चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति – संत तुकाराम महाराज अभंग – 1775
चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥१॥
एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥
क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥२॥
तुका म्हणे ऐसी बुद्धि ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥३॥
अर्थ
चंदनाच्या वनांमध्ये सर्पाची वस्ती असते परंतु जे खरच चंदनाच्या सुगंधाचा भोग घेणारे इच्छुक असतात ते लांब राहत असले तरी तेथे येऊन त्याचा सुगंध घेतात. देवा एकाने एखाद्या मालाचे ओझे वाहावे व त्याच मालाचा आनंद दुसऱ्याने घ्यावा असे घडणे म्हणजे केवळ संचिताचे भोग आहेत. गाईच्या स्तनामध्ये गोचीड चिटकलेला असतो परंतु गाईचे दूध ते पीत नाही रक्त पिते आणि दूर असलेले लोक त्या गाईचे शुध्द दूध पितात व भोग घेतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा ज्याच्याजवळ चांगली वस्तू आहे त्याचा वापर त्याला करता येत नाही अशी ज्याची बुद्धी जड आहे त्यापेक्षा मग दगड बरा आहे देवा.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.