जेणें वेळ लागे – संत तुकाराम अभंग – 1689
जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥१॥
कंठ कंठा मिळों देई । माझा वोरस तूं घेई ॥ध्रु.॥
नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥२॥
टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥३॥
हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥४॥
तुका म्हणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥५॥
अर्थ
हे पांडुरंगा माझी भेट घेण्याकरता तुला एवढा वेळ का लागत आहे ज्या कारणामुळे तुला इतका वेळ लागत आहे आता ते कारण बाजूला सार. देवा तू माझ्या गळ्याला गळा मिळव माझी भेट घे आणि माझ्या भक्तीचा रस तू प्रशांत कर. माझी भेट घेताना तुझे पितांबर आणि अलंकाराची तू सावरासावर करू नकोस. देवा माझ्या लौकिकाचे तू कौतुक करू नकोस आणि माझ्यासाठी काही खाऊ आणला असेल तर तो बाजूला टाकून दे. देवा मला आलिंगन देताना मी अपवित्र आहे म्हणून अंग चोरी करू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा एकदा तू मला आलिंगन दिले की मग तुझे अलंकार व पितांबर तू सावरत बस.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.