पतिव्रते आनंद मनीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1772

पतिव्रते आनंद मनीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1772

पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥१॥
जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥
सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥२॥
शूरा उल्हास अंगीं । गांढया मरण ते प्रसंगीं ॥३॥
शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥४॥
तुका म्हणे तोचि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥५॥

अर्थ

‘व्यभिचार करणे वाईट आहे’ असे ऐकताच जी पतिव्रता आहे ती मनापासून आनंदते परंतु शिंदळीच्या(व्यभिचारिण स्त्री) मनाला अशी वचने, असे शद्ब खोचक वाटतात आणि तिला ऐकताना देखील त्रास होतो.तसेच पुराणश्रवण करताना आचारशील व्यक्तीला सुख आणि समाधान लाभते परंतु दुराचारी व्यक्तीला ते दुःख देऊन जाते, त्यांचा जीव घुसमटतो.त्याप्रमाणेच शूर व्यक्ती रणांगण नजरेस पडताच उल्हसित होतो, त्याला रोमांच भरून येते परंतु फक्त शूर पणाच्या वार्ता करणाऱ्या पण मूळचा भित्र्या माणसाला मरण जवळ आल्यासारखे वाटते.शुद्ध सोने देखील आगीतून गेले असता उजळते परंतु हींन मिश्रित खोटा धातू काळवंडतो, त्याचे रूपच पालटते.
तुकाराम महाराज म्हणतात नुसते खोटे शब्द आणि देखावा ह्यांना आग लागो, मनाचा शुद्धपणा हा खरा सर्वात भला.कारण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्याची कसोटी घेतलीच जाते आणि मग खरे काय ते जगासमोर येतेच ज्याप्रमाणे खरा हिरा कितीही घाव घातले असता फुटत नाही, तो आहे तसाच अखंड राहतो.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.