काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न – संत तुकाराम महाराज अभंग – 1733
काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरासी लेपन चंदनाचें ॥१॥
नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥
काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥२॥
तुका म्हणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥३॥
अर्थ
जनावरापुढे मिष्टान्न ठेवून त्यांना त्याची चव कळणार आहे काय त्याचा काही उपयोग होणार आहे का आणि चंदनाची उटी गाढवाला लावली तरी काही उपयोग होणार आहे का ते पुन्हा उकिरडयातच जाऊन लोळणार आहे. त्याप्रमाणे देवा मला दुष्टांची संगती नको अजिबातच नको कारण ज्यांना हरीकथेतील ब्रम्हरसच समजत नाही त्यांच्या पंगतीला बसणे देखील मला नको वाटते. जर वानराला बसण्यास चांगल्या प्रकारचा बाज ज्यावर चांगल्या प्रकारची गादी टाकली त्याला अलंकार घालावयास दिले आणि खाण्यापिण्यासाठी उत्तम पदार्थही दिले तरी त्याच्या स्वभावगुणाप्रमाणे तो त्या सर्व गोष्टींचा नाशच करुन टाकणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो सर्पाला दूध किंवा अमृत पाजले तरी त्याचा काही उपयोग होत नाही कारण ते शेवटी पोटात गेल्यानंतर विषच तयार होते.”
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.