बोलविसी माझें मुखे । परी या जना वाटे दुःख ॥१॥
जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥
कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥२॥
खाऊं नये तेंचि मागे । निवारितां रडों लागे ॥३॥
वैद्या भीड काय । अतित्याई जीवें जाय ॥४॥
नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥५॥
धन माया पुत्र दारा । हे तों आवडे नरका थारा ॥६॥
तुका म्हणे यांत । आवडे ते करा मात ॥७॥
अर्थ
देवा तुला जे वाटत आहे, ते माझ्या मुखाने तू मला बोलण्यास भाग पाडत आहे, परंतु या बोलण्याने काही लोकांना दुःख वाटत आहे. देवा ज्याला ज्या गोष्टीची आवड असते तो त्याच्यासाठीच तो धडपड करत असतो त्याप्रमाणे लोकांना या विषयाची आवड आहे त्यासाठीच ते धडपड करत आहेत. वैद्याने रोगी मनुष्याला कडू कढा करून दिला तर तो मूर्ख रोगी आपले तोंड मिटुन बसतो आणि तो कढा घेत नाही. तो रोगी मनुष्य जे खाऊ नको म्हटले नेमके तो तेच मागतो आणि त्याला जर हे खाऊ नको असे सांगितले तर तो रडू लागतो. वैद्याला कसली भिड आली रोगी मनुष्य बरा होण्यासाठी तो कडू काढा करून देणारच आहे आणि तो रोगी मनुष्य काढा नको म्हणतो या कारणामुळे तो जीवाला मुकतो. वैद्याने कोणत्याही भिडात पडून नये आणि वेगळे काही औषध सांगू नये कारण पथ्यच औषधाला साहाय्य करत असतात. धन,माया,पुत्र,घरदार याची आवड करणे म्हणजे नरकाच्या ठिकाणी आपला थारा निश्चित करणे असेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात लोक हो मी तुम्हाला चांगले व वाईट हे दोन मार्ग सांगितले आहेत मग तुम्हाला जे आवडेल ते करा कारण देवच माझ्या मुखाने बोलत आहे.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.