तुझा विसर नको माझिया जीवा – संत तुकाराम महाराज अभंग – 1702

तुझा विसर नको माझिया जीवा – संत तुकाराम महाराज अभंग – 1702

तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥
जाओ राहो देह आतां येचि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥
कुश्चीळ इंद्रियें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥२॥
पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥३॥
पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥४॥
तुका म्हणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥५॥

अर्थ

हे केशवा मायबापा तुझा विसर मला एक क्षण एक पळ देखील नकोय. देवा माझा देह जावो अथवा राहो तरी मला या देहा विषयी आवड आता थोडीच राहिली आहे? देवा हा देह तुझे गुणानुवाद गात नसेल तर त्यांचे पालनपोषण करून काय उपयोग आहे. पुत्र, पत्नी, बहीण, बंधू हे तर केवळ खाण्याच्या पंक्तीला बसणारे आहेत आता यांची संगती कोण करतो? हा देह पाच तत्वांचा उसना आणलेला असतो मग तो ज्याचा त्याला द्यावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुझ्या वाचुन इतर दुसरा कोणीही मला सोयरा नाही.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.