संत पंढरीस जाती -संत तुकाराम महाराज अभंग – 1742

संत पंढरीस जाती -संत तुकाराम महाराज अभंग – 1742

संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥१॥
माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥
केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥२॥
तुमचे पायीं पायतान । मोचे माझे तन मन ॥३॥
तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥४॥
तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥५॥
लागती पादुका । ते मी तळील मृत्तिका ॥६॥
तुका म्हणे पंढरिनाथा। दुजें न धरावें सर्वथा ॥७॥

अर्थ

जे संत पंढरीला जात आहेत त्यांच्या हाती मी माझा निरोप पांडूरंगाला पाठवित आहे. ती विनंती म्हणजे अशी की, हे देवा मी तुकाराम तुमचा अनन्यसेवक आहे तरी तुम्हाला माझा विसर पडू देवू नये. देवा तुमच्या महाद्वारामध्ये जी निरंतर केरसुणी आहे ती मीच आहे असे तुम्ही समजावे. देवा तुमच्या पायातील पायताण म्हणजे माझे शरीर आणि माझे मन आहे. देवा तुम्ही जो विडा खाऊन ज्या पीकदाणीत थुंकणार आहात तेथे मी माझे मुख पसरुन बसतो मग तुम्ही त्यालाच पीकदाणी समजा. देवा हे पंढरीराया तुमची विष्ठा म्हणजे माझ्या शरीराला चंदनलेपच आहे व तेच लेप मी माझ्या शरीराला लावीन. देवा तुमचे पाय जेथून जातात तेथे तुमच्या पादुकाच्या तळाखाली जी माती लागते ती माती म्हणजे मीच आहे असे तुम्हाला वाटू दया. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनाथा मला तुमच्यापेक्षा वेगळे कधीही समजू नका.”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.