निष्ठुर उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचाचि ॥१॥
तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाईच्या कांता पांडुरंगा ॥ध्रु.॥
मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥२॥
पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥३॥
राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥४॥
तुका म्हणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥५॥
अर्थ
देवा मी तुम्हाला जर काही कठोर शब्दात बोललो असेल तरी तुम्ही राग धरू नका कारण आपला संबंध जुनाच आहे. हे रुक्मिणीकांता पांडुरंगा तूच माझा जन्मदाता आहेस तूच माझा जन्मदाता आहेस. देवा माझ्या मूळ स्वस्वरूपाचा ठेवा मी तुमच्या जवळ ठेवला आहे व मला त्याचा अधिकारही आहे केवळ द्वैता मुळेच मी तुमच्यापासून दूर झालो आहे. देवा मी पोटासाठी काहीतरी व्यवहार करू लागलो व त्यामुळे मी तुमच्यापासून अंतरलो. आपल्या दोघांमध्ये स्वामी आणि सेवक असा संबंध होता परंतु नंतर माझा संतांशी संग झाला व त्यांनी तू देव आणि मी भक्त दोन्ही एकच आहोत असे सिद्ध करून दाखवले. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तू आणि मी एकच आहोत त्यामुळे आता आपल्यामध्ये कोणतेच बंधन नको.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.