गातां ऐकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥१॥
रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥
विषयांच्या सुखें अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥२॥
वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥३॥
तीर्थाटण नाहीं केले उपकार । पाळिलें शरीर पुष्ट लोभें ॥४॥
तुका म्हणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥५॥
अर्थ
हरीचे किर्तन भजन करण्यासाठी गाण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी जो कंटाळा करतो तो अघोरी अशा कुंभपाकी नरकामध्ये वास करतो. मग यम त्याच्यावर रागावतो त्याचा छळ करतो आणि त्याला विचारतो अरे नालायका तुला देवाने मुख आणि कान कशासाठी दिले तर केवळ हरीचे गुणगान गाण्यासाठी व ऐकण्यासाठीच. विषयाच्या सुखाकरता तू अखंडपणे जागतोस परंतू कधी एकादशीच्या दिवशी हरी जागरण करण्यासाठी तू कधीही जागला नाहीस. अरे तू पैसे कमवून केवळ मद्यपान सेवन केलेस परंतू घरी आलेल्या देवरुपी अतिथ्याला कधीही अन्नदान केले नाहीस. तू केव्हाही तीर्थाटन केले नाहीस केव्हाही कोणावरही परोपकार केले नाहीस केवळ शरीराच्या लोभाने तू निषिध्द अन्न खावून त्याला पाळले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा निर्लज्ज लोकांना संतांनी कितीही चांगले वचने सांगितले तरीही ते ऐकत नाहीत मग पुढे यांना यमाने केलेला दंड सहन करावा लागतो.”
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.