आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ – संत तुकाराम महाराज अभंग – 1710
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥
माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥
बापुडा मी नव्हें दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥२॥
दृष्ट नव्हों आम्ही अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥३॥
संवसार आम्हां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥४॥
तुका म्हणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥५॥
अर्थ
आता मी कुठल्याही प्रकारे यातीहीन दिनहीन आणि कुळहीन नाही कारण माझी माता रखुमाई व पिता पांडुरंग आहे. अशाप्रकारे माझी माता पिता दोन्ही पक्ष शुद्ध आहेत म्हणून मीही शुद्ध आहे. मी आता वेडा, दुर्बळ, नकटा किंवा कोणाच्याही आधीन नाही. आता मी कोणत्याही प्रकारे दृष्ट, अभागी, आनाथ नाही कारण आमचा कैवारी हा सर्व समर्थ पंढरीचा राणा आहे. आता आम्ही सर्व संसार जिंकला आहे आमच्या भीतीने काळ देखील लपून बसला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही मनात तृप्त होऊन निर्भर झालो आहोत म्हणजे आनंदित झालो आहोत कारण आम्हाला सुखाच्या राशी जोडल्या गेले आहेत.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.