धरूनि पालव असुडीन करें – संत तुकाराम अभंग – 1694
धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥१॥
काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ध्रु.॥
अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं ॥२॥
रुसलेती तरी होईल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥३॥
सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥४॥
तुका म्हणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥५॥
अर्थ
देवा मी माझ्या हाताने चारचौघांमध्ये तुमचा पितांबर धरून ओढीन मग ही गोष्ट चांगली दिसणार आहे काय? मी तुम्हाला जोपर्यंत सवलत दिली आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या दोघांमध्ये काय ठराव झाला आहे याविषयी विचार करा. जोपर्यंत तुझ्या पायात आणि माझ्यात अंतर आहे तोपर्यंतच मी तुला बोलू देईल नंतर एकदा की मी तुझ्या पायाशी मिठी मारली की मग मी तुला हालुच देणार नाही. देवा तुम्ही जर माझ्यावर रुसला आहात तर मग मी तुमची समजूत काढीन पण एकदा की तुमची मी समजूत काढली तर मला भेटण्या विषयी तुम्ही तातडी करा. देवा तुझ्या पायाची प्राप्ती ज्या कारणामुळे होईल त्याच ठिकाणी आम्ही आमचा भक्तिभाव दृढ करून ठेवु देवा. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की तुझ्या प्राप्तीचे वर्म मला समजले की मग तुझी प्राप्ती करण्यासाठी जे काही खटपट करावी लागते ती चुकलीच समजा
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.