तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । दिंड्या पताका झळकती । जे गर्जती हरीनामें ॥१॥
दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥ध्रु.॥
विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें ॥२॥
पोट सेवितां न धाये । भूक भुकेली च राहे । तुका म्हणे पाहे । कोण वास मुक्तीची ॥३॥
अर्थ
आहो तेथेच सुखाची वस्ती आहे जेथे हरिभक्त वैष्णव आनंदाने हरिनाम घेऊन हरिनाम गातात व त्या छंदात नाचतात. तेथे दिंड्या असतात, गरुड चिन्हांकित पताका झळकत असतात आणि हरी नामाची गर्जना होत असते. दोषाला त्याठिकाणी मार खाण्याची वेळ आली आहे. त्या त्रासामुळे दोषाला त्याठिकाणी मार खाण्याची वेळ आली आहे आणि या त्रासामुळे दोष चारी दिशेला पळत सुटले आहेत. दोष परत माघारी येत नाहीत परत माघारी येण्याकरता शिल्लक ही राहत नाहीत. हा पंढरीचा राणा आपला देवपणा विसरून वैष्णवांच्या मेळ्यात कायम उभा असतो. निर्गुण स्वरूपाला कंटाळून देवाने वैष्णव करिता सुंदर गोजिरे रुप धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा या सुंदर गोजिर्या स्वरूपाला कितीही पाहिले तरी पोट भरत नाही. या सुंदर स्वरूपाला पाहण्याची भूक भुकेली राहते सुंदर गोजिरे स्वरूप असले तर मग कोणाला मुक्तीची आवड वाटते.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.