आतां काढाकाढी करो गा पंढरिनाथा – संत तुकाराम महाराज अभंग – 1798

आतां काढाकाढी करो गा पंढरिनाथा – संत तुकाराम महाराज अभंग – 1798

आतां काढाकाढी करो गा पंढरिनाथा । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥१॥
जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा स्वभावे प्राण घ्यावा ॥ध्रु.॥
मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥२॥
तुका म्हणे जाली अंधळ्याची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥३॥

अर्थ

हे पंढरीराया आता मला या भवसागरातून वरती काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा नाहीतर मी तुमचा दास झालो असून देखील वाया जाईल देवा. मी तर सर्व जाणत असून देखील दगडाच्या नावेत बसलो आहे त्या नावेचा स्वभावच आहे, स्वतःही बुडवावे व दुसऱ्याचाही बुडवून प्राण घ्यावा. इंद्रियांच्या ओढीने जेथे विषय आहेत तेथे धाव घेणे व त्या विषयांकडे धाव घेऊन स्वत:चे पतन करून घेणे हा मनाचा स्वभाव आहे व त्याचीच हाव त्याला होते. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी माझी गती ही आंधळ्या प्रमाणे झाली आहे आता त्यामुळे तू मला वाट दाखव.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.