संत तुकाराम गाथा १५  अनुक्रमणिका नुसार

३३५०
रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥
तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि झाली । कल्पना निघाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥
देशकाळ वस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥
न झाला प्रपंच आहे परब्रम्ह । अहंसोहं ब्रम्ह आकळलें ॥३॥
तत्वमसि विद्या ब्रम्हानंदी सांग । तें चि जाला अंगें तुका आतां ॥४॥


२०१३
रंगलिया या रंगें पालट न घरी । सेवलें अंतरीं पालटेना॥१॥
सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥
पवित्र जालें तें न लिंपे विटाळा । नैदी बैसों मळा आडवरी ॥२॥
तुका म्हणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां ॥३॥


२१६७
रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगें ॥१॥
शरीर जायांचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥ध्रु.॥
नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥२॥
अंतकाळींचा सोइरा । तुका म्हणे विठो धरा ॥३॥


३२२७
रंगीं रंगें नारायण । उभा करितों कीर्त्तन ॥१॥
हातीं घेउनियां वीणा । कंठीं राहें नारायणा ॥ध्रु.॥
देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥२॥
तुका म्हणे देवा । देई कीर्तनाचा हेवा ॥३॥


३९००
रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें ॥१॥
रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥
कळा सकळ ही गोविंदाचे हातीं । मंदिरें निगुतीं उभारिलीं ॥३॥
उभारिलीं दुर्गे दारवंठे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥
शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरी ॥५॥
आले नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥
निवडीना याति समान चि केलीं । टणक धाकुलीं नारायणें ॥७॥
नारायणें दिलीं अक्षईं मंदिरें । अभंग साचारें सकळांसि ॥८॥
सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥
रचिलें तें देवें न मोडे कवणा । बळियांचा राणा नारायण ॥१०॥
बळबुद्धीनें तीं देवा च सारिखीं । तुका म्हणे मुखीं गाती ओंव्या ॥११॥


१८२६
रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥१॥
तुम्हांआम्हांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावया ॥ध्रु.॥
सरी चिताक भोंवरी । अळंकाराचिया परी । नामें जालीं दुरी । एक सोनें आटितां ॥२॥
पिसांचीं पारवीं । करोनि बाजागिरी दावी । तुका म्हणे तेवीं । मज नको चाळवूं ॥३॥


३६०७
रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥१॥
म्हणोनि आठवती पाय । घेतों आलाय बलाय ॥ध्रु.॥
द्रुश द्रुमाकार लाणी। केलों सर्व सासी धणी ॥२॥
तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥३॥


५४४
रडे अळंकार दैन्याचिये कांती । उत्तमा विपित्तसंग घडे ॥१॥
एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥२॥
तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥३॥


१५०
रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥१॥
देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ध्रु.॥
लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥२॥
तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥३॥


१४४६
रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐशा मज धीरें राख आतां ॥१॥
संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा ॥ध्रु.॥
वागवितों तुझिया नामाचें हत्यार । हाचि बडिवार मिरवितों ॥२॥
तुका म्हणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुम्ही जाणां ॥३॥


३९७६
रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥१॥
कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी रखुमाई राही ॥ध्रु.॥
नाना उपचारीं । सिद्धि वोळगती कामारी ॥२॥
हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥३॥


२९६२
रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥१॥
जातिस्वभाव आला डोळ्यां आड । तया घडे नाड न कळतां ॥ध्रु.॥
कामधेनु देखे जैशा गाईंम्हैसी । आणिकांतें ऐसी करोनियां ॥२॥
तुका म्हणे काय बोलोनियां फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥३॥


६९३
रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्षने संतांचीया ॥१॥
त्यांचा महिमा काय वर्णु मी पामर । न कळे तो साचार ब्रह्मादिकां ॥ध्रु.॥
तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥२॥
मायबापें पिंड पाळीला माया । जन्ममरण जाया संतसंग ॥३॥
संतांचें वचन वारी जन्मदुःख । मिष्टान्न तें भूकनिवारण ॥४॥
तुका म्हणे जवळी न पाचारितां जावें । संतचरणीं भावें रिघावया ॥५॥


२८६
रवि रश्मीकळा । नये काढितां निराळा ॥१॥
तैसा आम्हां जाला भाव । अंगीं जडोनि ठेला देव ॥ध्रु.॥
गोडी साकरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥२॥
तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥३॥


८७७
रवीचा प्रकाश । तोचि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥
आतां हाचि वसी जीवीं । माझे अंतरी गोसावीं । होऊं येती ठावीं । काय वर्में त्याच्यानें ॥ध्रु.॥
सवें असतां धणी । आड येऊं न सके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥२॥
जन्माचिया गति । येणें अवघ्या खुंटती । कारण ते प्रीति । तुका म्हणे जवळी ॥३॥


रा
१११७
राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥१॥
न करी स्नान संध्या न म्हणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्नीशी ॥ध्रु.॥
देवाब्राम्हणासी जाईना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥२॥
सुगंध चंदन सांडोनियां माशी । बैसे दुगपधीशीं अत्याआदरें॥३॥
तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीन । कां रे रामराणा विसरसी ॥४॥


१६
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥


३९४०
राजस सुंदर बाळा पाहों आलिया सकळा वो । बिबीं बिंबोनि ठेली माझी परब्रम्ह वेल्हाळा वो । कोटि रविशशि जिच्या अंगीचीया किळा वो ॥१॥
राजस विठाबाई माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चौघींसी लावी आपुलिये सोई वो ॥ध्रु.॥
सकुमार साजिरी कैसीं पाउलें गोजिरीं वो । कंठीं तुळसीमाळा उभी भीवरेच्या तिरीं वो । दंत हिरया ज्योति शंखचक्र मिरवे करीं वो ॥२॥
निर्गुण निराकार वेदां न कळे चि आकार वो । शेषादिक श्रमले श्रुती न कळे तुझा पार वो । उभारोनि बाहे भक्तां देत अभयकर वो ॥३॥
येउनि पंढरपुरा अवतरली सारंगधरा वो । देखोनि भक्ति भाव वोरसली अमृतधारा वो । देउनि प्रेमपान्हा तुकया स्वामीनें किंकरा वो ॥४॥
१३७७
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥१॥
कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥
वाहिले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरें । करुणाकरें रक्षीलें ॥३॥


४५८
राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥१॥
कोणी कोणा एथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु.॥
शृंगारिलें नाहीं तगोंयेत वरी । उमटे लौकरि जैसे तैतें ॥२॥
तुका म्हणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खुण साम्या येते ॥३॥


३४६०
राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥१॥
अधर्माचें उबड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ध्रु.॥
न पिके भूमि कांपे भारें । मेघ वारें पीतील ॥२॥
तुका म्हणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीचि ॥३॥


३१६६
रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥
जीवा ही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य करी ॥ध्रु.॥
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचें काळें केलें तोंड ॥२॥


३५०१
राम कहो जीवना फल सो ही । हरीभजनसुं विलंब न पाई ॥१॥
कवनका मंदर कवनकी झोपरी । एकारामबिन सब हि फुकरी ॥ध्रु.॥
कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥२॥
कहे तुका सब हि चेलक्तहार । एकारामविन नहिं वोसार ॥३॥


३१५१
राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥१॥
काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥
चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देईन हा बळी जीव पायीं ॥२॥
तुका म्हणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोन ॥३॥


३९३०
रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळ्या वाजवीत । छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥१॥
जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव । मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसूं द्यावा भाव गा ॥ध्रु.॥
निज दानाची थोर आवडी । वासुदेवासि लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवीजोडी गा ॥२॥
अवघा सारूनि सेवट झाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवालागा ॥३॥
तुका म्हणे रे धन्य त्याचें जिणें । जींहीं घातलें वासुदेवा दान । त्याला न लगे येणें जाणें । झालें वासुदेवीं राहणे गा ॥४॥


१०३६
रामकृष्णनाम मांडीं पां वोळी । तेणें होईल होळी पापा धुनी ॥१॥
ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रम्हरसा ॥ध्रु.॥
जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस नुरे मागुताली ॥२॥
तुका म्हणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥३॥


३५०६
रामभजन सब सार मिठाई । हरी संताप जनमदुख राई ॥ध्रु.॥
दुधभात घृत साकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥१॥
खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥२॥
कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥३॥


७६०
राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एक चि सकळ दुजें नाहीं ॥१॥
मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंड चि खाणी एकी रासी ॥ध्रु.॥
मोडलें हें स्वामी ठायाठाव सेवा । वाढवा तो हेवा कोणा अंगें ॥२॥
तुका म्हणे अवघें दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हें चि आतां ॥३॥


३६४४
रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥१॥
कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥
हाचि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥२॥
जुन्हाट नागर नीच नवें । तुका म्हणें म्यां धरिलें जीवें भावें ॥३॥


३९२८
राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । सेवटिचें गोड तें चि खरें गा ॥१॥
राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपळिया । टाळ घागऱ्यावघोषें गा ॥ध्रु.॥
गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं कांहीं ठेवा गा ॥२॥
निज घेउनिया फिरती । ऐक वेळा जाणविती । धरूनियां राहाचित्तीं । नेघें भार सांडीं कामा हातीं ॥३॥
सुपात्रीं सर्व भाव । मी तों सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥४॥
शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥५॥


३६४९
रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥१॥
राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी ॥ध्रु.॥
राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥२॥
अयोध्येचे लोक । राम झाले सकळीक ॥३॥
स्मरतां जानकी । रामरूप झाले कपि ॥४॥
रावणेसी लंका। राम आपण झाला देखा ॥५॥
ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥६॥


१०७९
राम म्हणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥
राम म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ध्रु.॥
राम म्हणे जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥२॥
राम म्हणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥३॥
राम म्हणतां धर्म घडती सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥४॥
राम म्हणतां म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥५॥


३६४३
राम म्हणतां राम चि होईजे । पदीं बैसोन पदवी घेईजे ॥१॥
ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥२॥
तुका म्हणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥३॥


३६४५
राम म्हणतां तरे जाणता नेणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥
राम म्हणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥
राम म्हणे तया नये जवळी भूत । कैचा यमदूत म्हणतां राम ॥२॥
राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥३॥
तुका म्हणें हें सुखाचें हें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥४॥


३६४१
राम म्हणे वाटे चाली । यज्ञ पाउलापाउलीं ॥१॥
धन्यधन्य तें शरीर । तीर्थांव्रतांचे माहेर ॥ध्रु.॥
राम म्हणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥२॥
राम म्हणे ग्रासोग्रासीं । तोचि जेविला उपवासी ॥३॥
राम म्हणें भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥४॥
ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे जीवन्मुक्त ॥५॥


३६४०
रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥१॥
केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ध्रु.॥
वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥२॥
तुका म्हणें ॠषिनेम । ऐसा कळोनि कां भ्रम ॥३॥


२३६८
रायाचें सेवक । सेवटीचें पीडी रंक ॥१॥
हा तों हिणाव कवणा । कां हो नेणां नारायणा ॥ध्रु.॥
परिसेंसी भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥२॥
तुझें नाम कंठीं । तुक्या काळासवें भेटी॥३॥


४४९
रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥१॥
तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हे चि मानस शुद्ध त्याचें ॥ध्रु.॥
सर्पासी पाजिलें शर्करापीयूष । अंतरींचें विष जाऊं नेणे ॥२॥
तुका म्हणे श्वाना क्षिरीचें भोजन । सवें चि वमन जेवी तया ॥३॥


१४५३
राहाणें तें पायांपाशी । आणिकां रसीं विटोनि ॥१॥
ऐसा धीर देई मना । नारायणा विनवितों ॥ध्रु.॥
अंतरीं तों तुझा वास । आणिकां नाष कारणा ॥२॥
तुका म्हणे शेवटींचें । वाटे साचें राखावें ॥३॥


१४५१
राहिलों निराळा । पाहों कवतुक डोळां ॥१॥
करूं जगाचा विनोद । डोळां पाहोनियां छंद ॥ध्रु.॥
भुललिया संसारें । आलें डोळ्यासी माजिरें ॥२॥
तुका म्हणे माथा । कोणी नुचली सर्वथा ॥३॥


२९५१
राहे उभा वादावादीं । तरी फंदीं सांपडे ॥१॥
लव्हाळ्यासी कोठें बळ । करिल जळ आपुलें ॥ध्रु.॥
कठिणासी बळजोडा । नम्र पीडा देखेना ॥२॥
तुका म्हणे सर्वरसीं । मिळे त्यासी गोत तें ॥३॥


४६२
राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो ॥१॥
कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ध्रु.॥
होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥२॥
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥३॥


२४७८
राहो ये चि ठायीं । माझा भाव तुझे पायीं ॥१॥
करीन नामाचें चिंतन । जाऊं नेदीं कोठें मन ॥ध्रु.॥
देईन ये रसीं । आतां बुडी सर्वविशीं ॥२॥
तुका म्हणे देवा । साटी करोनियां जीवा॥३॥


रि रु रो
२४६२
रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही ॥१॥
वेळोवेळां पारायण । नारायण हें करीं ॥ध्रु.॥
भ्रमणांच्या मोडीं वाटा। न भरें फाटा आडरानें ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवें । हें चि घ्यावें धणीवरी ॥३॥


७२१
रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥
लोडे बालिस्तें पलंग सुपत्ती । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥
पुसाल तरि आम्हां वैकुंठींचा वास । परि नाहीं राह्यास ठाव कोठें ॥२॥
तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥३॥


८८५
रुची रुची घेऊं गोडी । प्रेमसुखें जाली जोडी ॥१॥
काळ जाऊं नेदूं वांयां । चिंतू विठोबाच्या पायां ॥ध्रु.॥
करूं भजन भोजन । धणी घेऊं नारायण ॥२॥
तुका म्हणे जीव धाला । होय तुझ्यानें विठ्ठला ॥३॥


३२९८
रुसलों आह्मीं आपुलिया संवसारा । तेथें जनाचारा काय पाड ॥१॥
आम्हां इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाहीं या दुसरें देवाविण ॥ध्रु.॥
दुराविले बंधु सखे सहोदर । आणीक विचार काय तेथें ॥२॥
उपाधिवचन नाइकती कान । त्रासलें हें मन बहु माझें ॥३॥
तुका म्हणे करा ठाकेल ते दया । सुख दुःख वांयां न धरावें ॥४॥


३३२१
रुसलों संसारा । आम्ही आणीक व्यापारा ॥१॥
म्हणऊनि केली सांडी । देउनि पडिलों मुरकंडी ॥ध्रु.॥
परते चि ना मागें । मोहो निष्ठुर झालों अंगें ॥२॥
सांपडला देव । तुका म्हणे गेला भेव ॥३॥


३५६६
रुळें महाद्वारीं । पायांखालील पायरी ॥१॥
तैसें माझें दंडवत । निरोप सांगातील हा संत ॥ध्रु.॥
पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥२॥
तुका म्हणे बाळ । लोळे न धरितां सांभाळ॥३॥


८५९
रूप नांव माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयापरि ॥१॥
सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु.॥
पोटा आलें तिच्या लोळे मांडिवरी । पारखी न करी खंतीं चित्तीं ॥२॥
तुका म्हणे भक्तीसाठी हरीहर । अरूपीचें क्षरविभाग हें ॥३॥


२३६०
रूपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥१॥
देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥ध्रु.॥
कळों नये सुखदुःख। तान हरपली भूक ॥२॥
तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥३॥


३५३२
रूपें गोविलें चित्त । पायीं राहिलें निश्चिंत ॥१॥
तुह्मीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ध्रु.॥
जाली इंद्रियां विश्रांति । भ्रमतां पीडत ते होतीं ॥२॥
तुका म्हणे भेटी । सुटली भवबंदाची गांठी ॥३॥


२३०५
रोजकीर्द जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥१॥
नाहीं होत झाड्यापाड्याचें लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥ध्रु.॥
चोरासाटीं रदबदल आटटहास्य । जळो जिणे दास्य बहुताचें ॥२॥
सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाड्यापाशी गुंपों नेणे ॥३॥

ल लं

११३१
लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥१॥
पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी ॥ध्रु.॥
कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं । शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ॥२॥
तुका म्हणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥३॥


१४९६
लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥
वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥
समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्धि चांच चाट ॥२॥
तुका म्हणे याचा धिक्कार चि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥३॥


४७८
लटिकियाच्या आशा । होतों पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥१॥
बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ध्रु.॥
मरणाची नाहीं शुद्धी । लोभीं प्रवर्तली बुद्धी । परती तों कधीं । घडे चि ना माघारीं ॥२॥
सांचूनि मरे धन । लावी पोरांसी भांडण । नाहीं नारायण । तुका म्हणे स्मरीला ॥३॥


१८२८
लटिका चि केला । सोंग पसारा दाविला ॥१॥
अवघा बुडालासी ॠणें । बहुतांचे देणें घेणें ॥ध्रु.॥
लावियेलीं चाळा । बहू दावूनि पुतळा ॥२॥
तुका म्हणे हात । आह्मी आवरीली मात ॥३॥


५९२
लटिका देव म्हणतां ऐसा । संदेहसा वाटतसे ॥१॥
ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥
शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥२॥
तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥३॥


१५५८
लटिका तो प्रपंच एक हरी साचा । हरीविण आहाच सर्व इंद्रियें ॥१॥
लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरीविण ध्यान नश्वर आहे ॥ध्रु.॥
लटिकिया वित्पत्ति हरीविण करिती । हरी नाहीं चित्तीं तो शव जाणा ॥२॥
तुका म्हणे हरी हें धरिसी निर्धारीं । तरीं तूं झडकरी जासी वैकुंठासी ॥३॥


३२५०
लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा ॥१॥
कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेसी ॥ध्रु.॥
रजस्वला रुधिर स्रवे । तें चि घ्यावें तृषेसी ॥२॥
तुका म्हणे जन्मा आला । काळ झाला कुळासी ॥३॥


८६३
लटिकें तें रुचे । साच कोणां ही न पचे ॥१॥
ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येईल सीण ॥ध्रु.॥
वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥२॥
कांहीं न मनी माकड । तुका उपदेश हेकड ॥३॥


१५६१
लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरीकिर्तन प्रिय नाहीं ॥१॥
लटिका चि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाठी ॥ध्रु.॥
लटिकें चि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्फुंदन प्रेम कथे ॥२॥
लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥३॥
नाम नावडे तो करील बाहेरी । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि ॥४॥
तुका म्हणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिला ही ॥५॥


११८९
लटिकें हासें लटिकें रडें । लटिकें उडें लटिक्यापें॥१॥
लटिकें माझें लटिकें तुझें । लटिकें ओझें लटिक्याचें ॥ध्रु.॥
लटिकें गायें लटिकें ध्यायें । लटिकें जायें लटिक्यापें ॥३॥
लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥३॥
लटिका तुका लटिक्या भावें । लटिकें बोले लटिक्यासवें ॥४॥


२३८४
लटिकेची साच दाविलें अचळ । पिडीतसे काळ किती म्हणू ॥१॥
सत्य तूं सत्य तूं सत्य तूं विठ्ठला । कां गा हा दाविला जगदाकार ॥ध्रु.॥
सांभाळी सांभाळी आपुलीं हे माया । आम्हांसी कां भयभीत केले ॥२॥
रूप नाही त्यासी ठेविले नाम । लटिकाची भ्रम वाढविला ॥३॥
तुका म्हणे कां गा झालासी चतुर । होतासी निसूर निर्विकार ॥४॥


३२२३
लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या विश्वास तोचि खरा ॥१॥
कोल्हांटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥ध्रु.॥
जळमंडप्याचे घोडे राउत नाचती । ते काय तगती युद्धालागीं ॥२॥
तुका म्हणे तैसें मतवादीयांचें जिणें । दिसे लाजिरवाणें बोलतां चि ॥३॥


१३८९
लटिक्याचे वाणी वचनाचा संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥१॥
अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥ध्रु.॥
अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥२॥
तुका म्हणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडे तसे ॥३॥


२७३३
लडिवाळ म्हणोनी निष्ठुर न बोला । परी सांभाळिला लागे घात ॥१॥
बहु वागवीत आणिलें दुरूनि । दासांची पोसनी बहु आहे ॥ध्रु.॥
नाहीं लागों दिला आघाताचा वारा । निष्ठुर उत्तरा कोमेजना ॥२॥
तुका म्हणे तुम्ही कृपावंत हरी । शांतवी उत्तरीं अमृताच्या ॥३॥


१४५५
लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥१॥
हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवि ॥ध्रु.॥
कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥२॥
कर्म उसंतावें चालत पाउलीं । होय जों राहिली देहबुद्धि ॥३॥
भक्ती तें नमावें जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥४॥
तुका म्हणे साध्य साधन अवघडें । देतां हें सांकडें देह बळी ॥५॥


२०३६
लय लक्षूनियां जालों म्हणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥
जालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही निश्चितीनें ॥ध्रु.॥
तपें दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥२॥
कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥३॥
तुका म्हणे जरी होईल निष्काम । तरि च होय राम देखे डोळां ॥४॥


३६९४
लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें ॥१॥
हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥ध्रु.॥
अंगीकारी हरी । नको पडों फेरी । लाज धरीं भांडे । जग झोडी रांडे ॥२॥
बैस भावा पाठीं । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥३॥
पाठिमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥४॥
आतां उभी ठायीं । उभाउभीं पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥५॥
नामा केलें खरें । आपुलें म्या बरें। तुका म्हणे येरी । पांगविल्या पोरी ॥६॥


२३७९
लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळें ॥१॥
तैसा समरस जालों । तुजमाजी हरपलों ॥ध्रु.॥
अग्नीकर्पुराच्या मेळीं । काय उरली काजळी ॥२॥
तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥३॥


२२३९
लवविलें तया सवें लवे जाती । अभिमाना हातीं सांपडेना ॥१॥
भोळिवेचें लेणें विष्णुदासां साजे । तेथें भाव दुजे हारपती ॥ध्रु.॥
अर्चन वंदन नवविधा भक्ती । दया क्षमा शांति ठायीं ॥२॥
तये गांवीं नाहीं दुःखाची वसती । अवघा चि भूतीं नारायण ॥३॥
अव घें चि जालें सोंवळें ब्रम्हांड । विटाळाचें तोंड न देखती ॥४॥
तुका म्हणे गाजे वैकुंठीं सोहळा । याही भूमंडळामाजी कीर्ती ॥५॥


७१६
लाहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥ध्रु.॥
ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥२॥
तुका म्हणे जाण । व्हावें लाहनाहुनि लाहन ॥३॥


३४२
लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आम्हांस दृष्टीपुढें ॥१॥
कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥
व्यापूनि वेगळें राहिलेंसे दुरी । सकळां अंतरीं निर्वीकार ॥२॥
रूप नाहीं रेखा नाम ही जयासी । आपुल्या मानसीं शिव ध्याय ॥३॥
अंत नाहीं पार वर्णा नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाद ॥४॥
अचेत चेतलें भक्तीाचिया सुखें । आपुल्या कौतुकें तुका म्हणे ॥५॥


६४८
लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥१॥
सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥ध्रु.॥
माझी अल्प हे वासना। तूं तो उदाराचा राणा ॥२॥
तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥३॥


ला लां लो लौ
३३१८
लागपाठ केला । आतां वांटा नित्य त्याला ॥१॥
करा जोडीचा हव्यास । आलें दुरील घरास ॥ध्रु.॥
फोडिलीं भांडारें। मोहोरलीं एकसरें ॥२॥
अवघियां पुरतें । तुका म्हणे घ्यावें हातें ॥३॥


४६६
लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माउली ॥१॥
उभयतां आवडी लाडें । कोडें कोड पुरतसे ॥ध्रु.॥
मेळवितां अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥२॥
तुका म्हणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥३॥


२४३१
लागलें भरतें । ब्रह्मानंदाचें वरतें ॥१॥
झाला हरीनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥ध्रु.॥
बैसोनि सकळ । बाळ चालिले गोपाळ ॥२॥
तुका म्हणे वाट । बरवी सांपडली नीट ॥३॥


२७४५
लागे तुझी सोय करी ऐसे कांहीं । माझे विठाबाई माऊलिये ॥१॥
पतितपावन म्हणविसी जरी । अव्हेर न करी तरी माझा ॥ध्रु॥
नाहीं तरी ब्रीद टाकी सोडूनियां । न धरिसी माया जरी माझी ॥२॥
बोलियेला बोल करावा साचार । तरी लोक बरें म्हणतील ॥३॥
करावा संसार लोक लाजे भेणें । वचनासी उणें येऊं नेदी ॥४॥
तुम्हां आम्हां तसै नाही म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलग ॥५॥


१४८५
लागों दिलें अंगा । ऐसें कां गा सन्निध ॥१॥
कोण्या पापें उदय केला । तो देखिला प्रळय ॥ध्रु.॥
न देखवे पिडला सर्प । दया दर्प विषाचा ॥२॥
तुका म्हणे भलें । मज तो न वजे साहिलें ॥३॥


११८८
लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥
कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥
सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरीनामें ॥३॥
तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ती । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥४॥


१२५९
लागों नेदीं बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण ॥१॥
परनारी मज रखुमाईसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥२॥
तुका म्हणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥३॥


२१७२
लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संहारी नानापरिचीं लाघवें ॥१॥
पुरोनि पंढरिये उरलें भक्तीसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥
बहु काळें ना सावळें बहु कठिण ना कोंवळें । गुणत्रया वेगळें बहुबळें आथीलें ॥२॥
असोनि नसे सकळांमधीं मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधि तुका म्हणे श्रीविठ्ठल ॥३॥


२४५१
लाजती पुराणें । वेदां येऊं पाहे उणें ॥१॥
आम्ही नामाचे धारक । किविलवाणीं दिसों रंक ॥ध्रु.॥
बोलिले ते संतीं । बोल वायांविण जाती ॥२॥
तुका म्हणे देवा । रोकडी हे मोडे सेवा॥३॥


१८३१
लाज ना विचार । बाजारी तूं भांडखोर ॥१॥
ऐसें ज्याणें व्हावें । त्याची गांठी तुजसवें ॥ध्रु.॥
फेडिसी लंगोटी । घेसी सकळांसी तुटी ॥२॥
तुका म्हणे चोरा । तुला आप ना दुसरा ॥३॥


२०८७
लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥१॥
चुकलिया कामा मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥
पाय सांडूनिया फिरतों बासर । स्वामिसेवे चोर होऊनियां ॥२॥
तुका म्हणे मज पाहिजे दंडिलें । पुढें हे घडलें न पाहिजे ॥३॥


१७७०
लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥१॥
मोजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥
कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥२॥
चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥३॥
तुका म्हणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥४॥


२७२०
लाजोनियां काळें राहिलें लिखित । नेदितां ही चित्त समाधान ॥१॥
कैसें सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥ध्रु.॥
एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मायेचा पदर कळों येतो ॥२॥
होत्या आपल्या त्या वेचूनियां शक्ती । पुढें झालों युक्तिकळाहीन ॥३॥
तुका म्हणे तुम्ही समर्थ जी देवा । दुर्बळाची सेवा कोठें पावे ॥४॥


१६१२
लाडकी लेक मी संताची । मजवरी कृपा बहुतांची ॥१॥
अखई चुडा हातीं आला । आंकण मोती नाकाला ॥ध्रु.॥
बोध मुराळी शृंगारीला । चवऱ्यायनशींचा सिक्का केला ॥२॥
तुका तुकी उतरला । सहनकेचा कौल दिला ॥३॥


२१४७
लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥
तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥
कवतुकें घ्यावे लेंकराचे बोल । साहिलिया मोल ऐसें नाहीं ॥२॥
तुका म्हणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा क्षतें धुंडी ॥३॥


१८१२
लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुह्य भाव शुद्ध बोला ॥१॥
अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥ध्रु.॥
तुका म्हणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्धभावें ॥२॥


२६१९
लांब धांवे पाय चोरी । भरोवरी जनाच्या ॥१॥
आतां कैसें होय याचें । सिजतां काचें राहिलें ॥ध्रु.॥
खाय ओकी वेळोवेळां । कैसी कळा राहेल ॥२॥
तुका म्हणे भावहीण । त्याचा सीण पाचावा ॥३॥


१५७६
लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥१॥
खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ध्रु.॥
सेवी भांग आफू तंबाखू उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥२॥
तुका म्हणे ऐसा सर्वस्वें बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥३॥


३०७२
लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥
सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥
तुका म्हणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥३॥


२२९९
लाभ खरा नये तुटी । नाहीं आडखळा भेटी ॥१॥
जाय अवघिया देशा । येथें संचलाची तैसा ॥ध्रु.॥
मग न लगे पारखी। अवघीं सकट सारखीं । तुका म्हणे वोळे । रूपें भुलविले डोळे ॥३॥


१९५९
लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥१॥
घेई हरीनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । जालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा ॥ध्रु.॥
घेउनि माप हातीं । काळ मोवी दिवस राती । चोर लाग घेती । पुढें तैसें पळावें ॥२॥
हित सावकासें । म्हणे करीन तें पिसें । हातीं काय ऐसें । तुका म्हणे नेणसी ॥३॥


३१४५
लाभ पुढें करी । घात नारायण वारी ॥१॥
ऐसी भक्ताची माउली । करी कृपेची साउली ॥ध्रु.॥
माय बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥२॥
तुका म्हणे नाड । नाहीं शरणागता आड ॥३॥


३५००
लाल कंबली वोढे पेनाये । मोसु हरीथें कैसें बनाये ॥१॥
कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरीका कठिन कठोर ॥ध्रु.॥
नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥२॥
और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥३॥


३८०
लावुनि काहाळा । सुखें करितों सोहोळा ॥१॥
सादावीत गेलों जना । भय नाहीं सत्य जाणां ॥ध्रु.॥
गातां नाचतां विनोदें । टाळघागरीयांच्या छंदें ॥२॥
तुका म्हणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥३॥


३३१०
लावूनि कोलित । माझा करितील घात ॥१॥
ऐसे बहुतांचे संधी । सांपडला खोळेमधीं ॥ध्रु.॥
पाहातील उणें । तेथें देती अनुमोदनें ॥२॥
तुका म्हणे रिघे । पुढें नाहीं झालें धींद ॥३॥


२८०९
लावूनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठी । देऊनियां मिठी । पळे महिया माथुले ॥१॥
पुढे तेची करी आड । तिचा लोभ तिसी नाड । उरवी चरफड । हात गोउनी पळावें ॥ध्रु॥
आधीं काकुलती । मोहो घालावापुढती । तोंडी पडे माती । फिरतां मग कैचां तो ॥२॥
तुका म्हणे देवा । यासी रडवी याचा हेवा । भावें कां हे सेवा । सुखे तुम्हा नार्पीती ॥३॥


१५३२
लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥१॥
पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ध्रु.॥
कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हे नासीतसे ॥२॥
तुका म्हणे वाटे चित्त । करा फजित म्हणऊनि ॥३॥


३०७७
लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाठी देशोदेशीं ॥१॥
नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥ध्रु.॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥२॥


३८२६
लीळाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥
मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥ध्रु.॥
नभाचा ही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हातें त्यासि ॥२॥
हातें कुर्वाळुनी मुखीं घाली घांस । पुरे म्हणे तीस पोट धालें ॥३॥
पोट धालें मग देतसे ढेंकर । भक्तीचें तें फार तुळसीदळ ॥४॥
तुळसीदळ भावें सहित देवापाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥५॥
क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचें तें जळ गोड देवा ॥६॥
देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्याठायीं ॥७॥
त्यांचा हा अंकित सर्व भावें हरी । तुका म्हणे करी सर्व काज ॥८॥


४७१
लेकरा आईतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥१॥
त्यापरि आमचा जालासे सांभाळ । देखिला चि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥
भुकेचे संनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥२॥
आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥३॥


८५८
लेकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशीं उणें जालें ॥१॥
आम्हां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रम्हज्ञान आत्मिस्थति ॥ध्रु.॥
वचनाचा घेईन अनुभव पदरीं । जें हें जनाचारीं मिरवलें ॥२॥
तुका म्हणे माझी भोळिवेची आटी । दावीन शेवटीं कौतुक हें ॥३॥


१७५९
लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥
पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्व ही साहे ॥२॥
तुका म्हणे माझें । तैसे तुम्हां संतां ओझें ॥३॥


१३४२
लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी॥१॥
कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥
आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि घाली हृदयात ॥२॥
पोटा आलें त्याचे नेणे गुणदोष । कल्याण चि आस असावें हें ॥३॥
मनाची ते चाली मोहाचिये सोई । ओघें गंगा काई परतों जाणे ॥४॥
तुका म्हणे कोठें उदार मेघां शक्ती । माझी तृषा किती चातकाची ॥५॥


२८५०
लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाळ्याची ॥१॥
नये चि उत्तर कांहीं परतोनि । झालों नारायणे न सरतें ॥ध्रु.॥
लाजिरवाणी कां वदली हे वाचा । नव्हेचि ठायींचा मननशीळ ॥२॥
तुका म्हणे फळ नव्हे चि सायासा । पंढरीनिवासा काय झालें ॥३॥


२४११
लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥१॥
विषयां वंचलों मीपणा मुकलों । शरण तुज आलों पांडुरंगा ॥ध्रु.॥
घर दार अवघीं तजिलीं नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे पडिलों पुंडलिकापाशीं । धांव हृषीकेशी आळिंगीं मज ॥३॥


१७८१
लोकमान देहसुख । संपित्तउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिये भेटीवांचूनि ॥१॥
तरी मज ये भेट ये भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्यें वीट । तुज दैवें चि लाधली ॥ध्रु.॥
काय ब्रम्हज्ञान करूं कोरडें । रितें मावेचें मापाडें । भेटीविण कुडें । तुझिये अवघें मज वाटे ॥२॥ आत्मिस्थतीचा विचार । काय करूं हा उद्धार। न देखतां धीर । चतुर्भुज मज नाहीं ॥३॥
रिद्धीसिद्धी काय करूं । अथवा अगम्य विचारू । भेटीविण भारु । तुझिये वाटे मज यांचा ॥४॥
तुजवांचूनि कांहीं व्हावें । ऐसें नको माझिया जीवें। तुका म्हणे द्यावें । दरूषन पायांचें ॥५॥


१२२१
लोक म्हणती मज देव । हा तों अधर्म उपाव ॥१॥
आतां कळेल तें करीं । सीर तुझे हातीं सुरी ॥ध्रु.॥
अधिकार नाहीं । पूजा करिती तैसा कांहीं ॥२॥
मन जाणे पापा । तुका म्हणे मायबापा ॥३॥


३८७३
लोकां कळों आला देव आम्हांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥१॥
शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥ध्रु.॥
तेव्हा मग झाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥२॥
कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चित्त झालें त्यांचें ॥३॥
त्यांसि ठावा नाहीं बाहेरिल भाव । अंतरीं च वाव सुख झालें ॥४॥
सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥५॥
चिंतनें चि धालीं न लगे अन्नपाणी । तुका म्हणे मनीं समाधान ॥६॥


२४४६
लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत॥१॥
त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ध्रु.॥
कोटिगोहत्यापातक। त्यासी घडेल निष्टंक ॥२॥
मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥३॥
तुका म्हणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥४॥


२४८४
लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री । अग्नी टणत्कारी दिसों येतो ॥१॥
सांगावें तें काई सांगावें तें काई । चित्ता होय ठायीं अनुभव तो ॥ध्रु.॥
अन्नें सांगों येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊं हेवा ॥२॥
तुका म्हणे मिळे जीवनीं जीवन । तेथें कोणा कोण नांव ठेवी ॥३॥


४१४
लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें ॥१॥
तैसा तूं चि आम्हांठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥२॥
तुका म्हणे अधीलपणें । नेली लांकडें चंदनें ॥३॥


१४२९
लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥१॥
म्हणऊनि करीं पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणें परी ॥ध्रु.॥
एकविध आम्ही स्वामिसेवेसाठी । वरी तोचि पोटीं एकभाव ॥२॥
तुका म्हणे करीं सांगितलें काम । तुम्हां धर्माधर्म ठावे देवा ॥३॥


१३६६
लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥१॥
ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठांयींचिये ठांयीं हालों नये ॥ध्रु.॥
डहुळिल्या मनें वितुळलें रूप । नांवऐसें पाप उपाधीचें ॥२॥
तुका म्हणे देव प्रीतीनें कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या