॥
तुका म्हणे वांयां झालों भूमी भार । होईल विचार काय नेणों ॥४॥
१३६
ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥१॥
संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु.॥
आचार करितां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥२॥
संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥
धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा लाविताती ॥४॥
बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥
भेटिसि न वजातां म्हणती हा निष्ठुर । येतां जातां घर बुडविलें ॥६॥
लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥७॥
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥
लोक जैसा लोक धरितां धरवे ना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥
तुका म्हणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥
७५९
ऐसिया संपत्ती आम्हां संवसारी । भोगाचिया परि काय सांगों ॥१॥
काम तो कामना भोगीतसे देवा । आलिंगणे हेवा चरण चुंबीं ॥ध्रु.॥
शांतीच्या संयोगें निरसला ताप । दुसरें तें पाप भेदबुद्धी ॥२॥
तुका म्हणे पाहें तिकडे सारिखें । आपुलें पारिखें निरसलें ॥३॥
३३११
ऐसी एकां अटी । रीतीं सिणती करंटीं ॥१॥
साच आपुल्या पुरतें । करून नेघेती कां हितें ॥ध्रु.॥
कां हीं वेचितील वाणी । निरर्थक चि कारणीं ॥२॥
तुका म्हणे देवा । कांहीं समर्पूनि सेवा ॥३॥
७४४
ऐसी जिव्हा निकी । विठ्ठल विठ्ठल कां न घोकी ॥१॥
जेणें पाविजे उद्धार । तेथें राखावें अंतर ॥ध्रु.॥
गुंपोनि चावटी । तेथें कोणा लाभें भेटी ॥२॥
तुका म्हणे काळ । देवाविण अमंगळ ॥३॥
१०४२
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥१॥
नाशीवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥
नाव धड करा सहस्र नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥२॥
तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरीरामबाणीं ॥३॥
२३९१
ऐसीं ठावीं वर्में । तरी सांडवलों भ्रमें ॥१॥
सुखें नाचतों कीर्तनीं । नाहीं आशंकित मनीं ॥ध्रु.॥
ऐसें आलें हाता । बळ तरी गेली चिंता ॥२॥
सुखे येथें जालें तरी । नाहीं आणिकांची उरी ॥३॥
ऐसें केलें देवें । पुढें कांहीं चि न व्हावें ॥४॥
तुका म्हणे मन । आतां जालें समाधान ॥५॥
३५८०
ऐसी ते सांडिली होइऩल पंढरी । येते वारकरी होत वाटे ॥१॥
देखिले सोहळे होती आठवत । चालती ते मात करूनियां ॥ध्रु.॥
केली आइकिली होईल जे कथा । राहिलें तें चित्ता होईल प्रेम ॥२॥
गरुडटके टाळ मृदांग पताका । सांगता ची ते एकां एक सुख ॥३॥
तुका म्हणे आतां येती लवलाहीं । आलिंगूनि बाहीं देइन क्षेम ॥४॥
२९६१
ऐसीं वर्में आम्हां असोनियां हातीं । कां होऊं नेणतीं दिशाभुली ॥१॥
पोटाळुनी पाय कवळीन उभा । कृपे पद्मनाभा झालों नेदीं ॥ध्रु.॥
आपुले इच्छेसी घालीन संपुष्टीं । श्रीमुख तें दृष्टी न्याहाळीन ॥२॥
तुका म्हणे बहु सांडियेलीं मतें । आपुल्या पुरतें धरुनी ठेलों ॥३॥
३४७२
ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ । कां हो कळवळ तुम्हां उमटेचिना ॥१॥
आवो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आसे चाळवूनी ठेविलें ॥ध्रु.॥
काय जन्मा येवूनियां केली म्यां जोडी । ऐसें घडीघडी चित्तां येतें आठवूं ॥२॥
तुका म्हणे खरा न पवे चि विभाग । धिक्कारितें जग हें चि लाहे हिशोबें ॥३॥
४०४०
ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥१॥
जनार्दना जगजीवना। विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ध्रु.॥
चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥२॥
मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाटएकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥३॥
गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा। करोनि अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळों ॥४॥
कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाय वेगळेजीवा न करी तुका ॥५॥
२०२
ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू ।
जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥१॥
भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु ।
भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं ।
लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥२॥
अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।
वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥
मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास ।
साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥
३४६२
ऐसें कलियुगाच्या मुळें । झालें धर्माचें वाटोळें ॥१॥
सांडुनियां रामराम । ब्राम्हण म्हणती दोमदोम ॥ध्रु.॥
शिवों नये तीं निळीं । वस्त्रें पांघरती काळीं ॥२॥
तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥३॥
१००९
ऐसें कां जालें तें मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगीं ॥१॥
कैसें तुम्हां देवा वाटतसे बरें । संतांचीं उत्तरें लाजविलीं ॥ध्रु.॥
भाविकां कंटक करिताती पीडा । हा तंव रोकडा अनुभव ॥२॥
तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाहीं तुम्हां ॥३॥
१४५६
ऐसें कां हो न करा कांहीं । पुढें नाहीं नास ज्या ॥१॥
विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥ध्रु.॥
श्रुतीचें कां नेघा फळ। सारमूळ जाणोनि ॥२॥
तुका म्हणे पुढें कांहीं । वाट नाहीं यावरी ॥३॥
६९६
ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजा ॥१॥
चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥ध्रु.॥
त्याचियानें दुःखी मही । भार तेही न साहे ॥२॥
तुका म्हणे ग्रामपशु । केला नाशु अयुष्या ॥३॥
३२६८
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥
अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥२॥
तुका म्हणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥३॥
२७२५
ऐसें कोण पाप बळी । जें जवळी येऊं नेदी ॥१॥
तुम्हां तंव होईल ठावें । नेदावें कां कळों हें ॥ध्रु.॥
कोण झाला अंतराय । कां ते पाय अंतरले ॥२॥
तुका म्हणे निमित्याचा । आला सुचा अनुभव ॥३॥
२६७३
ऐसें ठावें नाहीं मूढा । सोस काकुलती पुढां ॥१॥
माझीं नका जाळूं भांडीं । पोटीं भय सोस तोंडीं ॥ध्रु.॥
पातलिया काळ । तेव्हां काय चाले बळ ॥२॥
संचित तें करी । नरका जाया मेल्यावरी ॥३॥
परउपकार । न घडावा हा विचार ॥४॥
तुका म्हणे लांसी । आतां भेटों नये ऐसी ॥५॥
३०७८
ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाठी घेती प्रतिग्रह ॥१॥
परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥२॥
जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका म्हणे ॥३॥
५४७
ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥१॥
म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥
संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥२॥
तुका म्हणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥३॥
२३६३
ऐसें भाग्य कई लाहाता होईन । अवघें देखें जन ब्रम्हरूप ॥१॥
मग तया सुखा अंत नाहीं पार । आनंदें सागर हेलावती ॥ध्रु.॥
शांति क्षमा दया मूर्तीमंत अंगीं । परावृत्त संगीं कामादिकां ॥२॥
विवेकासहित वैराग्याचें बळ । धगधगित ज्ज्वाळ अग्नी जैसा ॥३॥
भक्ती नवविधा भावशुद्ध बरी । अळंकारावरी मुगुटमणि ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवी वासना । कोण नारायणा तुजविण ॥५॥
११७१
ऐसे संत जाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी ॥१॥
स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोढविली ॥ध्रु.॥
भांगभुकी हें साधन। पची पडे मद्यपान ॥२॥
तुका म्हणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥३॥
१७०३
ऐसें सत्य माझें येईल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥१॥
वचनांसारिखें तळमळी चित्त । बाहेरि तो आंत होईल भाव ॥ध्रु.॥
तरि मज ठाव द्यावा पायांपाशीं । सत्यत्वें जाणसी दास खरा ॥२॥
तुका म्हणे सत्य निकट सेवकें । तरि च भातुकें प्रेम द्यावें ॥३॥
८७८
ऐसे सांडुनियां घुरे । किविलवाणी दिसां कां रे । कामें उर भरे । हातीं नुरे मृत्तिका ॥१॥
उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥ध्रु.॥
न लगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरीं । त्याचा तोचि करी । पारपत्य सकळा ॥२॥
नाहीं आडकाठी । तुका म्हणे जातां भेटी । न बोलतां मिठी । उगी च पायीं घालावी ॥३॥
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या