संत तुकाराम गाथाअनुक्रमणिका नुसार

४०६३
आइका पांडुरंगा एक मात । काही बोलणे आहे एकांत । आम्हां जरी तारील संचित । तरीच उचित काय तुझे ॥१॥
उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनी भूषण । वांयां थोर पण जनामध्यें ॥ध्रु.॥
अन्न जरी न मिळे तयासी देणें । अंगातुक पात्र उचित दान । उपकार तरी धन्वंतरीपणें । जरी देणें घेणें नाहीं आशा ॥२॥
शूर तो तयासी बोलणे जाणा । पाठीसी घालूनी राखे दिना । पार पुण्या त्या नाही भूषणा । एक नारायणा वचन हें ॥३॥
आतां पुढे बोलणें ते कांहीं । मज तारिसील तरीच सही । वचन आपुले सिद्धी नेई । तुका म्हणे तई मज काळसी ॥४॥


२९२२
आइकावी माझीं कवतुकउत्तरें । देउनी सादरें चित्त देवा ॥१॥
वोरसें आवडी आलों पायापासीं । होय तें मनेसीं सुख कीजे ॥ध्रु.॥
तुमचें न भंगे सर्वोत्तमपण । करितां समाधान लेंकराचें ॥२॥
तुका म्हणे जरी बोलतों बोबडें । तरी लाडे कोडें कवतुके ॥३॥


३०३९
आइके नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपासीं ॥१॥
नाहीं भाव मज पडिली लोककाज । राहिलेंसे काज तुझे पायीं ॥ध्रु.॥
वरदळ भक्ती करितो मी नित्य परी नाही चित्त तुझे पाइ ॥२॥
जरि तुज कांहीं करणें उचित । तारीं तूं पतित तुका म्हणे ॥३॥


३४४१
आइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडावी सोई भ्रताराची ॥१॥
नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥२॥
तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥३॥


१५१३
आइकिली कीर्त्ति संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥१॥
मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा ॥ध्रु.॥
आह्मासी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥२॥
तुका म्हणे येथें नसावें चि दुजें । विनंती पंढरिराजें परिसावी हे ॥३॥


१५३४
आइकिली मात । पुरविले मनोरथ ॥१॥
प्रेम वाढविलें देवा । बरवी घेऊनियां सेवा ॥ध्रु.॥
केली विनवणी । तैसी पुरविली धणी ॥२॥
तुका म्हणे काया । रसा कुरोंडी वरोनियां ॥३॥


७८३
आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥१॥
आतां सोडोनि भोजन । भिके जावें वेडेपण ॥ध्रु.॥
उसंतिली वाट । मागें परतावें फुकट ॥२॥
तुका म्हणे वाणी । वेचों बैसोन ठाकणीं ॥३॥


३२९२
आइत्या भाग्या धणी व्हावे । केणें घ्यावे न सरे ते ॥१॥
केणे आहे पंढरपुरी । उधारीचे लाभीक ॥ध्रु.॥
बाखराची करुनी रिती । भरा पोती सकळ ॥२॥
तुका म्हणे संतांपाडे । करा पुढे वाखती ॥३॥


४५८४
आकारवंत मूर्ती । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥
मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ॥ध्रु.॥
श्रुति वाखाणिती । तैसा येसील प्रचिती ॥२॥
म्हणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥३॥


१८६५
अगी देखोनियां सती । अंगीं रोमांच उठती ॥१॥
हा तो नव्हे उपदेश । सुख अंतरीं उल्हासे ॥ध्रु.॥
वित्तगोतांकडे । चित्त न घाली न रडे ॥२॥
आठवूनि एका । उडी घाली ह्मणे तुका ॥३॥


२२१२
आगी लागो तया सुखा । जेणें हरी नये मुखा ॥१॥
मज होत कां विपित्त । पांडुरंग राहो चित्तीं ॥ध्रु.॥
जळो तें समूळ। धन संपित्त उत्तम कुळ ॥२॥
तुका म्हणे देवा । जेणें घडे तुझी सेवा॥३॥


३३०१
आग्रहा नांवें पाप । योगीं सारावे संकल्प ॥१॥
सहजा ऐसें भांडवल । असोनि कां सारा बोल ॥ध्रु.॥
तैं न भेटे तें काय । मना अंगींचे उपाय ॥२॥
तुका म्हणे धरीं सोय । वासनेची फोडा डोय ॥३॥


२११
आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥१॥
करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ध्रु.॥
श्वानाचियापरी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥२॥
तुका म्हणे ऐसा । सटवे चि ना पांचा दिसां ॥३॥


९५७
आचरती कर्में । तेथें कळें धर्मोधर्मे ॥१॥
खेळे गोवळियांसवें । करिती त्यांचें साहावें ॥ध्रु.॥
यज्ञमुखें घांस । मंत्रपूजेसी उदास ॥२॥
तुका म्हणे चोरी । योगियां ही सवें करी ॥३॥


३२५१
आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा ॥१॥
चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥ध्रु.॥
नव्हे संतान वोसघर । अंधकार कुळासी ॥२॥
तुका म्हणे त्याचें दान । घेतां पतन दुःखासी ॥३॥


३७३४
आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥
आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानीं । गाई जाल्या श्वापदें ॥ध्रु.॥
जें या देवांचें दैवत । उभें आहे या रंगांत । गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥२॥
जया सुखाची शिराणी । तीच पाऊले मेदिनी । तुका म्हणे मुनी । धुंडितांही न लभती ॥३॥


२४८२
आजिचें हें मज तुह्मीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥१॥
आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥
तुका म्हणे तुह्मीं उदार कृपाळ । शृंगारिलें बाळ कवतुकें ॥३॥


३०२३
आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥१॥
तुला शरणागत व्हावें नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥ध्रु.॥
विसरलों काम याजसाठीं धंदा । सकळ गोविंदा माझें तुझें ॥२॥
तुका म्हणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवीं झाली तैसी ॥३॥


२६३०
आजिवरी होतों तुझे सत्ते खालीं । तोंवरी त्वा केली विटंबणा ॥१॥
आतां तुज राहों नेदीं या देशांत । ऐसा म्यां समर्थ केला धणी ॥ध्रु.॥
सापें रिग केला कोठें बाळपणीं । होतीसी पापिणी काय जाणों ॥२॥
तुका म्हणे म्यां हा बुडविला वेव्हार । तुझे चि ढोपर सोलावया ॥३॥


३२४१
आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥१॥
यासी घेऊं प्रायश्चित्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥ध्रु.॥
झाली क्रोधासवे भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥२॥
अनुतापीं न्हाऊं । तुका म्हणे रवी पाहूं ॥३॥


३९४९
आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥१॥
विठोबाचीं वेडीं आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचों वाऊं टाळी रंजवूं गोविंदा ॥ध्रु.॥
सदा सन सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी ॥२॥
तुका म्हणे नाहीं जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक तें आमुचें कवतुक ॥३॥


३७७२
आजि का वो तूं दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्तीं ।
दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरी चित्तीं वो ॥१॥
सर सर परती झालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगासी या तोंड ।
व्याली माय ते लाजविली रांड । नाहीं थार दो ठायीं झाला खंड वो ॥धृ ॥
होते तैसे उमटले वरी । बाह्य संपादनी अंतरीची चोरी ।
नाही मर्यादा निःसंग बावरी । मन हे गोविंदी देह काम करी वो ॥२॥
नाही करीत उत्तर कोणा सवे । पराधीन भोजन दिले खावे ।
नाही अचल सावरावा ठावे ।देखो उदासीन तुझे गे देह भाव वो ॥३॥
कोठे नेणो हा फावला एकांत । सदा किलकील भोवती बहुत ।
दोघे एकवत बोलावया मात । नाही लाज धरिली दिला हात वो ॥४ ॥
करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासू सुना ।
पराभक्ती हे शुध्द तुम्ही जाणा । तुका म्हणे ऐसे कळो यावे या जना वो ॥५ ॥


३६००
आजिचिया लाभें ब्रह्मांड ठेंगणें । सुखी झालें मन कल्पवेना ॥१॥
आर्तभूत माझा जीव जयांसाटीं । त्यांच्या झाल्या भेटी पायांसवें ॥ध्रु.॥
वाटुली पाहातां सिणले नयन । बहु होतें मन आर्तभूत ॥२॥
माझ्या निरोपाचें आणिलें उत्तर । होईल समाचार सांगती तो ॥३॥
तुका म्हणे भेटी निवारला ताप । फळलें संकल्प संत आले ॥४॥


३९६८
आजी दिवस झाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥
झालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥
रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥२॥
तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥३॥


३५९७
आजि दिवस धन्य । तुमचें झालें दरुषण ॥१॥
सांगा माहेरींची मात । अवघा विस्तारीं वृत्तांत ॥ध्रु.॥
आइकतों मने। करूनि सादर श्रवण ॥२॥
तुका ह्मणे नाम । माझा सकळ संभ्रम ॥३॥


३७७४
आजि नवल मी आलें येणे राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें ।
गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो ॥१॥
गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जवळी दुजें नाहीं ।
अंगीं जडला मग उरलें तें काई । आतां राखतां गुमान भलें बाई वो ॥ध्रु.॥
बहुत कामें मज नाहीं आराणूक । एक सारितां तों पुढें उभें एक ।
आजि मी टाकोनि आलें सकळिक । तंव रचिलें आणिक कवतुक वो ॥२॥
चिंता करितां हरीली नारायणें । अंगसंगें मिनतां दोघेजणें ।
सुखें निर्भर झालियें त्याच्या गुणें । म्हणे तुका खुंटलें येणें जाणें वो ॥३॥


३६०१
आजी बरवें झालें । माझें माहेर भेटलें ॥१॥
डोळां देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥ध्रु.॥
धन्य झालों आतां । क्षेम देऊनियां संतां ॥२॥
इच्छेचें पावलों । तुका म्हणे धन्य झालों॥३॥


३४३७
आजिवरी तुम्हां आम्हां नेणपणे । कौतुकें खेळणें संग होता ॥१॥
आतां अनावर झालो अगुणाची । करूं नये तें चि करु सुखें ॥२॥
तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥३॥


१७२२
आठवूंचि नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥१॥
मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥
न लगे वोळावीं इंद्रियें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥२॥
तुका म्हणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥३॥


५८३
आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥१॥
होई बा जागा होई बा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥
जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघसि ना ॥२॥
तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥३॥


४०१४
आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥१॥
आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ध्रु.॥
देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥२॥
राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥३॥


३१४१
आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥१॥
दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥ध्रु.॥
एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥२॥
तुका म्हणे रांड । ऐसी कां ते व्याली भांड ॥३॥


१५८३
आडलिया जना होसी सहाकारी । अंधळियाकरीं काठी तूं चि ॥१॥
आडिले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा ॥ध्रु.॥
प्रल्हाद महासंकटीं रक्षिला । तुम्ही अपंगिला नानापरी ॥२॥
आपुलें चि अंग तुम्ही वोडविलें । त्याचें निवारलें महा दुःख ॥३॥
तुका म्हणे तुझे कृपे पार नाहीं । माझे विठाबाई जननीये ॥४॥


२३४२
आडवा तो उभा । असे दाटोनियां प्रभा ॥१॥
देव नाहीं एकविध । एक भाव असे शुद्ध ॥ध्रु.॥
भेदाभेद आटी । नाहीं फार कोठें तुटी ॥२॥
तुका म्हणे गोवा । उगवा वेव्हाराचा हेवा॥३॥


३९६१
आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥१॥
तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥
बाहिरल्या वेषें आंत जैसे तैसे । झाकलें तों बरें पोट भरे तेणें वेसें ॥२॥
तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥३॥


१४६७
आणिकांची सेवा करावी शरीरें । तीं येथें उत्तरे कोरडीं च ॥१॥
ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा सेवकाच्या ॥ध्रु.॥
आणिकांचे देणें काळीं पोट भरे । येथील न सरे कल्पांतीं ही ॥२॥
आणिकांचे भेटी आडकाठी पडे । येथें तें न घडे वचन ही ॥३॥
आणिकें दंडिती चुकलिया सेवा । येथें सोस हेवा दोन्ही नाहीं ॥४॥
तुका म्हणे करी आपणासारिखें । उद्धरी पारिखें उंच निंच ॥५॥


१५४
आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥
आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥
शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥२॥
तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघीं च पापें घडतील ॥३॥


१३३
आणिकांच्या कापिती माना । निष्ठुर पार नाहीं ॥१॥
करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥
सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥२॥
तुका म्हणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥३॥


१५९
आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥
ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥
कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥२॥
तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा॥३॥


३१७५
आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥१॥
ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥
किल्मीशाची चित्तीं राहाते कांचणी । अंगी ते जोडोनी ठाव जाळी ॥२॥
तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥३॥


१७७७
आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास ।
कृपणें सांचलें धन । न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण ।
तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥१॥
काय जालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे ।
घेउनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ध्रु.॥
सिद्धीं सेविलें सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिली मोतीं जन्मलें स्वातीचे ।
वरुषलें सर्वत्र जळ । कापुस पट नये चि कारणा । तयास पातला काळ ।
तें चि भुजंगें धरिलें कंठीं । मा विष जालें त्याची गरळ ॥२॥
भिक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळें । घालुनियां घसां अंगोळिया ।
हाते वांत करू बळें । कुंथावयाची आवडी ओवा । उन्हवणी रडवी बाळें ।
तुका म्हणे जे जैसें करिती । ते पवती तैसीं च फळें ॥३॥


१००१
आणिकांसी तारी ऐसा नाहीं कोणी । धड तें नासोनि भलता टाकी ॥१॥
सोनें शुद्ध होतें अविट तें घरीं । नासिलें सोनारीं अळंकारीं ॥ध्रु.॥
ओल शुद्ध काळी काळें जिरें बीज । कैंचें लागे निज हाता तेथें ॥२॥
एक गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवसीं क्षीर घुगरिया ॥३॥
तुका म्हणे विषा रुचि एका हातीं । पाधानी नासिती नवनीत ॥४॥


२३४६
आणितां त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥
सांडा सांडा रे मठारे । येथें गांठीसवें धुरें ॥ध्रु.॥
नाकेंविण मोती । उभ्या बाजारें फजिती ॥२॥
हुकुमदाज तुका । येथें कोणी फोंदो नका ॥३॥


१२२३
आणिलें सेवटा । आतां कामा नये फांटा ॥१॥
मज आपुलेंसें म्हणा । उपरि या नारायणा ॥ध्रु.॥
वेचियेली वाणी । युक्ती अवघी चरणीं ॥२॥
तुका धरी पाय । क्षमा करवूनि अन्याय ॥३॥


८८७
आणीक ऐसें कोठें सांगा । पांडुरंगा सारिखें ॥१॥
दैवत ये भूमंडळीं । उद्धार कळी पावितें ॥ध्रु.॥
कोठें कांहीं कोठें कांहीं । शोध ठायीं स्थळासी ॥२॥
आनेत्रींचें तीर्थी नासे । तीर्थी वसे वज्रलेप ॥३॥
पांडुरंगींचें पांडुरंगीं । पाप अंगीं राहेना ॥४॥
ऐसें हरें गिरिजेप्रति । गुह्य स्थिती सांगितली ॥५॥
तुका म्हणे तीर्थ क्षेत्र । सर्वत्र हें दैवत ॥६॥


३७६७
आणीके काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं ॥१॥
सदा मोकळीं च गुरें । होती फजीत तीं पोरें ॥ध्रु.॥
सदा घालिता हुंबरी । एक एकांचे न करी ॥२॥
तुका म्हणे घरीं माय । वेळोवेळां मारी ॥३॥


५४९
आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥१॥
भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥
गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥२॥
तरिच भलें आतां न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥३॥
तुका म्हणे गुण गाई या देवाचे । घेई माझे वाचे हे चि धणी ॥४॥


९६०
आणीक मज कांहीं नावडती मात । एक पंढरिनाथवांचुनिया ॥१॥
त्याची च कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवणें गोड लागे ॥२॥
तुका म्हणे संत म्हणोत भलतें । विठ्ठलापरतें न मनी कांहीं ॥३॥


२१३१
आणीक नाहीं नेणें । असें पायांच्या चिंतनें ॥१॥
माझा न व्हावा विसर । नाहीं आणीक आधार ॥ध्रु.॥
भांडवल सेवा। हाचि ठेवियेला ठेवा ॥२॥
करीं मानभावा । तुका विनंती करी देवा ॥३॥


९३८
आणीक कोणाचा न करीं मी संग । जेणें होय भंग माझ्या चित्ता ॥१॥
विठ्ठलावांचूनि आणीक जे वाणी । नाइकें मी कानीं आपुलिया ॥ध्रु.॥
समाधानासाठी बोलावी हे मात । परि माझें चित्त नाहीं कोठें ॥२॥
जिवाहूनि मज ते चि आवडती । आवडे ज्या चित्तीं पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे माझें तोचि जाणे हित । आणिकांच्या चित्त नेदीं बोला ॥४॥


३४०
आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥१॥
पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं । जाग्रतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ध्रु.॥
पडिलें वळण इंद्रियां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥२॥
तुका म्हणे नेत्रीं केलें ओळखण । साजिरें तें ध्यान विटेवरी ॥३॥


३१२३
आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी ॥१॥
सुखें करा हरीकथा । सर्वथा हे तारील ॥ध्रु.॥
अनाथाचा नाथ देव । अनुभव सत्य हा ॥२॥
तुका म्हणे बहुतां रिती । धरा चित्तीं सकळ ॥३॥


२६७०
आणीक पाखांडें असती उदंडें । तळमिळती पिंडें आपुलिया ॥१॥
त्याचिया बोलाचा नाहीं विश्वास । घातलीसे कास तुझ्या नामीं ॥ध्रु.॥
दृढ एक चित्तें झालों या जीवासी । लाज सर्वविशीं तुम्हांसी ते ॥२॥
पीडों नेदी पशु आपुले अंकित । आहे जें उचित तैसें करा ॥३॥
तुका म्हणे किती भाकावी करुणा । कोप नारायणा येईल तुम्हां ॥४॥


२०५९
आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥१॥
मुखा तें चि गोड श्रवणी आवडी । चित्त माझें ओढी तुझे पायीं ॥ध्रु.॥
जये पदीं नाहीं विठ्ठलाचें नाम । मज होती श्रम आइकतां ॥२॥
आणिकाचें मज म्हणवितां लाज । वाटे हें सहज न बोलावें ॥३॥
तुका म्हणे मज तूं च आवडसी । सर्वभावेंविसीं पांडुरंगा ॥४॥


२५७५
आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ॥१॥
तूं वो माझी सखी येसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ध्रु.॥
काया वाचा मनें हें चि आस करीं । पाउलें गोजिरीं चिंतीतसें ॥२॥
तुका म्हणे माझी पुरवीं हे आस । घालीं ब्रम्हरस भोजन हें ॥३॥


२५८
आणीक या काळें न चले उपाय । धरावे ते पाय विठोबाचे ॥१॥
अवघें चि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥
अवघें मोकळें अवघिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥२॥
काळ वेळ नाहीं गर्भवासदुःखें । उच्चारितां मुखें नाम एक ॥३॥
तुका म्हणे कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥४॥


८८२
आणूनियां मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥
यासी अनुसरल्या काय । घडे ऐसें वांयां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहाती ॥ध्रु.॥
तो देखावा हा विध । चिंतनें तें कार्य सिद्ध । आणिकां संबंध । नाहीं पर्वकाळासी ॥२॥
तुका म्हणे खळ । होती क्षणें चि निर्मळ । जाऊनियां मळ । वाळवंटीं नाचती ॥३॥


३७८४
आंत हरी बाहेर हरी । हरीनें घरीं कोंडिलें ॥१॥
हरीनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें ॥ध्रु.॥
हरीने जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥२॥
तुका म्हणे वेगळा नव्हे । हरी भोवे भोंवताला ॥३॥


१४२१
आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥१॥
केलें तरीं आतां सुशोभ्य करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥ध्रु.॥
नाहीं भक्तीराजीं ठेविला उधार । नामाचा आकार त्यांचियानें ॥२॥
तुका म्हणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ॥३॥


४५१
आतां असों मना अभक्तांची कथा । न होई दुश्चिता हरीनामीं ॥१॥
नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायिश्चत्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥
प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभक्तीाचें सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्व काळ सुखरूप ॥३॥


३५७३
आतां आशीर्वाद । माझा असो सुखें नांद ॥१॥
ह्मणसी कोणा तरी काळें । आहेतसी माझीं बाळें ॥ध्रु.॥
दुरी दूरांतर । तरी घेसी समाचार ॥२॥
नेसी कधीं तरी । तुका ह्मणे लाज हरी ॥३॥


१३९९
आतां आहे नाहीं । न कळे आळी करा कांहीं ॥१॥
देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा ॥ध्रु.॥
नेणे भाग सीण । दुजें कोणी तुम्हांविण ॥२॥
आतां नव्हे दुरी । तुका पायीं मिठी मारी ॥३॥


६५५
आतां आम्हां हें चि काम । वाचे गाऊ तुझें नाम । वाहुनियां टाळी प्रेम । सुखें आनंदे नाचावें ॥१॥
अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥
गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥२॥
तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥३॥


८६
आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासी ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥
नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं । कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥२॥
तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी । होतो उठाउठी । लवकरी च उतार ॥३॥


३६९३
आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥१॥
मग टाकिती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥ध्रु.॥
कोंडूं घरामधीं । न बोलोनि जागों बुद्धी ॥२॥
बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥३॥


३५९४
आतां करावा कां सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा ॥१॥
असेल तें कळों येईल लौकरी । आतां वारकरी आल्यापाठी ॥ध्रु.॥
बहु विलंबाचें सन्निध पातलें । धीराचें राहिलें फळ पोटीं ॥२॥
चालिलें तें ठाव पावेल सेवटीं । पुरलिया तुटी पाउलांची ॥३॥
तुका ह्मणे आसे लागलासे जीव । ह्मणऊनि कींव भाकीतसें ॥४॥


१७९८
आतां काढाकाढी करो गा पंढरिनाथा । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥१॥
जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा स्वभावे प्राण घ्यावा ॥ध्रु.॥
मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥२॥
तुका म्हणे जाली अंधळ्याची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥३॥


२६५१
आतां काशासाठी दुरी । अंतर उरी राखिली ॥१॥
करीं लवकरी मुळ । लहानें तीळ मुळींचिया ॥ध्रु.॥
दोहीं ठायीं उदेगवाणें । दरुषणें निंश्चिती ॥२॥
तुका म्हणे वेग व्हावा । ऐसी जीवा उत्कंठा ॥३॥


५७२
आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥१॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥
जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥२॥
तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आले ॥३॥


११५
आतां केशीराजा हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु.॥
काळाचें खंडण घडावें चिंतन । तनमनधन विन्मुख ता ॥२॥
कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं ॥३॥
सावध तों माझीं इंद्रियें सकळें । दिलीं एका वेळे हाक आधीं ॥४॥
तुका म्हणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐक्यता सकळांसी ॥५॥


२९०६
आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला । अवघा झाला आनंदु ॥ध्रु.॥
प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥
तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥३॥


४९५
आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरीकथा ॥१॥
होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु.॥
भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होउनि राहों ॥२॥
तुका म्हणे आम्ही लाडिकीं लेंकरें । न राहों अंतरे पायांविण ॥३॥


२०८९
आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची ॥१॥
पतितपावनासवें समागम । अपुलाले धर्म चालवीजे॥ध्रु.॥
घनघायें भेटी लोखंडपरिसा । तरी अनारिसा न पालटे ॥२॥
तुका म्हणे माती कोण पुसे फुका । कस्तुरीच्या तुका समागमें ॥३॥


२१००
आतां घेई माझें । भार सकळ ही ओझें ॥१॥
काय करिसी होई वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥
तूं चि डोळे वाती। होई दीपक सांगातीं ॥२॥
तुका म्हणे कांहीं । विचाराया चाड नाहीं॥३॥


१८९३
आतां चक्रधरा । झणी आह्मांस अव्हेरा ॥१॥
तुमचीं ह्मणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥ध्रु.॥
काळ आह्मां खाय । तरी तुझें नांव जाय ॥२॥
तुका ह्मणे देवा । आतां पण सिद्धी न्यावा ॥३॥


१४३७
आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥१॥
लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों तळ नल्हाचि ॥ध्रु.॥
होतें गोविलें विसारें माप जालें एकसरें । होतें होरें वारें तों चि लाहो साधिला ॥२॥
कराया जतन तुका म्हणे निजधन । केला नारायण साह्य नेदी विसंबों ॥३॥


६९७
आतां जागा रे भाई जागा रे । चोर निजल्या नाडूनि भागा रे ॥१॥
कैसें असोनि ठाउकें नेणां । दुःख पावाल पुढिले पेणा ॥ध्रु.॥
आतां नका रे भाई नका रे । आहे गांठीं तें लुटवूं लोकां रे ॥२॥
तुका म्हणे एकांच्या घायें । कां रे जाणोनि न धरा भये ॥३॥


३२१२
आतां जावें पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥१॥
जेथें चंद्रभागेचिया तिरीं । आम्ही नाचों पंढरपुरीं ॥ध्रु.॥
जेथें संतांची दाटणी । त्याचें घेऊं पायवणी ॥२॥
तुका म्हणे आम्ही बळी । जीव दिधला पायां तळीं ॥३॥


७६
आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥
हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥


२९८३
आतां तरी मज सांगा साच भावे । काय म्यां करावें ऐसें देवा ॥१॥
चुकालिया वर्म नोहे ते कारण । केला होय सीण अवघा चि ॥ध्रु.॥
कळे म्हणवूनी करीतसे वाद । दिसे भेदाभेद अंतरीचा ॥२॥
तुका म्हणे नको पाहूं तू निर्वाण । देई कृपादान याचकासी ॥३॥


२६१८
आतां तळमळ । केली पाहिजे शीतळ ॥१॥
पाहा करील तें देव । पायीं ठेवुनियां भाव ॥ध्रु.॥
तोचि अन्नदाता । नाहीं आणिकांची सत्ता ॥२॥
तुका म्हणे दासा । नुपेक्षील हा भरवसा ॥३॥


४०३१
आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥१॥
शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ती कांहीं च नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ध्रु.॥
मन स्थिर नाहीं माझिये हातीं। इंद्रियें धांवतां नावरती । सकळ खुंटलिया युक्ती । शांति निवृत्ति जवळी नाहीं ॥२॥
सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥३॥
राहिलों धरूनि विश्वास । आधार नेटीं तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका म्हणे यास तुझें उचित ॥४॥


१८७७
आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥१॥
टाकूनि सांकडें आपुलिये माथां । घातला या संतावरी भार ॥ध्रु.॥
स्तुती करवूनि पिटिला डांगोरा । तें कोण दातारा साच करी ॥२॥
जातीचें वाणी मी पोटींचे कुडें । नका मजपुढें ठकाठकी ॥३॥
तुका म्हणे नाहीं आलें अनुभवा । आधीं च मी देवा कैचा नाचू ॥४॥


२६०२
आतां तुझें नाम गात असें गीतीं । म्हणोनी मानिती लोक मज ॥१॥
अन्नवस्त्रचिंता नाहीं या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥ध्रु.॥
सज्जन संबंधी तुटली उपाधी । रोकडा या बंदीं सुटलोंसें ॥२॥
घ्यावा द्यावा कोणें करावा सायास । गेली आशापाश वारोनियां ॥३॥
तुका म्हणे तुज कळेल तें आतां । करा जी अनंता मायबापा ॥४॥


२५०२
आतां तुम्ही कृपावंत । साधु संत जिवलग ॥१॥
गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥
वंचिलें तें पायांपाशीं । नाहीं यासी वेगळें ॥२॥
तुका म्हणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायांसी ॥३॥


१४०९
आतां दुसरें नाहीं मनीं । निरंजनी पडिलों ॥१॥
तुमची च पाहें वास । अवघी आस निरसली ॥ध्रु.॥
मागिलांचा मोडला माग । घडला त्याग अरुची ॥२॥
तुका म्हणे करुणाकरा । तूं सोयरा दिनांचा ॥३॥


२९२९
आतां देवा मोकलीलें । तुम्ही भलें दिसेना ॥१॥
आतां नाहीं जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥ध्रु.॥
सांभाळुन घ्यावें देवा । आपणासवा यावरी ॥२॥
तुका म्हणे नग्न भाज । तरि ते लाज स्वामीसी ॥३॥


१३६२
आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥१॥
गाऊं नाचों गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥
या चि जीऊं अभिमानें। सेवाधनें बळकट ॥२॥
तुका म्हणे न सरें मागें । होईन लागें आगळा ॥३॥


२६९८
आतां दोघांमध्ये काय । उरलें होय वाणीजेसें ॥१॥
निष्ठुर हें केलें मन । समाधान न करूनि ॥ध्रु.॥
झुरावें तें तेथींच्या परी । घरिच्याघरीं अवघिया ॥२॥
तुका म्हणे देवपण । गुंडाळून असों दे ॥३॥


२६४०
आतां द्यावें अभयदान । जीवन ये कृपेचें ॥१॥
उभारोनी बाहो देवा । हात ठेवा मस्तकीं ॥ध्रु.॥
नाभी नाभी या उत्तरें । करुणाकरें शांतवीजे ॥२॥
तुका म्हणे केली आस । तो हा दिस फळाचा ॥३॥


४०३७
आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥१॥
येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥ध्रु.॥
ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीर्ती हे जगे वाणिजेते ॥२॥
घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसें ॥३॥
येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशिवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥४॥
केली आराणुक सकळां हातीं। धरावें धरिलें तें चित्तीं । तुका म्हणें सांगितलें संतीं । देई अंतीं ठाव मज देवा ॥५॥


१६८३
आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रम्हरस ॥१॥
सुखें सेवीन अमृत । ब्रम्हपदींचें निश्चित ॥ध्रु.॥
तुमचा निज ठेवा । आम्ही पाडियेला ठावा ॥२॥
तुका म्हणे देवराजा । आतां लपलेती वांयां ॥३॥


१८४३
आतां नको चुकों आपुल्या उचिता । कृपाळुवा कांता रखुमाईच्या ॥१॥
आचरावे दोष हें आम्हां उचित । तारावे पतित तुमचें तें ॥ध्रु.॥
आह्मी तों आपुलें केलेसें जतन । घडो तुम्हांकून घडेल ते ॥२॥
तुका म्हणे विठो चतुराच्या राया । आहे ते कासया मोडों देसी ॥३॥


२२१३
आतां न म्हणे मी माझें । नेघें भार कांहीं ओझें ॥१॥
तूं चि तारिता मारिता । कळों आलासी निरुता ॥ध्रु.॥
अवघा तूं चि जनार्दन । संत बोलती वचन ॥२॥
तुका म्हणे काही । माझे तिळभरी नाही ॥३॥


२३२६
आतां नये बोलों अव्हेराची मात । बाळावरी चित्त असों द्यावें ॥१॥
तुज कां सांगणें लागे हा प्रकार । परि हें उत्तर आवडीचें ॥ध्रु.॥
न वंचीं वो कांहीं एकही प्रकार । आपणां अंतर नका मज ॥२॥
तुका म्हणे मोहो राखावा सतंत । नये पाहों अंत पांडुरंगा ॥३॥


३८०६
आता न यें मागें । मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥१॥
कां गो कलित्यां कोल्हाळा । तुम्ही भलत्या च सकळा । वेचाला ते बोला । झुटे होती बोलिले ॥ध्रु.॥
याचे भेटी माझें मन । स्वरुपीं ठाकले लोचन । वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥२॥
काज काम नको झालें । बीजें नावरे बोलिलें । याचिया भेदिलें । कामबाणीं अंतर ॥३॥
या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें । घेतलें तें मनें । आतां मागें न फिरे ॥४॥
आतां मोटी वार । माझी नका धरूं चार । सवे तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों ॥५॥


२६५०
आतां नव्हे गोड करितां संसार । आणीक संचार झाला माजी ॥१॥
ब्रम्हरसें गेलें भरूनियां अंग । आधील तो रंग पालटला ॥ध्रु.॥
रसनेचिये रुची कंठीं नारायण । बैसोनियां मन निवविलें ॥२॥
तुका म्हणे आतां बैसलों ठाकणीं । इच्छेची ते धणी पुरईल ॥३॥


१८३५
आता पंढरीराया । माझ्या निरसावें भया ॥१॥
मनीं राहिली आशंका । स्वामिभयाची सेवका ॥ध्रु.॥
ठेवा माथां हात । कांहीं बोला अभयमात ॥२॥
तुका म्हणे लाडें । खेळें ऐसें करा पुढें ॥३॥


३०००
आतां पहाशील काय माझा अंत । आलों शरणागत तुज देवा ॥१॥
करीं अंगीकार राखें पायांपाशीं । झणीं दिसों देसी केविलवाणें ॥ध्रु.॥
नाहीं आइकिली मागें ऐसी मात । जे त्वां शरणागत उपेक्षिले ॥२॥
तुका म्हणे आतां धरीं अभिमान । आहेसी तूं दानशूर दाता ॥३॥


२९३९
आतां पाविजेल घरा । या दातारा संगती ॥१॥
पायावरी ठेवूं माथा । सर्वथा हा नुपेक्षी ॥ध्रु.॥
येथून तेथवरी आतां । नाहीं सत्ता आणिकांची ॥२॥
तुका म्हणे चक्रपाणी । शिरोमणी बळियांचा ॥३॥


४०१८
आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥१॥
जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई । सकळ गोताची च साई । पारिखें काई ऐसें नेणिजे ॥ध्रु.॥
जगदाकारीं जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघे आपुलें चि आतां । लाज आणि चिंता दुहावली ॥२॥
वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैसें आपण करी । भीड न घरी चुकल्याची ॥३॥
सोसिला होता सासुरवास। बहुतांचा बहुत दिवस । बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥४॥
करिती कवतुक लाडें । मज बोलविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥५॥


३५४४
आतां पंथ पाहों माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखे ॥१॥
काय करूं आतां न गमेसे झाले । बहुत सोसिले बहु दिस ॥ध्रु.॥
घर लागे पाठी चित्ता उभे वारे। आपुले ते झुरे पाहावया ॥२॥
तुका म्हणे जीव गेला तरी जावो । धरिला तो देव भाव शुध्द ॥३॥


३८३
आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥१॥
नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥
विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥२॥
तुका म्हणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥३॥


१२४७
आतां पुढें मना । चाली जाली नारायणा ॥१॥
येथें राहिलें राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ध्रु.॥
भोवतें भोंवनी । आलियांची जाली धणी ॥२॥
तुका म्हणे रंगे । रंगी रंगलो श्रीपांडुरंगे ॥३॥


२७००
आतां बरें घरिच्याघरीं । आपली उरी आपणापें ॥१॥
वाइट बरें न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥ध्रु.॥
बोलों जातां वाढे बोल । वांयां फोल खटखट ॥२॥
काकुलती यावें देवा । तो तों सेवा इिच्छतो ॥३॥
हिशोबाचे खटखटे । चढे तुटे घडेना ॥४॥
तुका म्हणे कळों आलें । दुसरें भलें तों नव्हे ॥५॥


१९०७
आतां बरे जाले । माझे माथांचे निघाले ॥१॥
चुकली हे मरमर । भार माथांचे डोंगर ॥ध्रु.॥
नसतां कांहीं जोडी । केली बहुते तडातोडी ॥२॥
जाला झाडापाडा । तुका म्हणे गेली पीडा ॥३॥


१९४६
आतां बरे झाले । माझे मज कळो आले ॥१॥
खोटा ऐसा संसार । मजि पायी द्यावा थार ॥ध्रु॥ उघडल्या डोळे । भोग देता कळी काळे ॥२॥
तुका म्हणे जीवा । होता तडामोडी देवा ॥३॥


१४६४
आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥
आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥
येथें नाहीं जाली कोणांची मिरास । आल्या याचकास कृपेविशीं ॥२॥
तुका म्हणे येथें नाहीं दुजी परी । राया रंका सरी देवा पायीं ॥३॥


२१७८
आतां मज तारीं । वचन हें साच करीं ॥१॥
तुझें नाम दिनानाथ । ब्रिदावळी जगविख्यात ॥ध्रु.॥
कोण लेखी माझ्या दोषा । तुझा त्रिभुवनीं ठसा ॥२॥
वांयां जातां मज । तुका म्हणे तुम्हां लाज ॥३॥


२१४८
आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा ॥१॥
पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी ॥ध्रु.॥
फेडा आतां पांग। अंगीं लपवुनी अंग ॥२॥
दुजें नेणें तुका । कांहीं तुह्मासी ठाउका॥३॥


४०२१
आतां मज धरवावी शुद्धी । येथुनी परतवावी बुद्धी । घ्यावें सोडवुनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥१॥
करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले करुणेची खाई। करीं वो आई मजवरी ॥ध्रु.॥
मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणे आयुष्य जालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥२॥
आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथें म्या येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥३॥
करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामीं घ्यावा प्रेमा। सोडवीं भ्रमापासुनिया ॥४॥
हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं । करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका म्हणे ॥५॥


१०८१
आतां मागतों तें ऐके नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां॥१॥
असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥
मातेचिया परी देखती परनारी । ठेवीं नेत्र तरी नाहीं तरि नको ॥२॥
तरी बरें कांटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तरि कानांचा ही देख प्रेत्न ॥३॥
सकळ इंद्रियांचा निग्रह करूनि एक । राखवीं पृथक तोडोनि भ्रम ॥४॥
तुकयाबंधु म्हणे ते चि वाट प्राणां । पडता नारायणा विसर तुझा॥५॥


४०४४
आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ताठायीं ॥१॥
भांडवल गांठी तरि विश्वास । झालों तों झालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥ध्रु.॥
आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व । अकाळीं काळ अवघें पर्व । झाला भरवसा कृपेलाभाचा ॥२॥
वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥३॥
करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥४॥
बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका म्हणे डोळां लेइलों तें ॥५॥


८०१
आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥१॥
सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥
लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥
निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥
अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥


११९३
आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥१॥
मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥२॥
तुका म्हणे हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें ॥३॥


३५८९
आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागलीसे ॥१॥
सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥ध्रु॥ काय लाभ झाला काय होते केणे । काय काय कोणे सांठविले॥२॥
मागणे ते काय धाडिले भातुके । पुसेन ते सुख आहेतसीं ॥३॥
तुका म्हणे काय सांगती ते कानीं । ऐकोनिया मनीं धरुनी राहे ॥४॥


१६०२
आतां माझ्या मायबापा । तूं या पापा प्रायिश्चत्त॥१॥
फजित हे केले खळ । तो विटाळ निवारीं ॥ध्रु.॥
प्रेम आतां पाजीं रस । करीं वास अंतरीं ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥३॥


२०२१
आतां माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥१॥
आले भागा ते करितों । तुझे नाम उच्चारितों ॥ध्रु.॥
दृढ माझेमन। येथे राखावे बांधोन ॥२॥
तुका म्हणे वाटे । नका फुटों देऊं फांटे॥३॥


३०८२
आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावे चि ना ॥१॥
कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥२॥
तुका म्हणे माझी विसरूं नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥३॥


३४०९
आतां माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥
ऐसें करींपांडुरंगा । प्रेमवोसंडेसेंअंगा ॥ध्रु.॥
सर्व काळ नये । वाचेविट आड भये ॥२॥
तुका वैष्णवांसंगती । हें चि भोजन पंगती ॥३॥


३४१
आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा ॥१॥
पुराणींचा अर्थ ऐकतां मानस । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥
इंद्रियांचे आम्ही पांगिलों अंकित । त्यांच्यारगें चित्त रंगलें तें ॥२॥
एकाचें ही जेथें न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥३॥
तुका म्हणे जरी मोकळिसी आतां । तरी मी अनंता वांयां गेलों ॥४॥


३६६२
आतां मी देवा पांघरों काई । भिकेचें तें ही उरे चि ना ॥१॥
सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥
नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥२॥
तुका म्हणे जना वेगळें झालें । एक चि नेलें एकल्याचें ॥३॥


४०३०
आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥१॥
न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥२॥
बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥३॥
आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसारिस्थती । न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥४॥
आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका म्हणे ॥५॥


२७३०
आतां मी पतित ऐसा साच भावें । कळों अनुभवें आलें देवा ॥१॥
काय करावें तें रोकडें चि करीं । राहिली हे उरी नाहीं दोघां ॥ध्रु.॥
येर येरा दृष्टी द्यावें या उत्तरा । यासी काय करा गोही आतां ॥२॥
तुका म्हणे मेलों सांगतसांगतां । तें चि आलें आतां कळों तुम्हां ॥३॥


१७१०
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥
माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥
बापुडा मी नव्हें दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥२॥
दृष्ट नव्हों आम्ही अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥३॥
संवसार आम्हां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥४॥
तुका म्हणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥५॥


२९२४
आतां येणें पडिपाडें । रस सेवूं हा निवाडें । मुंगी नेली गोडें । ठेविलिये अडचणी ॥१॥
तैसें होय माझ्या जीवा । चरण न सोडीं केशवा । विषयबुद्धी हेवा । वोस पडो सकळ ॥ध्रु.॥
भुकेलिया श्वाना । गांठ पडे सवें अन्ना । भुकों पाहे प्राणा । परि तोंडिंची न सोडी ॥२॥
काय जिंकियेलें मन । जीवित्व कामातुरा तृण । मागे विभिचारिण । भक्ती तुका ये जाती ॥३॥


४०६२
आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहातां न कळे जयाचा अंत । तोचि हृदयांत घालूं आतां ॥१॥
विसरोनि आपुला देहपणभाव । नामें चि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ नांव । लागावया पाव संतांचे ॥२॥
बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां । होय अविनाश सहाकारी दाता । चतुर्भुज संता परि धाकें ॥३॥
होय आवडी सान थोर । रूप सुंदर मनोहर । भक्तीप्रिय लोभापर । करी आदर याचकपणें ॥४॥
तें वर्म आलें आमुच्या हाता । म्हणोनि शरण निघालों संतां । तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवें भावें ॥५॥


२५२
आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड करील वांयां ॥१॥
सुख तें चि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ध्रु.॥
तुका म्हणे वाचा वाहिली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥३॥


२८१७
आतां येथें खरें । नये फिरतां माघारें ॥१॥
होय तैसी हो आबाळी । देहनिमित्य या बळी ॥ध्रु.॥
तुम्हांसवें गांठी । देवा जीवाचिये साटीं ॥२॥
तुका नव्हे लंड । करूं चौघांमध्यें खंड ॥३॥


२८००
आतां येथें झाली जीवा संवसाटी । होतें तैसें पोटीं फळ आलें ॥१॥
आतां धरिले ते नो सोडीं चरण । सांपडलें धन निजठेवा ॥ध्रु.॥
आतां हा अळस असो परता दुरी । नेदावी तें उरी उरों कांहीं ॥२॥
आतां याचा मज न व्हावा विसर । भरोनि अंतर राहों रूप ॥३॥
आतां लोकलाज नयो येथें आड । बहु झालें गोड ब्रम्हरस ॥४॥
तुका म्हणे आतां जन्म हा सफळ । अंतरीं गोपाळ स्थिरावला ॥५॥


२६२९
आतां येथें लाजे नाहीं तुझें काम । जाय मज राम आठवूं दे ॥१॥
तुझे भिडे माझे बहु जाले घात । केलों या अंकित दुर्जनाचा ॥ध्रु.॥
माझें केलें मज पारिखें माहेर । नष्ट तु साचार चाळविलें ॥२॥
सुखासाठी एक वाहियेलें खांदीं । तेणें बहु मांदी मेळविली ॥३॥
केला चौघाचार नेलों पांचांमधीं । नाहीं दिली शुद्धी धरूं आशा ॥४॥
तुका म्हणे आतां घेईन कांठीवरी । धनी म्यां कैवारी केला देवा ॥५॥


३२११
आतां वांटों नेदीं आपुलें हें मन । न सोडीं चरण विठोबाचे ॥१॥
दुजियाचा संग लागों नेदीं वारा । आपुल्या शरीरावरूनियां ॥ध्रु.॥
यावें जावें आम्हीं देवा चे सांगातें । मागूनी करीत हें चि आलों ॥२॥
काय वांयां गेलों तो करूं उद्वेग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥३॥
तुका म्हणे प्रेम मागतों आगळें । येथें भोगूं फळें वैकुंठींचीं ॥४॥


२७८३
आतां सांडूं तरी हातीं ना पदरीं । सखीं सहोदरीं मोकलीलों ॥१॥
जनाचारामध्यें उडाला पातेरा । झालों निलाजिरा म्हणऊनि ॥ध्रु.॥
कोणाचिया दारा जावेनासें झालें । म्यां च विटंबिलें आपणासी ॥२॥
कां न झाला माझे बुद्धीसी संचार । नाहीं कोठें थार ऐसें झालें ॥३॥
तुका म्हणे तुज भक्त झाले फार । म्हणोनियां थार नाहीं येथें ॥४॥


२८३१
आतां सोडवणें न या नारायणा । तरि मी न वंचे जाणा काळा हातीं ॥१॥
ऐसें सांगोनिया झालों उतराईं । आणीक तें काईं माझे हातीं ॥ध्रु.॥
केलियाचें माप नये सेवटासी । करितील नासि अंतराय ॥२॥
तुका म्हणे भय वाटतसे जीवा । धांवणिया धांवा लवकरी ॥३॥


२३८७
आतां हें उचित माझें जना हातीं । पाहिजे फजीती केली कांहीं ॥१॥
मग हे तुमचे न सोडीं चरण । त्रासोनियां मन येईल ठाया ॥ध्रु.॥
वाउगे वाणीचा न धरीं कांटाळा । ऐसी कां चांडाळा बुद्धी मज ॥२॥
तुका म्हणे जरि माथां बैसे घाव । तरि मग वाव नेघे पुढें ॥३॥


३७५५
आतां हें चि जेऊं । सवें घेऊं सिदोरी ॥१॥
हरीनामाचा खिचडा केला । प्रेमें मोहिला साधनें ॥ध्रु.॥
चवीं चवीं घेऊं घास । ब्रम्हरस आवडी ॥२॥
तुका म्हणे गोड लागे । तों तों मागे रसना ॥३॥


३३७५
आतां हें शेवटीं असों पायांवरी । वदती वैखरी वागपुष्पे ॥१॥
नुपेक्षावें आम्हां दीना पांडुरंगा । कृपादानीं जगामाजी तुह्मीं ॥ध्रु.॥
वोळवुनी देह सांडियेली शुद्ध । सारियेला भेद जीव शिव ॥२॥
तुका म्हणे मन तुमचे चरणीं । एवढी आयणी पुरवावी ॥३॥


३५७४
आतां हे सेवटीं । माझी आइकावी गोष्टी ॥१॥
आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥ध्रु॥
आतां करकर। पुढेन करीं उत्तर ॥२॥
तुका म्हणे ठसा । तुझा आहे राखे तैसा ॥३॥


२५९१
आतां हें चि सार हें चि सार । मूळबीज रे आइका ॥१॥
आवडीनें आवडी उरे । जें ज्या झुरे तें त्यासी ॥ध्रु.॥
प्रेमाचिया सूत्रदोरी । नाहीं उरी उरवी ॥२॥
तुका म्हणे चिंतन बरें । आहे खरें खऱ्यापें ॥३॥


१३२२
आतां होइन धरणेकरी । भीतरीच कोंडीन॥१॥
नाही केली जीवेसाठी । तों कां गोष्टी रुचे ते॥ध्रु.॥
आधी निर्धार तो सार । मग भार सोसेना ॥२॥
तुका म्हणे खाऊं जेऊं। नेदुं होऊं वेगळा ॥३॥


२०८२
आतां होई माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ता पांडुरंगा ॥१॥
येथूनियां कोठें न वजें बाहेरी । ऐसें मज धरीं सत्ताबळें ॥ध्रु.॥
अनावर गुण बहुतां जातींचे । न बोलावें वाचे ऐसें करीं ॥२॥
तुका म्हणे हित कोणिये जातीचें । तुज ठावें साचें मायबापा ॥३॥


२७३४
आत्मिस्थति मज नको हा विचार । देई निरंतर चरणसेवा ॥१॥
जन्मोजन्मीं तुझा दास पुरुषोत्तमा । हे चि गोडी आम्हां देई जीवा ॥ध्रु.॥
काय सायुज्यता मुक्तीची हे चाड । देव भक्त कोड तेथें नाहीं ॥२॥
काय तें निर्गुण पाहों कैशा परी । वर्णु तुझी हरी कीर्ती कैसी ॥३॥
गोड चरणसेवा देवभक्तपणें । मज देवा झणें दुराविसी ॥४॥
जाणिवेपासूनि सोडवीं सत्वर । देई चरणसेवा निरंतर ॥५॥
तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीति । सेवेविण चित्ती सार नाही ॥६॥


४६३
आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तों आपणापें यत्न बरा ॥१॥
दास्यत्वे दाविलें धन्याचें भांडार । तोंतों नव्हे सार एथुनियां ॥ध्रु.॥
उपायानें सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आलें ॥२॥
तुका म्हणे दृष्टि सकळांचे शिरीं । वचन चि करी बैसोनियां ॥३॥


१७०४
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥१॥
आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥
आपुलें तें येथें काय चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें ॥२॥
तुका म्हणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होईल तें ॥३॥


३९२१
आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता ।
घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥
धर्म गा जागो तुझा तूं चि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ध्रु.॥
घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं ।
न देखे दुसरें गा । झाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥
आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे ।
घातली लोळणी गा हरीनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥३॥
बैसोनि खोळी शुक राहे गर्भी आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा ।
मागील सोसिलें तें ना भीं म्हणे गोपाळा । पावला त्याकारणें । लाज राखिली कळा ॥४॥
न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो सांडवी धना ।
आपपर तें ही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया ते चि परी झाली पावें नारायणा ॥५॥


३३३९
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन सर्व खोटें ॥३॥


६१६
आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥१॥
तुम्हांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥
सेवेच्या अभिळासें। मन बहु जालें पिसें ॥२॥
अरे भक्तापराधीना । तुका म्हणे नारायणा ॥३॥


५१०
आधारावांचुनी । काय सांगसी काहाणी ॥१॥
ठावा नाहीं पंढरीराव । तोंवरी अवघें चि वाव ॥ध्रु.॥
मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रम्हज्ञान ॥२॥
तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥३॥


३४२३
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥
रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥
नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥


४३५
आधीं च आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥१॥
मग त्या कैंची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥ध्रु.॥
नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥२॥
तुका म्हणे ते गाढव । घेती मनासवें धांव ॥३॥


१९४५
आधीं नाही कळो आला हा उपाय । नाही तरी काय चुकी होती ॥१॥
घालितो पाया सी मिठी एकसरे। नेदी तो दुसरे आड येऊं ॥ध्रु॥
कासया पडितो लटिक्याचे भरी । नव्हता कां शिरी भार घेतो ॥२॥
संसाराचा हाटक फिरतो दुकानी । भरोवरी धन मेळवीतो ॥३॥
तुका म्हणे कां हे घेतो गर्भवास । कां या होतो दास कुटुंबाचा ॥४॥


२७०१
आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां तें मग गोवी नाहीं ॥१॥
ऐसा चालोनियां आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥ध्रु.॥
पळणें तों पळो सांडुनि कां बळें । उपाधीच्या मुळें लाग पावे ॥२॥
तुका म्हणे येथें शूर तो निवडे । पडिले बापुडे कालचक्रीं ॥३॥


२४२२
आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥
ते हे समचरण साजिरे विटेवरी । पहा भीमा तिरी विठ्ठलरुप ॥धृ॥
पुराणासी वाड श्रुती नेंणती पार । ते झाले साकार पुंडलिका ॥२॥
तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात । ते आमुचे कुळ दैवत पांडुरंग ॥३॥


३६५०
आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥१॥
आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥ध्रु.॥
करिती अक्षवाणें ओंवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥२॥
झालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईवत्सें नरनारीबाळें ॥३॥


२६६७
आनंदाचा थारा । सुखें मोहरला झरा ॥१॥
ऐसी प्रभुची ज्या कळा । त्याच्या कोण पाहे बळा ॥ध्रु.॥
अंकिता ऐसिया । होईल पावविलें ठाया ॥२॥
तुका म्हणे ऐसें । दिलें आभंड प्रकाशे ॥३॥


२५८२
आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचें ॥१॥
काय सांगों जालें कांहींचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥२॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥


१९१६
आनंदाच्या कोटी । सांठवल्या आह्मां पोटीं ॥१॥
प्रेम चालिला प्रवाहो । नामओघ लवलाहो ॥ध्रु.॥
अखंड खंडेना जीवन । राम कृष्ण नारायण ॥२॥
घडी अहक्य परत्र । तुका ह्मणे समतीर ॥३॥


१७३४
आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥१॥
गोप्य धन वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ध्रु.॥
झणी दृष्टि लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥२॥
तुका म्हणे हें बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥३॥


२९९९
आनंदें कीर्तन कथा करीं घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥१॥
मज या आवडे वैष्णवांचा संग । तेथें नाहीं लाग कळिकाळा ॥ध्रु.॥
स्वल्प मात्र वाचे बैसलासे निका । राम कृष्ण सखा नारायण ॥२॥
उच्चांरितां मज दुजें वाटे लाज । उपदेशें काज आन नाहीं ॥३॥
तुका म्हणे मन रंगलेंसे ठायीं । माझें तुझ्या पायीं पांडुरंगा ॥४॥


१८१८
आपण काय सादर । विशीं आम्हां कां निष्ठुर ॥१॥
केलें भक्त तैसें देई । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ध्रु.॥
काय पंगतीस कोंडा । एकांतासी साकरमांडा ॥२॥
काय एकपण । पोतां घालूनि गांठी खूण ॥३॥
काय घ्यावें ऐसें । त्या आपण अनारिसें ॥४॥
तुका म्हणे मधी । आता तोडू भेद बुद्धी ॥५॥


२८१५
आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आम्हांसी वेव्हारा पात्र केलें ॥१॥
काय झालें तरी नेघा तुम्हीं भार । आणीक कोणां थोर म्हणों सांगा ॥ध्रु.॥
पंच भूतें तंव कर्माच्या या मोटा । येथें खरा खोटा कोण भाव ॥२॥
तुका म्हणे नाहीं बोलावया जागा । कां देवा वाउगा श्रम करूं ॥३॥


२९४७
आपण चि व्हाल साहे । कार्य आहे निर्वाणीचे ॥१॥
भाकिली ते उरली कींव । आहे जीव जीवपणें ॥ध्रु.॥
आहाच कैंचा बीजा मोड । प्रीति कोड वांचूनि ॥२॥
तुका म्हणे दंडिन काया । याल तया धांवणिया ॥३॥


२७६३
आपण तों असा । समर्थ जी हृषीकेशा ॥१॥
करा करा बुझावणी । काय विलंब वचनीं ॥ध्रु.॥
हेंगे ऐसें म्हणा । उठूनि लागेन चरणा ॥२॥
घेऊनियां सुखें । नाचेल तुका कवतुकें ॥३॥


३०१५
आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥१॥
उकरड्यावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ॥ध्रु.॥
गाईंचा जो भक्ष अमंगळ खाय । तीचें दूध काय सेवूं नये ॥२॥
तुका म्हणे काय सलपटासी काज । फणसांतील बीज काढुनि घ्यावें ॥३॥


२४८१
आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥
येर तीं माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदिअंतीं अवसानी ॥ध्रु.॥
अविनाश करी आपुलिया ऐसें । लावीं मना पिसें गोविंदाच्या ॥२॥
तुका म्हणे एका मरणें चि सरें । उत्तम चि उरे कीर्ती मागें ॥३॥


१३०६
आपल्याच फुंदे । जेथें तेथें घेती छंदें ॥१॥
पडिला सत्याचा दुष्काळ । बहु फार जाली घोळ ॥ध्रु.॥
विश्वाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट ॥२॥
तुका म्हणे घाणा । मूढा तीर्थी प्रदिक्षणा ॥३॥


२१५२
आपुला तो देह आम्हां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा ॥१॥
कोण नाहीं दक्ष करितां संसार । आह्मीं हा विचार वमन केला ॥ध्रु.॥
नाहीं या धरीत जीवित्वाची चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥२॥
तुका म्हणे असों चिंतोनियां देवा । मी माझें हा हेवा सारूनियां ॥३॥


४८२
आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥१॥
भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु.॥
पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥२॥
तुका म्हणे जाली जोडी । चरण घडी न विसंभें ॥३॥


५५०
आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥१॥
आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥२॥
माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लागे ॥३॥
तुका म्हणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तथा फळे ॥४॥


३८४२
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥
खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥२॥
आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वांटी गडिया गडी ॥३॥
गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण म्हणे दुजा ॥४॥
जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसि उपाव तोचि सांगे ॥५॥
सांगे सकळांसि व्हा रे एकीठायी । चेंडू राखा गडे तुम्ही माझा ॥६॥
मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुतीं हाल माझी ॥७॥
माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेकां ॥८॥
एका समतुकें अवघेचि राहा । जाईंल तो पाहा धरा चेंडू ॥९॥
चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकला चि ॥१०॥
चिंडुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळिक पाहात चि ॥११॥
पाहात चि ठेलीं न चलतां कांहीं । येरू लवलाहीं म्हणे धरा ॥१२॥
धरावा तयानें त्याचें बळ ज्यासि । येरा आणिकांसि लाग नव्हे ॥१३॥
नव्हे काम बळ बुद्धी नाहीं त्याचें । न धरवे निंचें उंचाविण ॥१४॥
विचारीं पडिले देखिले गोपाळ । या म्हणे सकळ मजमागें ॥१५॥
मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥
चतुर चिंतिती बहुत मारग । हरी जाय लाग पाहोनियां ॥१७॥
या मागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥१८॥
पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागें त्यांचे ते चि हाल ॥१९॥
हाल दोघां एक मोहरे मागिलां । चालतां चुकलां वाट पंथ ॥२०॥
पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥२१॥
वयाचा प्रबोधे विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥२२॥
सिकविलें हित नायिके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥२३॥
नये तें चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तोचि खरा ॥२४॥
रानभरी झाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥
लाज सांडूनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठींच्या ॥२६॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची॥२७॥
गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें॥२८॥
सायी धरूनियां आले हरीपासीं । लहान थोरांसी सांभाळिलें ॥२९॥
सांभाळिलें तुका म्हणे सकळ हि । सुखी झाले ते ही हरीमुखें ॥३०॥


५६४
आपलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥
हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होईल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥
अब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥२॥
तुका म्हणे बहु मुखें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥३॥


२३५७
आपुलिया आंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं ॥१॥
रांडापोरें त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥ध्रु.॥
हर्षामर्ष जों हे नाहीं जों जिराले । तोंवरी हे केले चार त्यांनीं ॥२॥
मुक्त जालों ऐसें बोलों जाये मुखें । तुका म्हणे दुःखें बांधला तो ॥३॥


१२१६
आपुलिया काजा । आह्मीं सांडियेलें लाजा ॥१॥
तुम्हां असों जागवीत । आपुलें आपुले हित ॥ध्रु.॥
तुम्ही देहशून्य । आम्हां कळे पाप पुण्य ॥२॥
सांगायासी लोकां । उरउरीत उरला तुका ॥३॥


१२६१
आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥
काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥२॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायांविण ॥३॥


१०५८
आपुलिया लाजा । धांवे भक्तंचिया काजा ॥१॥
नाम धरिलें दिनानाथ । सत्य करावया व्रत ॥ध्रु.॥
आघात निवारी। छाया पीतांबरें करी ॥२॥
उभा कर कटीं । तुका म्हणे याजसाटीं ॥३॥



आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु.॥
गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥


२६७८
आपुलिये ठाकीं । करीन कांहीं तरी एकी ॥१॥
करीन पायांसी वोळखी । करिसी तें करीं सुखीं ॥ध्रु.॥
कायाक्लेशगंगाजळ । समर्पीन तुळसीदळ ॥२॥
तुका म्हणे देवा । कर जोडीन ते सेवा ॥३॥


३१७४
आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुटा ॥१॥
नाहीं कोणासवें बोलणें लागत । निश्चिंतीनें चित्तसमाधान ॥ध्रु.॥
लपविलें तें ही ढेंकरें उमटे । खोटियाचें खोटें उर फोडी ॥२॥
तुका म्हणे निंदा स्तुति दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥३॥


१५२५
आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥१॥
बहुरंगें माया असे विखुरली । कुंठिंत चि जाली होतां बरी ॥ध्रु.॥
पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारीं । भाव विश्वंभरीं समर्पावा ॥२॥
तुका म्हणे गेला फिटोनियां भेद । मग होतो देव मनाचा चि ॥३॥


२२५१
आपुल्या आम्ही पुसिलें नाही । तुज कांहीं कारणें॥१॥
मागें मागें धांवत आलों । कांहीं बोलों यासाटीं ॥ध्रु.॥
बहुत दिस होतें मनीं । घ्यावी धणी एकांतीं ॥२॥
तुका म्हणे उभा राहें । कान्हो पाहें मजकडे ॥३॥


७१३
आपुले गांवींचें न देखेसें जालें । परदेसी एकलें किती कंठूं ॥१॥
म्हणऊनि पाहें मूळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥ध्रु.॥
पाहातां अवघ्या दिसतील दिशा । सकळ ही वोसा दृष्टीपुढें ॥२॥
तुका म्हणे कोणी न सांगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥३॥


३९०
आपुलें तों कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं ॥१॥
परि हे वाणी वायचळ । छंद करविते बरळ ॥ध्रु.॥
पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥२॥
तुका म्हणे भुली । इच्या उफराटया चाली ॥३॥


१४५८
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥१॥
आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥
एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याचा त्यागें जाला सुकाळ हा ॥२॥
फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥३॥
नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥४॥
तुका म्हणे दिलें उमटोनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥५॥


४०९
आपुलें मागतां । काय नाहीं आम्हां सत्ता ॥१॥
परि या लौकिकाकारणें । उरीं ठेविली बोलणें ॥ध्रु.॥
ये चि आतां घडी । करूं बैसों ते ची फडी ॥२॥
तुका म्हणे करितों तुला । ठाव नाहींसें विठ्ठला ॥३॥


२५१६
आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीनबुद्धी तो ॥१॥
विषयांच्या संगें आयुष्याचा नास । पडियेलें ओस स्वहितांचे ॥ध्रु.॥
भुलल्यांचें अंग आपणा पारिखें । छंदा च सारिखें वर्ततसे ॥२॥
तुका म्हणे दुःख उमटे परिणामीं । लंपटासी कामीं रतलिया ॥३॥


१३३०
आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥१॥
उद्धारासी काय उधाराचें काम । वाढवूं चि श्रम नये देवा ॥ध्रु.॥
करा आतां मजसाठी वाड पोट । ठावे नाहीं तंटे झालें लोकीं ॥२॥
तुका म्हणे बाकी झडलियावरी । न पडें वेव्हारीं संचिताचे ॥३॥


१४३३
आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा ॥१॥
अवघियांचे वंदिन पाय । ठायाठाय न देखें ॥ध्रु.॥
नेदीं तुटों समाधान । थांबों जन सकळ ॥२॥
तुका म्हणे झाडा होय । तों हे सोय न संडीं ॥३॥


१५२७
आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या ॥१॥
ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥
गळ गिळी आमिशे मासा । प्राण आशा घेतला ॥२॥
तुका म्हणे बोकड मोहो । धरी पहा हो खाटिकाचा ॥३॥


९७९
आपुल्या महिमानें । धातु परिसें केलें सोनें ॥१॥
तैसें न मनीं माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ॥ध्रु.॥
गांवामागील वोहोळ । गंगा न मनी अमंगळ ॥२॥
तुका म्हणे माती । केली कस्तुरीनें सरती ॥३॥


३६१३
आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥१॥
सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥
करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिसें एकें न्यावयासी ॥२॥
त्या चि पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहें नित्य माहेराची ॥३॥
तुका म्हणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥४॥


३४९७
आप तरे त्याकी कोण बऱ्हाई । औरनकुं भलो नाम धराई ॥ध्रु.॥
काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥१॥
बरसतें मेघ फलतही बिरखा । कोन काम अपनी उन्हो तिरखा ॥२॥
काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥३॥
काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत घातु ॥४॥
कहे तुका उपकार हि काज । सब कररहिया रघुराज ॥५॥


२१८१
आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥१॥
वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥ध्रु.॥
बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं । आंतूनि बाहेरी येओं नेदी ॥२॥
तुज मज सरी होईल या विचारें । जळो भांडखोरें निलाजिरीं ॥३॥
भांडवल माझें मिरविसी जनीं । सहस्त्र वोवनी नाममाळा ॥४॥
तुका म्हणे आम्ही केली जिवें साटी । तुम्हां आम्हां तुटी घालूं आतां ॥५॥


२७८
आमुचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥१॥
न कळे सतंत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥
वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥२॥
तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥३॥


१७३२
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥१॥
मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥
नाहीं निरपराध । कोणां आम्हांमध्यें भेद ॥२॥
तुका म्हणे मान । अवघें आमचें हें धाम ॥३॥


१८७९
आमची कां नये तुह्मासी करुणा । किती नारायणा आळवावें ॥१॥
काय जाणां तुह्मी दुर्बळाचें जिणें । वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ध्रु.॥
देती घेती करिती खटापटा आणिकें । निराळा कौतुकें पाहोनियां ॥२॥
दिवस बोटीं आह्मीं धरियेलें माप । वाहातों संकल्प स्वहिताचा ॥३॥
तुका म्हणे मग देसी कोण्या काळें । चुकुर दुर्बळें होतों आह्मी ॥४॥


१५९५
आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥१॥
लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥ध्रु.॥
उभारिला कर प्रसिद्ध या जग । करूं केला त्याग मागें पुढें ॥२॥
तुका म्हणे होय दरिद्र विच्छिन्न । ऐसे देऊं दान एकवेळे ॥३॥


३३३७
आमची गोसावी आयचित वृत्ती । करवी शिष्या हातीं उपदेश ॥१॥
दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥१॥
तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी । सोंग संपादणी करिती परी॥३॥


५२३
आमुच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें ॥१॥
धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु.॥
आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥२॥
तुका म्हणे अंकित केला । खालीं आला वचनें ॥३॥


२३८५
आमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धी । धरावी ते शुद्धी योगा नये ॥१॥
काय या राहिलें विनोदावांचून । आपुलिया भिन्न केलें आम्हां ॥ध्रु.॥
कोठें मूर्त्तिमंत दावीं पुण्यपाप । काशासी संकल्प वाहाविसी ॥२॥
तुका म्हणे आतां आवरावा चेडा । लटिकी च पीडा पांडुरंगा ॥३॥


१२५७
आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥१॥
समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां ॥ध्रु.॥
चळण वळण सेवकाच्या बळें । निर्गुणाच्यामुळें सांभाळावें ॥२॥
तुका म्हणे आतां आलों खंडावरी । प्रेम देउनि हरी बुझवावें ॥३॥


५७०
आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥१॥
प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥
भूक तहान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥२॥
आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आम्हां करीं खेळावया ॥३॥
तुका म्हणे लावीं संताचा सांगात । तेथें न पवे हात किळकाळाचा ॥४॥


१९३२
आमुची जिवलगे सज्जन सोयरी । नांदतील तिरी भिंवरेच्या ॥१॥
तीच माझ्या चित्ती वसती दिवसराती । भेटावया खंती वाटतसे ॥धृ ॥.
संपदा सोहळे सर्वसुख वसे । वैकुंठ नसें सूरवरासी ॥२॥
ज्याच्या नामे पाप दुःख नासे भय । विठ्ठल बाप मे रखुमाई ॥३॥
माझा जीव जातो अमृत तें कळा । कंठी वेळोवेळां ध्यात असे ॥४॥
तुका म्हणे वाट पाहतां शिणले । न त्या पंथे डोळुले पंढरीच्या ॥५॥


३३५७
आमुची मिरासी पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥
पांडुरंग आमुचा पिता । रकुमाबाईं आमुचि माता ॥ध्रु.॥
भाव पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥२॥
तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥३॥


२५५०
आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥१॥
हें चि एक जाणें । काया वाचा आणि मनें ॥ध्रु.॥
पुढती पुढती नमन । घालूंनियां लोटांगण ॥२॥
नीच जना लोकां । तिळले पायरीस तुका ॥३॥


२२८
आमुचें उचित हे चि उपकार । आपला चि भार घालूं तुज ॥१॥
भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरणें काळीं शीताचिये ॥ध्रु.॥
जेणें काळें उठी मनाची आवडी । ते चि मागों घडी आवडे तें ॥२॥
दुःख येऊं नेदी आमचिया घरा । चक्र करी फेरा भोंवताला ॥३॥
तुका म्हणे नाहीं मुक्तीसवें चाड । हें चि आम्हां गोड जन्म घेतां ॥४॥


१९३७
आमुचे जीवन हे कथाअमृत्त । अणिक ही संतसमागम ॥१॥
सारूं एके ठायीं भोजन परवडी । स्वादरसे गोडी पदोपदीं ॥ध्रु.॥
धालिया ढेकरे येती आनंदाचे । वोसंडले वाचे प्रमेसुख ॥२॥
पिकले स्वरूप आलया घुमरि । रासी ते अंबरीं न समाये ॥३॥
मोजितां तयाचा अंत नाहीं पार । खुंटला व्यापार तुका म्हणे ॥४॥


१२९९
आमुचे ठाउके तुम्हां गर्भवास । बळिवंत दोष केले भोग ॥१॥
काय हा सांगावा नसतां नवलावो । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ध्रु.॥
एका पळवूनि एका पाठी लावा । कवतुक देवा पाहावया ॥२॥
तुका म्हणे ज्याणें असें चेतविलें । त्याच्यानें उगळें कैसें नव्हे ॥३॥


३६०४
आमुप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाहीं आतां ॥१॥
काय सांगों सुख झालें आलिंगन । निवाली दर्शनें कांति माझी ॥२॥
तुका म्हणे यांच्या उपकारासाठी । नाहीं माझे गांठी कांहीं एक ॥३॥


४०७
आयुष्य गेलें वांयांविण । थोर झाली नागवण ॥१॥
आतां धांवें धांवें तरी । काय पाहातोसि हरी ॥ध्रु.॥
माझे तुझे या चि गती । दिवस गेले तोंडीं माती ॥२॥
मन वाव घेऊं नेदी । बुडवूं पाहे भवनदी ॥३॥
पडिला विषयाचा घाला । तेणें नागविलें मला ॥४॥
शरण आलों आतां धांवें । तुका म्हणे मज पावें ॥५॥


१२०५
आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा ॥१॥
नेईल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता हरीविण ॥ध्रु.॥
कठीण हें दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायीं ॥२॥
राहतील दुरी सज्जन सोयरीं । आठवीं श्रीहरी लवलाहीं ॥३॥
तुका म्हणे किती करिसी लंडायी । होईल भंडाई पुढें थोर ॥४॥


२१३२
आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं ॥१॥
करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देउनि रोपीं विस्तारिजे ॥ध्रु.॥
आधारें वदली प्रसादाची वाणी । उिच्छष्टसवणी तुमचिया ॥२॥
तुका म्हणे हे चि करितों विनंती । मागोनि पुढती सेवादान ॥३॥


४०१२
आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुचि आई ॥१॥
देई गे विठाबाई प्रेमभातुकें । अवघियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥ध्रु.॥
असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहे कृपादृष्टी आतां पंढरीराया ॥२॥
तुका म्हणे आम्ही तुझीं वेडीं वांकुडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥३॥


२८५८
आरुषा वचनीं मातेची आवडी । म्हणऊनि तांतडी घेती नाहीं ॥१॥
काय होईल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥ध्रु.॥
लपोनियां करी चुकुर माऊली । नाहीं होती केली निष्ठा सांडी ॥२॥
तुका म्हणे करी पारखीं वचनें । भेवउनि तान्हें आळवावें ॥३॥


३६१५
आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥१॥
आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥
दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥२॥
तुका म्हणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥३॥


२८१०
आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य त्या नांवें ॥१॥
होणार तें सुखें घडो । लाभ जोडो महाबुद्धी ॥ध्रु.॥
सत्य संकल्प चे साटीं । उजळा पोटीं रविबिंब ॥२॥
तुका म्हणे मनीं वाव । शुद्ध भाव राखावा ॥३॥


८६०
आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शक्ती ॥१॥
फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥ध्रु.॥
अल्पें तो संतोषी। स्थळीं सांपडे उद्देसीं ॥२॥
सहज संगम । तुका म्हणे तो उत्तम ॥३॥


२५७७
आर्त माझ्या बहु पोटीं । व्हावी भेटी पायांची ॥१॥
यासी तुम्ही कृपावंता । माझी चिंता असों द्या ॥ ध्रु.॥
तळमळ करी चित्त । अखंडित योगे ॥२॥
तुका म्हणे पढंरिनाथा । जाणे व्यथा अंतरिची ॥३॥


३८४९
आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥१॥
होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥
आधीं पाठीमोरीं झालीं तीं सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥३॥
दिली हाक त्याणें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासि ॥४॥
भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥५॥
गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचें ॥६॥
चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण ॥७॥


९२८
आला भागासी तो करीं वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायीं ॥१॥
काय चाले तुह्मीं बांधलें दातारा । वाहिलिया भारा उसंतितों ॥ध्रु.॥
शरीर तें करी शरीराचे धर्म । नको देऊं वर्म चुकों मना ॥२॥
चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥३॥
इंद्रियें करोत आपुले व्यापार । आवडीसी थार देई पायीं ॥४॥
तुका म्हणे नको देऊं काळा हातीं । येतों काकुलती म्हणऊनि ॥५॥


२६
आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥
तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥२॥
तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥३॥


२३५८
आलिया अतीता म्हणतसां पुढे । आपुलें रोकडें सत्त्व जाय ॥१॥
काय त्याचा भार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं म्हणावया ॥ध्रु.॥
दारीं हाका कैसें करवतें भोजन । रुची तरि अन्न कैसें देतें ॥२॥
तुका म्हणे ध्वज उभारिला कर । ते शक्ती उदार काय जाली ॥३॥


२२९२
आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥१॥
मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर तें बापुडें काय रंक ॥ध्रु.॥
भयाचिये पोटीं दुःखाचिया रासी । शरण देवासी जातां भले ॥२॥
तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर ॥३॥


३०८६
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥
देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥२॥
निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें म्हणोनि व्यर्थ गेला ॥३॥
तुका म्हणे कां रे नाशवंतासाटीं । देवासवें आटी पाडितोसी ॥४॥


३७८१
आलियें धांवति धांवति भेट होईल म्हुण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥१॥
आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा । हरीलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ध्रु.॥
लाविला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा । सांभाळितां सांग असांग दुःख पावल्यें पीडा ॥२॥
जळो आतां संसारु वो कई शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥३॥


३९८५
आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥१॥
लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाउनि विश्वंभरा ॥ध्रु.॥
झालिया अवसान । न संपडती चरण ॥२॥
तुकयाबंधु म्हणे थोडें । अवधि उरली आहे पुढें ॥३॥


११८४
आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी॥१॥
अंतरीं पापाच्या कोडी । वरीवरी बोडी डोई दाढी ॥ध्रु.॥
बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ॥२॥
पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ॥३॥
भक्तीभावें विण । तुका म्हणे अवघा सीण ॥४॥


३६०३
आलें तें आधीं खाईन भातुकें । मग कवतुकें गाईन ओव्या ॥१॥
सांगितला आधीं आइकों निरोप । होईल माझा बाप पुसें तों तें ॥२॥
तुका म्हणे माझे सखे वारकरी । आले हे माहेरीहून आजि ॥३॥


१६४८
आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना ॥१॥
हरीश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥
पांडवांचा साहाकारी। राज्यावरोनि केले दुरी ॥२॥
तुका म्हणे उगेचि राहा । होईल तें सहज पाहा ॥३॥


८३७
आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठीं ॥१॥
नामें चि सिद्धी नामें चि सिद्धी । व्यभिचारबुद्धी न पवतां ॥ध्रु.॥
चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥२॥
तुका म्हणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हाणी लाभ ॥३॥


६४७
आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥१॥
उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥
वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥२॥
तुका म्हणे माप । खरें आणा माझे बाप ॥३॥


१९५८
आलें धरायच पेट । पुढें मागुतें न भेटे ॥१॥
नाहीं कोणांचा सांगात । दुःख भोगितां आघात ॥ध्रु.॥
होसी फजीती वरपडा । लक्ष चौऱ्यांशीचा वेढां ॥२॥
एका पाउलाची वाट । कोणां सांगावा बोभाट ॥३॥
जुंतिजेसी घाणां । नाहीं मारित्या करुणा ॥४॥
तुका म्हणे हित पाहें । जोंवरी हें हातीं आहे ॥५॥


११३७
आले संत पाय ठेविती मस्तकीं । येहीं उभयलोकीं सरता केलों ॥१॥
वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणी फिटईल ॥ध्रु.॥
अवघीं पूर्व पुण्यें जालीं सानुकूळ । अवघें चि मंगळ संतभेटी ॥२॥
तुका म्हणे कृतकृत्य जालों देवा । नेणें परि सेवा डोळां देखें ॥३॥


४०२८
आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तीमारग हळू चि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा देखसी ना ॥१॥
नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥२॥
नाहीं दिलें पावइल कैसा । चालतां पंथ तेणें वळसा । नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥३॥
क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं । वोढितां कांटवणा सोई । अिग्नस्तंभीं बाही कवटाळविती ॥४॥
देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती। लागे ठाव न लगे बुडविती । वरी मारिती यमदंड ॥५॥
तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥६॥
म्हणउनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तीरस तुका म्हणे ॥७॥


२९३३
आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायांपाशीं हित तुमच्या तरी ॥१॥
न देखेचि लासा दुःखी होतें मन । कठिणें कठिण वाटतसे ॥ध्रु.॥
नव्हे सांडी परि वाटतें निरास । न ये माझा दिस संकल्पाचा ॥२॥
तुका म्हणे तुम्हीं सदैव जी देवा । माझ्या हाचि जीवा एक ठाव ॥३॥


२६९२
आवडी कां ठेवूं । बैसोनियां संगें जेवूं ॥१॥
मागें नको ठेवूं उरी । माझी आण तुजवरी ॥ध्रु.॥
देखिले प्रकार । त्याचे पाहेन साचार ॥२॥
तुका म्हणे बाळीं । केली चाहाडी सकळीं ॥३॥


२८८५
आवडीवी न पुरे धणी । प्रीत मनीं बैसली ॥१॥
नित्य नवा कळवळा । मायबाळामध्यें तों ॥ध्रु.॥
सुख सुखा भेटों आलें । होय वाल्हें पोटींचे ॥२॥
तुका म्हणे ब्रम्हानंदें । संतवृंदें चरणापें ॥३॥


२५५२
आवडीची सलगी पूजा । विषम दुजा भाव तो ॥१॥
ऐसीं उफराटीं वर्में । कळों भ्रमें न येती ॥ध्रु.॥
न लगे समाधान मोल । रुचती बोल प्रीतीचे ॥२॥
तुका म्हणे एका जीवें । सूत्र व्होवें गुंतलें ॥३॥


२३९७
आवडीचे भेटी निवे । चित्त पावे विश्रांती ॥१॥
बरवियाचा छंद मना । नारायणा अवीट ॥ध्रु.॥
तूळणे कांहीं साम्या पुरे । हें तों नुरे ये रुचि ॥२॥
तुका म्हणे बरवें जालें । फावलें हें कळे त्या ॥३॥


२०३४
आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे॥१॥
जें जया रुचे तें करी समोर । सर्वज्ञ उदार मायबाप ॥ध्रु.॥
ठायीं पडिलिया तें चि लागे खावें । ठायींचे चि घ्यावें विचारूनि ॥२॥
बीज पेरूनियां तें चि घ्यावें फळ । डोरलीस केळ कैंचें लागे ॥३॥
तुका म्हणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूं चि पाहीं शत्रु सखा ॥४॥


२३८२
आवडीच्या ऐसे झाले । मुखा आले हरीनाम ॥१॥
आता घेऊ धणीवरी । मागे उरी नुरे तो ॥ध्रु॥
सांठवण मना ऐसी । पुढे रासी अमुप ॥२॥
तुका म्हणे कारण झाले । विठ्ठल या तीं अक्षरी॥३॥


७१९
आवडीच्या मतें करिती भोजना । भोग नारायणें म्हणती केला ॥१॥
अवघा देव म्हणे वेगळें तें काइ । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥ध्रु.॥
लाजे कमंडलु धरितां भोपळा । आणीक थीगळा प्रावरणासी ॥२॥
शाला गडवे धातुद्रव्यइच्छा चित्तीं । नैश्वर्य बोलती अवघें मुखें ॥३॥
तुका म्हणें यांस देवा नाहीं भेटी । ऐसे कल्पकोटि जन्म घेतां ॥४॥


२८६३
आवडी धरूनि करूं गेलों लाड । भक्तिप्रेमकोड न पुरे चि ॥१॥
म्हणऊनि जीव ठेला असावोनि । खेद होतो मनीं बहुसाल ॥ध्रु.॥
वेठीऐसें वाटे निर्फळ कारण । शीतळ होऊन खोडावलों ॥२॥
तुका म्हणे सरतें नव्हेंचि पायांपें । बळ केलें पापें नव्हें भेटी ॥३॥


३००९
आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाठी ॥१॥
तें मी तुझें नाम गाईंन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥ध्रु.॥
वर्म धरावें हा मुख्यधर्मसार । अवघे प्रकार तयापासीं ॥२॥
वेगळ्या विचारें वेगळाले भाव । धरायासी ठाव बहु नाहीं ॥३॥
तुका म्हणे घालूं इच्छेचिये पोटीं । कवळुनी धाकुटी मूर्ती जीवें ॥४॥


१७१८
आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥१॥
न पुरे हा जन्म हें सुख सांठितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥
मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥२॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तान ॥३॥


२८६७
आवडी न पुरे मायबापापासीं । घडों का येविसीं सकईंल ॥१॥
होईंल नेमलें आपुलिया काळें । आलीयाचें बळें आग्रहो उरे ॥ध्रु.॥
जाणविलें तेथे थोडें एक वेळा । सकळ ही कळा सर्वोत्तमीं ॥२॥
तुका म्हणे निवेदिलें गुह्य गुज । आतां तुझी तुज सकळ चिंता ॥३॥


१०९१
आवडीनें धरिलीं नांवें । प्रियभावें चिंतन ॥१॥
वेडा जाला वेडा जाला । लांचावला भक्तीसी ॥ध्रु.॥
निचाड हा चाड धरी । तुळसी करीं दळ मागे ॥२॥
धरिला मग न करी बळ । तुका म्हणे कळ पायीं ॥३॥


१४३१
आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥१॥
भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिंहीं नाहीं भेद राखियेला ॥ध्रु.॥
पाकसिद्धि स्वहस्तकें विनियोग । आवडीचे भाग सिद्ध केले ॥२॥
तुका म्हणे आला उच्छिष्ट प्रसाद । तेणें हा आनंद माझ्या जीवा ॥३॥


१७१६
आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥१॥
कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥
हातें जेवी एक मुखीं मागे घांस । माउली जयास तैसी बाळा ॥२॥
तुका म्हणे माझें ध्यान विटेंवरी । तैसी च गोजिरी दिसे मूर्ती ॥३॥


१६१७
आवडी येते गुणें । कळों चिन्हें उमटती ॥१॥
पोटीचें ओठीं उभें राहे । चित्त साहे मनासी ॥ध्रु.॥
डाहोळे याची भूक गर्भा । ताटीं प्रभा प्रतिबिंबे ॥२॥
तुका म्हणे मागून घ्यावें । मना खावें वाटे तें ॥३॥


३१६९
आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग ॥१॥
कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती ॥२॥
तुका म्हणे जीवा थोर झालें सुख । नाठवे हे भूक तहान कांहीं ॥३॥


३०४४
आवडेल तैसें तुज आळवीन । वाटे समाधान जीवा तैसें ॥१॥
नाहीं येथें कांहीं लौकिकाची चाड । तुजविण गोड देवराया ॥ध्रु.॥
पुरवीं मनोरथ अंतरींचें आर्त । धायेवरी गीत गाई तुझे ॥२॥
तुका म्हणे लेंकी आळवी माहेरा । गाऊं या संसारा तुज तैसें ॥३॥


३०९२
आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान ॥१॥
काय तया एका साठी । कामे केली अवघी खोटी ॥ध्रु.॥
दर्पण नलगें एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥
तुका म्हणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥


३१३८
आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥१॥
आतां दृष्टीपुढें ऐसा चि तूं राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥ध्रु.॥
लांचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडीं ऐसें झालें ॥२॥
तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥३॥


३९३८
आवल नाम आल्ला बडा लेते भुल न जाये । इलाम त्याकालजमुपरताही तुंब बजाये ॥१॥
आल्ला एक तुं नबी एक तुं ॥ध्रु.॥
काटतें सिर पावों हात नहीं जीव उराये । आगले देखे पिछले बुझे । आपें हजुर आयें ॥२॥
सब सबरी नचाव म्याने । खडा आपनी सात । हात पावों रखते जबाब । नहीं आगली बात ॥३॥
सुनो भाई बजार नहीं । सब हि निरचे लाव । नन्हा बडा नहीं कोये एक ठोर मिलाव ॥४॥
एक तरि नहीं प्यार । जीवतनकी आस । कहे तुका सो हि मुंढा । राखलिये पायेनपास ॥५॥


३२६
आविसाचये आशा गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे ॥१॥
मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥२॥
अंतकाळीं ज्याच्या नाम आलें मुखा । तुका म्हणे सुखा पार नाहीं ॥३॥


९४९
आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होईजेतें ॥१॥
अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचें ॥२॥
तुका म्हणे नाहीं आणिकांसी बोल । वांयां जाय मोल बुद्धीपाशीं ॥३॥


९०९
आशा ते करविते बुद्धीचा तो लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥१॥
आपुला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन ग्वाही ॥ध्रु.॥
नांवें रूपें अंगीं लाविला विटाळ । होतें ते निर्मळ शुद्ध बुद्ध ॥२॥
अंधळ्यासी नये देखण्याची चाली । चालों ऐसी बोली तुका बोले ॥३॥


२९३०
आशाबद्ध आम्ही भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं ॥१॥
प्रतिउत्तराची पाहातसें वाट । करूनि बोभाट महाद्वारीं ॥ध्रु.॥
आपुल्या उचितें करूनियां ठेवीं । संबंध गोसावी तोडोनियां ॥२॥
तुका म्हणे एक झालिया निवाड । कोण बडबड करी मग ॥३॥


४४
आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥१॥
करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥
भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥२॥
तुका म्हणे विषें । अन्न नाशियलें जैसें ॥३॥


१०००
आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥
आहे तें अधीन आपुले हातीं । आणिकां ठेविती काय बोला ॥ध्रु.॥
जाणतिया पाठीं लागला उपाध । नेणता तो सिद्ध भोजनासी ॥२॥
तुका म्हणे भय बांधलें गांठीं । चोर लागे पाठी दुम तया ॥३॥


२७२१
आशाबद्ध बहु असे निलाजिरें । होय म्हणें धीरें फळ टोंकें ॥१॥
कारणापें चित्त न पाहें अपमान । चित्त समाधान लाभासाठी ॥२॥
तुका म्हणे हातें लोटिलें न कळे । झांकितसें डोळे पांडुरंगा ॥३॥


३१८
आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥१॥
गातो तेची नाही ठावे । तोंड वासी कही द्यावे ॥ध्रु .॥
जाले लोभाचे मांजर । पोट धरी दारोदार ॥२॥
वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥३॥
बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥४॥
माप तैसी गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ॥५॥


९३९
आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हांचि गोसावी व्हावें तेणें ॥१॥
नाहीं तरी सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ॥ध्रु.॥
आशा मारूनिया जयवंत व्हावें । तेव्हांचि निघावें सर्वांतूनि ॥२॥
तुका म्हणे जरीं योगाची तांतडी । आशेची बीबुडी करीं आधीं ॥३॥


३९८०
आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥१॥
कल्याण ती असो क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ध्रु.॥
भक्तिभाग्यगांठी धन । त्या नमन जीवासी ॥२॥
तुका म्हणे हरीचे दास । तेथें आस सकळ ॥३॥


५९५
आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥१॥
मढयापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥
न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥२॥
तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥३॥


८९२
आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैचे दिलें साचें करोनियां ॥१॥
दुजियाचा तंव अकळ हा भाव । कराया तो जीव साक्षी येथ ॥ध्रु.॥
एकीं अनेकत्व अनेकीं एकत्व । प्रकृतिस्वभावत्व प्रमाणेंचि ॥२॥
तुका म्हणे करूं उगवूं जाणसी । कुशळ येविशीं तुम्ही देवा ॥३॥


२९४९
आश्वासावें दास । तरी घडे तो विश्वास ॥१॥
नाहीं चुकत चाकरी । पुट लाडे शोचे थोरी ॥ध्रु.॥
स्वामीच्या उत्तरें । सुख वाटे अभयें करें ॥२॥
न मगें परि भातें । तुका म्हणे निढळ रितें ॥३॥


२९७५
आषाढी निकट । आणी कार्तिकीचा हाट ॥१॥
पुरे दोन्ही च बाजार । न लगे आणीक व्यापार ॥ध्रु.॥
तें चि घ्यावें तें चि घ्यावें । कैवल्याच्या रासी भावें ॥२॥
कांहीं कोणा नेणे । विठो वांचूनि तुका म्हणे ॥३॥


२५३९
आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन ॥१॥
अवघियां केली काळें तडातोडी । अवसर घडी पुरों नये ॥ध्रु.॥
वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला ॥२॥
आवडीच्या आलें आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥३॥
काम तरी क्रोध बुद्धी मन नासे । भ्रमाचे वोळसे गिळिले शांती ॥४॥
तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥५॥


३८५४
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥
हाका आरोळिया देउनि नाचती । एक सादाविती हरी आले ॥३॥
आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥
लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥५॥
आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥


१९५
आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठुर अतिवादी ॥१॥
याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥
काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग । अंगाचेंच अंग साक्षी देतें ॥२॥
तुका म्हणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांठविलें ॥३॥


३९५५
आहा आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक ।
ठेवुनि गुरुचरणीं मस्तक । वदेल प्रसादिक वाणी । हरीहरांचे पवाडे ॥१॥
माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी ।
पान्हेरीनें मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडि हो ॥२॥
जें या सीतळाहुनि सीतळ । पातळाहुनि जें पातळ ।
प्रेमामृत रसाळ । तें हें सेवा अहो भाग्याचेनु ॥३॥
जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान । धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥४॥
काळा घेऊं नेदीं वाव । आला तो राखें घावडाव ।
शुद्ध सत्वीं राखोनि भाव । म्हणा महादेव हरीहर वाणी गर्जो द्या ॥५॥
पराविया नारी माउली समान । परधनीं बाटों नेदीं मन ।
जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर म्हणों तया आम्ही ॥६॥
शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा ।
सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे अहो सांगतों ॥७॥
व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरीजागर ।
पुण्य तें असे गातां नाचतां बहु फार । पुन्हा बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥८॥
संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा ।
पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ॥९॥
तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी ।
पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥१०॥


३९५६
आहा आहा रे भाई । हें अन्नदानाचें सत्र ।
पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥१॥
यावें तेणें घ्यावें । न सरेसें केलें सदाशिवें ।
पात्र शुद्ध पाहिजे बरवें । मंगळभावें सकळ हरी म्हणा रे ॥२॥
नव्हे हें कांहीं मोकळें । साक्षी चौघांचिया वेगळें ।
नेदी नाचों मताचिया बळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा साक्षित्वें हरी म्हणा रे ॥३॥
हे हरी नामाची आंबिली । जगा पोटभरी केली ।
विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । म्हणा हर हर महादेव ॥४॥
तुका हरीदास तराळ । अवघे हाकारी सकळ ।
या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शनें ॥५॥


३९५७
आहा आहारे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥१॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ध्रु.॥
बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा ॥२॥
विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांसि फळी मांडोनियां ॥३॥
गांविंचिया देवा नाहीं दंडवत । ब्राम्हण अतीत घडे चि ना ॥४॥
सर्वकाळ करि संताचिया निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥५॥
खासचेमध्यें धन पोटासि बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं ॥६॥
तुका म्हणे नटे दावुनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥७॥


३९५८
आहा आहा रे भाई । नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥
नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥२॥
नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरुचें त्यां ॥३॥
नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥४॥
नमो तया जाणे आणिकाचें सुखदुःख । राखे तान भुक तया नमो ॥५॥
परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसि ॥६॥
तुका म्हणे नमो हरीचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥


३९५९
आहा आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥
समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥
काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु । राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥३॥
चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥
गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥५॥
कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रम्हा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥
गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥
सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चर्मांतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥८॥
मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेनें ॥९॥
गांव नव्हे द्वारावती । रणछोड नव्हे मूर्ति । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥१०॥
कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥११॥


५०
आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र झाला ॥१॥
गळे चि ना गर्भ नव्हे चि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु. ॥
परपीडें परद्वारीं सावधान । सादर चि मन अभाग्याचें ॥२॥
न मळितां निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥३॥
परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥४॥
तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥५॥


१३८१
आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुद्धि तेणें न्यायें ॥१॥
म्हणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ध्रु.॥
विषासाठी सर्पां भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥२॥
तुका म्हणे काचें राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥३॥


३४४२
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥
भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥
तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥


२४५३
आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर ते चि होय॥१॥
परमितेविण बोलणें ते वांयां । फार थोडें काया पिंड पीडी ॥ध्रु.॥
समाधान त्याचें तोचि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनियां ॥२॥
तुका म्हणे होय पीडा ते न करीं । मग राहें परी भलतिये ॥३॥


३२३३
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ॥१॥
आवडी आवडी कलेंवरा कलेंवरी । वरीलें अंतरी ताळा पडे ॥ध्रु.॥
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडून मागे तुटी हर्षयोगे ॥२॥
तुका म्हणे एके कळते दुसरे। बरियानें बरें आहाचे आहाच ॥३॥


२९५७
आहे ऐसा आतां आहे ठायीं बरा । ठेविलों दातारा उचितें त्या ॥१॥
वचनाचा भार पडिलिया शिरीं । झालें मग भारी उतरेना ॥ध्रु.॥
अबोल्याची सवे लावुनियां मना । फाकों नेदीं गुणा ऐसें करूं ॥२॥
तुका म्हणे आम्हां गोंवळ्याचा संग । राखतें तें अंग जाणतसों ॥३॥


६१९
आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वराता ॥१॥
अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकुरें ॥ध्रु.॥
तरो निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥२॥
तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैची ॥३॥


७०६
आहे तें चि आम्ही मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्टें ॥१॥
न बोलावीं तों च वर्में बरें दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं ॥ध्रु.॥
एका ऐसें एका द्यावयाचा मोळा । कां तुम्हां गोपाळा नाहीं ऐसा ॥२॥
तुका म्हणे लोकां नाहीं कळों आलें । करावें आपुलें जतन तों ॥३॥


३५२७
आहे तें चि पुढें पाहों । बरे आहों येथें चि ॥१॥
काय वाढवूनि काम । उगा च श्रम तृष्णेचा ॥ध्रु.॥
स्थिरावतां ओघीं बरें । चाली पुरें पडेना ॥२॥
तुका म्हणे विळतां मन । आम्हां क्षण न लगे ॥३॥


२६८८
आहेतें सकळ प्रारब्धाचे हातीं । यावें काकुलती यासी आतां ॥१॥
ऐसा माझ्या मनें सांगितला भाव । तोंवरीच देव दुजा नाहीं ॥ध्रु.॥
अवघियांची जेव्हां सारावी करकर । भावबळें थार धरूं येसी ॥२॥
तुका म्हणे तुज ठेवावें पुजून । आणीक ते गुण नाहीं येथें ॥३॥


२९
आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥१॥
म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥
ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥२॥
तुका म्हणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥


१२४६
आहे सकळां वेगळा । खेळे कळा चोरोनि ॥१॥
खांबसुत्राचिये परी । देव दोरी हालवितो ॥ध्रु.॥
आपण राहोनि निराळा । कैसी कळा नाचवी ॥२॥
जेव्हां असुडितो दोरी । भूमीवरी पडे तेव्हां ॥३॥
तुका म्हणे तो जाणावा । सखा करावा आपुला ॥४॥


९२९
आम्हां अवघें भांडवल । येथें विठ्ठल एकला ॥१॥
कायावाचामनोभावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥
परतें कांहीं नेणें दुजें। तत्त्वबीजें पाउलें ॥२॥
तुका म्हणे संतसंगें । येणें रंगें रंगलों ॥३॥


३५९१
आम्हां अराणूक संवसार हातीं । पडिली नव्हती आजीवरी ॥१॥
पुत्रदाराधन होता मनी धंदा । गोवियेलों सदा होतों कामे ॥ध्रु.॥
वोढवले ऐसे दिसते कपाळ । राहिलों सकळ आवरोनि ॥२॥
मागे पुढे कांहीं न दिसे पाहातां । येथूनिया चिंता उपजली ॥३॥
तुका म्हणे वाट पाह्याचे कारण । येथींचिया हीन झाले भाग्य ॥४॥


१४१९
आम्हां आवडे नाम घेतां । तो ही पिता संतोषे ॥१॥
उभयतां एकचित्त । तरी प्रीत वाढली ॥ध्रु.॥
आम्ही शोभों निकटवासें । अनारिसें न दिसो ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगे । अवघीं अंगें निवालीं ॥३॥


३४३०
आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥
फावला एकांत एकविध भाव । हरी आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥


१४५२
आम्हां एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणकमळ स्वामीचे ते ॥१॥
चित्ताचे संकल्प राहिलें चळण । आज्ञा ते प्रमाण करुनी असों ॥ध्रु.॥
दुजिया पासाव परतलें मन । केलें द्यावें दान होईल तें ॥२॥
तुका म्हणे आतां पुरला नवस । एकाविण ओस सकळ ही ॥३॥


२७०३
आम्हां कथा आवश्यक । येर संपादूं लौकिक ॥१॥
जैसी तैसी माय बरी । मानिल्या त्या माना येरी ॥ध्रु.॥
व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोंवळा ॥२॥
कवतुकें वावरें । तुका म्हणे त्या आधारें ॥३॥


३२९६
आम्हां काही आम्हां काही । आतां नाही या बोले ॥१॥
मोल सांगा मोल सांगा । घेणें तीहीं गा पुसावें ॥ध्रु.॥
कैसें घडे कैसें घडे । बडबड तुज मज ॥२॥
मुद्दलेसाठीं मुद्दले साठीं । लाभ पोटी त्यामध्ये ॥३॥
तुका म्हणे साठवूं घरीं । आडल्या काळें पुसती तरी ॥४॥


३१०९
आम्हां केलें गुणवंत । तें उचित राखावें ॥१॥
तुम्हांसी तों चाड नाहीं । आणिकां कांहीं सुखदुःखां ॥ध्रु.॥
दासांचें तें देखों नये । उणें काय होईल तें ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरा । दृष्टि करा सामोरी ॥३॥


१७६०
आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण ॥१॥
जालों पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥ध्रु.॥
आह्मीं जना भ्यावें । तरि कां न लाजिजे देवें ॥२॥
तुका म्हणे देश । जाला देवाविण ओस ॥३॥


१२५५
आम्हां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥
वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥
वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥२॥
चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥३॥
तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥४॥


१६२७
आम्हां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥१॥
शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥


३००८
आम्हां देणें धरा सांगतों तें कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचे ॥१॥
तेणें माझें चित्ता होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोनें ॥ध्रु.॥
व्रत एकादशी दारीं वृंदावन । कंठीं ल्यारे लेणें तुळसीमाळा ॥२॥
तुका म्हणे त्याचे घरींची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥३॥


३२१३
आम्ही नरका जातां काय येईल तुझ्या हाता । ऐसा तूं अनंता विचारीं पां ॥१॥
तुज शरण आलियाचें काय हें चि फळ । विचारा दयाळ कृपानिधी ॥ध्रु.॥
तुझें पावनपण न चले आम्हांसीं । ऐसें हृषीकेशी कळों आलें ॥२॥
आम्ही दुःख पावों जन्ममरण वेथा । काय तुझ्या हाता येत असे ॥३॥
तुका म्हणे तुम्ही खादली हो रडी । आम्ही धरली सेंडी नाम तुझें ॥४॥


३६७६
आम्हां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें । नाहीं अनारीसें । कान्होबाचे अंतरीं ॥१॥
पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ध्रु.॥
खेळ खेळे न पडे डाईं । ज्याचा भार त्याच्या ठायीं । कोणी पडतील डाईं । कोणी कोडीं उगवीती ॥२॥
तुका म्हणे कवळ । हातीं घेऊनि गोपाळ । देतो ज्यांचें बळ । त्यांसि तैसा विभाग ॥३॥


७०८
आम्हांपाशीं याचें बळ । कोण काळवरी तों ॥१॥
करूनि ठेलों जीवेंसाठी । होय भेटी तोंवरी ॥ध्रु.॥
लागलों तों न फिरें पाठी । पडिल्या गांठी वांचूनि ॥२॥
तुका म्हणे अवकाश । तुमच्या ऐसें व्हावया ॥३॥


२३९५
आम्हांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराई जाणींव न लगे कळा ॥१॥
सर्वजाण माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगें गोपाळासी ॥२॥
तुका म्हणे कर्मधर्में नये हातां । तयावरी सत्ता भाविकांची ॥३॥


२६९४
आम्हां बोल लावा । तुम्हां अनुचित हें देवा ॥१॥
ऐसें सांगा कां व्यालेती । काय नाहीं तुम्हां हातीं ॥ध्रु.॥
आतां धरा दुरी । वांयां दवडाया थोरी ॥२॥
तुका म्हणे ठायीं । ऐसें विचारावें पायीं ॥३॥


३१७१
आम्हां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥१॥
आम्हांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ध्रु.॥
काय करावी हे कोणाची मान्यता । करितां अनंता कोण वारी ॥२॥
नाहीं शीण आम्हां झालें कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥३॥
तुका म्हणे खातों आनंदाचे लाडू । नका चरफडूं घ्या रे तुम्ही ॥४॥


२५९५
आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शके चि ना ॥१॥
जाणें माउली त्या खुणा । क्षोभ उपजों नेदी मना । शांतवूनि स्तना । लावीं अहो कृपाळे ॥ध्रु.॥
तुज अवघे होऊं येते । मज वाटों नये चित्ते । उपासने परतें । नये कांहीं आवडों ॥२॥
करूं रूपाची कल्पना । मुखीं नाम नारायणा । तुका म्हणे जना । जनस्थळ देखतां ॥३॥


३३१५
आम्हां लडिवाळांचे बोल । करा कवतुकें नवल ॥१॥
करूं स्तुती तरि ते निंदा । तुम्ही जाणां हे गोविंदा ॥ध्रु.॥
बोबड्या उत्तरीं । तुह्मा रंजवितों हरी ॥२॥
मागतों भातुकें । तुका म्हणे कवतुकें ॥३॥


१२००
आम्हां विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥१॥
वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान ॥२॥
तुका म्हणे द्रव्य मेळविलें मागें । हें तों कोणासंगें आलें नाहीं ॥३॥


३१३४
आम्हां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा एका भावें ॥१॥
तरीच हरीदास म्हणवितां श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥ध्रु.॥
गाऊं नाचूं प्रेमें आनंदें कीर्तनीं । भक्ति मुक्ति दोन्ही न मगों तुज ॥२॥
सगुण निर्गुण एकची आवडी । चित्ते दिली बुडी चिदानंदी ॥३॥
वृत्तिसहित मन रिघे प्रेम डोही । नाठविती देही देहभाव ॥४॥
तुका म्हणे देवा ऐसीयांची सेवा । द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥५॥


२००४
आम्हां वैष्णवांचा । नेम काया मने वाचा ॥१॥
धीर धरु जिवासाटीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ध्रु॥ उचित समय । लाज निवारावे भय ॥२॥
तुका म्हणे कळा । जाणों नेम नाहीं बाळा ॥३॥


१४०४
आम्हां शरणागतां । एवढी काय करणें चिंता ॥१॥
परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ध्रु.॥
अभयदान वदें । आम्हां कैंचीं द्वंदें ॥२॥
तुका म्हणे आम्ही । हरीजन साधनाचे स्वामी ॥३॥


१८२३
आम्हां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम ॥१॥
न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां ॥ध्रु.॥
आसनीं भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥२॥
तुका म्हणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥३॥


२८५
आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥
मोहें धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ध्रु.॥
कोठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥२॥
सुख ठेवी आम्हासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥३॥
आम्हां घाली पाठीकडे । पुढें कळिकाळाशीं भिडे ॥४॥
तुका म्हणे कृपानीधी । आम्हां उतरीं नांवेमधीं ॥५॥


४८४
आम्हां आपुलें नावडे संचित । चरफडी चित्त कळवळ्यानें ॥१॥
न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ध्रु.॥
कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥२॥
तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥३॥


९४६
आम्हांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥१॥
घालूनियां कास करितो कैवाड । वागों नेदीं आड कळिकाळासी ॥ध्रु.॥
अबद्ध वांकडें जैशातैशा परी । वाचे हरी हरी उच्चारावें ॥२॥
तुका म्हणे आम्हां सांपडलें निज । सकळां हें बीज पुराणांचें ॥३॥


२५७६
आम्हां सकळा हें । तुझ्या नामाचें चि बळ ॥१॥
करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥
जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥२॥
तुका म्हणे देवा । तुझे पायीं माझा हेवा ॥३॥


आम्हांसी सकळ । तुझ्या नामाचेंची बळ ॥१॥
करू अमृताचें पान । दुजें नेणो काही आन ॥ध्रु॥ जयाचा जो भोग। सुख दुःख पीडा रोग ॥२॥
तुका म्हणे देवा । तुझे पायी माझा ठेवा ॥३॥


२६६८
आम्हांसी संगाती । होती अराले ते होती ॥१॥
येती आइकतां हाक । दोन मिळोन म्हणती एक ॥ध्रु.॥
आणिक उत्तरीं । नसे गोवीली वैखरी ॥२॥
तुका म्हणे बोल । खूण पहाती विठ्ठल ॥३॥


१५४५
आम्हां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥१॥
घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥
वाहे बंदर द्वारका । खेप आली पुंडलिका । उभे चि विकिलें एका । सनकादिकां सांपडलें ॥२॥
धन्य धन्य हे भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेती जीं दुबळीं । तीं आगळीं सदैव ॥३॥
माप आपुलेनि हातें । कोणी नाहीं निवारितें । पैस करूनि चित्तें । घ्यावें हितें आपुलिया ॥४॥
नाहीं वाटितां सरलें । आहे तैसें चि भरलें । तुका म्हणे गेलें । वांयांविण न घेतां ॥५॥


२४६६
आम्हां सोइरे हरीजन । जनीं भाग्य निकींचन ॥१॥
ज्याच्या धैर्या नाहीं भंग । भाव एकविध रंग ॥ध्रु.॥
भुक तहान चित्तीं। सदा देव आठविती ॥२॥
तुका म्हणे धन । ज्याचें वित्त नारायण ॥३॥


१६६०
आम्हां हरीच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रयलोकीं ॥१॥
देव उभा मागेंपुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥
जैसा केला तैसा होय। धांवे सोय धरोनि ॥२॥
तुका म्हणे असों सुखें । गाऊं मुखें विठोबा ॥३॥


४६८
आम्हां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ध्रु.॥
अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥२॥
तुका म्हणे येथें खऱ्याचा विकरा । न सरती येरा खोटया परी ॥३॥


१७२३
आम्हां अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहों कंठीं ॥१॥
लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥
आम्हां आणिकांची चाड चित्ती नाहीं । सर्व सुखें पायीं विठोबाच्या ॥२॥
तुका म्हणे आम्ही नेघों या मुक्ती । एकाविण चित्तीं दुजें नाहीं ॥३॥


२०२०
आम्हां हें चि भांडवल । म्हणों विठ्ठल विठ्ठल ॥१॥
सुखें तरों भवनदी । संग वैष्णवांची मांदी ॥ध्रु.॥
बाखराचें वाण। सांडूं हें जेवूं जेवण ॥२॥
न लगे वारंवार । तुका म्हणे वेरझार ॥३॥


१५७८
आम्ही असों निंश्चितीनें । एक्या गुणें तुमचिया ॥१॥
दुराचारी तरले नामें । घेतां प्रेम म्हणोनि ॥ध्रु.॥
नाहीं तुम्हां धांव घेता । कृपावंता आळस ॥२॥
तुका म्हणे विसरूं कांहीं । तुज वो आई विठ्ठले ॥३॥


३१३२
आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणें चि वाढलें ॥१॥
ठेवा जोडला मिरासी । ठाव झाला पायांपासी । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ध्रु.॥
बळी दिला जीवभाव । नेणें आणिकांचे नांव । धरिला एक भाव । तो विश्वास फळला ॥२॥
तुका म्हणे झालों बळी । आम्ही निकट जवळी । बोलिलों तें पाळीं । वचन स्वामी आमुचें ॥३॥


२३२२
आम्ही आर्तभूत जिवीं । तुम्ही गोसावी तों उदास॥१॥
वादावाद समर्थाशीं । काशानशीं करावा ॥ध्रु.॥
आम्ही मरों वेरझारीं। स्वामी घरीं बैसले ॥२॥
तुका म्हणे करितां वाद । कांहीं भेद कळेना॥३॥


७८२
आम्ही आळीकरें । प्रेमसुखाचीं लेंकुरें ॥१॥
पायीं गोविली वासना । तुच्छ केलें ब्रम्हज्ञाना ॥ध्रु.॥
येतां पाहें मुळा । वास पंढरीच्या डोळां ॥२॥
तुका म्हणे स्थळ । मग मी पाहेन सकळ ॥३॥


६८२
आम्ही उतराई । भाव निरोपोनि पायीं ॥१॥
तुम्ही पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥
आमचा हा नेम । तुम्हां उचित हा धर्म ॥२॥
तुका म्हणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥३॥


६४२
आह्मीं गावें तुह्मीं कोणीं कांहीं न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें ॥१॥
म्हणा रामराम टाळी वाजवा हातें। नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥
सहज घडे तया आळस करणें तें काई । अग्नीचें भातुकें हात पाळितां कां पायीं ॥२॥
येथें नाहीं लाज भक्तीभाव लौकिक । हांसे तया घडे ब्रम्हहत्यापातक ॥३॥
जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥४॥
सदैव ज्यां कथाकाळी घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले ते पाषाण ॥५॥


३७५२
आम्ही गोवळीं रानटें । नव्हों जनांतील धीटें ॥१॥
सिदोरीचा करूं काला । एक वांटितों एकाला ॥ध्रु.॥
खेळों आपआपणांशीं । आमचीं तीं आम्हांपाशीं ॥२॥
म्हणे मिळाले नेणते । तुका कान्होबा भोंवते ॥३॥


२००१
आम्ही घ्यावे तुझे नाम । तुम्ही आम्हां द्यावे प्रमे॥१॥
ऐसे निवडिले मुळी । संतीं बैसोनि सकळीं ॥ध्रु
माझी डोयी पायावरी । तुम्ही न धरावी दुरी ॥२॥
तुका म्हणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥३॥


२३७५
आह्मीं जाणावें तें काई तुझें वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं ऐसें श्रुति बोलती ॥१॥
होई मज तैसा मज तैसा साना सकुमार हृषीकेशा । पुरवीं माझी आशा भुजा चारी दाखवीं॥ध्रु.॥
खालता सप्त ही पाताळा वरता स्वर्गाहूनि ढिसाळा । तो मी मस्यक डोळां कैसा पाहों आपला ॥२॥
मज असे हा भरवसा पढीयें वोसी तयां तैसा । पंढरीनिवासा तुका म्हणे गा विठोबा ॥३॥


८४१
आम्ही जाणों तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥१॥
फांकुं नेदूं चुकावितां । नेघों थोडें बहु देतां ॥ध्रु.॥
बहुता दिसाचें लिगाड । आलें होत होत जड ॥२॥
तुका म्हणे आतां । नेघो सर्वस्व ही देतां ॥३॥


१९२०
आम्ही जाणों तुझा भाव । कैचा भक्त कैचा देव । बीजा नाहीं ठाव । कैचे फळ शेवटीं ॥१॥
संपादिले बहु रूप । कैचे पुण्य कैचे पाप । नव्हतों आम्ही आप । आपणासी देखिले ॥ध्रु.॥
एके ठायीं घरच्याघरीं । न कळतां झाली चोरी । तेथे तेचि दुरी । जाणे याणे खुटंले ॥२॥
तुका म्हणे धरुनि हातीं । उरी ठेविली मागुती । एकांतीं लोकांतीं । देव भक्त सोहळा ॥३॥


३६२७
आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥
वाडवेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥
अंतकाळीं विठो आम्हांसी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ॥३॥


२३२१
आम्ही जालों एकविध । सुद्या सुदें असावें ॥१॥
यावरी तुमचा मोळा । तो गोपाळा अकळ ॥ध्रु.॥
घेतलें तें उसणें द्यावें । कांहीं भावें विशेषें ॥२॥
तुका म्हणे क्रियानष्ट । तरी कष्ट घेतसां ॥३॥


४२१
आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥१॥
तो हा देवांचा ही देव । काय कळिकाळाचा भेव ॥ध्रु.॥
वेद जया गाती। श्रुति म्हणती नेति नेति ॥२॥
तुका म्हणे निज । रूपडें हें तत्त्वबीज ॥३॥


२२
आम्ही जरी आस । जालों टाकोनि उदास ॥१॥
आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ध्रु.॥
भलते ठायीं पडों । देह तुरंगीं हा चढो ॥२॥
तुमचें तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ॥३॥
गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥४॥
तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥५॥


२४५२
आम्ही तुझ्या दासीं । जरि जावें पतनासी ॥१॥
तरि हें दिसे विपरीत । कोठें बोलिली हे नीत ॥ध्रु.॥
तुझें नाम कंठीं । आम्हां संसार आटी ॥२॥
तुका म्हणे काळ । करी आम्हांसी विटाळ॥३॥


३४२१
आम्ही तेणें सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मखीं ॥१॥
तुमचें येर वित्त धन । ते मज मृत्तिकेसमान ॥ध्रु.॥
कंठीं मिरावा तुळसी । व्रत करा एकादशी ॥२॥
म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥३॥


१५४८
आह्मीं देतों हाका । कां रे जालासी तूं मुका ॥१॥
न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ध्रु.॥
आधीं करूं चौघाचार । मग सांडूं भीडभार ॥२॥
तुका म्हणे शेवटीं । तुम्हां आम्हां घालूं तुटी ॥३॥


१३७८
आम्ही देव तुम्ही देव । मध्यें भेव अधीक ॥१॥
कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ध्रु.॥
भेडसाविलें हाके नादें । वोळखी भेदें मोडिली ॥२॥
तुका म्हणे उभा राहे । मागें पाहे परतोनि ॥३॥


१७०६
आम्ही न देखों अवगुणां । पापी पवित्र शाहाणा ॥१॥
अवघीं रूपें तुझीं देवा । वंदूं भावें करूं सेवा ॥ध्रु.॥
मज मुक्ती सवें चाड । नेणें पाषाण धातु वाड ॥२॥
तुका म्हणे घोटीं । विष अमृत तुजसाटीं ॥३॥


२०४५
आम्ही नाचों तेणें सुखें । वाऊं टाळी गातों मुखें॥१॥
देव कृपेचा कोंवळा । शरणागता पाळी लळा ॥ध्रु.॥
आम्हां जाला हा निर्धार । मागें तारिलें अपार ॥२॥
तुका म्हणे संतीं । वर्म दिलें आम्हां हातीं ॥३॥


२२१६
आह्मीं नामाचें धारक नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥
न लगे जाणावें नेणावें गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख घ्यावें वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥
भावबळें घालूं कास लज्जा चिंता दवडूं आस । पायीं निजध्यास म्हणों दास विष्णूचे ॥२॥
भय नाहीं जन्म घेतां मोक्षसुखा हाणों लाता । तुका म्हणे सत्ता धरूं निकट सेवेची ॥३॥


१८२०
आम्ही पतित म्हणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं ।
नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥१॥
आम्हां न तारावें तुम्ही काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥
अन्याय कोणाचा अंगीकार करणें । तया हातीं देणें लाज ते चि ।
काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥२॥
पोह्या अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी ।
नव्हे कीर्त कांहीं न माने लोकां । काय विटंबणा तैसी ॥३॥
प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष काई ।
तुका म्हणे तरी आम्हां का न कळे । तरलों किंवा आम्ही नाहीं ॥४॥


२५३२
आम्ही पापी तूं पावन । हें तों पूर्वापार जाण ॥१॥
नवें करूं नये जुनें । सांभाळावें ज्याचें तेणें ॥ध्रु.॥
मिरासीचा ठाव। राखी करोनि उपाव ॥२॥
वादें मारी हाका । देवा आइकवीतो तुका ॥३॥


६६९
आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हां लागे कोडें उगवणें ॥१॥
आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हातीं ॥ध्रु.॥
न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥२॥
दयासिंधु नाम पतितपावन । हें आम्हां वचन सांपडलें ॥३॥
तुका म्हणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूंम्ही चि देवा ॥४॥


२७६२
आम्ही पाहा कैसीं एकतत्त्व झालों । राखणे लागलों वासनेसी ॥१॥
तुम्हांविण कांहीं नावडावें या जीवा । केला तोचि देवा दृढ पण ॥ध्रु.॥
वर्म नेणों परि वृत्ती भंगों नेदुं । वंदिलें चि वंदूं आवडीनें ॥२॥
तुका म्हणे कले नामाचें जीवन । वारता ही भिन्न नेणों आतां ॥३॥


६०२
आम्ही बळकट झालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥१॥
जालें तुम्हां मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावे जाले ॥ध्रु.॥
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥२॥
तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥३॥


१९६२
आम्ही बोलों ते तुज कळे । एक दोहीं ठायी खेळे॥१॥
काय परिहाराचे काम । जाणे अंतरींचे राम ॥ध्रु.॥
कळोनिया काय चाड । माझी लोकांसी बडबड ॥२॥
कारण सवे ऐका । अवघे आहे म्हणे तुका ॥३॥


२१६३
आम्ही भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥१॥
होसी सरड बेडुक । वाघ गाढ्याही पाईक ॥ध्रु.॥
बळ करी तया भ्यावें । पळों लागे तया घ्यावें ॥२॥
तुका म्हणे दूर परता । नर नारी ना तूं भूता ॥३॥


२०१०
आम्हीं भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा पुढावा । पतना न्यावा दशरथ ॥१॥
तरी म्या काय गा करावे । कोण्या रीती तुज पावावे । न सांगतां ठावे । तुम्हां विण न पडे॥ध्रु.॥
दोनी फाकविल्या वाटा । गोवा केला घटापटा । नव्हे धीर फांटा । आड राने भरतीं ॥२॥
तुका म्हणे माझे डोळे । तुझे देखती हे चाळे । आतां येणे वेळे । चरण जीवे न सोडीं ॥३॥


२७७२
आम्ही भाविकें हे काय जाणों खोडी । आइकोनि प्रौढी विनविलें ॥१॥
नाहीं ऐसें येथें झालेती असतां । वाढविली चिंता अधिक सोस ॥ध्रु.॥
न कळे चि आधीं करितां विचार । न धरितां धीर आहाचता ॥२॥
तुका म्हणे आतां वचनें वचन । वाढले तीक्ष्ण बुद्धी झाली ॥३॥


३४७
आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भीतोसि पांडुरंगा ॥१॥
पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥
ॠद्धिसिद्धि तुझें मुख्य भांडवल । हें तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥२॥
तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निश्चिंत सुख भोगू ॥३॥


१२५८
आम्ही मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची मी ॥१॥
सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥
बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥२॥
पाप पुण्य ज्याचें तोचि जाणें कांहीं । संबंध हा नाहीं आम्हांसवें ॥३॥
तुका म्हणे तुम्ही आइका हो मात । आम्ही या अतीत देहाहूनी ॥४॥


२६८७
आम्ही म्हणों कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥
हागे माझ्या भोगें केलासी परता । विश्वंभरीं सत्ता नाहीं ऐसी ॥ध्रु.॥
आम्ही तुज असों देऊनि आधार । नाम वारंवार उच्चारितों ॥२॥
तुका म्हणे मज धरियेलें काळें । पंचभूतीं खळें करूनियां ॥३॥


७०७
आह्मीं याची केली सांडी । कोठें तोंडीं लागावें ॥१॥
आहे तैसा असो आतां । चिंतें चिंता वाढते ॥ध्रु.॥
बोलिल्याचा मानी सीण । भिन्न भिन्न राहावें ॥२॥
तुका म्हणे आम्हांपाशीं । धीराऐसी जतन ॥३॥


२९६९
आम्ही विठ्ठलाचे दास झालों आतां । न चलेचि सत्ता आणिकांची ॥१॥
नावरे तयासी ऐसें नाहीं दुजें । करितां पंढरिराजें काय नव्हे ॥ध्रु.॥
कोठें तुज ठाव घ्यावयासी धांवा । मना तूं विसावा घेईं आतां ॥२॥
इंद्रियांची वोढी मोडिला व्यापार । ज्या अंगें संचार चाली तुज ॥३॥
तुका म्हणे आम्ही जिंकोनियां काळ । बैसलों निश्चळि होऊनियां ॥४॥


९९९
आम्ही वीर झुंझार । करूं जमदाढे मार । थापटिले भार । मोड जाला दोषांचा ॥१॥
जाला हाहाकार । आले हांकीत झुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठीं हार तुळसीचे ॥ध्रु.॥
रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाण । गरुडटके पताका ॥२॥
तुका म्हणे काळ । जालों जिंकोनि निश्चळ । पावला सकळ । भोग आम्हां आमुचा ॥३॥


२३६
आम्ही वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताया ॥१॥
झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥
अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मन । साधनें बुडविलीं ॥२॥
पिटूं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जय जयकार आनंदें ॥३॥


६०६
आम्ही शक्तीहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥१॥
माझें मज देई देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥
नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तें चि माझें तोंड । चौघां चार खंड । लांबणी हे अनुचित ॥२॥
नाहीं येत बळा । आतां तुह्मासी गोपाळा । तुका म्हणे गळा । उगवा पायां लागतों ॥३॥


३५
आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके । जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥१॥
नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा । थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥
अक्षय साचार । केलें सायासांनी घर । एरंडसिंवार । दुजा भार न साहती ॥२॥
धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी । जतन तीं करी । कोण गुरें वासरें ॥३॥
जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती । झुळझुळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥४॥
तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा । कुटुंबाची सेवा । तोचि करी आमुच्या ॥५॥


१५०७
आम्ही सर्वकाळ कैंचीं सावधान । व्यवसायें मन अभ्यासलें ॥१॥
तरी म्हणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥
याच कानसुली मारीतसे हाका । मज घाटूं नका मधीं आतां ॥२॥
तुका म्हणे निद्रा जागृति सुषुप्ति । तुम्ही हो श्रीपती साक्षी येथें ॥३॥


२२१७
आम्ही हरीचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे पाठीसवें वागविलों ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाहीं ।देवा आम्हां एकदेहीं । नाहीं जालों कहीं। एका एक वेगळे ॥ध्रु.॥
निद्रा करितां होतों पायीं। सवें चि लंका घेतली तई । वान्नरें गोवळ गाई। सवें चारित फिरतसों ॥२॥
आम्हां नामाचें चिंतन ।राम कृष्ण नारायण। तुका म्हणे क्षण खातां जेवितां न विसंबो ॥३॥


९८२
आम्ही क्षेत्रींचे संन्यासी । देहभरित हृषीकेशी । नाहीं केली ऐशी । आशाकामबोहरी ॥१॥
आलें अयाचित अंगा । सहज तें आम्हां भागा । दाता पांडुरंगा । ऐसा करितां निंश्चिती ॥ध्रु.॥
दंड धरिला दंडायमान । मुळीं मुंडिलें मुंडण । बंद बंदाचि कौपीन । बहिरवास औटडें ॥२॥
काळें साधियेला काळ । मन करूनि निश्चळ । लौकिकीं विटाळ । धरूनि असों ऐकांत ॥३॥
कार्यकारणाची चाली । वाचावाचत्वें नेमिली । एका नेमें केली । स्वरूपींच वोळखी ॥४॥
नव्हे वेषधारी । तुका आहाच वरीवरी । आहे तैसीं बरीं । खंडें निवडि वेदांची ॥५॥


२५१८
आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौनचि ॥१॥
नये कांहीं वेचूं वाणी । वेडे घाणीसांगातें ॥ध्रु.॥
वेगळें तें देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥२॥
तुका म्हणे कवतुक केलें । किंवा भलें दवडितां ॥३॥


१९०१
आळवितां कंठ शोकला भीतर । आयुष्य वेचे धीर नाहीं मना ॥१॥
अझूनी कां नये हें तुझ्या अंतरा । दिनाच्या माहेरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
धन दिसे डोळा दगडाचे परी । भोग ते शरीर विष जाले ॥२॥
चुकलों काय ते मग क्षमा करीं । आळींगुनी हरी प्रमे द्यावे ॥३॥
अवस्था राहिली रूपाची अंतरीं । बाहेर भीतरी सर्व काळ ॥४॥
तुका म्हणे माझे सकळ उपाय । पांडुरंगा पाय तुझे आतां ॥५॥


९९५
आळविती बाळें । मातेतें सुख आगळें ॥१॥
द्यावें आवडी भातुकें । पाहे निवे कवतुकें ॥ध्रु.॥
लेववूनि अळंकार । दृष्टी करावी सादर ॥२॥
आपुलिये पदीं । बैसवूनि कोडें वंदी ॥३॥
नेदी लागों दिठी । उचलोनि लावी कंठीं ॥४॥
तुका म्हणे लाभा । वारी घ्या वो पद्मनाभा ॥५॥


१०५४
आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥१॥
यें वो यें वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दें गे ॥ध्रु.॥
पसरूनि चोंची । वचन हें करुणेची ॥२॥
तुका म्हणे बळी । आम्ही लडिवाळें आळीं ॥३॥


३१२६
आळस आला अंगा । धांव घालीं पांडुरंगा ॥१॥
सोसूं शरीराचे भाव । पडती अवगुणाचे घाव ॥ध्रु.॥
करावीं व्यसनें । दुरी येउनि नारायणें ॥२॥
जवळील दुरी । झालों देवा धरीं करीं ॥३॥
म्हणउनि देवा । वेळोवेळां करीं धावा ॥४॥
तुका म्हणे पांडुरंगा । दुरी धरूं नका अंगा ॥५॥


१२४८
आळस पाडी विषयकामीं । शक्ती देई तुझ्या नामीं॥१॥
आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गर्जो द्यावी गुणीं ॥ध्रु.॥
हे चि विनवणी विनवणी । विनविली धरा मनीं ॥२॥
तुका म्हणे पाय डोळां । पाहें एरवी अंधळा ॥३॥


२९४३
आळिकरा कोठें साहातें कठिण । आपुला तें प्राण देऊं पाहे ॥१॥
सांभाळावें मायबापें कृपादृष्टी । पीडितां तो दृष्टी देखों नये ॥ध्रु.॥
अंतरलों मागें संवसारा हातीं । पायांपें सरतीं झालों नाहीं ॥२॥
तुका म्हणे तुम्ही विचारा जी देवा । ठेवाल तें ठेवा कोणी परी ॥३॥


२२५५
आळीगन कंठाकंठीं । पडे मिठी सर्वांगें ॥१॥
न घडे मागें परतें मन । नारायण संभोगी ॥ध्रु.॥
वचनासी वचन मिळे। रिघती डोळे डोळियांत ॥२॥
तुका म्हणे अंतर्ध्यानीं । जीव जीवनीं विराल्या ॥३॥


१३८३
आळी करावी ते कळतें बाळका । बुझवावें हें कां नेणां तुम्ही ॥१॥
निवाड तो तेथें असे पायांपाशीं । तुम्हांआम्हांविशीं एकेठायीं ॥ध्रु.॥
आणीक तों आम्ही न देखोंसें जालें । जाणावें शिणलें भागलेंसें ॥२॥
तुका म्हणे तुम्हां लागतें सांगावें । अंतरींचें ठावें काय नाहीं ॥३॥


७२६
आली सलगी पायांपाशीं । होईल तैसी करीन ॥१॥
आणीक आह्मीं कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥
अवघ्या निरोपणा भाव । हाचि ठाव उरलासे ॥२॥
तुका म्हणे पाळीं लळे। कृपाळुवे विठ्ठले ॥३॥


२१३९
आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥१॥
भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरी डोई येथुनें चि॥ध्रु.॥
येणें जाणें हें तों उपाधीचे मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥२॥
तुका म्हणे असें चरणींचा रज । पदीं च सहज जेथें तेथें ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या