दावूनियां कोणां कांहीं – संत तुकाराम अभंग – 1690
दावूनियां कोणां कांहीं । तेचि वाहीं चाळविलीं ॥१॥
तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥२॥
उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळई ॥३॥
दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥४॥
तुका म्हणे पायांसाठी । करींतो आटी कळों द्या ॥५॥
अर्थ
देवा तुम्ही तुमच्या भक्तांना काहीतरी आमिष दाखवून फसविले आहे तसेच मलाही फसवत आहात काय? देवा माझा भक्ती भाव अतिशय शुद्ध आहे त्यामुळे माझ्याशी तुम्ही तसे काही करू नका. परमार्थामध्ये भक्ती उत्कृष्ट पद्धतीने न व्हावी यासाठी रिद्धी सिद्धी आड येत असतात. उन्हात झळायामुळे मृगजळाचा भास होतो मग हरीण त्याच्यामागे ऊर फुटेपर्यंत पळत असते व ते मृगजळ त्याला आपल्याकडे मोहन घेते. मूर्ख व्यक्ती आरश्यामध्ये धनाचे प्रतिबिंब दिसले की ते धन घेण्यासाठी चरफड करते. तुकाराम महाराज म्हणतात देवा केवळ तुमच्या पायाची प्राप्ती व्हावी यासाठी मी आता आटाआटी करत आहे हे तुम्ही लक्षात घ्यावे.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.