कुळाचे दैवत ज्याचें पंढरीनाथ – संत तुकाराम महाराज अभंग – 1774
कुळाचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरीं ॥१॥
शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥
पंढरीस कोणी जाती वारकरी । होईन त्यांचे घरीं पशुयाति ॥२॥
विठ्ठलचिंतन दिवसरात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ॥३॥
तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥४॥
तुका म्हणे हाचि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥५॥
अर्थ
ज्याचे कुळदैवत पंढरीनाथ आहे मी त्याच्या घरी दासीचा पुत्र देखील होऊन राहील. देवा मला शुद्ध जाती, शुद्ध कुळ किंवा शुद्ध वर्णाची आवड नाही मला तू कोणत्याही जातीत कोणत्याही कुळात व कोणत्याही वर्गात जन्माला घाल परंतु तुझा दास करून घे देवा.जे कोणी वारकरी होऊन पंढरीस जाईल त्यांच्या घरी मी पशु देखील होऊन राहील. जे कोणी विठ्ठलाचे चिंतन रात्रंदिवस करतील विठ्ठलाचे ध्यान करतील त्यांच्या पायातील पायताण होऊन मी राहील. ज्यांच्या अंगणामध्ये तुळशीचे वृंदावन आहे त्यांच्या दारातील केरसुनी देखील मी होईल. तुकाराम महाराज म्हणतात देवा हीच एक इच्छा माझ्या मनात आहे इतर कोणत्याही गोष्टीची आवड माझ्या मनात नाही.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.