तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा तोचि घडी झडो माझी ॥१॥
हें मज देई हें मज देई । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥
बहिरे कान तुझी कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जावोत डोळे ॥३॥
मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥३॥
हातपाय तेणें पंथे न चलतां । जावोत अनंता गळोनियां ॥४॥
तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका म्हणे गोड नाम तुझें ॥५॥
अर्थ
हे हरी ज्यावेळी माझ्या मुखाने तुझे नाम आवडीने घेतले नाही त्याच वेळी माझी जीभ झडून जावो. देवा हेच दान मला दे या पलीकडे दुसरे कोणतेही दान तुला मी मागत नाहीये . देवा मी तुझी कीर्ती माझ्या कानांनी ऐकली नाही तर माझे कान जावो मी बहिरा हवो आणि मी तुझे पाय माझ्या डोळ्याने पाहिले नाही तर माझी दृष्टीच जावो. देवा माझ्या मनाला जर तुझे ध्यान नित्य सर्वकाळ होत नसेल तर त्या मनाचा धिक्कार असो ती चांडाळ आहेत असे समजावे ते जळून जावो. देवा जर माझे हात तुला वंदन करीत नसतील तुझी पूजा करीत नसतील आणि माझे पाय तुझ्या मार्गाने चालत नसतील तर ते दोन्ही ही गळून जावोत. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुझ्या वाचून जगण्याची मला आवड नाही तुझे नाव नेहमी घ्यावे आणि ते नामच मला नेहमी गोड वाटते.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.