संत तुकाराम गाथा १९ अनुक्रमणिका नुसार
क्ष
३४२९
क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥
सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥२॥
तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥
१३८२
क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥१॥
येई वो येई वो येई लवलाहीं । आलिंगुनि बाहीं क्षेम देई ॥ध्रु.॥
उताविळ मन पंथ अवलोकी । आठवती चुकी काय जाली ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडीं वेगी ॥३॥
८८१
क्षणक्षणां सांभाळितों । साक्षी होतों आपुला ॥१॥
न घडावी पायीं तुटी । मन मिठी घातली ॥ध्रु.॥
विचारतों वचनां आधीं । धरूनि शुद्धी ठेविली ॥२॥
तुका म्हणे मागें भ्यालों । तरीं जालों जागृत ॥३॥
२५२३
क्षणक्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥
नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ध्रु.॥
संतासमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमार्थी ॥२॥
तुका म्हणे इहलोकींच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरूनि राहों ॥३॥
३११३
क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥
तृण नाहीं तेथें पडिला दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥
तुका म्हणे क्षमा सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥३॥
८९४
क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयानें जग दुरी धरा ॥१॥
तैसे आम्ही नेणों पालटोंचि कांहीं । त्यागिल्याची नाहीं मागें चाड ॥ध्रु.॥
प्रतिपादिता तूं समविषमाचा । प्रसाद तो याचा पापपुण्य ॥२॥
तुका म्हणे तुम्हां नाना अवगणीं । लागे संपादणी लटिक्याची ॥३॥
२७१८
क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपण चि खेळे आपणाशीं ॥ ॥
मधील ते वाव अवघी उपाधि । तुम्हां आम्हांमधीं ते चि परी ॥ध्रु.॥
घट मठ झाले आकाशाचे पोटीं । वचनें चि तुटी तेथें चि तें ॥ ॥
तुका म्हणे बीजें बीज दाखविलें । फल पुष्प आलें गेलें वांयां ॥३॥
२३१०
क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥१॥
समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां भलतेथें ॥ध्रु.॥
अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन तें ॥२॥
तुका म्हणे नेणें समयो ठाया ठाव । राहाडी ते वाव नरकाडी ॥३॥
३२१०
क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नाठवे । पहावया धांवें कोल्हांटासी ॥१॥
कथेसी साक्षेपें पाचारिला जरी । म्हणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥ध्रु.॥
बलत्कारीं जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसी टेंकूनियां ॥२॥
तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
३०४०
क्षुधारथी अन्नें दुष्काळें पीडिलें । मिष्टान्न देखिलें तेणें जैसें ॥१॥
तैसें तुझे पायीं लांचावलें मन । झुरे माझा प्राण भेटावया ॥ध्रु.॥
मांजरें देखिला लोणियांचा गोळा । लावुनियां डोळा बैसलेंसे ॥२॥
तुका म्हणे आतां झडी घालूं पाहें । पांडुरंगे माये तुझे पायीं ॥३॥
२११४
क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥१॥
धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ध्रु.॥
द्रव्य आणि कन्या । येथें कुळ कर्म शोधण्या ॥२॥
तुका म्हणे पुण्य गांठी । तरिच उचिताची भेटी ॥३॥
१६८८
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥१॥
आतां झडझडां चालें । देई उचलूं पाउलें ॥ध्रु.॥
सांडीं हंसगती । बहु उत्कंठा हे चित्तीं ॥२॥
तुका म्हणे आई । श्रीरंगे विठाबाई ॥३॥
३५८१
क्षेम मायबाप पुसेन हें आधीं । न घलीं हें मधीं सुख दुःख ॥१॥
न करीं तांतडी आपणांपासूनि । आइकेन कानीं सांगतीं तें ॥ध्रु.॥
अंतरींचें संत जाणतील गूज । निरोप तो मज सांगतील ॥२॥
पायांवरी डोई ठेवीन आदरें । प्रीतिपडिभरें आळींगून ॥३॥
तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओवाळून सांडीं त्यांवरून ॥४॥
२७७८
क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥१॥
क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडीता आवडीची ॥ध्रु.॥
शिकवूं जाणे तें गोमाटियासाठी । लोभें नाहीं तुटी निश्चियेंसी ॥२॥
अघवें चि मिथ्या समया आरतें । देता तो उचितें काय जाणे ॥३॥
न करी वेव्हार गांजूं नेदी कोणा । भेडसावी तान्हें हाऊ आला ॥४॥
तुका म्हणे करी जिवासी जतन । दचकूनि मन जवळी आणी ॥५॥
ह
१६२
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥
करोनी उड्डाण । केलें लंकेचें शोधन ॥२॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥
३६८४
हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्यांशीची ॥१॥
पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडी तें विसरलें । डाई पडिलें आपणची ॥ध्रु.॥
दुसर्या पहारा महा आनंदें । हमामा घाली छंदछंदें । दिस वाडे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥२॥
तिसर्या पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे स्थिर । सोसे सोस करितां डाईं पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥३॥
चौथ्या पहारा हमामा । घालिसी कांपविसी हातपाय । सुर्यापाटिलाचा पोर यम्या । त्यांचे पडलीस डाईं रे ॥४॥
हमामा घालितां भ्याला तुका । त्यानें सांडिली गड्याची सोई । यादवांचा मूल एक । विठोबा त्यासवें चारितो गाई रे ॥५॥
३२८८
हरिःॐ तत्सदिति सूत्राचें जें सार । कृपेचा सागर पांडुरंग ॥१॥
हरिःॐ दत्त उदात्त अनुदात्त । प्रचुररहित पांडुरंग ॥ध्रु.॥
सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळें । वेदाचें जें मूळ तुका म्हणे ॥२॥
१८५०
हरीकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची ॥१॥
म्हणोनि हिंडे मागें मागें । घरटी जागे घालितसे ॥ध्रु.॥
निर्लज्ज भोजें नाचे रंगीं । भरतें अंगीं प्रेमाचें ॥२॥
तुका म्हणे विकलें देवें । आपण भावें संवासाठी ॥३॥
३४०७
हरीकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥१॥
त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचें बीळ ॥ध्रु.॥
सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥२॥
तुका म्हणे पिसीं । वांयां गेलीं किती ऐसीं ॥३॥
३४०३
हरीकथेवांचून इच्छिती स्वहित । हरीजन चित्त न घला तेथें ॥१॥
जाईल भंगोन आपुला विश्वास । होईल या नास कारणांचा ॥ध्रु.॥
ज्याचिया बैसावे भोजनपंगती । त्याचिया संगती तैसे खावें ॥२॥
तुका म्हणे काय झालेती जाणते । देवा ही परते थोर तुम्ही ॥३॥
३७६५
हरी गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥
भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥
योगियांच्या ध्याना नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥२॥
तुका म्हणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास हाका मारी ॥३॥
३०५८
हरीचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥
न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥
असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ॥२॥
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥३॥
१७१४
हरीची हरीकथा नावडे जया । अधम म्हणतां तया वेळ लागे ।
मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥१॥
कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं ।
उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परि न धरी लंड लाज कांहीं ॥ध्रु.॥
ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी ।
देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥२॥
राम म्हणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी ।
जन्मोजन्मींचा होईल नरकीं । तुका म्हणे चुकी जरी यासी ॥३॥
१५४३
हरीचे नाम कदाकाळी कां रे नये वाचे । म्हणतां रामराम तुझ्या बाचे काय वेंचे ॥१॥
पोटासाठी खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणतां तुझी बसली दात खीळ ॥ध्रु.॥
द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती ॥२॥
तुका म्हणे ऐशा जीवा काय करूं आता । रामराम न म्हणे त्याचा गाढव माता पिता ॥३॥
१२
हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥१॥
कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाठी ॥२॥
ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥२॥
तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥
२५४६
हरीच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥१॥
कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ध्रु.॥
सरती येणें आटाआटी । नाहीं तुटी लाभाची ॥२॥
तुका म्हणे समाधान । सदा मन आमुचें ॥३॥
१७३०
हरीच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥१॥
राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥
हरीच्या दासां चिंता । अघटित हे वार्ता ॥२॥
खावे ल्यावें द्यावें । तुका म्हणे पुरवावें ॥३॥
१०६१
हरीजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥
रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तं अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥
दुर्वास हा छळों आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥२॥
द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केलें ॥३॥
न साहे चि बब्रु पांडवां पारिखा । दुराविला सखा बिळभद्र ॥४॥
तुका म्हणे अंगीं राखिली दुगपधि । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥५॥
३२०३
हरीजना प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं झालों ॥१॥
म्हणियें सत्वर करीन सांगतां । घेईन मी देतां शेष त्यांचें ॥ध्रु.॥
आस करूनियां राहेन अंगणीं । उच्छीष्ठाची धणी घ्यावयासी ॥२॥
चालतां ते मार्गी चरणीचे रज । उडती सहज घेइन आतां ॥३॥
दुरि त्यांपासूनि न वजें दवडितां । तुका म्हणे लाता घेइन अंगे ॥४॥
१०८
हरी तूं निष्ठुर निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥१॥
घेऊनि हरीश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥
नळा दमयंतीचा योग । विघडिला त्यांचा संग । ऐसें जाणे जग । पुराणें ही बोलती ॥२॥
राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दया भूतीं । तुळविलें अंतीं । तुळें मास तयाचें ॥३॥
कर्ण भिडता समरंगणीं । बाणीं व्यापियेला रणीं । मागसी पाडोनी । तेथें दांत तयाचे ॥४॥
बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर । करूनि काहार । तो पाताळीं घातला ॥५॥
श्रियाळाच्या घरीं । धरणें मांडिलें मुरारी । मारविलें करीं । त्याचें बाळ त्याहातीं ॥६॥
तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाहीं पुढती । तुका म्हणे करिसी तें ॥७॥
४०५४
हरी तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥
धरूनि पाय तजिलें जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठीं नाम अमृताचें पान। न लागे आन ऐसें जालें ॥ध्रु.॥
वाव तरी उदंड च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । वेठी तरी गिहे राबवीती ॥२॥
बळें तरि नांगवती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥३॥
संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास । रिद्धीसिद्धी देशटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥४॥
जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका म्हणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमा अमृताची ॥५॥
३२२२
हरीदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥१॥
म्हणसी कांहीं मागा । हें चि देगा पांडुरंगा ॥ध्रु.॥
संतां लोटांगणीं । जातां लाजों नको मनीं ॥२॥
तुका म्हणे अंगीं । शक्ती देई नाचें रंगीं ॥३॥
२५८५
हरीनाम वेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार वोल्हावली ॥१॥
तेथें माझ्या मना होई पक्षिराज । साधावया काज तृप्तीचें या ॥ध्रु. ॥
मुळींचिया बीजें दाखविली गोडी । लवकर चि जोडी झालियाची ॥२॥
तुका म्हणे क्षणक्षणां जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥३॥
१०२८
हरीनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥१॥
फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥
हरीनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥२॥
हरीनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें कळिकाळ ॥३॥
येणें चि बळें सरते आम्ही । हरीचे नामें लोकीं तिहीं ॥४॥
तुका म्हणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥५॥
३७८५
हरीनें माझें हरीलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥
आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥
पारखियांसी सांगतां गोटी । घरची कुटी खातील ॥२॥
तुका म्हणे निवांत राहीं । पाहिलें पाहीं परतुनी ॥३॥
३७७६
हरीबिन रहियां न जाये जिहिरा । कबकी थाडी देखें राहा ॥१॥
क्या मेरे लाल कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥ध्रु.॥
कोई सखी हरी जावे बुलावन । बार हि डारूं उसपर तन ॥२॥
तुका प्रभु कब देखें पाऊं । पासीं आऊं फेर न जाऊं ॥३॥
१५५७
हरीभक्ती माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥१॥
अंतकाळीं येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणें देइन त्यांसी ॥ध्रु.॥
आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवांचोनि नाहीं मज ॥२॥
देइन आलिंगण धरीन चरण । संवसारशीण नासे तेणें ॥३॥
कंठीं तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥४॥
तयांचे चरणीं घालीन मी मिठी । चाड ही वैकुंठीं नाहीं मज ॥५॥
आळसें दंभें भावें हरीचें नाम गाती । ते माझे सांगाती परलोकींचे ॥६॥
कायावाचामनें देइन क्षेम त्यासी । चाड जीवित्वासी नाहीं मज ॥७॥
हरीचें नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणी वरी ॥८॥
तुका म्हणे तया उपकारें बांधलों। म्हणऊनि आलों शरण संतां ॥९॥
३४९१
हरीसुं मिल दे एक हि बेर । पाछे तूं फेर नावे घर ॥१॥
माल सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥ध्रु.॥
हरीसुख मोहि कहिया न जाय । तव तूं बुझे आगोपाय ॥२॥
देखहि भाव कछु खरि हात । मिला तुका प्रभुसात ॥३॥
११७९
हरी म्हणतां गति पातकें नासती । किळकाळ कांपती हरी म्हणतां ॥१॥
हरी म्हणतां भुक्ती हरी म्हणतां मुक्ती । चुके यातायाती हरी म्हणतां ॥ध्रु.॥
तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरी म्हणतां ॥२॥
तुका म्हणे भावें जपा हरीचें नाम । मग काळयम शरण तुह्मा ॥३॥
३८०७
हरीरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥
अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥ध्रु.॥
वाचा वाच्यत्वासि न ये । कोठें काय करावें ॥२॥
तुका म्हणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥३॥
३४६६
हरीहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥१॥
ऐका त्यांची विटंबणा । देवपणा भक्तांची ॥ध्रु.॥
अंगीं कवडे घाली गळां । परडी कळाहीन हातीं ॥२॥
गळां गांठा हिंडें दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥३॥
माथां सेंदुर दांत खाती । जेंगट हातीं सटवीचें ॥४॥
पूजिती विकट दौंद । पशु सोंड गजाची ॥५॥
ऐशा छंदें चुकलीं वाटा । भाव खोटा भजन ॥६॥
तुका म्हणे विष्णुशिवा । वांचुनि देवा भजती ते ॥७॥
९९
हरीहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥
एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥
भेदकासी नाड । एक वेलांटीच आड ॥२॥
उजवें वामांग । तुका म्हणे एक चि अंग ॥३॥
६९४
हरी हरी तुह्मीं म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल ॥१॥
आणिका नका कांहीं गाबाळाचे भरी । पडों येथें थोरी नागवण ॥ध्रु.॥
भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावा पतित वेळोवेळां ॥२॥
तुका म्हणे हा तंव कृपेचा सागर । नामासाठी पार पाववील ॥३॥
३१२१
हरी तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥
अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देई हें चि ॥२॥
तुका म्हणे आतां देई संतसंग । तुझे नामीं रंग भरो मना ॥३॥
३७९०
हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥
उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥
तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचें बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥
मज ते हांसतील जन । धिक्कारिती मज देखोन । अंगीं तुझें देखोनि लक्षण । मग विटंबणा होईल रे ॥३॥
तुज तव लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं काहीं । कसी भीड नाहीं तुज माझी ॥४॥
वचन मोडी नेदी हात । कळलें न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥५॥
हा
३६७३
हारस आनंदाचा । घोष करा हरीनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥
पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥
काय पाहातां हे भाई । हरुषें नाचा धरा घाई । पोटभरी कांहीं । घेतां उरी कांहीं ठेवा ॥२॥
जें सुख दृष्टी आहे । तें च अंतरीं जो लाहे । तुका म्हणे काय । कळिकाळ तें बापुडें ॥३॥
४१३
हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥
करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥
तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥
२११८
हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी ॥१॥
ऐसे अनावर गुण । आवरावे काय ह्मुण ॥ध्रु.॥
नाहीं जरी संग । तरी बडबडविती रंग ॥२॥
तुका म्हणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥३॥
२२०२
हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥
अतेता समय नेणतां अवकळा । येऊं नये बाळा सिक धरा ॥ध्रु.॥
भोजनसमयीं ओकाचा आठव । ठकोनियां जीव कष्टी करी ॥२॥
तुका म्हणे किती सांगावे उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥३॥
१३४४
हा गे आलों कोणी म्हणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥१॥
तुम्ही तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥
भुकेलियां आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥२॥
तुका म्हणे दिली चिंतामणीसाठी । उचित कांचवटी दंडवत ॥३॥
१५८९
हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥१॥
केला ॠणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥ध्रु.॥
घालोनियां भार माथा । अवघी चिंता वारली ॥२॥
तुका म्हणे वचनासाठी । नाम कंठीं धरियेले ॥३॥
३७४८
हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती ॥१॥
देवें दिला खातों भाग । कराल तर करा लाग ॥ध्रु.॥
धालें ऐसें पोट । वरी करूनियां बोभाट ॥२॥
तुका म्हणे घरीं । मग कैंच्या जी या परी ॥३॥
२८६५
हा गे हाचि आतां लाहो । माझा अहो विठ्ठला ॥१॥
दंडवत दंडवत । वेगळी मात न बोलें ॥ध्रु.॥
वेगळाल्या कोठें भागें । लाग लागें लावावा ॥२॥
तुका म्हणे केल्या जमा । वृत्ति क्षमा भाजूनि ॥३॥
३४२४
हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी झालें पट्टराणी बळें । वरीलें सांवळें परब्रम्ह ॥२॥
बळियाचा अंगसंग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥
५६९
हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥१॥
बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥
जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥२॥
तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥३॥
तुका म्हणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥४॥
३०६०
हाचि माझा नेम धरिला हो धंदा । यावरी गोविंदा भेटी द्यावी ॥१॥
हाचि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥
डोळियांची भूक पहातां श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥२॥
बहु चित्त ओढे तयाचिये सोई । पुरला हाकांहीं नवसे नेणें ॥३॥
बहुबहु काळ झालों कासावीस । वाहिले बहुवस कलेवर ॥४॥
तुका म्हणे आतां पाडावें हें ओझें । पांडुरंगा माझें इयावरी ॥५॥
९०५
हातीं घेऊनियां काठी । तुका लागला कलेवरा पाठी ॥१॥
नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥ध्रु.॥
काढिलें तें ओढें । मागील उपचाराचें पुढें ॥२॥
नाहीं वाटों आला भेव । सुख दुःख भोगिता देव ॥३॥
याजसाठी हें निर्वाण । केलें कसियेलें मन ॥४॥
तुका म्हणे अनुभव बरा । नाहीं तरी हस्त पाय चोरा ॥५॥
४०६१
हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥
बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ झाला ॥ध्रु.॥
येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥२॥
मरती मेलीं नेणों किती । तोचि लाभ तयाचे संगती । म्हणोनि येतों काकुलती । धीर तोचित्तीं दृढ द्यावा ॥३॥
सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥४॥
आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्ट चि पतित । तुका म्हणे मज संत हांसती ॥५॥
१२९५
हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥१॥
ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥
देव ना संसार । दोहीं ठायीं नाहीं थार ॥२॥
तुका म्हणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥३॥
१४४
हातीं होन दावितींवेणा । करिती लेंकीची धारणा ॥१॥
ऐसे धर्म जाले कली । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥
टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥३॥
बैसोनियां तक्तां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥४॥
मुदबख लिहिणें । तेल तुप साबण केणें ॥५॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥६॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥८॥
अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥९॥
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥
२८०८
हा तों नव्हता दीन । टाळायाच्या ऐसा क्षण ॥१॥
कां जी नेणों राखा हात । कैसें देखावें रडत ॥ध्रु.॥
दावूनियां आस । दूर पळविता काशास ॥२॥
तुका म्हणे धांव । येतां न पुरे चि हांव ॥३॥
१३२४
हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥१॥
विश्वंभरें विश्व सामाविलें पोटी । तेथें चि सेवटीं आम्ही असों ॥ध्रु.॥
नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥२॥
तुका म्हणे माझ्या स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥३॥
१२३१
हारपल्याची नका चित्तीं । धरूं खंती वांयां च ॥१॥
पावलें तें म्हणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥
होणार तें तें भोगें घडे । लाभ जोडे संकल्पें ॥२॥
तुका म्हणे मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥३॥
२८९६
हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखों ॥१॥
नारायणीं वसलें घर । निरंतर आनंद ॥ध्रु.॥
अवघा रुधविला ठाव । नेला वाव मी माझें ॥२॥
तुका म्हणे एके ठावीं । असूं नाहीं क्षणभिन्न ॥३॥
१८६७
हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट ॥१॥
मग तयाच्या आधारें । करणें अवघें चि बरें ॥ध्रु.॥
सुख दुःख साहे । हर्षोमर्षी भंगा नये ॥२॥
तुका म्हणे जीवें । आधीं मरोनि राहावें ॥३॥
३४३३
हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥
सेवासुखें करूं विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥
तुका म्हणे आम्ही झालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥
हि ही हु हुं
२८७१
हित जाणे चित्त । कळों येतसे उचित ॥१॥
परिहार ते संपादणी । सत्य कारण कारणीं ॥ध्रु.॥
वरदळ तें नुतरे कसीं । आगीमध्यें तें रसीं ॥२॥
तुका म्हणे करुनी खरें । ठेवितां तें पुढें बरें ॥३॥
१९३५
हित तें हें एक राम कंठीं राहे । नाठविती देहभाव देही ॥१॥
हाचि एक धर्म निज बीजवर्म । हें चि जाळी कर्में केलीं महा ॥ध्रु.॥
चित्त राहे पायीं रूप बैसे डोळां । जीवें कळवळा आवडीचा ॥२॥
अखंड न खंडे अभंग न भंगे । तुका म्हणे गंगे मिळणी सिंधु ॥३॥
२६५३
हित नाही ठावे जननी जनका । दाविला लौकीकचार तीही ॥१॥
अंधळ्याचे काठी लागले अंधळे । घात एक वेळे पुढे मागे ॥ध्रु॥
न धरावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥२॥
तुका म्हणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहाती ॥३॥
१७१२
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥
आवडी विठ्ठल गाईजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥
आणीकां अंतरीं निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥२॥
तुका म्हणे बाण हाचि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥३॥
१२६२
हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥१॥
बळें हे वारावे आडरान करितां । अंधळें चालतां आडरानें ॥ध्रु.॥
द्रव्य देऊनियां धाडावें तीर्थासी । नेदावें चोरासी चंद्रबळ ॥२॥
तुका म्हणे ऐसें आहे हें पुराणीं । नाहीं माझी वाणी पदरींची ॥३॥
१२४१
हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥१॥
नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥ध्रु.॥
केली अटाअटी । अक्षरांची देवासाठी ॥२॥
तुका म्हणे खिजों । नका जागा येथें निजों ॥३॥
२५
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥१॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥
मोहरा होय तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥२॥
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥३॥
३९७७
हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥१॥
तैसा दिसे नारायण । मुख सुखाचे मंडण ॥ध्रु.॥
कोटि चंद्रलीळा । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥२॥
तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी ते न ये ॥३॥
५१३
हींच त्यांचीं पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥१॥
कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु.॥
हा च काळ वर्तमान । समाधान ही संपत्ती ॥२॥
तुका म्हणे दिवसरातीं । हें चि खाती अन्न ते ॥३॥
११६५
हीन माझी याति । वरी स्तुती केली संतीं ॥१॥
अंगीं वसूं पाहे गर्व । माझें हरावया सर्व ॥ध्रु.॥
मी एक जाणता । ऐसें वाटतसे चित्ता ॥२॥
राख राख गेलों वांयां । तुका म्हणे पंढरीराया ॥३॥
१३७९
हीन शुर बुद्धीपासीं । आकृतीसी भेद नाहीं ॥१॥
एक दांडी एक खांदी । पदीं पदीं भोगणें ॥ध्रु.॥
एकाऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती ॥२॥
तुका म्हणे भूमी खंडे । पीक दंडे जेथें तें ॥३॥
२७६७
हुंदकी पिसवी हलवीता दाढी । माळे मणी ओढी निंदेचीते ॥१॥
त्याचें फळ पाकीं यमाचे ते दंड । घर केलें कुंड कुंभपाकी ॥ध्रु.॥
क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥२॥
तुका म्हणे स्नान केलें मळमूत्रें । जेविलीं पितरें अमंगळें ॥३॥
२४२०
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥१॥
गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥
चोरोनियां खाये दुध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥२॥
निष्काम तो झाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥३॥
जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥४॥
तुका म्हणे हें चि चैतन्यें सावळें । व्यापुनि निराळें राहिलेंसे ॥५॥
३५०८
हू दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिई लंका ॥ध्रु.॥
गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥१॥
वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥२॥
स्तंभ फोड पेट चिरीया कसेपका । प्रल्हाद के लियें कहे भाई तुका ॥३॥
१५०९
हें का आम्हां सेवादान । देखों सीण विषमाचा ॥१॥
सांभाळा जी ब्रीदावळी । तुह्मीं कां कलीसारिखे ॥ध्रु.॥
शरणागत वैऱ्या हातीं । हे निश्चिंती देखिली ॥२॥
तुका म्हणे इच्छीं भेटी । पाय पोटीं उफराटे ॥३॥
३७३७
हे चि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनियां गोपाळकाला सेवूं ॥१॥
वोरसलें कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आइतें गगनभरी ॥ध्रु.॥
संत सनकादिक गोमट्या परवडी । विभाग आवडी इच्छेचिये ॥२॥
तुका म्हणे मधीं घालूं नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळें ॥३॥
१३०५
हें चि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो॥१॥
घ्यावी माझ्या हातें सेवा । हे चि देवा विनवणी ॥ध्रु.॥
आणीक कांहीं न घलीं भार । बहुत फार सांकडें ॥२॥
तुका तुमचा म्हणवी दास । त्याची आस पुरवावी ॥३॥
हे हें हो
३८९
हे चि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥१॥
अवघीं तुझींच हें पदें । नमस्कारीन अभेदें ॥ध्रु.॥
न वजिऩतदिशा । जाय तेथें चि सरिसा ॥२॥
नव्हे एकदेशी । तुका म्हणे गुणदोषीं ॥३॥
११९१
हे चि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥
वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥
तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥
२२२२
हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥
न लगे मुक्ती आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥
तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावें आह्मासी ॥३॥
४०५०
हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥१॥
सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥
भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान । तरीं च घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥२॥
नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥३॥
पास तें एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी । होईल गुसिळलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥४॥
न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा । होसिल मागें होतासि तैसा । तुका म्हणे दशा भोगीं वैराग्य ॥५॥
१२६०
हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपै ॥१॥
सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥
दुरील जवळी आपण चि होतें । कवळिलें चित्तें जिवापासीं ॥२॥
तुका म्हणे नाम घेतों वेळोवेळां । होतील सकळा शीतळा नाडी ॥३॥
३२३४
हेचि माझें चित्ती । राहो आता भावप्रीती । विठ्ठल सुषुप्ती । जागृती स्वप्नासी ॥१॥
आणिक नाही मागणें । राज्यचाड संपत्ती धनें । जिव्हे सुख तेणें । घेता देई नाम तुझे ॥ध्रु.॥
तुझें रूप सर्वाठायी । देखे ऐसे प्रमे देई । ठेवावा पायी । अनुभव चित्ताचा ॥२॥
जन्ममरणाचा बाध । समूळूनि तुटो कंद । लागो हाची छंद । हरी गोविंद वाचेसी ॥३॥
कायापालटे दर्शनें । अवघे कोंदाटे चैतन्य । जीवशिवखंडण । होय तरे चिंतिता ॥४॥
तुका म्हणे याची भावे । आम्ही धालो तुझ्या नांवे । सुख होत जन्मे । भलतेयाती भलतैसी ॥५॥
२९१५
हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥१॥
हें चि माझें तीर्थ हें चि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ध्रु.॥
हें चि माझा कर्म हाचि माझें धर्म । हाचि नित्यनेम नाम तुझें ॥२॥
हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ । हें चि तपध्यान नाम तुझें ॥३॥
हाचि कुळाचार हाचि कुळधर्म । हाचि नित्यनेम नाम तुझें ॥४॥
हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझें ॥५॥
तुका म्हणे दुजें सांगायासि नाहीं । नामेंविण कांहीं धनवित्त ॥६॥
६२९
हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥१॥
येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥
सांभाळिलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥२॥
जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥३॥
२१९०
हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥१॥
धीर उदारीं व निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें नांव ॥ध्रु.॥
हाचि होईजेल याचिया विभागें । अनुभववी अंगें अनुभविल्या ॥२॥
जोडे तयाचे कां न करावे सायास । जाला तरि अळस दीनपणे ॥३॥
फावल्यामागें कां न घालावी धांव । धरिल्या तरि हांव बळ येतें ॥४॥
तुका म्हणे घालूं खंडीमध्ये टांक । देवाचें हें एक करुनी घेऊं ॥५॥
२८३४
हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं येत बळा ॥१॥
धीर करावा करावा । तरी तो आहे आम्हां देवा ॥ध्रु.॥
रिघावें पोटांत । पायां पडोन घ्यावा अंत ॥२॥
तुका म्हणे वरी । गोडा आणावा उत्तरीं ॥३॥
२९३७
हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥
करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ध्रु.॥
गंगोदकें गंगे । अर्घ्य द्यावें पांडुरंगे ॥२॥
जोडोनियां हात । करी तुका प्रणिपात ॥३॥
२७४०
हें चि सर्वमुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां ॥१॥
हें चि एक सर्वसाधनांचें मूळ । आतुडे गोपाळ येणें पंथें ॥ध्रु.॥
न लगती कांहीं तपांचिया रासी । करणें वाराणसी नाना तीर्थे ॥२॥
कल्पना हे तिळ देहीं अभिमान । नये नारायण जवळी त्यांच्या ॥३॥
तुका म्हणे नामें देव नेदी भेटी । म्हणे त्याचे होंटी कुष्ट होय ॥४॥
३७६५
हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥१॥
जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥
दुजा भाव आड येऊं नेदीं चत्तिा । करावा अनंता नास त्याचा ॥२॥
अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ॥३॥
तुका म्हणे आम्ही जेजे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ॥४॥
२७१०
हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥१॥
म्हणवितां त्याचे दास । पुढें आस उरेना ॥ध्रु.॥
कृपादान केलें संतीं । कल्पांतीं ही सरेना ॥२॥
तुका म्हणे संतसेवा । हाचि हेवा उत्तम ॥३॥
३३२२
हें तों वाटलें आश्चर्य । तुम्हां न धरवला धीर ॥१॥
माझा फुटतसे प्राण । धांव धांव म्हणऊन ॥ध्रु.॥
काय नेणों दिशा । झाल्या तुम्हांविण ओशा ॥२॥
तुका म्हणे कां गा । नाइकिजे पांडुरंगा ॥३॥
१४९४
हेंदऱ्याचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥१॥
नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥
अवगुणी बाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥२॥
तुका म्हणे फजितखोरा । म्हणतां बरा उगा रहा ॥३॥
२८७०
हेंही ऐसें तें ही ऐसें । उभय पिसें अविचार ॥१॥
अभिमानाचे ठेलाठेलीं । मधीं झाली हिंपुष्टी ॥ध्रु.॥
धीरा शांती ठाव नुरे । हाचि उरे आबाळ्या ॥२॥
कौतुक हें पाहे तुका । कढतां लोकां अधणीं ॥३॥
३५०
होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥
हाचि माझा नेम धर्म । मुखी विठोबाचें नाम ॥ध्रु.॥
हे चि माझी उपासना । लागन संतांच्या चरणा ॥२॥
तुका म्हणे देवा । करीन ते भोळी सेवा ॥३॥
३५६८
होईल कृपादान । तरी मी येईन धांवोन ॥१॥
होती संतांचिया भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥ध्रु.॥
रिघेन मातेपुढें । स्तनपान करीन कोडें ॥२॥
तुका म्हणे ताप । हरती देखोनियां बाप ॥३॥
३१६७
होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन ॥१॥
आणीक काय दुजें । म्या मागणें तुजपासीं । आठविता सुख । भय नास नाहीं ज्यासी ॥ध्रु.॥
होइन मोचे वाहणा । पायीं सकळां संतजनां । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥२॥
सांडोवा पायरी । वोहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी । संतसज्जन चालती ॥३॥
लागें संतां पांयीं । ऐसा ठेवीं भलता ठायीं । तुका म्हणे देई । धाक नाहीं जन्माचा ॥४॥
११५८
होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥
येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥
धाला आणिकांची नेणे तान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥
तुका म्हणे येथें पाहिजे अनुभव । शब्दाचें गौरव कामा नये ॥३॥
१३२३
होईल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावें ॥१॥
तोंवरी मी पुढें कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु.॥
जाणेनियां अंतर देव । जेव्हां भेव फेडील ॥२॥
तुका म्हणे धरिल हातीं । करील खंती वेगळें ॥३॥
३००१
होईंल तो भोग भोगीन आपुला । न घलीं विठ्ठला भार तुज ॥१॥
तुम्हांपासाव हें इच्छीतसें दान । अंतरींचें ध्यान मुखीं नाम ॥ध्रु.॥
नये काकुलती गर्भवासांसाठी । न धरीं हें पोटीं भय कांहीं ॥२॥
तुका म्हणे मज उदंड एवढें । नाचेन मी पुढें मायबापा ॥३॥
३५७९
होईल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरीं जाऊनियां ॥१॥
करूनियां दधिमंगळभोजन । प्रयाण शकुनसुमुहूर्तें ॥ध्रु.॥
होतील दाटले सद्गदित कंठीं । भरतें या पोटीं वियोगाचें ॥२॥
येरयेरां भेटी क्षेम आलिंगनें । केलीं समाधान होतीं संतीं ॥३॥
तुका म्हणे चाली न साहे मनास । पाहाती कळस परतोंनी ॥४॥
३५८२
होईल माझी संतीं भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनीं बैसे ॥१॥
शृंगारूनि माझीं बोबडीं उत्तरें । होतील विस्तारें सांगितलीं ॥ध्रु.॥
क्षेम आहे ऐसें होईल सांगितलें । पाहिजे धाडिलें शीघ्र मूळ ॥२॥
अवस्था जे माझी ठावी आहे संतां । होईल कृपावंता निरोपिली ॥३॥
तुका म्हणे सवें येईल मुऱ्हाळी । किंवा कांहीं उरी राखतील ॥४॥
२०८१
होउनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥१॥
तूं चि चालविसी माझें । भार सकळ ही ओझें ॥ध्रु.॥
देह तुझ्या पायीं । ठेवुनि झालों उतराई ॥२॥
कायावाचामनें । तुका म्हणे दुजें नेणें॥३॥
३०७६
होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥१॥
शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥ध्रु.॥
तुका म्हणे त्यासी नाहीं शिवभक्ती । व्यापार करिती संसाराचा ॥२॥
३०७१
होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥१॥
निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥ध्रु.॥
तुका म्हणे ऐसें दांभिक भजन । तया जनार्दन भेटे केवीं ॥२॥
१२०६
होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं ॥१॥
हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोई ही धरावी विठोबाची ॥ध्रु.॥
आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरि जीवा घातक हें ॥२॥
तुका म्हणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥३॥
४१२
हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥१॥
त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ध्रु.॥
नसो भाव चित्तीं । हरीचे गुण गातां गीतीं ॥२॥
करी अनाचार । वाचे हरीनामउच्चार ॥३॥
हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥४॥
म्हणवी हरीचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥५॥
१७१३
हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरी ॥१॥
ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥
ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाह्य कोमळ ॥२॥
त्यांचा संग सर्वकाळ । घडो मज हे मंगळ ॥३॥ तुका म्हणे प्राण । काया कुरवंडी करीन ॥३॥
८१
हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥
कळों आलें खट्याळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥
फोडावें मडकें । मेलें लेखीं घायें एकें ॥२॥
तुका म्हणे त्यागें । विण चुकीजेना भोगें ॥३॥
३७८७
होतें बहुत दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं ।
व्हावी भेटी ते झाली गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥१॥
स्थिर स्थिर मज चि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।
येथें आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आलें तें दुसरें वारा वो ॥ध्रु.॥
मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळें होऊं एकी घडी ।
नाहीं लौकिक स्मरला आवडी । आता येणें काळें या वो लोभें वेडी वो ॥२॥
उदयीं उदय साधिला अवकाश । निश्चिंतीनें निश्चिंती सावकाश ।
धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥३॥
४०४१
होतों तें चिंतीत मानसीं । नवस फळले नवसीं । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥१॥
धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥ध्रु.॥
मज तों पडियेली होती भुली। चित्ताची अपसव्य चाली । होती मृगजळें गोवी केली । दृष्टि उघडली बरें जालें ॥२॥
आतां हा सिद्धी पावो भाव । मध्यें चांचल्यें न व्हावा जीव । ऐसी तुम्हां भाकीतसें कींव । कृपाळुवा जगदानिया ॥३॥
कळों येतें आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधीं। केवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥४॥
कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥५॥
३५९३
होतीं नेणों जालीं कठिणें कठीण । जवळी च मन मनें ग्वाही ॥१॥
आह्मी होतों सोइ सांडिला मारग । घडिलें तें मग तिकून ही ॥ध्रु.॥
निश्चिंतीनें होते पुढिलांची सांडी । न चाले ते कोंडी मायबापा ॥२॥
आम्हां नाहीं त्यांचा घडिला आठव । त्यांचा बहु जीव विखुरला ॥३॥
तुका म्हणे जालें धर्माचें माहेर । पडिलें अंतर आम्हांकूनि ॥४॥
१६२०
होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥१॥
तों या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥ध्रु.॥
होता भार माथां माझे । बहु ओझें अमुप ॥२॥
तुका म्हणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥३॥
४९८
होयें होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें । फळ अवघें चि तेणें ॥ध्रु.॥
अभिमान नुरे । कोड अवघें चि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥
म्ह व्हा
२९४६
म्हणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥१॥
आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥
तुके तरि तुकीं खऱ्याचे उत्तम । मुलाम्याच्या भ्रम कोठवरी ॥२॥
तुका म्हणे पुढें आणि मागें फांस । पावें ऐसा नास न करीं देवा ॥३॥
२१६
म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥
माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥
करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरें विषमासी ॥२॥
तुका म्हणे नाहीं काळापाशीं गोवा । स्थिति मति देवा वांचूनियां ॥३॥
२९५२
म्हणउनि झाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥१॥
दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥ध्रु.॥
हातें मुरगाळितां कान । नाहीं भिन्न वेदना ॥२॥
तुका म्हणे एकांतसुखें । अवघी गोतें गुंतलें ॥३॥
२९६०
म्हणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥१॥
तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥ध्रु.॥
बहु आहे करुणावंत । अनंत हें नाम ज्या ॥२॥
तुका म्हणे साक्षी आलें । तरी केलें प्रगट ॥३॥
६१०
म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥
कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥
कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥२॥
तुका म्हणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥३॥
२३०२
म्हणऊनि काकुळती । येतों पुढत पुढती । तुमचिया असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥
फेडूं आलेती दरिद्र । तरी न लगेची उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥
कोठें न घाली धांव । याजसाठीं त्यजिली हांव । घेऊं नेदी वाव । मना केला विरोध ॥२॥
कारणांच्या गुणें । वेळ काळ तोही नेणें । तुमच्या कीर्तनें । तुका तुम्हां जागवी ॥३॥
१५१५
म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥१॥
कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥
पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥२॥
तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समर्पीला ॥३॥
२५८३
म्हणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥१॥
आपुलें चि करूनि घ्यावें । आश्वासावें नाभिसे ॥ध्रु.॥
वाढली ते तळमळ चित्ता । शम आतां करावी ॥२॥
तुका म्हणे जीवीं वसे । मज नसे वेगळा ॥३॥
३७०४
म्हणती धालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आतां यासि विसंबों ॥१॥
चाल चाल रे कान्होबा । खेळ मांडूं रानीं । बैसवूं गोठणीं । गाई जमा करूनि ॥ध्रु.॥
न लगे जावें घरा । चुकलिया येरझारा । सज्जन सोयरा । मायबाप तूं आम्हां ॥२॥
तुका म्हणे धालें पोट । आतां कशाचा बोभाट । पाहाणें ते वाट । मागें पुढें राहिली ॥३॥
२६२६
म्हणवितां हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥१॥
आयुष्यधन त्याचें नेले यमदूतीं । भुलविला निंश्चितीं कामरंगें ॥ध्रु.॥
नावडे ती कथा देऊळासी जातां । प्रियधनसुता लक्ष तेथें ॥२॥
कोण नेतो तयां घटिका दिवसा एका । कां रे म्हणे तुका नागविसी ॥३॥
२६३
म्हणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं ॥१॥
ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईडाई ॥ध्रु.॥
पर्जन्याचे काळीं वोहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारे चि ॥२॥
हिऱ्याऐशा गारा दिसती दूरोन । तुका म्हणे घन न भेटे तों ॥३॥
३८७०
म्हणविती भक्त हरीचे अंकित । करितो अनंत हित त्यांचे ॥१॥
त्यांसि राखे बळें आपुले जे दास । कळिकाळासि वास पाहों नेदी
पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग
येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारीं शिळाचिये ॥३॥
शिळाचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥४॥
एक सरें गिरि धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आम्ही ऐसे ॥५॥
ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । म्हणे तुम्हीं आतां हात सोडा ॥६॥
हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥७॥
दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥८॥
भार आम्हांवरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥९॥
निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसि ॥१०॥
सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकेंचि खरें मानुनियां ॥११॥
यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका म्हणे वाचा वाचाळ ते ॥१२॥
१९२
म्हणवितों दास । मज एवढी च आस ॥१॥
परी ते अंगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ध्रु.॥
बडबडितों तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥२॥
तुका म्हणे बरा । दावूं जाणतों पसारा ॥३॥
५०१
म्हणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥१॥
गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु.॥
पाविजे तें वर्म न कळे चि कांहीं । बुडालो या डोई दंभाचिया ॥२॥
भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥३॥
तुका म्हणे वांयां गेलों ऐसा दिसें । होईल या हांसें लौकिकाचें ॥४॥
७२०
म्हणवितां हरीदास कां रे नाहीं लाज । दीनासी महाराज म्हणसी हीना ॥१॥
काय ऐसें पोट न भरेसे जाले । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥
तुका म्हणे पोटें केली विटंबना । दीन जाला जना कींव भाकी ॥३॥
२४६७
म्हणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं ॥१॥
खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा॥ध्रु.॥
आचरण खोटें आपणासी ठावें । लटिकें बोलावें दुसरें तें ॥२॥
तुका म्हणे ऐसा आहें अपराधी । असो कृपानिधी तुम्हां ठावा ॥३॥
३६०८
म्हणवितों दास । परि मी असें उदास ॥१॥
हाचि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥ध्रु.॥
सरतें कर्तुत्व माझ्यानें । परि मी त्याही हून असे भिन्न ॥२॥
तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥३॥
८१७
म्हणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥१॥
लाहो घेई हरीनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥
गळां पडेल यमफांसी । मग कैंचा हरी म्हणसी ॥२॥
पुरलासाठी देहाडा । ऐसें न म्हणें न म्हणें मूढा ॥३॥
नरदेह दुबळा । ऐसें न म्हणें रे चांडाळा ॥४॥
तुका म्हणे सांगों किती । सेखी तोंडीं पडेल माती ॥५॥
१८०१
म्हणसी होऊनी निश्चिंता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होईल तुझ्या ॥१॥
सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥
शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कदा अराणूक । करिती तडातोडी आंत बाह्यात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥२॥
मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोंडी । जागा होई करीं हिताचा उपाय । तुका म्हणे हाय करिसी मग ॥३॥
३८५१
म्हणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवावया कोड त्याचें ॥१॥
त्याचें आइकोन निष्ठुर वचन । भयाभीत मन जालें तीचें ॥२॥
तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥३॥
वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आम्हांवरीं ॥४॥
वरी उदकास नाहीं अंत पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥
संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायीं च देखिला अवचिता ॥६॥
अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥
मोठ्यानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥८॥
जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥९॥
यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळ्याकृतांतधुधुकारें ॥१०॥
कारणें ज्या येथें आला नारायण । झालें दर्शन दोघांमध्ये ॥११॥
दोघांमध्यें झाले बोल परस्परें । प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥१२॥
चिंतावला चित्ती तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥
झाला सावकाश झेंप घाली वरी । तंव म्हणे हरी मुष्टिघातें ॥१४॥
तेणें काळें त्यासि दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव आला ॥१५॥
आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुत नागकुळें ॥१६॥
कल्हारीं संधानीं वेष्ठीयेला हरी । अवघा विखारीं व्यापियेला ॥१७॥
यांस तुका म्हणे नाहीं भक्तीविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥१८॥
१०६५
म्हणे विठ्ठल ब्रम्ह नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥१॥
मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु.॥
नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥२॥
तुका म्हणे नाहीं। त्याची भीड मज कांहीं ॥३॥
ज्ञ
३३९८
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां ॥१॥
मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥ध्रु.॥
ब्रह्मादिक जेथें तुम्हां वोळगणे । इतर तुळणें काय पुढे ॥२॥
तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोलीं । म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥३॥
१०४०
ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥१॥
म्हणोनियां अवघे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु.॥
वेदपारायण पंडित वाचक । न मिळती एक एकांमधीं ॥२॥
पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखें चेष्टा विपरीत ॥३॥
आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें गुरगुरु ॥४॥
तुका म्हणे मज कोणांचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥५॥
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या