लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥१॥
मोजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥
कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥२॥
चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥३॥
तुका म्हणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥४॥
अर्थ
माझ्या अंगी असा एकही गुण नाही की ज्यामुळे लोकांनी मला मान-सन्मान द्यावा त्यामुळे जेव्हा लोक मला मानसन्मान देतात त्यावेळी मला खूप लाज वाटते.मापा मध्ये वस्तूचे मोजमाप केले जाते आणि हळूहळू ते माप देखील झिजत असते त्याप्रमाणे मी परमार्थ करत आहे,खरेतर हे देव कार्य आहे यामध्ये मला विनाकारणच मोठेपणा मिळत आहे परंतु अशा मोठेपणाला आग लागो.कोवळा काटा दिसण्यास अतिशय तीक्ष्ण वाटतो तजेलदार वाटतो परंतु त्या काट्याला तीक्ष्णता नसते तो पोचट असतो त्यामध्ये कडकपणा नसतो.भिंतीवरील चित्रे अतिशय उत्तम प्रकारे काढलेले असते परंतु त्याच्यामध्ये सजीवपणा नसल्यामुळे ते फीके असते.तुकाराम महाराज म्हणतात देवा अगदी त्याप्रमाणे मला तुझा अनुभव नाही त्यामुळे मी देखील वाया गेलो आहे असेच मला दिसते आहे.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.