कवणाचें कारण न लगेचि कांहीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1803

कवणाचें कारण न लगेचि कांहीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1803

कवणाचें कारण न लगेचि कांहीं ।सर्वी सर्वांठायीं तूं मज एक ।
कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काई न दिसे देवा ॥१॥
कवणा पाषाणासी धरूनिया भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां ।
म्हणऊनि निश्चित राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥ध्रु.॥
जळें जळ काय धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें ।
पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ समर्पीली ॥२॥
पितरस्वरूपी तूं चि जनार्दन। सव्य तें कवण अपसव्य ।
तुका म्हणे जीत पिंड तुझे हातीं । देऊनि निंश्चिती मानियेली ॥३॥

अर्थ

देवा आता मला कोणाशी काय कारण व कोणाची मला काहीही गरज नाही कारण सर्व ठिकाणी तूच व्यापून उरलेला आहे याचा मला अनुभव आला आहे. देवा मी माझे काया-वाचा-मन हे तुझ्या पायी ठेवले आहे आता काही उरले आहे असे मला दिसत नाही. आता मी देव समजून कोणत्या पाषणाच्या ठिकाणी भक्तिभाव धरू, जर सर्व पाषाण देव ठरवावे तर मी पाय कुठे ठेवू? देवा सर्व ठिकाणी तुझेच स्वरूप आहे हे मी ओळखले आहे त्यामुळेच मी निश्चिंत मनाने समाधानी होऊन राहिलो आहे. हा देह पंचमहाभूतांचा आहे त्यामध्ये पाणी ही आहे मग या पाण्याला तीर्थाच्या ठिकाणी जाऊन तीर्थाच्या पाण्याने धुतले तर कोणते पातक जाणार आहे? मी पापपुण्य वासना हे सर्व काही अविद्ये सह तुला समर्पण केले आहे देवा. तीर्थ स्वरूप तुच आहेस जनार्धन तूच पिता आहेस मग मी सव्य अपसव्य कशासाठी करेन? तुकाराम महाराज म्हणतात मी हा माझा जीव रुपी पिंड तुझ्या हाती दिला आहे व निश्चिंत झालो व मी समाधान मानले आहे.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.