सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण – संत तुकाराम महाराज अभंग – 1793
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥
आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं ढळों नये ॥ध्रु.॥
समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तपायरी ॥२॥
तुका म्हणे तरी म्हणावें सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥३॥
अर्थ
सेवकाला स्वामीची आज्ञा प्रमाण आहे .जोपर्यंत त्याच्या कुडीत प्राण आहे ,एवढेच काय पण प्राण जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवकाने आज्ञेचे पालन केलेच पाहिजे .स्वामीवाचून इतरांचे भय मनात धरू नये ,व स्वामीच्या आज्ञेप्रमाणे वागण्यात अंतर पडू देऊ नये .कदाचित स्वामीकडून धर्म-नीतीविरूध्द आज्ञा करण्याची चूक घडल्यास वेळप्रसंग पाहून एकान्तात त्यांची भेट घ्यावी ;व वज्र ज्याप्रमाणे पर्वताचा भेद करते ,त्याप्रमाणे त्यांना मार्मिक उत्तरे द्यावीत ;व त्यांना सन्मार्गावर आणावे .तुकाराम महाराज म्हणतात ,इतकी लक्षणे ज्याच्या ठिकाणी असतील ,त्याने स्वतःला ‘ सेवक ‘ म्हणवून घ्यावे ;व त्याने जे स्वामीचे अन्न खाल्ले असेल ,ते त्याच्या ख-या हक्काचे होईल .
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.