मन माझें चपळ न राहे निश्चळ – संत तुकाराम महाराज अभंग – 1755
मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥
आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥
धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥२॥
तुका म्हणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥३॥
अर्थ
देवा माझे मन फार चपळ आहे ते निश्चिंत एका ठिकाणी राहत नाही ,एक घडी काय एक क्षण स्थिर राहत नाही. त्यामुळे हे नारायणा तू माझ्या विषयी उदास होऊ नकोस मी दिन आहे त्रासलेलो आहे त्यामुळे तु माझ्याकडे लवकर धाव घे. देवा माझे इंद्रिय माझ्या मनाचेच ऐकतात व माझे मन विषयाकडे ओढ घेते त्यामुळे माझ्या चित्ताची त्यांनी तडातोड केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा आता ह्या मनापुढे माझे काहीही चालत नाही आता तुच ह्या मनाला हरी नामाची ओढ लावुन एका ठिकाणी चित्त स्थिर करशील अशी अपेक्षा मी तुझ्यापाशी धरून राहिलो आहे.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.