तुज दिलें आतां करीं यत्न याचा – संत तुकाराम महाराज अभंग – 1778

तुज दिलें आतां करीं यत्न याचा – संत तुकाराम महाराज अभंग – 1778

तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव वाचाकायामन ॥१॥
भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥
नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥२॥
वर्म नेणें दिशा हिंडती मोकाट । इंद्रियें सुनाट दाही दिशा ॥३॥
वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥४॥
तुका म्हणे मन इंद्रियांचे सोई । धांवे यासी काई करूं आतां ॥५॥

अर्थ

देवा मी तुला माझा जीव भाव काया-वाचा-मन सर्व काही अर्पण केले आहे तुच प्रयत्न करून यांचे रक्षण कर. हे दाता मी या भव सागरातील कर्म करून करून फार थकलो आहे या गोष्टीचा मला शीन झाला आहे त्यामुळे मी तुला शरण आलो आहे आता तु मला भवसागरातून तार. माझे येथे कोणीही नसताना मी त्यांच्यासाठी आजपर्यंत खूप अटाआटी केली आहे. देवा मला तुझ्या भक्तीचे खरे वर्म समजले नाही त्यामुळे माझे इंद्रिय आता दाही दिशेला मोकाट फिरत सुटले आहेत. मी या जन्म मरण रुपी फेऱ्यांमध्ये मध्ये खूप शिणलो आहे मला खूप त्रास झाला आहे त्यामुळे हे ऋषिकेशा आता तुम्ही माझा अंगिकार करा. तुकाराम महाराज म्हणतात माझे मन देखील इंद्रियाच्या सोबत विषयाकडे धाव घेत आहेत त्यामुळे हे देवा मी आता काय करू ते तुम्हीच मला सांगा.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.