सार्थ तुकाराम गाथा 1301 ते 1400
अभंग क्र.१३०१
नसतों किविलवाणें । कांहीं तुमच्या कृपादानें ॥१॥
हेचि तयाची ओळखी । धालें टवटवित मुखीं ॥ध्रु.॥
वांयां जात नाहीं । वचन प्रीतीचें तें कांहीं ॥२॥
तुका म्हणे देवा । सत्य येतें अनुभवा ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही माझ्यावर कृपा केली असती तर मी असा केविलवाणा दिसलो नसतो. ज्याचे मुख टवटवीत आहे तो तृप्त झाला असे समजावे. आणि हीच तुमच्या कृपेची खरी ओळख आहे. देवा तुम्ही एखाद्या बरोबर काही शब्द प्रेमाने बोलला तर ते शब्द कधीच वाया जात नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात देवा जे सत्य आहे ते अनुभवाला येते, म्हणजे मला तुमची कृपा झाली असती तर त्याचा अनुभवही आला असता.
अभंग क्र.१३०२
जालों तंव साचें । दास राहवणें काचें ॥१॥
हें कां मिळतें उचित । तुम्ही नेणा कृपावंत ॥ध्रु.॥
सिंहाचें ते पिलें । जाय घेऊनियां कोल्हें ॥२॥
तुका म्हणे नास । आम्हां म्हणविल्या दास ॥३॥
अर्थ
देवा आम्ही तुझे खऱ्या अर्थाने दास झालो आहोत तरीही आम्हाला अज्ञानात राहावे लागते आहे. हे कृपावंता देवा आम्हाला असे ठेवणे योग्य आहे काय, तुम्हाला ते कळत नाही काय. बलाढ्य सिंहिणी ची पिल्ले जर कोल्ह्याने नेले तर सिंहाच्या दृष्टीने ते योग्य आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तुझे दास आहोत असे म्हणून घेतल्यावरही आमचा नाश होणे योग्य आहे काय?
अभंग क्र.१३०३
देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभर ॥१॥
लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी पापपुण्या ॥ध्रु.॥
शुद्ध भक्ती मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥२॥
तुका म्हणे ज्याचें तयासी च कळे । प्रांत येतो फळें कळों मग ॥३॥
अर्थ
आपण जेथे जेथे देव आहे असा खरा भक्तिभाव ठेवतो तेथे विश्वंभर खरोखर वास करत असतो. लोभाचा संकल्प जर अंतकरणातून पळून गेला मग तेथे पाप-पुण्य कसे राहील? मन जर निर्मळ असेल तर तीच खरी शुद्ध भक्ती असते मन जर पापी विचाराने विटाळलेले असेल तर चित्तावर वज्रलेप घट्ट बसलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात आपले मन निर्मळ आहे की नाही त्या बाबतीत आपले मनच साक्षी असते आणि पुढे मिळणाऱ्या फळापासून ते आपल्याला कळून येते.
अभंग क्र.१३०४
कडसणी धरितां अडचणीचा ठाव । म्हणऊनि जीव त्रासलासे ॥१॥
लौकिकाबाहेरि राहिलों निराळा । तुजविण वेगळा नाहीं तुजा ॥ध्रु.॥
संकोचानें नाहीं होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥२॥
तुका म्हणे केलें इच्छे चि सारिखें । नाहींसें पारिखें येथें कोणी ॥३॥
अर्थ
संसाराविषयी जितका विचार करावा तितका त्रास होतो आणि त्याने भय व शोक वाढत जातात. देवा मी आता लौकिका पासून पूर्ण बाहेर राहिलो आहे . यापासून निराळा झालो आहे . त्यामुळे तू आणि मी वेगळा नाही आहोत . मी तुझ्याविषयी संकोच बाळगावा तर माझी इच्छा कधीही पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळे संकोच जवळ ठेवण्याचे काही कारण येत नाही . तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्या प्रमाणे सर्व काही केले आहे त्यामुळे जगातील कोणीच माझ्यासाठी परके राहिले नाही .
अभंग क्र.१३०५
हेचि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो ॥१॥
घ्यावी माझ्या हातें सेवा । हेची देवा विनवणी ॥ध्रु.॥
आणीक कांही न घालीं भार । बहुत फार सांकडे ॥२॥
तुका तुमचा म्हणवी दास । त्याची आस पुरवावी ॥३॥
अर्थ
देवा मी तुमचे चरण धरून राहिलो आहे ह्याच तुम्ही मला दिलेल्या कृपादानाचे तुम्ही रक्षण करा. देवा माझ्या हातून तुम्ही सेवा व्हावी हीच माझी तुम्हाला विनंती आहे . देवा या वाचून मी दुसरे कोणतेच भार किंवा कोणताही हे साकडे तुमच्यावर घालत नाही . तुकाराम महाराज म्हणतात मी तुमचा म्हणून घेतो मग तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा .
अभंग क्र.१३०६
आपुल्याच फुंदे । जेथें तेथें घेती छंदें ॥१॥
पडिला सत्याचा दुष्काळ । बहु फार जाली घोळ ॥ध्रु.॥
विश्वाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट ॥२॥
तुका म्हणे घाणा । मूढा तीर्थी प्रदिक्षणा ॥३॥
अर्थ
काही माणसे असे आहेत की ते आपल्या अभिमानाने जिथे तिथे दूराग्रह धरत असतात. परमार्थामध्ये सत्याचा फार मोठा दुष्काळ पडला आहे त्यामुळे घोटाळा ही फार मोठा निर्माण झाला आहे. मीथ्या जगाचा अभिमान धरणाऱ्या लोकांच्या कपाळी काहीच फळ प्राप्ती होत नसते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे घाण्याचा बैल घाण्याभोवतीच फिरत असतो त्याप्रमाणे मूर्ख लोक तीर्थयात्रा प्रदक्षिणा करतो परंतु आपले मुख्य साधन जे आहे ते म्हणजे हरी प्राप्ती करून घेणे ही साधना प्राप्त करावी याचे त्याला ज्ञान नसते.
अभंग क्र.१३०७
उद्योगाची धांव बैसली आसनीं । पडिलें नारायणीं मोटळें हें ॥१॥
सकळ निश्चिंती जाली हा भरवसा । नाहीं गर्भवासा येणें ऐसा ॥ध्रु.॥
आपुलिया सत्ते नाहीं आम्हां जिणे । अभिमान तेणें नेला देवे ॥२॥
तुका म्हणे चळें एकाचिया सत्ते । आपुलें मी रिते पणें असें ॥३॥
अर्थ
देहा सहीत सर्व इंद्रियांचे मोटाळे नारायणा जवळ आहेत त्यामुळे या संसारातील सर्व चिंता नारायणा जवळच येऊन बसली आहे.या कारणामुळेच आता माझा गर्भवास तुटला आहे व त्यामुळेच मी निश्चित झालो आहे व माझा या गोष्टीवर पूर्ण भरवसा झाला आहे.देवाने माझा सर्व देह अभिमान नेला आहे त्यामुळे मला माझ्या सत्तेने जगायचे नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व शरीर देवाच्या सत्तेने चलनवलन करीत आहे त्यामुळे मी आता देहाभिमान टाकून रिता झालो आहे.
अभंग क्र.१३०८
बहुतां पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥१॥
घ्या रे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥ध्रु.॥
ऐका निवळल्या मनें । बरव्या कानें सादर ॥२॥
तुका म्हणे करूनि अंती । निश्चिंती हे ठेवावी ॥३॥
अर्थ
परमार्थ स्वरूपाचा माल व धन सर्वांना मिळेल व फुकटचा नारायण रूपी माल कोणत्याही प्रकारची किंमत न देता घ्या. व या नारायणाला कधीही विसरू नका. मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुम्ही शुद्ध मनाने व कान देऊन ऐका. तुकाराम महाराज म्हणतात मी सांगितलेले साधन तुम्ही साठवून ठेवा व अंतकाळी निवांत होण्याची तरतूद ठेवावी.
अभंग क्र.१३०९
माझी मज जाती आवरली देवा । न व्हावा या गोवा इंद्रियांचा ॥१॥
कासया मी तुझा म्हणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥
भयाचिया भेणें धरियेली कास । न पुरतां आस काय थोरी ॥२॥
तुका म्हणे आप आपलीं जतन । कैचें थोरपण मग तुम्हां ॥३॥
अर्थ
देवा मला माझ्या इंद्रियांवर ताबा ठेवता आला असता तर मी त्यांच्या आधीन झालो नसतो. मग मी मला तुझा दास म्हणून का घेतले असते? मी इंद्रियांच्या आधीन असतो तर सर्व भावे उदास होऊन राहिलो असतो. जन्म मरणाच्या भीतीने मी तुमची कास धरली आहे त्यामुळे देवा तुम्ही जर माझी इच्छा पूर्ण करत नसाल तर तुमची थोरवी काय उपयोगाची? तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा आम्हाला जर आमची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात ठेवता आली असतील तर मग आम्ही तुम्हाला मोठेपणा का दिला असता?
अभंग क्र.१३१०
विनवितों तरी आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥१॥
आमुचे ही कांहीं असों द्या उपकार । एकल्यानें थोर कैचे तुम्ही ॥ध्रु.॥
न घ्यावी जी कांहीं बहु साल सेवा । गौरव तो देवा यत्न कीजे ॥२॥
तुका म्हणे नाहीं आमुची मिरासी । असावेंसी ऐसीं दुर्बळेंची ॥३॥
अर्थ
देव मी तुम्हाला विनंती करत राहतो आणि तुम्ही मला जे पाहिजे ते न देता भलतेच प्रकार दाखवता . पण एक लक्षात ठेवा या जगात दात्याचा थोरपणा हा केवळ याचकामुळे असतो . देवा तुम्ही आमचे थोडे उपकार मना जरा आम्ही तुमचे भक्त नसतो तर तुम्हाला देव पणा कसा आला असता ,कसा थोरपणा आला असता? देवा तुम्ही आमच्याकडून भरपूर सेवा करून घेऊ नका उलट आपल्या दोघांचाही गौरव कसा होईल याचा प्रयत्न करा . तुकाराम महाराज म्हणतात देवा आमची वंशपरंपरा अशी नाही की आम्ही कायमस्वरूपी दुबळे राहावेत .
अभंग क्र.१३११
एका ऐसें एक होतें कोण्याकाळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥१॥
घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ध्रु.॥
केला तो न संडीं आतां कइवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥२॥
तुका म्हणे जाली अळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळों साच ॥३॥
अर्थ
एकासारखी एक गोष्ट कोणत्याही काळात होणे शक्य आहे काय? परंतु समर्थांच्या बळाने काही होणे अशक्य नाही. मी माझी वंशपरंपरागत सेवा याचा आधार घेऊन तुमच्या पायाशी बसलो आहे देवा. त्यामुळे मी तुम्हाला जिंकणे यात कोणताही संदेह नाही. देवा मी एकदा निश्चय केला की, तो सोडणार नाही तुमच्या आणि माझ्या मध्ये येणाऱ्या विकारांना मी बाजूला सारे . तुकाराम महाराज म्हणतात देवा इतक्या दिवस माझ्यावर आळसाने धाडी घातली होती त्यामुळे मला तुम्हाला कसे जिंकावे याचे वर्म कळले नव्हते .
अभंग क्र.१३१२
झाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥
आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा ॥ध्रु.॥
सुरवाडिकपणें । जेथें सांपडलें केणें ॥२॥
तुका म्हणे भोग । गेला निवारला लाग ॥३॥
अर्थ
देवा मी तुमचे चरण खऱ्या भक्तीभावाने धरले आहे त्यामुळे माझ्या मनाचे समाधान झाले आहे. नारायण आता तुमच्या सुंदर चरणापासून उठावे असे मनातही येत नाही. तुमच्या चरणांजवळ मला कोणतेही कष्ट न करता मोक्ष रुपी माल सापडला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या संचित कर्माचा भोग नष्ट झाला आहे .
अभंग क्र.१३१३
मुखाकडे वास । पाहें करूनियां आस ॥१॥
आतां होईल ते शिरीं । मनोगत आज्ञा धरीं ॥ध्रु.॥
तुह्मीं अंगीकार । केला पाहिजे हें सार ॥२॥
तुका म्हणे दारीं । उभें याचक मीं हरी ॥३॥
अर्थ
देवा मी तुमच्या मुखाकडे मोठी आसं करून पाहत आहे . आता मला तुम्ही कोणतीही आज्ञा करा मी ती मला शिरसावंद्य आहे . देवा तुम्ही माझा अंगिकार करावा हाच माझा सार आहे . तुकाराम महाराज म्हणतात हे हरी मी तुमच्या दाराशी भिकारी म्हणून उभा आहे .
अभंग क्र.१३१४
नाहीं माथां भार । तुम्ही घेत हा विचार ॥१॥
जाणोनियां केलें । दुरिल अंगेसी लाविलें ॥ध्रु.॥
आतां बोलावें आवडी । नाम घ्यावें घडी घडी ॥२॥
तुका म्हणे दुरी । देवा खोटी ऐसी उरी ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही माझ्या योगक्षेम माझा भार तुमच्या अंगावर घेत नाही. हा तुमचा विचार आहे हे जाणून मी आता तुमच्या अंगाशी येऊन चिटकलो आहे. आता आम्ही तुमच्याशी आवडीने बोलणार आणि तुमचे नाम घडोघडी ला घेणार. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्यापासून दूर राहून जीव दशेने उरणे म्हणजे प्रत्यक्ष खोटेपणा आहे .
अभंग क्र.१३१५
माझें जड भारी । आतां अवघें तुम्हांवरी ॥१॥
जालों अंकित धंकिला । तुमचा मुकलों मागिला ॥ध्रु.॥
करितों जें काम । माझी सेवा तुझें नाम ॥२॥
तुका पायां लागे । कांहीं नेदी ना न मगे ॥३॥
अर्थ
माझा सर्व संकटाचा भार तुमच्यावर आहे. देवा मी तुमच्या दासाचा ही दास आहे त्यामुळे मी आता प्रपंचाच्या दुखायला ही मुकलो आहे. देवा मी एकच काम करतो ते म्हणजे तुझे नाव घेतो आणि हिच माझी सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी केवळ तुमच्या पायाला लागला आहे ,या वाचून मी तुम्हाला काही देऊ शकत नाही आणि तुम्हाला काही मागणारही नाही.
अभंग क्र.१३१६
तुम्ही आम्ही भले आतां । जालों चिंता काशाची ॥१॥
आपुलाले आलों स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ध्रु.॥
सहज जें मनीं होतें । तें उचितें घडलें ॥२॥
तुका म्हणे नसतें अंगा । येत संगा सारिखें ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही स्वामी आणि मी सेवक या नात्याने आप आपल्या परीने चांगले झालो आहो मग आता चिंता आहे तरी कशाची? देवा तुम्ही स्वामी आहात मी सेवक आहे, आपण दोघेही एकमेकांच्या जागेवर बरोबर आहोत. जर आपण मौन धरले तर आपल्या मध्ये भांडण होण्याचे कारण काय देवा इतके दिवस माझ्या मनात होते की तुमची सेवा करण्याची मला संधी यावे ते जाता उचित प्रकारे घडत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही आमच्याशी योग्य पणाने वागत नव्हते त्यामुळे आमच्या अंगी नसता क्रोध येत होता.
अभंग क्र.१३१७
चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥
आलिया वचन रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडी ॥ध्रु.॥
मत्सराचा ठाव शरीरीं नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥२॥
तुका म्हणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥३॥
अर्थ
हे मना ज्यामुळे देवाचे चरणा अंतरतील अशा गोष्टींची आठवण तू चित्तामध्ये येऊ देऊ नकोस, माझ्या मुखातून राम नामाचा ध्वनी बाहेर पडावा कानाने देवाचेच संदेश वचने ऐकावी अशाच गोष्टींची आवडत तुला लागू दे. दुसऱ्यांविषयी मत्सर नसावे कारण त्यामुळे लाभ तर काही होत नाही. पण दुःख मात्र होते. तुकाराम महाराज म्हणतात अंतकरण शितल असावे अंतकरणात क्षमा असावी हेच खरे शांतीचे बळ आहे.
अभंग क्र.१३१८
कोण पुण्य कोण गांठी । ज्यासी ऐसीयांची भेटी ॥१॥
जीही हरी धरिला मनी । दिले संसारासी पाणी ॥ध्रु.॥
कोण हा भाग्याचा । ऐसियाची बोले वाचा ॥२॥
तुका म्हणे त्याचे भेटी । होय संसाराची तुटी ॥३॥
अर्थ
असे कोणते पुण्य कोणाच्या पदरी आहे की ज्याला ज्ञानी भक्तांची भेट घडेल. की, ज्या हरीभक्तांनी संसारावर पाणी सोडले आणि हरीला आपल्या मनात धारण केले. असा कोण भाग्यवान आहे की त्या भाग्यवानाबरोबर ते हरीभक्त परमार्थाविषयी बोलण्यास तयार होतील. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा ज्ञानी भक्तांची भेट होणे म्हणजे पूर्व पुण्यानेच हे होते आणि त्यांची भेट झाली की संसारबंधन तुटते.”
अभंग क्र.१३१९
तरिच हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुम्हां सोई ॥१॥
एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥
फुटतसे प्राण क्षणांच्या विसरें । हें तों परस्परें सारिखेंचि ॥२॥
तुका म्हणे चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारिला ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही माझी उपेक्षा करणार नाही असा मी दृढविश्वास धरला आहे आणि त्या कारणामुळे मी संसाराविषयी उदास झालो आहे. दोन समान जातींचे व्यक्ती म्हणजे समान स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांना एकमेकांविषयी कळवळा असतो त्याप्रमाणे गोपाळा तुमची आणि माझी जात म्हणजे आपल्या दोघांचा स्वभाव एक सारखाच आहे. त्या कारणाने आपण प्रेम सुखाच्या दोरी ओढले गेलो आहोत. देवा तुमचा क्षणभर मला विसर पडला तर माझा जीव कासावीस होतो . अगदी त्याप्रमाणे तुम्हालाही माझा क्षणभर विसर पडला तर तुमचा देखील जीव कासावीस होतो हा तुमचा आणि माझा स्वभाव अगदी सारखाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी आणि माझी जात एकच आहे म्हणजे स्वभाव एकच आहे याचा माझ्या चित्ताला अनुभव आला आहे, त्यामुळे माझ्या मनाचा संदेह निवारण झाला आहे, माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही.
अभंग क्र.१३२०
किती विवंचना करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा ॥१॥
कोणा एका भावें तुम्ही अंगीकार । करावा विचार याच साठीं ॥ध्रु.॥
इतर ते आतां लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥२॥
तुका म्हणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधीं बुडोनियां ॥३॥
अर्थ
देवा तुझी प्राप्ती व्हावी यासाठी माझे मन किती वंचित होत आहे तुला काय सांगू. अरे तुझी भेट व्हावी यासाठी माझे मन दाहीदिशा हिंडत आहे. देवा तुम्ही माझा अंगिकार कोणत्याही प्रकारे केला पाहिजे याचा विचारा मी करीत आहे. संसारातील सर्व लाभ मला आता तुमच्या वाचून तूच्छ वाटत आहेत कारण संसारातील गुणदोष मला चांगलेच कळले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या प्रेम बोधात बुडून जावे अशी माझी इच्छा आहे आणि मला अखंड समाधी लागावी असेच मला वाटते.
अभंग क्र.१३२१
दिकची या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥
तांतडींत करीं म्हणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥
संकल्पाच्या बीजें इंद्रियांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥२॥
तुका म्हणे बीजें जाळुनी सकळ । करावे गोपाळ आपुले भाट ॥३॥
अर्थ
संसाराशी संबंध किती दिवस आहे याला मर्यादा नाही त्यामुळे संसारातील संसाराची भव रोगाची बाधा तुटेनाशी झाली आहे त्यामुळे मी तातडीने परमार्थ करीत आहे. जेवढा वेळ माझा परमार्थात जाईल तो एक वेळ म्हणजे माझ्यासाठी सोन्याचाच. संकल्प बीजाणे च इंद्रिये कर्म करत असतात व त्या क्रमानेच प्रारब्ध कर्म घडून पुन्हा गर्भवासाता नेऊन घालतात. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे हे गोपाळा तुम्ही माझे सर्व प्रारब्धाची कर्मे जाळून टाकून मला तुमचे गुणगान करणारा भाट करावे.
अभंग क्र.१३२२
आतां होइन धरणेकरी । भीतरीच कोंडीन॥१॥
नाही केली जीवेसाठी । तों कां गोष्टी रुचे ते॥ध्रु.॥
आधी निर्धार तो सार । मग भार सोसेना ॥२॥
तुका म्हणे खाऊं जेऊं। नेदुं होऊं वेगळा ॥३॥
अर्थ
देवा मी आता तुमच्या दारांमध्ये धरणे धरून बसेन आणि तुम्हाला आताच कोंडून ठेवीन. हे देवा मी माझ्या जीवावर उदार झालो नाही तर तुम्हाला माझ्या गोष्टी कोरड्या वाटतील आणि तुमचा त्यावर विश्वास कसा बसेल? देवा आधी निश्चयाने वागणे हे महत्त्वाचा आहे मग एकदा की आमचा निश्चय तुम्ही पाहिला की आमचा भार तुम्हाला सोसणार नाही आणि मग आमची विचारपूस केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही, गत्यंतर नाही आमची विचारपूस तुम्हाला करावी लागेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता आम्ही तुला भोजना सहित आमच्याशी एक रूप करू परंतु आम्ही तुला आमच्या पेक्षा वेगळे होऊ देणार नाही.
अभंग क्र.१३२३
होईल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावें ॥१॥
तोंवरी मी पुढें कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु.॥
जाणेनियां अंतर देव । जेव्हां भेव फेडील ॥२॥
तुका म्हणे धरिल हातीं । करील खंती वेगळें ॥३॥
अर्थ
मी देवाच्या दारात धरणे धरून बसलो आहे त्यामुळे देवाकडून माझी विचारपूस होईल मग त्याला उत्तर काय द्यायचे याची योजना आतापासूनच तयार करून ठेवली पाहिजे, तेच योग्य राहील. जोपर्यंत माझी विचारपूस होत नाही तोपर्यंत देवाला मी काहीही सांगणार नाही. माझ्या अंतकरणातील देव जाणून घेईल आणि तोच माझी सर्व काही कष्ट भय नाहीसे करेन. तुकाराम महाराज म्हणतात हा देव माझ्या हाताला धरील आणि मला या भयातून मुक्त करीन.
अभंग क्र.१३२४
हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥१॥
विश्वंभरें विश्व सामावले पोटी । तेथें चि सेवटी आम्ही असो ॥ध्रु.॥
नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥२॥
तुका म्हणे माझ्या स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खुणा जाणतसो ॥३॥
अर्थ
भक्ती मार्गांमध्ये निराश होऊन चालत नाही आपल्या मनात धीर धरावा आणि केव्हा तरी आपल्याला देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय दृढ धरावा. विश्वंभरा च्या पोटामध्ये सारे विश्व सामावले आहे म्हणजे आपणही त्याच्या पोटात आहेत आहोत शेवटी आपणही त्याच्या पोटात राहणार आहोत. देव माझी चिंता करत आहे हे मला कळत नाही. पण देवाच्या अंतःकरणात माझ्याविषयी प्रेम उमटलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझा स्वामी पांडुरंग अबोलच आहे परंतु त्याच्या इच्छेनुसार त्याला कशी सेवा आवडते हे मी जाणतो.
अभंग क्र.१३२५
निष्ठुर तो दिसे निराकारपणें । कोंवळा सगुणें प्रतिपाळी ॥१॥
केला च करावा केला कइवाड । होईल तें गोड न परते ॥ध्रु.॥
मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितिळतां आहाच तें ॥२॥
तुका म्हणे आतां मनाशीं विचार । करावा तो सार एकचित्ते ॥३॥
अर्थ
हा हरी निर्गुण आहे त्यामुळे लोकांना तो निष्ठुर असल्यासारखा वाटतो. परंतु तो सगुण साकार झाला की सर्व भक्तांवर कृपा करतो. तो कोवळा आहे दयावंत आहे आणि सर्वांचे तो पालन करतो असे दिसते. निर्गुण आणि सगुण हे दोन्ही रुप देवाचेच, त्यापैकी कोणत्याही एका रूपा वर भक्ती परम निष्ठा धरावी आणि त्याचीच पूजा करावी. असे केल्याने नक्कीच शेवट गोड होईल. दह्याचे मंथन केले तर लोणी हाताला लागते परंतु वरचेवर दह्याचे मंथन केले तर लोणीही नाश पावते. तुकाराम महाराज म्हणतात आता मनाशी एक चित्ताने असा विचार करावा की सगुण किंवा निर्गुण कोणत्याही एका देवाच्या रूपाचे चिंतन करावे व तेच सारभूत आहे असे लक्षात ठेवावे.
अभंग क्र.१३२६
बहु देवा बरें जालें । नसतें गेलें सोंवळें ॥१॥
धोवटाशीं पडिली गांठी । जगजेठीप्रसादें ॥ध्रु.॥
गादल्याचा जाला झाडा । गेली पीडा विकल्प ॥२॥
तुका म्हणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥३॥
अर्थ
देवा मीथ्या असणारे “सोवळे” नाहीसे झाले ते फार बरे झाले. जगात सत्य असणाऱ्या आत्म्याची मला गाठ पडली. त्रिविध गुणा ने माझे मन मलीन झाले होते त्यांचा झाडा झाला आहे आणि विकल्पाचीही पीडा आता गेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता जे निर्मळ आत्मतत्त्व आहे ते मला निर्मळ करीत आहे.
अभंग क्र.१३२७
स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥१॥
काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं ॥ध्रु.॥
धनवंत्र्याचिये अंगीं सत्ताबळ । व्याधि तो सकळ तोडावया ॥२॥
तुका म्हणे आलें मोड्यासी कोंपट । सांडोव्याची वाट विसरावी ॥३॥
अर्थ
माझ्या स्वामीचे वर्म सच्चिदानंद माझ्या जवळ असूनही मी त्रिगुणांच्या संगतीने देहत्रयाची मोळी वाहत आहे. हे दातारा आम्हाला या काबाडा पासून सोडवा आणि प्रपंचाचा भार वाहणारे आम्हाला करू नका. सर्व शरीराची व्याधी बरे करण्याचे सामर्थ्य धन्वंतरीच्या अंगी असते त्याप्रमाणे भवसागराचे बंधन तोडण्याचे सामर्थ्य तुमच्या अंगी आहे. हा भवसागर तोडणारे तुम्ही धन्वंतरी आहात. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझी देहरूपी खोपी मोडकळीस आली आहे आता यापुढे माझा गर्भवास फेरा बंद पडेल असे काहीतरी तुम्ही करा.
अभंग क्र.१३२८
ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥१॥
जालो उतराई शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥
आजिवरी होतों धरूनि जिवासी । व्याजें कासाविसी बहु केलें ॥२॥
तुका म्हणे मना आणिला म्यां भाव । तुमचा तेथें ठाव आहे देवा ॥३॥
अर्थ
हे नारायणा देवा तुमच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता मी तुमचा दास झालो आहे. आता तुम्ही मला हिशोब द्यावा. देवा आता मी तुमच्या उपकरातून मुक्त होण्यासाठी माझे शरीर तुम्हाला अर्पण करत आहे. या पुढचे माझे सर्व पाप तुम्ही नाहीसे करा. देवा मी आज पर्यंत कर्ज बाळगून होतो या जीव दशेला धरून होतो त्यामुळे माझे कर्ज वाढतच गेले. आणि माझा जीव त्यामुळे खूप कासावीस होत होता. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी मनात असा विचार केला की हे शरीर तुमचे राहण्याचे स्थान आहे, त्यामुळे आता हे शरीर मी तुम्हाला अर्पण करीत आहे.
अभंग क्र.१३२९
येणें पांगें पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥१॥
सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥ध्रु.॥
बंधनाची तुटली बेडी । हे चि जोडी मग आम्हां ॥२॥
तुका म्हणे नव्हें क्षण । पायांविण वेगळा ॥३॥
अर्थ
देवा मी तुमचा सेवक आहे आणि निश्चयाने तुमच्या पाया जवळच राहणार आहे. देवा मी तुमचे सर्व प्रकारचे दास्यत्व पत्करले आहे. तेव्हा तुम्ही मला जी सेवा सांगायला ती सेवा मी करेन. देवा मी भवसागराची बंधने तोडली आणि तुझ्या पायाची प्राप्ती झाली तर हाच आमच्यासाठी मोठा लाभ असणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या पायापासून मी एक क्षण देखील वेगळा राहणार नाही.
अभंग क्र.१३३०
आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥१॥
उद्धारासी काय उधाराचें काम । वाढवूंचि श्रम नये देवा ॥ध्रु.॥
करा आतां मजसाठी वाड पोट । ठावे नाहीं तंटे झालें लोकीं ॥२॥
तुका म्हणे बाकी झडलियावरी । न पडें वेव्हारीं संचिताचे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही या भवसागरातील उपाधी सोडवण्यासाठी काहीतरी करा, माझा उद्धार करण्याकरता माझ्या जडपणाशी, माझ्या मूर्खपणाशी काय काम? देवा माझा उद्धार करण्यासाठी उधारीचे काय काम आहे, म्हणजे आज करतो उद्या करतो असे तुम्ही का करतात. असे करून तुम्ही माझे श्रम वाढवू नका. देवा आता तुम्ही तुमच्या पोटी माझ्याविषयी दया येऊ द्या. लोकांमध्ये माझी किती फजिती झाली आहे हे तुम्हाला माहित आहे, ही गोष्ट तुम्हाला माहित नाही काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा एकदा की माझ्या संचिताची बाकी भेटली ती पुन्हा मी कर्मच करणार नाही.
अभंग क्र.१३३१
सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥
दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥
बहु जालों खेदक्षीण । येणें सीण तो नासे ॥२॥
तुका म्हणे गंगेवास । बहु त्या आस स्थळाची ॥३॥
अर्थ
देवा मला सर्व गोष्टींविषयी कंटाळा आला आहे आणि फक्त तूच एक मला आवडतो आहेस. हे जगजेठी मी तुझ्या पायाला मिठी दिली आहे ती आता कधीच सोडणार नाही. देवा मी खूप दुखी झालो आहे आणि तुझ्या पाया च्या दर्शनाने हे सर्व दुःख नाहीसे होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या ठिकाणी गंगेचा वास आहे आणि त्या ठिकाणी वास करण्याची मला इच्छा आहे.
अभंग क्र.१३३२
शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥१॥
सेवन हे शिरसा धरीं । अंतरीं हीं वरदळा ॥ध्रु.॥
अवघें चि नासी पाप । तीर्थ बाप माझ्याचें ॥२॥
बैसोनियां तुका तळीं । त्या कल्लोळी डौरला ॥३॥
अर्थ
देवा तुमच्या चरणांचे गंगा रुप तीर्थ हे जगातील शीतळ पदार्थ होऊनही शितळ आहे. हे देवा हेच ते तीर्थ मी सेवन करतो. माझ्या डोक्याने त्यालाच वंदन करतो. मी त्यालाच माझ्या डोक्यावर धारण करतो. पोटात ही तेच सेवन करतो आणि माझ्या बाह्य अंगावर, माझ्या सर्वांगावर हेच तीर्थ शिंपडतो. कारण माझा बाप हा विठ्ठल आहे याच्या तीर्थस्थाने सर्व पाप नाहीसे होतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या चरण तीर्थाच्या ठिकाणी बसून मी स्नान केले आणि त्याच्या लाटांमध्ये बसूनच त्या लाटा अंगावर घेऊनच मी पावन झालो.
अभंग क्र.१३३३
गोदेकांठी होता आड । करूनि कोड कवतुके ॥१॥
देखण्यांनीं एक केलें । आइत्या नेलें जिवनापें ॥ध्रु.॥
राखोनियां होतो ठाव । अल्प जीव लावूनि ॥२॥
तुका म्हणे फिटे धनी । हे सज्जनीं विश्रांति ॥३॥
अर्थ
एकदा एका माणसाला गोदावरीच्या काठावर खूप तहान लागली व तेथे एक आड,विहीर होते ते पाहून तो खूप आनंदीत झाला व तो ज्याने आड,विहीर निर्माण केली त्याचे कौतुक करू लागला. दुसऱ्या एका मनुष्याने पाहिले व तो त्या मनुष्याला म्हणू लागला अरे पाणी काढण्याचे श्रम करण्यापेक्षा पलीकडे गोदावरीचा तीर्थ आहे तिथे जा पाणी काढण्याचे श्रम लागणार नाही. त्या आडाच्या नादी लागणाऱ्या मनुष्य सारखा मीही संसारातील उपाधीनां जीव लावत बसलो होतो. तुकाराम महाराज म्हणतात मला संतांच्या संगती मुळे सर्व उपाधीच्या भ्रमाचा निरास झाला आणि माझी इच्छा पूर्ण होऊन परमात्मसुखाची विश्रांती त्यांनी मला प्राप्त करून दिली.
अभंग क्र.१३३४
न पाहें माघारें आतां परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥१॥
सामोरा येऊनि कवळीं दातारा । काळाचा हाकारा न साहावे ॥ध्रु.॥
सावधान चित्त होईल आधारें । खेळतां ही बरें वाटईल ॥२॥
तुका म्हणे कंठ दाटला या सोसें । न पवेचि कैसे जवळी हे ॥३॥
अर्थ
मी संसाराकडे मागे वळून पाहणार नाही कारण आता या संसारापासून माझा जीव आटला आहे. हे दातारा मला काळाचा हाकारा सहन होत नाही त्यामुळे तू माझ्या समोर येऊन मला कवटाळ. तू जवळ आलास की माझे चित्त सावधान होईल व तुझा आधार माझ्या चीत्ताला राहील आणि मग मी संसारातील कोणतेही खेळ खेळताना काहीच मला वाटणार नाही उलट बरे वाटेल. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या भेटी करता माझा कंठ दाटला आहे तरीही तू माझ्या जवळ का येत नाही?
अभंग क्र.१३३५
मथनीचें नवनीत । सर्व हितकारक ॥१॥
दंडवत दंडा परी । मागें उरी नुरावी ॥ध्रु.॥
वचनाचा तो पसरुं काई । तांतडी डोईपाशींच ॥२॥
तुका म्हणे जगजेठी । लावीं कंठीं उचलूनि ॥३॥
अर्थ
मंथन केलेले नवनीत हे सर्व प्रकारे हितकारक आहे. देवा तुम्हीही तसेच आहात त्यामुळे मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करत आहे. तुझ्याशी बोलण्याचा पाल्हाळ करण्यात काही उपयोग नाही. तुझ्या पायावर डोके ठेवण्याची तातडी करणे हेच बरोबर. तुकाराम महाराज म्हणतात हे जग जेठी तू मला उचलून तुझ्या कंठाशी लाव.
अभंग क्र.१३३६
अवचितचि हातीं ठेवा । दिला सेवा न करितां ॥१॥
भाग्य फळलें जाली भेटी । नेघें तुटी यावरी ॥ध्रु.॥
दैन्य गेलें हरली चिंता । सदैव आतां यावरी ॥२॥
तुका म्हणे वांटा जाला । बोलोंबोला देवासीं ॥३॥
अर्थ
देवाची कोणत्याही प्रकारची सेवा न करता या देवाने माझ्या हातात अवचितच आत्मसुखाचा मेवा दिला आहे. माझे भाग्य फळाला आले म्हणून मला देवाची भेट झाली. आता मी देवाचा वियोग घडू देणार नाही. आमचे दैन्य गेले सर्व चिंता नाहीशी झाली आम्ही यापुढे असेच भाग्यवान राहणार आहोत. तुकाराम महाराज म्हणतात देवाने मला माझा वाटा दिला त्यामुळे मी देवाशी गोड गोड गप्पा मारत आहे.
अभंग क्र.१३३७
समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥१॥
धांवे पावें करीन लाहो । तुमचा आहों विठ्ठला ॥ध्रु.॥
न लगे मज पाहाणें दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥२॥
तुका म्हणे नव्हे धीर । तुम्हां स्थिर दयेनें ॥३॥
अर्थ
सर्वसमर्थ असा देव आता मी त्याची कास धरली आहे. त्यामुळे माझा नाश कसा होईल? अहो विठ्ठला धावे, पावे हा तुमचा धावा मी करीत राहील. मी तुला हाक मारल्यावर तू माझ्याजवळ ओढल्यासारखा येतोस. त्यामुळे मला इतर कोणतीही दिशा पाहण्याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या पोटी दया पण आहे आणि त्यामुळे माझ्यावर कोणतेही संकट आले तर तुम्हाला धीर धरवतच नाही.
अभंग क्र.१३३८
करूं तैसें पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥
जिहीं केला मूर्तीमंत । ऐसा संतप्रसाद ॥ध्रु.॥
सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥२॥
तुका म्हणे घेऊं धांवा । करूं हांवा ते जोडी ॥३॥
अर्थ
देवा आम्ही असे पाठांतर करू की तुला आमची करूणाकर येईल. ज्यामुळे मूर्तिमंत संताचा प्रसाद आपल्या मिळेल. पूर्वी ऋषीमुनींनी ज्या स्वज्वळ वाटा निर्माण केल्या त्या झाडून संतांनी पुन्हा नीट नाटक्या केल्या. तुकाराम महाराज म्हणतात त्याच वाटेवर आपण धाव घेऊ आणि संतांनी जो लाभ मिळून घेतला आहे त्याचीच प्राप्ती करून घेण्याची हाव मनात धरु.
अभंग क्र.१३३९
अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निजखुण राहिलों ते ॥१॥
आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ध्रु.॥
एकविध भाव नव्हे अभावना । आणिक या गुणां न मिळवे ॥२॥
तुका म्हणे माझे पडिलें आहारीं । ध्यान विटेवरी ठाकले तें ॥३॥
अर्थ
माझे मन चंचल होते ते आता स्थिर झाले आहे कारण संतांनी मला निजखून दाखविली आहे तीच निजखून मी धरून राहिलो आहे. देवाच्या गुणांची आवड अंतरंगात बसली आहे आता त्याच गुणांचे तृप्ती होईपर्यंत पोट भरून सेवण करू. देवाच्या ठिकाणी जो काही भक्तिभाव लपला आहे त्या ठिकाणी अभावाने होणे शक्य नाही. आणि इतर कोणत्याही गुणांमध्ये माझे मन अगदी प्रपंच सुखांमध्ये देखील समरस होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात जे विटेवर समचरण उभे आहे त्याचे मी ध्यान केले असता तेच माझ्या पचनी पडले आहे.
अभंग क्र.१३४०
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥
गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥
लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥२॥
तुका म्हणे आतां आपुल्या सायासें । आम्हां जगदीशें सांभाळावें ॥३॥
अर्थ
देवा वैष्णवांच्या संगतीत माझ्या जीवाला फार सुख वाटते. यावाचून दुसरे काहीच मी जाणत नाही. मनाच्या आनंदामध्ये हरीचे नाम मुखाने गातो नाचतो आणि उड्या मारतो त्याच छंदात मी रंगून जातो. आता माझी लाज, भय, शंका आणि मान अपमान हे सर्व दूर झाले आहेत. वैष्णवांच्या संगती वाचून मला दुसरे कोणतेही साधन कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता या जगदीशाने आमचा सांभाळ करावा.
अभंग क्र.१३४१
शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥
स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥
देह सांभाळून । पायांवरी लोटांगण ॥२॥
विनवी तुका संता दीन । नोहे गौरवें उत्तीर्ण ॥३॥
अर्थ
हे संतजनहो मी तुम्हाला काकुळतीला येऊन त्रिवार हीच विनंती करत आहे की तुम्हाला मी शरण आलो आहे. तुमची स्तुती माझ्या वाचेने होत नाही परंतु मी तुम्हाला एक सत्य सांगत आहे की मी तुमच्या दासांचा ही दास आहे.मी माझ्या देहाची कोणतीही पर्वा न करता तुमच्या पायावर लोटांगण घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे संतांनो मी दिन आहे आणि माझ्या वाणीने तुमची कितीही स्तुती केली तरी तुमच्या उपकरातून उत्तीर्ण होणे अशक्य आहे.
अभंग क्र.१३४२
लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी॥१॥
कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥
आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि घाली हृदयात ॥२॥
पोटा आलें त्याचे नेणे गुणदोष । कल्याणाचि आस असावें हें ॥३॥
मनाची ते चाली मोहाचिये सोई । ओघ गंगा काई परतों जाणे ॥४॥
तुका म्हणे कोठें उदार मेघां शक्ती । माझी तृषा किती चातकाची ॥५॥
अर्थ
आई आपल्या लेकराला आवडीने अलंकार घालते व त्याला पाहिल्यानंतर तिच्या आनंदाला अंतपार नसते. त्याप्रमाणे हे संतजनहो तुम्ही माझे मायबाप आहात आणि तुमच्या कृपेने पोचला जाणारा मी दिन आहे. मुल कसेही बोलले तरी त्याच्या आईला संतोष वाटतो व ती आई त्याला आपल्या हृदयाशी धरून कवटाळते. आपल्या पोटी आलेल्या मुलाचे गुणदोष आई पाहत नसते उलट त्याचे कल्याण व्हावे हीच तिची इच्छा असते. मुलाविषयी त्या आईचा मोह असतो त्यामुळेच तिचे मुलाकडे मन धाव घेते. गंगेचा प्रवाह कधी मागे फिरतो का, त्याप्रमाणे आईचे मन त्या मुला पासून कधीच मागे फिरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मेघाला वर्षाव करण्याची शक्ती अमर्याद असते, मग माझ्यासारख्या चातकाची तहान आहे ती म्हणजे किती, संत हे म्हणजे मेघाप्रमाणे आहेत तर मी चातकाप्रमाणे आहे.
अभंग क्र.१३४३
युक्ती तंव झाल्या कुंठीत सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥
संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु.॥
जाणपणें नेणें कांहींचि प्रकार । साक्षी तें अंतर अंतरासी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही केलें अभयदान । जेणें समाधान राहिलोसे ॥३॥
अर्थ
संतांविषयी युक्ती आणि दृष्टांत आता कुंठित झाले आहे. आता उरले ते फक्त त्यांच्याविषयी कार्याचा भाग. संतांच्या पुढे मी भक्तिभावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो आहे. आणि त्यांच्यापुढे मी माझे दोन्ही हात जोडून उभा आहे, मी माझ्या शहाणपणाच्या जोरावर परमार्थातील कोणतेही गुढ जाण्यास गेलो तर ते मला कळत नाही याविषयी माझे मनच मला साक्षी आहे. अर्थात संतांची कृपा झाल्याशिवाय काहीही कळत नसते. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही संतजनांनी मला “भिऊ नकोस” असे अभयदान दिले त्यामुळेच मी निवांत राहिलो आहे.
अभंग क्र.१३४४
हा गे आलों कोणी म्हणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥१॥
तुम्ही तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥
भुकेलियां आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥२॥
तुका म्हणे दिली चिंतामणीसाठी । उचित कांचवटी दंडवत ॥३॥
अर्थ
पाण्यात बुडत असलेल्या माणसाला जर म्हटले की ‘थांब मी आलोय’ तर त्याला किती बळ येते. त्याप्रमाणे तुम्ही संतांनी माझा सर्व भार तुमच्या माथ्यावर घेतला आहे व माझ्यासारख्या बाळाच्या मस्तकावर तुमचा अभय हस्त ठेवून “भिऊ नकोस” असे आश्वासन तुम्ही मला दिले आहे. एखाद्या भुकेलेल्या मनुष्याला म्हटले की थांब मी तुला जेवू घालतो तर त्याला किती समाधान मिळते. तुकाराम महाराज म्हणतात की संतांनी माझा सर्व भार त्यांच्या माथी घेतला व त्या बदल्यात मी त्यांना फक्त साष्टांग नमस्कार केला, हे म्हणजे असे झाले की त्यांनी मला चिंतामणी रत्न द्यावा आणि मी त्यांना त्या बदल्यात काचेचा तुकडा द्यावा.
अभंग क्र.१३४५
कैसा तू देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंता डोळीं नारायणा ॥१॥
तेणें लोभें जीव जालासे बराडी । आम्ही ऐशी जोडी कई लाभों ॥ध्रु.॥
असेल तें कैसें दर्शनाचें सुख । अनुभवें श्रीमुख अनुभवितां ॥२॥
तुका म्हणे वाटे देसी आलिंगन । अवस्था ते क्षणक्षणां होते ॥३॥
अर्थ
हे नारायणा त्या पुण्यवंत गोपा बालकांनी तुला त्यांच्या डोळ्याने कसे पाहिले असेल, मी ही तुला पाहावे यासाठी माझा जीव कासावीस होत आहे. तो लाभ आम्हाला कधी होणार काय माहित. तुझ्या दर्शनाचा सुख लाभ कसा आहे आम्हाला काय माहीत असणार, परंतु ज्यांनी हरीच्या श्रीमुखाचा अनुभव घेतला आहे त्यांनाच त्या सुखाचा अनुभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु मला तुझे रूप केव्हा दाखवशील याची मी क्षणाक्षणाला इच्छा करत आहे आणि तु मला आलिंगन केंव्हा देशील याची वाट मी पाहत आहे.
अभंग क्र.१३४६
कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥१॥
चातकाचे परी एकचि निर्धार । लक्षभेदीतीर फिर नेणे ॥ध्रु.॥
सांवळें रूपडें चतुर्भुज मूर्ती । कृष्णनाम चित्तीं संकल्प हा ॥२॥
तुका म्हणे करीं आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगों देऊं ॥३॥
अर्थ
हे नारायणा माझे चित्त तुझ्या दर्शनासाठी एवढे आतुर का केले ते मला सांग? ज्याप्रमाणे मेघाच्या पाण्यावाचून दुसरे पाणी प्यायचे नाही असा निश्चय चातकाचा असतो, ज्याप्रमाणे लक्षभेदी बाण मागे परत फिरायचे नाहीये हे जाणते, त्याप्रमाणे माझे मन, तुझे दर्शन झाल्याशिवाय समाधान पाहणार नाही असा निर्धार माझ्या मनाने केला आहे. जी सावळी रूपडी चतुर्भुज मूर्ती आहे तिला माझ्या डोळ्यांनी पाहावे व त्याचे नाम मी नेहमी घ्यावे असा माझ्या मनाने संकल्प केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या आवडीला तू ठाव दे माझ्या भक्तीभावाला तू भंगु देऊ नको.
अभंग क्र.१३४७
काय माझा पण होईल लटिका । ब्रिदावळी लोकां दाविली ते ॥१॥
खरी करूनियां देई माझी आळी । येऊनि कुरवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥
आणीक म्यां कोणा म्हणवावें हातीं । नये काकुलती दुजियासी ॥२॥
तुका म्हणे मज येथें चि ओळखी । होईन तो सुखी पायांनींच ॥३॥
अर्थ
हे देवा मी तुझी ब्रिदावळी म्हणजे तू पतित-पावन आहेस दीनानाथ आहेस अशी केली आहे व अशी प्रतिज्ञा केली की तू भक्तवत्सल आहेस मग ती खोटी होईल काय? त्यामुळे पांडुरंगा मी तुझी जी ब्रिदावळी सर्व लोकांमध्ये केली आहे ती खरी करून दाखवा आणि माझी प्रतिज्ञा ही खरी कर. आणि माझ्याजवळ येऊन मला प्रेमाने कुरवाळ. मी तुझ्या वाचून कोणाचा आहे आश्रित म्हणून घेणार नाही आणि तुझ्या वाचून कोणालाही मी काकुळतीला येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात फक्त तुलाच मी ओळखत आहे आणि मी तुझ्या पायाच्या सुखाने सुखी होतो.
अभंग क्र.१३४८
तुम्हां आम्हां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥१॥
उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥
नेणपणें आम्ही आळवूं वोरसें । बोलवितों रसें शब्दरत्नें ॥२॥
तुका म्हणे लळे पाळीं वो विठ्ठले । कां हे उरविले भेदाभेद ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही व आम्ही ज्यावेळी एकरूप होऊ त्यावेळी कोणी कोणाचा सन्मान करावा? देवा जोपर्यंत तुमच्यात व माझ्या भेद आहे तोपर्यंत मला तुमचा आदर आहे तुमच्याविषयी चांगुलपणा आहे व त्यामुळेच माझा जीव तुमच्या पायाकडे ओढ घेत आहे. आम्ही अज्ञानी आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रेम शब्दाने आळवित आहोत आणि रसभरीत शब्द रत्नांनी तुमच्याशी गप्पा मारत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात हे विठाई तू आमचा लळा पाळ तू तुमच्यात व आमच्यात भेद का उरु दिला.
अभंग क्र.१३४९
नको माझे मानूं आहाच ते शब्द । कळवळ्याचा वाद करीतसें ॥१॥
कासयानें बळ करूं पायांपाशीं । भाकावी ते दासीं करुणा आह्मीं ॥ध्रु.॥
काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥२॥
लांचावल्यासाठी वचनाची आळी । टकळ्यानें घोळी जवळी मन ॥३॥
वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेले ॥४॥
तुका म्हणे माझी येथेंचि आवडी । श्रीमुखाची जोडी इच्छीतसें ॥५॥
अर्थ
देवा मी तुझ्याशी जे काही बोलत आहे ते माझे शब्द पोकळ मानू नकोस. मी मी तुझ्याशी अतिशय कळवळ्याने बोलत आहे. देव मी कशाच्या बळावर तुमच्या पायाला घट्ट धरू. आम्ही दासांनी फक्त तुझी करूणा भाकावी एवढेच. देवा मला लौकीकाची आवड आहे काय? परंतु मला तुझा अनुभव यावा एवढी इच्छा आहे. देवा मला तुझ्या शी बोलता यावे तुझा अनुभव घ्यावा याची इच्छा आहे व त्यामुळेच माझे मन तुझ्याजवळ घोळत आहे गिरक्या घेत आहे. देवा मला पूर्ण खात्री आहे की तू माझी इच्छा पूर्ण करशील त्यामुळेच मी माझ्या मनाला तुझे वेड लावून घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला या श्रीहरीचे श्रीमुख दिसावे आणि ते पाहण्याची इच्छा झालेली.
अभंग क्र.१३५०
जन्मा आलीयाचा लाभ । पद्मनाभ दरुषणें ॥१॥
म्हणउनि लवलाहे । पाय आहे चिंतीत ॥ध्रु.॥
पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळु माउली ॥२॥
बहु उसंतीत आलो । तया भ्यालो स्थळासी ॥३॥
कोण्या उपाये हे घडे । भव आंगडे सुटकेचे ॥४॥
तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणी विठ्ठले ॥५॥
अर्थ
मनुष्य जन्माला आल्याचा लाभ कोणता असेल तर पद्मनाभा चे दर्शन होणे हाच. म्हणून मी पद्मनाभा च्या पायाचे चिंतन करीत आहे. हा काळ पाठीमागे लागला आहे पण तु माझी कृपाळू माऊली आहेस त्यामुळे तुला माझी सर्व चिंता आहे. मी खूप वेळाने येथे आलो आहे. मी या यमलोकीच्या स्थळा लाभलो आहे. या भवसागरातून माझी सुटका केव्हा होईल हे काही मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तू माझी जननी आहेस, आई आहेस त्यामुळे मला या दुःखातून सोडवण्यास लवकर ये, धावत ये.
अभंग क्र.१३५१
जेणें वाढे अपकीर्ती । सर्वार्थी तें वर्जावें ॥१॥
सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु.॥
होइजेतें शूर त्यागें । वाउगें तें सारावें ॥२॥
तुका म्हणे खोटें वर्म । निंद्यकर्म काळिमा ॥३॥
अर्थ
जेणे अपकीर्ती वाढते त्याचा त्याग करावा. जगाला नेहमी भले पणाने वागणे, खरे वागणे हेच आवडते तर नेहमी खरे वागून, खरे बोलून खरा शूर व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात निंद्य वागणे, खोटे वागणे हेच आपल्या प्रतिमेला काळे फासण्याचे वर्म आहे.
अभंग क्र.१३५२
याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥१॥
परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥ध्रु.॥
जालें तरी काय तंट । आतां चट न संडे ॥२॥
तुका म्हणे चक्रचाळे । वेड बळें लाविलें ॥३॥
अर्थ
मला हरीची गोडी लागली आहे त्यामुळे मला त्याची संगती हवी अशी मनापासून इच्छा आहे. एक क्षण देखील हारी पासून परत यावे किंवा त्याच्यापासून दूर जावे असे मला वाटत नाही. आता हरी बरोबर कितीही भांडणे होवो, तंटा होवो, आता याचा लोकांमध्ये बोभाटा झाला तरी चालेल पण मला हरीच्या संगतीची जी चटक लागली आहे ती काही केल्या सुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात चक्राला एकदा की गती दिली की ती थांबत नाही त्याप्रमाणे देवाने त्याच्या गुणाने आम्हाला वेड लावून टाकले आहे.
अभंग क्र.१३५३
याचा तंव हाचि मोळा । देखिला डोळा उदंड॥१॥
नेदी मग फिरों मागें । अंगा अंग संचरे ॥ध्रु.॥
कां गा याची नेणां खोडी । जीभा जोडी करितसे ॥२॥
पांघरे तें बहु काळें । घोंगडें ही ठायींचें ॥३॥
अंगीं वसेचि ना लाज । न म्हणे भाज कोणाची ॥४॥
सर्वसाक्षी अबोल्यानें । दुश्चिंत कोणें नसावे ॥५॥
तुका म्हणे धरिला हातीं । मग निश्चिंतीं हरीनें ॥६॥
अर्थ
मी पुष्कळ वेळा डोळ्याने पाहिले आहे की हरी हीच एक सवय आहे.जो कोणी याची श्रद्धायुक्त भक्ती करतो त्याला तो संसाराकडे परत मागे फिरून येत नाही आणि त्याच्या अंगांमध्ये संचार करतो. हरीची आणखी एक खोड आहेत ती म्हणजे याचे नाव घेतले कि जिभेला मोठा लाभ होतो. हे तुम्हाला माहीत आहे काय. हा हरी नेहमी काळया रंगाची घोंगडी पांघरतो आणि ती घोंगडी म्हणजे त्याचा कृष्णवर्ण देह आहे. याला कसलीही लाज वाटत नाही आणि समोर कोणाचीतरी बायको आहे याचाही तो विचार करत नाही. हरी अबोला आहे सर्व साक्षी आहे त्यामुळे त्यांच्याविषयी कोणीही उदासीन असू नये व सर्वांनी याचे भजन करावे. तुकाराम महाराज म्हणतात या हरीने एकदा की त्याच्या हाताला भक्तला धरले तर तो भक्त निश्चिंतच होतो.
अभंग क्र.१३५४
प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥१॥
तरी वाटा न वजे कोणी । नारायणीं घरबुडी ॥ध्रु.॥
बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागें लागेना ॥२॥
हो कां नर अथवा नारी । लाहान थोरीं आदर ॥३॥
जालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥४॥
कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥५॥
तुका म्हणे दुसऱ्या भावें । छाया नावें न देखवे ॥६॥
अर्थ
हरीची जगामध्ये अशी कीर्ती आहे की जगात जेवढे नाम,रूप,रंग आहे ते सर्व याचेच आहे. हाच त्यांच्यामध्ये व ते सर्व याच्यामध्ये आहे. नारायणाच्या मागेच जो जातो त्याचे घर बुडते. नारायणाच्या मागे पूर्वी अनेक भक्त गेले आहे त्याचे ध्यान करून ते त्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले, त्यांचा परत मागमूसही लागला नाही. मग ते पुरुष असो अथवा नारी असो लहान असो किंवा मोठे असो एकदा की भक्त लौकीकातून बाजूला निघाला तो भक्त की एकदा हरी च्या स्वरुपात लीन झाला मग त्याची अविद्य समूळ नाहीशी होते. नारायण कसा आहे हे कोणालाच माहीत नाही, कोणत्या दिशेला आहे हेही माहीत नाही, लहान आहे की मोठा आहे हे देखील कोणालाच माहीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर द्वैतरूपाने पाहिले तर छायाही शरीरापेक्षा वेगळे असते.
अभंग क्र.१३५५
न संडावा आतां ऐसा वाटे ठाव । भयासी उपाव रक्षणाचा ॥१॥
म्हणऊनि मनें वळियेलें मन । कारियाकारण चाड नाहीं ॥ध्रु.॥
नाणावी उपाधि करूनियां मूळ । राखतां विटाळ तेंचि व्हावें ॥२॥
तुका म्हणे येथें न वेचे वचन । निजीं निजखूण सांपडली ॥३॥
अर्थ
हरिचरण व रूप आता कधी सोडूच नये असे मला वाटते कारण सर्व भयापासून रक्षण यात ठीकाणी होते. म्हणूनच मी माझे मन हरी कडे वळविले आहे आता मला कार्य करण्याची आवडच राहिली नाही. प्रपंच हा उपाधी मुलुख आहे त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करावे आणि लक्ष दिलेच तर आपणही उपाधी रूप होऊन जाऊ. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळेच मी प्रपंचाविषयी जास्त काही बोलत नाही व बोलूही वाटत नाही कारण मला आत्मसुखाचे वर्म सापडले आहे.
अभंग क्र.१३५६
सत्तेचें भोजन समयी आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी ॥१॥
वर्मेंभ्रम नेला जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग झाला ॥ध्रु.॥
कोथळीस जमा पडिलें संचित । मापल्याचा वित्त नेम झाला ॥२॥
तुका म्हणे धणी ऐसा झालों आतां । करीन ते सत्ता माझी आहे ॥३॥
अर्थ
जर आपल्या सत्तेचे म्हणजे स्वतः चे भोजन असेल तर ते आपल्याला केव्हाही जेव्हा आपल्याला भूक लागेल तेव्हा सेवन करता येते आणि ते भोजन आपण आवडीने सेवन करतो. तसेच मला परमार्थाचे मुख्य वर्म समजले आहे व त्यामुळे संसाराचा भ्रम नाहीसा झाला आहे हृदयस्थ राहणारा जो हरी आहे त्याचा संग मला झाला आहे. हरीच्या कोथळी मध्ये माझे संचित कर्म जमा आहे आता तेवढे प्रारब्ध कर्म नियमा प्रमाणे भोगायचे राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी आता इतका समर्थ झालो आहे की मी जे म्हणेल ते होऊ शकते.
अभंग क्र.१३५७
देईल तें उणें नाहीं । याचे कांहीं पदरीं ॥१॥
पाहिजे तें संचित आतां । येथें सत्ता करावया ॥ध्रु.॥
गुणां ऐसा भरणा भरी । जो जें चारी तें लाभे ॥२॥
तुका म्हणे देवीं देव । फळे भव आपुला ॥३॥
अर्थ
हा देव काहीही देऊ शकेल करण्याच्या पदरात कशाचीही कमतरता नाही. परंतु देवावर येवढी सत्ता करण्यासाठी आपल्याजवळ ही काही पुण्यकर्म असायला हवे. जो मनुष्य गाईला पुष्कळच चारा खाऊ घालतो त्या गुणा प्रमाणे ती गाय त्याला तो जेवढा चारा खाऊ घालेल तेवढे दूध देते. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या ठिकाणी आपला जसा भक्तिभाव असेल त्याप्रमाणे आपल्याला भक्तीचे फळ मिळते.
अभंग क्र.१३५८
तेव्हा होतो भोगाधीन । तुम्हां भिन्न पासूनि ॥१॥
आतां बोलों नये ऐसें । आनारिसें वेगळें ॥ध्रु.॥
सन्मुख जालों स्वामीकडे । भव आंगडे निराळे ॥२॥
चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥३॥
सहज स्थिती आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना ॥४॥
तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥५॥
तुका म्हणे जाणोनि वर्म । कर्माकर्में ठेविलीं ॥६॥
अर्थ
देवा मी ज्यावेळी तुमच्या पासून भिन्न होतो त्यावेळी मी भोगाच्या आधीन होतो. आता मी तुमच्या जवळ आलो आहे मी मागचे काहीच बोलत नाही. आता मी माझ्या स्वामीच्या पांडुरंगाच्या पुढे आलो आहे त्यामुळे मी माझ्या अंगावरील संसाराचे उपाधी रूप कपडे काढून टाकत आहे. मनात जी इच्छा असेल ती चिंतामणी पूर्ण करतो, देवा तुमच्या अंगी अशीच सहजच स्थिती आहे ती प्रसंगानुसार लपविली जरी असली तरीही भक्तांची इच्छेनुसार उघडकिस येतेच. म्हणून मी तुमची कास धरली आहे देवा आणि प्रपंचाचा नाश केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तुमची सर्व वर्म जाणली आहे त्यामुळे सर्व कर्म अकर्म बाजूला ठेवून मी तुम्हाला शरण आलो आहे.
अभंग क्र.१३५९
केला कइवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥
काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥
अबाळीनें जावें निश्चिंतीच्या ठायां । रांडा रोटा वांयां करूं नये ॥२॥
तुका म्हणे बळी देतां तें निधान । भिकेसाठी कोण राज्य देतो ॥३॥
अर्थ
मी भक्ती करण्याचा निर्धार केला आहे तो केवळ संतांच्या आधाराने कारण संतांना जो अनुभव आला आहे तोच अनुभव मला आला आहे. आता मी जीवित्वाची इच्छा कशासाठी धरू आणि तशी इच्छा मी धरलीच तर मी गर्भवास भाग घेण्यास पात्र आहे. भक्ती करताना कितीही मान-अपमान झाला तरीही भक्ती करावी व निश्चित अशा ठिकाणी जावे. नाहीतर उगीचच रांडा सारखे पोट भरून जीवन जगण्याची अपेक्षाच करू नये. तुकाराम महाराज म्हणतात जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर देवाच्या पायावर आपला जीव बळी द्यावा लागतो भीक मागून कोणी राज्य देते का तर नाही युद्ध करूनच राज्य मिळावे लागते.
अभंग क्र.१३६०
संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥
जैसी तैसी असो पुढिलांचें सोई । धरिती हाती पायी आचारिये ॥ध्रु.॥
उपकार नाहीं देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्तीं ॥२॥
तुका म्हणे तरीं सज्जनाची कीर्ती । पुरवावी आर्ती निर्बळांची ॥३॥
अर्थ
संतांच्या संगतीने त्यांच्या म्हणजे संतांच्या पंगतीचा लाभ होतो. परंतु नुसताच पंगतीचा लाभ होतो म्हणून त्यांची संगत करणे साधकाला अशोभनीय गोष्ट आहे. त्याकरिता ब्रम्ह रसाचा अनुभव येणे गरजेचे आहे. जसे असतील तसे पुढे गेलेल्या संतांच्या आधाराने चालावे त्यामुळे संत साधकाच्या हाताला धरून पुढे नेतात. जो खरा परोपकारी असतो त्याला दुसर्याचे दुःख दारिद्र्य पहावत नाही त्याच्या चित्तामध्ये नेहमी दया असते. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे चित्तही तसेच असते ते नेहमी दुर्बळ भक्तांची मदत करतात.
अभंग क्र.१३६१
करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥
मज घेऊनियां आपणांसी द्यावें । साठी जीवें भावें नारायणा ॥ध्रु.॥
उरी नाहीं मग पडदा कां आला । स्वमुखेंचि भला करितां वाद ॥२॥
तुका म्हणे माझें खरें देणें घेणें । तुम्ही साक्षी जाणें अंतरींचें ॥३॥
अर्थ
देवा खूप विचार केला तेव्हा मला एक वर्म सापडले ज्या योगाने समुळ दुःखाचा परिहार होईल, हे देवा, हे नारायणा ते वर्म म्हणजे माझा जीव अभाव तुम्हाला घ्या आणि त्या बदल्यात मला तुमच्यात विलीन करून घ्यावे. देवा तुमच्यात आणि माझ्यात भेद नाही. हा मायेचा पडदा आपल्या दोघांमध्ये अडवा का आला आहे? तुम्हीच तुमच्या मुखाने भगवद्गीतेत अर्जुनाशी संवाद करताना हे सांगितले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझा जीव भाव तुम्हाला अर्पण करणे आणि तुमच्या स्वरूपात मला विलीन करून घेणे हा माझा व्यवहार खरा आहे आणि त्याला साक्षीदार तुम्हीचे अंतरंग व साक्षी तुम्हीच आहात.
अभंग क्र.१३६२
आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥१॥
गाऊं नाचों गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥
याचि जीऊं अभिमानें। सेवाधनें बळकट ॥२॥
तुका म्हणे न सरें मागें । होईन लागें आगळा ॥३॥
अर्थ
आता देहावसन होईपर्यंत हरिनाम, रूप, ध्यानाचे रक्षण करू. मोठ्या गदारोळाने आणि आणि हरिनाम गाऊन आनंदात नाचत व त्याच्याच बळावर या संसाराला जिंकून घेऊ. आणि याच सेवा दानाच्या बळकट अभिमानाने जगू. तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या या निश्चयापासून मागे सरकणार नाही भक्तीच्या जोरावर मी आगळ्यावेगळ्या आढळ अवस्थोला प्राप्त होईल.
अभंग क्र.१३६३
कुळीची हे कुळदेवी । केली ठावी संतांनी ॥१॥
बरवे जाले शरण गेलो । उगवलो संकटी ॥ध्रु.॥
आणिला ही रूपा बळें । करूनि खळें हरीदासीं ॥२॥
तुका म्हणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥३॥
अर्थ
आमच्या कुळातील कुळदेवी संतांनी आम्हाला माहीत करून दिली. बरे झाले मी त्यामुळे देवीला शरण गेलो त्यामुळे माझी सर्व संकटे नाहीशी झाली आहे. मोठ्या भक्तीच्या बळावर या संतांनीं देवीला नावारूपाला आणले आहे. तुकाराम महाराज म्हणतात संत संगतीनेच मी त्या कुळदेवी पुढे नाचु लागलो.
अभंग क्र.१३६४
ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां ॥१॥
मन येथें साह्य जालें । हरीच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥
चुकुर तो गेला काळ । जालें बळ संगाचें ॥२॥
तुका म्हणे धरूं सत्ता । होईल आतां करूं तें ॥३॥
अर्थ
जे विकार परमार्थाला आड येत होते आता त्यांचे बळ नाहीशे झाले आहे. कारण मनच मला परमार्थ करण्यासाठी सहाय्य करत आहे व हरिनामाच्या गुणानुवादाने ते तृप्त झाले आहे. मनाने आता परमार्था विषय चुकारपणा करणारा काळा गेला आहे कारण संतांचे संगती नेत्याला बळ प्राप्त झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या हाती सत्ता आली आहे आता आम्ही करू तेच होईल.
अभंग क्र.१३६५
देवासी तो पुरे एकभाव गांठी । तोचि त्याचे मिठी देईल पायीं ॥१॥
पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥
कांहीं नेघें शिरी निमित्ताचा भार । न लगे उत्तर वेचावेंचि ॥२॥
तुका म्हणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटो येत ॥३॥
अर्थ
देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकनिष्ठ भक्तिभाव असणे हे पुष्कळ आहे आणि त्यानेच देवाच्या पायाला मिठी देणे शक्य होईल. मी माझ्या देहापासून वेगळा होऊन या जगाला कौतुकाने पाहत आहे. मी माझ्या शरीरावर कोणत्याही निमित्त चा भार घेणार नाही आणि त्याविषयी कोणी काही विचारले तर मी काहीच उत्तर देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात एकदा कि देवाची आणि जीवाची गाठ झाली कि मग ती काही केल्या सुटणार नाही.
अभंग क्र.१३६६
लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥१॥
ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठांयींचिये ठांयीं हालों नये ॥ध्रु.॥
डहुळिल्या मनें वितुळले रूप । नांवऐसें पाप उपाधीते ॥२॥
तुका म्हणे देव प्रीतीनें कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥३॥
अर्थ
काही लोक लौकिका साठी परमार्थाचा पसारा घालतात परंतु देवाला त्या गोष्टी आवडत नाही. देवाच्या चरणावर एकदा की मस्तक ठेवले की ते पुन्हा उचलू नये त्याच ठिकाणी एकनिष्ठ भक्तीभाव करून ठेवावा. देवाच्या ठिकाणी आनंदी राहावे. मन चंचल आहे आणि ते जर उपाधीत गुंतले तर मनातील हरिरूप प्रतिबिंब वितळले जाते व त्याचेच नाव पाप आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाविषयी एकनिष्ठ भक्ती भाव ठेवून जो कोणी वागेल त्याला देव त्याला प्रेमाने मिठी मारेल व त्याला जवळ घेईल.
अभंग क्र.१३६७
नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥१॥
ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरलें ॥ध्रु.॥
उतावीळ असे शरणागत काजे । धांवा केशीराजे आइकतां ॥२॥
तुका म्हणे हित चिंतन भरवंसा । नेदी गर्भवासा येऊं देऊ ॥३॥
अर्थ
देवावर जो कोणी आपला सर्व भार घालील त्याविषयी देव उदास राहत नाही. त्याचे सर्व इच्छा मनापासून देव पूर्ण करतो. एखाद्या कोण्या भक्ताची देवाने उपेक्षा केली असा मला एकाचाही अनुभव आलेला नाही याउलट जो कोणी खरा भक्तिभाव देवाच्या ठिकाणी ठेवतो त्याचा उद्धार हा देव करतो. केशव राजाला भक्ताने धाव घातली की तो लगेच धावत येतो आणि भक्ताचे काम करण्यासाठी उतावीळ होतो. तुकाराम महाराज म्हणतात देवाला भक्तांच्या हिताची चिंता आहे आणि देव भक्तांना पुन्हा पुन्हा गर्भ वासाला येऊ देत नाही याविषयी मला भरवसा आहे.
अभंग क्र.१३६८
उपजों मरों हे तों आमुची मिरासी । हें तूं निवारिसी तरी थोर ॥१॥
उभा राहीं करीं खरा खोटा वाद । आम्ही जालों निंद लंडपणें ॥ध्रु.॥
उभयतां आहे करणें समान । तुम्हां ऐसा म्हणें मी ही देवा ॥२॥
तुका म्हणे हातीं सांपडलें वर्म । अवघाची भ्रम फेडिन आतां ॥३॥
अर्थ
देवा जन्माला यावे आणि मरावे हीच आमची वतनदारी आहे. याचे निवारण तू केलेस तर तू थोर आहे असे मी समजेन. देवा तुला याविषयी वाद करायचा असेल तर माझ्या समोर ये आणि काय असेल ते खरा खोटा निकाल लाव. आम्ही अगोदरच निंद्य ठरलो आहोत. देवा आपण दोघेही समान आहोत त्यामुळेच मी म्हणत असतो, मी ही तुझ्या सारखाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझ्यासारखाच आहे याचे वर्म माझ्या हाती सापडले आहे त्यामुळे मी आता सर्व भ्रम नाहीसा करून टाकणार आहे.
अभंग क्र.१३६९
मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥१॥
मागिलां पुढिलां एकी सरोवरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥
आन दिसे परी मरण चि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥२॥
तुका म्हणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥३॥
अर्थ
ज्यांचे नवरे मेले आहे त्या स्त्रिया लेकरू व्हावे अशी इच्छा करतात. त्यांना त्याविषयी मोह धरावा याची त्यांना लाज कशी वाटत नाही. पती जिवंत असताना केलेला व्यवहार, गेल्यानंतर केलेला व्यवहार जर सारखाचं होऊ लागला तर त्या स्त्रियांचे वागणे म्हणजे काळाच्या पेटीवर बसून काळाच्या खांद्यावर जाण्यासारखे कृत्य आहे. उंदीर जसा आपले घर समजून बिळात शिरतो, पण त्यात त्याचे त्यात खरे मरण असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळी विषयापासून मन परत येते त्याच वेळेस आत्मज्योति आपल्याला दिसून येते.
अभंग क्र.१३७०
निष्ठुर मी जालों अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल ॥१॥
सांडियेली तुम्ही गोत परिसोय । फोडविली डोय कर्मा हातीं ॥ध्रु.॥
सांपडूनि संदी केली जीवेंसाठी । घ्यावयासि तुटी कारण हें ॥२॥
तुका म्हणे तुज काय म्हणों उणें । नाहीं अभिमानें चाड देवा ॥३॥
अर्थ
मी अतिगुण, अतिवादी या गुणांमुळे निष्ठुर झालो आहे हे नारायणाला काही समजत नाही काय? नारायण मुळे मी सर्व गोत्रजांसी संबंध तोडून टाकला आणि कर्माच्या हाताने मी माझे डोके फोडले. देवा तुम्ही मला या संसारात जन्माला घालून या देहाला “मी” असे म्हणायला लावले आणि त्यामुळे संसाराला माझा जीव मी अर्पण केला व त्यामुळे अनेक दुःख मी भोगु लागलो आहे. त्याचा अर्थ तुम्ही माझी उपेक्षा केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात पण देवा यात तुझा तरी काय दोष आहे म्हणा, मी तर खरा अभिमान आहे आणि ज्याच्या अंगी अभिमान असतो त्याची आवड तुला नसते देवा.
अभंग क्र.१३७१
माझें माझ्या हाता आलें । आतां भलें सकळ ॥१॥
कशासाठी विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥ध्रु.॥
जालीं तया दुःखें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥२॥
तुका म्हणे शुद्धकुळ । तेथें मळ कशाचा ॥३॥
अर्थ
माझे आत्मस्वरूप माझ्या हाती आले त्यामुळे सर्व काही भले झाले. आता मी विषमतेला कशासाठी थारा देऊ कारण त्याने अंतकरण विटाळत असते. पूर्वी झालेल्या दुःखाचा आत्मज्ञानामुळे विसर पडला त्यामुळे मागील दुःखाची मनात आठवण न झालेलीच चांगली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आत्मज्ञानामुळे माझे कुळ शुद्ध झाले मग तेथे कशाचा मळ राहिला आहे?
अभंग क्र.१३७२
समर्थपणें हे करा संपादणी । नसतेंचि मनीं धरिल्याची ॥१॥
दुसऱ्याचें येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥
खोटियाचें खरें खरियाचें खोटें । मानलें गोमटें तुम्हांसी तें ॥२॥
तुका म्हणे तुम्हां सवें करितां वाद । होईजे तें निंद्य जनीं देवा ॥३॥
अर्थ
देवा आम्हा भक्तांचा उद्धार तुम्हाला करायचा नसेल तर निदान आमच्यासाठी घेतलेल्या सोंगाची संपादनी तरी कर. तुझ्या भक्तांचा उद्धार दुसऱ्या कोणालाही करता येणार नाही ते त्यांना जमणारही नाही त्यामुळे मी तुझ्या पायाकडे डोळे लावून एक सारखा पाहत आहे. खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणे हे तुम्हाला चांगले जमते. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्याशी मी वाद करत बसणार नाही कारण तुमच्याशी जो कोणी वाद करतो तो लोकांमध्ये नींद्य ठरतो.
अभंग क्र.१३७३
तुम्हां आम्हांसवे न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळो आतां ॥१॥
किती म्हणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥
बोलिल्याची आता हेचि परचित । भीड भार थीत उडवीलीं ॥२॥
तुका म्हणे आली रोकडी प्रचिती । झांकणें तें किती कोठें देवा ॥३॥
अर्थ
हे जगजेठी आता यापुढे तुमची व माझी गाठ पडू नये कारण तुम्ही कसे आहात ते मला चांगलेच समजले आहे. एखाद्या वाईट गोष्टीला किती वेळ वाईट म्हणावे, एखाद्या गोष्टीचा वीट आला असेल तर त्याला स्पर्श देखील करू नये. देवा मी तुमच्याविषयी वाईट बोलतोय कारण त्याविषयी मला अनुभव आला आहे आणि त्याच कारणामुळे मी तुमच्याशी कोणतीही भीडभाड ठेवली नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या वाईट वागणुकीची मला आता चांगलीच अनुभूती आली आहे आणि तू तुझे दुर्गुण कितीदा आणि कोठे झाकून ठेवणार आहे?
अभंग क्र.१३७४
सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी ॥१॥
परि या कृपेच्या वोरसे । कुढावया चेचि पिसे ॥ध्रु.॥
अंगे सर्वोत्तम । अवघा चि पूर्णकाम ॥२॥
तुका म्हणे दाता । तरि हा जीव दान देता ॥३॥
अर्थ
हे हरी तू सर्वसत्ताधारी आहेस तरी तू असे का झालास? देवाने प्रेमपान्हा सोडण्याऐवजी नुसताच कुढत बसलेला आहे. हा देव अंगाने सर्वोत्तम आहे, सर्व काम आहे, आत्मतृप्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात जर हा दाता असता तरी आम्हाला जीवदान दिले असते.
अभंग क्र.१३७५
कोणापाशीं द्यावें माप । आपे आप राहिलें ॥१॥
कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥ध्रु.॥
एकें दाखविले दाहा । फांटा पाहा पुसून ॥२॥
तुका म्हणे सरलें वोझें । आतां माझें सकळ ॥३॥
अर्थ
आता कोणाकडे संचित कर्माचा हिशोब द्यावा कारण सर्वकाही आपोआप क्षीण झालेले दिसते आहे. आता कशासाठी खटाटोप करायचा दूर काय आणि जवळ ते काय? एकाच्या आकडे पुढे शून्य दाखविला तर दहाचा आकडा तयार होतो आणि एकाच्या आकड्या खालचा फाटा पुसला की दोन्ही शून्य होते. तुकाराम महाराज म्हणतात आता त्याचप्रमाणे माझे अहंमतेचे ओझे संपलेले आहे म्हणजे मी माझ्या देहाचा देहभाव नाहीसा केलेला आहे.
अभंग क्र.१३७६
नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें ॥१॥
आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयात ॥ध्रु.॥
कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपणा ॥२॥
तुका म्हणे कल्प जाला । अस्त गेला उदय ॥३॥
अर्थ
महाप्रलय झाला की सर्व आकाश जलमय दिसते पृथ्वी सकट पृथ्वीवरील सर्व जलाशयच होते. जिकडेतिकडे पाणीच असते आता यापुढे कोणत्याही पाण्याच्या हालचाली होतील काय? पाण्याच्या लाटा त्याच्या पोटात मिसळणार तिथे नद्या ओढे याचे पाणी कसे मिसळणार कारण सर्व पाणी एक झालेले असते आणि पाण्याने आपण होऊन आपल्यालाच कोंडून टाकलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की कल्पांत झाला की चंद्र सूर्य यांचा उदय अस्त देखील नाहीसा होतो तात्पर्य एकदा की आत्मज्ञान झाले की सर्व भेद हरवून जातात.
अभंग क्र.१३७७
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥१॥
कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥
वाहिले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरें । करुणाकरें रक्षीलें ॥३॥
अर्थ
राजा ज्या प्रकारचे नाणी तयार करतो ते पैसे म्हणून व्यवहारात चलनात येतात. एवढेच काय तर चमड्यावर जरी राजाने मुद्रा छापली तर ते देखील पैसे म्हणून चालतात. राज्याची सत्ता सर्वांवर असते त्यामुळे त्याचा अव्हेर कोणी करू शकतो काय? राजाच्या लाडक्या कुत्र्याला जरी राजाने खांद्यावर वागविले किंवा सिंहासनावर बसविले तर त्या कुत्र्याची देखील सत्ता चालते. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे करुणासागर विश्वंभराने माझे रक्षण केले आता त्यामुळे त्याची माझ्यावर कृपा आहे व या कारणामुळे माझी सत्ता सर्व जगावर चालते.
अभंग क्र.१३७८
आम्ही देव तुम्ही देव । मध्यें भेव अधीक ॥१॥
कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ध्रु.॥
भेडसाविलें हाके नादें । वोळखी भेदें मोडिली ॥२॥
तुका म्हणे उभा राहे । मागें पाहे परतोनि ॥३॥
अर्थ
लोकांनो तुम्ही आम्ही देव आहोत परंतु मध्ये संसाराचे भय निर्माण झाल्यामुळे जीवच राहिलो आहोत. निर्धारवंत संतांच्या मागे मागे तुम्ही धाव घ्या कारण ते जेथे जेथे असतात तेथे विठ्ठल त्यांच्या मागेमागे असतो. काळ आपल्याला आरोळी देऊन हाक मारत आहे आणि आपण भयभीत होत आहोत कारण आपण आपली ओळख विसरलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात अरे जीवा तू थोडा शांत उभा राहा आणि उपाधी पासून बाजूला हो मागे फिरून पहा मग तुला लक्षात येईल की तू जीव नसून ब्रम्ह आहेस.
अभंग क्र.१३७९
हीन शुर बुद्धीपासीं । आकृतीसी भेद नाहीं ॥१॥
एक दांडी एक खांदी । पदीं पदीं भोगणें ॥ध्रु.॥
एकाऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती ॥२॥
तुका म्हणे भूमी खंडे । पीक दंडे जेथें तें ॥३॥
अर्थ
हा हीन, हा शूर हा भेद बुद्धी पाशी आहे पण मूळ आकृतीला भेद नाही. एक मनुष्य पालखीत असतो तर त्याच पालखीच्या दांड्याला काही मनुष्य आपल्या खांद्यावर वाहत असतात या प्रकारे ते सर्व माणसे पदोपदी वेगवेगळे भिन्नभिन्न भोग भोगत असतात. जगामध्ये एकासारखे एक असे काहीच नाही परंतु कार्य, प्रकृती मात्र भिन्न भिन्न आहे. तुकाराम महाराज म्हणतात जगात पृथ्वी सर्वत्र एक सारखिच आहे असे वाटते परंतु प्रत्येक ठिकाणी पीक वेगवेगळे प्रमाणामध्ये येते म्हणजे काही ठिकाणी जास्त येते तर काही ठिकाणी कमी यावरून असे सिद्ध होते की भूमीतही भेद आहे.
अभंग क्र.१३८०
काय बोलों सांगा । याउपरी पांडुरंगा ॥१॥
कांहीं आधारावांचून । पुढें न चले वचन ॥ध्रु.॥
वाढे ऐसा रस । कांहीं करावा सौरस ॥२॥
भक्तीभाग्यसीमा । द्यावा जोडोनियां प्रेमा ॥३॥
कोरड्या उत्तरीं । नका गौरवूं वैखरी ॥४॥
करी विज्ञापना । तुका प्रसादाची दाना ॥५॥
अर्थ
हे पांडुरंगा यानंतर आता मी कोणत्या गोष्टीवर प्रतिपादन करू ते तुम्ही सांगा. देवा तुमच्या आणि वेदाच्या आधारा वाचून मला पुढे काही प्रतिपादन करता येणार नाही. त्यामुळे देवा आता माझ्या वचनांमध्ये रसाळपणा वाढेल असे तुम्ही करा. देवा मी केलेल्या काव्यरूपी अभंगांमध्ये भक्ती व भाग्य अलोट प्रमाणात वाढेल असे तुम्ही करा व त्यात तुमचे प्रेम द्यावे. माझ्या वाणीला फक्त कोरड्या शब्दाने गौरवु नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा नेहमी कृपा प्रसादाची दान तुम्ही मला द्या अशी विनंती मी तुम्हाला करत आहे.
अभंग क्र.१३८१
आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुद्धि तेणें न्यायें ॥१॥
म्हणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ध्रु.॥
विषासाठी सर्पा भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥२॥
तुका म्हणे काचें राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥३॥
अर्थ
उगवलेले मोड जसे पाण्यावाचून वाळून गेल्यावर व्यर्थ ठरते त्या न्यायाने ज्याच्या अंगी धीर नाही त्याची बुद्धी व्यर्थ ठरते. म्हणून त्यामुळे इतर कोणाची संगतीन न करता संतांचे संगती करावी. जर आपण दुष्टांची संगती केली तर आपले चित्त मलीन होते. सर्पाच्या पोटी विष असते त्यामुळे सर्व लोक त्याला घाबरतात ही गोष्ट तर सर्वच लोक जाणतात. तुकाराम महाराज म्हणतात जे कच्चे लाकूड आहे ते कामी येत नाही म्हणजेच ज्याचा त्याचा अवगुन ज्याला त्याला बाधक ठरतो.
अभंग क्र.१३८२
क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥१॥
येई वो येई वो येई लवलाहीं । आलिंगुनि बाहीं क्षेम देई ॥ध्रु.॥
उताविळ मन पंथ अवलोकी । आठवती चुकी काय जाली ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडीं वेगी ॥३॥
अर्थ
देवा तुझ्या भेटी करता माझा जीव क्षणाक्षणाला खंत करत आहे. आणि माझ्या चित्तामध्ये मी तुझे पाय आठवीत आहे. त्यामुळे देवा तू ये, तू ये, तू लवकर ये आणि तुझे दोन्ही बाहू पसरून मला आलिंगन दे. देवा माझे मन तुझी आठवण करते आणि तुझ्या भेटी करता ते उताविळ झाले आहे. ज्या अर्थी तू मला लवकर भेट देत नाही त्याअर्थी माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे आणि तेच मी माझ्या चित्तात आठवीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्या जीवाचे जीवण आहे त्यामुळे तू माझा माझ्या भेटी करता लवकर उडी घाल.
अभंग क्र.१३८३
आळी करावी ते कळतें बाळका । बुझवावें हें कां नेणां तुम्ही ॥१॥
निवाड तो तेथें असे पायांपाशीं । तुम्हां आम्हांविशीं एकेठायीं ॥ध्रु.॥
आणीक तों आम्ही न देखोंसें जालें । जाणावें शिणलें भागलेंसें ॥२॥
तुका म्हणे तुम्हां लागतें सांगावें । अंतरींचें ठावें काय नाहीं ॥३॥
अर्थ
हट्ट करणे हे हट्टी बालकाचे काम आहे तुम्ही आमची आई आहात आणि आम्ही तुमचे हट्ट करणारे लेकरे आहोत त्यामुळे देवा आमचे हट्ट पूर्ण करावे हे तुम्हाला समजत नाही काय देवा? तुमच्या आमच्या संबंधाविषयी जो काही निकाल लागणार आहे तो तुमच्या पाया जवळच लागणार आहे. देवा तुमच्या वाचून इतर कोणालाही आम्ही पाहत नाही आणि कोणाला पहावेसे वाटत देखील नाही. तुमचे हे बालक भागले आहे शिणले आहे हे तुम्ही का जाणून घेत नाही? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला हे सर्व सांगावे लागेल काय तुम्हाला आमच्या अंतःकरणातील भक्तीभाव माहित नाही काय?
अभंग क्र.१३८४
तांतडीनें आम्हां धीरचि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं ॥१॥
नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा एक हेवा तुमचा माझा ॥ध्रु.॥
वोरसाचा हेवा सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगीं धंदा ॥२॥
तुका म्हणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥३॥
अर्थ
देवा तुमच्या भेटी करता आम्ही खूप तातडी करीत आहोत. आता आम्हाला धीर निघत नाही त्यामुळे तू आता आमचे लाड लवकर पुरव. देवा तुमच्या व माझ्या भेटीविषयी सावकाश पणा तुम्ही धरू नका आणि तुमच्या व माझ्या एकरूप पाणाविषयी तुम्ही मनामध्ये हेवा धरा. माझ्या प्रेमाचा सोस तुम्ही सांभाळा आणि आपल्यात भेद राहणार नाही असे करा. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला इतर कोणत्याही गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवून ठेवू नका कारण मी आनंदाच्या जेवणाची वेळ राखून ठेवले आहे.
अभंग क्र.१३८६
वचनें चि व्हावें आपण उदार । होईल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥
सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥
वंचिलिया काय येतसे उपेगा । शरीर हें नरकाचें चि आळें ॥२॥
तुका म्हणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥३॥
अर्थ
आपण आपल्या वाणीने विश्वंभरा चे नाम घेण्याविषयी उदार व्हावे. त्यामुळे विश्वंभर आपल्यावर नक्कीच संतुष्ट होईल. आपले संकल्प शुद्ध आणि सत्य असेल तर त्याचे फळ सत्य मिळते आणि जे शुद्ध आणि सत्य आहे ते केव्हाही नाश पावत नाही. आपले शरीर म्हणजे नरकाचे आळेच आहे आणि ते हरीच्या सेवेत लावले नाही तर त्याचा काय उपयोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात याकरिताच मी तुम्हाला सांगत आहे की जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमचा देह तुम्ही हरिभजना कडे लावा जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला चौर्यांशी लक्ष योनी च्या फेऱ्यात गुंतावे लागेल.
अभंग क्र.१३८७
उखतें आयुष्य जायांचें कलेवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥१॥
कोणासी हा लागे पुसणे विचार । मनचि सादर करूं आतां ॥ध्रु.॥
उत्पत्ति प्रळय पडिलें दळण । पाकाचें भोजन बीज वाढे ॥२॥
तुका म्हणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगी ॥३॥
अर्थ
आपले संपूर्ण आयुष्य आणि हे शरीर जाणारे आहे आणि विषयांचे खेळ हे गारुड्याच्या खेळाप्रमाणे थोडा वेळच आहेत. हा विचार कोणालाही विचारण्याची गरज नाही आता आपणच आपल्या मनाने हा विचार करू. उत्पन्न झाला की मृत्यु आणि पुन्हा जन्म हे दळण चालू राहते. एकदा की मिष्टान्न खाल्ले की पुन्हा तसे अन्न खाण्याची वासना वाढते. तुकाराम महाराज म्हणतात आता ज्या ठिकाणी आपल्याला अभय आहे त्या ठिकाणी आपण जाऊ व देवराज पांडुरंगाला आपण वेगाने शरण जाऊ.
अभंग क्र.१३८८
बोलावे म्हणून बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळा ॥१॥
भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी ॥ध्रु.॥
मुखीं घेतां घांस पळवितीं तोंड । अंगीचिया भांड असुखाने ॥२॥
तुका म्हणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥३॥
अर्थ
गंगेचा प्रवाह वाहत असतो त्यामध्ये स्नान करण्याचा कोणी उपभोग घेऊ अथवा न घेऊ ते वाहा तच असते. त्याप्रमाणे हरिभक्ती का करावे हे सांगणे गरजेचे आहे म्हणून मी ते सांगत आहे. जे लोक खरे भाग्यवान आहेत तेच मी सांगितलेल्या उपदेशाचे अनुकरण करतील आणि येथे सर्वच लोक उपदेशाचे खरे अधिकारी आहेत असेही नाही. जे लोक अभागी आहेत त्यांच्या तोंडात हरी भक्तिचा गोड घास घालण्याचा प्रयत्न केला तरी ते तोंड मिटून पळण्याचा प्रयत्न करतात. तुकाराम महाराज म्हणतात मी मात्र माझ्या आवडीप्रमाणे देवाची पूजाअर्चा करतो आहे.
अभंग क्र.१३८९
लटिक्याचे वाणी वचनाचा संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥१॥
अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥ध्रु.॥
अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥२॥
तुका म्हणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडतसे ॥३॥
अर्थ
जे माणसे लबाड ढोंगी असतात त्यांचे बोलणे ही कोणाला गोड वाटत नाही व त्यांची मते देखील कोणाला मान्य होत नाही. हा त्याचा अन्याय किंवा व्यर्थ चाळा नसतो तर त्याच्या आई-वडिलांनी त्याचा गर्भ धारणेसाठी योग्य वेळ पाहीली नसते. त्या मनुष्याच्या अंगी प्रबळ अवगुण असतात व अशा मनुष्याचे मन कोठेही काम करण्यासाठी तातडी करत असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या वागण्यात आणि बोलण्यात ताळमेळ नसतो त्यामुळेच त्याच्या ठिकाणी दोष लागतो आणि त्याची फजिती होते.
अभंग क्र.१३९०
नये स्तवूं काचें होतें क्रियानष्ट । फुंदाचे ते कष्ट भंगा मूळ ॥१॥
नाहीं परमार्थ साधत लौकिकें । धरुन होतों फिकें अंगा आलें ॥ध्रु.॥
पारखिया पुढें नये घालूं तोंड । तुटी लाभा खंड होतो माना ॥२॥
तुका म्हणे तरी मिरवतें परवडी । कामावल्या गोडी अविनाश ॥३॥
अर्थ
अयोग्य माणसाची उगीच खोटी स्तुती करू नये म्हणजेच स्वतःच्या भौतिक लाभासाठी आणि हितासाठी कोणालाही खोटे स्तवू नये अशाने स्वतःच्या पदरी असलेल्या पुण्यकर्माचा देखील नाश होतो व असे करण्याने फक्त फुकटचे कष्ट पदरी पडतात आणि आपले मूळ कर्म देखील भंग पावते. तसेच ह्यातून जी माणसे लौकिक आणि नामरूप कमावतात अशा ही माणसाला खरी परमार्थात गती लाभत नाही किंबहुना ते साध्यही होत नाही किंबहुना जे आजपर्यंत अंगी आले आहे ते देखील फिके पडते.म्हणजेच जे आज पर्यंत कमावले आहे ते देखील नष्ट होते. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती पारखी असेल तर तिच्या पुढे पुढे करू नये, आपले ज्ञान सांगू नये किंबहुना ते पाघळू नये कारण अशाने फक्त लाभत तूट होते आणि मानात खंड पडतो.म्हणजेच ज्याला भक्ती अर्पण करायची तो सर्वज्ञ आहे, तो खरी भक्ती किंवा त्यातला फोलपणा जाणतो, त्यामुळे इतरांना कितीही भ्रमात ठेवले तरी पारखी असलेल्या नारायणाला ते ठकवू शकत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात तरी देखील अशी माणसे स्वतःचे नुकसान झाले तरी किंवा कितीही परवड झाली तरी ते देखील इतरांपुढे मिरवतात परंतु त्यांना हे नाही कळत की जर खरच परमार्थ साधला तर त्या कमावलेल्याची गोडी काही औरच असते आणि ते सुख अविनाशी असते, अभंग असते.
अभंग क्र.१३९१
कोण्या काळें येईल मना । नारायणा तुमचिया ॥१॥
माझा करणें अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥ध्रु.॥
लागलीये तळमळ चित्ता । तरी दुश्चिता संसारी ॥२॥
मुखाची च पाहें वास । मागें दास सांभाळीं ॥३॥
इच्छा पूर्ण जाल्याविण । कैसा सीण वारेल ॥४॥
लाहो काया मनें वाचा । दिवसाच्या भेटीचा ॥५॥
कंटाळा तो न धरावा । तुम्ही देवा दासांचा ॥६॥
तुका म्हणे माझे वेळे । न कळे कां हें उफराटें ॥७॥
अर्थ
हे नारायणा तुमच्या मनात असे केव्हा येईल की माझा अंगिकार करावा माझा सर्व भार फेडून टाकावा. माझ्या मनाला हीच एक तळमळ लागलेली आहे त्यामुळे संसाराविषयी दूश्चित मी झालेलो आहे. मी तुमच्या श्री मुखाचे दर्शन केव्हा होईल याची वाट पाहत आहे आणि तुमच्या दासांचा तुम्ही सांभाळ करावा एवढीच माझी मागणी आहे. माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याशिवाय माझा शिण कसा हलका होणार? तुमच्या भेटीचा दिवस केव्हा येणार याची मी माझ्या काया वाचा मनाने आवड धरली आहे देवा तुम्ही या दासाचा कंटाळा करू नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा अंबरीशराजा आणि प्रल्हादाच्या वेळी तुम्ही तुमची वागणूक एकदमच सरळ केली होती पण मला एक कळत नाही की माझ्या वेळी तुम्ही तुमची वागणूक अशी उलटी का केली आहे, अशी तुमची वागणूक का झाली.
अभंग क्र.१३९२
घ्यावी तरी घ्यावी उदंड चि सेवा । द्यावें तरी देवा उदंड चि ॥१॥
ऐसीं कैंचीं आम्ही पुरतीं भांडवलें । आल्या करीं बोलें समाधान ॥ध्रु.॥
व्हावे तरी व्हावे बहुतचि दुरी । आलिया अंतरी वसवावे ॥२॥
तुका म्हणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ॠणी आवडीचा ॥३॥
अर्थ
देवा तू तुझ्या भक्तांकडून भरपूर सेवा करून घे आणि भक्तांनाही तू भरपूर द्यावे. आमच्याकडे असे कोणते पुण्याचे भांडवल आहे की तू आम्ही आल्यावर आमचे गोड बोलून समाधान करतोस. देवा तू दूर गेला की फार दूर जातो नाहीतर जवळ आल्यानंतर एकदम अंतकरणात येऊन राहतोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याशी सख्यत्व करणे फारसे अवघड नाही तुझ्याशी अनन्य भक्तीने ज प्रेम करतो त्यांचा तू स्वतः ऋणी होतोस.
अभंग क्र.१३९३
काय करूं जीव होतो कासावीस । कोंडिले दिस गमेचिना ॥१॥
पडिले हे दिसे ब्रम्हांडचि वोस । दाटोनि उछ्ववास राहातसे ॥२॥
तुका म्हणे अगा सर्वजाणतिया । विश्वंभरे काया निववावी ॥३॥
अर्थ
देवा मी आता काय करू मला फारच कासावीस झाल्यासारखे होत आहे मला कोंडल्यासारखे होत आहे आणि दिवस तर जाईन असे झाले आहे. सर्व ब्रह्मांड ओस पडल्यासारखे दिसत आहे आणि माझा दम कोंडल्यासारखा दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे विश्वंभरा तू सर्व जाणता आहेस त्यामुळे तू ये मला भेट दे आणि माझ्या शरीराला शांत कर.
अभंग क्र.१३९४
सुकलियां कोंभा अत्यंत जळधर । तेणीची प्रकार न्याय असे ॥१॥
न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मनत्वरे लागीं ॥२॥
तुका म्हणे भूक न साहावे बाळा । जीवनांची कळा ओढलीसे ॥३॥
अर्थ
ज्याप्रमाणे सुकलेल्या झाडाला कोंभाला पावसाच्या पाण्याची अत्यंत गरज असते त्याप्रमाणे देवा मला तुझ्या भेटीची अत्यंत गरज आहे. तेव्हा माझ्या भेटीला येण्याकरिता तू पायी येऊ नकोस, गरुडावर ही येऊ नकोस कारण त्याने विलंब होईल तू मनाचेही मन हो आणि लवकर ये. तुकाराम महाराज म्हणतात लहान मुलाला भूक सहन होत नाही अन्नासाठी त्याचा जीव कासावीस होतो त्याप्रमाणे माझा जीवही तुझ्या भेटीसाठी कासावीस होतो आहे देवा.
अभंग क्र.१३९५
शृगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥१॥
न घलावा मधीं कामाचा विलंब । तुम्ही तों स्वयंभ करुणामूर्ती ॥२॥
तुका म्हणे केलें सन्मुख वदन । देखतां चरण पोटाळीन ॥३॥
अर्थ
देवा माझी बोलणे म्हणजे शुंगरिक नाही माझी अवस्था तशी झाली आहे त्यामुळे मी तुला आळवित आहे. देवा तुम्ही स्वयंभू करूणेची मूर्ती आहात. त्यामुळे माझ्या भेटीसाठी मध्ये कोणताही अडथळा करू नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमची वाट पाहत आहे तुमच्या भेटीच्या दिशेने बसलो, आता मला तुमची चरण दिसले की ते मी माझ्या हृदयाशी कवटीळीण.
अभंग क्र.१३९६
तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥१॥
तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥
तुका म्हणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥३॥
अर्थ
हे पांडुरंगे तू माझी आई, सावली आहेस त्यामुळे मी तुझी वाट पाहत आहे. हे पांडुरंगा तूच मला वडील धाकटा जिवलगा सोयरा सज्जन सर्वकाही आहेस. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा जीव तुझ्या पायापाशी आहे आणि तुझ्या वाचून मला सर्व दिशा ओस वाटतात.
अभंग क्र.१३९७
कराल ते करा । हाते आपुल्या दातारा ॥१॥
बळियाची आम्ही बाळें । असो निर्भर या सळे ॥ध्रु.॥
आतां कोठे काळ । मध्ये रिघेल ओंगळा ॥२॥
तुका म्हणे पंढरीराया । थापटितो ठोक बाह्या ॥३॥
अर्थ
हे पांडुरंग दातारा तुला माझे काय करायचे असेल ते तुझ्या हाताने कर. कारण आम्ही बलवंतांची लेकरे आहोत आणि त्याच्या आधाराने आम्ही राहतो त्यामुळे आम्ही कशाची आम्हाला कशाची भीती आहे, आता तो काळ आमचे काय करील व आमच्या मध्ये तो कशाला घुसेल? तुकाराम महाराज म्हणतात काळाशी लढण्याकरता मी माझे दंड थोपटून उभा आहे.
अभंग क्र.१३९८
डोळां भरिले रूप । चित्ती पायांपचा संकल्प ॥१॥
अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥
जिव्हा केली माप । रासीं हरीनाम अमुप ॥२॥
भरूनियां भाग । तुका बैसला पांडुरंग ॥३॥
अर्थ
डोळ्यांमध्ये देवाचे स्वरूप भरले आहे आणि चित्तात त्याच्या पायाचाच संकल्प केलेला आहे. मी माझ्या इंद्रियांची वाटणी देवा संबंधितच केलेली आहे आणि माझे हरिकीर्तन विषयी प्रेम जडलेले आहे. असंख्य हरिनाम राशी मोजण्याकरिता मी माझ्या जीवेचे माप तयार केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी पांडुरंग हा माझा विभाग आहे त्यानाच माझ्या मध्ये भरून हरिरूप झालो आहे.
अभंग क्र.१३९९
आतां आहे नाही । न कळे आळीकरा कांही ॥१॥
देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा ॥ध्रु.॥
नेणे भाग सीण । दुजें कोणी तुम्हांविण ॥२॥
आतां नव्हे दुरी । तुका पायी मिठी मारी ॥३॥
अर्थ
हट्टी मुलांना आपण जे मागत आहोत ते आपल्या आई-वडिलांकडे आहे किंवा नाही याच्याशी काहीच कर्तव्य नसते. तरीही त्या मुलांचा आई-वडील त्याचा हट्ट पूर्ण करतातच त्याप्रमाणे हे पंढरीनिवासा पांडुरंगा तु ही माझे हट्ट पूर्ण करशीलच कारण मी तुझा हट्टी मुलगा आहे तुझे छोटे बालक आहे. तुझ्या वाचून माझे शिण भाग हलके करण्याचे काम दुसरे कोणी करणार आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मी तुझ्या पासून दूर जाणार नाहीत कारण मी तुझ्या पायाला मिठी मारत आहे.
अभंग क्र.१४००
संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें ॥१॥
अवघियांचें पुरे कोड । फिडे जड देहत्व ॥ध्रु.॥
उभय लोकीं उत्तम कीर्ती । देव चित्तीं राहिलिया ॥२॥
तुका म्हणे जीव धाय । नये हाय जवळी ॥३॥
अर्थ
संकल्प करायचा असेल तर नारायणाचाच करा आणि ते चांगले आहे. असे केल्याने सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात आणि जड देहाशी असलेले देह तादात्म्य नाहीसे होते. देव जर आपल्या चित्तात कायमस्वरूपी राहिला तर उभय लोकात आपली उत्तम किर्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात नारायणाचा संकल्प केल्याने जीव तृप्त होतो आणि कोणत्याही प्रकारचा हाव मनामध्ये राहत नाही.