जैसें तैसें राहे देवाचें हें देणें – संत तुकाराम अभंग – 1658
जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥१॥
दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥
मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों कांहीं ॥२॥
तुका म्हणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥३॥
अर्थ
आपण जशा प्रकारची भक्ती करू तशा प्रकारचे देणे देव देत असतो परंतु आपण जर सात्विक मनाने भक्ती केली तर काय असाध्य आहे? जो अनन्य भक्तीने हरीचा दास झालेला असतो त्याची कृपासिंधू हरी सर्व प्रकारची अंतरंगातील व्यथा जाणतो व त्याची कधीही उपेक्षा करत नाही. लहान बाळाला कोणत्या वेळी काय मागावे हे समजत नाही परंतु त्या बाळाला कोणत्या वेळी काय द्यावे, काय करावे लागते याचे वर्म हे कोणालाही समजणार नाही ते केवळ त्याच्या आईलाच समजते आणि ती आई त्या बालकाला काहीच कष्ट होऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या बाबतीत हा अनुभव माझ्या अंगी भिनलेला आहे देव भक्तांची उपेक्षा करतो हे मी मानत नाही.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.