आठवूंचि नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥१॥
मन धांवे तेथें तिचेंचि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥
न लगे वोळावीं इंद्रियें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥२॥
तुका म्हणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥३॥
अर्थ
हा पांडूरंग मला इतर कोणत्याही व्यर्थ गोष्टी आठवू देत नाही व त्याविषयी आवडही निर्माण होऊ देत नाही कारण हा तीन्ही लोकांमध्ये भरुन राहीला आहे. माझे मन जिथे जिथे धावते तिथे तिथे या विठाईचेच प्रेमरुपी दूध मला मिळते व ते संपूर्ण सर्वकाळ आयते मिळते. आता माझ्या इंद्रियांना वळवण्याची गरज मला लागत नाही कारण सर्वत्र ही विठाईच भरुन उरली आहे त्यामुळे कोठेही जावे तेथे विठाईच राहाते मग इंद्रियांना इतर कोणत्याही विषयांकडे वळण्यास गरजच पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हा विठ्ठल आपले समचरण पाऊल विटेवर ठेवून बळकटपणे उभा आहे व आम्हीही त्याला कधी हलू देणार नाही.”
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.