संत तुकाराम गाथा १३ अनुक्रमणिका नुसार
६२१
मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥
२९३५
मंगळाचा मंगळ सांटा । विट तोटा नेणे तें ॥१॥
हें भरा सातें आलें । भलें भलें म्हणवावें ॥ध्रु.॥
जनीं जनार्दन वसे । येथें दिसे तें शुद्ध ॥२॥
तुका म्हणे बहुतां मुखें । खरें सुखें ठेवावें ॥३॥
६९९
मज अंगाच्या अनुभवें । काई वाईट बरें ठावें ॥१॥
जालों दोहींचा देखणा । नये मागें पुढें ही मना ॥ध्रु.॥
वोस वसती ठावी । परि हे चाली दुःख पावी ॥२॥
तुका म्हणे घेऊं देवा । सवें करूनि बोळावा ॥३॥
२६०५
मज अनाथाकारणें । करीं येणें केशवा ॥१॥
जीव झुरे तुजसाठी । वाट पोटीं पहातसें ॥ध्रु.॥
चित्त रंगलें चरणीं । तुजवांचूनि न राहे ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । माझी चिंता असावी॥३॥
२८९४
मज ऐसें कोण उद्धरिलें सांगा । ब्रीदें पांडुरंगा बोलतसां ॥१॥
हातींच्या कांकणां कायसा आरिसा । उरलों मी जैसा तैसा आहें ॥ध्रु.॥
धनमंत्री हरी रोग्याचिये वेथे । तें तों कांहीं येथें न देखिजे ॥२॥
तुका म्हणे नाहीं अनुभव अंगें । वचन वाउगें कोण मानी ॥३॥
२८५४
मज कांहीं सीण न व्हावा यासाठी । कृपा तुम्हां पोटीं उपजलीं ॥१॥
होतें तैसें केलें आपलें उचित । शिकविलें हित बहु बरें ॥ध्रु.॥
आम्ही न मनावी कोणाची आशंका । तुम्हां भय लोकां आहे मनीं ॥२॥
तुका म्हणे आतां संचिताचा ठेवा । वोढवला घ्यावा जैसा तैसा ॥३॥
१९९९
मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं ॥१॥
व्याला वाडविलें ह्मुण । मज सुख तुज सीण ॥ध्रु.॥
माझें पोट धालें । तुझे अंगीं उमटलें ॥२॥
तुका म्हणे खेळें । तेथें तुमचिया बळें ॥३॥
४०४२
मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मूर्तीमंत । म्हणोनि उद्वेगलें चित्त । आहा च भक्ती ऐसा दिसें ॥१॥
ध्यानीं म्या वर्णावेति कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आस लागलोंसें ॥ध्रु.॥
कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा । आम्हां लेंकरांसि पीडा । एक मागें जोडा दुसयाचा ॥२॥
सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥३॥
नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेति नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अज्ञाना समजावीं ॥४॥
बहुत दिवस केला बोभाट । पाहातां श्रमलों ते वाट । तुका म्हणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामीया ॥५॥
१९२५
मज त्याची भीड नुलंघवे देवा । जो म्हणे केशवा दास तुझा ॥१॥
मज आवडती बहु तैसे जन । करिती कीर्तन कथा तुझी ॥ध्रु.॥
सांडूनियां लाज नाचेन त्यांपुढें । आइकती कोडें नाम तुझें ॥२॥
न लगे उपचार होईन भिकारी । वैष्णवांच्या घरीं उष्टावळी ॥३॥
तुका म्हणे जाणों उचित अनुचित । विचारूनि हित तें चि करूं ॥४॥
३२
मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥१॥
मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥
नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥
तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥
२४०२
मज नष्टा माया मोह नाहीं लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा ॥१॥
धिग हें शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥ध्रु.॥
मजहून नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहुमोल ॥२॥
न दिसती मज आपलेसे गुण । संचित तें कोण जाणे मागें ॥३॥
तुका म्हणे देखोनियां काई । पांडुरंगा पायीं राखियेलें ॥४॥
१७०७
मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें ॥१॥
नेणतें लेंकरूं आवडीचें तान्हें । बोलतों वचनें आवडीनें ॥ध्रु.॥
भक्ती नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाई भार तुज ॥२॥
तुका म्हणे नाचें निर्लज्ज होऊनि । नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥३॥
२११६
मज नाहीं धीर । तुम्ही न करा अंगीकार ॥१॥
ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥
चालों नेणें वाट । केल्या न पवाची बोभाट ॥२॥
वेचों नेणे जीवें । तुका उदास धरिला देवें॥३॥
८२९
मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥१॥
कोणाचा कोणासीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ध्रु.॥
काढा जी मोह बुंथा जाळ । नका लावूं बळें वेड आम्हां ॥२॥
जीव शिव कांही ठेवियेलीं नांवें । सत्य तुम्हां ठावें असोनियां ॥३॥
सेवेच्या अभिळासें न धरा चि विचार । आम्हां दारोदार हिंडविलें ॥४॥
आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥५॥
तुका म्हणे काय छायेचा अभिळासे । हंस पावे नाश तारागणीं ॥६॥
२१०७
मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ता वाटतसें ॥१॥
याचा कांहीं तुह्मीं देखावा परिहार । सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥
काम क्रोध नाहीं सांडिलें आसन । राहिले वसोन देहामध्यें ॥२॥
तुका म्हणे आतां जालों उतराई । कळों यावें पायीं निरोपिलें ॥३॥
१२६९
मज माझा उपदेश । आणिकां नये याचा रीस ॥१॥
तुम्ही अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥ध्रु.॥
तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥२॥
तुका पाय धरी । मी हें माझें दुर करीं ॥३॥
१६९७
मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥१॥
तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥
वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥२॥
तुका म्हणे नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥३॥
३९९
मज संतांचा आधार । तूं एकलें निर्वीकार ॥१॥
पाहा विचारूनि देवा । नको आम्हांसवें दावा ॥ध्रु.॥
तुज बोल न बोलवे। आम्हां भांडायाची सवे ॥२॥
तुका म्हणे तरी । ऐक्यभाव उरे उरी ॥३॥
३४३४
मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥
न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥
तुका म्हणे झालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥
२९३
मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥१॥
बैस सांडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ध्रु.॥
येथें न सरे चार । हीण आणीक वेव्हार ॥२॥
तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥३॥
१५९३
मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला ॥१॥
या रे या रे हातोहातीं । काय माती सारावी ॥ध्रु.॥
रोजकीदव होतां झाडा । रोकडा चि पर्वत ॥२॥
तुका म्हणे खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥३॥
४५७
मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहें ॥१॥
तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥
ओटीच्या परिस मुठीचें तें वाढे । यापरि कैवाडें स्वहिताचें ॥२॥
नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥३॥
तुका म्हणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥४॥
२२३२
मतिविण काय वर्णु तुझें ध्यान । जेथें पडिलें मौन्य वेदश्रुती ॥१॥
करूनि गोजिरा आपुलिये मती । धरियेलें चित्तीं चरणकमळ ॥ध्रु.॥
सुखाचें ओतिलें पाहों ते श्रीमुख । तेणें हरे भूक तान माझी ॥२॥
रसना गोडावली ओव्या गातां गीत । पावलेंसे चित्त समाधान ॥३॥
तुका म्हणे माझी दृष्टि चरणांवरी । पाउलें गोजिरीं कुंकुमाचीं ॥४॥
२२२०
मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥१॥
आशौच तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥ध्रु.॥
रागज्ञानघात चुकतां होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक॥२॥
आणिकां भजना बोलिला निषेध । नाम तें अभेद सकळां मुखीं ॥३॥
तुका म्हणे तपें घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामें ॥४॥
३४८९
मंत्रतंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥१॥
राम कहे त्यागे पगहूं लागूं । देखत कपट अभिमान दुर भागूं ॥ध्रु.॥
अधिक याती कुलहीन नहिं ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानूं ॥२॥
कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥३॥
१०७८
मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथ्वीचा भार वाहावया ॥१॥
काय धाक आम्हां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥
शंखचक्रगदा आयुधें अपार । वागवितो भार भक्तांसाठी ॥२॥
पांडवां जोहरी राखिलें कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥३॥
३१८७
मथनासाठी धर्माधर्म । त्याचें वर्म नवनीत ॥१॥
तें चि तें घाटूं नये । आलें जाय नासूनि ॥ध्रु.॥
सांभाळावें वरावर । वर्म दूर न वजावें ॥२॥
तुका म्हणे धालें पोट । मग बोटचांटणी ॥३॥
१३३५
मथनीचें नवनीत । सर्व हितकारक ॥१॥
दंडवत दंडा परी । मागें उरी नुरावी ॥ध्रु.॥
वचनाचा तो पसरुं काई । तांतडी डोईपाशींच ॥२॥
तुका म्हणे जगजेठी । लावीं कंठीं उचलूनि ॥३॥
२८८३
मथनें भोगे सार । ताकें घडे उपकार ॥१॥
बरवी सायासाची जोडी । अनुभविया ठावी गोडी ॥ध्रु.॥
पाक आणि रुचि । जेथें तेथें ते कइंची ॥२॥
वाढितो पंगती । तुका आवडी संगती ॥३॥
१६७८
मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥१॥
तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥
नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥२॥
जीवींचें ते जाणा । तुका म्हणे नारायणा ॥३॥
१९७२
मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥१॥
आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट ॥ध्रु.॥
आलें अंगासी तें बिळवंत गाढें । काय वेड्यापुढें धर्मनीत ॥२॥
तुका म्हणे कळों येईल तो भाव । अंगावरील घाव उमटतां ॥३॥
३०२८
मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाड प्रेम असो ॥१॥
प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥ध्रु.॥
जननिंदा होय तो बरा विचार । थोरवीचा भार कामा नये ॥२॥
तुका म्हणे भाव निष्टावंत चित्तीं । दया क्षमा शांत सर्वां भूतीं ॥३॥
३९४
मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥१॥
मागें परती तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ध्रु.॥
येऊनियां घाली घाला । नेणों काय होई तुला ॥२॥
तुका म्हणें येणें । बहु नाडिले शाहाणे ॥३॥
२६५९
मन जालें भाट । कीर्ती मुखें घडघडाट । पडियेली वाट । ये चि चाली स्वभावें ॥१॥
बोलें देवाचे पवाडे । नित्य नवे चि रोकडे । ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनि ॥ध्रु.॥
रोखीं रहावें समोर । पुढें मागें चाले भार । करावें उत्तर । सेवा रुजू करूनि ॥२॥
पूर वर्षला देकारें । संतोषाच्या अभयें करें । अंगींच्या उत्तरें । तुकया स्वामी शृंगारी ॥३॥
१७५५
मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥
आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥
धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥२॥
तुका म्हणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥३॥
४४५
मनवाचातीत तुझें हें स्वरूप । म्हणोनियां माप भक्ती केलें ॥१॥
भक्तीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥ध्रु.॥
योग याग तपें देहाचिया योगें । ज्ञानाचिया लागें न सांपडेसी ॥२॥
तुका म्हणे आम्ही भोळ्या भावें सेवा । घ्यावी जी केशवा करितों ऐसी ॥३॥
३४५
मन वोळी मना । बुद्धी बुद्धी क्षण क्षणां ॥१॥
मी च मज राखण जालों । ज्याणें तेथें चि धरिलों ॥ध्रु.॥
जें जें जेथें उठी। तें तें तया हातें कुंटी ॥२॥
भांजिली खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥३॥
३३३०
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥
मनें प्रतिमा स्थापिली । मनें मन पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥
१९१३
मना एक करीं । म्हणे जाईन पंढरी । उभा विटेवरी । तो पाहेन सांवळा ॥१॥
करीन सांगती तें काम । जरी जपसी हें नाम । नित्य वाचे राम । हरी कृष्ण गोविंद ॥ध्रु.॥
लागें संतांचिया पायां । कथे उल्हास गावया । आलों मागावया । शरण देई उचित ॥२॥
नाचें रंगीं वाहें टाळी । होय सादर ते काळीं । तुका म्हणे मळी । सांडूनियां अंतरी ॥३॥
२८२३
मनाचिये साक्षी झाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥१॥
तुम्हां परामृश घेणें सत्ताबळें । धरितां निराळें कैसीं वांचों ॥ध्रु.॥
मी माझें सांडून यावया पसारा । आणीक दातारा काय काज ॥२॥
तुका म्हणे आम्ही तुजविण एका । निढळें लौकिका माजी असों ॥३॥
३९०८
मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा ॥१॥
वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥
नाहीं झालें ज्ञान पाहिलें अक्षर । मानी जैसें थोर थोरी नाहीं ॥३॥
नाहीं मनीं लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसि ॥४॥
चतुरांच्या राया मी तुझें अंकित । झालों शरणागत देवदेवा ॥५॥
देवा आतां करीं सरतीं हीं वचनें । तुझ्या कृपादानें बोलिलों तीं ॥६॥
तुझें देणें तुझ्या समर्पूनि पायीं । जालों उतरायी पांडुरंगा ॥७॥
रंकाहुनि रंक दास मी दासांचें । सामर्थ्य हें कैचें बोलावया ॥८॥
बोलावया पुरे वाचा माझी कायी । तुका म्हणे पायीं ठाव द्यावा ॥९॥
३३८१
मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी ।
असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥१॥
ऐसा सर्वभावें तुज शरण आलों । देहदुःख हें भोगितां फार भ्यालों ।
भवतारितें दूसरें नाहिं कोणी । गुरु होत कां देव आणिक तीन्ही ॥२॥
जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती ते चि सोये ।
करीं सर्व संगी परि त्यागु ठायीं । तुका विनवी ठेवुनि शीर पायीं ॥३॥
६३२
मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥१॥
जातीचें तें झुरे येर येरासाठी । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥
भेटीची अपेक्षा वारता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरीजन प्राणसखे ॥३॥
३९२५
मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी ।
पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आम्हांवरी गा ॥१॥
म्हणउनि आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा ।
दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा॥ध्रु.॥
सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण ।
कडे चुकवुनि कांटवण । ऐका आणिली तीं कोण कोण गा ॥२॥
पुढें भक्तिनें धरिलें हातीं । मागें ज्ञान वैराग्य धर्म येती ।
स्थिर केलीं जीं आचपळें होतीं । सद्धि आणुनि लाविलीं पंथीं गा ॥३॥
केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय ।
धर्में त्याच्या हे देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥४॥
होतों पीडत हिंडतां गांव । पोट भरेना राहावया ठाव ।
तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बांधव गा ॥५॥
३८१०
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥
रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥
सीण झाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥३॥
दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥
पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥
गर्भासी तयांच्या आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप ॥६॥
आपेंआप बेड्या तुटल्या शंकळा । बंदाच्या आर्गळा कुलुपे कोंडे ॥७॥
कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष नलगतां ॥८॥
न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥९॥
नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं झाला गोवा सवें देव ॥१०॥
सवें देव तया आड नये कांहीं । तुका म्हणे नाहीं भय चिंता ॥११॥
३८१९
मनें हरीरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥
यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरी एकां लेंक ॥३॥
एक भाव नाहीं सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीति तैसें रूप ॥४॥
रूप याचें आहे अवघें चि एक । परि कवतुक दाखविलें ॥५॥
लेंकरूं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥६॥
कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥
३७३
मनोमय पूजा । हे चि पढीयें केशीराजा ॥१॥
घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाह्य रंग ॥ध्रु.॥
अंतरींचें जाणे । आदिवर्तमान खुणे ॥२॥
तुका म्हणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥३॥
२२३७
मरण माझें मरोन गेलें । मज केलें अमर ॥१॥
ठाव पुसिलें बुड पुसिलें । वोस वोसलें देहभावा ॥ध्रु.॥
आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥२॥
तुका म्हणे बुनादीचें । जालें साचें उजवणें ॥३॥
८६८
मरणा हातीं सुटली काया । विचारें या निश्चयें ॥१॥
नासोनियां गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥ध्रु.॥
न देखें सें जालें श्रम । आलें वर्म हाता हें ॥२॥
तुका म्हणे कैची कींव । कोठें जीव निराळा ॥३॥
३४३९
मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥१॥
आतां तुम्ही पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥२॥
तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसे संग सरी तुम्हां आम्हां ॥३॥
१०८०
मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥
चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥
केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंतातळमळ नाहीं ऐसी ॥२॥
काळें तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र जालें सज्जनसखें ॥३॥
तुकयाबंधु म्हणें अवघ्या दशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥४॥
२६९५
मरोनियां गेली माया । मग तया कोण पुसे ॥१॥
पोरटियांची दाद कोणा । ऐसा जाना प्रवाहो ॥ध्रु.॥
निढळास निढळ जोडा । होय कोडा कवतुका ॥२॥
तुका म्हणे देवाऐसी । आहों सरसीं आपण ॥३॥
३५५७
मविलें मविती । नेणों रासी पडिल्या किती ॥१॥
परि तूं धाला चि न धासी । आलें उभाउभीं घेसी ॥ध्रु.॥
अवघ्यां अवघा काळ । वाटा वाहाती सकळ ॥२॥
तुका म्हणे नाहीं । अराणूक तुज कांहीं ॥३॥
३६८३
मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥१॥
पोरा हमामा रे हमामा रे ॥ध्रु.॥
मशीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥२॥
तरीच मशीं बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥३॥
मशीं घेतां भास । जीवा मीतूंपणा नास ॥४॥
मज सवें खरा । पण जाऊं नेदी घरा ॥५॥
आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥६॥
तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥७॥
३०
महारासि सिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥
तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥
नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥२॥
ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥३॥
७२४
महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥१॥
पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तो ॥ध्रु.॥
विरुळा पावे विरुळा पावे । अवघड गोवे सेवटीचे ॥२॥
उंच निंच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥३॥
झळके तेथें पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥४॥
पावेल तो पैल थडी । म्हणों गडी आपुला ॥५॥
तुका म्हणे उभाऱ्यानें । खरें कोण मानितसे ॥६॥
मा
२८४२
माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राण प्रीती ॥१॥
ऐसी बळिवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ध्रु.॥
मोहें मोहियेलें सर्वकाळ चित्त । विसरु तो घेत नाहीं क्षण ॥२॥
तुका म्हणे दिला प्रेमाचा वोरस । सांभाळिलें दास आपुलें तें ॥३॥
३११६
माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥१॥
अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥
मायबापाची उपमा। तुज देऊं पुरुषोत्तमा ॥२॥
ते ही साजेना पाहातां । जीवलगा पंढरिनाथा ॥३॥
माय पाळी संसारीं । परलोक राहे दुरी ॥४॥
तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥५॥
तुका म्हणे नारायणा । तुम्हां बहुत करुणा ॥६॥
३३०६
माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता तो निराळे वरील सारी ॥१॥
एका रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ध्रु.॥
सुनियांसी क्षीर चारील्या ओकवी । भोगित्यां पोसवी धणीवरी ॥२॥
तुका म्हणे मूर्ख वागविती भार । नेतील तें सार परीक्षक ॥३॥
१०७
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥
४०९२
मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥१॥
या संतांसी निरवीं हें मज देई । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥२॥
तुका म्हणे आतां उदार होई । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥३॥
२०२३
मागणें तें मागों देवा । करूं भक्ती त्याची सेवा ॥१॥
काय उणे तयापाशीं । रिद्धीसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥
कायावाचामन । करूं देवा हें अर्पण ॥२॥
तुका म्हणे विश्वंभर । ज्याच्यानें हें चराचर ॥३॥
१७८४
मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देई मज हरी कृपादान ॥१॥
प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥
सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥२॥
तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥३॥
संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥४॥
तुका म्हणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥५॥
९२०
मागतां विभाग । कोठें लपाल जी मग ॥१॥
संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकिया खुणा ॥ध्रु.॥
होइन धरणेकरी । मग मी रिघों नेदीं बाहेरी ॥२॥
तुका म्हणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥३॥
१७५६
मागतियाचे दोनचि कर । अमित भांडार दातियाचें ॥१॥
काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥
एकें सांठवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥२॥
तुका म्हणे आतां आहे तेथें असो । अंखुनियां बैसों पायांपाशीं ॥३॥
२८५७
मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें ॥१॥
कासया मी होऊं उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ध्रु.॥
झाला तरी वेळ कवतुकासाठी । निर्दया तों पोटीं उपजेना ॥२॥
तुका म्हणे त्यासी ठाउकें उचित । होईंल संकेत नेमियेला ॥३॥
५९६
मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥१॥
लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥
हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥२॥
तुका म्हणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥३॥
३७५९
मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥
तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ध्रु.॥
वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥२॥
तुका म्हणे तूं आम्हां वेगळा । राहें गोपाळा म्हणउनी ॥३॥
२६९९
मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाहीं ॥१॥
म्हणऊनि सारिली आस । होती यास मूळ तें ॥ध्रु.॥
माझ्या मोहें तुज पान्हा । लोटे स्तना वोरसे ॥२॥
तुका म्हणे आळवणे । माझ्या देणें उत्तरा ॥३॥
३५२५
मागितल्यास पसरी कर । पळतां भरी वाखती ॥१॥
काय आम्ही नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ध्रु.॥
बोलतां बरें येतां रागा । कठीण लागा मागेंमागें ॥२॥
तुका म्हणे येथें बोली । असे चाली उफराटी ॥३॥
१४७६
मागील ते आटी येणें घडे सांग । सुतविल अंग एका सूत्रें ॥१॥
पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥ध्रु.॥
आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥२॥
तुका म्हणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥३॥
२७७६
मागील विसर होईंल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥
दोहींचें अहिक्य घालीं गडसंदीं । स्थिरावली बुद्धी पायांपाशीं ॥ध्रु.॥
अहाच या केलों देहपरिचारें । तुमचें तें खरें वाटों नये ॥२॥
तुका म्हणे व्हावें लवकरी उदार । मी आहें सादर प्रतिग्रहा ॥३॥
४०५१
मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥१॥
लक्ष चौयाशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा। वोळसा थोरा मायाजाळीं ॥२॥
पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥३॥
नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देव चि म्हणती ते होती । तरि कां चित्तीं न धरावें ॥४॥
क्षण एक मन स्थिर करूनी । साव होई डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥५॥
२४३६
मागें चिंता होती आस । केला नास या काळें ॥१॥
तुम्ही आम्हां उदासीन । भिन्नाभिन्न वारिलें ॥ध्रु.॥
मोहजाळें दुःख वाढे । ओढे ओढे त्यास तें ॥२॥
तुका म्हणे कोण देवा । आतां हेवा वाढवी ॥३॥
२०८५
मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥१॥
ऐसें ग्वही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥
पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥२॥
तुका म्हणे जाली कोंबड्याची परी । पुढें चि उकरी लाभ नेणें ॥३॥
१५८
मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥१॥
परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥
उपदेशा वरी मन नाहीं हातीं । तो आम्हां पुढती पाहूं नये ॥२॥
तुका म्हणे साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥३॥
२९००
मागें पुढें झालों लाटा । अवघा मोटा सरळ ॥१॥
नाहीं कोठें रितें अंग । नित्य रंग नवा चि ॥ध्रु.॥
पोसिंद्याचे पडिलों हातीं । वोझें माती चुकली ॥२॥
जोगावलों पोटीं खर । पाठी भार वरी नाहीं ॥३॥
अवघिया मोकळ्या दिशा । नाहीं वोळसा कामाचा ॥४॥
संताचिये लोळें द्वारीं । पळती दुरी गोमाशा ॥५॥
पातोगें महाद्वारीं । वरी झुली वाकळा ॥६॥
कांहीं न साहेसा झाला । तुका नेला समर्थे ॥७॥
२९४१
मागें पुढें नाहीं । दुजें यावेगळें कांहीं ॥१॥
नाहीं उरलें आणीक । केला झाडा सकळिक ॥ध्रु.॥
विश्वासावांचून । नांवें दुजियाचे शून्य ॥२॥
तुका म्हणे कांहीं । बोलायची उरी नाहीं ॥३॥
३७५१
मागें पुढें पाहें सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखे गडियांसि ॥१॥
मुरडे दंडा दोहीं तोंडें गडियां सावध करी । भेटतियासंगे तया हाल तुजवरी ॥ध्रु.॥
गडियां गडी वांटुनि देई । ज्याचा सोडी तेचि ठायीं ॥२॥
अगळ्या बळें करील काय । तुज देणें लागे डोय ॥३॥
नवां घरीं पाउला करीं । सांपडे तो तेथें धरीं ॥४॥
जिंकोनि डाव करीं । टाहो सत्ता आणिकांवरी ॥५॥
सांपडोनि डाईं बहु । काळ गुंतलासी ॥६॥
बळिया गडी फळी । फोडी न धरितां त्यांसी ॥७॥
चुकांडी जो खाय मिळोनि अंगीं जाय । गुंतलासी काय तुका म्हणे अझूनी ॥८॥
३१२५
मागें बहुत झाले खेळ । आतां बळ वोसरलें ॥१॥
हालों नये चालों आतां । घट रिता पोकळ ॥ध्रु.॥
भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥२॥
तुका म्हणे पाहतां घडी । जगा जोडी अंगारा ॥३॥
२२१८
मागें बहुतां जन्मीं हें चि करित आलों आम्ही । भवतापश्रमी दुःखें पीडिलीं निववूं त्यां ॥१॥
गर्जो हरीचे पवाडे मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढूं पाषाणामध्यें ॥ध्रु.॥
भाव शुद्ध नामावळी हर्षे नाचों पिटूं टाळी । घालूं पायां तळीं ।कळीकाळ त्याबळें ॥२॥
कामक्रोध बंदीखाणी तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचे धणी आम्ही जालों गोसांवी ॥३॥
२४४८
मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥१॥
ऐसें ठावें झालें मज बरव्या परी । म्हणऊनि करीं धांवा तुझा ॥ध्रु.॥
माझेविशीं तुज पडिला विसरु । आतां काय करूं पांडुरंगा ॥२॥
अझुनि कां नये तुह्मासी करुणा । दुरि नारायणा धरिलें मज ॥३॥
तुका म्हणे जीव जाऊं पाहे माझा । आतां केशीराजा घालीं उडी ॥४॥
२२७९
मागें शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥१॥
पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥
अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥२॥
गजेंद्रपशु नाडियें जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥३॥
प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥४॥
पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥५॥
तुका म्हणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥६॥
५३८
मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥१॥
आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥
वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥२॥
वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥३॥
तुका म्हणे किती करावे फजित । ते चि छंद नित्य बहु होती ॥४॥
१२५०
मागेन तें एक तुज । देई विचारोनि मज ॥१॥
नको दुर्जनांचा संग । क्षणक्षणा चित्तभंग ॥ध्रु.॥
जन्म घेईन मी नाना । बहु सोसीन यातना ॥२॥
रंक होईन दीनांचा । घायें देहपात साचा॥३॥
तुका म्हणे हें चि आतां । देई देई तूं सर्वथा ॥४॥
४०४८
माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भक्ती तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥१॥
धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त । नेणें पुजों ब्राम्हण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥२॥
नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियांसी ॥३॥
तीर्थ करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें । देव जरि आहे म्हणों मजसवें । तरि आपपरावें न वंचे ॥४॥
म्हणोनि झालों शरणागत । तुझा दास मी अंकित । यास कांहीं न लगे संचित । झालों निश्चिंत तुका म्हणे ॥५॥
१९१०
माझा तुह्मी देवा केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळे ॥१॥
कां हो कांहीं माझ्या नये अनुभवा । विचारितां देवा आहें तैसा ॥ध्रु.॥
लौकिकाचा मज लाविसी आभार । शिरोरत्नभार दुःखाचा हा ॥२॥
तुका म्हणे नाहीं पालट अंतरीं । तेथें दिसे हरी ठकाठकी ॥३॥
३९१४
माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें ॥१॥
या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी । करील झाडणी । भूत काढी संसार ॥ध्रु.॥
पडिले विषयांचे गोंधळीं । ते त्रिगुण आकळी । हरीनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥२॥
घेतला अहंकारें । काम क्रोध या मत्सरें । पळती प्रेमभरें । अवघे ठाव सांडुनी ॥३॥
घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥४॥
तुका म्हणे द्यावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । कांहीं कोठें हिंडावें ॥५॥
७०१
माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥
बोलविलें तें चि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥
सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद म्हणियारा ॥२॥
तुका म्हणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥३॥
२९९३
माझा बाप दिनानाथ । वाट भक्तांची पाहात ॥१॥
कर ठेवुनियां करीं । उभा चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
गळां वैजयंतीमाळा । रूपें डोळस सांवळा ॥२॥
तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ॥३॥
३५२३
माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं ॥१॥
तुमच्या नामाची जतन । नव्हतां थोर वाटे सीण ॥ध्रु.॥
न पडावी निंदा । कानीं स्वामींची गोविंदा ॥२॥
तुका म्हणे लाज । आम्हां स्वामीचें तें काज ॥३॥
११९८
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥
तीर्थे तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥२॥
तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥३॥
२४७६
माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चित्तीं पांडुरंगा ॥१॥
भांडवल गांठी झालेंसे पुरतें । समाधान चित्तें मानियेलें ॥ध्रु.॥
उदंड उच्चारें घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा॥२॥
तुका म्हणे मज भक्तीची आवडी । अभेदीं तांतडी नाहीं ह्मुण ॥३॥
२१२४
माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥१॥
इच्छतां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंतले हो ॥ध्रु.॥
देह आम्ही केला भोगाचे सांभाळीं । राहिलों निराळीं मानामानां ॥२॥
तुका म्हणे कोणें वेचावें वचन । नसतां तो सीण वाढवावा ॥३॥
२७९५
माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे ॥१॥
पाय चित्तीं रूप डोळांच राहिलें । चिंतने गोविलें मुख सदा ॥ध्रु.॥
अवघियांचा झाला विसर हा मागें । वेध हा श्रीरंगें लावियेला ॥२॥
तुका म्हणे कानीं आइकली मात । तोचि झाला घात जीवपणा ॥३॥
२७
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥
भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥
टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥२॥
यावें कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥३॥
११५०
माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें ।
पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥१॥
काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख ।
नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती डोळा माझें मुख ॥ध्रु.॥
काया वाचा मनें अघटित करणें । चर्मचक्षु हात पाय ।
निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ॥२॥
लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद ।
पितृवचन घडली अवज्ञा अविचार। कुटिल कचर वादी निंद्य ॥३॥
आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन ।
भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट शब्द हीन ॥४॥
संत महानुभाव ऐका हें उत्तरें। अवगुण अविचारें वृद्धि पापा ।
तुका म्हणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥५॥
१७८०
माझिया संचिता । दृढ देखोनि बळिवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥१॥
तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एका संपादिसी । मान करिसी येकाचा ॥ध्रु.॥
तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न चले तयापुढें । काय तुज म्यां कोंडें । रें सांकडें घालावें ॥२॥
भोगाधीपति क्रियमाण । तें तुज नांगवे अजून । तरि का वांयांविण । तुज म्यां सीण करावा ॥३॥
तुज नव्हतां माझें कांहीं । परि मी न संडीं भक्तीसोई । हो कां भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥४॥
तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं मागणें ते आशा । तुका म्हणे ऐसा । कांहीं न धरीं संकोच ॥५॥
१९३६
माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥१॥
आवडे ज्या हरी अंतरापासूनि । ऐसियाचे मनीं आर्त माझें ॥ध्रु.॥
तयालागीं जीव होतो कासावीस । पाहातील वास नयन हे ॥२॥
सुफळ हा जन्म होईल तेथून । देतां आलिंगन वैष्णवांसी ॥३॥
तुका म्हणे तोचि सुदिन सोहळा । गाऊं या गोपाळा धणीवरी ॥४॥
२७८९
माझिये बुद्धीचा खुंटला उपाय । करिसील काय पाहणे तें ॥१॥
सूत्रधारी तूं हें सकळचाळिता । कासया अनंता भार वाहों ॥ध्रु.॥
वाहिले संकल्प न पवती सिद्धी । येऊं देहबुद्धीवरी नयों ॥२॥
तुका म्हणे दुःखी करिती तरंग । चिंतूं पांडुरंग आवरूनि ॥३॥
३४५४
माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुरावो ॥१॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नोहे गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥
जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥२॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटे ॥३॥
तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥४॥
३४५६
माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार झालों आतां ॥१॥
तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ध्रु.॥
ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥२॥
जीवभाव तुझ्या ठेवियेला पायीं । हें चि आतां नाही लाज तुम्हां ॥३॥
तुका म्हणे संतीं घातला हवाला । न सोडीं विठ्ठला पाय तुझे ॥४॥
२२१
संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥
तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥
कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥२॥
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥३॥
१९५१
माझी आतां लोक सुखें निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला ॥१॥
कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करूं देवा ॥ध्रु.॥
तुका म्हणे काय करूं लापनिक । जनाचार सुख नासिवंत ॥२॥
२३२४
माझी आतां सत्ता आहे । तुम्हां पायां हे वरती ॥१॥
एकाविण नेणें दुजा । पंढरिराजा सर्वांगें ॥ध्रु.॥
पुरवावी केली आळी । जे जे काळीं मागेन तें ॥२॥
तुका म्हणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलों ॥३॥
५४
माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥१॥
तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ध्रु.॥
उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥२॥
तुका म्हणे बाहेरमुदी । आहा च गोविंदीं न सरती ॥३॥
६१८
माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥१॥
मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥
आतां अनारिसा । येथं न व्हावें सहसा ॥२॥
तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥३॥
३३५३
माझी मज आली रोकडी प्रचीत। होऊनि फजित दुःख पावे ॥१॥
काहीं द्वेष त्याचा करितां अंतरी। व्यथा या शरीरीं बहुत झाली ॥ध्रु.॥
ज्ञानेश्वरें मज केला उपकार। स्वप्नीं सविस्तर सांगितले ॥२॥
तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आंम्हा थोर । कां जो अवतार नामयाचा ॥३॥
त्याची तुज कांही घडलीरे निंदा। म्हणोनी हे बाधा जडली तुज ॥४॥
आता एक करी सांगेन ते तुला । शरण जी त्याला निश्चयेसी ॥५॥
दर्शनेचि तुझ्या दोषा परिहार । होय तो विचार सांगितला ॥६॥
तोचि हा विश्वास धरोनि मानसी । जाय कीर्तनासी नित्य काळ ॥७॥
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे । झालें हें आराम देह माझें ॥८॥
१३०९
माझी मज जाती आवरली देवा । न व्हावा या गोवा इंद्रियांचा ॥१॥
कासया मी तुझा म्हणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥
भयाचिया भेणें धरियेली कास । न पुरतां आस काय थोरी ॥२॥
तुका म्हणे आपआपुलीं जतन । कैचें थोरपण मग तुम्हां ॥३॥
९३७
माझी मेलीं बहुवरिं । तूं कां जैसा तैसा हरी ॥१॥
विठो कैसा वांचलासि । आतां सांग मजपाशीं ॥ध्रु.॥
तुज देखतां चि माझा । बाप मेला आजा पणजा ॥२॥
आम्हां लागलेंसे पाठी । बालत्व तारुण्यें काठीं ॥३॥
तुज फावलें तें मागें । कोणी नसतां वादिलागें ॥४॥
तुका म्हणे तुझ्या अंगीं । मज देखता लागलीं औघीं ॥५॥
६८१
माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥१॥
कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥
केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥२॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥
११२२
माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें ॥१॥
विसरणे रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥
विसरतां हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥२॥
तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाये । संजीवनी आहे हृदयामाजी ॥३॥
२०९३
माझे अंतरींचें तोचि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥१॥
जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥
सुखसमारंभें संतसमागमें । गाऊं वाचे नाम विठोबाचें ॥२॥
गातां पुण्य होय आइकतां लाभ । संसारबंद तुटतील ॥३॥
तुका म्हणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणें ॥४॥
६५४
माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥१॥
तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥
दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥२॥
तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥३॥
३७३६
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥
आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥
घाबरियांच्या मीडा काड्या । धाडा भ्याडा वळतियां ॥२॥
तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥
३६६५
माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥१॥
चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥
चोर कुठोरि एके चि ठायीं । वेगळें पाहावें नलगेच कांहीं ॥२॥
आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥३॥
आपल्या आपण शोधिलें तींहीं । करीन मी ही ते चि परी ॥४॥
तुका म्हणे माझें हित चि झालें । फाटकें जाउन धडकें आलें ॥५॥
२२७
माझें चित्त तुझे पायीं । राहें ऐसें करीं कांहीं । धरोनियां बाहीं । भव तारीं दातारा ॥१॥
चतुरा तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळां मणि । तूं चि धन्य विठोबा ॥ध्रु.॥
करीं त्रिमिराचा नाश । दीप होउनि प्रकाश । तोडीं आशापाश । करीं वास हृदयीं ॥२॥
पाहें गुंतलों नेणतां । तुज असो माझी चिंता । तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥३॥
१३१५
माझें जड भारी । आतां अवघें तुम्हांवरी ॥१॥
जालों अंकित धंकिला । तुमचा मुकलों मागिला ॥ध्रु.॥
करितों जें काम । माझी सेवा तुझें नाम ॥२॥
तुका पायां लागे । कांहीं नेदी ना न मगे ॥३॥
२९९४
माझें जीवन तुझे पाय । कृपाळुं तूं माझी माय ॥१॥
नेदीं दिसों किविलवाणें । पांडुरंगा तुझें तान्हें ॥ध्रु.॥
जन्ममरण तुजसाठी । आणीक नेणें दुजी गोष्टी ॥२॥
तुका म्हणे तुजविण । कोण हरील माझा सीण ॥३॥
२८४५
माझे तों फुकाचे काय वेचे कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुम्हांऐसा ॥१॥
कांहीं च न वंचीं आजिच्या प्रसंगीं । सकळा ही अंगीं करीन पूजा ॥ध्रु.॥
द्यावें तुम्हीं काहीं हें तों नाहीं आस । असों या उदास देहभावें ॥२॥
तुका म्हणे माझी मावळली खंती । समाधान चित्तीं सर्वकाळ ॥३॥
२६७९
माझे तों स्वभाव मज अनावर । तुज ही देतां भार कांहीं नव्हे ॥१॥
ऐसें कळों आलें मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाहीं ॥ध्रु.॥
संपादितों तो अवघा बाह्य रंग । तुझा नाहीं संग अभ्यंतरीं ॥२॥
तुका म्हणे सत्या नाहीं पाठी पोट । असतें निघोंट एकी जाती ॥३॥
१६०४
माझे पाय तुझी डोई । ऐसें करिं गा भाक देई ॥१॥
पाहतां तंव उफराटें । घडे तई भाग्य मोठें ॥ध्रु.॥
बहु साधन मोलाच। यासी जोडा दुजें कैचें ॥२॥
नका अनमानूं विठ्ठला । तुका म्हणे धडा जाला ॥३॥
१७८७
माझें मज आतां न देखें निरसतां । म्हणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक ।
जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी मी कवणांचा । आर्त मोहो सांडवला ।
तारीं मारीं करीं भलतें दातारा । होऊन तुझा आतां ठेलों रे ॥१॥
असो माझें कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप ।
बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥ध्रु.॥
पापपुण्यें श्रुति आटल्या । शास्त्रांस न लागेचि ठाव ।
विधिनिषिधें गोविलीं पुराणें वेदांसी तो अहंभाव ।
ओंकाराचें मूळ व्यापिलें माया । तेथें न धरे च भाव ।
म्हणऊन काबाड सांडिलें उपसतां । धरिलें तुझें चि नांव ॥२॥
तनमनइंद्रियें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे पायीं । तप तीर्थ दान करवूं कवणा हातीं ।
आधीन तें मज काई । आहिक्यें परत्रें चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देहीं ।
मायामोहपाश करीं विष तैसें । तुका म्हणे माझ्याठायीं ॥३॥
११७५
माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥१॥
आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥
वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन जालों देवा ॥२॥
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥३॥
३३१४
माझें मज द्यावें । नाहीं करवीत नवें ॥१॥
सहस्रनामाचें रूपडें । भक्त कैवारी चोखडें ॥ध्रु.॥
साक्षीविण बोलें । तरी मज पाहिजे दंडिलें ॥२॥
तुका म्हणे माल । माझा खरा तो विठ्ठल ॥३॥
३०९६
माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून ॥१॥
कापुनि देइन शिर । पाहा कृपण कीं उदार ॥ध्रु.॥
मजवरी घालीं घण । परि मी न सोडीं चरण ॥२॥
तुका म्हणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥३॥
९७२
माझे मनोरथ पावले जैं सिद्धी । तई पायीं बुद्धी स्थिरावली ॥१॥
समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरण हें ॥ध्रु.॥
त्रिविध तापाचें जालेंसे दहन । सुखावलें मन प्रेमसुखें ॥२॥
महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगीं संग अखंडित ॥३॥
जीवनाचा जाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरींमावळलें ॥४॥
तुका म्हणे माप भरु आलें सिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥५॥
१३७१
माझें माझ्या हाता आलें । आतां भलें सकळ ॥१॥
काशासाठी विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥ध्रु.॥
जालीं तया दुःखें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥२॥
तुका म्हणे शुद्धकुळ । तेथें मळ काशाचा ॥३॥
२७८७
माझे माथां तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥१॥
ऐसी पडियेली गांठी । शरीरसंबंधाची मिठी ॥ध्रु.॥
येरयेरांपाशीं । सांपडोन गेलों ऐसीं ॥२॥
तुका म्हणे सेवा । माझी कृपा तुझी देवा ॥३॥
३०४५
माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥१॥
अबद्ध चांगलें गाऊं भलतैसें । बाळ वडे जैसे मायबापा ॥२॥
तुका म्हणे मज न लवी वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥३॥
२२३८
माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥१॥
गोष्ट न करी नांव नेघें । गेलों दोघें खंडोनी ॥ध्रु.॥
स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥२॥
तुका म्हणे निवांत ठेलों । वेचित आलों जीवित्व ॥३॥
२७४१
माझे विषयीं तुज पडतो विसर । नको धरूं दूर पांडुरंगा ॥१॥
तुझा म्हणवितों हे चि लाज तुला । आतां झणी मला विसरेसी ॥२॥
तुका म्हणे तुझी माझी नाहीं उरी । आतां केली खरी देवराया ॥३॥
२३९९
माझे हातीं आहे करावें चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावें ॥१॥
मागति यां भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी॥ध्रु.॥
बाळक धांवोनि आड निघे स्तनीं ॥ घालावा जननी प्रेम पान्हां ॥२॥
तुका म्हणे करीं कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हातीं ॥३॥
२६२०
माझ्या इंद्रियांसीं लागलें भांडण । म्हणतील कान रसना धाली ॥१॥
करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुष्काळ पडिला थोर ॥ध्रु.॥
गुण गाय मुख आइकती कान । आमचें कारण तैसें नव्हे ॥२॥
दरुषणें फिटे नेत्रांचा पांग । जेथें ज्याचा भाग घेईल तें ॥३॥
तुका म्हणे ऐसें करीं नारायणा । माझी ही वासना ऐसी आहे ॥४॥
२८२१
माझ्या कपाळाच्या गुणें । किंवा सरलेंसे नेणें ॥१॥
नये वचन बाहेरी । उभें तिष्ठतसें दारीं ॥ध्रु.॥
काय सांगायास वेचे । रीते आरंभीं ठायींचे ॥२॥
तुका म्हणे किती । भीड धरावी पुढती ॥३॥
१२७३
माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां ॥१॥
आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥
तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥२॥
तुका म्हणे देवा । देई चरणांची सेवा ॥३॥
३३९७
माझ्या बापें मज दिधलें भातुकें । म्हणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥१॥
केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें गुण आलें त्याचें ॥ध्रु.॥
घेऊनि विभाग जावें लवलह्या । आलेति या ठाया आपुलिया ॥२॥
तुका ज्ञानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥३॥
५८४
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥१॥
फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥
नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥२॥
तुका म्हणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥३॥
१६२४
माझ्या मुखें मज बोलवितो हरी । सकळां अंतरीं नारायण ॥१॥
न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आम्ही ॥२॥
तुका म्हणे दोष नाहीं या विचारें । हिताचीं उत्तरें शिकवितां ॥३॥
१२८७
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥
उपवास पारणी राखिला दारवंटा केला । भोगवाटा आम्हालागी॥ध्रु.॥
वंशपरंपरा दास मी अंकिता । तुका मोकलितां लाज कोणां ॥२॥
५०७
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥१॥
पढियें देहभावें पुरवि वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योगक्षेम जाणे त्याचे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥
९६
मांडवाच्या दारा पुढें । आणिला म्हातारा ॥१॥
म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्याचें तोंड ॥ध्रु.॥
समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥२॥
तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥३॥
३३२७
मांडे पुर्या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥१॥
ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥
बोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें तें ॥२॥
तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंग तें च मूळ लटिक्याचें ॥३॥
११६६
माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥१॥
हें कां नेणां नारायणा । मज चाळवितां दिना ॥ध्रु.॥
नागवी धावणें । तेथें साह्य व्हावें कोणें ॥२॥
राजा सर्व हरी । तेथें दुजा कोण तारी ॥३॥
तुझ्या केल्याविण । स्थिर वश नव्हे जन ॥४॥
तुका म्हणे हरी । सूत्र तुझ्या हातीं दोरी ॥५॥
१५६५
मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ति ॥१॥
देह विसरे आपुला । जवळीं घेतां शीण गेला ॥ध्रु.॥
दावी प्रेमभातें । आणि अंगावरी चढतें ॥२॥
तुका संतापुढें । पायीं झोंबे लाडें कोडें ॥३॥
७७९
मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥
वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥
अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥२॥
तुका म्हणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥३॥
३३०९
मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तों सकळ चिंता त्याची ॥१॥
ऐसें परस्परें आहे चि विचारा । भोपळ्याचा तारा दगडासी ॥ध्रु.॥
भुजंग पोटाळी चंदनाचें अंग । निवे परि संगे नव्हे तैसा ॥२॥
तुका म्हणे करा परिसाचे परी । मज ठेवा सरी लोखंडाचे ॥३॥
१८३८
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥
तैसें जालें माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥ध्रु.॥
वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिता सिंधू ॥२॥
सारसांसी निशीं । ध्यानरवीच्या प्रकाशीं ॥३॥
जीवनाविण मत्स्य । जैसें धेनूलागीं वत्स ॥४॥
पतिव्रते जिणें । भ्रताराच्या वर्त्तमानें ॥५॥
कृपणाचें धन । लोभालागीं जैसें मन ॥६॥
तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे॥७॥
८४
मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥
हें चि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ध्रु.॥
शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥२॥
आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥३॥
१५६७
मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥१॥
एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सिद्ध करी ॥ध्रु.॥
आधीं फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥
तुका म्हणे राजहंस ढोरा नांवे । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥३॥
७४६
मानामान किती । तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥१॥
जा रे चाळवीं बापुडीं । कोणी धरितील तीं गोडी ॥ध्रु.॥
रिद्धीसिद्धी देसी। आह्मीं चुंभळें नव्हों तैसीं ॥२॥
तुका म्हणे ठका । ऐसें नागविलें लोकां ॥३॥
८००
मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥१॥
तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥
करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उशीर आतां देवा ॥२॥
नव्हे साच कांहीं कळों आलें मना । म्हणोनि वासना आवरीली ॥३॥
तुका म्हणे आतां मनोरथ सिद्धी। माझे कृपानिधी पाववावे ॥४॥
१००६
मानी भक्तांचे उपकार । रुणीया म्हणवी निरंतर । केला निर्गुणीं आकार । कीर्त मुखें वर्णितां ॥१॥
म्हणोनि जया जे वासना । ते पुरवितो पंढरिराणा । जाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥ध्रु.॥
अंबॠषीकारणें । जन्म घेतले नारायणें । एवडें भक्तींचे लहणें । दास्य करी हा दासाचें ॥२॥
म्हणियें करितां शंका न धरी । रक्षपाळ बिळच्या द्वारीं । भक्तीचा आभारी । रीग न पुरे जावया ॥३॥
अर्जुनाचे रथवारु । ते वागवी सर्वेश्वरु । एवढे भक्तीचे उपकारु । मागें मागें हिंडतसे ॥४॥
पुंडलिकाचे द्वारीं । सम पाउलीं विटेवरी । न वजे कट करीं । धरूनि तेथें राहिला ॥५॥
भावभक्तीचा अंकित । नाम साजे दिनानाथ । म्हणोनि राहिला निवांत । तुका चरण धरोनि ॥६॥
३२६९
मानूं कांहीं आम्ही आपुलिया इच्छा । ना तरि सरसा रंकरावो ॥१॥
आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥ध्रु.॥
तुका म्हणे आम्ही खेळों सहजलीळे । म्हणोनी निराळे सुख दुःखचा ॥२॥
३३२
माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥१॥
देवा अभिमान नको । माझेठायीं देऊं सकों ॥ध्रु.॥
देशी चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥२॥
हातीं सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ॥३॥
१०७७
मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥
आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥
मद्यपीतो पुरा अधम जातीचा । तया उपदेशाचा राग वांयां ॥२॥
तुकयाबंधु म्हणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥३॥
१७५४
मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥१॥
नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥
वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥२॥
कर्णद्वारें पुराणिक। भुलवी शब्दें लावी भीक ॥३॥
आम्हां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥४॥
तुका म्हणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥५॥
३२९४
मायबाप सवें नये धनवित्त । करावे संचित भोगावे ते ॥१॥
म्हणवुनि लाभ काय तो विचारी । नको चालीवरी चित्त ठेवूं ॥ध्रु.॥
आयुष्य शेवटी सांडूनि जाणार । नव्हेचि साचार शरीर हें ॥२॥
तुका म्हणे काळें लावियेले माप । जमा धरी पापपुण्याचीही ॥३॥
१४४१
मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥१॥
भोगिलें तें आहे सुख । आतां मुख मोकळें ॥ध्रु.॥
उत्तम तें बाळासाठी । लावी ओठीं माउली ॥२॥
तुका म्हणे जाली धणी । आनंद मनीं न समाये ॥३॥
४२८
मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥१॥
सांभाळा जी माझीं विषमें अनंता । जवळी असतां अव्हेर कां ॥ध्रु.॥
आणिकांची चाले सत्ता आम्हांवरी । तुमची ते थोरी काय मग ॥२॥
तुका म्हणे आलों दुरोनि जवळी । आतां टाळाटाळी करूं नये ॥३॥
१७२०
मायबापापुढें लाडीकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥१॥
कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग ॥ध्रु.॥
नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कवळिती ॥२॥
तुका म्हणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे तैसें ॥३॥
३३३१
मायबापें जरी सर्पीण कि बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥१॥
चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥
तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥
२९८८
मायबापें सांभाळिती । लोभाकारणें पाळिती ॥१॥
तैसा नव्हे देवराव । याचा कृपाळु स्वभाव ॥ध्रु.॥
मनासारिखें न होतां । बाळकासी मारी माता ॥२॥
तुका म्हणे सांगूं किती । बाप लेंकासी मारिती ॥३॥
३०६७
मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नानाकर्में ॥१॥
काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥
नाना छंदे अंगीं वसती विकार । छळियेले फार तपोनिधि ॥२॥
तुका म्हणे ऐसें सिकवितों तुज । आतां धरी लाज मना पुढें ॥३॥
२६९१
मायलेंकरांत भिन्न । नाहीं उत्तराचा सीण ॥१॥
धाडीं धाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥
करूनि नवल । याचें बोलिलों ते बोल ॥२॥
तुका म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते ॥३॥
३०८७
माय वनीं धाल्या धाय । गर्भ आंवतणें न पाहें ॥१॥
तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥
पुत्राच्या विजयें । पिता सुखावत जाये ॥२॥
तुका म्हणे अमृतसिद्धी । हरे तृषा आणि व्याधि ॥३॥
४०
माया तें चि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया । अंग आणि छाया तया परी ॥१॥
तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपती ॥ध्रु.॥
दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥२॥
तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥३॥
७३
माया ब्रम्ह ऐसें म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥१॥
विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥ध्रु.॥
करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ॥२॥
औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥३॥
तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं वारा त्यांचीं ॥४॥
तुका म्हणे जयां पिंडाचें पाळण । न घडे नारायणभेट तयां ॥५॥
८३५
माया मोहोजाळीं होतों सांपडला । परि या विठ्ठला कृपा आली ॥१॥
काढूनि बाहेरि ठेविलों निराळा । कवतुक डोळां दाखविलें ॥ध्रु.॥
नाचे उडे माया करी कवतुक । नाशवंत सुखें साच केलीं ॥२॥
रडे फुंदे दुःखें कुटितील माथा । एकासी रडतां तें ही मरे ॥३॥
तुका म्हणे मज वाटतें नवल । मी माझे बोल ऐकोनियां ॥४॥
८९९
माया साक्षी आम्ही नेणों भीड भार । आप आणि पर नाहीं दोन्ही ॥१॥
सत्याचिये साठी अवघा चि भरे । नावडे व्यापार तुटीचा तो ॥ध्रु.॥
पोंभाळिता चरे अंतरींचें दुःख । लांसें फांसें मुख उघडावें ॥२॥
तुका म्हणे नव्हे स्फीतीचा हा ठाव । निवाड्यासी देव साक्षी केला ॥३॥
३३४४
मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी ॥१॥
न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा वेडावली ॥ध्रु.॥
न पवे धांवणें न पवे चि लाग । न लगेची माग धरावया ॥२॥
भेणें तरि अंगा लावियेल्या राखा । तरी त्यासी वाखा करीतसे ॥३॥
तुका म्हणे हाका मारूं नेदी देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥४॥
२२६७
मायें मोकलिलें कोठें जावें बाळें । आपुलिया बळें न वांचे तें ॥१॥
रुसोनियां पळे सांडुनियां ताट । मागें पाहे वाट यावें ऐसीं ॥ध्रु.॥
भांडवल आम्हां आळी करावी हे । आपणें माये धांवसील ॥२॥
तुका म्हणे आळी करुनियां निकी । देसील भातुकीं बुझाऊनि ॥३॥
२३८८
मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी ॥१॥
अपराध माझे न मनावे मनीं । तुम्ही संतजनीं मायबापीं ॥ध्रु.॥
आरुषा वचन लेंकुराची आळी । साहोनि कवळी मागुताली ॥२॥
तुका म्हणे अंगीं काय नाहीं सत्ता । परि निष्ठुरता उपेजना ॥३॥
३०५७
मायेविण बाळ क्षणभरि न राहे । न देखता होय कासाविस ॥१॥
आणिक उदंड बुझाविती तरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥
नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥२॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥३॥
१६६५
मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥
सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥
पीतांबरें छाया करी लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥२॥
तुका म्हणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥३॥
१८८
मार्गी बहुत । या चि गेले साधुसंत ॥१॥
नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥
चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥२॥
झळकती पताका । गरुड टके म्हणे तुका ॥३॥
३८९६
मारिले असुर वाढल्या मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥
तया नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥
वरीले ते दूतीं यमाचिया दंडीं । नुच्चरितां तोंडीं नारायण ॥३॥
नारायण नाम नावडे जयासि । ते झाले मिरासी कुंभपाकीं ॥४॥
कुंभपाकीं सेल मान तो तयांचा । तुका म्हणे वाचा संतनिंदा ॥५॥
२९०४
मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें ॥१॥
एक सूत्र जीवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥ध्रु.॥
नाहीं साहों येत दुखाची ते जाती । परपीडा भूतीं साम्य झाली ॥२॥
तुका म्हणे दिला नीतीचा संकेत । पुजा नांवें चित्त सुखी तेणें ॥३॥
२७१२
मार्ग चुकले विदेशी एकले । तयावरी झाले दिशाभुली ॥१॥
हातीं धरुनियां पावविलें घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥२॥
तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । सेवा न घडे लाजा म्हणऊनि ॥ध्रु.॥
सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुध्द ॥३॥
उष्ण तहान भूक एवढे आकांतीं । वोसंगा लाविती काय म्हणु ॥४॥
खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे । अन्यायहि मोठे साच केले ॥५॥
हातींचा हिरोनि घातला पाठीसी । तुका म्हणे ऐसी परी आली ॥६॥
१६२५
मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला॥१॥
कोण त्याची करिल कींव । जीवें जीव नेणती ॥ध्रु.॥
पुढिलांसाठी पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥२॥
तुका म्हणे कुटती हाडें। आपुल्या नाडें रडती ॥३॥
१२१४
मासं चर्म हाडें । देवा अवघीं च गोडें ॥१॥
जे जे हरीरंगीं रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ध्रु.॥
वेद खाय शंखासुर । त्याचें वागवी कलेवर ॥२॥
तुका म्हणे ऐसा । बराडी हा भक्तीरसा॥३॥
२२०९
माहार मातेची पणी भरे । न कळे खरें पुढील ॥१॥
वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी न लगे चि ॥ध्रु.॥
श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येतां उत्तर ॥२॥
तुका म्हणे गुमान कां । सांगों लोकां अधमासी ॥३॥
३५७६
माहेरिंचा काय येईल निरोप । म्हणऊनि झोंप नाहीं डोळां ॥१॥
वाट पाहें आस धरूनियां जीवीं । निडळा हे ठेवीं वरी बाहे ॥ध्रु.॥
बोटावरी माप लेखितों दिवस । होतों कासावीस धीर नाहीं ॥२॥
काय नेणों संतां पडेल विसर । कीं नव्हे सादर मायबाप ॥३॥
तुका म्हणे तेथें होईल दाटणी । कोण माझें आणी मना तेथें ॥४॥
३५८७
माहेरींचें आलें तें मज माहेर । सुखाचें उत्तर करिन त्यासी ॥१॥
पायांवरी माथा आळीगीन बाहीं । घेइऩन लवलाहीं पायवणी ॥ध्रु.॥
सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥२॥
आपुले जीवींचें सुखदुःख भावें । सांगेन अघवें आहे तैसें ॥३॥
तुका म्हणे वीट नेघें आवडीचा । बोलिली च वाचा बोलवीन ॥४॥
मि मी
९२२
मिठवण्याचे धनी । तुम्ही व्यवसाय जनीं ॥१॥
कोण पडे ये लिगाडीं । केली तैसीं उगवा कोडीं ॥ध्रु.॥
केलें सांगितलें काम । दिले पाळूनियां धर्म ॥२॥
तुका म्हणे आतां । असो तुमचें तुमचे माथां ॥३॥
३०९९
मिळे हरीदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥१॥
तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥
कैसें तुज लाजवावें । भक्त म्हणोनियां भावें ॥२॥
नाचतां नये ताळीं । मज वाजवितां टाळी ॥३॥
अंतीं मांडिती भुषणें भूषणे । शरीर माझें दैन्य वाणें ॥४॥
तुका म्हणे कमळापति । मज न द्यावें त्या हातीं ॥५॥
३७८३
मिळोनि गौळणी देती यशोदे गाऱ्हाणीं । दहिं दुध तुप लोणीं शिंकी नुरेचि कांहीं ।
मेळवुनी पोरें तेथें रिघे एकसरें । वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥१॥
हरी सोंकला वो सोंकला वो सोंकला तो । वारीं तुज लाज नाहीं तरी ।
आम्हां सांपडतां उरी तुज मज नाहीं ॥ध्रु.॥
तुज वाटतसे कोड यासि लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागलें वो ।
आम्ही जाऊं तुजवरी पोरें चाळविल्या पोरी । काय सांगों भांडखोरी लाज वाटे आम्हां ॥२॥
मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे । तंव दसवंती म्हणे आणा शीक लावूं ।
थोर आणिला कांटाळा घरीं दारीं लोकपाळां । डेरा रिघोनी घुसळा तेथें लोणी खाय ॥३॥
मिळोनियां सकळा दावें लावूनियां गळां । कैशा बांधिती उखळा येथें राहे उगा ।
बरा सांपडलासी हरी आजिच्यानें करिसिल चोरी । डोळे घालुनियां येरी येरीकडे हांसे ॥४॥
फांकल्या सकळा उपडूनियां उखळा । मोडी वृक्ष विमळादुर्जन दोन्ही ।
उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धांवे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥५॥
३५३९
मी अवगुणी अन्यायी किती म्हणोन सांगों काई । आतां मज पायीं ठाव देई विठ्ठले ॥१॥
पुरे पुरे हा संसार कर्म बिळवंत दुस्तर । राहों नेदी स्थिर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥
अनेक बुद्धिचे तरंग क्षणक्षणां पालटती रंग । धरूं जातां संग तंव तो होतो बाधक ॥२॥
तुका म्हणे आतां अवघी तोडीं माझी चिंता । येऊनि पंढरिनाथा वास करीं हृदयीं ॥३॥
१५२९
मी च विखळ मी च विखळ । येर सकळ बहु बरें ॥१॥
पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें विनवणी ॥ध्रु.॥
मी च माझें मी च माझें । जालें ओझें अन्याय ॥२॥
आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका जाला निर्मनुष्य ॥३॥
७७२
मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥
आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥
जालों बरा बळी। गेलों मरोनि तेकाळीं ॥२॥
दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥
४०१७
मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा ॥१॥
नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥ध्रु.॥
केला करविला नाहीं उपकार। नाहीं दया आली पीडितां पर । करू नये तो केला व्यापार। वाहिला भार कुटुंबाचा ॥२॥
नाही केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण । नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मुर्तीचें ॥३॥
असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे हित करावें तें काय । नये बोलूं आठवूं तें ॥४॥
आप आपण्या घातकर। शत्रु जालों मी दावेदार । तूं तंव कृपेचा सागर। उतरीं पार तुका म्हणे ॥५॥
२६०१
मी तव बैसलों धरुनियां आस । न करीं उदास पांडुरंगा ॥१॥
नको आतां मज दवडूं श्रीहरी । मागाया भिकारी जालों दास ॥ध्रु.॥
भुकेलों कृपेच्या वचनाकारणें । आशा नारायणें पुरवावी ॥२॥
तुका म्हणे येऊनियां देई भेटी । कुरवाळुनी पोटीं धरीं मज ॥३॥
२१४६
मी तें मी तूं तें तूं । कुंकुड हें लाडसी ॥१॥
वचनासी पडो तुटी । पोटींचें पोटीं राखावें ॥ध्रु.॥
येथील तेथें तेथील येथें । वेगळ्या कुंथे कोण भारें ॥२॥
याचें यास त्याचें त्यास । तुक्यानें कास घातली ॥३॥
३६५३
मी अल्प मतिहीन । काय वर्णु तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥१॥
नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केलें राक्षसां ॥ध्रु.॥
द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥२॥
शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ती वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशानें ॥३॥
राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥४॥
३१४
मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥१॥
मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥
दिनानाथा कृपाळुवा। सांभाळावें आपुल्या नांवा ॥२॥
तुका म्हणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥३॥
२९७८
मी तों बहु सुखी आनंदभरिता । आहें साधुसंतां मेळींकारी ॥१॥
कांहीं व्हावें ऐसें नाहीं माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥ध्रु.॥
न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेतां जन्म ऐसें ॥२॥
मृत्युलोकीं कोण धरिलें वासना । पावावया जनासवें दुःख ॥३॥
तुका म्हणे तुझा दास ऐसें लोकां । कांहीं सकळिकां कळों यावें ॥४॥
२७८०
मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥
आहे तो विचार आपणयापाशीं । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबीं ॥ध्रु.॥
शुभ शकून तो शुभ लाभें फळे । पुढील तें कळे अनुभवें ॥२॥
तुका म्हणे माझा असेल आठव । तैसा माझा भाव तुझ्या पायीं ॥३॥
२२९
मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहाविरहित जो ॥१॥
राहिलासे उभा भीमरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥
नवल काई तरी पाचारितां पावे । न त्वरित धांवे भक्तीकाजें ॥२॥
सर्व भार माझा त्यासी आहें चिंता । तों चि माझा दाता स्वहिताचा ॥३॥
तुका म्हणे त्यास गाईन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥
३६६३
मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खान ॥१॥
मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥
घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडें चि ॥२॥
तुका म्हणे चोरटा चि झाला साव । सहज न्याय नाहीं तेथें ॥३॥
८१६
मीं हें ऐसें काय जाती । अवघड किती पाहातां ॥१॥
नाहीं होत उल्लंघन । नसतां भिन्न दुसरें ॥ध्रु.॥
अंधारानें तेज नेलें। दृष्टीखालें अंतर ॥२॥
तुका म्हणे सवें देव । घेतां ठाव दावील ॥३॥
१९९६
मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥१॥
म्या तों पसरिला हात । करीं आपुलें उचित ॥ध्रु.॥
आह्मी घ्यावें नाम । तुम्हां समाधान काम ॥२॥
तुका म्हणे देवराजा । वाद खंडीं तुझा माझा ॥३॥
मु मुं मू
२९७४
मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥१॥
आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कोणासीहि ऐसे बोलों नको ॥२॥
तुका म्हणे तुम्हां सांगतों मी खूण । देवासी तें ध्यान लावुनि बैसा ॥३॥
३८१
मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥१॥
सुखें करितों कीर्तन । भय विसरलें मन ॥ध्रु.॥
देखिजेना नास । घालूं कोणावरी कास ॥२॥
तुका म्हणे साहे । देव आहे तैसा आहे ॥३॥
९६३
मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥१॥
सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥२॥
तुका म्हणे लागे थोडा च विचार । परी हे प्रकार नागविती ॥३॥
१०७२
मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥
पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥
तुका म्हणे गेलें व्यर्थ वांयां विण । जैसा मृगसीण मृगजळीं ॥३॥
१६८५
मुक्तीपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥
बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि अंतीं अवसान ॥ध्रु.॥
भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तोचि गाती ॥२॥
बळ बुद्धि त्यांची उपकारासाठी । अमृत तें पोटी सांठविलें ॥३॥
दयावंत तरी देवाचि सारखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥४॥
तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती ते ॥५॥
११५३
मुख डोळां पाहे । तैशी च ते उभी राहे ॥१॥
केल्याविण नव्हे हातीं । धरोनि आरती परती ॥ध्रु.॥
न धरिती मनीं । कांहीं संकोच दाटणी ॥२॥
तुका म्हणें देवें । ओस केल्या देहभावें ॥३॥
१३१३
मुखाकडे वास । पाहें करूनियां आस ॥१॥
आतां होईल ते शिरीं । मनोगत आज्ञा धरीं ॥ध्रु.॥
तुह्मीं अंगीकार । केला पाहिजे हें सार ॥२॥
तुका म्हणे दारीं । उभें याचक मीं हरी ॥३॥
२२११
मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥१॥
वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ध्रु.॥
भस्म दंड न लगे काठी । तीर्थां आटी भ्रमण ॥२॥
तुका म्हणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥३॥
३२०९
मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैचा भवभ्रम ॥१॥
चालतां बोलतां खातां । जेवितां निद्रा करितां ॥ध्रु.॥
सुखें असों संसारीं । मग जवळी च हरी ॥२॥
मुक्तिवरील भक्ती जाण । अखंड मुखीं नारायण ॥३॥
मग देवभक्त झाला । तुका तुकीं उतरला ॥४॥
१८४४
मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥१॥
आतां हें चि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुह्मी याचा ॥ध्रु.॥
आपलें तों येथें केलें नव्हे कांहीं । साधनाचा वांहीं पडों नये ॥२॥
तुका म्हणे देह दिला पिंडदान । वेळोवेळां कोण चिंता करी ॥३॥
३०९
मुखें बोले ब्रम्हज्ञान । मनीं धनअभिमान ॥१॥
ऐशियाची करीता सेवा । काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥
. पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥२॥
विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥३॥
३८४३
मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥
माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥
जळांत पाहातां हाडति या दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसें नव्हे ॥३॥
नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चित्त लावा वरी ॥४॥
वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । म्हणती गोपाळा आतां कैसें ॥५॥
कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥६॥
डोहो बहु खोल काळया भीतरी । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥७॥
जयाचें कारण तयासी च ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरी ॥८॥
त्यासि नारायण म्हणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥
वरी जातां वरी पाहाती गोपाळ । म्हणति सकळ आम्ही नेणों ॥१०॥
नेणों म्हणती हें करितोसि काईं । आम्हां तुझी आईं देईल सिव्या ॥११॥
आपुलिया कानां देउनियां हात । सकळीं निमित्य टाळियेलें ॥१२॥
निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥
खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥१४॥
तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥१५॥
२५९०
मुख्य आधीं विषयत्याग । विधिभाग पाळणें ॥१॥
मन पावे समाधान । हें चि दान देवाचें ॥ध्रु.॥
उदासीन वृत्ति देहीं । चाड नाहीं पाळणें ॥२॥
तुका म्हणे नाहीं भय । सम सोय विषमाची ॥३॥
२२६१
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥
याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥
उदक अन्न काये म्हणे मज खा ये । भुकेला तो जाये चोजवीत ॥२॥
व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥३॥
तुका म्हणे जया आपुलें स्वहित। करणें तोचि प्रीत धरी कथे ॥४॥
३४१७
मुंगी आणि राव । आम्हां सारिखाची जीव ॥१॥
गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥ध्रु.॥
सोनें आणि माती । आम्हां समान हें चित्तीं ॥२॥
तुका म्हणे आलें । घरा वैकुंठ सांवळें ॥३॥
६९८
मुदल जतन झालें । मग लाभाचें काय आलें ॥१॥
घरीं देउनि अंतर गांठी । राख्या पारिख्यां न सुटे मिठी ॥ध्रु.॥
घाला पडे थोडें च वाटे । काम मैंदाचें च पेटे ॥२॥
तुका म्हणे वरदळ खोटें । फांसे अंतरिंच्या कपटें ॥३॥
१७२७
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥
आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥
एके सांते सरिखीं वित्तें । हानि हित वेगळालीं ॥२॥
तुका म्हणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥३॥
६५७
मुनि मुक्त झाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥१॥
अवघा चि संसार केला ब्रम्हरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु.॥
पुराणीं उपदेश साधन उद्भट । आम्हां सोपी वाट वैकुंठींची ॥२॥
तुका म्हणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥३॥
३६७
मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥१॥
एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥
सागरीं थेंबुडा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥२॥
तुका म्हणे नवें । नव्हे जाणावें हें देवें ॥३॥
८६१
मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे ॥१॥
ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु.॥
न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥२॥
तुका म्हणे थीते । दुःख पाववावें चित्ते ॥३॥
२०२८
मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥
वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥
अराणूक नाहीं कधीं। जाली तरि भेदबुद्धी ॥२॥
अंतरली नाव । तुका म्हणे नाहीं ठाव॥३॥
३६६०
मुळींचा तुम्हां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥
घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥
माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥२॥
तुका म्हणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥३॥
७३२
मूळ करणें संतां । नाहीं मिळत उचिता ॥१॥
घडे कासयानें सेवा । सांग ब्रम्हांडाच्या जीवा ॥ध्रु.॥
सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी ॥२॥
तुका म्हणे भावें । शरण म्हणवितां बरवें ॥३॥
मृ
७४
मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥१॥
जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥
संचित सांगातीं बोळवणें सवें । आचरलें द्यावें फळ तेणें ॥२॥
तुका म्हणे शेखी श्मशान तोंवरी । संबंध गोवरी आगीं सवें ॥३॥
३३३८
मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥
खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें लाभ हाणि ॥ध्रु.॥
मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥२॥
स्वप्नींचें जें सुखदुःख जालें काहीं । जागृतीं तो नाहीं साच भाव ॥३॥
सारीं जालीं मेलीं लटिकें वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥४॥
३३६९
मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥
भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥
चंद्रामृतें तृप्तिपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥२॥
अधिकारी येथें घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसें ॥३॥
तुका म्हणे काय अंधळिया हातीं । दिले जैसें मोतीं वांयां जाय ॥४॥
२३८
मृत्युलोकीं आम्हां आवडती परी । नाहीं एका हरीनामें विण ॥१॥
विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन हें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥
सोनें रूपें आम्हां मृत्तिके समान । माणिकें पाषाण खडे तैसे ॥२॥
तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हांपुढें ॥३॥
मे मै मैं मो मौ
२२०६
मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य। वांटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥
द्रव्य वेचावें अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । न घ्यावा हा पुत्र ।उत्तमयाती पोसना ॥ध्रु.॥
बीज न पेरावें खडकीं ।ओल नाहीं ज्याचे बुडखीं । थीतां ठके सेखीं ।पाठी लागे दिवाण ॥२॥
गुज बोलावें संतांशीं ।पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी वांटा पावे कर्माचा ॥३॥
शुद्ध कसूनिपाहावें वरी रंगा न भुलावें । तुका म्हणे घ्यावें जया नये तुटी तें ॥४॥
३४९६
मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥
हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥१॥
जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हिंदु धेड चंभार ॥२॥
ज्याका चित लगा मेरे रामको नाम । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥३॥
१३६९
मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥१॥
मागिलां पुढिलां एकी सरोबरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥
आन दिसे परी मरण चि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥२॥
तुका म्हणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥३॥
२११०
मेल्यावरी मोक्ष संसारसंबंध । आरालिया बद्ध ठेवा आम्हां ॥१॥
वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥
गाणें गीत आम्हां नाचणें आनंदें । प्रेम कोठें भेदें अंगा येतें ॥२॥
तुका म्हणे किती सांगावे दृष्टांत । नसतां तूं अनंत सानुकुळ ॥३॥
३७२३
मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥१॥
चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी ।
वेळ लावियेला अझुणी । एकाकरितां गडे हो ॥ध्रु.॥
वाट काढिली गोविंदीं । मागें गोपाळांची मांदी ॥२॥
अवघा चि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥३॥
घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥४॥
रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥५॥
बोलों नेदी म्हणे स्थिर । खुणा दावी खा रे क्षीर ॥६॥
जोगवल्या वरी । तुका करितो चाकरी ॥७॥
६१
मैत्र केला महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥१॥
आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥
नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥२॥
धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥
कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥
तंववरी मिरविसी बळ । जंव आला नाहीं काळ ॥५॥
तुका म्हणे बापा । चुकवीं चौर्याशींच्या खेपा ॥६॥
४७६
मैंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥१॥
पुढें नाडियलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ध्रु.॥
उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधीताहे ॥२॥
वैकंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥३॥
पुंडलिकें यारा । देउनि आणिलें चोरा ॥४॥
तुका म्हणे चला । तुम्ही आम्ही धरूं त्याला ॥५॥
३७७५
मैं भुली घरजानी बाट । गोरस बेचन आयें हाट ॥१॥
कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरूं देखें गोपाल ॥ध्रु.॥
काहां पग डारूं देखे आनेरा । देखें तों सब वोहिन घेरा ॥२॥
हुं तों थकित भैर तुका । भागा रे सब मनका धोका ॥३॥
३९६३
मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥१॥
ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥
न बोलतां करी चिंता न मारिता पळे । दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥२॥
देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुकें । तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं झालीं एकें ॥३॥
६३९
मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न ॥१॥
लक्ष्मी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥
नमन ते नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥२॥
तुका म्हणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥३॥
७०२
मोल देऊनियां सांठवावे दोष । नटाचे ते वेश पाहोनियां ॥१॥
हरीदासां मुखें हरीकथाकीर्तन । तेथें पुण्या पुण्य विशेषता ॥ध्रु.॥
हरीतील वस्त्रें गोपिकांच्या वेशें । पाप त्यासरिसें मात्रागमन ॥२॥
तुका म्हणे पाहा ऐसें जालें जन । सेवाभक्तीहीन रसीं गोडी ॥३॥
१२३५
मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागों बळें ॥१॥
नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥
नेदूं भोग आम्ही आपुल्या शरीरा । तुम्हांसी दातारा व्हावें म्हणून ॥२॥
कीर्ती तुझी करूं आमुचे सायास । तूं का रे उदास पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे तुज काय मागों आम्ही । फुकाचे कां ना भी म्हणसी ना ॥४॥
१५१४
मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥१॥
उगवूं आलेति तुह्मीं नारायणा । परिहार या सिणा निमिषांत ॥ध्रु.॥
लिगाडाचे मासी न्यायें जाली परी । उरली ते उरी नाहीं कांहीं ॥२॥
तुका म्हणे लाहो साधीं वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाला ॥३॥
३०५४
मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥१॥
अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥
कराल ते जोडी येईंल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागीं ॥२॥
सांचलिया धन होईंल ठेवणें । तैसा नारायण जोडी करा ॥३॥
करा हरीभक्ती परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ॥४॥
तुका म्हणे करा आयुष्याचें मोल । नका वेचूं बोल नामेंविण ॥५॥
१२९६
मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥
तैसा भक्तीवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥
वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥२॥
काजव्याच्या ज्योती । तुका म्हणे न लगे वाती ॥३॥
२०७४
मोहरोनी चित्ता । आणूं हळूं चि वरी हिता ॥१॥
तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥
संवसारा भेणें । कांहीं उसंती तों पेणें ॥२॥
एखादिया भावें । तुका म्हणे जवळी यावें ॥३॥
२९२
मोहीऱ्या च्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥१॥
नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥
स्वामीचिया अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥२॥
तुका म्हणे खोडी । देवमणी ने देती दडी ॥३॥
३५२
मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥१॥
मज भक्तीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ध्रु.॥
आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥२॥
तुका म्हणे भेटी । पुरे एक चि शेवटीं ॥३॥
२४८०
मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाई विळवतें ॥१॥
काय खरें न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमलें ॥ध्रु.॥
अहंकारास उरलें काई । पांचांठायीं हें वांटे ॥२॥
तुका म्हणे कुंथे भारें । लटिकें खरें मानुनियां ॥३॥
१७३५
मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आम्हां जन्म घेणें युगायुगीं ॥१॥
विटे ऐसें सुख नव्हे भक्तीरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥
देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ॥२॥
तुका म्हणे चित्त निवांत राहिलें । ध्याई तीं पाउलें विटेवरी ॥३॥
९५१
मोक्षाचें आम्हांसी नाहीं अवघड । तो असे उघड गांठोळीस ॥१॥
भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु.॥
ज्याचें त्यासी देणें कोण तें उचित । मानूनियां हित घेतों सुखे ॥२॥
तुका म्हणे सुखें देई संवसार । आवडीसी थार करीं माझे ॥३॥
३२३५
मौन कां धरिले विश्वाच्या । जीवना उत्तर वचना देई माझ्या ॥१॥
तूं माझे संचित तूंचि पूर्वपुण्य । तूं माझे प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥
तूं माझे सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूंचि नित्यनेम नारायणा ॥२॥
कृपावचनाची वाट पाहातसे । करुणा वोरसे बोला कांही ॥३॥
तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा । बोला सर्वात्तमा मजसवे ॥४॥
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या