मातेविण बाळा – संत तुकाराम महाराज अभंग – 1838
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥
तैसें जालें माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥ध्रु.॥
वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिसा सिंधू ॥२॥
सारसांसी निशीं । ध्यान रवीच्या प्रकाशीं ॥३॥
जीवनाविण मत्स्य । जैसें धेनूलागीं वत्स ॥४॥
पतिव्रते जिणें । भ्रताराच्या वर्त्तमानें ॥५॥
कृपणाचें धन । लोभ्या लागीं जैसें मन ॥६॥
तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे ॥७॥
अर्थ
आई जर जवळ नसेल तर बालकाला कोणताही सुख सोहळा असेल तरी तो आवडत नाही. हे पंढरीनाथा तुझ्या वाचून अगदी माझ्या चित्तातही तसेच झाले आहे. चातक पक्षी पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत असतो. त्याच्या समोर सागर किंवा नद्या जरी भरून वाहत असल्या तरीही त्याला त्याची आवड नसते. सारस पक्षाला रात्रीच्या वेळी असे वाटते की, केव्हा एकदा सूर्य प्रकाश पडेल याचेच ध्यान लागत रहात असते. पाण्यावाचून मासा जगू शकत नाही आणि गाय आपल्या वासराकडे ज्याप्रमाणे ओढ घेते अगदी त्याप्रमाणेच देवा मला तुझी ओढ लागली आहे. पतिव्रता स्त्रीला आपला पती आपल्या बरोबर असल्यावरच ज्या प्रमाणेच सुखं वाटते, कृपण माणसाचे म्हणजे कंजूस माणसाचे मन जसे धना वाचून तरफडत असते. तुकाराम महाराज म्हणतात देवा अगदी त्या प्रमाणे माझे झाले आहे तुझ्या वाचून माझे प्राण राहणार आहेत काय?
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.