सिणलों दातारा करितां वेरझारा – संत तुकाराम महाराज अभंग – 1804
सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥१॥
न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥
मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥२॥
पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥३॥
पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥४॥
जन साह्यभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥५॥
कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥६॥
तुका म्हणे मज तुझाची भरवसा । म्हणऊनि आशा मोकलिली ॥७॥
अर्थ
हे दातारा मी या जन्ममरणाच्या येरझारा करुन करुन फार शीणलो आहे आता मला तू या संसारापासून सोडव. माझ्या पूर्वच्या संचित कर्माचा झाडा पाडा काही होत नाही त्याची बाकीच राहते त्यामुळे माझ्या या देहाच्या हाडाला जन्ममरणाचा खोडा घातला आहे. माझे मायबाप हे माझ्या या जन्मीच्या जीवाचे सांगाती आहेत ते देखील मला काळाच्या हाती देतील. यम सुरी पाजळून आणि काळाचा फासा हातात घेऊन माझ्या शेजारीच बसला आहे. यम माझ्या शेजारीच बसला असल्यामुळे त्याने हातात घेतलेली सुरी माझ्या पाठीपोटी लागली आहे व त्याने घेतलेला काळाचा फासा मला ओढून मला नरकाकडे नेत आहे. आणि या सर्व गोष्टीला हे सर्व लोक देखील साहाय्य होत आहेत आणि या सर्वांमध्ये मीच एकटा निराळा परदेशी आहे येथे मी तरी काय करणार आहे ? हे हरी कृपाळूवा तुझ्यावाचून इतर कोणीही मला काकूळतीला येणार नाही. कोणीही माझ्यावर दया करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला तुझ्यावाचून कोणावरही भरवसा नाही त्यामुळेच मी सर्व लोकांवरची आशाच सोडून देतोय.”
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.