सज्जन तो शब्द सत्य जो मानी – संत तुकाराम महाराज अभंग – 1799
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥
एक गुण तो केला दो ठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥
भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥२॥
परउपकार घडे तोचि भला । नाठ्याळ तयाला दया नाहीं ॥३॥
जातिवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥४॥
हित तें अनहित केलें कैसें । तुका म्हणे पिसें लागलें यासी ॥५॥
अर्थ
जो वेद-शास्र-पुराणे व संत यांचे शब्द प्रमाण मानतो त्याला ‘ सज्जन ‘ म्हणावे ;आणि जो दुस-याला पीडा देतो त्याला दुर्जन म्हणावे .मुळात एकच सामान्य गुण असतो ;पण तो दोन ठिकाणी विभागला गेला ,म्हणजे ज्याचा जसा स्वभाव असेल त्याप्रमाणे तो विशेषत्वाला प्राप्त होऊन त्याच्या हिताला किंवा अनहिताला कारण होतो .जो सात्त्विक आहे ,तो दुस-याशी परिमित व सत्य बोलतो ,आणि जो वाचाळ आहे ,तो आपल्या वाणीने खोटे बोलतो .ज्याच्याकडून परमार्थ घडतो तो चांगला आणि जो नाठाळ असतो त्याला कोणाची दया येत नाही .जो शुध्द जातीचा व शहाणा असतो ,तो आपला अधिकार ओळखून मर्यादेने वागतो ;आणि जो अधम आहे ,तो आपला अधिकार न जाणता खुंटाप्रमाणे ताठ असतो .तुकाराम महाराज म्हणतात ,याप्रमाणे सद्गुणाने आणि दुर्गुणाने मनुष्याचे अनुक्रमे हित व अनहित होत असते .या मनुष्यदेहात सद्गुणाने हित होणे शक्य असूनही काही लोकांनी दुर्गुणाने अनहित का केले ?या उत्तरने त्यांना वेड लागले आहे .
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.