घेईन मी जन्म याजसाठीं देवा – संत तुकाराम महाराज अभंग – 1810

घेईन मी जन्म याजसाठीं देवा – संत तुकाराम महाराज अभंग – 1810

घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥
हरीनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥
आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आम्हां ॥२॥
आणीक सायास न करीं न धरीं आस । होईन उदास सर्व भावें ॥३॥
मोक्ष आम्हां घरीं कामारी ते दासी । होय सांगों ऐसी तुका म्हणे ॥४॥

अर्थ

देवा मी जन्म घेईन तर केवळ तुझी चरण सेवा साधण्याकरीताच. मग मी हरिनाम कीर्तन करीन संतांची पूजन करीन आणि महाद्वारात लोटांगण घालीन. आम्ही जिथे कुठे राहू तेथे आनंदाने समृद्ध राहु. सुख आणि दुख यांची आवड तर आम्हाला राहिलीच नाही. तुझी चरण सेवा करण्यावाचून इतर कोणतेही कष्ट मी करणार नाही आणि कशाचीही इच्छाही धरणार नाही आणि मग या संसारापासून मी सर्वभावे उदास होऊन राहील. तुकाराम महाराज म्हणतात अहो मोक्ष तर आमच्या घरी काम करणारी दासीच आहे तिला आम्ही जसे काम सांगू तसे काम ती करते.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.