काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥१॥
तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥
गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भीतरी राखियेलें ॥२॥
वधुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना मथुरेचें ॥३॥
पांडव जोहरीं राखिले कुसरी । विवरा भीतरीं चालविले॥४॥
तुका म्हणे हा भक्तंचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥५॥
अर्थ
ज्याने बाळपणीच काग ,बग ,रिठासुर मारले आणि सर्व दैत्यांची खानच बुडून टाकली. तो नंदाचा नंदन मला दाखवा कारण तो मला फार आवडतो. ज्यावेळी इंद्राने अतिवृष्टी करून गोकुळात संकट निर्माण केले त्यावेळी या श्री कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन गिरी पर्वत उचलून संपूर्ण गोकुळाचे रक्षण केले. ज्याने सोळा सहस्र राजकन्या पळवून नेल्या अशा भैमा सुराला या श्री कृष्णाने मारून टाकले व त्यां सोळा सहस्त्र राजकन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला व मथुरेचे राज्य त्याने उग्रसेनाला देऊन टाकले. ज्यावेळी पांडव लाक्षागृहात मध्ये झोपले होते त्यावेळी दुर्योधनाने त्या लाक्षागृहात आग लावली व या श्रीकृष्णाने कौशल्यतेने सर्व पांडवांना भुयारातून बाहेर काढून त्यांचे रक्षण केले . तुकाराम महाराज म्हणतात हा नारायण भक्तांचा कृपाळू आहे आणि दुष्टांचा काळ आहे
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.