रज्जु धरूनियां हातीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1826
रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥१॥
तुम्हां आम्हां मध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावया ॥ध्रु.॥
सरी चिताकभोंवरी । अळंकाराचिया परी । नामें जालीं दुरी । एक सोनें आटितां ॥२॥
पिसांचीं पारवीं । करोनि बाजेगिरी दावी । तुका म्हणे तेवीं । मज नको चाळवूं ॥३॥
अर्थ
एखाद्या मनुष्याने हातामध्ये दोरी धरली आणि लहान मुलांना सांगितले की हा साप आहे, आणि त्या लहान मुलांना नंतर समजले की ही दोरी आहे तर ती दोरी दोघांनाही सारखीच असते. त्याप्रमाणे हे हरी तुमच्या व आमच्यामध्ये ही असाच काही एक प्रकार निर्माण झाला होता. आणि आम्ही या भवसागराच्या मृगजळाच्या पुरातून कसे तरून जावे याविषयी विचार करीत बसलो होतो.ज्याप्रमाणे सोन्याचे सरी, चित्तांक आणि बुगडी असे अलंकार केले व नंतर ते सर्व अलंकार एका भांड्यात ठेवून त्योचे आळवण केले तर खाली केवळ सोने हाच धातू राहतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा जसा एखादा गारोडी पिसांचा पारवा तयार करतो आणि लोकांची दिशाभूल करतो, त्याप्रमाणे तुम्ही मला फसवू नका
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.