दिनेदिने शंका वाटे – संत तुकाराम महाराज अभंग – 1786
दिनेदिने शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥१॥
कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
विसरली मरण । त्याची नाहीं आठवण ॥२॥
देखत देखत पाहीं । तुका म्हणे आठव नाहीं ॥३॥
अर्थ
अर्थ:–संसारातील लोकांचे आयुष्य बघता, त्यांचा दिनक्रम बघता दिवसेंदिवस माझी या लोकांबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल शंका वाढत चालली आहे. ही बापुडी प्रापंचिक माणसे या दंभगिरीला किती खोलवर भुलतात याचे मला वाईट वाटते, आयुष्य किती गूढ आहे, मायेने किती भरलेले आहे व त्यातून स्वतःहून बाहेर येणे किती कठीण आहे किंबहुना स्वबळावर बाहेर येणे जवळ जवळ अशक्यप्राय आहे हे माहित नसल्याने ही बिचारी माणसे येथील दांभिक आयुष्याला भुलत चालली आहेत आणि विषयाच्या चक्रव्यूहात अडकत चालली आहेत.अशा या लोकांना मरणाचे स्मरण देखील राहिले नाही उलट माणसाला मरण असते हेच ते विसरली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात परंतु रोज लोक मृत्युमुखी पडत आहेत, ह्या ना त्या कारणाने त्यांचा अंत होत आहे व कमावलेले सर्व तसेच टाकून त्यांना जावे लागत आहे हे सर्व ही माणसे रोज आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत परंतु तरीही आयुष्याच्या खऱ्या सत्याचे त्यांना स्मरण नाही किंवा अजूनही कसे होत नाही ह्याचे आश्चर्य वाटते.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.