धन्य ते पंढरी धन्य भीमातीर – संत तुकाराम महाराज अभंग – 1753
धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥१॥
धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥
धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥२॥
धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥३॥
धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥४॥
तुका म्हणे धन्य संसार ती आलीं । हरीरंगीं रंगलीं सर्वभावें सर्वभावें ॥५॥
अर्थ
सर्व वेद, शास्त्रांचे सार असा जो पांडुरंग त्याला पुंडलिकाने पंढरीत आणले आहे म्हणून ती पंढरी धन्य आहे व ते भीमातीर ही धन्य आहे. त्या ठिकाणी राहणारे लोकही धन्य आहेत कारण देवाच्या दारामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या घरी भक्ती प्रेमाचा सुकाळा आहे. त्या पंढरी मधील भूमि ही धन्य आहे तेथील झाडेझुडपे धन्य आहेत आणि तीर्थरूप सरोवरही धन्य आहे. त्या पंढरीतील नर व नारी हेही धन्य आहेत कारण त्यांच्या मुखामध्ये नेहमी विठ्ठलाचे नाम व चित्तामध्ये त्याचेच ध्यान आहे त्यामुळे हे पंढरी क्षेत्र ,पंढरी भुवन विठ्ठलाच्या आनंदाने व नामा ने गर्जुन गेले आहे. त्या पंढरीतील पशुपक्षी,कीटक,पाषाण देखील धन्य आहेत कारण या सर्वांसाठीच नारायणाने तेथे अवतार घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात या संसारात जन्माला येऊन जे सर्व भाविक हरी रंगात रंगले ते खरोखरच धन्य आहेत.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.