आनुहातीं गुंतला नेणे बाह्य रंग । वृत्ति येतां मग बळ लागे ॥१॥
मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले अवयव आवरीतां ॥ध्रु.॥
आणिकांची वाणी वेद तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥२॥
तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥३॥
तुका म्हणे बाह्य रंग जो विटला । अंतर निवाला ब्रम्हरसें ॥४॥
अर्थ
एकदा की वृत्ती अंतर्मुख झाली तर तिला बाह्य अवस्था समजत नाही आणि वृत्तीला बहिर्मुख करण्यास फार कष्ट लागतात. मद्यधुंद व्यक्तीला ज्याप्रमाणे आपले अवयव आवरता येत नाही आपले इंद्रिये त्याच्या स्वाधीन नसतात अगदी त्याप्रमाणे ज्याची वृत्ती अंतर्मुख झालेली असते त्याची अवस्थाही अशीच असते. त्याचे इंद्रीय त्याच्या स्वाधीन नसतात आणि त्याची वृत्ती अंतर्मुख झालेली असते तो कधीही कोणाशी काहीही बोलत नाही आणि जरी तो बोलला तरी दुसऱ्याच्या हितासाठीच बोलतो आणि त्याला सुख-दुःख याची जाणीवही राहत नाही. अंतर्मुख वृत्ती विषयी त्याने जर लोकांना अनुभव सांगितला तर लोकांना त्याचे आश्चर्य वाटते एवढेच नाही तर, हे काहीतरी विपरीत तच आहे असे लोकांना वाटते. तुकाराम महाराज म्हणतात जो बाहेर अंगाला पूर्णपणे विटला तो अंतर्मुख होऊन ब्रम्हरसामध्ये स्थिर झाला आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.