अभंग क्र.401
तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥१॥
आणी नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ध्रु.॥
हेंचि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥२॥
तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥३॥

अर्थ

हे देवा मी तुला शरण आलेलो आहे जन्मोजन्मीचा मी तुझा अंकित दास आहे.हे केशवा,तुझ्या शिवाय आणखी कशाचीही हाव माझ्या मनात नाही.माझे गाणे म्हणशील,तर तुझे नामसंकीर्तन करणे तेवढेच. तुकाराम महाराज म्हणतात आणि माझी भूषणे,अलंकार म्हणशील तर तुझी विविध नामे हीच.


अभंग क्र.402
उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥१॥
तुझें नाम धरिलें कंठीं । केली संसारासी तुटी ॥ध्रु.॥
आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥२॥
तुका म्हणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥३॥


अभंग क्र.403
क्रियामति हीन । एक मी गा तुझें दीन ॥१॥
देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ध्रु.॥
नको माझे ठायीं । गुणदोष घालूं कांहीं ॥२॥
अपराधाच्या कोटी । तुका म्हणे घाला पोटीं ॥३॥

अर्थ

देवा मी क्रियाहीन आहे मती हीन आहे मी तुझा दीन दुबळा दास आहे.देवा,तू माझा सांभाळ कर.माझी तळमळ दूर कर.माझ्या ठिकाणी गुण किंवा दोष यांपैकी कशाचाच प्रवेश येणार नाही असे कर. तुकाराम महाराज म्हणतात खरोखर माझे अनंत अपराध झाले आहेत त्यांबद्दल मला क्षमा कर ते अपराध पोटात घाल.


अभंग क्र.404
नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥१॥
तैसे चित्तशुद्धी नाहीं । तेथें बोध करील काई ॥ध्रु.॥
वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥२॥
वांझा न होती लेकुरें । काय करावें भ्रातारें ॥३॥

अर्थ

नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥४॥@
प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥५॥@
तुका म्हणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥६॥


अभंग क्र.405
नवां नवसांचीं । झालों तुह्मासी वाणीचीं ॥१॥
कोण तुझें नाम घेतें । देवा पिंडदान देतें ॥ध्रु.॥
कोण होतें मागें पुढें । दुजें बोलाया रोकडें ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । कोणा घेतोसि वोसंगा ॥३॥

अर्थ

अहो देवा आम्ही तुमची नव्या नवसाची लेकरे आहोत.देवा आमच्या वाचून तुझे नाव कोण घेणार आहे जीवरुपी पिंड आम्ही दान तुला देत आहोत ते आमच्या वाचून तुला कोण देणार आहे, आमच्या खेरीज मागे पुढे तुम्हांला परखड शब्दात बोलणारे,रोकठोक प्रश्न विचारणारे दुसरे कोण आहे. आम्ही पांडुरंग,आम्हीं तुझी मुले नसतो,तर तुम्हीं पदरात कोणाला घेतले असते.


अभंग क्र.406
एका बीजा केला नास । मग भोगिले कणीस ॥१॥
कळे सकळां हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥ध्रु.॥
लाभ नाहीं फुकासाठीं । केल्यावीण जीवासाठीं ॥२॥
तुका म्हणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥३॥

अर्थ

शेतकरी भूमीमध्ये एक बीज पेरून त्याचा नाश करतो पण खरे तर त्या एक बीज यामुळेच अनेक बीज उत्पन्न होतात मग त्या शेतकऱ्याला अनेक कंसांचा लाभ होतो.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही गोष्ट कळतच असते.आपला जीव खर्ची घातल्या शिवाय फुकट काही मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात रणा मध्ये शूर वीर जीव गमवतो पण त्याला दुप्पट लाभ होतो.तो म्हणजे इहलोकी कीर्ती मिळते आणि परलोकी सद्गती प्राप्त होते.


अभंग क्र.407
आयुष्य गेलें वांयांविण । थोर झाली नागवण ॥१॥
आतां धांवाधांव करी । काय पाहातोसि हरी ॥ध्रु.॥
माझे तुझे याचि गती । दिवस गेले तोंडीं माती ॥२॥
मन वाव घेऊं नेदी । बुडवूं पाहे भवनदी ॥३॥
पडिला विषयाचा घाला । तेणें नागविलें मला ॥४॥
शरण आलों आतां धांवें । तुका म्हणे मज पावें ॥५॥

अर्थ

माझे आयुष्य वाया गेले माझी चांगलीच नागवंण झाली आहे. हे हरी आता तरी तु धावा धाव कर काय पाहत आहेस माझा उद्धार कर. अरे देवा माझे आणि तुझे करण्यातच आज पर्यंत दिवस गेले असे करता करता माझ्या तोंडात माती पडायची वेळ आली आहे. माझे मन एक क्षण देखील स्थिर राहत नाही ती मला भवन नदीत बुडवू पाहत आहे. माझ्यावर विषयांचा घाला पडला आणि त्यामुळे मी चांगलाच नागावला गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता तुला शरण आलो आहे त्यामुळे तू धाव आणि मला येऊन भेट.


अभंग क्र.408
सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥१॥
त्याचा हाचि उपकार । अंतीं आम्हाशीं वेव्हार ॥ध्रु.॥
नामरूपा केला ठाव । तुज कोण म्हणतें देव ॥२॥
तुका म्हणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥३॥

अर्थ

देवा मी आज पर्यंत आणि प्रकारच्या विपत्ती सोसल्या आणि सर्व लाव तुझ्या हाती दिला आहे. अखेर आम्हांला सोडून दिलेस त्याचेच का उपकार फेडलेस?अरे आम्हीं आमच्या भक्तीने तुला नाव आणि रूप दिले.तुला सगुण साकार केले.नाही तर तुला देव कोणी म्हंटले असते? तुकाराम महाराज म्हणतात नाम रूपाच्या घराचा आश्रय आम्हीच तुला दिला आहे.


अभंग क्र.409
आपुलें मागतां । काय नाहीं आम्हां सत्ता ॥१॥
परि या लौकिकाकारणें । उरीं ठेविली बोलणें ॥ध्रु.॥
येचि आतां घडी । करूं बैसों तेची फडी ॥२॥
तुका म्हणे करितों तुला । ठाव नाहींसें विठ्ठला ॥३॥

अर्थ

देवा आम्ही तुम्हाला काही मागत आहोत तर ते आमचेच मागत आहोत आणि ते देखील आम्हाला मागायची सत्ता नाही की काय? परंतु देवा आम्ही तुला जबरदस्ती करून ती गोष्ट मागितली तर तुझा अपमान होईल या लौकिकामुळे आम्ही आमच्या मनामध्ये जी गोष्ट आहे ती मनातच ठेवली आहे. परंतु देवा आता याच घटकेला बसून आपल्यात काय निर्णय असेल त्याचा निकाल लावू. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला आता मी तुझा ठावठिकाणा नाहीसा करतो म्हणजे तुला चांगले समजेल. (म्हणजेच या अभंगात महाराज म्हणतात की देव नाम व रूप याच्याही पलीकडे आहे आणि तो ते मी जाणत आहे.)


अभंग क्र.410
असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥१॥
माझें प्रारब्ध हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ध्रु.॥
सोडवीन आतां । ब्रीदें तुझे पंढरीनाथा ॥२॥
तुका म्हणे बळी । गांढयाचे कान पिळी ॥३॥

अर्थ

देवा आता तुला किती वेळा काकुळतीला यावे?माझे प्रारब्ध फारच बलवान आहे त्या पुढे तू सुद्धा दुबळा ठरतोस.हे पंढरीनाथा तू आता धारण केले तुझे पतितपावन दीनदयाला दिनबंधू हि ब्रिदे मी तुला सोडून द्यायला लगीन. तुकाराम महाराज म्हणतात जो बळी असतो तो (गांढ्याचे)दुर्बळाचे कान पिळतो,असा नियमाच आहे.


अभंग क्र.411
काय नोहे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१॥
सर्व साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥
योगायाग तपें । केलीं तयानें अमुपें ॥२॥
तुका म्हणे जपा । मंत्र त्री अक्षरी सोपा ॥३॥

अर्थ

एका विठ्ठलाचे नाम चिंतन केले असता काय एक होत नाही?सर्व काही चिंतनाने प्राप्त होते.विठ्ठल चिंतन हे सर्व साधनांचे सार आहे.ते भवसागरातून तरुण नेते.त्याने असंख्य तपे व व्रते केल्याचे आणि याग करण्याचे पुण्य मिळते. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून भक्तजन हो,विठ्ठल हा तीन अक्षरी नाम जप तुम्ही श्रद्धेने करा.


अभंग क्र.412 
हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥१॥
त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ध्रु.॥
नसो भाव चित्तीं । हरीचे गुण गातां गीतीं ॥२॥
करी अनाचार । वाचे हरीनामउच्चार ॥३॥
हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥४॥
म्हणवी हरीचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥५॥

अर्थ

जरी एखादा दुराचारी मनुष्य असेल परंतु अनु तापाने तो वाचेने विठ्ठल नामाचा उच्चार करत असेल, तर,त्याचा मी सर्वथा दास आहे.हरीचे गुणानुवाद गाताना प्रथम प्रथम तीव्र भावभक्ती चित्तात नसेलही तरी नाम घ्याच.अनाचार करणारासुद्धा जर वाचेने हरिनामाचा उच्चार करीत असेल,त्याचे कुळ अशुद्ध असेल तरी ,त्याने काही बाधा येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्याला हरीचा दास म्हणवितो,धन्यच आहे.


अभंग क्र.413
हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥
करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥
तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥

अर्थ

भक्त प्रल्हादाने आर्ततेने नारायणाला हाक मारताच नारायण स्तंभ फोडून स्तंभातून प्रकट झाले.अशी कृपावंत माऊली माझ्या विठाई माऊलीहून दुसरी कोण आहे?तिचे स्मरण करताच प्रेमाने धावत येऊन ती भक्ताला मिठी मारते. तुकाराम महाराज म्हणतात हरीचेनाम गीतात आळवावे.त्याने सायुज्य मुक्ती मिळते.


अभंग क्र.414
लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें ॥१॥
तैसा तूंचि आम्हांठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥२॥
तुका म्हणे अधीलपणें । नेली लांकडें चंदनें ॥३॥

अर्थ

चुंबकाच्या आकर्षणाने लोखंडाची सुई उभी राहते,तसा तू आमच्या आकर्षणाने आताही व बाहेरही उभा राहतोस.दोरा जळणारा आहे,पण तो मोहरा नावाच्या खड्याला गुंडाळून टाकला तर तो जळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात चंदनाच्या वृक्षाच्या संगतीने इतर वृक्षांचे पूर्वीचे गुणधर्म जाऊन त्यांना चंदनाचा सुगंधी गुण येतो.


अभंग क्र.415
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥
तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥
मेळवूनि नरनारी । शकुन सांगे नानापरी ॥२॥
तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥३॥

अर्थ

असे अनेक लोक आहेत की जे डोक्यावर केस वाढतात व अंगामध्ये भुताचा संचार आणतात.पण तेवढ्याने ते संत होत नाहीत,कारण ती आत्मानुभवाची खूण नसते.काही लोक,पुरुष आणि बायका जमुन अनेक प्रकारचे शकून सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात पण असल्या लबाड, (मैंद)डोंगी माणसाजवळ गोविंद राहत नाही.


अभंग क्र.416
गाढवाचे घोडे । आम्ही करूं दृष्टीपुढें ॥१॥
चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥ध्रु.॥
सोंगसंपादनी । तरि करूं शुद्ध वाणी ॥२॥
तुका म्हणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥३॥

अर्थ

गाढवाचे घोडे म्हणजे इंद्रियांचा दास असलेल्या मनुष्याला देखील आम्ही घोड्याप्रमाणे म्हणजे जसा साधू बुद्धिवान असतो त्याप्रमाणे आम्ही त्याला करू.म्हणजेच इंद्रियांचा स्वामी करू.असा मनुष्य वारंवार वाहणा चघळणाऱ्या कुत्र्याप्रमाणे पुन्हा पुन्हा नीच कर्म करतो.जरी असा मनुष्य ढोंगी पाणाने वागत असला तरी त्याची वाणी सुद्धा आम्हीं शुध्द करू. तुकाराम महाराज म्हणतात जरी कोणी दुष्ट असला,खळ पुरुष असला तरी त्याला आम्ही शुद्ध करू.


अभंग क्र.417
बाप मेला न कळतां । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसर्‍याचे काज ॥ध्रु.॥
बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥२॥
पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥३॥
माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥४॥

अर्थ

महाराज म्हणतात ज्या वेळी मला संसाराची काहीच चिंता नव्हती त्याचवेळी माझा बाप मेला, माझी बायको मेली मुक्त झाली,सुटली मी पण सुटलो.फार बरे झाले देवाने मला माये पासून सोडविले .माझा पोरगा मेला ते हि बरे झाल.देवाने माये पासूनच सोडवले. तुकाराम महाराज म्हणतात माझी आई माझ्या समक्षच वारली तेही बरे झाले तिचे कसे होईल हि चिंता देखील हरली.


अभंग क्र.418
न लगे मरावें । ऐसा ठाव दिला देवें ॥१॥
माझ्या उपकारासाठीं । वागविला म्हणु कंठीं ॥ध्रु.॥
घरीं दिला ठाव । अवघा सकळ ही वाव ॥२॥
तुका म्हणे एके ठायीं । केले माझें तुझें नाहीं ॥३॥

अर्थ

देवाने मला अशा ठिकाणी आश्रय दिला आहे की जेथे मरणच नाही.त्याचे असे माझ्यावर उपकार असल्यामुळे मी त्याला माझ्या कंठात धारण केले आहे.हरीने आपल्या पूर्णतेच्या घरी मला आश्रय दिला,त्यामुळे बाकी सर्व पोकळ वाटू लागलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाने त्याचे आणि माझे असे ऐक्य केले कि तेथे माझे आणि तुझे हि भाषाच नाही.


अभंग क्र.419
नाहीं लाग माग । न देखेंसें झाले जग ॥१॥
आतां बैसोनियां खावें । दिलें आइतें या देवें ॥ध्रु.॥
निवारिलें भय । नाहीं दुसऱ्याची सोय ॥२॥
तुका म्हणे कांहीं । बोलायाचें काम नाहीं ॥३॥

अर्थ

ज्या ठिकाणी जाऊन मला जगच दिसणार नाही आणि ज्या मार्गाचा मागमूसही कोणाला लागणार नाही अशा ठिकाणी देवाने मला बसविले आहे(सच्चिदानंदपद).अशी हि आयती स्वरूप देणगी देवाने दिल्या मुळे आता मी जगाच्याजागीच बसून तो आनंद उपभोगतो.त्या ठिकाणी भय मुळीच नाही कारण भयाचे मुळ म्हणजे द्वैत,त्याचा तेथे संबंधच येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता बोलण्याचे कामच उरले नाही.
१३८५@नाहीं लोपो येत गुण । वेधी आणीका चंदन ॥१॥@
न संगतां पड ताळा । रूप दर्पणी सकळा ॥ध्रु.॥@
सारविलें वरी । आहाच तें क्षणभरी ॥२॥@
तुका म्हणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें ॥३॥


अभंग क्र.420
तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥
हेंचि आतां लागे करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ध्रु.॥
होउनी निर्भर राहिलों निंश्चित । पावनपतित नाम तुझें ॥२॥
करितां तुज होय डोंगराची राई । न लागतां कांहीं पात्या पातें ॥३॥
तुका म्हणे तुज काय ते अशक्य । तारितां मशक मज दीना ॥४॥

अर्थ

देवा मी तुझा अंकित दास आहे असे सर्वच लहानथोर म्हणत आहेत.देवा आता तुला हा आपला मोठे पणा राखला पाहिजे.पतितपावन असे तुझे नाव आहे.हे जाणून मी निश्चिंत पणे राहिलो आहे.तुझा पराक्रम असा आहे कि,पापणी लावते न लावते तेवढ्यात तू डोंगराची राई करशील(मोठे पापही नष्ट करशील). तुकाराम महाराज म्हणतात मी तर ऐखाद्या मशका प्रमाणे शुल्लक आहे,दिन आहे असे असताना मला तरणे तुला अश्यक्य आहे का?


अभंग क्र.421
आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥१॥
तो हा देवांचा ही देव । काय कळिकाळाचा भेव ॥ध्रु.॥
वेद जया गाती । श्रुति म्हणती नेति नेति ॥२॥
तुका म्हणे निज । रूपडें हें तत्त्वबीज ॥३॥

अर्थ

आम्ही ज्याचे दास आहोत तो आमचा मालक पंढरीला वास करतो. तो आमचा मालक देवांचाही देव आहे त्यामुळे आम्हाला कसले आले कळिकाळा चे भेव. ज्याचे वर्णन वेद गातात आणि श्रुती म्हणतात की आम्हाला तो अजूनही कळत नाही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात निज स्वरूपाचे जे तत्व बीज आहे ते पंढरीला वास करणाऱ्या आमच्या मालकाचे म्हणजे पंढरीरायाचे रूप आहे.


अभंग क्र.422
भक्तवत्सल दिनानाथ । तिहीं लोकीं ज्याची मात॥१॥
तो हा पुंडलिकासाठीं । आला उभा वाळवंटीं ॥ध्रु.॥
गर्भवास धरी । अंबॠषीचा कैवारी ॥२॥
सकळां देवां अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥३॥
तुका म्हणे ध्यानीं । ज्यासि ध्यातो शूळपाणी॥४॥

अर्थ

अहो ज्या देवाची त्रैलोक्यामध्ये भक्तवत्सल दिनानाथा अशी कीर्ती आहे तोच हा देव पुंडलिकाकरता वाळवंटात उभा राहिला आहे.त्याने अंऋषीचा कैवार घेऊन त्याच्या साठी गर्भवास पत्करले.तो सर्व देवांचाअधिष्ठान आहे म्हणून त्याच्या एका नामस्मरणाने सर्व सिद्ध होते. तुकाराम महाराज म्हणतात या देवाचे,नित्य ध्यान शूलपाणी,शिव भगवान महादेव एकाग्रतेने आपल्या चित्तात करतो.ऐवढा हा श्रेष्ठ आहे


अभंग क्र.423
फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चाळविलें ॥१॥
फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥
तुका म्हणे अवघें फटकाळ हें जिणें । अनुभविये खूणे जाणतील ॥३॥

अर्थ

जे लोक तामस गुणाने उपासना करतात त्या लोकांचा देव्हारा ही फटकळ आहे त्यांनी दिलेला अंगारा ही फटकळ आहे म्हणजे खोटा आहे व त्यांनी सांगितलेले विचारही फसवे आहेत.कारण त्याने लोकांना भाबडे विचार सांगून फसविले.असा भक्त वाह्यात आणि त्याचा देव हि वाह्यात कारण असा डोंगी माणूस इतरंना नादी लावून त्याचा घात करतो. तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारचे देव्हारे माजवून जे अंगारे देतात,त्यांचे जगणे व्यर्थ आहे हे,ज्यांना अनुभवाचीम्हणजे स्वरूपस्थितीची खूण पटते ते सहज ओळखतात.


अभंग क्र.424
नेत्राची वासना । तुज पाहावें नारायणा ॥१॥
करीं याचें समाधान । काय पहातोसी अनुमान ॥ध्रु.॥
भेटावें पंढरिराया । हेंचि इच्छिताती बाह्या ॥२॥
जावें पंढरीसीं । हेंचि ध्यान या मानसी ॥३॥
चित्त म्हणे पायीं । तुझे राहीन निश्चयीं ॥४॥
म्हणे बंधु तुकयाचा । देवा भाव पुरवीं याचा ॥५॥

अर्थ

हे नारायणा तुझे रूप माझ्या डोळ्यांनी पाहावे अशी माझी वासना आहे.त्यांचे तू समाधान कर.वाट पाहत काय बसला आहेस?हे पंढरीराया,तुला भेटावे हीच माझ्या बाहूंची इच्छा आहे.पंढरीला जाण्याचा ध्यास माझ्या मानाने घेतला आहे.चित्त हे तुझ्या पायांच्या ठिकाणी निश्चिंत होऊन निरंतर राहवे अशी इच्छा करत आहे.तुकाराम महाराजांचे बंधू म्हणतात,माझी हि इच्छा तू पूर्ण कर.


अभंग क्र.425
जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्ही ॥१॥
नाहीं तरी तुज कोण हो पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ध्रु.॥
अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणाची ॥२॥
धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावें त्या ॥३॥
अमृतासी मोल विषाचिया गुणें । पितळें तरी सोनें उंच निंच ॥४॥
तुका म्हणे आम्ही असोनिया जान । तुज देव पणा आणियेलें ॥५॥

अर्थ

देवा पतीता करताच तुला नाम रूपाला यावे लागले म्हणजेच याचा अर्थ असा होतो की, आम्ही पतीतच खरे तुझे दैवत आहोत.नाही तर तू निराकार स्वरुपस्थितीने असतास तर तुला कोणी मानले असते.आंधरानेच दिव्याच्या प्रकाशाला शोभा आणली आहे व कोणंदणाच्या योगाने माणिक शोभून दिसते.वैद्याला रोगा मुळेच प्रसिद्धी मिळते.जर सर्व सुखी निरोगी असते,तर वैद्याकडे जाण्याचे कोणाला काय कारण होते?विषा मुळेच अमृताला मोल चढते आणि पितळ हा धातू हलका आहे म्हणून सोन्याला श्रेष्टता प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला,आम्हीं असे पतित असल्यामुळेच तुला देवपणाचा मोठेपणाला आणले आहे हे तू समजून राहा.


अभंग क्र.426
सुखवाटे येचि ठायी । बहु पायीं संतांचें ॥१॥
म्हणऊनि केला वास । नाहीं नास ते ठायीं ॥ध्रु.॥
न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥२॥
तुका म्हणे निवे तनु । रज:कणु लागतां ॥३॥

अर्थ

मला संतांच्या पाया जवळच खूप सुख वाटत आहे.येथे सुखाला कधीही नाश नाही म्हणून मी येथेच वास्तव्य केले.आता येथून ढळणे नाही,कसलेही खटाटोप नाहीत म्हणून माझी चिंता नाहीशी झाली. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे रज: कण जरी शरीराला लागले तरी त्रिविध ताप नाहीसे होतात शरीर विश्रांत पावते.


अभंग क्र.427
देऊंनियां कपाट । कीं कोण काळ राखों वाट ॥१॥
काय होईल तें शिरीं । आज्ञा धरोनियां करीं ॥ध्रु.॥
करूं कळे ऐसी मात । किंवा राखावा एकांत ॥२॥
तुका म्हणे जागों । किंवा कोणा नेंदूं वागों ॥३॥

अर्थ

देवा इंद्रियांचे द्वार बंद करून किती दिवस तुझी वाट पाहत राहावे.आता जी आज्ञा तू करशील,ती मी शिरोधार्य करीन.मी काय करू?मला जसे समजते,तसे कार्य करू कि केवळ एकांतात राहू.तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मी येथे नेहमी जागत राहू की, इतर कोणाला म्हणजे विकारांना येण्या-जाण्यासाठी बंदी घालत राहू की, त्यांची वागणूक बंद करू?


अभंग क्र.428
मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥१॥
सांभाळा जी माझीं विषमें अनंता । जवळी असतां अव्हेरु कां ॥ध्रु.॥
आणिकांची चाले सत्ता आम्हांवरी । तुमची ते थोरी काय मग ॥२॥
तुका म्हणे आलों दुरोनि जवळी । आतां टाळाटाळी करू नयें ॥३॥

अर्थ

मायबापाच्या पुढे लेकराचे हट्ट चालत असतात माय बापा वाचून इतर कोण त्याचे हट्ट पुरवणारा आहे?अहो देवा,अनंता माझ्या ठिकाणी जी काम क्रोधाची विषम वृत्ती वाढली आहे,ती तुम्ही नाहीशी करा.तुम्ही माझ्या जवळ असून माझा अव्हेर का करता?जर आमच्यावर दुसऱ्या कोणाची सत्ता चालेल, तर मग तुमचा थोर पणा तो काय राहिला? तुकाराम महाराज म्हणतात देवा,मी खूप लांबून तुमच्या जवळ (अनेक योनी फिरून मनुष्यदेहात) आलो आहे आता आपण माझा उद्धार करण्यास टाळाटाळ करू नये.


अभंग क्र.429
योग तप याचि नांवें । गळीत व्हावें अभिमानें ॥१॥
करणें तें हेंचि करा । सत्य बरा व्यापार ॥ध्रु.॥
तरि खंडे येरझार । निघे भार देहाचा ॥२॥
तुका म्हणे मानामान । हें बंधन नसावें ॥३॥


अभंग क्र.430
करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥१॥
तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥ध्रु.॥
मजुराचें धन । विळा दोरचि जतन ॥२॥
तुका म्हणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥३॥

अर्थ

काही मनुष्य असे आहेत की ती दररोज स्नानसंध्या करतात परंतु निषिद्ध अन्न खाऊन त्याने केलेल्या सर्व कर्मांचा नाश करतो.अशा मनुष्याला काही लाभही होत नाही व त्याचे नुकसानही होत नाही.जमा खर्च बरोबर होतो.ज्याप्रमाणे मजुराने मजुरी करून मिळवलेले सर्व धन खर्च होते आणि त्याच्या जवळ फक्त विळा आणि गवत बांधण्याचा दोर ऐवढेच राहते.म्हणून ज्याच्यामध्ये अधीरपण आहे त्याला देव प्राप्त होत नाही.


अभंग क्र.431
वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारे नेहालें ॥१॥
नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ध्रु.॥
अंगुळिया मोडी । त्यासी काय सिलें घोडीं ॥२॥
नपुंसकासाठीं । तुका म्हणे न लगे जेठी ॥३॥

अर्थ

एखादा सामान्य नाव्ही शुर शिपायावर वस्तरा घेऊन धावला आणि त्याचा प्रतिकार म्हणून शूर शिपायाने त्याच्यावर तलवार घेऊन धाव घेतली तर ते योग्य नाही, त्यावर खरे म्हणजे,” शिपायानने,त्याच्यावर तलवार घेऊन धावणे आवशक नाही” शिपायाने जर त्या नाव्याला “गप्प बस मूर्खा,काय गडबड लावली आहेस?”अशा भाषणाने त्याला फजित करावे म्हणजे झाले. अतिरागणे दुसऱ्यावर बोटे मोडणार्‍या हिजडयाचा प्रतिकार करण्यास शिपाई आणि घोडेस्वार काय करायचे आहेत? तुकाराम महाराज म्हणतात नामर्दाच्या पारिपत्यासाठी मल्लाची आवशक्यता नाही.


अभंग क्र.432
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥
मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥ध्रु.॥
सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुलती ॥२॥
तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥३॥

अर्थ

हरी आणि भक्त या दोघांमध्ये प्रेमसूत्र ची दोरी असते त्यामुळे भक्त जिकडे जातो तिकडे त्याच्या पाठीमागे देव प्रेमसुत्रा च्या दोरीने आपोआप जात असतो.कारण भक्ताने पण देवाला आपले मन,काय आणि वाचा सर्वच अर्पण केले आहे.त्या देवाच्या हाती सर्व सत्ता आहे.त्याला माझी कीव येते. तुकाराम महाराज म्हणतात आता तो जसे ठेवील,तसे आम्हीं राहो.


अभंग क्र.433
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥
त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥
पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥२॥
तुका म्हणे तई । सिद्धी वोळंगती पायीं ॥३॥

अर्थ

पांडुरंगाचे चिंतन केले असता आपल्याला जे ठिकाण पाहिजे आहे जे पद पाहिजे आहे त्या ठिकाणी आपल्याला तो पोहोचवतो.मना मध्ये त्याचे चिंतन केले म्हणजे तो चित्ताला आपल्या स्वरूपाने वेढून टाकतो.इच्छिलेले फळ प्राप्त होण्यास आपल्या अंगी भागवत चिंतनाचे बळ पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात असे असेल तर रीध्दी सिद्धी भक्ताची चरण सेवा करतात.


अभंग क्र.434
धन्य भावशीळ । ज्याचें हृदय निर्मळ ॥१॥
पूजी प्रतिमेचे देव । संत म्हणती तेथें भाव ॥ध्रु.॥
विधिनिषेध नेणती । एक निष्ठा धरुनी चित्तीं ॥२॥
तुका म्हणे तैसें देवा । होणें लागे त्यांच्या भावा ॥३॥

अर्थ

ज्या भाविकाचे हृदय निर्मळ आहे शुद्ध आहे तो भक्त धन्य आहे.जो देवाची प्रतीमा करून मोठ्या प्रेमाने तिचे पूजन करतो,त्याच प्रतिमेच्या ठिकाणी त्याचा खरा भाव असतो,असे संत म्हणतात.ज्यांच्या चित्तात विधिनिषेध यांचा काहीही विचार नसतो,केवळ भगवंता वरच एकनिष्ठा असते, तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या भक्तीभावा सारखे स्वरूप देवाला धरण करावे लागते.


अभंग क्र.435
आधीच आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥१॥
मग त्या कैंची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥ध्रु.॥
नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥२॥
तुका म्हणे ते गाढव । घेती मनासवें धांव ॥३॥

अर्थ

जगामध्ये असे काही मनुष्य आहेत की जे अगोदरच आळशी असतात आणि त्याला गुरूदेखील असे मिळतात की त्या गुरूचा उपदेश देखील त्याला आळशी बनवण्यासाठी आणखी मदत करतात. मग त्याला विधिनिषेध याचे पालन करण्यासाठी कसली आडकाठी येणार तो विधिनिषेध करणार नाही त्यामुळे त्याची आणि विधिनेनिषेधाची भेट कशी होणार? त्यामुळे त्याला नेहमीच असे वाटते की धर्माचरण करू नये आणि विधिनिषेधाचे कर्म देखील करू नये. तुकाराम महाराज म्हणतात असे मनुष्य मनुष्य देहाला येऊन देखील गाढवाच असतात कारण त्यांची वर्तणूक गाढवा प्रमाणेच असते कारण ते त्यांच्या मनानुसार हवे तसे मन मानेल तसे धाव घेतात.


अभंग क्र.436
नाचे टाळी पिटी । प्रेमें अंग धरणीं लोटी ॥१॥
माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरीजन ॥ध्रु.॥
न धरिती लाज । नाहीं जनासवें काज ॥२॥
तुका म्हणे दाटे । कंठ नेत्रीं जळ लोटे ॥३॥

अर्थ

खरे भोळे भाविक भक्त हे नाचतात हरीनाम घेताना टाळी वाजवतात धरणीवर अंग टाकून लोळण घेतात हरीछंदात मग्न असतात,असे जे भोळे भाविक माझे मित्र ते अतिशय सज्जन आहेत ते मला फार आवडतात.ते मनात मुळीच लाज धरत नाहीत कारण त्यांना लोकांशी काही कर्तव्य नसते. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या प्रेमाने त्यांचा कंठ सद्गतीत होऊन त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू येत असतात,असे भक्त मला फार आवडतात.


अभंग क्र.437
कथा करुनियां दावी प्रेमकळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ॥१॥
तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥धृ॥
टिळे टोपी माळा देवाचे गवाळे । वागवी ओंगळ पोटासाठी ॥२॥
गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी । तयाचे अंतरी काम लोभ ॥३॥
कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे । प्रेमेवीण डोळे गळताती ॥४॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ॥५॥

अर्थ

काही लोक असे आहेत ते हरिकथा तर करतात पण हरिकथा करताना हरी विषयी प्रेम आहे असे दाखवतात परंतु त्यांच्या अंतरंग मध्ये कुकर्मा विषयी एक विशेष जिव्हाळा असतो.तो स्वतः नीच असून बारा टिळे लावतो डोक्यात टोपी घालतो, गळ्यात माळा घालतो.व आपले पोट भरण्या करता देवाची सांभाळ जवळ बाळगतो.असा मनुष्य गोसाव्याचे रूप धारण करतो परंतु त्याच्या अंतरंगात परनारी विषयी विषय वासना जागृत असते पाप दृष्टीने तो परनारी कडे पाहत असतो त्याच्या अंतरंगात काम क्रोध यांचा विकार माजलेला असतो,तो पडतो, लोळतो, त्याचे डोळ्यातून प्रेम शिवाय पाणी गाळत असते. तुकाराम महाराज म्हणतात असले मायेचे मैंद ढोंगी लबाड असतात त्यांच्या जवळ गोविंद नाहिच असे महाराज दोन वेळा सांगतात.


अभंग क्र.438
पाखांडयांनी पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों ॥१॥
कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुलें भिकारी अर्थ नेणे ॥ध्रु.॥
न कळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥२॥
तुझ्या पांयांविण दुजें नेणें कांहीं । तूंचि सर्वांठायीं एक मज ॥३॥
तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलों भांडां वादकासी ॥४॥

अर्थ

देवा पाखंडयांनी माझी पूर्णपणे पाठ पुरवली म्हणजे पाटला केलेला आहे आता यांच्याविषयी मी काय बोलू?नुसतेच कांदे खाणाऱ्याला कस्तुरीचा वास काय समजणार आहे स्वतः भिकारी असताना कस्तुरी प्राप्तीची इच्छा असून काय उपयोग आहे? जी गोष्ट मला कळत नाही तीच गोष्ठ मला छळुन विचारतात आणि माझे पाय घट्ट धरून सोडत नाही. देवा तुमच्या चरणा वाचून मी दुसरे काहीच जाणत नाही सर्व ठिकाणी तुम्हीच माझ्यासाठी सर्वकाही आहात. तुकाराम महाराज म्हणतात या नास्तिक लोकांची वाचेलाखिळ पडो अश्या भांडखोर लोकांशी मी किती बोलू?


अभंग क्र.439
कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥१॥
द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडेंचि ॥ध्रु.॥
दंभ करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥२॥
वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥३॥
तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥४॥

अर्थ

अहो कलियुगामध्ये असे पाखंडी लोक झाले आहेत कि जे खूप चांगल्या प्रकारे कवित्वही करतात व भांडणही करतात. चित्तामध्ये द्रव्य, पत्नी, पुत्र, घरदार मान-सन्मान याची आवडतात धरतात आणि मुखाने केवळ वैराग्याच्या कोरड्या गप्पा हाणतात. लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा यासाठी साधूत्वाचे दांभिक सोंग हे पाखंडी लोक घेतात मुखाने वैराग्याच्या त्यागाच्या गोष्टी बोलतात परंतु मनामध्ये त्याचा लवलेशही नसतो. वेदाने ज्या आज्ञा दिल्या आहेत तसेच आपले स्वहित ज्यामध्ये आहे त्या गोष्टी करत नाहीत आणि देहावरून आलीप्त तर होतच नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात वाचेने जे बोलाल तसे जर केले नाही तर तो पुढे यमाचे दंड सहन करेल.


अभंग क्र.440
विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥१॥
मारिती तोडिती झोडिती निष्ठ‍ुर । यमाचे किंकर बहुसाल ॥ध्रु.॥
असिपत्रीं तरुवरखैराचे इंगळ । निघतील ज्वाळ तैलपाकीं ॥२॥
तप्तभूमीवरी चालविती पायी । अग्नीस्तंभ बाहीं कवळविती ॥३॥
म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे यातायातीं गर्भवास ॥४॥

अर्थ

विषय सुख तिथे म्हणजे इहलोकांमध्ये भोगताना खूप गोड वाटते पण पुढे यमदंड भोगावा लागेल त्यावेळी अवघड होईल.यमलोकांत यमदूत तलवारीच्या पात्याप्रमाणे धारदार पाने असलेल्या वृक्षांना आलिंगन द्याण्यास सांगतात.खैराच्या निखाऱ्यातून चालवितात आणि उकळत्या तेलात बुडवितात.अतिशय तापलेल्या भूमीवर अनवाणी चालवतात.तापून लाल झालेल्या खांबाला मिठी मारावयास लावतात. तुकाराम महाराज म्हणतात पुढे असे हाल होणार आहे,म्हणुन अशा विषयासक्त लोकांना मी कळवळ्याने सांगतो कि आता पुन्हा गर्भवास भोगायला लावणाऱ्या उद्योगात पडू नका.


अभंग क्र.441
अल्प माझी मती । म्हणोन येतों काकुलती ॥१॥
आतां दाखवा दाखवा । तुमची पाउलें केशवा ॥ध्रु.॥
धीर माझ्या मना । नाहीं नाहीं नारायणा ॥२॥
तुका म्हणे दया । मज करा अभागिया ॥३॥

अर्थ

देवा माझी बुद्धी अल्प आहे म्हणून तर मी तुम्हाला काकुळतीला येत आहे.अहो पांडुरंगा दाखवा हो दाखवा मला तुमचे चरण दाखवा.नारायण माझ्या मनाला मुळीच धीर नाही हो नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही माझ्या सारख्या का भाग्यावर दया कराल,तरच माझा उद्धार होईल.


अभंग क्र.442
वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां ॥१॥
तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वाट तुझी ॥२॥
कां बा मोकलिले कोणा निरविले । कठिण कैसे झाले हृदय तुजे ॥३॥
तुका म्हणे माझ्या असांवल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥४॥

अर्थ

देवा तुमची वाट पाहून पाहून माझे डोळे शिणले आहे मजे त्रासले आहेत तुम्ही केव्हा माझ्या डोळ्यांना तुमचे रूप दाखवणार आहात?हे विठाबाई,तू कृपेची सावली देणारी माय माउली आहेस.मी तुझी वाट पाहत आहे. तुम्ही मला का सोडून दिलेत?कुणाच्या हाती सोपविलेत?तुझे हृदय असे कठीण कसे झाले? तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा माझ्या बहु तुम्हाला क्षेमालिंगन देण्यास फार आसुसलेले आहेत.


अभंग क्र.443
देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख एथें नाम आहे ॥१॥
ब्रम्ह जें देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें झालें ब्रम्हरूप ॥ध्रु.॥
यजन याजन तप व्रतें करिती । विकल्पें नागवती शुद्ध पुण्या ॥२॥
तुका म्हणे सर्व सुख एथें आहे । भ्रांति दूर पाहें टाकुनियां ॥३॥

अर्थ

देहाविषयी विवेकाने विचार केला,तर असे दिसून येते कि हरीचे नाम या असूनही सुख प्राप्त करण्यास आधार आहे.ज्या वेळी द्वैत बुद्धी निरास होतो,त्या वेळी बेम्हचा साक्षात्कार होतो व शरीर ब्रम्हरूप होते.कित्येक लोक यद्न्य करतात किंवा करवितात.तप करतात,व्रते धरतात.पण त्यांच्या मनात फलाचा हेतू असतो आणि देहाचे त्याच्या शी ममत्व जडलेले असल्यामुळे ते शुध्द पुण्याईळा अंतरतात.एका हरीच्या नामामध्ये सर्व सुख आहे,पण देहादी सर्व वस्तू आपल्याला सुख देतील हि भ्रांती टाकून जर तुम्ही पाहाल,तरच हे तुम्हाला कळून येईल.


अभंग क्र.444
तुझे वर्णु गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौनपणें ॥१॥
मौनपणें वाचा थोटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥
रूप तुझें ऐसें डोळां न देखवे । जेथें हें झकवे ब्रह्मादिक ॥२॥
ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । म्हणोनि आटाटी फार त्यांसी ॥३॥
तुका म्हणे तुझें गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणूं काई ॥४॥

अर्थ

हे देवा विठोबा राया तुमचे गुणगाण वर्णन करणे मला जमणार नाही माझी तेवढी बुद्धी ही नाही अहो तुमचे वर्णन करण्याकरता वेद श्रुती देखील मौन झाल्या. चारही वेद तुझे वर्णन करताना स्तब्ध झाले हे हरि असे तुझे स्वरूप आहे.तुझे रूप पाहण्याचे सामर्थ्य माझ्या डोळ्यांना नाही,जेथे ब्रम्हादिक फसले तेथे माझी काय कथा?ब्रम्हादिक देवांना सृष्ठी निर्माण करण्याची मोठी कटकट मागे लागलेली आहे.त्यामुळे तुझी कृपा संपादन करण्यासाठी त्यांना फारच त्रास पडतो. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा,तुझे गुण,तुझे रूप तुझे नाम या गोष्टी असंख्य आहेत.त्यांचे वर्णन मी काय करणार?


अभंग क्र.445
मन वाचातीत तुझें हें स्वरूप । म्हणोनियां माप भक्ती केलें ॥१॥
भक्तीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥ध्रु.॥
योग याग तपें देहाचिया योगें । ज्ञानाचिया लागें न सांपडसी ॥२॥
तुका म्हणे आम्ही भोळ्या भावें सेवा । घ्यावी जी केशवा करितों ऐसी ॥३॥

अर्थ

देवा तुझे स्वरूप हे मन वाचा यांच्याही पलिकडचे आहेत्यामुळेच तर आम्ही भक्ती रूपाचे माप हाती घेतले आहे.आम्ही अनंताला भक्तीच्या मापाने मोजतो.इतर कोणत्याही साधनाने तुझी मोज माप होणार नाही.देवा तुझे स्वरूप योग याग याने तसेच देहावर अवलंबून असलेल्या साधनाने तुझ्या स्वरूपाचे ज्ञान होणार नाही आणि ज्ञानी पणाने देखील तू आम्हाला सापडला जाणार नाही त्यामुळेच हे देवा. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही, केशवा,भोळ्या भावाने तुझी भक्ती करतो तीच तू प्रेमाने स्वीकार म्हणजे झाले.


अभंग क्र.446
जंववरी नाहीं देखिली पंढरी । वर्णिसी थोर वैकुंठींची ॥१॥
मोक्षसिद्धी तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु.॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिनव सोहोळा घरोघरीं ॥२॥
नामघोष कथापुराणकीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंग ॥३॥
सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रम्ह तें केवळ नांदतसे ॥४॥
तुका म्हणे जें न साधे सायासें । प्रत्यक्ष तें दिसे विटेवरी ॥५॥

अर्थ

जोपर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांनी पंढरपुराचे दर्शन घेतले नाही तोपर्यंतच वैकुंठाची थोरवी तू गाशील.अहो पंढरीमध्ये मोक्ष तसेच सिद्धी हे दिन पणाने दारोदारी हिंडत आहेत काम करणार्‍या दासी प्रमाणे त्यांची अवस्था झालेली आहे,इथे घरोघरी तुळशी वृन्दावने आहेत.रस्ते झाडून,साडे घालून रांगोळ्या काढल्या आहेत.घरोघर अभिनव सोहळा आहे.इथे कथा पुराणे कीर्तन,नाम घोष होत आहे.दळण कांडन करतांना स्रिया पांडुरंगाला आळवून ओव्या म्हणत आहे.इथे सर्वदा सर्व सुख असून मूर्ती मंत ब्रम्ह इथेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात मोठ्या सायासाने सुद्धा ज्याची प्राप्ती होत नाही ते ब्रम्ह विटेवर प्रत्यक्ष उभे आहे.


अभंग क्र.447
दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥१॥
येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥
काय करूं देवा ऐसी नाहीं शक्ती । दंडुनि पुढती वाटे लावूं ॥२॥
तुका म्हणे मज दावूं नको ऐसे । दृष्टीपुढें पिसे पांडुरंगा ॥३॥

अर्थ

देवा तुझ्या चरणांची तूट म्हणजे वियोग ज्या गोष्टींमुळे घडतो त्या गोष्टी ऐकून मला दुःख वाटते.या सर्व माणसांचा प्रपंचा मुळे मोठा घात होत आहे हे पाहून मला मोठा कळवळा येतो मी त्यांची वेळोवेळी फजिती करतो, पण ते एकात नाहीत.हे देवा,काय करावे?त्यांना शिक्षा करून सन्मार्गाला लावण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे संसाराच्या प्रेमाने बहकलेले,वेडे झालेले लोक माझ्या दृष्टी पुढे येऊ देऊ नका,एवढी माझी विनंती आहे.


अभंग क्र.448
सूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥
तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥
श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरी ॥२॥
तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष जालें ॥३॥

अर्थ

डुकराला मिष्टांन्न हे आवडणार नाही त्याला मिष्टान्नाची चव काय कळणार त्याला केवळ विष्टा खाणे हेच आवडते?तसेच अभक्तांना,नास्तिकांना पाखंड मत आवडते परमार्थ आवडत नाही.कुत्र्याला पंचपक्वन्नाचे जेवण घातले,तरी त्याचे लक्ष हाडा वर असते. तुकाराम महाराज म्हणतात सर्पाला जरी दुध पाजले,तरी त्याच्या पासून त्याच्या शरीरात विषच तयार होते.


अभंग क्र.449
रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥१॥
तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हेचि मानस शुद्ध त्याचें ॥ध्रु.॥
सर्पासी पाजिलें शर्करापीयूष । अंतरींचें विष जाऊं नेणे ॥२॥
तुका म्हणे श्वाना क्षिरीचें भोजन । सवेचि वमन जेवी तया ॥३॥

अर्थ

अहो रासभ म्हणजे गाढवाला कितीही महान तीर्थामध्ये धुतले तरी तो तेजस्वी शाम कर्ण घोड्या प्रमाणे होणार नाही. त्या प्रमाणेच खळ म्हणजे दुष्ट लोकांना कितीही चांगला उपदेश केला तरी त्यांचे मन शुद्ध होणार कारण त्यांचे मन शुध्द मुळीच नसते.सापाला दुधात साखर घालून जरी पाजले तरी त्याच्या आतले विष जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात कुत्र्याला दुध पाजले तरी कुत्रा ते तत्क्षणीच ओकतो.


अभंग क्र.450
जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥
तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥
कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥२॥
तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥३॥


अभंग क्र.451
आतां असों मना अभक्तांची कथा । न होई दुश्चिता हरीनामीं ॥१॥
नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायश्चित्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥
प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभक्ताचें सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्वकाळ सुखरूप ॥३॥

अर्थ

आता हे मना अभक्ताची गोष्ट राहू दे.तू मात्र हरीनाम घेण्याच्या बाबतीती उदास राहू नकोस.अभक्ता विषयी तू बोलू नकोस.कारण तुझ्या जिभेला प्रायश्चित्त घ्यावे लागेल.सकाळी माकडाचे नाव जसे घेऊ नये,तसे अभक्ताचे नाव कधीच घेऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात आता जे मंगल मय आहे त्याचेच निरंतर स्मरण करू म्हणजे सर्व काळ सुखाचा जाईल.


अभंग क्र.452
नाम आठवितां सद्गदित कंठीं । प्रेम वाढे पोटीं ऐसें करीं ॥१॥
रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टांग ही गात्रीं प्रेम तुझें ॥ध्रु.॥
सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम तुझें ॥२॥
तुका म्हणे दुजें न करीं कल्पांतीं । सर्वदा विश्रांती संतापायीं ॥३॥

अर्थ

देवा तुझे नाम आठवले की आमचा कंठ दाटुनि यावा आणि तुझ्याविषयी प्रेम वाढतच जावे आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी दुप्पट प्रेम वाढावे असेच तू कर.तुझे नाम घेताच सर्वांगावर रोमांच उभे राहावेत,शरीराला स्वेद यावा,आनंदाश्रू ओघळावेत आणि अष्टांगामध्ये सर्वच शरीरामध्ये तुझे प्रेम असावे.माझ्या सर्व शरीराचा विनियोग तुझे कीर्तन करण्याकडे व्हावा आणि मी तुझे नावच रात्रंदिवस गावे. तुकाराम महाराज म्हणतात कल्पांत जरी झाला,तरी मी दुसरे काही करणार नाही.सर्व काळ संतांच्या पायी खरी विश्रांती आहे.


अभंग क्र.453
जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं ॥१॥
अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तोचि जाणे ॥ध्रु.॥
शरणागता जेणें घातलें पाठीशीं । तो जाणे तेविशीं राखों तया ॥२॥
कासे लागे तया न लगती सायास । पोहोणारा त्यास पार पावी ॥३॥
तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तोचि जाणे ॥४॥

अर्थ

बालकाला ज्यावेळी सुखदुःख जे जे काही होईल ते सर्व धर्म आणि त्याचे वर्म त्याच्या आईला माहीत असते ती बालका विषय सर्वकाही जाण असते.आंधळ्याला हात देऊन,धरून चाललेला डोळस,पुढे येणारे खाच खळगे,मार्ग आडमार्ग जाणतो व आंधळ्याला सुखरूप घेऊन जातो.तसेच एखद्या मोठ्या शूराला जर कोणी संकट ग्रस्त मनुष्य शरण आला आणि त्याला त्या शुराने पाठीशी घातले,तर त्याचे रक्षण कसे करावे,याची चिंता त्या शूराला लागते.पुरातून नदी पलीकडे जायचे आहे पण पोहता येत नाही,अशा वेळी ऐखाद्या पोहणार्‍याची मदत घेतली,तर त्या पोहणाऱ्याला त्याची चिंता. तुकाराम महाराज म्हणतात आम्हीं आपला जीव पांडुरंगाच्या हाती दिला आहे.आता आमच्या जीवाचे बर वाईट काय करायचे,ते तो पांडुरंग करील.आम्ही कशाला काळजी करू?


अभंग क्र.454
नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥१॥
खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघेचि जाये एका घांसें ॥ध्रु.॥
जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥२॥
तुका म्हणें येथें न मना विषाद । निंबेंविण व्याध तुटों नये ॥३॥

अर्थ

तुम्ही विधिनिषेधाची कटकट मुळीच करू नका पांडुरंगाचेच स्मरण मनात करत राहा.सगळे जेवण होत आले आहे,पण शेवटच्या घासत माशी पोटात गेली असे कोणी कोणाला म्हणू नये.कारण त्या कल्पनेनेच सगळे अन्न ओकून पडेल.एखादी लाभाची गोष्ट सहज घडते पण पुढे जपून ठेवणे फार कठीण आहे.म्हणून तिचे दक्ष पने रक्षण करावे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या बोलण्याचा आपण विषाद मानू नका.खरोखर कडूनिंबाच्या कट्याशिवाय शरीरातील व्याधी बरी होत नाही.


अभंग क्र.455
नको होऊं देऊं भावीं अभावना । याचि नांवें जाणा बहु दोष ॥१॥
मेघवृष्टि येथें होते अनिवार । जिव्हाळ्यां उखर लाभ नाड ॥ध्रु.॥
उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥२॥
तुका म्हणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥३॥

अर्थ

देवा माझ्या मना मध्ये जो काही तुमच्याविषयी भक्तिभाव आहे त्याविषयी अभावना होऊ देऊ नका आणि असे जर झाले तर मला दोषच घडेल.कारण त्याने माझे फार नुकसान होईल.जर अपार पाऊस पडला,तर सुपीक जमिनीत चांगले पिक येत पण नापीक जमिनीत पिकाचे नुकसानच होते.कल्पतरूच्या तळवटी बसून चांगली इच्छा केली,तर चांगले फळ मिळेल आणि वाईट इच्छा केली, तर तसेच वाईट फळ मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात आपले आयुष्य फार थोडे आहे म्हणून आपले खरे हित आहे,त्या गोष्टीचा तू विचार कर.


अभंग क्र.456
त्याग तंव मज न वजतां केला । कांहींच विठ्ठला मनांतूनि ॥१॥
भागलिया आला उबग सहज । न धरितां काज झालें मनीं ॥ध्रु.॥
देह जड झालें ॠणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥२॥
तुका म्हणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारले ॥३॥

अर्थ

हे विठ्ठला मला कोणत्याही विषयांचा त्याग केला नाही तरीदेखील त्याचा त्याग घडला आहे.कारण संसाराच्या त्रासाने माझ्याकडून सहजच त्याचा त्याग झाला आहे.ऋणाच्या भाराने माझा देह जड झाला संसार आणि मला फार कासावीस केले. तुकाराम महाराज म्हणतात संसारातील आपत्तीने मी तळमळलो त्यामुळे आळस आला,संसाराचा तिटकारा आला.परमार्थाचा तिटकारा आलाच नाही.पर्मार्थाचाच उत्साह वाढला.म्हणून संसारिक पणामुळे जो त्रास होतो,त्याचे निवारण आपोआप झाले आहे.


अभंग क्र.457
मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहो ॥१॥
तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥
ओटीच्या परिस मुठीच्या तें वाढे । यापरि कैवाडें स्वहिताचें ॥२॥
नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥३॥
तुका म्हणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥४॥

अर्थ

कुणबी लोकांची जात पेरणी विषयी इतकी दक्ष असते कि त्या वेळी घरात कोणी मेलेले असेल,तरी त्याचे मढे झाकून ठेवतात आणि पेरणी करायला धावतात.त्याच्या प्रमाणे मानवाने हा जन्म दुर्लभ आहे असे जाणून,इतर सर्व गोष्टी बाजूला ठेऊन आपले हित ज्यात आहे,असा परमार्थ करण्या विषयी तत्पर असावे.पेरणी करण्या करता ओटीमध्ये बी घेऊन त्यातील मुटभर दाने शेतकरी पाभरीच्या वर ठेवतो.ते जमिनित पडतात तेंव्हा हातील दाण्यांपेक्षा ते अनेक पटीने वाढतात.त्याच प्रमाणे आपले हित वाढेल याचा विचार कर.उशीर करू नको.कारण काळ केंव्हा घाला घालील,याचा नेम नाही.त्याच्या हातून वाचणे शक्य नाही,असे ओळखून ज्ञानी लोक संसाराच्या गुंत्यातून आपली सुटका करून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात त्या सुचणे प्रमाणे जो मनुष्य या मृत्युलोकात आपले स्वतःचे हित करून घेतो,तोच शहाणा आहे.


अभंग क्र.458
राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥१॥
कोणी कोणा तेथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु.॥
शृंगारिलें नाहीं तगोंयेत वरी । उमटे लौकरि जैसे तैसे ॥२॥
तुका म्हणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खुण दिसो येते ॥३॥

अर्थ

राजाची स्वारी जिकडे जाते,तिकडे त्याचा सर्व लवाजमा व वैभव त्याच्या बरोबर जाते.हे वेगळे सांगायला लागत नाही.कोणी कोणाला देवाच्या कृपेवाचून उगीच थोर मानत नाही.कोणत्याही सामन्य वस्तूला वरवर पुष्कळ सुशोभित केले,तरी ती शोभा फार वेळ टिकत नाही.लवकरच खरे स्वरूप दिसते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या हृदय रुपी घरात नारायणाची वस्ती झाली आहे,त्याला ओळखण्याची खूण म्हणजे त्याच्या वर नारायणची कृपा झाली असे समजावे.


अभंग क्र.459
वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगे आविर्भाव ॥१॥
शिकविलें काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ध्रु.॥
सांडिलें तें नाहीं घेत मेळवितां । म्हणऊनि लाता मागें सारी ॥२॥
तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे हा गे अनुभव ॥३॥

अर्थ

गाय वासराच्या मागे धावत पळत एका रणात तिच्या अंगी वासरा विषयी अविर्भाव प्रेम असते म्हणून.अश्या गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत शिकवून येणारहि नाहीत.खर प्रेम तंतू दुसऱ्याच्या मनाला ओढतो.पण तीच गाय ते वासरू मोठे झाल्यावर जवळ आले तर त्याला दुध न पाजता दूर लोटते. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याविषयी प्रेम कराच असा आग्रह करावा लागत नाही कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी त्याचा विषयी त्याचा असलेला अनुभव महत्त्वाचा आहे.


अभंग क्र.460
देवाच्या संबंधें विश्वचि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥१॥
आहाच हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनीं देखें सामावलें ॥ध्रु.॥
आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरीं तेणें न्यायें ॥२॥
तुका म्हणे ठसावलें शुद्ध जाती । शोभाचि पुढती विशेषता ॥३॥

अर्थ

एका देवाशी च आपला संबंध असला की सर्व विश्वच आपले सोयरे होते कारण आपले देवाविषयी प्रेम असले तर सर्व विश्वच आपल्याला देवस्वरूप दिसते. एकदा की आपल्याला सर्व विश्व देवासारखे वाटायला लागले की त्यांच्याविषयी झालेले निर्माण झालेले प्रेम हे कधीही विटण्या सारखे नसते कारण ब्रम्‍हनिष्ठांचा जीव विश्वाचे जीवन असलेल्या देवाशी समरस झालेला असतो.अश्या तऱ्हेची सोयरिक वरवर दिसणारी नसून किंवा वीट येणारी नसून जिवाभावाची असते.जीव जीवनात परस्परांशी ऐक्य पावतात असे समजावे.दुसऱ्याला झालेली सुख दुखः हि सर्वाना जाणवते. तुकाराम महाराज म्हणतात अश्या तर्हेचा शुद्ध सर्वात्म भाव ब्रम्हनिष्ठ भक्ताच्या अंतकरणात ठसतो.आणि त्याचे वैशिष्ट्य आणखीच शोभून दिसते.


अभंग क्र.461
अवघा वेंचलों इंद्रियांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥१॥
असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु.॥
कायावाचामनें तोचि निजध्यास । एथें जालों ओस भक्तीभावें ॥२॥
तुका म्हणे करूं येईल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥३॥

अर्थ

देवा इंद्रियांच्या ओढीने मी जे जे काही कर्म केले ते ते सर्व कर्म तुला निरूपण केले आहे म्हणजे मी तुला सांगितले आहे. देवा तुला आमच्या अशाप्रकारचे सेवेचा ठावा नसावा परंतु मी जे काही घडले ते सर्व तुला निरोपण केले आहे त्यामुळे माझ्या माथ्यावरचा सर्व भार उतरविला आहे. माझ्या काया वाचा व मनाने इंद्रियांच्या ओढीने विषयांचा निजध्यास घेतला होता त्यामुळे मी भक्ती भावाच्या दृष्टीने ओस झालो होतो. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुला जर माझ्यासाठी धावून येता आले तर ये आणि माझा सांभाळ कर.


अभंग क्र.462
राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥१॥
कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥ध्रु.॥
होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥२॥
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥३॥

अर्थ

आता माझ्या डोळ्यांना आणि मनाला विटेवर असलेले देवाचे ध्यान निरंतर राहो व माझे डोळे व मन त्याच्याविषयी लंपट होवो.ते ध्यान मग मी माझ्या जिवामध्ये दृढ धरीन आणि माझी देह भावना त्याला वाहून मी त्याची पूजा करीन.अश्या प्रकारे ते ध्यान मनात स्थिर झाले म्हणजे कळस गाठल्या सारखे होईल. तुकाराम महाराज म्हणतात हे गोजिरवाण्या देवा,मला तुझ्या पाया पडू दे.


अभंग क्र.463
आदि मध्य अंत दाखविले दीपें । तों आपणापें यत्न बरा ॥१॥
दास्यत्वे दाविलें धन्याचें भांडार । तोंतों नव्हे सार एथुनियां ॥ध्रु.॥
उपायानें सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आलें ॥२॥
तुका म्हणे दृष्टि सकळांचे शिरीं । वचनेचि करी बैसोनियां ॥३॥

अर्थ

अंधारामध्ये आपण दिवा हातात घेतला तर दिवा आपल्याला अंधारातील एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा भाग मध्यभाग आणि अंत भाग म्हणजे संपूर्ण वस्तूचे ज्ञान करून देतो आणि अंधारामध्ये दिव्याचे साहाय्य घेणे चांगले.अगदी त्याप्रमाणेच या जगामध्ये एक विठ्ठलच सत्य आहे हे मी जाणले आहे व त्याचे दास्यत्व पत्करले आहे म्हणून त्या विठ्ठल धन्याने म्हणजे मालकाने मला परमार्थाचा ठेवा ऐश्वर्य दाखविले आता याच कारणामुळे मी देवा विठ्ठला शिवाय जे काही दिसेल ते सत्यच नाही ते खरे नाही असेच ठरविले आहे.मी हरी भक्तीचा उपाय केला त्यामुळे माझा सर्व विषय भोग नाहीसा झाला आणि देवाची भक्ती मी निरंतर करत राहिलो त्यामुळे विठ्ठलाने मला त्याची सर्व शक्ती देण्यास पात्र केले व माझ्या अंगी सत्ता बळ आले.आणि देवाची जी सत्ता आहे तिचे सामर्थ्य माझ्या अंगी आले. तुकाराम महाराज म्हणतात सर्वांच्या ठिकाणी माझी समान दृष्टी असून बसल्या जागेवरून मी सर्वांना देवाचे वचन एकवितो.


अभंग क्र.464
सांठविला वाण । पैस घातला दुकान ॥१॥
जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्धचि जवळी ॥ध्रु.॥
निवडिलें साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥२॥
तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥३॥

अर्थ

आम्ही दुकान उघडे केले आहे त्या दुकानात आम्ही नवविधा भक्तीचा माल साठविला आहे.आमचे दुकान हे असे आहे ज्याला जी वस्तू हवी असेल ती वस्तू लगेच मिळते.आमच्या या दुकानात तिन्ही दर्जाची म्हणजे उत्तम,मध्यम आणि कनिष्ट जातीची भक्ती भरून ठेवलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी या दुकानात बसलो आहे जो जशी किंमत सेवा रुपी किंमत देईल तसा माल मी त्याला दाखवितो.


अभंग क्र.465
अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठिले । मागें होते आले शिष्टाचार ॥१॥
दुर्बळाच्या नांवे पिटावा डांगोरा । हा तो नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु.॥
मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें त्या ॥२॥
तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृष्टिन्यायें ॥३॥

अर्थ

पूर्वीपासूनच कोणीही अवगुणाची स्थापना केलेली नाही मागे शिष्टांचे जसे आचार होते काही शिष्टांचे आचार होते जे अवगुणाला धरून होते जर आपण पूराणे वाचले तर त्यामध्ये आपल्याला काही शिष्टाचे अवगुण दिसून येतील ते म्हणजे असे की विश्वामित्र तपस्वी होते तरी देखील त्यांनी मेनका बरोबर संबंध केला भीष्माचार्यांनी दुर्योधनाचा पक्ष घेतला धर्मराज कधीही खोटे बोलत नव्हता तो देखील द्रोणाचार्‍या बरोबर खोटे बोलला म्हणजेच शिष्टांनी कसेही आचरण केले तर चालतात तर मग भक्ती न करणाऱ्या र्दुबाळाने अवगुणाचे वर्तन केले तर त्याच्या नावाने डांगोरा पिटवावा का? तसे देखील काही लोकांचे म्हणणे आहे पण खरे पाहिले गेले तर त्यांचे हे बोलणे बरोबर नाही.मध आणि मद्य यांना मधु हे एकच नाव आहे.तेंव्हा आम्ही मधुपान करतो असा शब्द वापरून उगाच दारू का प्यावी?म्हणजेच अवगुण कोणीही करो तो अवगुणच आहे ज्येष्ठांनी करो अथवा कनिष्ठाने करो तो अवगुणच आहे आणि सद्गुण कोणीही करो तो सद्गुणच आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला संतांच्या उच्छिष्टाचा प्रसाद लाभला आहे.तो तर मेघवृष्टी प्रमाणे भरपूर आहे.तो ग्रहण केल्या मुळे आझ्या अंगी चांगले,वाईट यांची निवड करण्याचे बळ आले आहे.


अभंग क्र.466
लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माउली ॥१॥
उभयतां आवडी लाड । कोडें कोड पुरतसे ॥ध्रु.॥
मेळवितां अंगें अंग । प्रेम रंग वाढतो ॥२॥
तुका म्हणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥३॥

अर्थ

आईने आपल्या बालकाचे मूख आपल्या स्थानाला लावले की तिला पान्हा फुटतो.त्या दोघां मध्ये परस्परांची गोडी असते,म्हणून त्या दोघांचे लाड पूर्ण होतात.लहन बाळाचे अंग कुरवाळून आईने प्रेमाने बाळाला मिठी मारली कि प्रेमानंद अधिकच वाढतो. तुकाराम महाराज म्हणतात त्या बालकाला काहीही दुखणे,भाणे झाले,तर आईला त्याची सर्व काळजी असते.


अभंग क्र.467
भूतीं भगवंत । हा तों जाणतों संकेत ॥१॥
भारी मोकलितों बाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥
करावा उपदेश । निवडोनि तरि दोष ॥२॥
तुका म्हणे वाटे । चुकतां आडरानें कांटे ॥३॥

अर्थ

सर्व भूत मात्रा मध्ये प्राणीमात्रा मध्ये भगवंत आहे हा संकेत मी जाणतो.त्यामुळे मी जे कठोर बोलतो,त्या वाग्बानाने ज्याचा त्याला गुण कळून येतो.गुण आणि दोष यांची निवड करून यथातथ्य उपदेशच करावा,तसा मी करतो. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर वाट चुकून भलतीकडे जाल,तर आड रानात तुम्हाला काटेच बोचतील.


अभंग क्र.468
आम्हां हें कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिये ॥ध्रु.॥
अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥२॥
तुका म्हणे येथें खऱ्याचा विकरा । न सरती येरा खोटया परी ॥३॥


अभंग क्र.469
दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥१॥
ऐसें अवगुणांचे बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ध्रु.॥
अंधळ्यास काय हिरा । गारां चि तो सारिखा ॥२॥
तुका म्हणे भुंके सुनें । ठाया नेणे ठाव तो ॥३॥

अर्थ

आरश्यामध्ये नकटा माणूस स्वतःचे रूप पाहून लाजतो आणि एखाद्या चांगल्या मनुष्याचे नाक पाहून त्याच्यावर विणाकारण चिडत असतो.अवगुणाची ज्याला बाधा आहे,त्याला वरील उदाहरणा प्रमाणे जे सरळ आहे,ते वाकडे भासते.आंधळ्या माणसाला मौल्यवान हिरा जरी दिला,तरी त्याला गारगोटीच वाटणार.तुकाराम महाराज म्हणतात वाटेल त्या ठिकाणी कुत्रे भुंकते,तशातलाच हा प्रकार आहे.


अभंग क्र.470
नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥१॥
नासोनियां जाय रस या संगती । खळाचे पंगती नारायणा ॥ध्रु.॥
तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥२॥
तुका म्हणे नाहीं संतांची मर्‍यादा । निंदे तोचि निंदा मायझवा ॥३॥

अर्थ

अहो भांडखोर लोकांना जर परमार्थ करणे आवडत नसेल तर हे त्यांचे काळे तोंड घेऊन आमच्याकडे काय येतात.हे नारायणा अध्यात्म रस परमार्थ रस या दुष्ट लोकांच्या संगती मध्ये नष्ट होतो.तोंडातून नर्कासारखे घाणेरडे शब्द काढतात.कुत्रे चांगल्या अन्नला तोंड लावून ते अन्न दुषित करते,तसेच हे आहे.तुकाराम महाराज म्हणतात जो संताची मर्‍यादा राखत नाही त्याला शिवी देवून महाराज म्हणतात तो निंद्य आहे तुम्हीदेखील अशा दुष्ट लोकांची निंदा करा.


अभंग क्र.471
लेकरा आईतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥१॥
त्यापरि आमुचा जालासे सांभाळ । देखिलाचि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥
भुकेचे संन्नीध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥२॥
आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥३॥

अर्थ

लेकराला पित्याचे सर्व आहे ते धन तो जाणता झाला की त्याच्या स्वाधीन करतो तेही लेकरांनी काहीही नष्ट करतातअगदी त्याप्रमाणेच देवा तुम्ही आमचा सांभाळ केला आहे काळाचे तोंड देखील आम्ही आतापर्यंत पाहिले नाही तो आम्हाला आडवा देखील आला नाही.भूक लागताच स्तनपान उपलब्ध असेल,तर धावा धाव करावीच लागत नाही.तुकाराम महाराज म्हणतात मी अशा प्रकारे पांडुरंगाला ओवाळून पैलतीरावर उभा राहिलो,तेंव्हा पांडुरंगाने मला जवळ घेण्या करता धाव घेतली.


अभंग क्र.472
शुद्धचर्‍या हें संताचे पूजन । लागतचि धन नाही वित्त ॥१॥
सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपणचि येती चोजवीत ॥ध्रु.॥
कीर्तनींच वोळे कृपेचा वोरस । दुरीपणें वास संन्नीधता ॥२॥
तुका म्हणे वर्म सांगतों सवेगे । मन लावा लागें स्वहिताच्या ॥३॥

अर्थ

संतांचे पूजन म्हणजे शुद्ध आचरण करणे हेच आहे, संतांचे पूजन करण्यासाठी काही धन वित्त लागत नाही.हरीची सगुण स्वरूपाच्या भक्तीने सगुण स्वरुपाची विश्रांती आपल्याला मिळते आणि ती विश्रांती आपल्याला शोधत आपोआप आपल्याकडे येते.देव जरी दूर आहे तरी कीर्तनाने कृपाप्रसाद होतो त्यामुळे तो दूर असला,तरी समीपच असतो.तुकाराम महाराज म्हणतात मी हे माझ्या जीवीचे रहस्य तत्परतेने तुम्हाला सांगत आहे.कारण तुम्ही तुमचे जीवन स्वहिताच्या मार्गाकडे लावावे.


अभंग क्र.473
जीवीचे जाणावे या नांवे आवडी । हेकड तें ओढी अमंगळ ॥१॥
चित्ताच्या संकोचें कांहींच न घडे । अतिशयें वेडे चार तेचि ॥ध्रु.॥
काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करूनि संकेत ठेवियेला ॥२॥
तुका म्हणे काळे वचनें चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळां ॥३॥

अर्थ

देवाच्या आणि गुरूच्या मनातील परमार्थ विषयी मत जाणून घेणे त्यालाच खरी परमार्थाची आवड असे म्हणावे आणि जे हेकड आहेत ते त्यांच्या मनाने कसेही वागतात ते अमंगळ कृत्य करण्याकडे आपोआप ओढ घेतात.त्यांचे मन अमंगळाकडेच वळते.चित्ताच्या अप्रसंन्नतेने कार्य होत नसतो.दुराग्रहाने काही करणे म्हणजे वेडाचार होय.ईश्वर करता आहे.योग्य काळा वाचून काहीही जमत नाहि,रुचत नाही असा त्याने नियम करून ठेवला आहे.तुकाराम महाराज म्हणतात मला मनुष्याच्या केवळ एकाच वाक्याच्या बोलन्या वरूनच त्याची चाचणी होते तो मनुष्य कसा आहे हे मला चांगले कळते त्याला वेळ वेळा बोलायला लावण्याची गरज पडत नाही.


अभंग क्र.474
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥१॥
रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥
धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥२॥
तुका म्हणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥३॥

अर्थ

कामातूर मनुष्य लोकराज्य सोडून जे मनाला येईल तशी बडबड करत असतो.ज्या विचाराने मन भरलेले असते,तशी चिन्ह मनुष्य आपल्या शरीरावर दाखवितोच.विष पोटात गेले तर मनुष्य आचके देऊ लागतो.धनाच्या लोभाने माणूस वेडा झाला म्हणजे त्याची बडबड थांबत नाही.तुकाराम महाराज म्हणतात स्त्री आणि पैसा हि दोन्ही नरकखाणी भोगावयास लावणारी आहे.


अभंग क्र.475
कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी ॥१॥
निरोपाच्या मापें करीं लडबड । त्याचें त्यानें गोड नारायणें ॥ध्रु.॥
भाग्यवंतांघरीं करितां विश्वासें । कार्य त्यासरिसें होईजेतें ॥२॥
तुका म्हणे पोट भरे बऱ्या वोजा । बिज ठाव निजा निजस्थानीं ॥३॥

अर्थ

कृष्ण रूपी अंजन माझ्या बुद्धी रुपी डोळ्यात घातले त्यामुळे सत्य काय आहेअसत्य काय हे मला निवडता आले आणि कृष्ण रुपी अंजनाने मला मदत केली माझी बुद्धी रुपी डोळे आता स्वच्छ झाले आहेत.नारायणाचा संदेश सांगण्याची मी खट पट करत आहे.नारायणाला ती खटपट गोड वाटते.भाग्यवंताच्या घरी नौकरी केली की,त्या नौकाराचा कार्यभाग अपोआप होतो.तुकाराम महाराज म्हणतात चांगल्या भोजन व्यवस्तेने पोट भरते,आणि जीवात्म्याला बोध झाला म्हणजे तोही मुक्त होतो.


अभंग क्र.476
मैंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥१॥
पुढें नाडियलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ध्रु.॥
उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधीताहे ॥२॥
वैकंठीहुनि येणें । केलें पंढरीकारणें ॥३॥
पुंडलिकें थारा । देउनि आणिलें या चोरा ॥४॥
तुका म्हणे चला । तुम्ही आम्ही धरूं त्याला ॥५॥

अर्थ

पांडुरंग रुपी मैंद म्हणजे लबाड चोर त्याच्या हातामध्ये प्रेमाचा घेऊन पंढरपुर क्षेत्र मध्ये आलेला आहे.तो सर्व जगाला फसवून अशा ठिकाणी घेऊन जातो की ज्या ठिकाणी कोणीही पोहोचू शकत नाही त्याचा शोध कोणालाही लागत नाही.आपले बाहु वर करून तो भक्ताची नजरबंदी करतो.या कामासाठी तो वैकुंठावरुन येथे आला आहे. या चोराला पुंडलीकाने आपल्या घरी थारा दिला आहे.तुकाराम महाराज म्हणतात चला तुम्ही व आम्ही जाऊ व त्याला धरू.


अभंग क्र.477
भांडवी माउली कवतुके बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं ॥१॥
माझी माझी म्हणे एकएकां मारी । हे ती नाहीं दुरी उभयंता ॥ध्रु.॥
तुझे थोडे भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥२॥
तुका म्हणे एके ठायी आहे वर्म । हेंचि होय श्रम निवारिते ॥३॥

अर्थ

आई आपल्या दोन बाळांमध्ये कौतुकाने भांडण लावून देते आणि साक्षित्वाने त्यांची मजा बघत असते एकाला मार देते तर एकाला जवळ घेते परंतु असे असले तरी देखील त्या दोघांवरही तिचे प्रेम सारखेच असते त्यामध्ये ती भेदभाव करत नाही.तुझा खाऊ थोडा आहे आणि माझा पुष्कळ आहे असा हट्ट धरून मुले उगाच भांडण करतात. तुकाराम महाराज म्हणतात या सर्वांचे वर्म आईच्या ठिकाणी असते त्यामुळेच त्या दोघांना होणारे श्रम ती निवारण करते.


अभंग क्र.478
लटिकियाच्या आशा । होतों पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥१॥
बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ध्रु.॥
मरणाची नाहीं शुद्धी । लोभीं प्रवर्तली बुद्धी । परती तों कधीं । घडेचि ना माघारीं ॥२॥
सांचूनि मरे धन । लावी पोरांसी भांडण । नाहीं नारायण । तुका म्हणे स्मरला ॥३॥


अभंग क्र.479
जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहर्निशीं ॥१॥
भवनिर्दाळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ध्रु.॥
सुखाचें शेजार । करूं कां नावडें घर ॥२॥
तुका म्हणे ठेवा । कां हा न करीच बरवा ॥३॥

अर्थ

अहो हरीचे नाम अगदी मुखाजवळ आहे तरीदेखील तुम्ही रात्रंदिवस त्याचे नाम का घेत नाहीत?विठ्ठलाचे नाम हे संसाराचा निरास करून अनेक कामांचा नाश करणारे आहे.हे नाम सुख मय शेजार आहे,ते तुला का आवडत नाही? तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही हरिनामाचा हा उत्तम प्रकारचा ठेवा जतन करून का ठेवत नाही?


अभंग क्र.480
बरवें देशाउर झालो । काय बोले बोलावे ॥१॥
लाभें लाभ दुणावला । जीव धाला दरुषणें ॥ध्रु.॥
भाग्यें झाली संतभेटी । आवडी पोटीं होती ते ॥२॥
तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥३॥

अर्थ

संत संगतीचा व्यवहार हा उत्तम आहे,तो शब्दाने काय सांगावा?मनुष्य देह मिळाला हा लाभ झाला,त्यानंतर संतांचे दर्शन झाले हा दुसरा लाभ अशाप्रकारे लाभाने लाभ वाढतच गेला दुप्पट झाला,या सर्वांन मुळे जीव सुखावला हा तीसरा लाभ झाला मला संतांच्या भेटीची ओढ होती.ती भेट मोठ्या भाग्याने घडून आली. तुकाराम महाराज म्हणतात आज पर्यंत मी परमार्थाचा जो श्रम केला,तो सफल झाला.


अभंग क्र.481
सांगतां हें नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥१॥
आवडीनें सेवन करू । जीवीचे धरू जीवीच ॥ध्रु.॥
उपमा या देतां लाभा । काशा शोभा सारिखी ॥२॥
तुका म्हणे नुचलीं डोई । ठेविली पायीं संतांचे ॥३॥

अर्थ

संतांच्या कृपेने मला लाभ झाला त्याचे सुख कसे सांगू, ते मला सांगता ही येत नाही त्यांच्या किर्तीचे वर्णन करण्यासाठी माझे मुख देखील कमी पडत आहे.आता त्यांच्या कृपेचा जो लाभ झाला आहे त्याचे आवडीने सेवन करू आणि तेच चित्तामध्ये दृढ धरून ठेवु .हा जो लाभ झाला आहे,त्याला कशाची उपमा देता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या चरणावर मी मस्तक ठेवले आहे.ते आता ते उचलणार नाही.


अभंग क्र.482
आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥१॥
भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु.॥
पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥२॥
तुका म्हणे झाली जोडी । चरण घडी न विसंभें ॥३॥

अर्थ

आता आपणच लाहो म्हणजे त्वरा करून चांगला हा विठ्ठल रुपी चांगला माल भरू. माझे भाग्य उदयाला आले त्यामुळे मी या ठिकाणी पोहोचलो आता मी माझ्या शरीराची कुरवंडी करून विठ्ठला वरून वळून टाकीन.कारण असा लाभ पुन्हा कोठे मिळणार आहे?फार दिवसांनी हा लाभ झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यांना मी घटका भरही विसंबणार नाही.


अभंग क्र.483
उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥
संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटीं सांठवूं ॥२॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥३॥

अर्थ

माझे भाग्य उजळले कारण मला संतांचे दर्शन झाले त्यामुळे माझी सर्व चिंता नाहीशी झाली. आणि संतांच्या दर्शना मुळेच पद्मनाभ असा जो हरी त्याचा मला लाभ झाला.मी आपल्या संपुष्ट अशा हृदयरूपी पेटीत देवाला साठवून किंवा सुरक्षित ठेवीन.तुकाराम महाराज म्हणतात देवरूपी ठेवा हा तर माझ्याठीकाणी पहिल्या पासूनच होता,पण तो माझ्या शुध्द भावनेने सापडला.


अभंग क्र.484
आम्हांसी आपुलें नावडे संचित । चरफडी चित्त कळवळ्यानें ॥१॥
न कळतां आला खोळंबा मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ध्रु.॥
कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरी बरें ॥२॥
तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥३॥

अर्थ

आम्हाला आमचे संचित कर्म आवडतच नाही त्यामुळे आम्हाला आमचाच कळवळा येत आहे आणि आमचे चित्त चरफडत आहे.मला माझ्या अज्ञानामुळे अनेक प्रकारचे परमार्थ मार्ग मध्ये खोळंबे आलेआणि जसे जग असेल तसे या प्रकारचे मी सोंग घेऊ लागलो म्हणजे बहुरूपी झालो.हे सारे कळून आले विचारांची दृष्टी घडली आणि आता.असे वाटत आहे कि,या भाव नदीतून पार करणारा नावाडी मिळाला तर किती चं होईल. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायण,जर हि करून आपण ऐकत असाल,तर आमच्या करता धावत या.


अभंग क्र.485
बरगासाठी खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥१॥
फजित तो केला लाहे । ताडण साहे गौरव ॥ध्रु.॥
ओठाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥२॥
तुका फजीत करी बुच्चा । विसरे कुच्चा खोडी तेणें ॥३॥

अर्थ

एका मूर्ख मनुष्याला दुष्काळामध्ये खाण्यासाठी अन्न मिळेना म्हणून त्याने कदान्न खाण्यास सुरुवात केली दुष्काळ निवारण झाले तरी कदान्न खाण्याचे काही सुटेना अशा मूर्खाला कितीही मार दिला त्याची कितीही फजिती केली तरी त्याला काही वाटत नाही.ओढाळ, जनावराला नासधूस करणे आवडते,कचरा खाणे आवडते.त्याची खोड आपल्या आपण जात नाही.तुकाराम महाराज म्हणतात जे निलाजरे कोडगे लोक आहे,त्यांची चागली फजिती केली,तरच ते आपली खोड विसरतात.


अभंग क्र.486
धांव घालीं आई । आतां पाहातेसी काई ॥१॥
धीर नाहीं माझे पोटीं । झालो वियोगें हिंपुटीं ॥ध्रु.॥
करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥२॥
तुका म्हणे डोई । कई ठेवीन हे पायीं ॥३॥

अर्थ

हे विठाई ये तू माझ्याकडे लवकर धाव घे तू काय पाहत आहेस?हे विठाबाई आता माझ्या पोटी धीर नाही राहिला तू माझ्या मला भेटण्यासाठी लवकर माझ्याकडे धावत ये तुझ्यावियोगाने मी हिंपुटी म्हणजे कष्टी झालो आहे.मला अतिशय ताप होतो आहे तो शांत कर.तुकाराम महाराज म्हणतात माझे डोके तुझ्या पायावर कधी ठेवीन असे मला झाले आहे.


अभंग क्र.487
तुम्हां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा ॥१॥
होती काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ध्रु.॥
नसतें सांभाळिलें । जरि तुम्हीं आश्वासिलें ॥२॥
तुका म्हणे कृपाळुवा । बरवा केला सांवाधांवा ॥३॥

अर्थ

देवा माझ्या अंतःकरणातील सर्व इच्छा तुम्हाला माहित होती.हे वैकुंठनायका,माझी सुटका कशाने होईल?तुम्ही जर माझा सांभाळ केला नसता,तर माझी सुटका झालीच नसती.तुकाराम महाराज म्हणतात हे कृपाळू देवा,माझी सुटका करण्यासाठी तुम्ह्नी धावाधाव केली हे फार बरे झाले.


अभंग क्र.488
देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥१॥
पाहातां काशा तूं सारिखा । तिंहीं लोकांच्या जनका ॥ध्रु.॥
आरुष हे वाणी । गोड करूनि घेतां कानीं ॥२॥
आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहळे ॥३॥

अर्थ

ते पुरुषोत्तमा तुला आवडीने जरी मी एखादी उपमा द्यायचे म्हटले तरी. हे त्रैलोक्यजनका त्रैलक्यामध्ये तू कोणा सारखा आहे हे पाहण्यास केले तर तेही समजत नाही.माझी वेडी भाबडी भाषा तुम्ही गोड मानून ऐकता.त्यातच मला धन्यता आहे.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या आधारने मी आंनदाने रहातो माझे लाड तुम्हीच पुरवावे.


अभंग क्र.489
दर्शनाची आस । आतां न साहे उदास ॥१॥
जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥
कांहीच नाठवे । ठायीं बैसलें नुठवे ॥२॥
जीव असतां पाहीं । तुका ठकावला ठायीं ॥३॥

अर्थ

देवा आता मला तुमच्या दर्शना शिवाय जमणारच नाही त्याविषयी उदासीनता धरणे मला शक्य नाही मला तुमच्या दर्शनाची आस लागलेली आहे इच्छा आहे.माझा जीव तुमच्या पाया पाशी आला आहे आणि माझ्या देह हि येथेच आहे.मला दुसरे काहीच आठवत नाही.आणि बसल्या जागेवरून उठवतहि नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या पायाजवळ माझा जीव अर्पण केला समर्पित केला तरीही मला तुमचे दर्शन होईना म्हणूनच मला असं वाटत आहे की मी फसलो गेलो आहे.


अभंग क्र.490
भोगावरी आम्हीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥
विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥
काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥२॥
केला तरी उरे वादचि कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची तें ॥३॥
अवघेचि वाण आले तुम्हां घरा । मजुरी मजुरा रोजकीर्दी ॥४॥
तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥५॥

अर्थ

आता आम्ही सर्व भोगावर मी त्याचा दगड टाकला असून मरणालाच मरण आणले म्हणजे सर्व अज्ञान दूर झाले.देवा तू विश्वव्यापक आहेस मग मी तुझ्या पासून वेगळा कसा होईल व तुझी प्राप्ती करून घेण्यासाठी मी आता अंगात वेगळे कोणते बळ आणु?आणि वेगळे काही मिळवायचे आहे.असा खटाटोप का करू?आतून बाहेर काय टाकू?आणि बाहेरचे काय गुण अंगात आणू?कितीही चर्चा केली,तरी ती शिल्कच ठरते.देवा माझ्या जवळ जो काही माल होता पाप-पुण्याची शिदोरी होती ती सर्व तुमच्याजवळ तुमच्या घरी आणून टाकली आहे आता मला मजुराला फक्त दररोजची काय रोजची मजुरी होत असेल तेवढीच द्यावे.तुकाराम महाराज म्हणतात मी काही लाभ हानी जाणत नाही जो या देहाचा धनी असेल तो या देहरूपी वाड्याचे रक्षण करील.


अभंग क्र.491
कां हो येथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया ॥१॥
कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ध्रु.॥
कां हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा ॥२॥
पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाहीं आतां ॥३॥
काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ॠणा पायीं ॥४॥
तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनि ॥५॥

अर्थ

अहो देवा तुमची आणि माझी भेट होण्याच्या वेळी हा काळ भेटीच्या आडवा तरी का आला असेल?देवा अहो मला भेट देण्याविषयी तुम्ही इतका विचार का करतात आणि मला वेळ देण्याविषयी तुम्हाला असे कोणते संकट निर्माण झाले आहे?अशी कोणती अडचण आली आहे,आम्हाला भेटावे असे तुम्हाला का वाट नाही?आमच्या विषयी मनात दुजाभाव धरला काय?आमचे पाप वाढले आहे की काय किंवा तु दुर्बळ झाला आहेस की काय किंवा मागे जसे तुझ्या अंगी बळ होते तसे बळ तुझ्या अंगी आता राहिले नाही की काय?तुम्हाला देणे झाले म्हणून तुमचे दिवाळे निघाले काय?कि सावकाराने ऋण वसूल करण्यासाठी तुम्हाला बांधून ठेवले आहे?तुकाराम महाराज म्हणतात अरे तुझा आणि माझा ठेवीचा व्यवहार तू वेगळा केलास आणि आता कोठे गुंतलास?


अभंग क्र.492
काय देह घालूं करवती कर्मरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥१॥
काय सेवूं वन शीत उष्ण तहान । साहों कीं मौन धरुनी बैसों ॥ध्रु.॥
काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥२॥
काय त्यजूं अन्न करूनि उपास । काय करूं नाश जीवित्वाचा ॥३॥
तुका म्हणे काय करावा उपाव । ऐसा देई भाव पांडुरंगा ॥४॥

अर्थ

देवा आता तुमची माझी भेट होण्यासाठी मी माझ्या देहावर करवत चालवून घेऊ का, का माझ्या शरीराला अग्नीमध्ये टाकून देऊ?वना मध्ये जाऊन, शीत उष्ण,तहान याचे ताप सहन करू कि मौन घेऊन बसू,कि सर्व अंगाला भस्म फासू?देशांतराला जाऊ कि चारी दिशा फिरू?अरे देवा मग मी अन्नत्याग करू ठीक आहे कि माझ्या जीवाचं नाश करून घेऊ?तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या भेटी करिता काय उपाय करू ते सांग?


अभंग क्र.493
दंभें कीर्ती पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥१॥
अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु.॥
पिंडाच्या पाळणें धांवती विकार । आहे दावेदार मजमाजी ॥२॥
कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥३॥
तुका म्हणे मज दावी तो सोहोळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥४॥

अर्थ

दांभिक वृत्तीने किर्ती होते पोट भरते जनमानसामध्ये मान-सन्मान मिळतो परंतु दांभिकपणा स्वहित होत नाही.मी मोठा जानता आहे,असा अभिमान धरला तर तुझ्या चरणांचा वियोग होतो.या शरीराचे पालन-पोषण केले तर यामध्ये अनेक प्रकारचे विकार असतात ते बळावले जातातआणि सर्व विकार माझे दावेदार आहेत परमार्थ करण्यासाठी यांचा विरोध असतो.लोकांची पर्वा करून संसारकरून मी आपला घात कशाला करून घेऊ?तुकाराम महाराज म्हणतात तू अशी युक्ती कर की मी तुझे पाय पाहीन.


अभंग क्र.494
धिग जिणें ज्याचा स्वामी हीन वर । मरण तें बरे भलें मग ॥१॥
आईका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु.॥
देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें तरि भलें ॥२॥
तुका म्हणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥३॥

अर्थ

अहो ज्याचा स्वामीचा दुर्बळ आहे हिन आहे त्या माणसाचे जगणे व्यर्थ आहे त्यापेक्षा त्याला मरण आलेले बरे.म्हणून देवा तुम्ही ऐका नीती अशीच आहे म्हणून जे योग्य असेल,उचित असेल तेच तुम्ही करावे.ज्याच्या शब्दाचा दरारा देशोदेशी आहे,त्याच्या घरी श्वान होणे ही बरे. तुकाराम महाराज म्हणतात मी असे कठोर का बोलतो,असे बोलावेसे मला का वाटले,ते आपण जाणून घ्यावे.


अभंग क्र.495
आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरीकथा ॥१॥
होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु.॥
भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होउनि राहों ॥२॥
तुका म्हणे आम्ही लाडिकीं लेंकरें । न राहों अंतरे पायांविण ॥३॥

अर्थ

देवा आता तुझे मंगलमय गाणे ओव्याने गाऊ आणि गदारोळ करून हरिकथा करू.कारण आमची सर्व संकटे तूच निवारण करतोस.भय,तळमळ, पापाची भावना,पुण्याचा मार्ग सर्व तुच निवारण करतोस.आम्ही जे काही भोग भोगतो,ते तूच भोगतोस अशा श्रद्धेने आम्ही ते सर्व तुझ्याकडे लावून मोकळे राहू.तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुझी लाडकी लेकरे आहोत तुझ्या पाया पासून वेगळे आम्ही राहू शकत नाही.


अभंग क्र.496
सर्व सुखें आजी येथेचि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥१॥
सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२॥
तुका म्हणे वाचा राहिली कुंटित । पुढें झालें चित्त समाधान ॥३॥

अर्थ

आज मी संतांची चरणकमले पाहिली त्यामुळे सर्व सुख येथे आली आहेत.सर्वकाळ सारखे संतांचे चरणाची मी आठवत होतो आता त्यांचे दर्शन झाले त्यामुळे यावेळी माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या.तुकाराम महाराज म्हणतात आता या संबंधी काहीच बोलता येत नाही.माझे चित्त समाधान पावले आहे.


अभंग क्र.497
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥
विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु.॥
बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥२॥
सकळां इंद्रियां मन हे प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥३॥
तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥४॥

अर्थ

विठ्ठल हा माझा सोयरा सज्जन सोबती असून विठ्ठलच माझ्या जगतामध्ये दृढ बसलेला आहे.विठ्ठलाने माझे सर्व अंग व्यापून टाकले असून माझी सावली हि विठ्ठलच झाला आहे,असे मला वाटू लागले आहे.माझ्या जीव्हेवर विठ्ठलच बसलेला आहे त्यामुळे विठ्ठला वाचून इतर काहीही दुसरे माझी जीव्हा बोलत नाही हे मी शपथ घेऊन सांगतो.सगळ्या इंद्रियात मन श्रेष्ठ आहे आणि ते देखील विठोबाचे ध्यान करीत आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता या विठ्ठलाला मी विसंबूम्हणजे विसरू शकत नाही.


अभंग क्र.498
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु.॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥

अर्थ

वारकरी व्हा वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा.बाकीचे साधने काय करायची आहे?सर्व काही फळ यानेच मिळते.असे केल्याने अभिमान नाहीसा होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्येय येतो.


अभंग क्र.499
पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥१॥
अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु.॥
न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥२॥
तुका म्हणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥३॥

अर्थ

पंढरीला जातो त्याला त्याच्या माय बापाची देखील आठवण राहत नाही.तो स्वतःच पांडुरंगरूप होतो आणि त्याच स्थितीत राहतो.मग त्याला कोणत्याही प्रकारचा मान-सन्मान धन द्रव्य लागत नाही कारण तो देहा विषयी उदासीन झालेला असतो.तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूर हे क्षेत्र त्रिगुणरुपी मलाचा तात्काळ नाश करणारे आहे.


अभंग क्र.500
बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥१॥
ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु.॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरुनि सकळही ॥२॥
प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाव ॥३॥
तुका म्हणे मज बहुरूप्याचि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥४॥

अर्थ

अहो बळेच मी बाह्य रंगाने साधू पणाचे संत पणाचे सोंग घेतलेले आहे पण माझ्या अंतःकरणा मध्ये विकारांचा विविध प्रकारच्या विषयांचा त्याग तसेच संसाराचा देखील माझ्या अंतकरणातून त्याग अजूनही झालेला नाही.माझ्या नित्य अनुभवला हीच गोष्ट येत आहे आणि खरा हा काय प्रकार आहे,ते माझे मला माहित आहे.मला जो अनुभव जागृतीती येतो तो पूर्ण पणे मुरलेला नसतो त्यामुळे स्वप्नात तो मी विसरून जातो.माझे चित्त खरोखर प्रपंचातून अजून बाहेर पडलेलेच नाही.मी पूर्वीचेच व्यवसाय पुढे करी राहिलो आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझा प्रकार बहुरुप्याप्रमाने झाला वरच्या बाजूने जगाला सोंग मात्र दिसत आहे.


सार्थ तुकाराम गाथा 401 ते 500 समाप्त .

 

View Comments

  • खूप छान अभंग आहेत मी पूर्ण गाथा वाचण्याचा प्रयत्न करत आहे.तुम्ही जो अभंगाचा अर्थ दिलेला
    आहे तो मला खूप खूप आवडलेला आहे.मी तुमचा कोटी कोटी आभरी आणि ऋनी आहे.असच काम चालू ठेवा तुम्हाला खूप मोठी पुण्याई भेटेल विठॣमाऊली तुमचं कल्याण करो.

  • खूप छान अभंग आहेत मी पूर्ण गाथा वाचण्याचा प्रयत्न करत आहे.तुम्ही जो अभंगाचा अर्थ दिलेला
    आहे तो मला खूप खूप आवडलेला आहे.मी तुमचा कोटी कोटी आभरी आणि ऋनी आहे.असच काम चालू ठेवा तुम्हाला खूप मोठी पुण्याई भेटेल विठॣमाऊली तुमचं कल्याण करो. जय हरि विठ्ठल