दुष्टाचें चिंतन भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला ।
पालथे घागरी घातलें जीवन । न धरीच जाण तें ही त्याला ॥१॥
जन्मा येउनि तेणें पतनचि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा ।
जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥
पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो ।
कुचर मुग नयेचि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥२॥
तुका म्हणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं ।
म्हणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥३॥
अर्थ
दुष्टाला जन्मभर जरी उपदेश केला तरी त्याच्या अंतरंगात वेगळेच चिंतन चालू असते. पालथ्या घागरीवर कितीही पाणी घातले तरी ती घागर कधीच भरणार नाही त्याप्रमाणे या दुष्टाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जो मनुष्य जन्माला येऊन केवळ तमोगुणानेच व्यापला आहे त्याने केवळ स्वत:चे पतनच करुन घेतले आहे. अशा मनुष्यांच्या जगण्याला आग लागो हे असे जन्मालाच का बरे आले असतील या संसारातच का बरे आले असतील ? एखादा दगड कल्पांतापर्यंत पाण्यात जरी ठेवला आणि त्याला शेवटी फोडून पाहिले तरीही तो ज्याप्रमाणे कोरडाच असतो. किंवा कुचर मूग स्वयंपाकासाठी घेतला त्याला शिजवले तर तो न शिजता तसाच राहातो. तुकाराम महाराज म्हणतात, “सगळया गोष्टींना उपाय आहेत परंतू दुष्ट लोकांना चांगले करण्याचा
—-
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.
प्रयत्न केला तरीही काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे या दुष्टांची संगती न करणे हेच भले आहे आणि यांच्याशी अबोला धरणे यातच आपले सर्व हित आहे