नको ऐसें जालें अन्न । भूक तहान ते गेली ॥१॥
गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥
राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥२॥
देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥३॥
जाऊं नेदीं करितां सोस । क्षमा दोष करवीन ॥४॥
तुका म्हणे याचे पाठी । आता साटी जीवाची ॥५॥
अर्थ
मला अन्न नकोसे झाले आहे आणि तहान भूक तर कोठे गेली समजत नाही. कारण माझ्या जीवाला गोविंदाची आवड लागली आहे आणि त्याची सेवा मी तृप्त होईपर्यंत करणार आहे. या गोविंदाच्या सेवेपुढे मी माझ्या देहाचे सर्व धर्म सर्व कर्म ते बाजूला राहिले तर खुशाल राहू देत. हा देह धारण केल्याचे फळ म्हणजे नारायणाची सेवा आहे आणि त्याच्या सेवेत जाणारा देखील सर्वकाळ धन्य आहे. या गोविंदाची सेवा करताना मला कितीही कष्ट झाले तरी मला त्याची पर्वा नाही आणि माझ्याकडून जे दोष घडतील त्याची क्षमाही मी त्याच्याकडून करुन घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, “मी माझा जीवच या गोविंदाला अर्पण केला आहे आता त्याची पाठ कधीही मी सोडणार नाही.”
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.