कासियानें पूजा करूं केशीराजा – संत तुकाराम महाराज अभंग – 1747
कासियानें पूजा करूं केशीराजा । हाचि संदेह माझा फेडीं आतां ॥१॥
उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥२॥
फळदाता तूंच तांबूल अक्षता । तेथे काय आतां वाहों तुज ॥३॥
वाहूं दक्षिणा तरी धातु नारायण । ब्रम्ह तें चि अन्न दुजें काई ॥४॥
गातां तूं ॐकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥५॥
तुका म्हणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप राम कृष्ण हरी ॥६॥
अर्थ
हे केशीराजा मी तुझी पूजा कशाने करु हा माझा संदेह आता तू फेड. तुम्हाला जर पाण्याने स्नान घालावे तर ते तुमचे स्वरुप आहे मग तेथे माझे काय खर्च होणार आहे देवा ? देवा गंधाचा सुगंध पुष्पांचा परिमळ तूच आहेस मग मी दुर्बळाने तुला काय अर्पण करावे ? हे अनंता, फळदाता तूच आहेस तांबूल, अक्षदा तूच निर्माण केलेल्या आहेस मग मी तुला काय वाहू देवा ? देवा तुला दक्षिणा किंवा सुवर्णरुपी धातू वाहावे तर ते तुझेच रुप आहे आणि अन्नरुपी नैवेदय तुला समर्पण करावा तर अन्न म्हणजे ब्रम्ह व ब्रम्ह म्हणजे तेही तूच आहेस. देवा तुला ओंकारस्वरुपाने आळवावा तर ते तूच आहेस आणि टाळी वाजवून तुझे भजन करावे तर सर्व नादाचाही तू नादेश्वर आहेस आणि तुझ्या भजनास नाचावयास कोठे गेले तर सर्व चरचरामध्ये तूच भरुन उरला आहेस त्यामुळे कोठे नाचावा हाही प्रश्नच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता माझ्याजवळ केवळ एकच भांडवल आहे ते म्हणजे तुझे नाम “रामकृष्ण हरी” आता तेच नाम मीधुप दीप म्हणून तुलाच अर्पण करीत आहे.”
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.