चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती – संत तुकाराम महाराज अभंग – 1769
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥
विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥
दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्नीज्वाळा ॥२॥
आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥३॥
तुका म्हणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥४॥
अर्थ
ज्याचे चित्त शुद्ध आहे त्याचे शत्रू देखील मित्र होतात व त्याला वाघही खात नाही व साप काही करत नाही.त्याला विष जरी दिले तरी त्याचे अमृत होईल त्याच्यावर आघात जरी कोणी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यामुळे त्याचे हित होईल त्याच्या हातून अकर्तव्य जरी घडले तरी धर्मनीती प्रमाणे कर्तव्य घडल्यासारखे होईल.दुःख देखील त्याच्या साठी सुखाचे फळ घेऊन येईल त्याच्यासाठी अग्निज्वाला देखील शीतळ होतील.अशा मनुष्या विषयी सर्वांना “हा आपल्या प्राणापेक्षाही आपल्याला प्रिय आहे” असे वाटेल आणि सगळ्यांच्या अंतरंगात त्याच्याविषयी एक विध भक्तिभाव निर्माण होईल.तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचा अनुभव ज्या माणसाला येईल त्याने हे जाणून घ्यावे “नारायणाने आपल्यावर कृपा केलेली आहे” व निश्चिंत व्हावे.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.