संत तुकाराम महाराज

संत तुकाराम गाथा १७ (श, श्र)

संत तुकाराम गाथा १७ अनुक्रमणिका नुसार

१५११
शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥१॥
भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥
प्रीत कळे आलिंगनीं । संपादनीं अत्यंत ॥२॥
तुका म्हणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें ॥३॥


२५५६
शक्ती द्याव्या देवा । नाहीं पार्थीवाची सेवा ॥१॥
मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥ध्रु.॥
मना पोटीं देव । जाणे जैसा तैसा भाव ॥२॥
तुका म्हणे सोसें । लागे लाविल्यासे पिसें ॥३॥


३९५४
शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें । ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवउनि खावें रे विठ्ठल ॥१॥
टिळे माळा करंडी सोंग । धरुनि चाळविलें जग । पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग रे विठ्ठल ॥२॥
राख लावुनि अंग मळी । वाये ठोके मी एक बळी । वासने हातीं बांधवी नळी । त्यासि येउनि काळ गिळी उगळी रे विठ्ठल ॥३॥
कोण तें राहडीचें सुख । वरते पाय आरतें मुख । करवी पीडा भोगवी दुःख । पडे नरकीं परी न पळे चि मूर्ख रे विठ्ठल ॥४॥
सिकला फाक मारी हाका । रांडा पोरें मेळवी लोकां । विटंबी शरीर मागे रुका । केलें तें गेलें अवघें चि फुका रे विठ्ठल ॥५॥
कळावें जनां मी एक बळी । उभा राहोनि मांडी फळी । फोडोनि गुडघे कोंपर चोळी । आपला घात करोनि आपण चि तळमळी रे विठ्ठल ॥६॥
फुकट खेळें ठकलीं वांयां । धरुनि सोंग बोडक्या डोया । शिवों नये ती अंतरीं माया । संपादणीविण विटंबिली काया रे विठ्ठल ॥७॥
धुळी माती कांहीं खेळों च नका । जवादी चंदन घ्यावा बुका । आपणा परिमळ आणिकां लोकां । मोलाची महिमा फजिती फुका रे विठ्ठल ॥८॥
बहुत दुःखी जालियां खेळें । अंगीं बुद्धि नाहींत बळें । पाठीवरी तोबा तोंड काळें । रसना द्रवे उपस्थाच्या मुळें रे विठ्ठल ॥९॥
काय सांगतो तें ऐका तुका । मोडा खेळ कांहीं अवगों च नका । चला जेवूं आधीं पोटीं लागल्या भुका । धाल्यावरी बरा टाकमटिका रे विठ्ठल ॥१०॥


३६१८
शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥१॥
ना भी ना भी भक्तीराया । वेगीं पावलों सखया ॥ध्रु.॥
दुरूनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टी ॥२॥
तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरी आला ॥३॥


२९७१
शब्द ज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्तते ॥१॥
जळो ते जाणींव जळो त्याचे बंड । जळो तया तोंड दुर्जनाचें ॥२॥
तुका म्हणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडूं डोया न धरूं भीड ॥३॥


४००४
शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥१॥
भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ध्रु.॥
संसारा हातीं दिलें आंचवण । मुखशुद्धी मन समर्पिलें ॥२॥
रंगलीं इंद्रियें सुरंग तांबूल । माथां तुळसीदळ समर्पिलें ॥३॥
एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचें या ॥४॥
न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥५॥


९४
शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥१॥
त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥
संतास जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥२॥
तुका म्हणे पोटीं । भाव अणीक जया होटीं ॥३॥


२२८८
शरण आलें त्यासी नेदावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥
अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ध्रु.॥
गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥२॥
भागलियाचा होई रे विसांवा । परिसावी केशवा विज्ञापना ॥३॥
अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विज्ञापना ॥४॥
तुका म्हणे आम्हां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥५॥


१६३
शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥
शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥२॥
तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥३॥


१३४१
शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥
स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥
देह सांभाळून । पायांवरी लोटांगण ॥२॥
विनवी तुका संता दीन । नोहे गौरवें उत्तीर्ण ॥३॥


१२६
शरणागत झालों । तेणें मीपणा मुकलों ॥१॥
आतां दिल्याची च वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥
नलगे उचित । कांहीं पाहावें संचित ॥२॥
तुका म्हणे सेवा । माने तैसी करूं देवा ॥३॥


४०६६
शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार । शरीर दुगपधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥१॥
शरीर उत्तम चांगलें। शरीर सुखाचें घोंसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रम्ह ॥ध्रु.॥
शरीर विटाळाचें अळें । मायामोहपाशजाळें। पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥२॥
शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचा ही निध । शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगी देव शरीरा ॥३॥
शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा रांधा । शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा एक शरीरीं ॥४॥
शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावें सुख न करीं त्याग । नव्हे वोखटें ना चांग । तुका म्हणे वेग करीं हरीभजनीं ॥५॥


१५९२
शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥१॥
कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥
यज्ञमुखें खोडी काढी । कोण गोडी बोरांची ॥२॥
तुका म्हणे भावाविण । अवघा सीण केला होय ॥३॥


३४५९
शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥१॥
सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंद्रियें ॥ध्रु.॥
क्रोधरूपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥२॥
मद्यभक्षण मांगिण जाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥३॥
स्तवुनियां पूजी रांड । न लजे भांड दाढीसी ॥४॥
तुका म्हणे भगवती । नेइल अंतीं आपणापें ॥५॥


३४६५
शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥१॥
तिची त्या पडली सवे । मागें धांवें म्हणोनि ॥ध्रु.॥
शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥२॥
तुका म्हणे शिंदळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥३॥


२८९
शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥१॥
म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥
खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥
म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥३॥


२१५८
शादीचें तें सोंग । संपादितां राजा वेंग ॥१॥
पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥
दिसतें तें लोपी । झिंज्या ओढोनियां पापी ॥२॥
सिंदळी त्या सती । तुका म्हणे थुंका घेती ॥३॥


३३३४
शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥१॥
म्हणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ध्रु.॥
सगुण निर्गुण जयाचींये अंगें । तोचि आम्हां संगें क्रीडा करी ॥२॥
तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभ आइते केले नव्हों ॥३॥


८७४
शाहाणियां पुरे एक चि वचन । विशारती खुण ते चि त्यासी ॥१॥
उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥ध्रु.॥
फांसावेना तरिं दुःख घेतें वाव । मग होतो जीव कासावीस ॥२॥
तुका म्हणे नको राग धरूं झोंडा । नुघडितां पीडा होईल डोळे ॥३॥


शि शी
३३३२
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥१॥
पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मळिती अर्था निजसुखा ॥२॥
तुका म्हणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे ठावी नाहीं वस्तु ॥३॥


२८७८
शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान । दर्पणींचें धन उपर वाया ॥१॥
अनुभव कइं होईंन भोगिता । सांकडें तें आतां हें चि आलें ॥ध्रु.॥
गायें नाचें करीं शरीराचे धर्म । बीजनाम वर्म तुमचें दान ॥२॥
तुका म्हणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सद्धि ॥३॥


३२४६
शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥१॥
निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥
अवगुणांचा सांठा करी । ते चि धरी जीवासी ॥२॥
तुका म्हणे जडबुद्धी । कर्मशुद्धी सांडवीं ॥३॥


३४३५
शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥
प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥
तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥


२०९७
शिकविलो ते बोल । बोलें तैसी नाहीं ओल ॥१॥
आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ध्रु.॥
एकांताचा वास । नाहीं संकल्पाचा नास ॥२॥
बुद्धी नाहीं स्थिर । तुका म्हणे शब्दा धीर ॥३॥


१५५३
शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥१॥
आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥
हातीं प्रेमाचें भातुकें । आम्हां देऊनियां निकें ॥२॥
तुका करी टाहो । पाहे रखुमाईचा नाहो ॥३॥


१२१८
शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥१॥
त्याग करूं नये खरें । ऐसें विचारावें बरें ॥ध्रु.॥
तुमचिया तोंडें । धर्माधर्म चि खंडे ॥२॥
मजसाठी देवा । कां हो लपविला हेवा ॥३॥
जाला सावधान । त्यासी घालावें भोजन ॥४॥
तुका म्हणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥५॥


३६८९
शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥१॥
तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्रु.॥
वाहाती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥२॥
तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥३॥


३०६२
शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तूं जाण श्रुतिदास ॥१॥
त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥
बहु झालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुकों नको ॥२॥
शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहींनाहीं ॥३॥
तुका म्हणे तरि वर्तूनि निराळा । उमटती कळा ब्रम्हींचिया ॥४॥


२५५४
शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ ॥१॥
ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ध्रु.॥
सांभाळावें वर्म । उचिताच्या काळें धर्म ॥२॥
तुका म्हणे कळे । ऐसें कारणाचे वेळे ॥३॥


४००१
शिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥
अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुम्हांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ध्रु.॥
बहुतांनीं विनविलें बहुतां प्रकारीं । सकळां ठायीं हरी पुरलेती ॥२॥
तुका म्हणे अगा कुटुंबवत्सळा । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥३॥


११३
शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥
दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥ध्रु.॥
तुका म्हणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥२॥


९३६
शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें ॥१॥
त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ॥ध्रु.॥
त्याचें खरें ब्रम्हज्ञान । उदासीन देहभावीं ॥२॥
तुका म्हणे सत्य सांगें । येवोत रागें येतील ते ॥३॥


११४३
शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥
होय जतन तें गोड । अंतरा येती नाड ॥ध्रु.॥
देव जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥२॥
तुका म्हणे मोड दावी । तैशीं फळें आलीं व्हावीं ॥३॥


३८१३
शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥१॥
जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥
फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥
मायबापा सोडविलें बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कौसादिक ॥४॥
दिक नाहीं देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥
मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥
पाप कोठें राहे हरी आठवितां । भक्ती द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥
साक्षी तयापाशीं पूर्वीलकर्माच्या । बांधला सेवेच्या ऋणी देव ॥८॥
देव भोळा धांवे भक्ता पाठोवाठी । उच्चारितां कंठीं मागेंमागें ॥९॥
मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धांवे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥


२४३०
शिळें खातां आला वीट । सुनें धीट पाय धरी॥१॥
कान्होबा ते जाणे खूण । उन उन घास घाली ॥ध्रु.॥
आपुले ठायींचे घ्यावें । लाड भावें पाळावा ॥२॥
तुका म्हणे मी जुनाट सुने । मोहो आट परतला ॥३॥


१३३२
शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥१॥
सेवन हे शिरसा धरीं । अंतरीं हीं वरदळा ॥ध्रु.॥
अवघें चि नासी पाप । तीर्थ बाप माझ्याचें ॥२॥
बैसोनियां तुका तळीं । त्या कल्लोळीं डौरला ॥३॥


६७७
शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥१॥
जाऊनि वोसंगा रिघे न वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥
कृपा तनु माझी सांभाळी दुभोनि । अमृतसंजीवनी लोटलीसे ॥२॥
आनंदाचा ठाव नाहीं माझे चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥३॥
सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आसे ॥४॥
तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाईचें ॥५॥


शु शू
१०५
शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षिती लाहो दिसां सातां ॥१॥
उठा उठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥
त्वरा झाली गरुडा टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥
तुका म्हणे करी बहुत तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥


१२१०
शुद्ध ऐसें ब्रम्हज्ञान । करा मन सादर ॥१॥
रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥
कोणासवें नाहीं चोरी । सकळांवरी समत्व ॥२॥
सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं॥३॥


४७२
शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥१॥
सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥
कीर्तनीं चि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणें वास संनिधता ॥२॥
तुका म्हणे वर्म सांगतों सवंगें । मन लावा लागें स्वहिताच्या ॥३॥


३७१४
शुद्ध दळणाचें सुख सांगों । मानवत असे सईबाई ॥१॥
शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥
शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥
शुद्ध त्याचा पाक शुद्धचीत्त चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥३॥
तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥४॥


३७
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥
मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥ध्रु.॥
सर्वांग निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥


२६२४
शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥१॥
कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥
उदक भिन्न असे काई । वोहाळ बावी सरिता नई ॥२॥
सूर्य तेजें निवडी काय । रश्मी रसा सकळा खाय ॥३॥
वर्णां भिन्न दुधा नाहीं । सकळा गाई सारखें ॥४॥
करितां भिन्न नाहीं माती । मडक्या गति भिन्न नांवें ॥५॥
वर्त्ते एकविध अग्नी । नाहीं मनीं शुद्धाशुद्ध ॥६॥
तुका म्हणे पात्र चाड । किंवा विष अमृत गोड ॥७॥


१५२३
शुध्दरसें ओलावली । रसना धाली न धाये ॥१॥
कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्तता ॥ध्रु.॥
आवडे तें तें चि यासी । ब्रम्हरसीं निरसें ॥२॥
तुका म्हणे बहुतां परी । करूना करीं सेवन ॥३॥


३७४४
शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥१॥
आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सद्धि कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥
सुपीं तों चि पाहें धड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥२॥
सुपीं तों चि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥३॥
सुपीं तों चि संग घेई धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥४॥
दळितां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥५॥
सुपीं तों चि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥६॥


१९३०
शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें ॥१॥
हातींचिया दीपें दुराविली निशी । न देखिजे कैसी आहे ते ही ॥ध्रु.॥
सुख दुःखाहूनि नाहीं विपरीत । देतील आघात हितफळें ॥२॥
तुका म्हणे आतां आम्हांसी हें भलें । अवघे चि जाले जीव जंत ॥३॥


३८५६
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥
हरुषलीं माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥३॥
गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥४॥
थोर सुख झालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरी आला ॥५॥
आले वरी बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥६॥
नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥७॥
नारायणापुढें गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥८॥
तंव तो देखिला वैकुंठींचा पती । लोटांगणीं जाती सकळ ही ॥९॥
सकळ ही एका भावें आलिंगिले । अवघियां झाले अवघे हरी ॥१०॥
हरी आळीगुनीहरीरूप झालीं । आप विसरलीं आपणास ॥११॥
सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापां भावें लोकपाळां ॥१२॥
मायबाप देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका म्हणे ॥१३॥


१६५
शूद्रवंशी जन्मलों । म्हणोनि दंभें मोकलिलों ॥१॥
अरे तूं चि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥
घोकाया अक्षर। मज नाहीं अधिकार ॥२॥
सर्वभावें दीन । तुका म्हणे यातिहीन ॥३॥


१७२९
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥
केला न संडी कैवाड । जीवेंसाठी तों हे होड ॥ध्रु.॥
धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥२॥
तुका म्हणे हरी । दासां रिक्षतो निर्धारीं ॥३॥


१७३८
शूरां साजती हतियारें । गांढया हांसतील पोरें ॥१॥
काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥
पतिव्रते रूप साजे। सिंदळ काजळ लेतां लाजे ॥२॥
दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥३॥
मान बुद्धिवंतां । थोर न मनिती पिता ॥४॥
तुका म्हणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥५॥


शृ शे शौ श्म
१३९५
शृगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥१॥
न घलावा मधीं कामाचा विलंब । तुम्ही तों स्वयंभ करुणामूर्ती ॥२॥
तुका म्हणे केलें सन्मुख वदन । देखतां चरण पोटाळीन ॥३॥
२४४२
शेवटींची हे विनंती । पाय चित्तीं रहावे ॥१॥
ऐसे करा कृपादान । तुम्हां मन सन्निध ॥ध्रु.॥
भाग्याविण कैंची भेटी । नव्हे तुटी चिंतनें ॥२॥
तुका म्हणे कळसा आलें । हें विठ्ठलें परिसावें ॥३॥


६४०
शेवटीची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ध्रु.॥
पुढें फार बोलों काई । अवघें पायीं विदित ॥२॥
तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥३॥


१४८१
शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥१॥
तरीच नेदा जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥
जावें वनांतरा । येणें उद्देशें दातारा ॥२॥
तुका म्हणे गिरी । मज सेववावी दरी ॥३॥


२१५
शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥
येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥
करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥२॥
तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥३॥


३६०६
शोधितां चि नये । म्हणोनि वोळगतों पाये ॥१॥
आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥
परतोनि मन । गेलें ठायीं चि मुरोन ॥२॥
विसरला तुका । बोलों चालों झाला मुका ॥३॥


१८६
शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥१॥
ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु झाले तट ॥ध्रु.॥
लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया धरी ॥२॥
तुका म्हणे गुण । तुझा लागलिया शून्य ॥३॥


३२७५
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥१॥
म्हणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥
एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहात ध्वनी गगन गर्जे ॥२॥
तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥३॥


४८
श्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥
भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥
अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥२॥
तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥३॥


श्र
२७५१
श्रमपरिहारा । मूळ झालें दातारा ॥१॥
देह निवुदूनि पायीं । झालों निष्काम उतराई ॥ध्रु.॥
आपली ते सत्ता । येथें असों नेदीं आतां ॥२॥
राहिला निराळा । तुका खटपटी वेगळा॥३॥


४०४७
श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥१॥
सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ध्रु.॥
चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥२॥
कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥३॥
अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना। वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥४॥
तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हे चि करीतसें विनवणी। भवबंधनीं सोडवावें ॥५॥


३३८२
श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥
अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं ब्रिदावळी ॥ध्रु.॥
न संगतां कळे अंतरीचें गुज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥
आळिकर त्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देऊनियां ॥३॥
तुका म्हणे तूं चि खेळें दोहीं ठायीं । नसेल तो देई धीर मना ॥४॥


२१२९
श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥१॥
विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें॥ध्रु.॥
डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥२॥
तुका म्हणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा वोडवला ॥३॥


५१
श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥१॥
नाहीं भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु. ॥ माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥२॥
तुका म्हणे चित्त । मळिण करा तें फजित ॥३॥


१८३२
श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे ॥१॥
तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥
जेवितां जवळी । येऊनियां पुंस घोळी ॥२॥
कोपेल तो घनी । तुका म्हणे नेणें मनीं ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

View Comments