संत तुकाराम गाथा १२ अनुक्रमणिका नुसार

६७
भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥१॥
मागें काय जाणों अइकिली वार्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥
माघारिया धन आणिलें घरासि । ने घे केला त्यासि त्याग तेणें ॥२॥
नामदेवाचिया घरासि आणिलें । तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥३॥
प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण । व्यंकोबाचें ॠण फेडियेलें ॥४॥
बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥५॥
तुका म्हणे ऐसा नाहीं ज्यासि निर्धार । नाडेल साचार तोचि एक ॥६॥


७४८
भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१॥
विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥ध्रु.॥
निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहीं च सांकडें पडों नेदी ॥२॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साहे । घातलिया भये नरका जाणें ॥३॥


३०३५
भक्तकरुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळों आलें ॥१॥
पक्षीयासी तुझें नाम जें ठेविलें । तयें उद्धरिलें गणिकेसी ॥ध्रु.॥
कुंटिणी ते दोष बहु आचरली । नाम घेतां आली करुणा तुज ॥२॥
हृदय कोमळ तुझें नारायणा । ऐसें बहुता जनां तारियेलें ॥३॥
तुका म्हणे सीमा नाहीं तुझे दये । कोमळ हृदय पांडुरंगा ॥४॥


३८१८
भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥
आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरी ॠणी ॥२॥
रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आपण क्रिया करी ॥३॥
क्रिया करी तुम्हां न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥४॥
गोपिकांसी म्हणे वैकुंठींचा पति । तुम्हीं माझ्या चित्ती सर्वभावें ॥५॥
भाव जैसा माझ्याठायीं तुम्ही धरा । तैसा चि मी खरा तुम्हांलागीं ॥६॥
तुम्हांसी कळों द्या हा माझा साच भाव । तुमचा चि जीव तुम्हां ग्वाही ॥७॥
ग्वाही तुम्हां आम्हां असे नारायण । आपुली च आण वाहातसे ॥८॥
सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभवें सरसा आणूनियां ॥९॥
यांसी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें हें ठावें नाहीं एकी ॥१०॥
एक क्रिया नाहीं आवघियांचा भाव । पृथक ते देव घेतो तैसें ॥११॥
तैसें कळों नेदी जो मी कोठें नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥१२॥
जैसा मनोरथ जया चित्ती काम । तैसा मेघशाम पुरवितो ॥१३॥
पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥
गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्यांचा चित्ती ॥१५॥
चित्ते ही चोरूनि घेतलीं सकळा । आवडी गोपाळांवरी तयां ॥१६॥
आवडे तयांसी वैकुंठनायक । गेलीं सकळिक विसरोनि ॥१७॥
निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाहीं या देहाची शुद्धि कोणा ॥१८॥
कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव म्हणुनि तया चुंबन देती ॥१९॥
देती या टाकून भ्रतारांसी घरीं । लाज ते अंतरीं आथी च ना ॥२०॥
नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका म्हणे वाचा काया मनें ॥२१॥


१२१२
भक्ती देवाघरचा सुना । देव भक्तचा पोसणा ॥१॥
येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥
देव भक्तची कृपाळु माता । भक्ती देवाचा जनिता ॥२॥
तुका म्हणे अंगें । एक एकाचिया संगें ॥३॥


३३५५
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं।
ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥१॥
ब्रह्मानंद तुकें तुळे आला तुका । तो हा विश्वसखा क्रीडे जनीं ॥ध्रु.॥
शास्र शीष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली ।
देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविनी योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥
संत ग्रहमेळीं जग दांध्या गिळी । पैल उदयाचळीं भानु तुका ।
संत वृंदें तीर्थ गौतमी हरीकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली ॥३॥
शांति पतिव्रते झाले परिनयन । काम संतर्पण निष्कामता।
क्षमा क्षमापणें प्रसिद्ध प्रथा जगीं । तें तों तुझ्या अंगी मूर्तीमंत ॥४॥
दया दिनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ती तुझी ।
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभावे ॥५॥
अधर्म क्षयव्याधि धर्मांशीं स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ती।
ब्रम्ह ऐक्यभावें भक्ती विस्तारिली । वाक्यें सफल केलीं वेदविहितें ॥६॥
देहबुद्धी जात्या अभिमानें वंचलों । तो मी उपेक्षिलों न पाहिजे।
न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥


४२२
भक्तवत्सल दिनानाथ । तिहीं लोकीं ज्याची मात॥१॥
तो हा पुंडलिकासाठीं । आला उभा वाळवंटीं ॥ध्रु.॥
गर्भवास धरी। अंबॠषीचा कैवारी ॥२॥
सकळां देवां अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥३॥
तुका म्हणे ध्यानीं । ज्यासि ध्यातो शूळपाणी॥४॥


२१५९
भक्त म्हणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाठी ॥१॥
नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥ध्रु.॥
अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥२॥
तुका म्हणे कोठें तगों येती घाणीं । आहाच ही मनीं अधीरता ॥३॥


९४८
भक्तांचा महिमा भक्त चिं जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी ॥१॥
जाणोनि नेणते जाले तेणें सुखें । नो बोलोनि मुखें बोलताती ॥ध्रु.॥
अभेदूनि भेद राखियेला अंगीं । वाढावया जगीं प्रेमसुख ॥२॥
टाळ घोष कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥३॥
तुका म्हणे हें तों आहे तयां ठावें । तीहीं एक्या भावें जाणीतला ॥४॥


७७
भक्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा ॥१॥
शोभविलें येर येरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु.॥
देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥२॥
तुका म्हणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥३॥


१९७४
भक्त समागमें सर्वभावें हरी । सर्व काम करी न संगतां ॥१॥
सांटवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूर्ती उभा ॥ध्रु.॥
मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥२॥
तुका म्हणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मगती ॥३॥


३१२०
भक्तांहून देवा आवडते काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥१॥
नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ॥ध्रु.॥
सर्वभावें त्याचें सर्वस्वें ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावें ॥२॥
सर्वस्वें त्याचा म्हणवी विकिला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥३॥
तुका म्हणे भक्तीसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं ॥४॥


३२०५
भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलों हें संग सुख याचें ॥१॥
सुख आम्हां झालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥
तुका म्हणे सुख बहु झालें जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥३॥


३१९९
भक्ती ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥१॥
तो नर चि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥ध्रु.॥
भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥२॥
तुका म्हणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥३॥


२१२८
भक्ती तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रम्हा तनु ॥१॥
देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥
उदक अग्नी धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥२॥
तुका म्हणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥


१०४५
भक्ती तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥
जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥
कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥२॥
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥३॥


२४१
भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सळे । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥
पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥२॥
तुका म्हणे माझें जाळूनि संचित । करीं वो उचित भेट देई ॥३॥


१०९९
भक्तीप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥
आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्यां ॥२॥
तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥३॥


९१९
भक्तिसुख नाहीं आले अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करूं ॥१॥
नसावे जी तुह्मी कांहीं निश्चिंतीने । माझिया वचने अभेदाच्या ॥ध्रु.॥
एकाएकीं मन नेदी समाधान । देखिल्या चरण वांचूनियां ॥२॥
तुका म्हणे वाचा गुणीं लांचावली । न राहे उगली मौन्य मज ॥३॥


१९३९
भक्तीभावें आह्मी बांधिलासे गांठी । साधावितों हाटीं घ्या रे कोणी ॥१॥
सुखाचिया पेंठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥ध्रु.॥
सुखाचें फुकाचें सकळांचें सार । तरावया पार भवसिंधु ॥२॥
मागें भाग्यवंत जाले थोर थोर । तिहीं केला फार हाचि सांटा ॥३॥
खोटें कुडें तेथें नाहीं घातपात । तुका म्हणे चित्त शुद्ध करीं ॥४॥


३०३०
भक्तिभावें करी बैसोनि निश्चित । नको गोवूं चित्त प्रपंचासी ॥१॥
एका दृढ करीं पंढरीचा राव । मग तुज उपाव पुढिल सुचे ॥ध्रु.॥
नको करूं कांहीं देवतापूजन । जप तप ध्यान तें ही नको ॥२॥
मानिसील झणी आपलिक कांहीं । येरझार पाहीं न चुके कदा ॥३॥
ऐसे जन्म किती पावलासी देहीं । अझूनि का नाहीं कळली सोय ॥४॥
सोय घरीं आतां होय पां सावध । अनुभव आनंद आहे कैसा ॥५॥
सहज कैसें आहे तेथीचें तें गुज । अनुभवें निज पाहे तुकीं ॥६॥
तुका म्हणे आतां होईं तूं सावध । तोडीं भवबंध एका जन्में ॥७॥


२०४९
भक्ती सुखें जे मातले । ते किळकाळा शूर जाले॥१॥
हातीं बाण हरीनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥
महां दोषां आला त्रास । जन्ममरणां केला नाश ॥२॥
सहस्रनामाची आरोळी। एक एकाहूनि बळी ॥३॥
नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥४॥
तुका म्हणे त्यांच्या घरीं । मोक्षसिद्धी या कामारी॥५॥


७६३
भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी । बह्मींची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥
माउलीचे मागें बाळकांची हरी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥
जेथील जें मागे तें रायासमोर । नाहींसें उत्तर येत नाहीं ॥२॥
सेवेचिये सत्ते धनी च सेवक । आपुलें तें एक न वंची कांहीं ॥३॥
आदिअंत ठाव असे मध्यभाग । भोंवतें भासे जग उच्चांसनी ॥४॥
भावारूढ तुका झाला एकाएकीं । देव च लौकिकीं अवघा केला ॥५॥


भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओंवाळूं आरती ॥१॥
ओंवाळू आरती माझ्या पंढरीनाथा। दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥ध्रु.॥
काय महिमा वर्णु आतां सांगणें तें किती । कोटि ब्रम्हहत्या मुख पाहतां जाती ॥२॥
राही रखुमाई दोही दों बाही । मयूर पिच्छचामरें ढाळिति ठायीं ठायीं ॥३॥
तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनति शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥४॥


३१९३
भक्तीचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥१॥
अष्टमासिद्धि वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां ॥ध्रु.॥
तेथें दुष्ट गुण न मिळे नि:शेष । चैतन्याचा वास झालामाजी ॥२॥
संतुष्ट चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणाची ॥३॥
तुका म्हणे त्याचा देव सर्व भार । चालवी कामार होऊनिया ॥४॥


३८३५
भक्तीसाठी केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥
देव गिळुनियां धरिलें मोहन । माय म्हणे कोण येथें दुजें ॥ध्रु.॥
दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥२॥
देवापाशीं पुसे देव काय झाला । हांसें आलें बोला याचें हरी ॥३॥
यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥४॥
लटिकें तें साच साच तें लटिके । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥५॥
सांग म्हणे माय येरु वासी तोंड । तंव तें ब्रम्हांड देखे माजी ॥६॥
माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भक्तांकारणें बाळलीला ॥७॥
लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥८॥
देव कवतुक दाखविलें तयां । लागतील पायां मायबापें ॥९॥
मायबाप म्हणे हाचि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥१०॥
तो हि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तो हि मी च ॥११॥
मीं च म्हणउनि जें जें जेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥१२॥
तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रम्हांडांत ॥१३॥
तद्भावना तैसें भविष्य तयाचें । फळ देता साचें मी च एक ॥१४॥
मी च एक खरा बोलें नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥१५॥
निजदासां खूण दाविली निरुती । तुका म्हणे भूतीं नारायण ॥१६॥


३९२३
भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी ।
न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥
विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ध्रु.॥
भुक्तिमुक्ति तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।
सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येउनि सामोरा आतां ॥२॥
संसारसागरू गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ ।
इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥३॥
तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरी खोडा भाव धरूनि टेंका ।
जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥
नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा सोइसवा हारपला विचारू ।
घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥


३०१२
भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥१॥
वाढवुनी जटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति ॥ध्रु.॥
कोरोनियां भूमी करिती मधीं वास । तरी उंदिरास काय वाणी ॥२॥
तुका म्हणे ऐसें कासया करावें । देहासी दंडावें वाउगें चि ॥३॥


१६९
भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी ॥१॥
धिग त्याचें साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ध्रु.॥
नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जावें आस ॥२॥
हें ना तैसे जालें । तुका म्हणे वांयां गेलें ॥३॥


२७१४
भजन या नासिलें हेंडि । दंभा लडी आवडी ॥१॥
जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥ध्रु.॥
एकाएकीं इच्छी पाठ । नेणे चाट काउळे ॥२॥
तुका म्हणे मुलाम्याचें । बंधन साचें सेवटीं ॥३॥


३८९९
भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्ती हेवा दुजा कांहीं ॥१॥
दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥
ध्यान ज्यां हरीचें हरीसि तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥३॥
भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकळिक मथुरेचे ॥४॥
मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥५॥
राज्य करी गोपीयादवांसहित । कमिऩलें बहुतकाळ तेथें ॥६॥
तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥


३१५६
भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥१॥
जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ध्रु.॥
उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥२॥
तुका म्हणे चित्त । होय आवडी मिश्रित ॥३॥


६७९
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥१॥
ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा म्हणउनी ॥ध्रु.॥
विचारिता कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥२॥
तुका म्हणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥३॥


१२०४
भय हरीजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥१॥
नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥
चित्त वित्त हेवा । समर्पून राहा देवा ॥२॥
तुका म्हणे मन । असों द्यावें समाधान ॥३॥


२९०३
भय होतें आम्हीपणें । पाठी येणें घातलें ॥१॥
अवघा आपुला चि देश । काळा लेश उरे चि ना ॥ध्रु.॥
समर्थाचें नाम घेतां । मग चिंता काशाची ॥२॥
तुका म्हणें नारायणें । केलें जिणें सुखाचें ॥३॥


२३१३
भयाची तों आम्हां चिंत्तीं । राहो खंती सकेचीन ॥१॥
समर्पीलों जीवें भावें । काशा भ्यावें कारणें ॥ध्रु.॥
करीन तें कवतुकें। अवघें निकें शोभेल ॥२॥
तुका म्हणे माप भरूं । दिस सारूं कवतुकें ॥३॥


९२७
भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती ॥१॥
भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथें देव । विरहित संकल्पा ॥ध्रु.॥
दिला पाडूनियां धडा । पापपुण्यांचा निवाडा । आचरती गोडा । आचरणें आपुलाल्या ॥२॥
तुका म्हणे पराधीनें । जालीं ओढलिया ॠणें । तुटती बंधनें । जरि देवा आळविती ॥३॥


३७७३
भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचें गोविंदाची चट ।
चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥१॥
चाळा लावियेले गोप गोपीनाथें । जाणे आवडीचें रूप जेथें तेथें ।
दावी बहुतांच्या बहुवेषपंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥ध्रु.॥
मनीं आवडे तें करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनि आधार ।
उगा राहे कां मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥२॥
धरिली खोडी दे टाकोनियां मागें । न ये विनोद हा कामा मशीं संगें ।
मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकी पडिलीं तुझीं सोंगें रें ॥३॥
सुख अंतरींचें बाहय ठसठसी । म्हणे विनोद हा काय सोंग यासी ।
तुज मज काय सोयकरी ऐसी । नंदानंदन या थोरपणें जासी रे ॥४॥
करी कारण तें कळों नेदी कोणा । सुख अंतरींचे बाह्य रंग जाना ।
मन मिनलें रे तुका म्हणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥५॥


२२३५
भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें ॥१॥
सुख दुःख तुज देईन भोगितां । मग मज चिंता कासयाची ॥ध्रु.॥
तुझा दास म्हणवीन मी अंकिला । भोगितां विठ्ठला गर्भवास ॥२॥
कासया मी तुज भाकितों करुणा । तारीं नारायणा म्हणवुनि ॥३॥
तुका म्हणे तुज येऊं पाहे उणें । तारिसील तेणें आम्हां तया ॥४॥


२०४०
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ॥१॥
कोण्या काळें सुखा। ऐशा कोण पावत ॥२॥
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥ध्रु.॥
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३॥
तुका म्हणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिलें॥४॥


२०९६
भला म्हणे जन । परि नाहीं समाधान ॥१॥
माझें तळमळी चित्त । अंतरलें दिसे हित ॥ध्रु.॥
कृपेचा आधार । नाहीं दंभ जाला भार ॥२॥
तुका म्हणे कृपे । अंतराय कोण्या पापें ॥३॥


३४९९
भले रे भाई जिन्हें किया चीज । अछा नहिं मिलत बीज ॥१॥
फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥ध्रु.॥
तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटति भवरोग ॥२॥
कहे तुका मैं ताका दासा । नहिं सिरभार चलावे पासा ॥३॥


२९७२
भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुसऱ्याची ॥१॥
असो आतां यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोडवलें ॥ध्रु.॥
समर्थासी काय कोणें हें म्हणावें । आपुलिया जावें भोगावरी ॥२॥
तुका म्हणे तुम्हां बोल नाहीं देवा । नाहीं केली सेवा मनोभावें ॥३॥


२२०
भले भणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥१॥
ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥ध्रु.॥
पाकसिद्धी लागे संचित आइतें । घडतां सोई तें तेव्हां गोड ॥२॥
तुका म्हणे बरे सांगतां चि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडता ॥३॥


३७७७
भलो नंदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥१॥
आगळ आवो देवजी कान्हा । मैं घरछोडी आहे म्हांना ॥ध्रु.॥
उन्हसुं कलना वेतो भला । खसम अहंकार दादुला ॥२॥
तुका प्रभु परवली हरी । छेपी आहे हुं जगाथी न्यारी ॥३॥


१५३१
भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥
परी आम्ही असों एकाचिये हातीं । नाचवितोचित्तीं त्याचें तैसें ॥ध्रु.॥
वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥२॥
तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥३॥


१०९०
भल्याचें दर्शन । तेथें शुभ चि वचन ॥१॥
बोलावी हे धर्मनीत । शोभें होत नाहीं हित ॥ध्रु.॥
मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥२॥
तुका म्हणे बहु । लागे ऐसें बरें मऊ ॥३॥


२०३
भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥१॥
त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥
सुखें करावा संसार । परि न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥२॥
भुक्तिमुक्तिची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥३॥


३५४
भवसिंधूचें काय कोडें । दावी वाट चाले पुढें ॥१॥
तारूं भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ध्रु.॥
मागें उतरिलें बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥२॥
तुका म्हणे लाग वेगें । जाऊं तयाचिया मागें ॥३॥


५६७
भवसिंधूचें हेंचि तारूं । मज विचारूं पाहातां ॥१॥
चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥
माझ्या खुणा मनापाशीं। तें या रसीं बुडालें ॥२॥
तुका म्हणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥३॥


भा भां
३८६३
भाग त्या सुखाचे वांकड्या बोबड्या । आपुलिया गड्या भाविकांसि ॥१॥
भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि॥ध्रु.॥
काला करूनियां वांटिती सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥२॥
खेळेंमेळें दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्ती कवणाचें ॥३॥
कवणाचें चाले तुका म्हणे बळ । जयासी गोपाळ साह्य झाले ॥४॥


३५९५
भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा ॥१॥
तुह्मी क्षेम कीं सकळ । बाळ अवघे गोपाळ ॥ध्रु.॥
मारगीं चालतां । श्रमलेती येतां जातां ॥२॥
तुका म्हणे कांहीं । कृपा आहे माझ्या ठायीं ॥३॥


३०१०
भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्वासीजे ॥१॥
देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें हीं दातारें निववावीं ॥ध्रु.॥
अमृताची दृष्टी घालूनियां वरी । शीतळ हा करीं जीव माझा ॥२॥
घेई उचलूनि पुसें तानभूक । पुसीं माझें मुख पीतांबरें ॥३॥
बुझावोनि माझी धरीं हनुवंटी । ओवाळुनि दिठी करुनी सांडीं ॥४॥
तुका म्हणे बापा आहो विश्वंभरा । आतां कृपा करा ऐसी कांहीं ॥५॥


२७४३
भागल्यांचा तूं विसांवा । करी गांवा निंबलोण ॥१॥
परमानंदा पुरुषोत्तमा । हरीं या श्रमापासूनि ॥ध्रु.॥
अनाथांचा अंगीकार । करितां भार न मनिसी ॥२॥
तुका म्हणे इच्छा पुरे । ऐसी धुरे हे विठ्ठले ॥३॥


३२१७
भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥१॥
ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाची च राशी पांडुरंग ॥ध्रु.॥
सकळां सन्मुख कृपेचिया दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळां ॥२॥
तुका म्हणे येथें आतां उरे कैंचा । अनंता जन्मींचा शीण भाग ॥३॥


२३६७
भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला ॥१॥
तुझा म्हणवितों दास । केली उिच्छष्टाची आस ॥ध्रु.॥
राहिली तळमळ । तई पासोनी सकळ ॥२॥
तुका म्हणे धालें । पोट ऐसें कळों आलें॥३॥


३२५८
भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥१॥
नाही तें पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखें ॥ध्रु.॥
प्रीति अंगीं असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखें ठायीं ॥२॥
आपुल्या स्वभावें जैसे जेथें असों । तैसे तेथें दिसों साजिरेचि ॥३॥
वासनेचा कंद उपडिलें मूळ । दुरितें सकळ निवारिलीं ॥४॥
तुका म्हणे भक्तजनांची माउली । करील साउली विठ्ठल आम्हां ॥५॥


२०५४
भाग्यवंत म्हणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥१॥
तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥
भुक्तीमुक्तीचें तें स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥२॥
गाइलें पुराणीं । तुका म्हणे वेदवाणी ॥३॥


८६२
भाग्यवंतां हें चि काम । मापी नाम वैखरी ॥१॥
आनंदाची पुष्टि अंगीं । श्रोते संगीं उद्धरती ॥ध्रु.॥
पिकलें तया खाणें किती । पंगतीस सुकाळ ॥२॥
तुका करी प्रणिपात । दंडवत आचारियां ॥३॥


१४०१
भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥१॥
धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥
जनाविरहित हा लाभ । टांचें नभ सांठवणें ॥२॥
तुका म्हणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी॥३॥


२२२३
भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥१॥
आपुलाला लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥
इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥२॥
तुका म्हणे आल्या थोऱ्या । वस्तु बऱ्या मोलाच्या ॥३॥


१५०५
भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥१॥
येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥
होई बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥२॥
तुका आला लोटांगणीं । भक्तीभाग्या जाली धणी ॥३॥


५७५
भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंबे ॥१॥
विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥
अवघें आतां काम सारूं । हाचि करूं कैवाड ॥२॥
तुका म्हणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥३॥


२५३४
भांडणचि जालें । मग जीवाचें काय आलें ॥१॥
येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ध्रु.॥
करितां सरोबरी। कांहीं न ठेवावी उरी ॥२॥
तुका म्हणे शूर । व्हावे धुरेसींच धुरे ॥३॥


२६१२
भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हेचि ॥१॥
कैसी तुझी वाट पाहों कोण्या तोंडें । भोंवतीं किं रे भांडे गर्भवास ॥ध्रु.॥
चहूं खाणीचिया रंगलोंसें संगें । सुष्ट दुष्ट अंगें धरूनियां ॥२॥
बहुतांचे बहु पालटलों सळे । बहु आला काळें रंग अंगा ॥३॥
उकलूनि नये दावितां अंतर । घडिचा पदर सारूनियां ॥४॥
तुका म्हणे करीं गोंवळयासाठी । आपल्या पालटीं संगें देवा ॥५॥


४७७
भांडवी माउली कवतुके बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं ॥१॥
माझी माझी म्हणे एकएकां मारी । हे ती नाहीं दुरी उभयंता ॥ध्रु.॥
तुझे थोडे भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥२॥
तुका म्हणे एके ठायी आहे वर्म । हेंचि होय श्रम निवारिते ॥३॥


२४०९
भांडावें तें गोड । पुरे सकळ ही कोड ॥१॥
ऐसा घरींचा या मोळा । ठावा निकटां जवळां ॥ध्रु.॥
हाक देतां दारीं । येती जवळी सामोरीं ॥२॥
तुका म्हणे शिवें । मागितलें हातीं द्यावें ॥३॥


१७००
भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥१॥
नये खंडों देऊं वाद । आम्हां भांडवलभेद ॥ध्रु.॥
शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥२॥
तुका म्हणे आळस । तोचि कारणांचा नास ॥३॥


२१६६
भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥१॥
आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ध्रु.॥
गरुडटकयाच्या भारें । भूमी गर्जे जेजेकारें ॥ ।॥ तुका म्हणे काळ । पळे देखोनियां बळ ॥३॥


३८६१
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥
अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥
मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुद्धी स्थिर ॥३॥
बुद्धी स्थिर राहो नेदी नारायण । आशाबद्ध जन लोभिकांची ॥४॥
लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका म्हणे तेणें दुःखी होती ॥५॥


३८७
भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥१॥
धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु.॥
हिरा हिरकणी । काढी आंतुनि आहिरणी ॥२॥
तुका म्हणे केलें । मन शुद्ध हें चांगलें ॥३॥


३८३७
भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥
सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥२॥
आजि आम्हां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वंचतों ॥३॥
न वंचत्या गाईं जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥४॥
पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठी । बोले जगजेठी गोपाळांसि ॥५॥
गोपाळांसि म्हणे वैकुंठनायक । भले तुम्ही एक पुण्यवंत ॥६॥
करी तुका म्हणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसि ॥७॥


२९४
भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत ॥१॥
धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ध्रु.॥
बहुत बराडी । देवा वरी आवडी ॥२॥
तुका म्हणे हें रोकडें । लाभ अधिकारी चोखडे ॥३॥


२८२
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥
करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥
निंबाचिया झाडा साखरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥२॥
तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥


३८४८
भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भय पोटीं ॥१॥
पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥ध्रु.॥
न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥२॥
अंतरला बहु बोलतां वाउगें । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥३॥
गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोणाभावें रडती तीं ॥४॥
तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥५॥
मायबापांची तों ऐसी झाली गति । तुका म्हणे अंतीं कळों आलें ॥६॥


६८७
भावबळें कैसा झालासी लाहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें ॥१॥
तें मज उचित करूनियां देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ध्रु.॥
पाहोनियां डोळां बोलेन मी गोष्टी । आळिंगुनि मिठी देइन पांयीं ॥२॥
चरणीं दृष्टि उभा राहेन समोर । जोडोनियां कर पुढें दोन्ही ॥३॥
तुका म्हणे उत्कंठित हे वासना । पुरवीं नारायणा आर्त माझें ॥४॥


९१३
भावबळें विष्णुदास । नाहीं नाश पावत ॥१॥
योगभाग्यें घरा येती । सर्व शक्ती चालती ॥ध्रु.॥
पित्याचें जें काय धन । पुत्रा कोण वंचील ॥२॥
तुका म्हणे कडे बैसों । तेणें असों निर्भर ॥३॥


१९०३
भावाचिया बळें । आह्मी निर्भर दुर्बळें ॥१॥
नाहीं आणिकांची सत्ता । सदा समाधान चित्ता ॥ध्रु.॥
तर्का नाहीं ठाव । येथें रिघावया वाव ॥२॥
एकछत्रीं राज । तुक्या पांडुरंगीं काज॥३॥


१९०४
भावापुढें बळ । नाहीं कोणाचे सबळ ॥१॥
करी देवावरी सत्ता । कोण त्याहूनि परता ॥ध्रु.॥
बैसे तेथें येती । न पाचारितां सर्व शक्ती ॥२॥
तुका म्हणे राहे । तयाकडे कोण पाहे॥३॥


२३५४
भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उच्छीष्ट तें ॥१॥
उिच्छष्ट तीं फळें खाय भिल्लटीचीं । आवडी तयांची मोठी देवा ॥ध्रु.॥
काय देवा घरीं न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥२॥
अर्जुनाचीं घोडीं धुतलीं अनंतें । संकटें बहुतें निवारिलीं ॥३॥
तुका म्हणे ऐसीं आवडती लडिवाळें । जाणीवेचें काळें तोंड देवा ॥४॥


१९७३
भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरी ॥१॥
इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदिती तीं पदें सकुमारें ॥ध्रु.॥
विसरले मुक्ती भक्तीच्या अभिळासें । ओढत सरिसें सुखा आलें ॥२॥
तुका म्हणे नाहीं मागायाची आस । पांडुरंग त्यांस विसंबेना ॥३॥


२३३५
भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥ध्रु.॥
आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥२॥
मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा॥३॥
वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥४॥
तुका म्हणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥


भि भी भुं भू
३७२८
भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥१॥
बाप रे हा देवांचा ही देव कळों । नेदी माव काय करी करवी तो ॥ध्रु.॥
पसरूनि मुख विश्वरूप खाय ज्वाळ । सारूनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥२॥
तुका म्हणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण । कळों आलें आतां या सांगातें नाहीं शिण ॥३॥


९१२
भिक्षायापत्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥
देवा पायीं नाहीं भाव। भक्ती वरी वरी वाव । समर्पीला जीव । नाहीं तो हा व्यभिचार ॥ध्रु.॥
जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें । हें चि अभाग्य रोकडें । मूळ आणि विश्वास ॥२॥
काय न करी विश्वंभर । सत्य करितां निर्धार । तुका म्हणे सार । दृढ पाय धरावे ॥३॥


२७६
भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥१॥
आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ॥ध्रु.॥
भजनीं विक्षेप तें चि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥२॥
तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥३॥


३९९७
भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥१॥
न करीं त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ध्रु.॥
करूनी मर्दन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥२॥
नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥३॥
करुनियां भोजन घेतलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥४॥
तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होती चित्ती ॥५॥


३७१२
भीमातीरीं एक वसविले नगर । त्याचें नांव पंढरपुर रे । तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥१॥
नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसावा रे ।
पुढें गेले ते निघाई झाले । वाणितील त्याची सीमा रे ॥ध्रु.॥
बळियां आगळा पाळी लोकपाळां । रीघ नाहीं कळिकाळा रे ।
पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो झाला भवदुःखा वेगळा रे ॥२॥
संतसज्जनीं मांडिलीं दुकाने । जें जया पाहिजे तें आहे रे ।
भुक्तिमुक्ति फुका च साठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥३॥
दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे ।
न वजों म्हणती आम्ही वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥४॥
बहुत दिस होती मज आस । आजि घडलें सायासीं रे ।
तुका म्हणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसी रे ॥५॥


२६६
भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥
भाविकांनीं दुर्जनाचें । कांहीं मानूं नये साचें ॥ध्रु.॥
होईल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥
तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥३॥


३३६६
भुंकुनियां सुनें लागे हत्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥१॥
काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥ध्रु.॥
मातलें माकड विटवी पंचानना । घेतलें मरणा धरणें तेंणे ॥२॥
तुका म्हणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करूनियां ॥३॥


१५०३
भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥१॥
हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ध्रु.॥
नैवेद्याचा आळ । वेच ठाकणीं सकळ ॥२॥
तुका म्हणे जड । मज न राखावें दगड ॥३॥


२५४३
भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला ॥१॥
कुळिकेसी लांस फांस । डोई दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वजन चुकतां ॥ध्रु.॥
विधिसेवनें विहितें । कार्यकारणापुरतें । न वाटे तोचित्तें । अधमांच्या तो त्यागी ॥२॥
आज्ञा पाळणें ते सेवा । भय धरोनियां जीवा । तुका म्हणे ठेवा । ठेविला तो जतन ॥३॥


९५९
भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥१॥
शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु.॥
हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संतां तैसी ॥२॥
सरितां वोहोळ गंगा सागरा । लेखी तयाहून अधम नाहीं ॥३॥
आणीक अमुप होती तारांगणें । रविसी समान लेखूं नये ॥४॥
तुका म्हणे नाहीं नम्रता अंगी । नव्हे तें फिरंगी कठिण लोह ॥५॥


३५१४
भूतबाधा आम्हां घरीं । हें तों आश्चर्य गा हरी ॥१॥
जाला भक्तीचा कळस । आले वस्तीस दोष ॥ध्रु.॥
जागरणाचें फळ । दिली जोडोनि तळमळ ॥२॥
तुका म्हणे देवा । आहाच कळों आली सेवा ॥३॥


६७४
भूत भविष्य कळों येईल वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥१॥
आह्मीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धेंचि ॥ध्रु.॥
जगरूढीसाठी घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥२॥
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धीसिद्धी ॥३॥


२५४७
भूतांचिये नांदे जीवीं । गोसावी च सकळां ॥१॥
क्षणक्षणां जागा जागा ठायीं । दृढ पायीं विश्वास ॥ध्रु.॥
दावूनियां सोंग दुजें । अंतर बीजें वसतसे ॥२॥
तुका म्हणे जाणे धर्म । धरी तें वर्म चिंतन ॥३॥


१२३०
भूतीं देव म्हणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥१॥
जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ध्रु.॥
दयेसाठी केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥२॥
तुका म्हणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां॥३॥


४६७
भूतीं भगवंत । हा तों जाणतों संकेत ॥१॥
भारी मोकलितों वाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥
करावा उपदेश। निवडोनि तरि दोष ॥२॥
तुका म्हणे वाटे । चुकतां आडरानें कांटे ॥३॥


१५६२
भूतीं भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥१॥
ऐसीं गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ध्रु.॥
माझें तुझें हा विकार । निरसतां एकंकार । न लगे कांहीं फार । विचार चि करणें ॥२॥
तुका म्हणे दुजें । हें तों नाहीं सहजें । संकल्पाच्या काजें । आपें आप वाढलें ॥३॥


२४५४
भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥
तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥
जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥२॥
तुका म्हणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥३॥


३०९७
भूमीवरी कोण ऐसा । गांजूं शके हरीच्या दासा ॥१॥
सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥
काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥२॥
तुका म्हणे चित्तीं । सांगूं मानाची हे निति ॥३॥


भे भो भ्या भ्र
३३०७
भेटीची आवडी उताविळ मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥
आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥ध्रु.॥
नेत्र उन्मिळत राहिले ताटस्थी । गंगा अश्रुपाती वहावली ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥३॥


११३६
भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥
दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥


२७४६
भेटीलागीं पंढरिनाथा । जीवा लागली तळमळ व्यथा ॥१॥
कधी कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥
सीणलें माझें मन । वाट पाहातां लोचन ॥२॥
तुका म्हणे भूक । तुझें पाहावया मुख ॥३॥


३०५१
भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाठी ॥१॥
भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजें जेवूं संगें ॥ध्रु.॥
मायलेकरासीं नाहीं दुजी परि । जेऊं बरोबरी बैसोनियां ॥२॥
तुका म्हणे ऐसें अंतरींचें आर्त । यावें जी त्वरित नारायणा ॥३॥


१४९८
भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥१॥
कैसी जाली दिशाभुली । नवजाति ये वाटे चाली ॥ध्रु.॥
संसाराची खंती । मावळल्या तरी शक्ती ॥२॥
तुका म्हणे हीणा । बुद्धि चुकली नारायणा ॥३॥


२५४९
भेद तुटलियावरी । आम्ही तुमचीं च हो हरी ॥१॥
आतां पाळावे पाळावे । आम्हां लडिवाळांचे लळे ॥ध्रु.॥
आणिकांची देवा । नाहीं जाणत चि सेवा ॥२॥
तुका म्हणे हेवा । माझा हेत पायीं देवा ॥३॥


२४७२
भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥१॥
येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥
भोंवरे खळाळ चोर वाटा घेती । पावल मारिती सिवेपाशीं ॥२॥
तुका म्हणे येथें भावेंविण पार । न पविजे सार हें चि आहे ॥३॥


११९७
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥
भर्ता आणि भोक्त कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥
विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राम्हणांची ॥२॥
कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भक्ताचें तुका म्हणे ॥३॥


२२९३
भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥१॥
म्हणऊनी मनीं मानूं नये खेदु । म्हणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥
आणिकां रुसावें न लगे बहुतां । आपुल्या संचितावांचूनियां ॥२॥
तुका म्हणे भार घातलिया वरी । होईल कैवारी नारायण ॥३॥


१८६९
भोग द्यावे देवा । त्याग भोगीं च बरवा ॥१॥
आपण व्हावें एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥ध्रु.॥
योजे यथाकाळें । उत्तम पाला कंदें मूळें ॥२॥
वंचकासी दोष । तुका म्हणे मिथ्या सोस ॥३॥


१६५४
भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥१॥
शांती धरणें जिवासाठी । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥
देह लेखावें असार । सत्य परउपकार ॥२॥
तुका म्हणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रम्हरसी ॥३॥


४९०
भोगावरी आह्मीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥
विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥
काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥२॥
केला तरी उरे वाद चि कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची ॥३॥
आवघे चि वाण आले तुम्हां घरा । मजुरी मजुरा रोज कीदव ॥४॥
तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥५॥


३९०६
भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईंवत्सां ॥१॥
गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥
भक्ति नवविधा तयांसि घडली । अवघीं च केली कृष्णरूप ॥३॥
रूप दाखविलें होतां भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाहीं ॥४॥
नाहीं राहों दिलें जातां निजधामा । तुका म्हणे आम्हांसहित गेला ॥५॥


३१३०
भोगी झाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंद्रियांचा लाग । आम्हांवरूनि चुकला ॥१॥
करुनि ठेविलों निश्चळ । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ॥ध्रु.॥
तळीं पक्षिणीचे परी । नखें चोंची चारा धरी । आणुनियां घरीं । मुखीं घाली बाळका ॥२॥
तुका म्हणे ये आवडी । आम्हीं पांयीं दिली बुडी । आहे तेथें जोडी । जन्मांतरींचें ठेवणें ॥३॥


६८
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥१॥
ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ॥ध्रु.॥
देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥२॥
तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ॥३॥


७८७
भोजन तें पाशांतीचें । निंचें उंचें उसाळी ॥१॥
जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥ध्रु.॥
कल्पना ते देवाविण । करी भिन्न इतरीं ॥२॥
तुका म्हणे पावे भूती । ते निंश्चिती मापली ॥३॥


३७१६
भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्नेएकवटा ।
देई निवडुनी । माते म्हणतो जननी । हात निपटून मेदिनी । वरी अंग घाली ॥१॥
कैसा आळी घेसी । नव्हे तें चि करीसी । घेई दुसरें तयेसी । वारी म्हणे नको ॥ध्रु.॥
आतां काय करूं । नये यासि हाणूं मारूं । नव्हे बुझावितां स्थिरू । कांहीं करितांही ।
हातेची केलें एके ठायीं । आतां निवडूनि खाई । आम्हा जाचितोसि काई । हरीसि म्हणे माता ॥२॥
त्याचें तयाकुन । करवितां तुटे भान । तंव झालें समाधान । उठोनियां बैसे ।
माते बरें जाणविलें । अंग चोरूनि आपुलें । तोडियलें एका बोलें । कैसें सुखदुःख ॥३॥
ताट पालवें झाकिलें । होतें तैसें तेथें केलें । भिन्नाभिन्न निवडिलें । अन्नें वेगळालीं ।
विस्मित जननी । भाव देखोनियां मनीं । म्हणे नाहीं ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥४॥
हरुषली माये । सुख अंगीं न समाये । कवळूनि बाहे देती आळींगन । आनंद भोजनीं ।
तेथें फिटलीसे धणी । तुका म्हणे कोणी । सांडा शेष मज ॥५॥


३२५९
भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥१॥
मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें ॥ध्रु.॥
तिमयाचें बैल करी शिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥२॥
तुका म्हणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्ती निसुंगातें ॥३॥


६९
भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । बक ध्यान धरी मत्स्या जैसें ॥१॥
टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ध्रु.॥
ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी ॥२॥
खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥३॥
तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परी तूं कृपावंत पांडुरंगा ॥४॥


८६५
भोवंडींसरिसें । अवघें भोंवत चि दिसे ॥१॥
ठायीं राहिल्या निश्चळ । आहे अचळीं अचळ ॥ध्रु.॥
एक हाकेचा कपाटीं । तेथें आणीक नाद उठी ॥२॥
अभ्र धांवे शशी । तुका असे ते तें दुसरें भासी ॥३॥


३२६३
भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसें केलें भक्तिभावें ॥१॥
म्हणउनि चिंता नाहीं आम्हां दासां । न भ्यो गर्भवासा जन्म घेतां ॥ध्रु.॥
आपुलिया इच्छा करूं गदारोळ । भोगूं सर्वकाळ सर्व सुखें ॥२॥
तुका म्हणे आम्हां देवाचा सांगात । नाहीं विसंबत येर येरां ॥३॥


३७६३
भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळीं तो ॥१॥
आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ध्रु.॥
जवळी होतां न कळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥२॥
तुका म्हणे हा लाघवी मोटा । पाहे खोटा खरा भाव ॥३॥


३२३७
भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥१॥
अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥
जोडितसां तुम्ही खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥२॥
तुमची व्याली माझे डाई हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥३॥
दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥४॥
भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥५॥
माझ्या अंगसंगें तुम्हांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥६॥
ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि । परि तुम्ही अजूनि न धरा लाज ॥७॥
वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥८॥
तुका म्हणे झाला कामाचा अंकित । सांगे मनोगत तैसा वर्ते ॥९॥


७७६
भ्रमना पाउलें वेचताती तीं वाव । प्रवेशतां ठाव एक द्वार ॥१॥
सार तीं पाउलें विठोबाचीं जीवीं । कोणीं न विसंभावीं क्षणभरि ॥ध्रु.॥
सुलभ हें केलें सकळां जीवन । फुंकावें चि कान न लगेसें ॥२॥
तुका म्हणे येथें सकळ ही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचें ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या