तुझें म्हणवितां काय नास जाला – संत तुकाराम महाराज अभंग – 1749

तुझें म्हणवितां काय नास जाला – संत तुकाराम महाराज अभंग – 1749

तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥
परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥
समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥२॥
लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥३॥
मृत्तिका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥४॥
तुका म्हणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥५॥

अर्थ

अरे विठ्ठला आम्ही स्वत:ला तुझे म्हणवून घेतले त्यामुळे आमचा काय नाश झाला काय तुझी किर्ती तेवढी ऐक. देवा तू पहिला निर्गुण होतास परंतू आम्ही तुझी भक्ती करुन तुला नामरुपाला आणले परंतू तुला आता आमचे उपकार राहिलेच नाहीत. आम्ही तुझ्यासाठी संसार समूळ देशोधडीला पाठवून दिला आणि त्यामधील आवड ममता सर्व टाकून दिली. अरे आम्ही आमच्या अंत:करणामध्ये लोभ, दंभ, काम, क्रोध, अहंकार याचा भारच राहाणार नाही असे केले. जशी माती पाषाण आहे तसेच आम्ही धन मानले आहे आणि आपले कोण आणि परके कोण हा भेदभावच आम्ही जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही तुझी प्राप्तीसाठी आमच्या देहावर उदार झालो मग याच्यापेक्षा आणखी दुसरा कोणता विचार केला पाहिजे ?”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.