सार्थ तुकाराम गाथा १००१ ते ११००

सार्थ तुकाराम गाथा 1001 ते 1100

सार्थ तुकाराम गाथा १००१ ते ११००


अभंग – १००१
आणिकांसी तारी ऐसा नाहीं कोणी । धड तें नासोनि भलता टाकी ॥१॥
सोनें शुद्ध होतें अविट तें घरीं । नासिलें सोनारीं अळंकारीं ॥ध्रु.॥
ओल शुद्ध काळी काळें जिरें बीज । कैंचें लागे निज हाता तेथें ॥२॥
एक गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवसीं क्षीर घुगरिया ॥३॥
तुका म्हणे विषा रुचि एका हातीं । पाधानी नासिती नवनीत ॥४॥

अर्थ

या जगामध्ये अनेकांना तारणारा असा कोण आहे तर कोणीही नाही या उलट एखादा ढोंगी मनुष्य चांगल्या मनुष्याला वाईट मार्गाला नेतो. आपल्याजवळ शुद्ध सोनेच असते पण आपण ते सोनाराकडे घेउन जातो व तो सोनार त्या सोन्याला डाग देऊन त्याचा अलंकार तयार करतो त्यामुळे सोन्याचा कस कमी होतो. जमिन पेरणी युक्त झाली चांगली झाली आणि त्यामध्ये एखाद्या मुर्खाने काळे जिरे पेरले तर त्याला जे पिक अपेक्षित आहे ते पिक त्याला कसे मिळेल. एखादी सुगरण स्त्री असेल तर तिला गव्हाचे अनेक प्रकार करता येतात गव्हाचा सांजा दिवसे गव्हाची खीर तयार करता येते. तुकाराम महाराज म्हणतात चांगल्या स्त्रीला विशापासुनही गोडी कशी तयार करवी हे समजते परंतु एखाद्या मूर्ख स्त्रीला नवनीता पासूनही चांगला पदार्थ तयार करता येत नाही याउलट ती त्याचा नास करते.


अभंग – १००२
वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा ॥१॥
कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥ध्रु.॥
काय मानुनियां राहिले निंश्चिती । काय जाब देती यमदूतां ॥२॥
कां हीं विसरलीं मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे ॥३॥
काय हातीं नाहीं करील तयासी । काय जालें यांसी काय जाणों ॥४॥
कां हीं नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनियां ॥५॥
काय मोल यासी लागे धन वित्त । कां हें यांचें चित्त घेत नाहीं ॥६॥
तुका म्हणे कां हीं भोगितील खाणी । कां त्या चक्रपाणी विसरती ॥७॥

अर्थ

मला या लोकांचे फार आश्चर्य वाटते कारण हे लोक स्वतःच्या हिताचा विचार का बरे करत नाही? त्यांच्या अंतःकरणामध्ये असा कोणता विश्वास आहे? हे लोक नेमके कोणाच्या आधारावर ऐवढे निश्चिन्त राहिले आहेत शेवटी हे लोक आपल्या पापाचा जाब यामदुता पुढे कसा देणार ?हे लोक आपन मरनार आहोत हे विसरले की काय आणि यांना या भाव सागरामध्ये अशी कोणती गोडी लागली ?आहो यांच्या हातामध्ये नेमके काय नाही काय म्हंटले तर हे लोक करणार नाही परन्तु यांना काय झाले आहे हे हे काही कळत नाही. ह्या संसारबंधनातून सोडण्याकरता हे लोक देवकीनंदन श्रीकृष्णाचे चिंतन का करत नाहीत त्याला का आठवत नाहीत. हरिचिंतन करण्याकरता कोणत्याही प्रकारचे मोल लागत नाही हे या लोकांच्या चित्तात कां बरे येत नाही हे चित्ता हे लोक का बरे घेत नाहीत?तुकाराम महाराज म्हणतात अरे तुम्ही या कृष्णाचे चिंतन केले नाही तर पुढे नरकयातना भोगाव्या लागतील हे मात्र निश्चित मग हे लोक त्याचक्र्पानी कृष्णाला श्रीकृष्णाला विसरले आहेत कि काय?


अभंग – १००३
काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण ॥१॥
देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥
काय हें शरीर साच कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ॥२॥
कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥३॥
कां हें आवडलें प्रियापुत्रधन । काय कामा कोण कोणा आलें ॥४॥
कां हें जन्म वांयां घातलें उत्तम । कां हे रामराम न म्हणती ॥५॥
काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ॥६॥
काय करिती हे बांधलिया काळें । तुका म्हणे बळें वज्रपाशीं ॥७॥

अर्थ

या संसाराची संगती करून एकेकाची काय दुर्दशा झाली आहे हे लोकांना ठाऊक नाही काय?या लोकांना काय काय म्हणून समजून सांगावे?या संसाराची दुर्दशा हे डोळ्यांनी पाहतात कानाने ऐकतात आणि पुराणात काय सांगितले आहे हे ही त्यांना माहीत आहे.हे शरीर खरे आहे की जाणार आहे हेही सगळ्यांना माहीत आहे.आपले स्वहित कशात आहे हे सगळ्यांना का बरे करू नये आणि बालक व तारुण्य वृद्धावस्था यामध्ये किती दोष आहेत हेही सर्वांना माहीत आहे.आप्तइष्ट हे यांना इतके का आवडले आहेत अखेरीस कोणी कोणाच्या कामाला आले आहे काय?हा उत्तम असा जन्म या लोकांनी का बरे वाया घातला आहे का बरे हे लोक राम राम म्हणत नाहीत?कित्येक लोकं मरताना हे पाहत असतात तरीही या लोकांना या संसाराच्या शाश्वत पानाचा भ्रम पडलेला का आहे?तुकाराम महाराज म्हणतात काळाने आपल्या बलाने या लोकांना वज्रपशाशी बांधले तर हे लोक काय करतील.त्यामुळे नेहमी हरिभजन करावे असे महाराज सांगतात व हरिभजन केल्यानेच आपण तरू शकतो.


अभंग – १००४
झुंजार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥१॥
गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥
ऊर्ध्वपुंड्र भाळीं कंठीं शोभे माळी । कांपिजे कळिकाळ तया भेणें ॥२॥
तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजी ॥३॥

अर्थ

या जगामध्ये एक विष्णुदास असे एक योद्धे आहेत की ते या भवसिंधु रूप शत्रूशी युद्ध करू शकतात. त्यांना पाप-पुण्याची बाधा कधीही होत नाही. ते गोविंदाचे सारखे चिंतन करत असतात नेहमी करत असतात बसताना झोपल्यावर ते सारखे गोविंदाचे चिंतन करतात त्यामुळेच त्यांचे मनही गोविंद मय झालेले आहे. त्याच्या कपाळी ऊर्ध्वपुंड्र व कंठामध्ये तुळशीचे माळ असते त्यामुळे त्यांच्या कडे काळ देखील पाहण्यास थरथर कापतो .तुकाराम महाराज म्हणतात ज्या विष्णुदासांच्या अंगावर शंख चक्र इत्यादी मुद्रांचे शृंगार आहेत आणि ज्या लोकांमध्ये सतत नामामृत आहे ते वैष्णव केव्हाही कधीही कळीकाळाला भीत नाहीत.


अभंग – १००५
जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे ॥१॥
संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनाचे जोडीवरी हांव ॥ध्रु.॥
बांधलें गांठी तें लागलें भोगावें । ऐसियासी देवें काय कीजे ॥२॥
तुका म्हणे जया गांवां जाणे जया । पुसोनियां तया वाट चाले ॥३॥

अर्थ

जो आपल्या स्वहिताचा विचार करत नाही आणि पुढच्या व्यक्तीचा घात करण्याचा विचार करतो. अशा माणसाला वाईट प्रवृत्ती ती करण्याकरता त्याचे पूर्वकर्म असते व त्या माणसाला अशा साधनांची सवय लागते की ज्या कारणामुळे त्याचे अधपतन होणार असते. जसे ज्याचे संचित असते ते त्याला भोगावेच लागते त्याला ते संचित हरिनामाच्या साह्याने जाळावे एवढेच. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला ज्या गावाला जायचे असेल त्यानें त्या गावाची वाट विचारूनच चालावे तसेच ज्याला आपले हित कशात आहे हे समजून घ्यायचे असेल आपले हित कोणत्या मार्गाला आहे हे माहीत करून घ्यायचे आहे त्याने संतांना विचारूनच चालावे.


अभंग – १००६
मानी भक्तांचे उपकार । रुणीया म्हणवी निरंतर । केला निर्गुणीं आकार । कीर्त मुखें वर्णितां ॥१॥
म्हणोनि जया जे वासना । ते पुरवितो पंढरिराणा । जाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥ध्रु.॥
अंबॠषीकारणें । जन्म घेतले नारायणें । एवडें भक्तींचे लहणें । दास्य करी हा दासाचें ॥२॥
म्हणियें करितां शंका न धरी । रक्षपाळ बिळच्या द्वारीं । भक्तीचा आभारी । रीग न पुरे जावया ॥३॥
अर्जुनाचे रथवारु । ते वागवी सर्वेश्वरु । एवढे भक्तीचे उपकारु । मागें मागें हिंडतसे ॥४॥
पुंडलिकाचे द्वारीं । सम पाउलीं विटेवरी । न वजे कट करीं । धरूनि तेथें राहिला ॥५॥
भावभक्तीचा अंकित । नाम साजे दिनानाथ । म्हणोनि राहिला निवांत । तुका चरण धरोनि ॥६॥

अर्थ

हा देव आपल्या भक्तांचा उपकार निरंतर मानत असतो आणि तो त्याभक्तांचा निरंतर ऋणी आहे असेही म्हणतो.कारण भक्ताने हा निर्गुणनिराकार आहे त्याला आपल्या मुखाने त्याची कीर्ति वर्णन करून सगुण साकार केले आहे.म्हणूनच त्याच्या भक्तांना जी काही मना मध्ये इच्छा आहे ती सर्व इच्छा आहे हा पंढरीराणा पूर्ण करतो.व भक्तांचे हे ऋण फेडण्याचा करता तो भक्तांचा पोसना दास झालेला असतो.अंबऋषीला वाचवण्याकरता त्याला मिळालेल्या शापामुळे या नारायणाने त्याचा शाप स्वतःवर घेऊन अनेक जन्म घेतले आहे.भक्तांनी केलेल्या सेवेमुळे तो त्यांच्या दासांचाही आणि दास होतो.भक्ताने कोणतेही काम सांगितले तरीही तो त्याची लाज बाळगत नाही म्हणूनच तर तो पाताळामध्ये बळीचा द्वारपाल म्हणून उभा आहे.तो त्याच्या भक्तांच्या भक्तीचा आभारी आहे त्यामुळे भक्तांचे घर सोडून कुठेही एक दुसरीकडे कडेला तो जात नाही.सर्वेश्वर अर्जुनाचा रथांच्या घोड्यांची काळजी घेतो कारण अर्जुनाने भक्ती केली आहे त्यामुळे या रथाचे घोडे वागवितो त्यांना लागणारा चारा खरारा सर्वकाही हा सर्वेश्वर करतो.भक्तांच्या भक्तीचे हाइतके उपकार मानतो की तो सतत त्या भक्तांच्या मागे मागे फिरतो.भक्तांची तो तेवढी काळजी घेतो अर्जुनाने त्याची भक्ती केली म्हणूनच तर तो त्याच्या मागे मागे फिरतो त्याच्या घोड्यांचा चारा खरारा वगैरे इत्यादी करतो.हा हरी पुंडलिकाच्या दारामध्ये त्याने फेकलेल्या विटेवर त्याचे समचरण घेऊन उभा आहे.हा हरी कमरेवर त्याचे दोन्ही कर ठेवून वीटेवर उभा आहे तेथून तो कोठेही जात नाही.तुकाराम महाराज म्हणतात हा देव भक्तीचा अंकित आहेम्हणूनच तर त्याला दीनानाथ हे नाव शोभते.म्हणूनच तर मी त्याचे दोन्ही चरण धरून निवांत राहिलो आहे.


अभंग – १००७
सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥१॥
त्यांचा आम्हांसी कांटाळा । पाहों नावडती डोळां ॥ध्रु.॥
रिद्धीसिद्धींचे साधक । वाचासिद्ध होती एक ॥२॥
तुका म्हणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥३॥

अर्थ

काही ज्योतिषीलोक भूत-भविष्य-वर्तमान या कालातील शुभशकुन सांगतात.परंतु आम्हाला त्या लोकांचा कंटाळा आहे व त्यांना डोळ्यांनी पाहणे हेही आम्हाला आवडत नाही.काही लोक तर रिद्धी सिद्धीचे साधक आहेत ते वाचणे जे बोलतात ते खरे होते.तुकाराम महाराज म्हणतात असे हे रिद्धी सिद्धी जाणणारे लोक ज्योतिष जाणणारे लोक यांच्या पुण्याचा क्षय झाला की ते अधोगतीला जातात.


अभंग – १००८
ठाकलोंसें द्वारीं । उभा याचक भीकारी ॥१॥
मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥ध्रु.॥
याचकाचा भार । घेऊं नये येरझार ॥२॥
तुका म्हणे दान । सेवा घेतल्या वांचून ॥३॥

अभंग – १००९
ऐसें कां जालें तें मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगीं ॥१॥
कैसें तुम्हां देवा वाटतसे बरें । संतांचीं उत्तरें लाजविलीं ॥ध्रु.॥
भाविकां कंटक करिताती पीडा । हा तंव रोकडा अनुभव ॥२॥
तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाहीं तुम्हां ॥३॥

अर्थ

देवा या जगामध्ये कीर्तनाची निंदा थट्टा जिकडे तिकडे होत आहे हे असे का झाले आहे ते मला काही कळत नाही.कीर्तनाची थट्टा-मस्करी जिकडे तिकडे लोक करत आहेत पण पूर्वी संतांनी सांगितले आहे की तुम्हाला कीर्तन-भजन कथा खूप आवडते म्हणून आणि या लोकांनी संतांची वचने लाजविली आहे हे तुम्हाला बरे कसे वाटते?देवा हे कंटक लोक तुझ्या भक्तभाविकांना त्रास देतात त्यांना ते पिडा करतात हे मी फक्त बोलत नाही तर हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला तुमच्या नावाचा अभिमानच नाही असे मला वाटायला लागले आहे अहो तुमचे नाव म्हणजेशेवटचा राखीव बाणच आहे ते या लोकांना समजत नाही हे देवा तुम्हाला तुमचा नामाचा अभिमान असेल तर कीर्तनाची थट्टा मस्करी करणार्‍या तुमच्या भाविक भक्तांना त्रास देणार्‍या या कंटक लोकांना तुम्ही शिक्षा करा.


अभंग – १०१०
तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हां कां हे डोळे कान दिले ॥१॥
नाइकवे तुझी अपकीर्त्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥
आपुले पोटीं तों राखियेला वाव । आम्हांसी कां भाव अल्प दिला ॥२॥
तुका म्हणे दुःखी असें हें कळों द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥३॥

अर्थ

देवा तुम्ही निर्गुणाचे खोळे अंगावर पांघरून घेऊन बसला आहात मग आम्हालाच हे डोळे कान का दिले आहेत. हे देवा दुष्टांनी तुमची अपकीर्ती करावी निंदा करावी तुझ्या भक्तगणांचा अपमान करावा हे मला देखवत नाही आणि पाहवतही नाही. देवा तुमची निंदा किंवा अपकीर्ती कोणी केली तर तुम्ही ते सहन करतात एवढा वाव म्हणजे अवकाश तुम्ही तुमच्या पोटी ठेवला आहे पण आम्हाला ती सहन होत नाही असा संकुचित भाव आम्हाला का तुम्ही दिला? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी अपकीर्ती निंदा करणाऱ्या दुष्टांना तुम्ही सशान का करत नाहीत या कारणामुळे मी फार दुःखी झालो आहे. देवा या कारणामुळे यापुढे तुझे नामसंकीर्तन हे एक धंद्याने करावे असे मला वाटते अरे तुझे नाम करण्याकरता माझे मन उत्साही राहिले नाही.


अभंग – १०११
अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥१॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥
माझी कोणी न धरो शंका । ऐसे हो कां निर्द्वंव्द ॥२॥
तुका म्हणे जें जें भेटे । तें तें वाटे मी ऐसें ॥३॥

अर्थ

देवा सर्वत्र तुझे साम्य रूप आहे म्हणजे सर्वत्र तूच आहे असे मला माझ्या ज्ञानदृष्टीने केव्हा पाहता येईल?असे ज्यावेळेस होईल त्यावेळेस मला या पांडुरंग रायाची माझ्यावर कृपा झाली आहे असा विश्वास मला येईल.माझी कोणाला भयही वाटू नये आणि माझ्याविषयी कोणी शंकाही धरू नये.माझा कोणाशी शत्रुत्व किंवा मित्रत्व कोणत्याही प्रकारचा संबंध असू नये असा भेद विरहित देवा तु मला कर.तुकाराम महाराज म्हणतात देवा मला जे कोणी भेटेल ते सगळे माझेच स्वरूप आहे असे मला वाटावे.


अभंग – १०१२
सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥१॥
सारा अवघें गाबाळ । डोळ्या आडील पडळ ॥ध्रु.॥
शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥२॥
तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥

अर्थ

परमार्थामध्ये कोणत्याही प्रकारचे सोंग केले तर देव प्राप्त होतो असे नाही.हे लोकांनो तुम्ही तुमच्या डोळ्यावरील अज्ञानाचे पडळ बाजूला सारा.तुम्ही शुद्ध भक्तिभावाने परमार्थ केला नाही तर तो व्यर्थ शीणच ठरेल.तुकाराम महाराज म्हणतात सर्व माहीत असूनदेखील हे लोक विचार दृष्टीने आंधळे होतात.


अभंग – १०१३
सत्य संकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥
येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचें तें ॥ध्रु.॥
अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रम्हांडाचा ॥२॥
तुका म्हणे नाहीं चालत तांतडी । प्राप्त काळ घडी आल्याविण ॥३॥

अर्थ

कोणत्याही प्रकारचा सत्यसंकल्प आपण केले तर ते पूर्णत्वास जाण्यासाठी तो नारायण प्रयत्न करतो आणि ते सत्कर्म सत्यसंकल्प तो नारायण पूर्ण करतो आणि त्याचे फळही देतो.आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा मनोरथ तो नारायण पूर्ण करतो.आणि असाच सत्यसंकल्प करणारा भक्त त्याच्या अंगावर परमार्थातील सर्व अलंकार शोभतात आणि तो त्याच्या भक्तीच्या बळावर कोणतेही संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्यठेवतो.हा नारायण त्याच्या भक्तांच्या अंतःकरणातील सर्व इच्छा जाणत असतो कारण तो सर्वव्यापक आहे.तुकाराम महाराज म्हणतात कोणतेही सत्यसंकल्प पूर्ण करण्याकरता आपल्यावर हरी ची कृपा असावी लागते हरिकृपेचे वेळ आल्याशिवाय ते सत्य संकल्प पूर्ण होत नाही व त्याविषयी तातडी करणे हे योग्य नाही.


अभंग – १०१४
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥
भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥३॥
तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें स्रवतसे ॥४॥

अर्थ

आता मी या संतांचे वर्णन तरी कसे करू कारण ऐवढे सामर्थ्य एवढे बळ माझ्या वाणीत नाही मी बाकी काहीही न करता या संतांच्या चरणावर मस्तक ठेवतो.परिस आपले मोठेपणा आपली थोरी बाजूला ठेवून तोच लोखंडाचे सोने करतो तो असे म्हणत नाही की मी परिस आहे आणि हे लोखंड आहे मी याला कसा स्पर्श करू.संत ही तसेच आहे ते या जगाच्या कल्याणा करता अवतार घेतात आणि या भूतालातील लोकांवर परोपकार करण्याकरता देह कष्टविता.संतांचे भांडवल म्हणजे तरी काय तर ते या भूतांवर म्हणजे प्राणी मात्रांवर दया करतात व स्वतःच्या देहाविषयी त्यांना मुळीच ममत्व नसते.तुकाराम महाराज म्हणतात हे संत दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात आणि त्यांच्या वाणीतून नेहमी नामामृत स्त्रवत असते.


अभंग – १०१५
जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥१॥
तुम्ही सांभाळिले संतीं । भय निरसली खंती ॥ध्रु.॥
कृतकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥२॥
तुका म्हणे काळ । आतां करूं न शके बळ ॥३॥

अर्थ

आज मी मनुष्य जन्माला आलो त्याचे खरे फळ प्राप्त झाले. ते फळ म्हणजे असे की तुम्ही संत जणांनी माझा सांभाळ केला त्यामुळे माझे जन्ममरणाचे भय व खंत नाहीशी झाली आहे. आतापर्यंत मी जे काही इच्छा व्यक्त केली ती सर्व मला मिळाली माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या त्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता काळ माझ्यावर त्याची बळजबरी करू शकत नाही.


अभंग – १०१६
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥१॥
तुम्ही जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥
काय वोळलें संचित । ऐसें नेणो अगणित ॥२॥
तुका म्हणे नेणें । काय केलें नारायणें ॥३॥

अर्थ

माझ्या पुण्याचा राशी आकाशाला भेदून गेले की काय हे मला काही कळत नाही. कारण तुम्ही संत जणांनी माझ्यावर कृपा करून करून माझा सांभाळ केला आहे. पूर्व पुण्याची संचित माझ्याकडे कसे ओढले हे मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात या संत जनांची भेट घडवून आणण्याकरता नारायणाने च माझ्यावर कृपा केली आहे की काय हे मला कळत नाही.


अभंग – १०१७
असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां ॥१॥
भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु.॥
आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥२॥
तुका म्हणे केला कोणें । एवढा नेणें लौकिक ॥३॥

अर्थ

या परमार्थ विषयांमध्ये मी सर्वांपेक्षा हीन आहे.माझ्याकडे माझे मुख्य भांडवल म्हणजे मी कंठामध्ये या हरीचे नाम धारण केलेले आहे.यापेक्षा दुसरे माझ्याजवळ काहीही नाही.तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे फक्त हरिनामाचेच भांडवल आहे तरीही माझा एवढा लौकिक कसा झाला हे मला काही कळत नाही?


अभंग – १०१८
गायें नाचें वाहे टाळी । साधन कळी उत्तम हें ॥१॥
काय जाणों तरले किती । नाव आइती या बैसा ॥ध्रु.॥
सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥३॥

अभंग – १०१९
सर्वकाळ माझे चित्तीं । हेचि खंती राहिली ॥१॥
बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥
वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥२॥
तुका म्हणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥३॥

अर्थ

माझ्या चित्तामध्ये एकच खंत आहे ती म्हणजे मला या हरीची भेट केव्हा होईल?त्या श्रीहरीचे रूप माझ्या डोळ्यांमध्ये ठसलेले आहेत त्याचेच आठव मला वेळोवेळा होत आहे.व्यवहारांमध्ये सर्व काम संपले असून चित्तामध्ये अखंड याहरीचे अनुसंधान चालू आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझे चित्ता मध्ये वेळोवेळी या हरीचे आठव होत आहे त्यामुळेत्याचेच आठव मला वेळोवेळी होत आहे व त्यामुळेच तो माझ्या चित्त मध्ये राहिला आहे.


अभंग – १०२०
जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥१॥
दुःख पावायाचें मूळ । राहाणी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥
माळामुद्रांवरी। कैंचा सोंगें जोडे हरी ॥२॥
तुका म्हणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥३॥

अभंग – १०२१
अवघा तो शकून । हृदयी देवाचे चिंतन ॥१॥
येथे नसता वियोग । लाभ उणें काय मग ॥ध्रु.॥
छंद हरीच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥
तुका म्हणे हरीच्या दासा । शुभ काळ अवघ्या दिशा ॥३॥

अर्थ

आपल्या हृदया मधे नित्य निरंतर हरीचे चिंतन करणे हाच काळ सर्व शुभ शकून जाणावा.या हरीचे चिंतन करत असताना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नसेल तर लाभाला कोणत्याही प्रकारची उणीव आहे काय?या आपल्या वाणीला हरिनामाचा नित्य निरंतर छंद लागलेला असेल तर ती वाणी सुचिर्भुत असते पवित्र असते असे जाणावे.तुकाराम महाराज म्हणतात या हरीच्या दासांना सर्वकाळ व सर्व दिशा या शुभ असतात.


अभंग – १०२२
ब्रम्हरूपाचीं कर्में ब्रम्हरूप । विरहित संकल्प होती जाती ॥१॥
ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥
नानाभाषामतें आळविता बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥२॥
तुका म्हणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥३॥

अर्थ

ब्रम्‍हरूप असलेल्या व्यक्तीने कोणतेही कर्म केले तरी ते ब्रम्‍हरूप असते.त्याने ते कर्म कोणताही प्रकारचा संकल्प करून केलेले नसते व त्या कर्मांमध्ये कोणत्याही प्रकारचा अभिमान स्वहित नसते त्यामुळे ते कर्म सहज होतात आणि जातात.स्पटिक मनी हा कोणत्याही रंगापासून ठेवला की तो अगदी त्या रंगाप्रमाणे दिसतो त्या रंगां पासून तो भिन्न असतो अगदी तसेच ज्ञानी मनुष्य असतो त्याने कोणतेही कर्म करू परंतु तो त्या कर्मापासून अलिप्त असतो.लहान मुलाला इतर कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही नावाने हाक मारू द्या पण त्याला ते समजत नाहीपण त्याला त्याच्या आईने हाक मारली की त्याला ते लगेच समजते लगेच कळतेतसेच या ज्ञानी असते त्याला इतर कोणीही कोणत्याही नात्याने हाक मारू द्या पण त्याला ते समजत नाही तो त्या ब्रह्मा शिवाय कोणालाही ओळखत नाही.तुकाराम महाराज म्हणतात अशा आत्मस्वरूप जाणणाऱ्या माणसाला मी वेळोवेळा नमस्कार करतो आणि त्याचे चरणही वेळोवेळी धरतो.


अभंग – १०२३
नाहीं सुगंधाची लागत लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥१॥
वाऱ्या हातीं माप चाले सज्जनाचें । कीर्ती मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥
प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥२॥
तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥३॥

अर्थ

सुगंध उत्पन्न करण्याकरता कोणत्याही प्रकारची पेरणी करावी लागत नाही तर जसे फुल असेल तसें सुगंध आपोआप तयार होतो अगदी त्याचप्रमाणे मन शुद्ध झाले की सद्गुण ही आपोआप तयार होते.सद्गुण व कीर्ती हे दोन्ही गुण चांगल्या मनुष्याचे जसे सुगंध वाऱ्यासारशी पसरते तसे त्यांचे सज्जन व्यक्तींचे हे सद्गुण आणि कीर्ती वाऱ्यासारशी पसरते व त्यांची व कीर्ती सांगणारे मुखही नारायणाचे चसते.सूर्य आणि प्रकाश हे दोन्ही वेगवेगळे आहेत काय तर नाही याला सर्व लोकही साक्षी आहेत तसेच सज्जन व्यक्ती तो जेथे जेथे जात असतो तेथे त्याची कीर्ती व सद्गुण हे आपोआपच प्रसारित होतात.तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्हाला सायास करायचेच असेल तर सत्यासाठी सायस करा कारण ज्याप्रमाणे नमिताचा नाश होत नाही त्याचप्रमाणे तर त्याचाही कधीच नाश होत नाही.


अभंग – १०२४
तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥१॥
तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥
अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥२॥
तुका म्हणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥३॥

अर्थ

काही मनुष्य तीर्थ करतात तप करतात व त्याविषयी अभिमान धरून गुरगुर करत असतात.पण हे विष्णुदास बिचारी तसे नसतात ते याउलट एकमेकांचे चरण धरत असतात.वेदशास्त्रांचे अध्ययन करणारे असे अनेक लोक आहेत कि त्यांच्या मनांमध्ये अशी इच्छा करतात की लोकांनी आपला मानसन्मान करावा आपल्याला पूज्य मानावे.तुकाराम महाराज म्हणतात जे लोक विधी निषेधाचा डोहामध्ये बुडालेले आहेत कर्मकांडाच्या अभिमानाचा अडकलेले आहेत बुडालेले आहेत त्यांना देवाची प्राप्ती कधीच होत नाही.


अभंग – १०२५
पट्टे ढाळूं आम्ही विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥१॥
निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥
बळिवंत जेणें रचिलें सकळ । आम्हां त्याचें बळ अंकितांसी ॥२॥
तुका म्हणे आम्ही देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥३॥

अर्थ

या विश्वामध्ये आम्ही एकच असे शुर शिपाई दांडपट्टा खेळणारे आहोत कि जे अंगाला पाप पुण्य लागू देत नाहीत.आम्हा विष्णुदासांच्या अंतःकरणामध्ये सदासर्वकाळ आनंद भरलेला आहे व आमच्या योगक्षेम आता भारही या देवाने घेतलेला आहे.जो सर्वशक्तीमान आहे ज्याने या जगाची निर्मिती केली आहे त्याचेच शक्ती आम्हा हरिदासांना आहे.तुकाराम महाराज म्हणतात या देवा वाचून आम्ही दुसरे काही जाणत नाही व पाहत नाही.


अभंग – १०२६
कथेचा उलंघ तो अधम अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥१॥
कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥
निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥२॥
तुका म्हणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥३॥

अर्थ

ज्याला हरिकथा आवडत नाही आणि जो हरीचें नाम हे ओळखत नाही घेत नाही तो अधमातील अधम आहे असे जाणावे. असा कृतघ्न मनुष्य मातेच्या पोटी येऊन भूमीला भार का झाला असेल? अशा माणसांना निद्रा असते हरी जागरणात ते कधीही येत नाहीत व यांच्या पोटामध्ये या कारणाने पाप व वासनारूपी किट उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात ज्या कोणाला हरिकथेची आवड नाही त्याने आपल्या आईचे व बापाचे हे दोन्हीकुळ बुडविले असे समजावे.


अभंग – १०२७
सांडोनीया दों अक्षरां । काय करूं हा पसारा ।
विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥१॥
म्हणोनि बोबड्या उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं ।
नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥
सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें ।
नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥२॥
शेवटीं ब्रह्मार्पण । याचि मंत्राचें कारण ।
काना मात्रा वांयांविण । तुका म्हणे बिंदलीं ॥३॥

अर्थ

हे दातारा तुझे हे दोन अक्षरी नाव म्हणजे “हरी” हे सोडुन बाकी पसारा मी कशासाठी घालू?मी जर विधिनिषेधाचा भार घेतला तर मी कर्मकांडामध्ये अडकेल व त्यामुळे मला तुझी प्राप्ती होणार नाही.म्हणूनहे हरी तुझे नाम मी माझ्या बोबड्या शब्दाने जपत आहे.कारण तुझे नामहरी आहे आणि तेच या भवसागरातून तारणारे आहे.तू सर्वत्र व्यापून उरलेला आहे हेच वेदाचे वचन आहे आणि उपनिषदे पुराने हेच गर्जून सांगतात.म्हणून हे हरी मी तुझ्या नामावाचून दुसरे कोणतेही नाव घेत नाही तुझ्या वाचून इतर कोणतेही साधनांची मला आवड नाही.तुकाराम महाराज म्हणतात कोणतेही वैदिक कर्म केल्यानंतर शेवटी ओम तत्सत ब्रम्हार्पनमस्तु हे वाक्य म्हणण्याची गरज आहे,कोणतेही वैदिक कर्म करताना मंत्र उपचार करताना त्याचा काना मात्रा वेलांटी चुकले तर ते वैदिक कर्म निष्फळ ठरते परंतु तुझे नाम घेतल्याने कोणतेही कर्म अगदी सहजच सफल होते असा तुझा नामाचा महिमा आहे.


अभंग – १०२८
हरीनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥१॥
फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥
हरीनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥२॥
हरीनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें कळिकाळ ॥३॥
येणें चि बळें सरते आम्ही । हरीचे नामें लोकीं तिहीं ॥४॥
तुका म्हणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥५॥

अर्थ

मी या हरिनाम रुपी नामाची नौका करून हा भवसिंधु पार उतरलो आहे.मला हे सर्व काही प्राप्त झाले ते केवळ संतांमुळे कारण मी त्यांच्या पायी लागलो आहे.हरी नाम रूप वेगवान घोडा आणि ज्ञानरूप शस्त्र घेऊन आम्ही या गाढ संसाराचा समूळ छेद केला आहे.हरी नाम रूप बाणामुळे कळिकाळ देखील तोंड विन्मुख करून पळून गेला.या हरिनामाचा बळामुळेच आम्ही तिन्ही लोकामध्ये मान्यतेला प्राप्त झालो आहोत.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या विठ्ठलाचे भक्तीभावपूर्ण सेवक झालो आहोत.


अभंग – १०२९
नव्हें हो गुरुत्व मेघवृष्टिवाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥१॥
आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥
देहपिंड दान दिला एकसरें । मुळिचें तें खरें टांकसाळ ॥२॥
तुका म्हणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥३॥

अर्थ

हे लोकांनो मी कोणालाही माझा गुरु पणा दाखविण्यासाठी उपदेश वाणी करत नाही तर मेघवृष्टी ज्या प्रमाणे सर्वाना सारखीच होते त्याप्रमाणे सर्वांना माझी उपदेश वाणी मी सांगत आहे तुम्हा संत जणांना ऐकावी.माझे शब्द बोबडे जरी असले तरी ते देवाचेच आहे आणि मी जे काही बोलतो आहे ते तोच मला बोलवीत आहे.मी माझा देह या हरीला केव्हाच अर्पण केलेला आहे त्यामुळे मी जे काही बोलतो आहे ते सर्व हा हरीच बोलत आहे कारण तो माझ्याशी एकरूप झालेला आहे आणि मी जे काही बोलतो ते शब्द माझ्या टाकसाळीतून बोलत आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मुखातून हरिनाम रुपी नवनीताचा झरा स्रवत आहे आणि जे कोणी हे नवनीत सेवन करीन ते तृप्त होतील समाधानी होतील.तुकाराम महाराजांच्या कोणत्याही अभंगाचा अर्थ वाचण्यासाठी सार्थ तुकाराम गाथा हे ॲप नक्की डाऊनलोड करा


 

अभंग – १०३०


घटीं अलिप्त असे रवि । अग्नी काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥१॥
भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥
देह संकल्पासारिखें । एक एकांसी पारिखें । सुख आणि दुःखें । अंगी कर्में त्रिविध ॥२॥
तुका म्हणे कोडें । न कळे तयासी सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥३॥

अभंग – १०३१
सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥१॥
चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥
नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥२॥
तुका म्हणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥३॥

अर्थ

अहो विठ्ठला मला तुमच्या चिंतनाने सद्गतीत होऊन कंठ दाटून येवो व माझे ह्दय फुटून जावो. माझ्या चित्तामध्ये नेहमी तुमच्या चिंतनाचा छंद लागो. अहो विठ्ठला तुमच्या चिंतनाने मला आनंद होवो व डोळयातून प्रेम अश्रू वाहोत व अंगावर रोमांच उभे राहोत. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारचे कृपादान तुम्ही मला दयावेत व अशी इच्छा मला मनामध्ये आहे.”


अभंग – १०३२
जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥१॥
डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥
सरसावलें मन । केले सोज्वळ लोचन ॥२॥
तुका म्हणे सवें । आतां असिजेत देवें ॥३॥

अर्थ

जिथे पाहावा तिथे आकाशाचा गाभा तो हरी उभा असलेलाच दिसतो. आणि हेच हरीचे रुप माझ्या डोळयामध्ये वसले आहे व याचेच ध्यान माझ्यामध्ये संचरले आहे. याचे ध्यान करण्याकरता माझे मन सरसावले आहे व हे ज्ञान बघूनच मी माझे डोळे शुध्द केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता असे झाले आहे की आम्ही जिकडे जावो तिकडे हा हरीच आमच्याबरोबर असतो.”


अभंग – १०३३
तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥१॥
जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥
वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥२॥
शेष उरला तुका । जीवीं जीवा जाला चुका ॥३॥

अर्थ

या विठ्ठलाच्या कृपेने मला असे झाले की तहानेनेच तहान प्यावून घ्यावी आणि भूकेनेच भूक खावी. तहान व भूक ज्या जीवाचे धर्म आहेत तो जीवच आता जीवत्वदशेने नाहीसा झाला आहे व या सर्वांचा झाडा या विठ्ठलाने केला आहे. आता वासनेला आश्रयच राहीला नाही कारण ज्या मनात वासना राहाते ते मनच आता हरीच्या चरणाच्या ठिकाणी पांगुळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता माझ्या जीवाचा जीवदशेचा बाद झाला असून मी आता कुठस्थ ब्रम्हरुपाने उरलो आहे.”


अभंग – १०३४
पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥१॥
आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥
भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशीं शयन ॥२॥
पांघरोनि तुका दिशा । केला वास अलक्षीं ॥३॥

अर्थ

वैराग्य, ज्ञान आणि भक्ती हे ज्याच्या ठिकाणी आहे आणि अष्टदिशा ज्याचे वस्त्र झालेले आहेत असा जो कोणी दिगंबर आहे त्याचे हातच खाण्यापिण्याकरता पात्रासारखे आहेत. असे जे कोणी दिगंबर आहेत त्याचे मन हरीचिंतनासाठी नेहमी तत्पर असते त्यांना कोणत्याही पदार्थाची गरज वाटत नाही. भिक्षासारखी कामधेनू त्यांच्याजवळ असते आणि ते आकाशाखाली झोपत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा या दिगंबराने दहाही दिशांचे पांघरुन करुन अंगावर घेतलेले असतात व ते अलक्ष अशा परमात्माच्या ठिकाणी वास करतात.”


अभंग – १०३५
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥
लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥
तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥३॥

अर्थ

मला आता विषयांचा विसर पडला आहे कारण आता माझ्या अंगी पूर्णपणे ब्रम्हरस ठसवला आहे. आता माझी वाचा मला अनावर झाली आहे कारण तिने हरीनामाचा छंद घेतला आहे. ज्याप्रमाणे कृपण मनुष्य धनाच्या हव्यासाने वेगवेगळे प्रयत्न करुन धन प्राप्त करुन घेतो त्याप्रमाणे माझ्या मनानेही आता या हरीचा आनंद मिळवण्याकरता या हरीनामाचा छंद घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याप्रमाणे गंगा आणि सागर यांचा संगमा नंतर ते दोन्ही एकरुप होतात त्याप्रमाणे मीही या भक्ती आणि ज्ञानाच्या आनंदात तद्रूप झालो आहे.”


अभंग – १०३६
रामकृष्णनाम मांडीं पां वोळी । तेणें होईल होळी पापा धुनी ॥१॥
ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रम्हरसा ॥ध्रु.॥
जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस नुरे मागुताली ॥२॥
तुका म्हणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥३॥

अर्थ

तू फक्त आपल्या जीभेने रामकृष्ण नाम हे ओळीने बसव त्यामुळे तुझ्या पापांची होळी होईल. अरे तू तुझ्या मनाला या ओळीचा छंद लाव या ओळीच्या अभ्यासाचा छंद लाव त्यामुळे तुला “ज्याचा नाश होत नाही अशा ब्रम्हरसाचा काढा मिळेल”. मनुष्याने अशा धनाची प्राप्ती करुन घ्यावी की जे धन कधीही संपणार नाही व पुढेही आपल्याला असेच हेच धन मिळावे अशी तळमळ धरावी. तुकाराम महाराज म्हणतात, “असेच अविनाशी धन मिळवण्याचा विचार तुम्ही मनात धरा की ज्यामुळे तुमच्या जन्ममरणाच्या खाणी भोगायच्या चुकतील.”


अभंग – १०३७
परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥
थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥
पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥२॥
तुका म्हणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥३॥

अर्थ

जो परमार्थी आहे, ब्रम्हनिष्ठ आहे, हरीभक्त आहे त्याला आपण कोणतेही नाते जोडू नये त्याला आपला म्हणू नये त्याच्याशी लहान असला म्हणून त्याची अवहेलना करु नये कारण त्याचा अधिकार मोठा असतो. अग्नीची ठिणगी थोडी लहान जरी असले तरी लाकडाच्या संयोगाने ती मोठया अग्नीत रुपांतर करते त्याचप्रमाणे हा परमार्थी मनुष्य लहान जरी असला ज्ञान आणि भक्तीच्या साहाय्याने तो मोठा अधिकारी असतो. ज्याच्या अंत:करणात नित्य देव वसलेला असतो अश्या पुत्राला बापानेही नमस्कार करावा. तुकाराम महाराज म्हणतात, “खापराच्या भांडयामध्ये नवनीत म्हणजे लोणी असेल तर त्या खापराला सुध्दा आपल्या डोक्यावर वाहावे लागते. जरी ते खापर मातीचे असले तरीही तसेच त्याप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे ब्रम्हनिष्ठ माणसाला परमार्थामध्ये किंमत असते त्यामुळे त्याचा देह, वय, कुळ, जात ही जरी हीन असली तरी तो सर्वांना पूज्य आहे.”


अभंग – १०३८
ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥१॥
देव तया जवळी असे । पाप नासे दर्शणें ॥ध्रु.॥
कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥२॥
तुका म्हणे भेदाभेद । गेला वाद खंडोनि ॥३॥

अर्थ

या जगामधे सर्वत्र देवच आहे असा ज्याचा दृढनिश्चय असतो. देव त्याच्याजवळ राहात असतो व त्याच्या दर्शनाने पाप नाहीसे होते. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचा क्राम क्रोध वास्तव्य वास करत नाही व त्याच्या अंत:करणामध्ये सर्वत्र देव आहे सर्व भूतमात्रांविषयी समान भावना प्राप्त झालेली असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा या ब्रम्हरुप झालेल्या माणसांच्या मनामधून भेदाभेद व वादविवाद खंडीत झालेले असतात.


अभंग – १०३९
सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥
न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥
देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥२॥
तुका म्हणे होय भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥३॥

अर्थ

सर्व भेद अभेद बाजूला सारुन हरीचे नाम प्रेमाने उच्चारावे हीच खरी हरीची सेवा आहे. हरीचे नाम घेण्याकरता कोठे बाहेर यावे जावे लागत नाही फक्त घरी बसूनच हरीचे नाम घेतल्याने सर्व लाभ होतात. देवाचे नाम हेच गंध, पुष्प, अलंकार सर्व साधने पूजेचे साधने समजून देवाच्या शीरावर अर्पण करावेत. तुकाराम महाराज म्हणतात, “हा देव केवळ भक्तीभावानेच संतुष्ट होतो म्हणजे हरीनाम घोष चालू आहे तेथेच हा हरी राहात असतो.”


अभंग – १०४०
ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥१॥
म्हणोनियां अवघे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु.॥
वेदपारायण पंडित वाचक । न मिळती एक एकांमधीं ॥२॥
पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखें चेष्टा विपरीत ॥३॥
आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें गुरगुरु ॥४॥
तुका म्हणे मज कोणांचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥५॥

अर्थ

ज्ञानी मनुष्याच्या घरी मी देव पाहाण्यास गेलो तर मला तेथे फक्त शब्दज्ञानाचा अहंकार त्याच्या पाठी लागलेला आहे असे दिसले. म्हणूनच देवा आता मी सर्व उपाय टाकून दिलेले आहेत आणि तुझे पाय दृढ धरलेले आहे. वेदपठन करणारे पंडीत वाचक यांच्यामधे जाऊन पाहिले तर ते त्यांचे मत मांडतात व प्रत्येकाचे मत वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे एकमेकांमधे मत मिळत नाही. हरीभक्तीमध्ये भक्तीभाव कसा असतो आत्मनिष्ठा त्यांची कशी असते हे पाहाण्याकरीता गेलो पण तेथे सारा त्यांचा दंभ स्वैराचार चेष्टा हे विपरीत प्रकार दिसून आले. योगी यांच्याकडे गेलो तर समाधी स्थितीने शांत ते झाले नाही असे मला दिसले तर याउलट ते लोकांवरच गुरगुर करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “म्हणून हे विठ्ठला मला या सर्वांचे परीक्षण केल्यानंतर यापैकी कोणाचाही अंकीत करु नकोस.”


अभंग – १०४१
पंढरीची वाट पाहें निरंतर । निढळावरी कर ठेवूनियां ॥१॥
जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥
पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥२॥
तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥३॥

अर्थ

मी माझ्या कपाळावर हात ठेउन कोणीतरी पंढरपूर वरून येत आहे का यांची वाट पाहात आहे.करण पंढरीकडे जाणाऱ्या म्हणजे माझे माहेरकडील जाणाऱ्या भक्तांकडे मला असा निरोप पाठवायचा आहे की या संसाराच्या सासुरवाडीत देवा मला का सोडले?मला पलीकडे कोणीतरी विठ्ठला सारखागरुडावर बसलेला चतुर्भुज दिसत आहे कोण आहे ते?तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तू मला आता केंव्हा भेटशील मला आता धीर राहिलेला नाही तरी तू लवकर ये.


अभंग – १०४२
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥१॥
नाशीवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा सीण तेंचि फळ ॥ध्रु.॥
नाव धड करा सहस्र नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥२॥
तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरीरामबाणीं ॥३॥

अर्थ

कंठा मध्ये राम नाम राहील अशी जोडी(लाभ) तुम्ही धरा त्यामुळे तुमचा गर्भ वासाचा फेरा चुकेल. हा संसार नाशिवंत आहे व त्याचे मूळ म्हणजे दुःख देणारे आहे. स्त्री पुत्र धन यांच्या साठी केलेले खटाटोप व्यर्थ ठरेल. सहस्रनामाची नाव मजबूत करा की, जेणेकरून ती नाव तुम्हाला या भवसागरातून पार करेल. तुकाराम महाराज म्हणतात हरी नामाची तुम्ही हृदयात भाते भरा आणि त्या काळाच्या तोंडावर मारा.


अभंग – १०४३
पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुटी जालों माते ॥१॥
करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥
सत्यासाठी माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥२॥
तुका म्हणे माझी कळवळ्याची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥३॥

अर्थ

हे विठाबाई, हे माझे आई मी फार कष्टी झालो आहे तरी तू माझ्याकडे डोळे भरून पहा. माझ्या जीवाला तुझे प्रेम रस स्तनपान करावेसे वाटत आहे, माझे हे बोलणे अलंकारिक नसून किंवा खोटेपणाचे नसून अगदी खरे आहे माझे हे बोलणे विचारपूर्वक आहे आणि ते केवळ सत्य साठीच आहे ते केवळ शब्दाला शब्द जोडून केलेले वाक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे विठाबाई माझी आई ही प्रार्थना कळकळीची आहे कारण माझा जीव या भव सागरातील कर्तव्य करून थकला आहे.


अभंग – १०४४
तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥
आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥
आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥२॥
प्रेमरसपान्हा पाजीं माझे आई । धांवें वो विठाई वोरसोनि ॥३॥
तुका म्हणे माझें कोण हरील दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥४॥

अर्थ

हे पांडुरंगा, तुम्ही कृपेचे सागर आहात तरी मला भेटण्यासाठी तुम्ही एवढा उशीर का केलास ?हे देवराया तू काय पाहतोस तुला अजूनही माझी दया का येत नाही ?देवा अरण्यांमध्ये हरिणीचे पाडस जसे त्याच्या आईला हाक मारते तसे मी तुला आळवित आहे .हे विठाई तुझ्या प्रेम रसाचा पान्हा तू मला पाज तू धावत माझ्याकडे लवकर ये .तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंग राया तुझ्या वाचून कोण माझे दुःख हरण करीन?


अभंग – १०४५
भक्ती तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥
जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥
कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥२॥
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥३॥

अभंग – १०४६
पापी म्हणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥१॥
ऐशा विचाराने घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥
एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें ॥ घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥२॥
तुका म्हणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥३॥

अर्थ

देवा मी पापी आहे असे लोक म्हणतात, बरे ठिक आहे मी पापी आहे पण मी तर रोज तुमची चिंतन करतो मग ते पाप जायला पाहिजे या लोकांच्या म्हणण्यानुसार माझे पाप अजूनही गेलेले नाही मग देवा माझे पाप तुमच्या नामा पेक्षा प्रबल आहे की काय? अशा प्रकारचे विचार घालून माझ्या मनाची कोणी करून हे चक्रपाणी तुम्ही निजला आहात की काय? पण देवा त्या महापापी अजामिळाने तुमचे केवळ एकदा नाव घेतले तेही त्याच्या पुत्राच्या निमित्ताने तरीही तुम्ही त्याचे लगेच दुःख घालविले त्याचा कोणत्याही अधिकार न पाहता त्याचा उद्धार कसा केला? देवा मी तर त्याच्या इतका पापी नाही .तुकाराम महाराज म्हणतात मी तर तुमचा भक्त आहे आणि तुमच्या सेवकाला इतका विचार करण्याची वेळ येते हे योग्य नाही.


अभंग – १०४७
उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥१॥
ख्यात केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु.॥
मोकलिला प्रायिश्चतीं । कोणी न धरिती हातीं ॥२॥
तुका म्हणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥३॥

अर्थ

देवा तुम्ही मागे कित्येक भक्तांना या भवसागरातून मुक्त केले याची गणती ही करता येत नाहीये. अजामिळाने धर्माचे कोणतेही पालन केले नाही तरी त्याला मोक्ष मिळाला त्याचे धर्माच्या नावाने दिवाळे निघाले होते तरी त्याला मोक्ष तुम्ही दिला व त्याने एवढी कीर्ती केली की त्याची तुलना करता येणार नाही. त्याचे एवढे पाप होते की त्याला प्रायश्चित्त म्हणून काहीच उरले नव्हते आणि कोणीही त्याचा उद्धार करण्यास तयार नव्हते .तुकाराम महाराज म्हणतात त्या आजामिलाने फक्त एकदा नारायणा असा नामोच्चार केला तेही त्याच्या मुलाच्या निमित्ताने व त्याची वैकुंठाची वाट मोकळी झाली असा देवा तुझ्या नामाचा महिमा आहे.


अभंग – १०४८
सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरी बा गोविंदा रामकृष्ण ॥१॥
पुण्य पर्वकाळ तीर्थे ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥
अवघे चि लाभ बैसलिया घरा । घेती भाव धरा एके ठायीं ॥२॥
शेळ्या मेंढ्या गाई सेवा घेती म्हैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥३॥
तुका म्हणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभचि ॥४॥

अर्थ

राम कृष्ण हरी गोविंद सरळ प्रांजळ मनाने उच्चारावित. हरिकथा म्हणजे पुण्य पर्वकाळ आहे व त्या कथेमध्ये सर्व तीर्थे एवढेच काय पण समुद्र देखील स्नान करण्यात येतो या हरिनामा वर दृढ विश्वास ठेवला तर लाभ घरी बसल्या बसल्या येतात. शेळ्या-मेंढ्या, म्हशी ,गाय यांची पुष्कळ सेवा करावी लागते पुष्कळ उठाठेव करावी लागते पण हरिनाम रुपी कामधेनूची सेवा करण्यात कोणत्याही प्रकारचे कष्ट लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही हरिनामाचे सोपे वर्म जाणले तर तुम्हाला त्या अनंताची प्राप्ती आपोआपच होईल.


अभंग – १०४९
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥
तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥
देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥२॥
काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥३॥
तुका म्हणे देवभक्तंचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥

अर्थ

जो सर्वकाळ अच्युता चे नाम आपल्या वाणीने घेतो त्याचा देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवंत आहे .आणि त्याचे सतत नाम घेणाऱ्या वैष्णवांचे स्मरण जरी केले तरी कितीही दोष असले तरी त्यांचा नाश होतो .आणि तो मनुष्य हा भवसमुद्र तरुन जातो व त्याच्या सर्व पापांच्या राशी जळून जातात. देव सुद्धा त्या पवित्र वैष्णवांच्या पायाची रज म्हणजे माती आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न करतो व त्याच्या मागे मागे सारखा फिरत असतो .त्या वैष्णवांच्या कंठामध्ये सदासर्वकाळ वैकुंठ नायकाचे नाम आहे व मग वैष्णवांच्या मध्ये आणि देवा मध्ये कोणता फरक उरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात गंगा आणि यमुना यांचा संगम झाला की तेथे सरस्वती गुप्त रूपाने असते तसेच देव आणि भक्त यांचा संगम झाला की तेथे नामरूपी त्रिवेणी संगम आपोआप तयार होतो.


अभंग – १०५०
पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया या भेटी हरीदासांची ॥१॥
ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिर्थे जगीं दान व्रत ॥ध्रु.॥
चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥२॥
भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥३॥
तुका म्हणे मना जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥४॥

अर्थ

पाप ,ताप,दैन्य हे हरिदासांच्या दर्शनाने तसेच त्यांची भेट झाली की क्षणात नाहीसे होतात. या जगामध्ये तीर्थ ,दान ,तप ,व्रत असे अनेक साधने आहेत पण वैष्णव सारखे सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते. जे हरी भक्त हरी कीर्तनामध्ये आनंदाने नचतात त्यांच्या चरणाची माती शंकर म्हणजे साक्षात भगवान महादेव आपल्या मस्तकाला लावतात आणि त्यांना वंदन करतात. हे वैष्णव म्हणजे हा भवसागर तरुन जाण्याकरता उत्तम प्रकारची नौका आहे त्या नावे मध्ये जो कोणी बसून जातो त्याचे हात व पाय देखील ते वैष्णव भिजू देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवांचे चरण पाहिल्यानंतर मनाला समाधान वाटते.


अभंग – १०५१
येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करूं हेनिर्मळ हरीकथा ॥१॥
आम्ही भूमीवरी एक दैवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥
तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥२॥
न चळे हा मंत्र न म्हणे यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥३॥
तुका म्हणे माझा विठ्ठल विसांवा । सांठवीला हांव हृदयांत ॥४॥

अर्थ

हरिकथा करणे हे भाग्याचे लक्षण आहे असे समजून आम्ही निर्मळ मनाने हरिकथा करू. या पृथ्वीवर आम्हीच एक भाग्यवान आहोत कारण आम्हाला विठ्ठलनामाचे निदान सापडले आहे .विठ्ठलाचे नाम गाईले ऐकले तर माता आणि पिता या दोन्ही कुळाचा उद्धार होतो. विठ्ठल नामजप करण्याकरिता वर्णन मात्र चुकण्याची भय नाही .कोणत्याही कुळांमध्ये किंवा जाती मध्ये जन्म घेतला तरी त्या गोष्टीचा प्रश्नच नाही कोणत्याही देश कालाची गरज नाही .तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला हा माझ्या विश्रांतीचे स्थान असून मी त्याला जबरदस्तीने माझ्या हृदयात साठवीन.


अभंग – १०५२
बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरीभक्त । कृपावंत मानसीं ॥१॥
म्हणवी म्हणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥
असे भूतदया मानसीं । अवघा देखे हृषीकेशी । जीवें न विसंबे त्यासी । मागें मागें हिंडतसे ॥२॥
तुका म्हणे निर्वीकार । शरणागतां वज्रपंजर । जे जे अनुसरले नर । तयां जन्म चुकलें ॥३॥

अर्थ

ज्याच्या जवळ अनेक जन्मीचे संचित आहे ज्याचे चांगले संचित आहे तोच मनुष्य खरा कृपावंत व निस्सीम हरिभक्त आहे असे समजावे. सर्वभावे विठ्ठलाला शरण जाण्याचा ध्यास धरणाऱ्या व्यक्तीच्या दासाचा ही दास विठ्ठल स्वतःला समजतो.जो भक्त विठ्ठलाला काया वाचा मनाने शरण गेलेला असतो, जे भक्त भूतमात्रांना विषयी दया धरतात आणि सर्वत्र हा ऋषिकेश आहे असे पाहतात अशा भक्तांना हा ऋषिकेश मनापासून कधीही विसरत नाही आणि त्याच्या मागे मागे सारखा फिरत असतो .तुकाराम महाराज म्हणतात हा देव निर्विकार आहे आणि शरण आलेल्या भक्तांना हा वज्र पंजर आहे जे जे नर त्याला अनुसरतात त्यांची जन्म-मरणाची फेऱ चुकले आहेत.


अभंग – १०५३
तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥
लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥
जाला हरीनामाचा तारा। सीड लागलें फरारा ॥२॥
तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥३॥

अर्थ

चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर नावाचे बंदर आहे व त्या ठिकाणी विठ्ठल रुपी जहाज लागले आहे. हे संतांनो त्या विठ्ठलनाम रुपी जहाजामध्ये परमार्थ धनाच्या पुष्कळ राशी आहेत त्या तुम्ही लुटा या विठ्ठलनाम रुपी जहाजाला हरिनाम रुपये मोठे शिड लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात या हरिनाम रुपी जहाजा मध्ये ओझे वाहणारा मी एक हमाल आहे.


अभंग – १०५४
आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥१॥
यें वो यें वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दें गे ॥ध्रु.॥
पसरूनि चोंची । वचन हें करुणेची ॥२॥
तुका म्हणे बळी । आम्ही लडिवाळें आळीं ॥३॥

अभंग – १०५५
सकळीकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥१॥
रूप दाखवीं रे आतां । सहस्त्रभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥
शंखचक्रपद्मगदा। गरुडासहित ये गोविंदा ॥२॥
तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ॥३॥

अर्थ

हे विठ्ठला तुला प्रत्यक्ष पाहिल्यावर वाचून माझे समाधान होणारच नाही.सहस्रभुजानी मंडित असलेल्या हे हरी तुम्ही मला तुमचे तेच रूप दाखवा .हे गोविंदा तुम्ही शंख, चक्र, गदा सहित गरुडावर विराजित होऊन माझ्याकडे धावत यावे .तुकाराम महाराज म्हणतात हे कान्हा तुला पाहण्याकरता माझ्या नयनांना भूक लागलेली आहे.


अभंग – १०५६
पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥१॥
तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ध्रु.॥
ब्रम्हांडनायका । विश्वजनांच्या पाळका ॥२॥
जीवींचिया जीवा । तुका म्हणे देवदेवा ॥३॥

अर्थ

हे पतितपावन, दीनानाथा नारायना तुझे रूप माझ्या चित्तात नेहमी राहो आणि तुझे गुण माझ्या वाणीत नेहमी येवो. हे ब्रम्हांड नायका विश्वाच्या पालका, तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही देवांचे ही देव आहात आणि जीवांचे ही जीव आहात.


अभंग – १०५७
करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥१॥
लागो हाचि छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥
तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥

अर्थ

हे मना तू सदासर्वकाळ राम राम असा जप करण्याचे काम कर. मना तुला गोविंद गोविंद म्हणणे हा छंद लागू दे. तुकाराम महाराज म्हणतात मना माझ्या सारख्या गरिबाला तू एवढीच भीक घाल की माझे मन हरिनाम जप करेल.


अभंग – १०५८
आपुलिया लाजा । धांवे भक्तंचिया काजा ॥१॥
नाम धरिलें दिनानाथ । सत्य करावया व्रत ॥ध्रु.॥
आघात निवारी। छाया पीतांबरें करी ॥२॥
उभा कर कटीं । तुका म्हणे याजसाठीं ॥३॥

अर्थ

हा देव आपली लज्जारक्षण करण्याकरिता लगेच धावत येतो कारण या देवाने दीनानाथ हे नाव धारण केलेले आहे आणि त्याने भक्तांचे रक्षण करण्याचे व्रत घेतले आहे व ते व्रत खरे करून दाखविण्याकरिता त्याला त्याच्या नावाप्रमाणे वागावे लागते. हा देव भक्तांवर येणाऱ्या आघात त्याचे निवारण करतो आणि त्याच्या पीतांबरा ची शीतल छाया भक्तांवर सदासर्वकाळ राखतो. तुकाराम महाराज म्हणतात हा देव त्याचे दीनानाथ हे नाव खरे करण्यासाठी कमरेवर हात ठेवून सदासर्वकाळ उभा आहे.


अभंग – १०५९
साधावया भक्तीकाज । नाहीं लाज हा धरीत ॥१॥
ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥ध्रु.॥
भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥२॥
तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥३॥

अर्थ

आपल्या भक्तांची काम करण्यासाठी हा देव कोणत्याही प्रकारचे लाज धरत नाही. तो आपल्या भक्तांचे कार्य करण्याकरिता आपल्या शक्तीची कोणत्याही प्रकारे वंचना करत नाही. अशा विठ्ठलाला शरण जावे. या हरीने युद्धामध्ये भीष्माची प्रतिज्ञाही खरी केली आणि अर्जुनाचे रक्षणही केले. तुकाराम महाराज म्हणतात याचा साक्षी मी आहे त्यामुळे मी हरीला माझ्या चित्तात धारण करीत आहे.


अभंग – १०६०
धेनु चरे वनांतरीं । चित्त बाळकापें घरीं ॥१॥
तैसें करीं वो माझे आई । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु.॥
न काढितां तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥२॥
तुका म्हणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥३॥

अर्थ

व्यालेली गाय दूर रानात गेली तरी तिचे चित्त घरी आपल्या वासराकडे लागलेले असते .अगदी त्याप्रमाणे हे विठाबाई तुझे चित्त जरी सृष्टीची घडामोडी करण्याकडे असले तरीदेखील माझ्यावरही तुझे चित्त असू दे आणि मला तुझ्या पायात ठिकाणी आश्रय द्यावे. जसे पाण्यातून मासा बाहेर काढला की तो मासा तर फड करतो त्याप्रमाणे देवा तू माझे जीवन आहे आणि त्या जीवनातून मी वेगळा झालो की माझा जीव कासावीस होतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या जीवाला, प्राणाला आणि देहाला तुझीच आवड आहे आणि जर माझ्या जीवाला तुझी प्राप्ती होत नसेल तर मला याची मुळीच गरज नाही.


अभंग – १०६१
हरीजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥
रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तं अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥
दुर्वास हा छळों आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥२॥
द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केलें ॥३॥
न साहे चि बब्रु पांडवां पारिखा । दुराविला सखा बळिभद्र ॥४॥
तुका म्हणे अंगीं राखिली दुर्गंधी । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥५॥

अर्थ

हरीभक्तांची कोणीही निंदा करु नये कोणाकडूनही त्याची निंदा घडू नये आणि जर तसे झालेच तर ते गोविंदाला सहनच होत नाही. हा गोविंद भक्तांकरता अवतार धारण करतो आणि भक्तांना अभय देतो आणि दुष्टांना कष्ट देतो भय देतो. दुर्वास ऋषी अंबर ऋषींना छळण्याकरता आले पण हे भगवंताला सहन झाले नाही त्या हरीने आपले सुदर्शन त्यांच्या पाठीशी लावले व ते सुदर्शन त्यांना पीडा देत फिरु लागले. कौरवांनी भरसभेत द्रौपदीचा अपमान केला त्यामुळे या श्रीपती भगवानाला ते सहन झाले नाही ते रागावले व त्यांनी पांडवांना साहाय्य करुन या कौरवांची मदनशांती केली. ब्रभू हा पांडवांचा शत्रू होता ते हरीला सहन झाले नाही आणि आपल्या मोठया बंधूचे म्हणजे बलरामदादाचे दुर्योधनावर प्रेम होते असे असले तरी युध्दाच्या काळी हरीने बलरामदादाला योजना करुन तीर्थयात्रेस पाठवले व कौरवांचा नाश केला. तुकाराम महाराज म्हणतात, “अश्वत्थाम्याने गुपचूप हल्ला करुन पांडवांच्या पाचही पुत्रांचा वध केला त्यामुळे या भगवंताने त्या अश्वत्थाम्याच्या कपाळावरील मणी काढून त्याच्या सर्व अंगाला दुर्गंध येईल असे केले.”


अभंग – १०६२
ज्यासी आवडी हरीनामांची । तोचि एक बहु शुचि ॥१॥
जपे हरीनाम बीज । तोचि वर्णांमाजी द्विज ॥२॥
तुका म्हणे वर्ण धर्म । अवघें आहे सम ब्रम्ह ॥३॥

अर्थ

ज्याला हरिनामाची आवड आहे तोच एक पवित्र आहे. जो मनुष्य वेदाचे बीज हरिनाम सदासर्वकाळ जपतो तो चारी वर्णा मध्ये खरा ब्राम्‍हण होय. तुकाराम महाराज म्हणतात सर्व प्रकारची वर्णधर्म हे समान असून एक ब्रम्‍हच आहे.


अभंग – १०६३
विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥
आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥ध्रु.॥
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजिवनी ॥२॥
रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥३॥

अर्थ

हे विठ्ठलाचे मला नाम माझ्या हृदयात साठवून ठेवायला आणि त्याचे गीत गाण्यात खूप आवडते गोड वाटते. हे जीवन म्हणजे विठ्ठलच आहे .टाळ-चिपळ्या खरेतर हेच आमचे धन आहे आमच्या वाणीने विठ्ठल विठ्ठला म्हणणे हेच आमचे अमृत संजीवनी आहे .तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्वांग हे विठ्ठलाच्या रंगात रंगून गेले आहे.


अभंग – १०६५
म्हणे विठ्ठल ब्रम्ह नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥१॥
मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु.॥
नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥२॥
तुका म्हणे नाहीं। त्याची भीड मज कांहीं ॥३॥

अर्थ

जो विठ्ठलाला ब्रम्‍ह मानत नाही त्याचे कोणतेही बोल ऐकू नयेत .मग तो कोणीही एक असो एवढेच काय तो ब्रम्‍हदेव जरी असला तरीही त्याचे कोणीही ऐकु नये. ज्याला विठ्ठलच माहित नाही त्याचे डोळ्याने दर्शनही घेऊ नये .तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी विठ्ठलाला मानत नाही ज्याला कोणाला विठ्ठलाचे ज्ञान नाही मग तो कोणीही असो मला त्याची भीड नाही.


अभंग – १०६६
एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥१॥
मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥
मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तोचि वरी माप भरी ॥२॥
तुका म्हणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥३॥

अर्थ

हे लोकांनो तुम्ही एखाद्या माणसाचे स्मशानात दहन झालेले पाहता मग त्या योगाने तुम्ही सावध का बरे होत नाहीत? जोपर्यंत तुम्ही काळाच्या आधीन झालेले नाहीत तोपर्यंत तुम्ही भय पूर्वक आक्रोश पूर्वक त्या देवाला हाका मारा. जेव्हा तुम्ही जन्मता तेव्हा तुम्ही तुमच्या पदरात मरणाची गाठोडे घेऊन येता.मनुष्य जगणे हे तोपर्यंत असते जोपर्यंत त्याच्या आयुष्याचे माप भरलेले नाही.तुकाराम महाराज म्हणतात जे लोक परमार्थ करण्यासाठी परमार्थाच्या मागे लागत नाही त्यांच्या जीवनाचा धिक्कार असो कारण मरणाचे मार्ग सारखे चालूच आहेत आणि त्या काळाच्या मनात आले तर तो आपल्याकडे आला तर तो आपल्या अंगाला हलु देणार नाही.


अभंग – १०६७
संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥१॥
म्हणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥
भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥२॥
तुका म्हणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥३॥

अर्थ

संतांना आपल्या सन्मानाची आवड मुळीच नसते परंतु असे असले तरी देखील संत आपल्याकडे आल्यानंतर जो त्यांचा अपमान करतो त्यांचे वाटोळे होते. त्यामुळे संतांनी आपला अपमान जेथे होते तेथेच जाऊच नाही. जे त्यांचा अपमान करतात ते लोक दुर्बळ असतात व त्यांच्या पापामुळे त्यांचा घात होतो .ज्यांच्या ठिकाणी भक्ती भाव नसतो त्यांनाच संता विषयी शंका निर्माण होते.ती चूक संतांना मान-सन्मान योग्य वेळेत न देणे यामुळेच होत असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांना संत दर्शनाने संकोच निर्माण होतो त्या ठिकाणी संतांनी जाणे अयोग्य असते.


अभंग – १०६८
संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥१॥
हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥
ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥२॥
तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥३॥

अर्थ

हे लोक हो अहो संसाराची संगती केली म्हणजे परमार्थ मध्ये लाभ होणे शक्य आहे काय ?जनावराने चघळुन टाकलेली चिपाटे त्यामध्ये चांगल्या प्रकारची वैरण असते काय आणि आपल्याला ती निवडता येईल काय? ढेकुन असलेल्या बाजेवर सुखाची झोप येईल काय आणि तशी कल्पना करून बोलणे देखील मूर्खपणाचे ठरेल .तुकाराम महाराज म्हणतात मद्य सेवन केल्यानंतर मनुष्य आपल्या देखील ढुंगणाची लंगोटि सोडून देण्यास भीत नाही इतकी ती मद्य बुद्धी भ्रष्ट करते आणि कोणी जरी चांगले विचार त्या मनुष्याला सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते चांगले विचार सांगणाऱ्या लोकांना दुष्ट समजतात.


अभंग – १०६९
पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥१॥
राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥
उद्धव अक्रूर व्यास आंबॠषि । भाई नारदासी गौरवीन ॥२॥
गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचें कवतुक वाटे मज ॥३॥
मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥४॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥५॥
नागो जगमित्रा नरहरी सोनारा । रोहिदास कबिरा सोईरिया ॥६॥
परिसा भागवता सुरदास सांवता । गाईन नेणतां सकळिकांसी ॥७॥
चोखामेळा संत जिवाचे सोइरे । न पडे विसर यांचा घडी ॥८॥
जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाठक हा कान्हा मिराबाई ॥९॥
आणीक हे संत महानुभव मुनि । सकळां चरणीं जीव माझा ॥१०॥
आनंदें ओविया गाईन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥११॥
तुका म्हणे माझा बळिया बापमाय । हर्षे नांदे राये घराचारी ॥१२॥

अर्थ

हे माझे सखे माझे बुद्धी पंढरी माझे माहेर आहे आणि दळताना कांडताना माझे माहेरा संबंधीच्या ओव्या तू गात जा .माझ्या माहेरी राई रखुमाबाई ,सत्यभामा या माझ्या माता व पांडुरंग माझा पिता आहे उद्धव, अक्रूर ,व्यास ,अंबऋषी नारद मुनी हे माझे बंधू आहेत व मी त्यांचा गौरव करीत आहे .गरुड लाडका बंधू आहे. पुंडलिकाचे मला फार कौतुक वाटते. मला माझ्या माहेरा मध्ये संत आणि महंत असे भरपूर गणगोत आहे मी त्यांना माझ्या गोव्यातून नित्य आठवींन निवृत्ती ,ज्ञानदेव ,सोपान, चांगदेव हे माझे जिवलग आहेत जगन मित्र नागो, नरहरी सोनार, रोहिदास ,कबीर हे माझे सोयरे आहेत परसाे भागवत, सूरदास व सावतामाळी यांचे गुणगान मी गाईन. चोखामेळा व इतर सर्व संत हे माझ्या जीवाची सोयरे आहेत त्यांचा विसर मला एक क्षणभर देखील पडत नाही. माझ्या जीवाचे जीवन म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य श्री एकनाथ ,कान्होबा पाटक व मीराबाई हे आहेत आणिकही संत महानुभव व मुनी आहेत त्यांच्या सर्वांच्या चरणी माझा जीव आहे. जे वारकरी आनंदाने पंढरी जातात मित्रांसाठी आनंदाने वोव्या गाईन. तुकाराम महाराज म्हणतात हे माझ्या सखे बुद्धी हा माझा मायबाप पांडुरंग तो सर्वात असून तो सर्वांमध्ये चराचरामध्ये आहे व सर्वश्रेष्ठ आहे.


अभंग – १०७०
जातीचे ते चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥१॥
ते काय गुण लागती येरां । कागा न शोभे पिंजरा ॥ध्रु.॥
शिकविलें तें सुजात सोसी । मग मोल चढे त्यासी ॥२॥
तुका म्हणे वेषधारी ॥ हिजड्या नव्हती त्या नारी ॥३॥

अर्थ

जे आपल्या जातिचे(हरी भक्तां विषयी महाराज बोलतात) असतात त्यांच्याविषयी प्रेम अधिकच वाढते .पोपट हा पक्षी आपण पाहिला आहे त्याला जर आपण राम राम म्हणा यास शिकवली तर तो राम राम म्हणतो म्हणून त्याविषयी अधिक आनंद वाटतो .आणि हे गुण इतरांना लागू पडणार आहे काय म्हणजे कावळ्याला जर सोन्याच्या पिंजर्‍यात ठेवले तर ते शोभणार आहे काय तर नाही. जे उत्तम जातीचे आहेत तेच चांगले गुण ग्रहण करतात त्यामुळे त्यांना महत्त्व वाढते .तुकाराम महाराज म्हणतात जरी हिजड्याने चांगल्या प्रकारच्या साड्या नेसल्या तरी ते उत्तम जातीची स्त्रि बनू शकत नाही.


अभंग – १०७१
बसणें थिल्लरी । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥
नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥
फुगते काउळे । म्हणे मी राजहंसा आगळें ॥२॥
गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥३॥
मुलाम्याचें नाणें । तुका म्हणे नव्हे सोनें ॥४॥

अर्थ

डबक्यात बसलेला बेडूक सागराचा धिक्कार करतो कारण त्याला त्याचे डबके सरकारपेक्षा मोठी आहे असे वाटते .जे कधीही पाहिले नाही, जे माहितही नाही त्याचा तो बेडूक तोंडाने तिरस्कार करतो. कावळा स्वतःलाच फुगतो आणि अभिमानाने म्हणतो की मी राजहंस यापेक्षाही श्रेष्ठ आहे .एखादा गाढव म्हणतो मी हत्ती पेक्षाही फार चांगला आहे .तुकाराम महाराज म्हणतात नाण्याला सोन्याचा मुलामा जरी दिला तरी ते नाणे सोन्याचे नसते.


अभंग – १०७२
मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥
पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥
तुका म्हणे गेलें व्यर्थ वांयां विण । जैसा मृगसीण मृगजळीं ॥३॥

अर्थ

हा जीव मूळचा ब्रम्‍हस्वरूप आहे त्यामुळे तो नित्यमुक्त आहेच पण अविद्येमुळे देह माझा व देह संबंधी माझे या छंदाने मनुष्यजीव बद्ध झालेला आहे. मनुष्यजीव पाप-पुण्य स्वतःच्या अंगी जडवून घेतो व खरा कर्ता आणि भोक्ता कोण आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जसे हरिण मृगजळाच्या सत्यत्व भासामुळे, सत्यत्व भ्रमामुळे त्याच्या मागे धावून म्हणजे मृगजळाच्या मागे धावून कष्टी होते त्याप्रमाणे हे मनुष्य संसाराच्या बंधनात पडतात.


अभंग – १०७३
वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥१॥
राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ध्रु.॥
आशा धरोनि मनीं । कांहीं देईल म्हणऊनि ॥२॥
पोटा एका साठी । तुका म्हणे जाले कष्टी ॥३॥

अर्थ

काही लोक वरती तोंड करून देवाला प्रचंड हाक मारतात ,काही लोक आपल्या गायन कलेतून वेगवेगळ्या रागाने देवाला आळवतात ,पण देवाचे खरे स्वरूप काय आहे हे त्यांना काही कळत नाही .ऐकणारी लोक मला काही धन द्रव्य वगैरे देतील अशी अपेक्षा मनात धरून हे लोक इत्यादी क्रिया करतात .तुकाराम महाराज म्हणतात हे लोक पोटासाठी इतके कष्ट करतात परंतु परमार्थ हा त्यांचा मुख्य हेतू नसतो.


अभंग – १०७४
जाळी महा कर्मे । दावी नीजसुखवर्मे ॥१॥
ऐसे कळले आम्हां एक । झालो नामाचे धारक ॥ध्रु.॥
तपाचे सायास । न लगे घेणे वनवास ॥२॥
तुका म्हणे येणे । कळीकाळ हे ठेंगणे ॥३॥

अर्थ

महापातकांना जाळते व जे आत्मसुख दाखविते ते वर्म आम्हाला समजले आहे ते वर्म म्हणजे हरीचे नाम होय. आणि आम्ही नामाचे धारक झालो आहोत .नामाचे वर्म आम्हा हाती लागल्यामुळे आता तपाचे व वनवासात जायचे कष्ट सोसावे लागणार नाही तुकाराम महाराज म्हणतात नामजप केल्यामुळे कळिकाळा आम्हाला आता भीत आहे.


अभंग – १०७५
ये हरी मज कृपा देई दान । नासी तिमिर दाखवी चरण । आर्त पुरवावे भेटी देऊन । नको उपेक्षुं आलिया शरण ॥१॥
काम क्रोध अहंकार नको देही । आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही । वास पंढरीचा जन्म सदा देई । आणिक दुजे मागणे तुज नाही ॥ध्रु.॥
नाम अखंड हृदयी राहो वाणी । नको पडो विसर क्षण जागृती स्वप्नी । संत समागम ऐसा दे लाऊनि । आणीक दुजे काहीं नेणें तुज वाचुनी ॥२॥
पंथ पुरींचा रवी सुत पुरे आतां । आड करावा भवसिंधू ऐसा नव्हता । नाही अडथळा त्रेकोल्या माजी सरता । विनवी तुकया बंधू चरणी ठेउनी माथा ॥३॥

अर्थ

हरी तू लवकर ये आणि मला तुझ्या कृपेचे दान दे .माझ्या जीवनातील अहंकाराचा अज्ञानाचा नाश कर आणि तुझे चरण मला दाखव. देवा माझी‌ अार्त इच्छा माझ्या अंतकरणातील इच्छा तू पूर्ण कर. मी तुला शरण आलो आहे तू मला भेट दे आणि माझी उपेक्षा तू करू नको. हे देवा तू माझ्या देहामध्ये काम,क्रोध ,आशा, तृष्णा ,अहंकार ,माया , लज्जा ,चिंता काहीच राहू देऊ नको. सदासर्वकाळ पंढरी त राहीना असा जन्म दे बाकी अणिक दुसरे काही मागणे माझे तुझ्यापाशी नाही देवा. तुझे नाव माझ्या हृदयात, वाणीत अखंड राहू दे मला तुझा विसर जागृती व स्वप्नात देखील एक क्षणभरसुद्धा पडू देऊ नकोस. देवा मला असा संत समागम लाभू दे की तुझ्या वाचून मी दुसरे काहीच जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा रविपुत्रं जो‌ यम त्याच्या गावी जाण्याचा रस्ता आहे तिकडे जाण्यास चालले नको त्या वाटेने जाणे नको व त्यामुळे या भवसिंधूला तू माझ्या पुढून नाहीसे कर देवा तुमच्या या कर्तव्याला त्रैलोक्या मध्ये कोणीही अडथळा करणार नाही त्यामुळे मीच तुमच्या चरणावर मस्तक ठेवून तुम्हाला हि विनंती करत आहे.


अभंग – १०७६
तट्टाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लहान नेणे ॥१॥
परी तो त्या विशेष मनुष्य होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥
बेरसा गाढव माय ना बहीण । भुंके चवीविण भलतें चि ॥२॥
तुकयाबंधु म्हणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥३॥

अर्थ

तट्टाच्या जातीला भीड नसते त्यामुळे तो कोणालाही वाटेल त्याला लाथ मारतो कारण लहान-थोर हे त्याला काहीच समजत नाही .परंतु विशेष असे की मनुष्य जन्म जरी मिळाला तरी काही मनुष्यांना ज्येष्ठ-श्रेष्ठ समजत नाही आणि समजत नसेल तर तो त्यांची मानखंडना करत असतो आणि असे असेल तर तो त्या तट्टा पेक्षाही नीच जातीचा आहे असे समजावे .जर एखादा मनुष्य आपल्या आईला व बहिणीला वाटेल तसे बोलून भुंकत असेल तर तो मनुष्य नाही तो गाढवच आहे असे समजावे. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की बोकड माजले तर कोणताही विचार न करता स्वतःच्या तोंडात मुततो.


अभंग – १०७७
मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥
आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥
मद्यपीतो पुरा अधम जातीचा । तया उपदेशाचा राग वांयां ॥२॥
तुकयाबंधु म्हणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥३॥

अर्थ

या ठिकाणी महाराज एक अत्यंत घाण शिवी देतात व म्हणतात जो मनुष्य जेष्ठ श्रेष्ठांची मानखंडना करतो त्यांचा अपमान करतो तो मनुष्य गाढवाच्या पोटी जन्मला आहे असे समजावे म्हणजे तो मनुष्य गाढवाचे बीज आहे हे सहज लक्षात येते .ज्याने श्रेष्ठांच्या वचनांचा अपमान केलेला आहे त्या मनुष्याची हीच खून आहे की तो गाढवाच्या पोटी जन्माला आलेला आहे हे ओळखून घ्यावे. मद्यपी मनुष्य तोही त्याच जातीचा असतो त्याला जर कोणी चांगला उपदेश केला तर तो उपदेश करणाऱ्यावर व्यर्थच रागवत असतो .तुकया बंधू कान्होबा म्हणतात की पिसाळलेले कुत्रे हे कोणालाही चावत सुटते त्याला आपले आणि परके हे कोणीही कळत नाही.


अभंग – १०७८
मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथ्वीचा भार वाहावया ॥१॥
काय धाक आम्हां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥
शंखचक्रगदा आयुधें अपार । वागवितो भार भक्तांसाठी ॥२॥
पांडवां जोहरी राखिलें कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥३॥

अर्थ

मत्स्य, कूर्म ,शेष हे मोठे अवतार आहेत पण त्यांना पृथ्वीचा भार वाहण्यासाठी कोणाचा आधार आहे तर त्यांना या देवाचा आधार आहे .आणि असा देव आमचा सहाय्य करणारा असताना आम्हाला कोणाची व कशाची चिंता असणार आहे? आमचा देव भक्तांसाठी शंख, चक्र, गदा असे आयुधे अनेक वागवीत असतो. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की पांडव लाखेच्या घरात सापडले होते त्यावेळी त्यांना युक्तीने ज्या देवाने बाहेर काढले तो देव माझा कैवारी झाला.


अभंग – १०७९
राम म्हणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥
राम म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नासही ॥ध्रु.॥
राम म्हणतां जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधी ॥२॥
राम म्हणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥३॥
राम म्हणतां धर्म घडती सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥४॥
राम म्हणतां म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥५॥

अर्थ

राम नाम घेतले की काम ,क्रोधाचे दहन होते ते जळून जातात .आणि अभिमान तर देशोधडीला जातो राम म्हटले तर भव बंधन हे देखील तुटून जातात आणि कोणत्याही प्रकारचे स्वप्नातही श्रम येत नाही .रामाचे नामस्मरण जरी केले,स्मरण केले तर जन्म-मृत्यू टळतो म्हणजे गर्भवास पुन्हा पुन्हा होत नाही .आणि तो मनुष्य कधीही दारिद्र्यास पात्र होत नाही. रामाचे नाम घेतले की यम देखील दरिद्री होऊन आपल्याला शरण येतो .आणि त्यामुळे अमरपणा आपल्याला प्राप्त होतो ,ध्रुवाला‌ जे अढळपदाची आपल्याला प्राप्त झालेल्या अमरपणा पुढे काय माहिती आहे ?राम नाम घेतले की सर्व धर्म घडतात आणि डोळ्यावर जे अज्ञानाचे पडळ आलेल्या आहे ते क्षणात नाहीसे होतात. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की रामाचे नाम अंतकरणापासून घेतले की हा भवसिंधु सहजच मनुष्य तरुण जाईल त्याचा उद्धार होईल यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही.


अभंग – १०८०
मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥
चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥
केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंतातळमळ नाहीं ऐसी ॥२॥
काळें तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र जालें सज्जनसखें ॥३॥
तुकयाबंधु म्हणें अवघ्या दशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥४॥

अर्थ

हे चक्रपाणी मायबापा तुझ्या नामावरून व गुणावरून मी माझा देह देखील ओवाळून टाकीन ,कारण तुझ्या गुणाने व नामाने माझी सर्व दुःखे चुकविले व मायेचा वळसा चुकविला आणि माझे सर्व आशा पाश त्याने तोडून टाकले आहे .मी त्रिविध तापाने तप्त झालो होतो त्यावेळी मला तुझ्या नावाने शितल केले त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता आणि तळमळ मला राहिलेली नाही. तुझ्या नामामुळे हा काळ देखील घाबरतो त्याचे तोंड काळे करून लपून तो बसलेला आहे व सर्व भूतमात्र माझे सखे सज्जन सोयरे झाले आहेत. तुकया बंधू कान्होबा म्हणतात हे परेशा तुझ्या नामचिंतनामुळे दाहीदिशा माझ्यासाठी मुक्त झाल्या आहे असे मला दिसू लागलेले आहे.


अभंग – १०८१
आतां मागतों तें ऐके नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां ॥१॥
असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥
मातेचिया परी देखती परनारी । ठेवीं नेत्र तरी नाहीं तरी नको ॥२॥
तरी बरें कंटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तरि कानांचा ही देख प्रयत्न ॥३॥
सकळ इंद्रियांचा निग्रह करूनि एक । राखवीं पृथक तोडोनि भ्रम ॥४॥
तुकयाबंधु म्हणे तेचि वाट प्राणां । पडता नारायणा विसर तुझा॥५॥

अर्थ

हे नारायणा आता मी तुला जे काही मागत आहे ते तू भावपूर्वक व मनापासून ऐक. माझी जिव्हा तुझे गुणगान गात असेल तर तिला मोकळि ठेव जर माझ्या जीव्हेने तुझे गुणगान गायले नाही तर तिला खिळवून ठेव नाही तर‌ मुकी कर .आणि परनारी ला जर माझ्या डोळ्यांनी मातेसमान पाहिले तरच त्यांना माझ्याजवळ ठेव नाही तर त्या डोळ्यांची देखील मला गरज नाही. एवढे तरी बरे आहे की माझ्या कानांना कोणाचीही निंदा किंवा स्तुती ऐकवत नाही त्याचा मला कंटाळा आहे आणि जर त्यांना कोणाची निंदा किंवा स्तुती ऐकायची असेल तर ते कान बहिरे करून टाक .माझ्या सर्व इंद्रियांचा निग्रह कर व त्यांचा भ्रम तोडून टाका आणि माझे सर्व इंद्रिय तुझ्यापाशी राख. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की हे नारायणा मला जर तुझा विसर पडला तर माझे प्राणही मला नको त्यांना तू वाटे लाव म्हणजे ठेवू नको.


अभंग – १०८२
नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥१॥
परउपकारीं वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥ध्रु.॥
द्वैतांद्वैतभाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥२॥
जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥३॥
उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ती मानव तो ॥४॥
तुकयाबंधु म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥५॥

अर्थ

आपली जात विसरून जो सर्व प्राणिमात्रांना नमस्कार करतो त्यांनीच आपली आत्मस्थिती जाणली असे समजावे. जो परोपकार करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतो त्यानेच आपली आत्मस्थिती जाणली आहे असे समजावे. ज्याच्या चित्ता मध्ये द्वैत आणि अद्वैत हा भावच नाही त्याने आपली आत्मस्थिती झाली आहे .ज्याच्या वाणीमध्ये कोणाविषयी ही निंदा किंवा स्तुती येत नाही त्याने आपली आत्मस्थिती जाणली आहे. ज्याला उचित व अनुचित धर्मनीती समजते आणि देवाविषयी भक्तिभाव ज्याच्या चित्ता मध्ये आहे त्याने मानव जन्माला येऊन आपल्या जन्माचे सार्थक केले असे समजावे. तुकया बंधू कान्होबा म्हणतात या व्यतीरिक्त जर कोणी वागत असेल तर तो व्यक्ती संसाराचा भार वाहणारा गाढवच आहे असे समजावे.


अभंग – १०८३
चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्यें देखो ॥१॥
उत्पत्तीसंहारकरिता जो पाळण । तो नंदा नंदन म्हणवीतसे ॥ध्रु.॥
असुर तोडरी दैत्यांचा काळ । जाला द्वारपाळ बळीचा तो ॥२॥
लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्ट कवळा पसरी मुख ॥३॥
तुकयाबंधु म्हणे चतुरांचा रावो । भावे तो पाहा हो केला वेडा ॥४॥

अर्थ

ज्या देवाने आपल्या दाढी मध्ये चवदा भुवने आणि तीनही लोकाला कवळले आहे तो देव भक्तांच्या भक्ती करता अगदी छोट्या म्हणजे संपुटा मध्ये राहतो. जो देव या सृष्टीचा उत्पन्न संहार आणि पालन कर्ता आहे तोच देव मी नंदाचा बाळ आहे असे म्हणून घेतो .ज्या देवाने सर्व दैत्यांचा संहार करून त्यांची पैजन करुन पायात बांधले तोच देव बळीराजाच्या भक्ती करता त्याच्या दारात त्याच्या दाराचा द्वारपाल झाला. लक्ष्मीचा पती क्षीरसागरा मध्ये निवास करतो तोच नारायण आपल्या गोकुळातील भक्तांचे उच्चिष्ट खाण्याकरता मुख्य पसरतो. तुकया बंधू कान्होबा म्हणतात हा देव चतुरांचाही चतुर आहे पण भक्तांच्या भक्ती करता तो कसा वेडा झाला आहे ते तुम्ही पहा.


अभंग – १०८४
कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं ।
जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥१॥
भला पुंडलिका भला । महिमा नव जाय वर्णिला ।
दगा देउनि अवघियांला । सांठविलें अविनाश ॥ध्रु.॥
केले एके घरीं केणें । भरलीं सदोदित दुकानें ।
दुमदुमलीं सुखानें । हे भाग्याची पंढरी ॥२॥
तुकयाबंधु म्हणे किल्या । संताचे हातीं दिल्या ।
आंगावेगळें आपुल्या । टाकुनि जाला मेहेमान ॥३॥

अर्थ

या पुंडलिकाची महती किती आहे पहा जो ब्रम्हांडनायक परमात्मा आहे त्याला त्याने आपल्या हातोहात येथे आणले असून त्याला आपलेसे केले. हा पृथ्वी पती त्याने आपला केला अशी अद्भुत ख्याती या पुंडलिकाची आहे पुंडलिका तु धन्य आहे तुझे हे सुकृत्य नावाजाण्यासारखे आहे. तू सर्व विकारांना दगा देऊन अविनाशी पांडुरंग आपआपल्या हृदयात साठविला आहे. तुझा हा महिमा कसा वर्णन करू पांडुरंग रुपी मला तू एका घरी आणलास पण त्यामुळे याठिकाणी परमार्थाची मोठे मोठे दुकाने लागले आहे त्यामुळे ही पंढरी गजबजून गेली आहे व त्यामुळे सर्वत्र सुख आले आहे. आणि त्यामुळे ही पंढरी भाग्याची आहे .तुकया बंधू कान्होबा म्हणतात ज्या दुकानांमध्ये हा पांडुरंग रुपी मला भरलेला आहे त्या दुकानाच्या किल्ल्या आम्ही संतांच्या स्वाधीन केल्या आणि हे पुंडलिका तू आपल्या देहापेक्षा वेगळे टाकून त्यापासून वेगळा झाला हे तुझे मोठे महात्म्य आहे .


अभंग – १०८५
केली हर्णाळां अंघोळी । येऊनी बैसलों राउळीं ॥१॥
आजिचें जालें भोजन । रामकृष्ण नारायण ॥धृ॥
तुकयाबंधू म्हणे नास । नाहीं कल्पांती जयास ॥२॥

अर्थ

मी वाहत्या पाण्यामध्ये स्नान करून देवळामध्ये येऊन बसलो आहे .आज माझे जेवण झाले ते म्हणजे रामकृष्ण नारायण यांनीच .तुकया बंधू कान्होबा म्हणतात की त्यामुळे माझा कल्पांतातही नास होणे अशक्य आहे.


अभंग – १०८६
तुजलागीं माझा जीव झाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥१॥
सांडिला व्यवहार माया लोकाचार । छंद निरंतर हाचि मनीं ॥ध्रु.॥
आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण करिताति ॥२॥
प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥३॥
तुका म्हणे आतां कोणता उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥४॥

अर्थ

हे पांडुरंगा तुझ्या भेटी करता माझा जीव वेडापिसा झाला आहे. मी दहाही दिशा तुलाच पाहत फिरतोय. देवा मी तुझ्या भेटीसाठी सर्व माया,मोह ,व्यवहार ,लोकांचार सोडला आहे आणि सतत तुझ्या भेटीचा छंद मी धरला आहे. देवा तुझ्या स्वरूपाचे वर्णन मी संतांच्या मुखातून ऐकले आहे आणि ते पाहण्याकरिता मी सिण करतोय म्हणजे तळमळ करत आहे. पाण्यावाचून मासा जसा तळमळ करतो ना देवा तसाच माझा जीव तुझ्या भेटी करता कासावीस होत आहे .तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता असा कोणता उपाय करू की जेणेकरून मला तुझ्या पायाची प्राप्त होईल ते तूच मला सांग.


अभंग – १०८७
कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हां कोणा ॥१॥
लागतसें पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु.॥
गुण रूप याचे वाणिती या संतां । मज क्षेम देतां सुख वाटे ॥२॥
सर्वस्वें हा जीव ठेवीन चरणीं । पांडुरंग कोणी दावी तया ॥३॥
तुका म्हणे गाईवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥४॥

अर्थ

हे लोकांनो हा विठ्ठल कोणत्या गावाला आहे हे तुम्हाला माहीत आहे का आणि तुम्हाला जर माहित आहे तर तुम्ही मला कृपा करून सांगा मी तुमच्या पाया पडतो वाटेल तर लोटांगण घालतो पण मला त्याची वार्ताह कुणीतरी सांगा .या विठ्ठलाचे गुण व रूप जे कोणी संत करतात त्यांना आलिंगन देताना मला फार सुख वाटते .मी माझा सर्व जीवभाव त्यांच्या चरणावर अर्पण करीन जे मला हा पांडुरंग दाखवितील. तुकाराम महाराज म्हणतात की जसे गाय आणि वासरू यांच्यात ताटातूट केल्यानंतर त्यांना प्रत्यक क्षण दुःखाचा जातो त्याप्रमाणे मला या विठ्ठला वाचून प्रत्येक क्षण दुःखाचा जात आहे.


अभंग – १०८८
विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥
विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥
विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥२॥
विठ्ठल हे जन विठ्ठल माझें मन । सोईरा सज्जन विठ्ठल माझा ॥३॥
तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । त्वरित गांवा जाइन त्याच्या ॥४॥

अर्थ

विठ्ठल हा माझा जीव भाव आहे कुळधर्म आणि माझा देवही हा विठ्ठलच आहे .विठ्ठलच माझा गुरु आहे आणि तोच मला या भवसागरातून तारणारा आहे आणि या भवसागरातून पार लावणारा आहे .विठ्ठलच माझी माता ,पिता ,बहीण ,बंधू ,चुलता सर्व जे काही आहे ते सर्व विठ्ठलच आहे .विठ्ठलच माझे जण आहे विठ्ठलच माझे मन आहे .सोयरा आणि सज्जन हे देखील विठ्ठलच आहे .तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हाच माझा विसावा आहे त्यामुळे मी त्वरित त्याच्या गावाला जाईन.


अभंग – १०८९
एकाचिये सोई कवित्वाचे बांधे । बांधिलिया साधे काय तेथें ॥१॥
काय हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुनि काय ॥ध्रु.॥
कवित्वाचे रूढी पायां पडे जग । सुखावोनि मग नरका जाय ॥२॥
तुका म्हणे देव केल्याविण साहे । फजिती ते आहे लटिक्या अंगीं ॥३॥

अर्थ

एखाद्या प्रासादिक कवीने शब्दांची जुळवाजुळव करून कविता तयार केली आणि त्याच्या शब्दाची चोरी करून दुसऱ्या एखाद्या कवीने दुसरे काव्य तयार केले तर त्या काव्यापासून त्याला काय लाभ होणार आहे? भुसाचे जर कांडण केले तर त्यापासून काय होणार आहे त्याप्रमाणे सत्याची पायमल्ली करून काय उपयोग होणार आहे? एखाद्या प्रसादिक कवीच्या कवितेतील शब्द चोरून त्याच शब्दा द्वारे नवीन काव्य तयार करून तो कवी व त्यांची कविता ही जगामध्ये मानसन्मानास पात्र होईल परंतु असे केल्याने तो कवी सुखासुखी नरकाला जाईल. तुकाराम महाराज म्हणतात देवाची प्राप्ती झाल्यावाचुन केलेले काव्य म्हणजे केवळ खोटे आहे आणि शेवटी त्याची फजिती तर होते.


अभंग – १०९०
भल्याचें दर्शन । तेथें शुभचि वचन ॥१॥
बोलावी हे धर्मनीत । शोभे होत नाही हित ॥ध्रु.॥
मर्‍यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरी ॥२॥
तुका म्हणे बहु । लागे ऐसे बरे मऊ ॥३॥

अभंग – १०९१
आवडीनें धरिली नांवे । प्रियभावे चिंतन ॥१॥
वेडा जाला वेडा जाला । लांचावला भक्तीसी ॥ध्रु.॥
निचाड हा चाड धरी । तुळसीं करी दळ मागे ॥२॥
धरिला मग न करी बळ । तुका म्हणे कळ पायी ॥३॥

अर्थ

देवाने भक्तांच्या आवडीनुसार अनेक रूप व नाव धारण केलेले आहे. व हे हरिभक्त त्या देवाचे नाम आवडीने घेतात. देव वेडा झाला आहे अतिशय वेडा झाला आहे तो भक्तांच्या भक्ती करता लाचावला आहे .या देवाला कसल्याही प्रकारची इच्छा नसते परंतु मनात इच्छा धरून भक्तांना आवडीने तुळशीपत्र तो मागत असतो. तुकाराम महाराज म्हणतात की एकदा जर त्याचे पाय प्रेमाने घट्ट धरले तर त्याचे काहीच चालत नाही त्याला म्हणजे विठ्ठलाला जिंकण्याची खरी किल्ली त्याच्या पायातच आहे.


अभंग – १०९२
कंठी राहो नाम । अंगी भरोनियां प्रेम ॥१॥
ऐसे द्यावे कांही दान । आलो पतित शरण ॥ध्रु.॥
संतांचिये पायीं । ठेवींतो वेळोवेळां डोई ॥२॥
तुका म्हणे तरें । भवसिंधु एक सरे ॥३॥

अर्थ

देवा कंठामध्ये तुझे नाम राहो आणि हृदयातही तुझ्याविषयी प्रेम राहो असेच काही दान तू मला दे .मी पतित आहे म्हणून मी तुला शरण आलेलो आहे देवा .मी संतांच्या पायावर वेळोवेळी माझा माथा टेकवित आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी हा भवसिंधु एकाच दमात तरुन जाईल असेच मला दान द्या.


अभंग – १०९३
विठ्ठल विठ्ठल येणें छंदे । ब्रह्मानंदे गर्जावे ॥१॥
वाये टाळ टाळ्या टाळी । होईल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥
विठ्ठल आदी अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥२॥
तुका म्हणे विठ्ठलवाणी । वदा कानीं आईका ॥३॥

अर्थ

विठ्ठल या नामात ब्रह्मानंद आहे व त्या नामाच्या छंदात गर्जना करावी .नाम घेताना हाताने टाळी, टाळ वाजवाव्यात त्यामुळे सर्व विघ्नांची होळी होते .कोणतेही काम करताना कामाच्या आधी व शेवटी विठ्ठल नाम घ्यावे मनामध्येही विठ्ठलाचे स्मरण करावे .तुकाराम महाराज म्हणतात हे जन हो तुम्ही तुमच्या वाणीने विठ्ठलच म्हणा आणि कानाने ही विठ्ठलच ऐका.


अभंग – १०९४
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥
पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥
मूढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥२॥
तुका म्हणे खरें जालें । एका बोलें संतांच्या ॥३॥

अर्थ

पंढरीचे जे खरे वारकरी आहेत तेच मोक्षाचे खरे अधिकारी आहेत असा वर देवाने पुंडलिकाला दिलेला आहे .तो वारकरी मूढ असो ,पापी असो किंवा कसाही असो हा पांडुरंग त्याला आपल्या कासेला बांधून भवसागरातून पार करतो .तुकाराम महाराज म्हणतात पुंडलिकाने देवाला वर मागितला आहे की ‘हे देवा जे कोणी वारकरी तुझ्या दर्शनाला पंढरीला येतील तू त्यांना मुक्त कर’ या पुंडलिकाच्या वराला देवाने मान्य करून त्याचे म्हणणे खरे ठरविले.


अभंग – १०९५
अमृताची फळें अमृताची वेली । ते चि पुढे चाली बीजाची ही ॥१॥
ऐसियांचा संग देई नारायणा । वोलाचा वचना जयांचिया ॥ध्रु.॥
उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्ट कांती तैसी दिसे वरी ॥२॥
तुका म्हणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥३॥

अर्थ

अमृताची वेली असली की फळही अमृताचे तयार होईल आणि त्या फळापासून जे बीज तयार होईल पुढे त्याचाच सविस्तर होईल. त्याप्रमाणे हे नारायणा मला अशा संतांची संगती दे की ज्यांच्या अंतःकरणात मध्ये आणि त्यांच्या वचनांमध्ये भक्तीचा ओलावा असेल. उत्तम प्रकारचे अन्न सेवन केलेले असेल किंवा उत्तम प्रकारची पेये घेतल्याने घशाला शीतलता मिळते त्यामुळे अंगावर कांती व शरीरावर पुष्टी दिसते .तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडा शेजारी असणाऱ्या सर्व वृक्षांना चंदनाचा वास लागतो त्याप्रमाणे संतांच्या संगतीने संसारिक माणसांच्या अंगी संतांचे गुण आपोआप येतात.


अभंग – १०९६
पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥
मागील परिहार पुढें नाही शीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥२॥
तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तोचित्तीं निवडेना ॥३॥

अर्थ

हे संसारिक लोकांनो तुम्ही एकदा तरी पंढरीला नक्की जा कारण तेथे दिनाचा सोयरा पांडुरंग आहे. तो पांडुरंग भक्तांच्या भेटी करता फार उतावीळ आहे आणि भक्तांची वाट तो सारखी पाहत असतो. तो कृपाळू आहे आणि भेट घेण्याकरता तो तातडी करतो त्या पांडुरंगाचे एकदा जरी मनापासून दर्शन झाले की मागील परिहार म्हणजे संचित आणि पुढे होणारे कष्ट भोगावे लागणार नाहीत .तुकाराम महाराज म्हणतात की या पांडुरंगाकडे जे भक्त दर्शनासाठी येतात त्यांना तो दुसऱ्या कोणाच्याही हातात देत नाही आणि तो भक्तांच्या चित्तात एकदा की एकरूप झाला की काही केल्या वेगळा होत नाही तो भक्तांच्या चित्तात चिद्रुप होतो.


अभंग – १०९७
न कळे तें कळों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥१॥
न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥
न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥२॥
न भेटे तें भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥३॥
अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणतां वाचे ॥४॥
तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥५॥

अर्थ

श्रद्धेने विठोबाचे नाम घेतले की न कळणाऱ्या गोष्टीही आपोआप कळतात. जे काही अदृष्य स्वरूपात आहे तेही दिसू लागते केवळ विठोबाचे नाम स्मरण केले तर. जे बोलण्यासाठी अवघड आहे ते वेदार्थही आपण सहज बोलू शकतो केवळ विठ्ठलाचे नामस्मरण मनापासून करण्याची आवश्यकता आहे. ज्याची भेट ही अशक्य आहे त्यांची भेट ही‌ आपोआप होईल ते केवळ विठ्ठलाच्या नामस्मरणाने .अलभ्याचाही लाभ पुष्कळ होईल ते केवळ विठोबाचे नामस्मरण निरंतर आपल्या वाचेने केल्यानेच .तुकाराम महाराज म्हणतात जे लोक या भवसागरात आसक्त झालेले आहेत ते मनोभावे विठोबाचे नामस्मरण करतील तर ते देखील तरुण जातील.


अभंग – १०९८
बहुजन्में केला लाग । तो हा भाग लाधलों ॥१॥
जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥ध्रु.॥
गेलें मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥२॥
तुका म्हणे तांतड करूं । पाय धरूं बळकट ॥३॥

अर्थ

माझ्या अनेक जन्मीचे पूर्वपुण्य आहे की मला हा मनुष्यदेह प्राप्त झाला .मी या विठ्ठलाच्या चरणी माझा देह अर्पण करेल आणि संसाराची होळी करीन .एकदा की हा मनुष्य देह गेला की पुन्हा मिळत नाही याची चिंता मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता तातडी करून परमार्थ करावा लागेल आणि हरीचे पाय बळकट धरावे लागेल.


अभंग – १०९९
भक्तीप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥
आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्यां ॥२॥
तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥३॥

अर्थ

भक्ती प्रेम सुख हे हरीच्या भक्तांवाचून इतर कोणालाही समजणार नाही मग पंडीत असो, ग्रंथवाचक असो किंवा ज्ञानी असला तरी. मग कोणी आत्मनिष्ठ किंवा जीवनमुक्त जरी झाले तरी त्यांनाही भक्तीसुख दुर्लभ आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, “श्रध्देने तुम्ही या विठ्ठलाचे नारायणाचे नाम जर घेतले तरच तो नारायण कृपा करील आणि मग भक्तीसुखाचे रहस्य मर्म वर्म कळेल.”


अभंग – ११००
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची ती कळा काय जाणे ॥ध्रु.॥
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तूं नेणे ॥२॥
जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३॥

अर्थ

गाढवीनीने दूध दिले तरी त्या दुधाची बरोबरी गाईच्या दुधाशी होईल काय? कावळ्याच्या गळ्यामध्ये पुष्पांचा हार घातला तरी त्याला हंसाचे रूप येईल काय ?मर्कटाने जरी अंगाला बारा टिळे लावले तरी त्याला ब्राम्‍हणाप्रमाणे वर्तन करता येईल काय ?तर येणार नाही .तुकाराम महाराज म्हणतात ब्राम्‍हणाने जरी कर्म भ्रष्ट पणा केला तरी तो तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे म्हणजे चांगले कर्म करणाऱ्यांकडून एखादे कर्म चुकून वाईट जरी घडले त्याच्याकडून कर्म भ्रष्ट पानाचे वर्तन झाले तरी तो श्रेष्ठ होय .(या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात ‘तो ब्राम्‍हण’ म्हणजे नेहमी चांगले कर्म करणारा श्रेष्ठ ब्राम्‍हण.)


सार्थ तुकाराम गाथा १००१ ते ११०० माहिती समाप्त 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *